Monday, 9 June 2025

राजसंन्यास' नाटकात शिवराय-संभाजींची बदनामी वाघ्याच्या समाधीचं मूळ 'राजसंन्यास'मध्ये

"वाघ्याला समाधीवर स्वार करणाऱ्यांनी गडकरींच्या 'राजसंन्यास'च्या अर्पणपत्रिकेतील वाक्यं समाधी फलकावर गडकरींच्या नावानिशी लिहिली आहेत. गडकरींचं 'राजसंन्यास' नाटकात शिवरायांचे समर्थ गुरू रामदासच असल्याचा बनाव आणि संभाजीराजे रगेल, रंगेल, स्त्रीभोगी, सत्तालोभी असल्याचा बदनामी डाव पूर्ण रंगवण्यात आलाय. माने, मोरे या सरदारांनाही स्वराज्यनाशक म्हणून रेखाटण्यात आलंय. दंतकथेतला कुत्रा 'वाघ्या' बनून रायगडावर सर्वोच्चस्थानी शिल्परूपे समाधीस्त होतो. ही शिवप्रेमींची इमानी की बेईमानी? वाघ्याचा पुतळा हटवावा यावर शिवप्रेमी आग्रही आहेत. तर भिडे गुरुजींसारखे लोक विरोध करताहेत. त्याचा घेतलेला धांडोळा...!"
---------------------------------------------------
रायगडावर परवा ६ जूनला 'शिवराज्याभिषेक दिन' साजरा होण्यापूर्वीच तिथल्या वाघ्या कुत्र्याच्या शिल्प रक्षणासाठी पोलीस तैनात करण्यात आलेत. कुत्रा हा माणसाच्या सुरक्षेसाठी उपयुक्त, इमानी असा पाळीव प्राणी आहे. अशा प्राण्याच्या शिल्पाच्या रक्षणाची जबाबदारी वर्दीतल्या माणसांनी करावी, ही उलटी खूण आहे. तथापि, ही उलटी खूण नसून, ही काल्पनिक भराऱ्यावर आधारित इतिहासाच्या खोट्या खुणा रचणाऱ्यांच्या हलकट वृत्तीवर उलटलेली खूण आहे. 'रायगडावरचा वाघ्या' वादग्रस्त होण्याच्या कारणांचा तपशील आहे. या प्रकरणाची अधिक चर्चा मराठी न्यूज चॅनलमधून झाली. काही महिन्यांपूर्वी झी २४ तास या चॅनलवर या प्रकरणावर रोखठोक हा पाऊण तासाचा चर्चात्मक कार्यक्रम होता. त्यात इतिहास अभ्यासक दुर्गेश परुळेकर, पुण्याचे कट्टर हिंदू संघटनवादी मिलिंद एकबोटे, शिवसेना आमदार रामदास कदम आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड सहभागी झाले होते. या वादग्रस्त विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा अपेक्षित होती. परंतु वाघ्याचा विषय वादाच्या ऐरणीवर आणणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्या विरोधात सूत्रधारासह सगळेच तुटून पडलेले दिसत होते. हा विरोधही प्रवीण गायकवाड यांच्या चुकीच्या युक्तिवादाला विरोध करण्यासाठी नव्हता. तर वाघ्या काल्पनिक की ऐतिहासिक, या मुद्याला बगल मारणारा होता. मिलिंद एकबोटे 'औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला का, असा प्रश्न विचारत होते. 'इतिहासातील वादाचे मुद्दे वा नवं संशोधन योग्य ठिकाणी मांडलं पाहिजे; रस्त्यावर उतरण्याची भाषा योग्य नाही...!' असं दुर्गेश परुळेकरांचं म्हणणं होतं. 