"राज ठाकरे-फडणवीस भेटीनं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. उद्धव यांच्याशी युती होणार असं वातावरण निर्माण झाल्यानं मराठी माणसांमध्ये, कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता. पण अचानक सारे संदर्भ बदलले. सर्व्हेतून ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना ५१.९ टक्के मतं मिळतील, भाजपला ३२ तर शिंदेसेनेला ६ टक्के मतं पडतील असं समोर आलं. राज्यातल्या, दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही हा जबर धक्का होता. अद्यापि मुंबईत 'ठाकरेब्रँड' शिल्लक असल्याचं समोर आल्यानं राजभेटीचा घाट घातला गेला. आर्थिक राजधानी मुंबईवर कब्जा, उध्दवसेनेला संपवणं, शिंदेंना त्यांची जागा दाखवणं, लाडक्या अदानीला पायघड्या घालणं, दिल्लीश्वरांच्या चरणी मुंबईला समर्पित करणं यासाठीच भाजपने राज ठाकरे यांचं बुजगावणं उभं केलंय. यासाठी भाजप आता काहीही करायला सिद्ध झालीय!"
--------------------------------------------------
मुंबईत अमित शहा यांची भेट नाकारून उद्धव ठाकरे यांच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंनी अचानकपणे आपल्या धरसोड स्वभावाला जागून भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती करणार असं एका मुलाखतीत सांगून आश्चर्याचा धक्का दिला. आपण १९ वर्षातले वादविवाद, वैर, विरोध, मतभेद टाळून सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगून मराठी मतदारांमध्ये सहानुभूती मिळवली. शिवाय राजकीय सौदेबाजीत आपलं महत्व वाढवलं. हे दोघे भाऊ एकत्र आले तर मात्र राजकीय वेगळा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली. एकही लोकप्रतिनिधी नसताना निवडणुकीच्या राजकारणात आपलं घोडं दामटण्याचं कौशल्य राज ठाकरे यांनी दाखवलं. सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचं जाहीर करताच राज पुन्हा एकदा भाजपच्या दिशेनं लवंडलेत. त्यांनी विधानसभा निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूरवरही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळं राज ठाकरे आता भाजपच्या विरोधात जाणार असं चित्र निर्माण झालं होतं. पण तो विरोध क्षणभंगुर ठरला. आपल्या त्या वागण्यानं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'भाजप नेत्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना भेटू नये...!' अशी इच्छा प्रदर्शित केली होती. तीला ठोकरून उद्धव यांच्या त्या मतांशी आपण सहमत नाही हे दाखवून दिलंय. पर्यायानं युतीसाठी पुढे केलेला हात त्यांनी मागे घेतल्याचं दिसलं. खरंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. उद्धवसेना आणि मनसे कार्यकर्ते एकत्र यायला सुरुवात झाली होती. मुंबई, ठाणे आणि इतर परिसरातल्या मराठी मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत होतं. प्रसिद्धीमाध्यमातून याच युतीवर चर्चा सुरू झाल्या होत्या. काहींनी त्यासाठी सर्व्हे करायला सुरुवात केली होती. त्यातून जे काही समोर आलं त्यानं सत्ताधाऱ्यांना धक्का बसला. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर ५१.९ टक्के मतं या दोघांना पडतील भाजपला ३२ तर शिंदेसेनेला ६ टक्के मतं पडतील असं समोर आलं. राज्यातल्या आणि दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही हा जबर धक्का होता. मुंबईमध्ये 'ठाकरे ब्रँड' अद्याप चालतो हे लक्षात आल्यानं एक ठाकरे आपल्याकडे हवेतच, असा संदेश दिल्लीश्वरकडून आला. प्रारंभी टिंगल टवाळी करणारे फडणवीस मग राज यांना जवळ घेण्यासाठी प्रयत्नशील बनले. राजभेटीने अस्वस्थता निर्माण झाली ती शिंदे यांच्या गटात. शिंदेसेनेची मुंबई आणि सभोवतालच्या इतर महापालिका जिंकण्यात कोणतीच मदत होणार नाही हे वास्तव भाजपला जाणवलं. मुंबई आपल्याकडे येणार असं वातावरण भाजपमध्ये निर्माण झालं होतं. जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आपला स्वप्नभंग होईल अशी स्थिती निर्माण झाल्यानं राजभेट झालीय. भाजपसोबत उद्धव ठाकरे येणं शक्यच नाही, त्यासाठी मग राज यांना हाताशी धरायला हवं ते सोबत आल्यास यश सहजसाध्य होईल. या उद्देशाने अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात राज ठाकरे यांच्या भेटीचा घाट घातला गेला. त्याला राज यांनी नकार दिल्यानं संभ्रम निर्माण झाला. अखेर शिंदे नाराज झाले तरी चालेल पण राज सोबत आल्यास दिल्लीकर खुश होतील अन् मुंबई महापालिका हाती येऊ शकेल. याचसाठी फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झालीय.
राज ठाकरे यांनी मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता यासाठी वैयक्तिक मतभेद दूर सारून एकत्र येण्यास मी तयार आहे. असं मत महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्यानं ठाकरेबंधु एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी 'महाराष्ट्र, मराठी द्रोही भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी होत असलेल्या भेटी राज यांनी टाळल्या तर एकत्र येण्यात कोणतीही अडचण येणार नाही...!' असं मतप्रदर्शन केलं. त्यावर राज यांनी तेव्हा काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळं शिवसेनेत आनंदाचं वातावरण निर्माण झालं. उद्धव यांनी तर महाराष्ट्रातल्या मनातली बातमी देईन....! असं सांगितल्यानं शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक यांनी त्याला पूरक असे फलक लावायला सुरुवात केली. राज-उद्धव आणि आदित्य-अमित यांचे एकत्रित फोटो झळकायला लागले होते. पण राज यांच्या फडणवीस भेटीनं त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मनसे आणि राज ठाकरे यांच्या दृष्टीनं विचार करता त्यांना भाजपसोबत जाणं ही एक सुवर्णसंधी दिसतेय. शिवसेनेचेच अनुकरण करणाऱ्या मनसेनं ज्याप्रकारे शिवसेनेने तीस वर्षांपूर्वी भाजपशी युती केली होती तशी युती करण्याचा मानस कदाचित राज यांचा असावा. राज यांनी जर भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला तर राजकीय पक्ष म्हणून मनसेला तो निर्णय फायदेशीर ठरेल. उद्धवसेनेने जरी राज यांना प्रतिसाद दिला असला तरी ते प्रत्यक्षात ते येणं आजतरी अवघड दिसतंय. 'मराठी माणसांच्या भल्यासाठी...!' असं म्हणत राज ठाकरे लवकरच भाजपसोबत युती करू शकतात. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीने नवीन अटकळांना उधाण आलंय. या भेटीनंतर राज्यात नवी समीकरणे तयार होताहेत. कार्यकर्त्यांमध्ये राज अन् उद्धव यांच्यात युतीची चर्चा होती, तर आता राज अन् फडणवीस यांच्या भेटीने राजकीय दिशा बदललीय. त्यामुळं पुन्हा शिवसैनिकांमध्ये आणि महाराष्ट्र सैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. आधी राज-उद्धव, नंतर राज- शिंदे यांच्याशी युतीची चर्चा होती. राज यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मनसे नेत्यांची बैठक 'शिवतीर्थ' या आपल्या निवासस्थानी घेतली. यात राज यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, प्रवक्त्यांना कसलीही जाहीर टिप्पणी न करण्याचे निर्देश दिलेत. राज यांच्याकडून सद्यस्थिती अन् कार्यकर्त्यांमधली चर्चा यांचा आढावा घेतला जातोय. यासोबतच, राज आणि त्यांचे सहकारी भाजपसोबत युती झाल्यास होणाऱ्या संभाव्य परिणामांचाही विचार करताहेत. राज ठाकरे भाजपसाठी योग्य का असू शकतात यामागे काही कारणे दिली जात आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मनसे आणि भाजपमध्ये युती झाल्यास त्याचा परिणाम केवळ मुंबईवरच नाही तर ठाणे, नाशिक, पुणे यासह इतर महापालिकांच्या समीकरणांवरही होईल. या युतीमुळं राज यांना राजकीय ताकद मिळू शकते आणि अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचीही संधीही. दीर्घकालीन दृष्टिकोनातून, भाजपसोबतची युती राज ठाकरेंसाठी फायदेशीर ठरू शकते. अल्पसंख्यांक, हिंदीभाषिक परप्रांतीयांची मातांसाठी मात्र भाजपला अडचणी निर्माण होतील. हे भाजपला माहितीये की, राजमुळे मराठी मतविभागणी झाली तर उद्धव अन् शिंदे यांच्या जागा घटू शकतात अन् मुंबईवर कब्जा मिळू शकतो.
मनसेची उद्धवसेनेसोबत युती झाल्यास, उद्धवसेनेची सध्याची ताकद आणि मुंबई-ठाणे कल्याण डोंबिवली वगळता इतर ठिकाणी त्यांचा असलेला प्रभाव हा मनसेला फायदेशीर नाही. शिंदेंसेनेसोबतच्या युतीला हाच तर्क लागू होतो. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या तीनही पक्षांची नाळ ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जोडलेली आहे. मर्यादित प्रादेशिक ताकद असलेल्या पक्षांशी युती करण्यापेक्षा, राष्ट्रीय पक्ष भाजपशी युती करणं हे मनसेच्या पक्ष विस्तारासाठी उपयुक्त ठरू शकते. ज्याप्रकारे शिवसेनाप्रमुखांनी भाजपशी युती करून पक्ष विस्तार केला होता. त्यामुळंच राज हे भाजपशी युती करण्यास अनुकूल असू शकतात. शिवाय मुंबईत दीडशे जागा मागणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठीही राज यांचा पर्याय भाजपला उपयोगी पडू शकतो. राज्यात राज यांची ताकद मर्यादित आहे. त्यांचा उपद्रव असणार नाही. शिंदेंची अवास्तव मागणी फेटाळण्यासाठी राज यांचा प्यादं म्हणून उपयोग होऊ शकतो. भाजपला उद्धव यांच्या ताब्यात गेली अनेक वर्षे असलेली मुंबई कोणत्याही परिस्थिती हवीय. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशी सर्व आयुधं वापरली जाणार आहेत. भाजपच्या गुजराती नेत्यांना मुंबई गमावल्याचं जुनं दुखणं आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मुंबई गुजराथ्यांना हवी होती. त्यावर त्यांनी दावा सांगितला होता. मात्र १०५ हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिलीय. याचं शल्य त्यांना सतत सलत असतं. त्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आपल्याला हवी असा चंग त्यांनी बांधलाय. मुंबई आणि परिसरात आजमितीला ९ महापालिका आहेत तर अख्ख्या गुजरातमध्ये केवळ ६ महापालिका आहेत. त्यामुळे मुंबई पाठोपाठ ह्याही आपल्याकडे हव्यात असा निर्धार भाजपने केलाय. त्यासाठीच राजभेट झालीय. गेल्या काही वर्षात राजकारणाचा जो खेळखंडोबा झालाय तो केवळ एकच गोष्टीसाठी ते म्हणजे मुंबईचा डॉन कोण...?
