त्यांना विनम्र अभिवादन...!
मराठीतील 'साहित्य सरस्वती' म्हणून ज्याची ओळख सांगता येईल अशा शांताबाई शेळकेंनी मराठी साहित्यातील सर्व प्रकार हाताळले आहेत. म्हणूनच ख्यातनाम हिंदी-उर्दू कवी गुलझार आपला त्रिवेणी हा काव्यसंग्रह त्यांना अर्पण केलाय त्याच्या अर्पण पत्रिकेत त्यांनी म्हटलंय......!
शांताबाई.......
आप सरस्वती की तरह ही मिली
और सरस्वती की तरह ही गुम हो गयी
ये त्रिवेणी
आप ही को अर्पित कर रहा हूँ।
- गुलज़ार
--------------------------------------------
शांताबाई शेळके सरस्वती नदीसारख्या त्या लुप्त पावल्या असल्या तरी त्यांच्या साहित्यस्रोतानं आपल्या भावविश्वाची वनराई अजून हिरवीगार आणि टवटवीत ठेवलीय. शांताबाई म्हणजे एक कल्पवृक्षचं! असंच कायम वाटत राहतं. त्या वृक्षाखाली बसून फक्त म्हणायचं बालसाहित्य की झालाच बघा बालसाहित्याचा वर्षाव.. म्हणा कविता, गीत, लेख, समीक्षा, भाषांतरं, मुलाखत…! आपल्या रसिक मनाच्या एक एक इच्छा पुऱ्या होत राहतात. त्यातील वैविध्य बघून आपण थक्क होत राहतो. काव्य, गीतं या एका प्रांतातील शांताबाईची विविधता विस्मयचकित करणारी आहे. त्याबद्दल बरंच लिहिलं, बोललं गेलंय. इतर प्रांतात त्यांची मुशाफिरी बघून वाटत त्यांची प्रतिभा ही विशिष्ट वर्तुळात फिरणारी नाही. ती एखाद्या निरागस बालिकेसारखी मुक्त आहे. कधी ती झाडावर चढेल तर कधी माळरानात मनसोक्त हुंदडेल.. तर कधी इंद्रधनुष्याचे पंख लाऊन आकाशात भरारी घेईल तर कधी नदीत सूर मारून तिचा तळ शोधेल..! ‘धुळपाटी’ या पुस्तकांला त्याचं आत्मचरित्र समजलं जातं. पण ते माझं आत्मचरित्र नाहीये तर त्या आठवणी आहेत, असं त्यांनीच सांगितलंय. मग शांताबाईंनी आत्मचरित्र हा प्रकार का हाताळला नसावा? हा प्रश्न पडणाऱ्यांना माहिती नसेल तर आहे की शांताबाईचं आत्मचरित्र. शांताबाईंनी जे लेख लिहिले आहेत ते म्हणजेच त्यांचं आत्मचरित्र! शांताबाई आपल्याला समजत जातात ते त्याच्या वेगवेगळ्या लेखातून. त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, एखाद्या गोष्टीकडं बघण्याची ताकद, त्याबद्दलचं मार्मिक विश्लेषण आणि त्यातून व्यक्त होणारी त्यांची मतं आणि भूमिका.
लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य हा त्यांचा आवडीचा विषय. लोकसाहित्य म्हणजे महाराष्ट्राचं जनजीवन, ग्रामीण माणसाचं वास्तव दर्शन- साधं, सरळ, भाबडं; पण कारुण्यानं ओथंबलेलं. असं हे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती शांताबाईंच्या साहित्याचा मूळ आधार आहे. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर शांताबार्इंचं प्रभुत्व होतं. वाङ्मयाचे सगळेच प्रकार जरी त्यांनी हाताळले असले तरी गीतकर म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रीत करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून आपल्याला जाणवतं. विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं. शांताबार्इंचं खेड्यात रमलेलं बालपण, भाषेवरचं प्रेम, प्रभुत्व आणि विविध वाङ्मयप्रकारात अभिव्यक्त होण्याची त्यांची क्षमता यामुळेच त्याचं साहित्य अनेक साजांत रूपवान ठरतं. शांता शेळके यांच्यावर खेड्यातल्या मुक्त वातावरणाचे संस्कार झाले असल्यामुळेच की काय, त्यांच्या गाण्यातील शब्द स्त्री गीतांतील मार्दव ठेवून येतात. ते शब्द रसिकांच्या काळजात चटकन झिरपणारे असतात. स्त्रीमनाच्या भावनांचा वेध घेणारी शांताबाईंची अनेक गाणी आहेत. ती गाणी त्या त्या वेळच्या स्त्रीमनाची अवस्था व्यक्त करतात. खट्याळ रंगाबरोबर विषण्णता, नवथरपणाबरोबर धीटपणा असणारी अशी उडत्या लयीतील गाणी शांताबाईंनी खूप लिहिलेली आहेत. शांताबाईंच्या कवितेत कधी कधी धीट शृंगार असला तरी त्यांनी कधी मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. उलट त्यांच्या कवितेत सरळ, शुद्ध, निरागस आत्माविष्कार दिसून येतो. त्यामुळेच त्यांचं साहित्य काळजाला स्पर्शून जातं. ‘असा बेभान हा वारा’, ‘वर्षा पाण्यावरच्या पाकळ्या’, ‘किनारे मनाचे’, ‘अनोळख’ हे त्यांचे काव्यसंग्रह चोखंदळ वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. शांताबाईंच्या काव्यलेखनात अनेक प्रकारच्या सूक्ष्म तरल संवेदना आपल्याला जाणवतात. गाण्यातलं मराठीपण त्यातल्या सुगंधासह जपण्यासाठी अस्सल ग्रामीण शब्द गाण्यात घालताना त्यांची प्रतिभा कचरत नाही. सखे, सये अशा संबोधनातून ते घरच वाहू लागतं. उनाड मनाच्या अवखळ प्रियकराचा अल्लडपणा, त्याचं प्रेयसीला चिडवणं हे सगळं त्या मोठ्या मिश्कीलपणे व्यक्त करतात. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक गीतांतून स्त्रीमनाच्या छटा त्यातील स्वाभाविकतेसह व्यक्त केलेल्या आहेत. प्रियकराच्या मनातील विरह, प्रीती, धैर्य, बेछूटपणा यांचाही प्रत्यय देणारी त्यांची अनेक गाणी आहेत. कोणत्या तरी दाहक वेदनेचा चटका बसून संपूर्ण आयुष्यालाच एक रिक्तता यावी, अशी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. शांताबार्इंची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देतात.
‘नवयुग’मध्ये असताना अत्रे एकदा त्यांना म्हणाले, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्रचुर भाषाशैली बदलली.
कविता कशा सुचतात, गीते कशी आकार घेतात, या प्रक्रियेबद्दल त्यांनी स्वत:च केलेले भाष्य 'माझ्या जुन्या कविता वाचताना, ध्वनिमुद्रित झालेली गीते ऐकताना किंवा संकलनातून वाचताना त्या कविता आपल्याला कशा सुचल्या ते मला आठवतं. कवितेबद्दल बोलायचं झालं तर ती कशानेही सुचते. नजरेत भरलेले एखादे दृश्य, एखादेच चित्र, एखादं अवतरण, रस्त्याने जाताना सहज कानावर पडलेलं वाक्य, निसर्गाची विविध रूपं आणि मनात जागवलेली भाववृत्ती. अकारण येणारी उदासीनता किंवा दाटून येणारा उल्हास यातलं काहीही कविता सुचायला कारणीभूत ठरतं. मनात एखादी प्रतिमा तरंगत