"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ्यासमोर येते. याचं कारण शिवसेना दुभंगल्यानंतर 'ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारधारा बदलली!' 'बाळासाहेबांचे विचार सोडले!' अशी टीका होतेय. मुळात त्यांची विचारधारा ही महाराष्ट्रधर्माची होती हे इथं स्पष्ट करायला हवं. शिवसेनेला तशी कोणतीच विचारधारा अस्पृश्य नव्हती. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रजा समाजवादी, रिपब्लिकन, दलित पँथर, कम्युनिस्ट इतकंच काय मुस्लिम लीगशीही शिवसेनेनं युती केली होती. शिवसेनेनं केलेल्या आघाड्या ह्या काळाच्या कसोटीवर उतरल्या. एवढ्या उलट-सुलट उड्या मारूनही शिवसेना टिकून कशी राहिली? त्याचं एक कारण म्हणजे शिवसेनेची कट्टर फौज आणि दुसरी, पक्षाला नसलेली सैद्धांतिक बैठक!"
....................................................
*भा*जप, मुस्लिम लीग, काँग्रेसचे विविध गट, प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित पँथर, ह्यांच्यात काय साम्य आहे, असं विचारलं तर अनेक जण बुचकळ्यात पडतील. फार कमी लोकांना माहीत असेल की, महाराष्ट्रातल्या ह्या राजकीय शक्ती कधी काळी शिवसेनेच्या सोबत युतीत वा आघाडीत होत्या. इतकंच काय, भाजपसोबत सुद्धा शिवसेनेनं १९८४ मध्ये अगदी काही काळासाठी घरोबा केला होता. पण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या भीषण दंगलीमुळं आलेल्या काँग्रेसच्या लाटेत, ही सेना भाजप युती वाहून गेली होती. नंतर, भाजपनं शिवसेनेशी काडीमोड घेतला पण त्यांचे बंध परत जुळले ते १९८९ मध्ये, ते सुद्धा हिंदुत्वाच्या विषयावर! यालाही एक घटना कारणीभूत आहे. ही युती २०१४ पर्यंत कायम राहिली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि आचार्य अत्रेंचा वाद नंतरच्या काळात इतका प्रचंड वाढला, कि त्या चिखलफेकीचे शिंतोडे अक्षरश: मुंबईतल्या जवळजवळ प्रत्येक मराठी घरात पोचले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी आचार्य अत्रे यांचा उल्लेख ‘वरळी नाक्यावरचं डुक्कर’ असं करून अत्र्यांच्या चेहऱ्याची साधर्म्य सांगणाऱ्या डुकराचं व्यंगचित्र मार्मिकमध्ये सतत काढलं होतं हे विशेष! तसं पाहिलं तर शिवसेनेच्या फक्त दोनच राजकीय भूमिका पहिल्या दिवसापासून आजवर कायम आहेत. त्या भूमिका म्हणजे मराठी माणसाचा घेतलेला कैवार तथा देशीवाद आणि टोकाचा कम्युनिस्ट विरोध!
शिवसेनेच्या जन्माच्या पुढच्या वर्षी, म्हणजे १९६७ मध्ये, शिवसेनेने एक महत्त्वाची राजकीय भूमिका घेतली. भारताचे माजी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना ईशान्य मुंबईतून लोकसभेसाठी निवडणूक लढवायची होती. परंतु त्या काळात मुंबई काँग्रेसचे अनभिषिक्त सम्राट असलेले स.का.पाटील, यांनी मेननना उमेदवारी नाकारली आणि माजी सनदी अधिकारी स.गो.बर्वे यांच्या गळ्यात माळ पडली. शिवसेनेनं आपला कधीकाळचा स.का.पाटील विरोध विसरून, पाटील हे संयुक्त महाराष्ट्राचे आणि मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याच्या विचाराचे कट्टर विरोधक मानले जायचे. शिवसेनेनं चक्क बर्वे यांना पाठिंबा जाहीर केला. १९६८ मध्ये शिवसेनेनं आपली पहिली वहिली मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. ऑक्टोबर १९६६ च्या पक्षाच्या पहिल्या सभेमध्ये शिवसेनाप्रमुखांनी राजकारणाचा उल्लेख 'राजकारण म्हणजे गजकर्ण' असा केला होता हे विशेष! प्रारंभी निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला. कालांतरानं केवळ नागरी सेवा देण्यासाठी म्हणून महापालिकेच्या निवडणुक लढविली. त्यावेळेला शिवसेनेचा मित्रपक्ष होता तत्कालीन प्रजा समाजवादी पक्ष. शिवसेना आणि प्रजा समाजवादी यांची युती फक्त १९७० पर्यंत टिकली. १९७२ मध्ये शिवसेनेला एक नवा मित्र मिळाला तो म्हणजे रा. सु. गवई यांच्या नेतृत्वाखालचा रिपब्लिकन पक्ष. उल्लेखनीय गोष्ट अशी की नंतरच्या काळात शिवसेना आणि दलित पॅंथर यांचा रस्त्यावर टोकाचा संघर्ष झाला. अर्थात नंतरच्या काळात ह्याच दलित पँथरच्या मुशीत घडलेले नामदेव ढसाळ, रामदास आठवले आणि अर्जुन डांगळे यासारखे नेते ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ चा नारा देऊन शिवसेनेच्या वळचणीला आले. १९७७ मध्ये सेनेनं काही काळ का होईना सेना आणि दलित पॅन्थर यांची युती झाली होती.