'वादग्रस्त मुद्दे करून इतिहास बदलता येणार नाही, आम्ही तो बदलू देणार नाही...!' असा रामदास कदमांनी आवाज दिला. तर 'गायकवाड, तुम्ही इंग्रज इतिहासकारांनी लिहिलेले संदर्भ का सांगता...?' असं सूत्रधार ओरडून ओरडून विचारत होते, प्रवीण गायकवाड या साऱ्याला रोखठोक हे कार्यक्रमाचं नाव सार्थ करण्याच्या आवाजात उत्तर देत होते. एकूण कार्यक्रम गोंधळाचा झाला. कार्यक्रम कुत्र्यावरचा असल्याने त्याने थोडीफार जाग निश्चित आणली असेल. तथापि, या कार्यक्रमात रामदासभाई कदम कुत्र्याच्या संबंधाने बोलले, ते दखलपात्र आहे. 'कुत्रा हा इमानी असतो. अगदी माणसापेक्षाही...!' असं रामदासभाईंनी दोनदा ऐकवलं. पण 'गेली ४० वर्ष शिवसेनाप्रमुख हेच सांगत आहेत...!' ते रामदासभाईंना कुणी ऐकवलं नाही. कुत्रा हा सर्व प्राण्यांत इमानी प्राणी आहेच. पण इमानी, पाळीव कुत्र्यालाच काय, इतर कुठल्याही माणसाळलेल्या प्राण्याला इतिहास कळत नाही, हे वास्तव आहे. आपल्या बापाला, बापाच्या बापाला, त्यांच्या आई-बापालाही फुटकळ मायेत माणसाने स्वसंरक्षणासाठी हुकमतीचा पट्टा गळ्यात अडकवून आपल्याप्रमाणेच पाळीव केलं होतं, हा इतिहास कुत्र्याला कळताक्षणी काय करील? पाळीव बनवणाऱ्याचा बदला घेतल्याशिवाय राहाणार नाही! सिंह, वाघ, हत्ती आदि जंगली प्राण्यांनाही कुत्र्यासारखाच आपल्या आधीच्या पिढ्यांचा इतिहास कळत नाही आणि त्यांना वापरणाऱ्यांचं स्वार्थी वर्तमानही कळत नाही, म्हणूनच ते सर्कशीत रिंग मास्तरच्या चाबकाच्या फटकाऱ्याला घाबरून कसरती करतात, त्यांच्या या कसरती इमानी नसतात; ती इतिहास-वर्तमानाच्या अज्ञानातून आलेली मजबुरी असते, रामदास कदम राज्याचे मंत्री होते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते, लोकप्रतिनिधित्वाचा एवढा संपन्न अनुभव असताना त्यांनी कुत्र्याच्या इतिहासविषयक अडाणीपणाला इमानीपणा ठरवत, माणसाच्या स्वार्थी चतुराईचं प्रदर्शन करायला नको होतं! कदाचित, आपला पक्ष-विचार निष्ठेचा पट्टा किती घट्ट, इमानी आहे, ते दाखवण्याचा मोह त्यांना आवरला नसावा. अशा या फाजील पक्ष-विचार निष्ठेमुळेच इतिहासातलं पाप झाकून वर आपलाच टेंभा मिरवण्यासाठी हवा तसा इतिहास लिहिणाऱ्या साळसूद सोद्यांचं फावतं. त्यांच्या या हरामखोरीची आणि त्या हरामखोरीलाच सत्य इतिहास म्हणत त्यांचंच रक्षण करण्यासाठी झटणाऱ्यांच्या नादानीची साक्ष म्हणजे रायगडावरील वाघ्याचं शिल्प आहे. 