येते, त्याभोवती शब्दांचे मोहोळ जमते आणि कविता भरभर जुळत जाते!' वाङ्मयात नवनवीन प्रकार आहेत, नवकथा, नवकविता आली, प्रतिमासृष्टी कवितेत वाढली. या नवसाहित्याचं शांताबाईंनी स्वागतच केलं; पण त्यांच्या कवितेत पूर्णपरंपरेशी असलेलं नातं त्यांनी कधीच सोडलं नाही. म्हणून त्यांची कविता आजही नवीन आणि टवटवीत वाटते. खरं तर शांताबाई आज आपल्यात नाहीत; पण त्यांचं साहित्य वाचताना त्या अजून आपल्यातच आहेत, असा भास होतो. ‘धूळपाटी’सारखं त्याचं आत्मचरित्र वाचताना मन गलबलून जातं. ‘लता’ आणि ‘वेचक राजाध्यक्ष’ ही त्यांची महत्त्वाची दोन संपादनं. लहान मुलांसाठीही त्यांनी विपुल लेखन केलं. प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी बाबर यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षं लोकसाहित्य समितीचं काम केलं. शांता शेळकेंनी साहित्यातील किती तरी क्षेत्रं सहज ओलांडली. वाङ्मयाच्या क्षेत्रात त्यांनी स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं. संस्कृत ‘मेघदूत’चा त्यांनी मराठीत केलेला अनुवाद काळजाला स्पर्शून जातो. शांताबाईंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या गीतांतून व्यक्त केल्यात. आळंदी इथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना देऊन रसिक श्रोत्यांनी, वाचक, साहित्यिकांनी त्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव केला. आजपर्यंत बोटावर मोजण्याएवढ्याच महिलांना हे भाग्य लाभलं. शांताबाईंचं जीवन हे साहित्यातून व्यक्त होतं. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल एकाच वाक्यात म्हणता येईल की, त्या प्राजक्तासारख्या फुलांना आयुष्यभर उधळीत राहिल्या.
शांताबाईंचे आजोबा, वडिलांचे वडील अण्णा हे शाळामास्तर होते. शांताबाईंचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर. त्यांच्या बदलीच्या नोकरीमुळं चिखलदरा, नांदगाव, खर्डी या गावातही त्यांना वास्तव्य करावं लागलं. त्यांच्या वडिलांना त्या दादा आणि आईला अंबिकाबाईंना वहिनी म्हणत. एकूण ही पाच भावंडं त्यात शांतबाई सगळ्यात मोठ्या. आईच्या मृदू स्वभावाचं, तिच्या चित्रकलेचं, तिच्या वाचनवेडाचं संस्कार कळत-नकळत शांताबाईंवर होत राहिले. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीतं, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत. त्यामुळं कवितेची आवड, वाचनाची आवड, त्या संस्कारक्षम वयात रूजत गेली. १९३० मध्ये शांताबाईंच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी त्या नऊ वर्षांच्या होत्या. चौथीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं होतं. यानंतर सारे पुण्याला काकांकडं आले. अखेर पुढील शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागेत झालं. सुसंस्कृत सुविद्य, अभिजात अशा या शाळेतील वातावरणाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. १९३८ मध्ये त्या मॅट्रीक झाल्या आणि पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून बी. ए. झाल्या. प्रा. श्री. म. माटे, प्रा. के. ना. वाटवे, प्रा. रा. श्री. जोग यांच्यामुळं अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत गेली. या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले. कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला. प्रा. माटे यांच्या त्यावरील अभिप्रायानं त्यांना लेखनासाठी हुरूप आला. हळूहळू त्या कविता, लेख, लिहू लागल्या. बी.ए. झाल्याबरोबर मुक्ता आणि इतर गोष्टी नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही निघाला. याला प्रा. माटेसरांनी प्रस्तावना लिहिली. १९४४ मध्ये संस्कृत घेऊन शांताबाई एम्.