मुंबई....सोन्याचं अंड देणारी कोंबडी....! देशात सत्ता असली तरी आर्थिक राजधानी मुंबई हातात नाही हे दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना सहन होत नाहीये. आर्थिक स्थिती नाजूक असताना अवैध धंद्यांनी अक्राळविक्राळ पाय पसरलेत. गुजरातेत दिवसागणिक ड्रगचे साठे उतरताहेत. उद्योगधंदे भुईसपाट होताहेत मात्र बॉलीवूड, आयपीएल, मादक ड्रगव्यवसाय आणि राजकारण्यांच्या आर्थिक स्थितीत मात्र भरभराट होतेय. यामागचं गौडबंगाल काय आहे? या साऱ्यांच्या नाकदूऱ्या काढण्यासाठी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारच्या पोलीस, सीबीआय, ईडी, एनसीबी, एनआयए, कस्टम, एक्साईज एवढंच नाही तर इकॉनॉमिक्स ओफेन्स ब्युरो अशा तमाम तपास यंत्रणांनी इथं मुंबईत तळ ठोकलेला असतो. इथं संघर्ष पेटलाय तो मुंबईवरच्या वर्चस्वाचा...! सध्या राज्यातल्या राजकीय संघर्षाला मुंबईवर वर्चस्व कुणाचं, कुणाचा कब्जा राहणार. याची किनार आहे. राजकारणी, बॉलिवूड, आयपीएल आणि ड्रगच्या अवैध धंद्याच्या चौकडीकडून होणाऱ्या कमाईशी हे सारं निगडित आहे, त्यावरच्या कब्जासाठी ही लढाई आहे. गेल्या चार-पांच वर्षात देशाची आर्थिकस्थिती डबघाईला आलीय. औद्योगिक क्षेत्र पुन्हा नीट उभं राहू शकलेलं नाही. बेरोजगारीचा आगडोंब उसळलाय. कार्पोरेट जगत हळूहळू ढासळू लागलंय. पण जगात तिसरी अर्थव्यवस्था निर्माण झालीय असं सांगत असतानाच ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातंय. एकीकडं ही उतरण सुरू असताना मात्र बॉलिवूड, आयपीएल, ड्रगबाजाराची भरभराट होतेय. इतकंच नाही तर राजकारणीही गब्बर होताहेत. ह्या साऱ्या बाबी मुंबईत केंद्रित झालेल्या आहेत. हे सारं समजून घेण्यासाठी आपण सत्तांतराचं वर्ष म्हणजे २०१४ पासूनचा विचार करू या. राजकारणाला इथं वेगळं वळण लागलं. या सत्तांतरानंतरच मुंबई, महाराष्ट्र, शिवसेना, शरद पवार, त्यांचं प्रांतीय राजकारण, त्यांचं केंद्रीय सत्ताधाऱ्यांना असलेलं आव्हान, गुजराती-मराठी वाद, उद्योग व्यापार जगतावर असलेलं गुजरातींचं वर्चस्व, याच्या माध्यमातून या सुप्त संघर्षाला सुरुवात झालीय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरात राज्याच्या राजकारणातून थेट देशात सत्तेवर आलेत. आता सत्तेची सारी सूत्रं त्यांच्या हाती आहेत. त्यामुळं हा संघर्ष गुजराती व्यापारी, उद्योगपती यांना सोबत घेऊन त्याचबरोबर भाजप आपल्या महाराष्ट्रातल्या भक्तांच्या साथीनं मराठी माणसांनाच आव्हान देण्यासाठी, ठाकरे ब्रँड संपविण्यासाठी उभा ठाकलाय! त्यासाठी भाजपने आधी शिवसेना फोडून शिंदेंना हाती घेतलं, मग राष्ट्रवादीची शकलं करून अजित पवारांना घेतलं आता राज यांना घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. केवळ महापालिकेच्या सत्तेसाठी नाही तर वर उल्लेखलेल्या मुंबईतल्या बॉलिवूड, आयपीएल, ड्रग उद्योगावर जम बसविण्यासाठी, त्याचबरोबर गुरगुरणाऱ्या शिवसेनेला संपविण्यासाठी हे सगळं केंद्रीय भाजप सत्तेनं आरंभलंय!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा तपशील बाहेर आला नसला आणि राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली नसल्याने ते भावासोबत जाणार की, भाजपसोबत याची उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागलाय. वातावरण ढवळून निघालंय. त्यातच उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच राज ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेत सस्पेन्स वाढवलाय. राज यांनी १९ वर्षापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. सुरुवातीला मोठं यशही मिळालं. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले. मात्र, त्यांचा हा करिष्मा नंतर फारसा चालला नाही. राज ठाकरे यांनी २०२४ साली लोकसभा निवडणूक न लढता भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीच्या प्रचारार्थ सभाही घेतल्या. मात्र महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज यांनी स्वबळावर उमेदवार उभे केले. पुत्र अमित ठाकरे यांच्यासह त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी एका मुलाखतीत शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याला उद्धव ठाकरेंनी भाषणातून प्रतिसाद दिला. त्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या गटाकडून दोन्ही पक्ष लवकरच एकत्र येणार असल्याचे बॅनर झळकले. त्यातच गुरुवारी राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. महायुतीसोबत युती केल्यास राज ठाकरे यांना आर्थिक आणि संघटनात्मक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजपचा आपला विशिष्ट मतदार आहे. त्याचा मनसेला फायदा होऊ शकतो. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यासोबत युती केल्यास मराठी मतांचे विभाजन टाळता येईल, ज्यामुळे मनसेला अधिक जागा जिंकण्याची संधी मिळू शकते. मात्र, सध्या तरी महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी असल्याने याठिकाणी मनसेसाठी फारशी जागा असण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढली तर भाजपचा फायदा होईल मात्र दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एका सर्वेक्षणानुसार, ठाकरे बंधूंची युती झाल्यास त्यांना ५२.१ टक्के मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. मुंबईत ठाकरे गट आणि मनसे यांचा मराठी मतदारवर्ग मोठा आहे. युतीमुळे मराठी मतांचे विभाजन टाळता येईल. दोन्ही पक्षांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी एकमेकांची गरज आहे. युतीमुळे दोघांचाही प्रभाव वाढू शकतो. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या २० वर्षांचं राजकीय हाडवैर विसरुन 'मातोश्री' आणि 'शिवतीर्था'ला एकत्र येण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुतीतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका हातातून जाऊ न देण्यासाठी मोठी खेळी रचली. विधानसभा निवडणुकीत दीडशेच्या वर उमेदवार देऊन, तगडा प्रचार करुन एकही आमदार निवडून येण्याची नामुष्की ओढवलेल्या राज ठाकरेंशी जुळवुन घेण्यासाठी पावलं टाकण्यास सुरुवात केली.
हरीश केंची
९४२२३१०६०९
चौकट
सारं काही अदानी साठी...!
देशाची सत्ता अन् अर्थव्यवस्था सध्या गौतम अदानी यांच्याभोवती फिरतेय. प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अदानीला पायघड्या घातल्या जाताहेत. यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी दोघेही तत्पर असतात. असं गमतींना म्हटलं जातं की, 'भाजप आणि राष्ट्रवादी यांचा गौतम अदानी कृष्ण आहे. पवार हे गौतमचे ‘देवकी’ तर मोदी हे गौतमचे ‘यशोदा’ आहेत. बारामती मथुरा तर वडनगर वृंदावन आहे...!' असं असल्यानं मुंबईत त्यांना विमानतळापासून धारावी पुनर्विकास प्रकल्पसारखे अनेक प्रकल्प दिले गेलेत. त्यासाठी शेकडो एकर जमीन दिली गेलीय. यापूर्वी देशाच्या विकासात टाटा बिर्ला यांसारख्या अनेक उद्योगपतींचा हातभार लागलाय. त्यासाठी त्यांना भारतरत्न, महाराष्ट्रभूषण दिलं गेलंय. मात्र वादग्रस्त अदानीना हिंडनबर्ग अहवालातून, सेबीच्या गैरप्रकारातून अमेरिकेच्या न्यायालयातल्या दाव्यातून अदानी यांचा कारभार उघड झालाय. तरीही अदानीना आणखी पायघड्या घालण्यासाठी मुंबईवर कब्जा हवाय, त्यासाठी भाजप सारंकाही करायला सिद्ध झालीय. याचीही किनार ही राजभेटीमागे आहे!
No comments:
Post a Comment