'हे शिल्प छत्रपती शिवरायांच्या समाधीवर स्वार झालं आहे...!' असं रायगडाचे अभ्यासक आर्किटेक्ट गोपाळ चांदोरकरांचं म्हणणं आहे; तर 'चांदोरकर म्हणतात, 'ती समाधी सोयराबाईची वा छत्रपतींच्या परिवारातील अन्य कुणाची तरी असावी...!' असं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचं म्हणणं आहे. हे मतभेदाचे मुद्दे असले तरी, 'त्या' समाधीवर वाघ्याला स्वार करण्याचं मूळ हे राम गणेश गडकरी यांच्या 'राजसंन्यास' नाटकात आहे, याबद्दल दोघांचं एकमत आहे. त्यासाठी वाघ्याला समाधीवर स्वार करणाऱ्यांनी गडकरींच्या 'राजसंन्यास'च्या अर्पणपत्रिकेतील वाक्यं समाधी फलकावर गडकरींच्या नावानिशी लिहिली आहेत. गडकरींचं 'राजसंन्यास' हे नाटक अपूर्ण आहे. या अपूर्ण नाटकातही शिवरायांचे समर्थ गुरू रामदासच असल्याचा बनाव आणि संभाजीराजे रगेल, रंगेल, स्त्रीभोगी, सत्तालोभी असल्याचा बदनामी डाव पूर्ण रंगवण्यात आला आहे. माने, मोरे या सरदारांनाही स्वराज्यनाशक म्हणून रेखाटण्यात आलंय. 'देहू दफ्तरी' या पेहलवानाच्या शिवप्रेमाची येथेच्छ टवाळी करत शिवरायांचीच निंदा करण्यात आलीय. 'राजसंन्यास' मधलं जिवाजीपंत कलमदाने हे कारकुनी कारस्थानी पात्र आपली ओळख सांगताना म्हणतं, 'वारुळांतली दोन जिभांची पिवळी नागीण चावली तर एकाच पिढीचा घात होतो, परंतु कारकुनी कानावरची ही दोन जिभांची काळी नागीण म्हणजे लेखणीचा टाक डसली, तर सात पिढ्यांचा सत्यानाश करिते...!' हे वर्णन गडकऱ्यांच्या लेखणीलाच नाही, तर 'राजसंन्यास'मधल्या त्यांच्या कल्पनाविलासाला साजेसं आहे. त्यात प्रत्येक वाक्यागणिक इतिहासाचा मुडदा पाडण्यात आला आहे. राजसंन्यास नाटक अपूर्ण आहे, असं म्हटल्यावर कुणाला ते अर्धवट, म्हणजे पाचपैकी दोन-तीनच अंक लिहिले असतील, असं वाटेल, पण तसं नाही. या नाटकाच्या पहिल्या अंकाचा पहिला, दुसरा आणि तिसरा अपूर्ण असे प्रवेश आहेत. दुसरा अंकच नाही. तिसऱ्या अंकाचे फक्त संभाजींच्या तोंडचं गाणंच आहे. चौथा अंकच नाही. पाचव्या अंकाचे मात्र पाचही प्रवेश पूर्णपणे लिहिलेले आहेत. या पाचव्या अंकाच्या अखेरीस शिवरायांच्या स्मृतींना उद्देशून 'आपल्यासारख्या अवताराला सद्‌गुरू रामदासांचा उपदेश घ्यावासा वाटला, राज्याच्या सनदा काढून आबांनी समर्थांच्या झोळीत टाकल्या,...' अशी वाक्यं संभाजींच्या तोंडी घातली आहेत. पुढे संभाजीराजे साबाजीकडे छत्रपतींच्या मस्तक स्पर्शाने पवित्र झालेला जिरेटोप, सोयराबाईंकडे राजाराम महाराजांच्या मस्तकावर ठेवण्यासाठी देताना म्हणतात, 'शंभूराजांचा राजबाळाला आशीर्वाद सांगा. महाराष्ट्राच्या या कमनशिबी मराठ्याचा राम राम सांगा... आणि रायगडाच्या जुन्या राजाची नव्या राजाला शेवटची एवढीच वाणी ऐकवा की, राजा म्हणजे जगाचा उपभोगशून्य स्वामी! राज्य उपभोग म्हणजे राजसंन्यास ! ना विष्णुः पृथिवीपती...! आणि पडदा पडतो.' गडकरींचं १९१९मध्ये निधन झालं. त्यापूर्वी तीन वर्षं त्यांनी 'राजसंन्यास' लिहिण्यास घेतली होती. गडकरी शेवटचा अंक आधी लिहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं म्हणे! ते खरं मानलं, तरी तीन वर्षांचा काळ नाटक पूर्ण लिहिण्यास पुरेसा ठरतो. तथापि, गडकरींनी शिवराय आणि संभाजीराजांविरोधी कल्पनांचे जे छटेल रंग उधळलेत, ते पाहाता त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या १९२२ मध्ये 'राजसंन्यास' मधील शिवराय-संभाजी बदनामीचे आणि विरोधाचे अतिरेकी अंक-प्रवेश प्रकाशनकर्त्याने जाणीवपूर्वक ग्रंथबद्ध केले नसावेत. त्यामुळे 'राजसंन्यास' हे अपूर्ण नाही, तर ते अपूर्ण दाखवण्यात आलंय. यासाठी नाटकाची अर्पणपत्रिकेची साक्ष पुरेशी आहे. कारण नाटक अपूर्ण असताना कुणी अर्पणपत्रिका पूर्ण नाही करीत.
वाघ्याचा रायगड दासबोधी भानगड
या अर्पणपत्रिकेचा आणि नाटकाचा संबंध काय? तर तो आहे! जिवाजी कलमदाने देहूला रामदासाची महती सांगताना अंक पहिला, प्रवेश दुसरा मध्ये म्हणतो, 'अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला; पण खरी करणी रामदासाची आहे! त्याने आपला दासबोध ग्रंथ लिहिला नसता, तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना...!' हो, घेण्यासारखी गोष्ट काय की, नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढला नाही, तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी आहे! ...अरे, शिवाजीच्या नावात रामदासाइतका काही राम नाही! आता तुला व्हायचं आहे शिवाजी! पण एखाद्या रामदासावाचून तू कसा होणार शिवाजी..m?' या प्रश्नासरशी जिवाजीच्या पायावर डोकं ठेवत देहू ओरडतो, 'बजरंगबली की, जय जय रघुवीर समर्थ...!' यावर जिवाजी खूश होत देहूला सुनावतो, 'समर्था घरीचे श्वान, त्यास सर्वही देती मान! बेटा देहू, अखिल त्रैलोक्य तुझ्यासारख्या कुत्र्याला मान देतील...!' म्हणजे जिवाजीपंत झाले समर्थ! आणि शिवरायप्रेमी देहू झाला कुत्रा ! असो. रायगडावरच्या शिल्पमय कुत्र्याचं नाव वाघ्या आहे! तेदेखील राजसंन्यासमधल्या गाळलेल्या भागात देहूचा वाघ्या करून झाल्याची शक्यता आहे. शिवरायांची रामदासांच्या दासबोधी फुटपट्टीने मापं काढून झाल्यावर गडकऱ्यांनी नाटकाच्या अखेरच्या भागात संभाजीराजांच्या तोंडून 'संभाजी हा म्हणजे केवळ छाकटा रंडीबाज...!' असं वाक्य टाकून छत्रपती या किताबतीला आपण नालायक आहोत, छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थाची-श्रीगंगासागराची आपण व्यभिचाराने दिवाणखान्यातली मोरी केली, वैराग्याच्या वेगाने फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारूबाजाचे तोंड पुसण्याचा रुमाल केला. महाराष्ट्रलक्ष्मीच्या वैभवाचा जरीपटका फाडून त्याची रांडेसाठी काचोळी केली; यासारख्या न केलेल्या अपराधांचीही कबुली द्यायला लावली. या भाषाप्रभूच्या सैतानी प्रतिभेतून निर्माण झालेला कुत्रा रायगडावर स्वार करणाऱ्यांचा हेतू शुद्ध असू शकेल काय? आणि संभाजींना रंडीबाज, दारूबाज, स्वराज्यद्रोही ठरवण्यासाठी लेखणी नागिणीसारखी चालवणाऱ्या गडकरींचा पुतळा पुण्यातल्या संभाजी पार्कवरच बसवून घेणाऱ्यांचा हेतू तरी शुद्ध असू शकतो काय? २३ जानेवारी १९६२ रोजी 'पुणे महानगरपालिका'च्या वतीने गडकरींच्या ४३व्या पुण्यतिथी दिवशी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचं उ‌द्घाटन झालं. यावेळी भाषण करताना आचार्य अत्रे म्हणाले, 'संभाजी उद्यानात हा पुतळा उभारला जात आहे, हे काही वाईट नाही. त्यांच्या राजसंन्यास या अप्रतिम नाटकाच्या नायकाचे नाव ज्या उद्यानास आहे, त्या संभाजी उद्यानात तो उभारला जात आहे, हे ठीकच झाले...!' ह्यात ठीक काय झालं आणि नायकालाच बदनाम करणाऱ्या राजसंन्यासमध्ये अप्रतिम काय आहे, ते अत्रेंनाच ठाऊक! महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा 'अप्रतिम' विसंगतींची जाणीवपूर्वक उभारणी केली आहे. पुणे त्यात आघाडीवर आहे. ह्याची साक्ष देण्यासाठी पुण्याच्या महात्मा फुले मंडईच्या प्रवेशद्वारीच पुण्याच्या महापालिकेतल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांचा पुतळा नाकावर टिच्चून उभा करण्यात आलाय! या 'अप्रतिम विसंगती' पाहायच्या आणि थंड बसायचं! कारण पक्ष-विचार निष्ठेने अडकवलेला इमानी पट्टा ! अशा आणि त्यांच्या कल्पना-विलासाला वापरणाऱ्यांनी वाघ्याच्या माध्यमातून रायगडावर टाकलेली विष्ठा कशी कळणार!
गडकरींवर प्रबोधनकारांचा सोटा
पुण्यातल्या लाल महालासमोरील समूह शिल्पातून दादोजी कोंडदेवचा पुतळा हटवण्यात आला, तेव्हा शिवसेना-भाजपने केलेल्या निषेधाचा आवाज दाबण्यासाठी, युती सरकार असताना मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवरून मिनाताई ठाकरेंचा पुतळा लावण्यासाठी तिथला राम गणेश गडकरी यांचा पुतळा कसा हटवण्यात आला, असा प्रतिप्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाची चर्चा झाली नाही; तशी शिवाजी पार्कवरून गडकरीचा पुतळा काढून तो जवळच्या पेट्रोल पंपावर बसवण्यात आला, तेव्हाही फारशी चर्चा झाली नाही. कुणी शिवसेनाप्रमुखांकडे नाराजी व्यक्त केली नाही. खुद्द शिवसेनाप्रमुखांनीही या बदलाबद्दल कुरबुर केली नाही. यावरून त्यांना 'राजसंन्यास' मधला गडकरींचा बेतालपणा नक्की ठाऊक असणार! कारण 'शिवशाही' हा बाळासाहेब ठाकरे यांच्या अभ्यास-चिंतनाचा विषय आहे. शिवाय प्रबोधनकार के.