ए. झाल्या. या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळालं. एम्.ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठा त दोनतीन वर्षे काम केलं. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना इथं मिळाली. अनेक साहित्याविषयक गोष्टी त्यांना इथं शिकायला मिळाल्या. नागपूरचं हिस्लॉप कॉलेज, मुंबईचं रूईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केलं. कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. वर्षा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रूपसी, तोच चंद्रमा, गोंदण, अनोळख, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, जन्मजान्हवी, चित्रगीते, पूर्वसंध्या, इत्यर्थ हे त्यांचे इतर काव्यसंग्रह. तर मुक्ता, गुलमोहोर, प्रेमिक, काचकमळ, सवाष्ण, अनुबंध, बासरी, कविता करणारा कावळा, सागरिका, ह्या बालकविता संग्रह. आणि कथासंग्रह, कादंबऱ्या विझली ज्योत, नरराक्षस, पुनर्जन्म, धर्म, ओढ, स्वप्नतरंग, कोजागिरी, मायेचा पाझर तर शब्दांच्या दुनियेत, आनंदाचे झाड, धूळपाटी, पावसाआधीचा पाऊस, एकपानी, वडीलधारी माणसे, संस्मरणें, मदरंगी, सांगावेसे वाटले म्हणून हे ललितलेखन इत्यादि विपुल अशी त्यांची साहित्यसंपदा प्रकाशित झालीय. धूळपाटी हे त्यांचे आत्मपर लेखन आहे. तालपुष्कर, आंधळ्याचे डोळे, औट घटकेचा राजा, चौघीजणी, गाठ पडली ठका ठका, गवती समुद्र, आंधळी, गाजलेले विदेशी चित्रपट, पाण्यावरल्या पाकळ्या, मेघदूत असे अनेक अनुवादही शांताबाईंनी केले आहेत.
विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांचं पहिलं आणि खरं प्रेम राहिलं ते कवितेवरचं. हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ सारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत. शांताबाई बी.ए.च्या पहिल्या वर्षात असताना म्हणजे १९४१ मध्ये त्यांची पहिली कविता ‘शालापत्रक’ मासिकात छापून आली. तीही काहीशी बालगीतं या स्वरुपात. एकीकडं अनेक कवींच्या, विशेषत: माधव ज्युलिअन यांच्या काव्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळं सुरुवातीला त्या वळणाची शब्दबंबाळ कविताच त्या लिहित राहिल्या. पण ‘गोंदण’ पासून शांताबाईंची कविता कुणाच्याही अनुकरणापासून दूर असलेली कविता म्हणून, शांताबाईंच्या कवितेला चेहरा मिळाला. त्यांची कविता अधिकाधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रगल्भ होत गेली. बालपणाच्या सुखद आठवणी, प्रेम वैफल्य, मानवाच्या अपुरेपणाचा वेध, एकाकीपण,मनाची हुरहूर, सृष्टीची गूढता हे सारे काव्यविषय गोंदणपासून पुढील कवितेत अधिक प्रगल्भपणे प्रतिमारूप धारण करून वाचकांसमोर येतात. वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली. तेवढ्याच सहजतेनं त्यांनी गीतं, बालगीतं, सुनीतं आणि मुक्तछंद रचनाही केल्या. ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीतं लिहिणारी गीत लेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, सलील चौधरींसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी चालीबरहुकूम अशी अनेक गीतं लिहिली. हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिलेली, सर्वांत गाजलेली लोकप्रिय गीतं म्हणजे ‘वादळवारं सुटलं गं’, ‘वल्हव रे नाखवा’, ‘राजा सारंगा, राजा सारंगा’ ही होत. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या 'वासवदत्ता' आणि 'हे बंध रेशमाचे ' या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली. अशाप्रकारे कवितेच्या विविध रूपात, विविध लेखनप्रकारात त्या रमलेल्या होत्या. संतांच्या काव्यातील सात्विकता, पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहिराच्या काव्यातील ललितमधुर उन्मादकता शांता शेळके यांच्या कवितेत आढळते. शांता शेळके यांच्या कथा ह्या त्यांनी बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचे शब्दचित्र आहे. प्रौढ वयात अनुभवलेलं शहरी जीवनातील अनुभवही नंतर त्यांच्या कथेत आले आहे. मनोविश्लेषण किंवा धक्कातंत्र या निवेदनशैलीचा वापर न करता अगदी सहज रोजच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या कथा अभिव्यक्त होतात. हीच बाब त्यांच्या ललित लेखनाबद्धल मांडता येते. रोजच्या दैनदिन अनुभवाला एक मानवी, वैश्विक स्तर देवून त्यांनी ललितलेखन केलंय. मानवी जीवनाकडं बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी, मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता यापोटी मिळालेले अनुभव अतिशय चिंतनशिलतेतून शांता शेळके यांनी त्यांच्या ललितलेखनातून मांडलंय. अनुवादित कृतीला स्वतंत्र निर्मितीच्या जवळपास नेण्याची दृष्टी ठेवून अनुवादातून जवळजवळ पुनर्निर्मितीचा आनंद मिळावा ह्या गांभीर्यानं शांताबाईंनी त्यांचे अनुवाद कार्य केलंय. सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांताबाईंची साहित्य वैशिष्टे होत. अवतीभवतीचा सामाजिक, सांस्कृतिक अवकाश त्यांनी याच सौंदर्यदृष्टीतून आणि सहजतेतून अभिव्यक्त केला आहे. डेक्कन बालमित्र मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचा कुसुमाग्रज पुरस्कार, ग .दि .माडगुळकर पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.त्याबरोबरच १९९६ मध्ये आळंदीत भरलेल्या ६९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं होत.
शांताबाई शेवटपर्यंत मनमोकळ्या, दिलखुलास जगल्या. कोणता वेगळा मुखवटा चढवण्याची त्यांना गरज भासली नाही. प्रवीण दवणे यांच्या एका लेखात त्यांनी एक किस्सा सांगितलाय. एकदा शांताबाईच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. त्यांच्या एका मुलाखतीचं शीर्षक होतं, ‘शांताबाई : एक शांत, तृप्त व्यक्तिमत्त्व.’ त्या मुलाखतीच्या आरंभीच शांताबाईंनी मोकळेपणाने सांगून टाकलं, ‘मी शांत तर नाहीच, तृप्त तर अजिबातच!’ श्रोत्यांना धक्काच बसला. शांताबाई असं काय म्हणतात! शांताबाई बोलल्या ते खरंच होतं. खरा जातिवंत, कलावंत कधीही शांत, तृप्त नसतो. त्याची अस्वस्थता त्याच्या नवतेचा शोध, त्याची तडफड, त्याची तहान हेच निर्मितीचे स्रोत आहेत. शांताबाईंनी हे स्रोत जपलं. म्हणून त्या कायम काळाबरोबर राहिल्या. म्हणून त्या कधीच जुन्या झाल्या नाहीत. त्याच्या डोळ्यात जगाबद्धलचं कुतूहल, प्रत्येक क्षणीचं प्रेम, भरभरून देण्याची उर्मी, व्यक्तीबद्दलचा आदर यामुळं त्या मराठी रसिकजनाला आपल्या घरातल्या वाटल्या. डोळ्यासमोर उभा राहतो तो साहित्यातून आपल्या घरातल्या झालेल्या शांताबाईचा शांत, शीतल निर्मळ चेहरा..! अशा या ऋजु, भावुक, प्रसन्न, स्नेहाळ शांताबाई! आज त्या आपल्यात नाहीत; पण त्यांची ही कविता म्हणजे त्यांच्या आयुष्यातली भैरवीच आहे. त्या म्हणतात -
असेन मी नसेन मी
तरी असेल गीत हे
फुलाफुलात येथल्या
उद्या हसेल गीत हे
असं तृणात लवलवणारं, अश्रूतून ओघळणारं, फुलात हसणारं त्यांचं हे गीत भावभावनांची विविधता व्यक्त करतं. खरं म्हणजे शांताबाईंच्या अंतर्मनात दडून बसलेलं स्त्रीत्व असं स्वाभाविकपणे आणि सूक्ष्मपणे अनेक कवितांतून शब्दाशब्दांतून प्रकट होतं. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन....!
हरीश केंची
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment