Monday, 2 June 2025

शिवजन्माचा जागर.....!


"मराठी माणसानं एकदा तरी रायगड चढायलाच हवा. रायगड ही महाराष्ट्राची शान आहे. मराठ्यांची ती ताठ मान आहे. मराठ्यांचा राजा या रायगडावर छत्रपती झाला. शिवरायांनी रायगडावर राज्याभिषेक का करून घेतला याबद्धल असं म्हणतात की, मानवी रक्त न सांडलेल्या भूमीवर आपला राज्याभिषेक व्हावा अशी महाराजांची इच्छा होती. ती राज्याभिषेकासाठी निवडली. कन्नड कवी लिंगप्पा यानं १७७० मध्ये लिहिलेल्या '' मध्ये 'भू तलात आश्चर्यकारक म्हणून गणली जाणारी रायरी' असं रायगडाचं वर्णन केलंय!"
-----------------------------------------------
राजधानी रायगड
रायगड तुटलेल्या कड्यांमुळे सह्याद्रीच्या रांगांपासून अलग वाटतो. पण जणू सह्याद्रीच्या रांगा रायगडाला वेढून उभ्या आहेत. असंही वाटतं. स्वराज्याचं तोरण जिथं शिवरायांनी बांधलं, तो तोरणा रायगडाच्या पूर्वेला वीस मैलावर असून रायगडाहून हजार फूट अधिक उंच आहे. या तोरण्यावरून रायगडचं फारच सुंदर, स्पष्ट दर्शन होतो. पुणे, मुंबई, सातारा रायगडपासून सारख्या अंतरावर आहे. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांचा पाडाव करून हा रायरी किल्ला ताब्यात घेतला आणि त्याला रायगड नाव देऊन स्वराज्याची राजधानी बनवलं.
मोठेपणाची जाणीवच नाही
छत्रपती महाराष्ट्रात झाले हे महाराष्ट्राचं भाग्य आणि छत्रपतींचे दुर्भाग्य....! असं अनेकदा वाटतं. छत्रपतींच्या मोठेपणाची अजूनही आम्हाला पुरती जाणीवच झालेली नाही. छत्रपतींचे मोठेपण आम्ही नीट अभ्यासलेलेही नाही. बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई यांनी लिहलेल्या छत्रपतींच्या कादंबऱ्या आहेत. पण एक राष्ट्रपुरुष म्हणून ज्या तऱ्हेनं छत्रपती सादर व्हायला हवेत तसे अजूनही सादर झालेलं नाहीत. दत्तो वामन पोतदार आणि त्याही आधी त्र्यं. शं. शेजवळकर महाराजांचं चरित्र लिहिणार होते. दुर्दैवानं ते लिहिण्याआधीच पोतदार, शेजवळकर गेले. शेजवळकर यांनी त्यांच्या संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना लिहिलीय आणि ती प्रस्तावना त्यांनी केलेल्या आराखड्यासह आणि जमलेल्या साधनांसह 'मराठा मंदिर'ने ते प्रसिद्ध केलीय. १९६४ साली छापलेल्या या ६४० पानांच्या ग्रंथाची किंमत फक्त ३० रुपये आहे, अन् या ग्रंथात जे आहे त्याचे मोल अफाट आहे. शिवाजी महाराजांचे मोठेपण शेजवळकर निश्चितपणे सिद्ध करू शकले असते.
मेहेंदळे यांचं शिवचरित्र
प्रत्येक प्रसंग, प्रत्येक नोंद, प्रत्येक दंतकथा याचा अभ्यास करून शुद्ध सत्य पारखून घेऊन शिवाजी साकारण्याचा शेजवळकरांचा प्रयत्न होता. गजानन भास्कर मेहंदळे यांनी असाच महत्वाकांक्षी आणि महत्वाचा प्रयत्न चालवलाय. 'श्री राजा शिवछत्रपती' या ग्रंथाचा खंड-१, भाग-१, त्यांनी स्वतःच प्रसिद्ध केलाय. त्याची पानं आहेत १०८० आणि फक्त अफझलखान वधापर्यंतच शिवचरित्राचा मागोवा त्यात आहे. चरित्र म्हणजे कथा, कादंबरी नव्हे. याची जाणीव ठेवून हा प्रयत्न मेहंदळे यांनी केलाय आणि स्तुतिस्तोत्राचे स्वरूप या ग्रंथाला येऊ नये याची दक्षता ते घेत आहेत. पण त्यांचे हे चरित्र पुरे होईल याची खात्री नाही. जेम्स लेन प्रकरण उदभवलं त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला. या आघाताच्यावेळी त्यांनी लिहिलेल्या दुसऱ्या खंडाची पाने त्यांनी फाडून टाकली होती आणि आता आपण शिवचरित्र लिहिणार नाही, असं त्यांनी त्रासून, चिडून म्हटलं होतं. 'केवलं सुसंगती म्हणजे सत्य नव्हे' अशी खात्री झाल्यानं विश्वसनीय साधनांतून जास्तीत जास्त तपशील वेचून काढून शिवचरित्र लिहायचे व्रत मेहंदळे चालवत आहेत. पहिल्या खंडाचं लेखन त्यांनी पुरे केले आहे. दोन खंड लिहायचे आहेत. पहिल्या खंडातला अर्धाभाग छापलाय. त्यासाठी मेहंदळे यांनी जीवाचा जसा आटापिटा केलाय हे एकदा या खंडाच्या प्रस्तावनेत वाचलं तर लक्षात येईल.
देशी विदेशी भाषेत शिवचरित्र हवे
महाराजांचे भव्यदिव्य स्मारक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करायला सरकार तयार आहे. उद्यान, पुतळा, संग्रहालय अगदी समुद्रातही पुतळा अशा कल्पनाभोवतीच स्मारक फिरते आहे. छत्रपतींचे विश्वसनीय समग्र चरित्र, त्यांचे मोठेपण सिद्ध करणारे, विविध पैलूंवर प्रकाश पाडणारे ग्रंथ निव्वळ मराठी भाषेत नव्हेत, अन्य भारतीय आणि मुख्य आंतरराष्ट्रीय भाषेत करण्याची आमची कुवतच दिसत नाही. साहित्य संमेलनावर एक कोटी रुपये खर्च करायला आम्ही तयार! मात्र छत्रपती शिवरायांमुळे आम्ही हिंदू म्हणून शिल्लक राहिलो त्यांचे चरित्र निघावं म्हणून कुणी 'महाकोश' उभारायला मात्र तयार नाही. शिवरायांचे गडकोटकिल्ले आज भग्नावस्थेत आहेत तिकडं कुणाचं लक्ष देत नाही.
आमच्याकडं दानतच नाही
मुंबईचा विमानतळ आता महाराजांच्या नावानं पावन झालाय. पण या विमानतळावरून  येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना महाराजांचं मोठेपण सांगणारी छोटी छोटी विविध भाषेतली  तोंडओळख पत्रके काढायचं कुणाला सुचणार नाही. आपल्या माणसाला मोठं करायची आमची दानतच नाही. आणि मोठ्या माणसाचं मोठेपण ओळखण्याची आमची कुवत नाही. असं म्हणायचं का? शिवाजी महाराज कसे होते, याचा अनेकांगाने शोध घेता येतो, ते सांगणारं एक कवन आहे, ते असे
गेला भोक्ता गडांचा 
हयगजपतीचा आणि त्या भूपतींचा।
शुरांचा सज्जनांचा ऋषीजनमुनींचा
आणि त्या देवतांचा।भक्तांचा पंडितांचा 
चतुर सुमतीचा साबड्या भाविकांचा।
नाना विद्याकवींचा कुशल जगतीचा
बोलक्या नेमकांचा।
या प्रत्येक गोष्टीचा विस्तार केला तर एक ग्रंथ ' शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व साकार करणारा ' होईल की नाही!
रामदासांचा शब्द जाळ
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला त्याआधी देशस्थिती काय होती, याच विदारक चित्र इतिहासात उभं केलंय. काव्यात शब्दाची मर्यादा सांभाळीत केलेल्या वर्णनानेसुद्धा मन कासावीस व्हावं एवढा अनाचार, अत्याचार त्याकाळी माजल्याचं वर्णनातून स्पष्ट होतं. कल्पांत या एकाच शब्दाने समर्थांनी ती दारुण परिस्थिती दर्शविलीय.किती 
येक मृत्यासि ते योग्य जाले किती 
येक देश त्यागूनि गेले। 
किती येक ग्रामेचि ती वोस झाली
पिके सर्व धान्येचि नाना बुडाली।
किती येक धाडीवरी धाडी येतीत
या सैनिकाचेनि संहार होती।
किती येक ते घ्राणकर्पेचि घेती
किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टविती।
शब्दाशब्दातून नुसता दुःखाचा जाळ भरलाय.
विदेशीचं परिस्थितीचं चित्रण
इंग्रजांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या पीटर मुंड नांवाचा इंग्रजी नोकराने आपल्या रोजनिशीत लिहिलेल्या नोंदीची माहिती अशी आहे. हा पीटर मुंड लिहितो, 'एक दिवस फुरसत मिळाल्याने मी हवा खायला बाहेर पडलो, तेव्हा शहराच्या एकाबाजूला कित्येक मिनार उभारलेले दिसले. त्यांच्या भोवती अनेक लोकांची मुंडकी चुन्यात बसवलेली होती...!' मानूची यानेही प्रवासात रस्त्याच्या कडेला अनेक ताजी मुंडकी पडलेली दिसल्याचा, झाडांना प्रेते टांगलेली असल्याचा आणि रस्त्यावर मुंडक्यांचे मिनार बघितल्याचे लिहून ठेवले आहे. अशाप्रकारे मारण्यात आलेल्यांना चोर, वाटमारे म्हटलं जायचं. पण मोगलांनी ज्यांची घरदार लुटली, गावं उठविली, असे हे दुर्दैवी भारतीय-हिंदू असायचे. मोगलांच्या या क्रूर जुलमी सत्तेला शिवरायांनीच टक्कर दिली. शिवरायांनीच हिंदू आणि हिंदुस्थान शिल्लक ठेवलंय याचं भान आपल्या राहिलंय का याचा विचार ज्यानं त्यानं करायचाय...!
रोजच शिवजयंती व्हावी...
आज शिवछत्रपतींची ३९५ वी जयंती....! सरकारी पातळीवर साजरी केली जातेय. सरकारनं इतिहासकारांची एक समिती स्थापन करून शिवजन्माचा वाद मिटविला. आणि ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे १९ फेब्रुवारी ही शिवजन्माची तारीख निश्चित केली. पण पंचांगावर आपला कारभार रेटणाऱ्यांनी त्याला विरोध करत तिथीनुसार करण्याचा प्रयत्न चालवलाय. पण काळाचा सूड म्हणतात ना अगदी तसंच ज्यांनी जन्म तारखेला विरोध केला त्यांनाच सरकारनं जाहीर तारखेलाच शिवजागर करावा लागतोय. तसं पाहिलं तर शिवजन्माचा सोहळा हा तारखेनं किंवा तिथीनुसार करावा असं काही नाही. छत्रपती शिवरायांची महती इतकी उत्तुंग आहे की, दररोज जरी शिवजागर केला तरी तो कमीच आहे.
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंडस्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।
नरपती हयपती गजपती । गडपती भूपती जळपती ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ।।
यशवंत किर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ।।
आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळां ठायी ।।
धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले
देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।।
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ।।
कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याण राजा ।।

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...