सी. ठाकरे यांनी गडकरींच्या 'राजसंन्यास'ची नेमक्या शब्दांत 'दगलबाज शिवाजी' या पुस्तिकेत चंपी केली आहे. शिवाजीच्या स्वराज्योपक्रम म्हणजे ईश्वरी संकेत आणि 'समर्थाच्या कृपे 'मुळे सहजगत्या घडून आलेला एक नवलाईचा चमत्कार इतक्या हलक्या-फुलक्या भावनेने त्या प्रचंड प्रबोधनाकडे पाहिलं जात आहे, असा सोटा प्रबोधनकारांनी राजसंन्यासकारांवर हाणला आहे. 'शिवाजी सोळा वर्षाचा झाला नाही तोच त्याने लोकांची संगत करून देशात पुंडाई आरंभली...!' असं राज्यसंन्यासमध्ये जिवाजीपंत म्हणतो. ह्याचा समाचार घेताना प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, 'आडदांड लोकांची संगत धरून देशात पुंडाई आरंभणाऱ्याला जर स्वराज्य स्थापन करता येते, तर आज गावोगावचे गुंड राष्ट्रवीर का बनत नाहीत...?' जुन्या बखरी आणि सध्याचे इतिहासग्रंथ शिवाजीराजांच्या जगमान्यतेच्या कामी कसे नालायक ठरले, ते प्रबोधनकारांनी 'दगलबाज शिवाजी'मध्ये पुराव्यांसह दाखवून दिलंय. त्यांची माहिती त्यांचे समकालीन, स्नेही आचार्य अत्रे यांना ठाऊक असली पाहिजे होती. तथापि, त्यांनी गडकरींना 'नाट्यगुरू' मानल्याने त्यांचे प्रमादही त्यांना अप्रतिम वाटले असावेत. तथापि, खोटेपणालाही शेवट असतो. तो वा.सी. बेंद्रे, कमल गोखले यांनी संभाजी राजांना बदनाम करणारं कारस्थान संशोधनाने उधळून केलं आहे. डॉ. कमल गोखले यांचं 'शिवपुत्र संभाजी' हे साडेपाचशे पृष्ठांचं साधार, विवेचनात्मक चरित्र प्रकाशित झालं आहे १९७१ मध्ये. त्याला इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांनी प्रस्तावनात्मक 'आशीर्वाद' देताना म्हटलंय, 'हा ग्रंथ शुद्ध ऐतिहासिक आहे. शुद्ध ऐतिहासिक म्हणजे काय? तर जो पूर्वकालीन घटितांच्या विश्वसनीय आणि प्रमाणभूत अशा विविध साधनांच्या आधारे लिहिलेला असतो तो...!' शुद्ध इतिहासाची व्याख्या सांगतानाच दत्तो वामन पोतदारांनी, ऐतिहासिक कथा, कहाण्या, काव्यं, कादंबरी, नाटकं यांना 'शबल' इतिहास लेखन ठरवलं आहे. त्यांना दुय्यम ठरवून त्यांची अविश्वसनीयता दाखवली आहे. ह्यात गडकऱ्यांचं राजसंन्यास चपखल बसतं. राजसंन्यासचा पायाच इतका कच्चा असेल, तर त्याच्या अर्पणपत्रिकेतील संदर्भाचा दाखला देत रायगडावर स्थानापन्न झालेला वाघ्या कुणाचा इमानीपणा राखत तिथे पाहायचा?
गोखलेबाईच्या गौरवावर पाजणकरांचं पाणी
डॉ. कमल गोखले यांनी 'शिवपुत्र संभाजी' या ग्रंथातील 'सिंहावलोकन' प्रकरणात स्पष्टपणे लिहिलंय की, 'हिंदुस्थानातील लोकांना पाश्चात्त्यांसारख्या प्रत्येक गोष्टी टिपून ठेवण्याची सवय नसल्याने आणि येथे आलेल्या शंत्रूनी तोटकी साधनेही नष्ट करण्याचा सपाटा ठेवल्याने मराठ्यांच्या इतिहासाची सूत्रबद्ध जुळणी करणे कठीण जाते. संशोधनपूर्ण ग्रंथ निर्माण झाले, तरी ते वाचण्यापेक्षा सर्वसामान्य वाचक हलकी-फुलकी मनोरंजक ललितकृती पसंत करतो. त्यामुळे अनैतिक, विकृत, असत्य, काल्पनिक, भाबडी, चमत्कारावर भर देणारी कथानके आणि कथा जनतेत लोकप्रिय होतात...!' कमल गोखले यांचा रोख थेट गडकऱ्यांचं राजसंन्यास आणि त्यात जसे शिवाजी संभाजी सादर केले, त्याप्रकारच्या ललित साहित्यावर आहे. संभाजीराजे स्त्रीलंपट, मदिरासक्त, विलासी, छत्रपतीपदाला शोभेसं त्यांचं वर्तन नव्हतं, हे सारं धादान्त खोटं असल्याचं त्यांनी पुराव्यांसह स्पष्ट केलं आहे. कमल गोखले लिहितात, 'शिवाजी राजांसारखा संभाजी लोकोत्तर नव्हता. परंतु त्याचे चरित्र आजपर्यंत रंगवण्यात आले, ते तसे नसून त्याच्या अंगात अनेक गुणही होते. त्यांनी आपल्या नऊ वर्षांच्या छत्रपतीच्या कारकिर्दीत सर्वशक्ती पणाला लावून कारभार केला. शिवाजी महाराजांसारखा तो पुरुषसिंह नसला, तरी त्या महापुरुषाला शोभेल असाच त्यांचा छावा होता, हे वाचकांच्या ध्यानात आले, तरी लेखिकेला श्रमाचे सार्थक झाले असे वाटेल...!' कमल गोखले यांच्या या शुद्ध संभाजी चरित्राला ग.ह. खरे, बाबासाहेब पुरंदरे आदि बऱ्याच जणांचं मार्गदर्शन लाभलं. 'शिवपुत्र संभाजी' हा चरित्र ग्रंथ १९७१ मध्ये प्रकाशित झाला. या प्रकाशनाला 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संकृती मंडळा'ने अनुदान दिलं. तरीही ह्या मंडळातर्फे १९८८ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या 'गडकऱ्यांची नाटकेः चिंतन आणि आकलन' या रु.पां. पाजणकर लिखित समीक्षात्मक ग्रंथाने गोखलेबाईंच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. या ग्रंथात पाजणकरांनी गडकऱ्यांच्या डोक्यानं 'राजसंन्यास'चं विश्लेषण करण्यात आलंय. त्यात त्यांनी 'नाटकातून साकार होणारा संभाजी नुसताच साहसोत्सुक वा बेफाम नाही, तर त्यासोबत रंगेलही आहे. उद्दाम, निर्भयता आणि शृंगारप्रियता यांची सोबत जमली आहे. संभाजीच्या पुढील मनोव्यापारावर आणि वर्तनव्यवहारावर अशरण कामासक्तीचे जे वर्चस्व नांदते त्याची ही नांदीच होय. संभाजीचे हे साहस 'परमेश्वरस्वरूप' ठरणाऱ्या राजाच्या आदर्श गुणपरंपरेत बसणारे नाही,...!' असाही निकाल नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख असलेल्या रु.पां. पाजणकरांनी दिला आहे. त्यांना दरम्यानच्या काळात प्रबोधनकार ठाकरे, वा. सी. बेंद्रे, कमल गोखले, न.र.फाटक, दत्तो वामन पोतदार यांनी काय लिहून ठेवलंय, ह्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. ह्यालाच म्हणतात कुत्र्याचं शेपूट वाकडंच! इतिहासाची माती करणाऱ्यांच्या मतीचंही तसंच आहे. म्हणूनच कुत्राच नाही, तर कुठलाही प्राणी आगीला घाबरतो, आगीपासून दूर राहातो, हे जगजाहीर असूनही दंतकथेतला कुत्रा 'वाघ्या' बनून रायगडावर सर्वोच्चस्थानी शिल्परूपे समाधीस्त होतो. ही शिवप्रेमींची इमानी की बेईमानी?

No comments:

Post a Comment

मराठीच्या मरणकळा.....!

"पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधासाठी उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू येत्या पाच तारखेला मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येताहेत. ...