१९७२ मध्ये शिवसेनेचे अजातशत्रू नेते सुधीरभाऊ जोशी हे महापौर झाले तेसुद्धा चक्क मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर अर्थात नंतर महापौर जोशींना लीगच्या नगरसेवकांना एक सवलत द्यावी लागली ती म्हणजे सभागृहांमध्ये वंदे मातरम गायले जात असताना तटस्थ राहण्याची! याच मुस्लिम लीगसोबत शिवसेनेनं नंतर काही काळ युतीही केली होती. शिवसेनाप्रमुख आणि लीगचे तत्कालिन अध्यक्ष जी.एम.बनातवाला यांनी तर नागपाडामध्ये मस्तान तलावावर चक्क सभा घेतली. १९७५ ते १९८५ हे दशक शिवसेनेसाठी तसं फार अवघड होतं. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीला शिवसेनेनं पाठिंबा दिला. आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात डांबले जात होते. लाखोच्या संख्येत असलेल्या शिवसैनिकांची तुरुंगवारी वाचविण्यासाठी आणीबाणीला पाठींबा देऊन टाकला होता. असं शिवसेनाप्रमुखांनीच नंतर सांगितलं होतं.१९७७ मध्ये शिवसेनेच्या एका गटाची मागणी धुडकावून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि शिवसेनेलाही घरघर लागली. १९८० मध्ये शिवसेनेनं बाळासाहेबांचे मित्र असलेल्या काँग्रेसच्या बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांना मुख्यमंत्रिपदी पाठिंबा दिला. बाळासाहेबांनी तर श्रीवर्धनमध्ये त्यांचा प्रचारही केला होता. या पाठिंब्याच्या बदल्यात शिवसेनेला विधान परिषदेत काही जागा मिळाल्या. १९६९ च्या काँग्रेसमधल्या ऐतिहासिक फुटीनंतर शिवसेनेने काँग्रेसमधल्या विविध गटांचा, उदाहरणार्थ, इंडिकेट आणि सिंडिकेट, पाठिंबा घेऊन आणि देऊन महापालिकेतलं राजकारण पार पाडलं होतं. १९७७ मध्ये इंदिरा काँग्रेसच्या मुरली देवरांना मुंबईच्या महापौरपदासाठी पाठिंबा देण्याच्या विषयावरून ज्येष्ठ शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुंबईतले पहिले महापौर डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांनी तर जनता पक्षात प्रवेश केला. आज ह्याच मुरली देवरांचे पुत्र मिलिंद देवरा हे शिवसेनाप्रमुखांचे नातू आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी सरसावले आहेत.
ह्यात एक लक्षणीय गोष्ट अशी की शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याला स्टेजवर असणाऱ्या चार वेगळ्या पक्षाच्या नेत्यांपैकी एक होते ज्येष्ठ काँग्रेस नेते बॅरिस्टर रामराव आदिक!. आदिकांना १९७४ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा दिला होता. शिवसेनेची तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासोबत जवळीक होती. महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचा वाद जगजाहीर होता. दिल्ली दरबारी फंड गोळा करणाऱ्या रजनी पटेल, मुरली देवरा यांना मुख्यमंत्र्यांहून अधिक किंमत दिली जात असल्याने नाईक यांचा राग होता. शिवसेनेने परप्रांतीय विरोधात आंदोलन करीत असल्यानं ते काँग्रेसला पूरक ठरलं होतं. म्हणून मग शिवसैनिकांच्या आंदोलनांना पोलिसांनी अधिक त्रास न देता सौम्यता दाखविली. त्यामुळे शिवसेनेला ‘वसंतसेना’ हे नाव पडलं होतं, हेही तसं जगजाहीरच आहे. शिवाय शिवसेनेचे टीकाकार म्हणतात ही काँग्रेसच्या सांगण्यावरून शिवसेनेनं कम्युनिस्टांच्या अधिपत्याखालील कामगार संघटना खिळखिळ्या केल्या. अडचणीच्या गर्तेत सापडलेल्या शिवसेनेला ह्याच काँग्रेसनं १९८५ मध्ये नवसंजीवनी दिली. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि मुंबई काँग्रेसचे बॉस मुरली देवरा यांच्यात विळा भोपळ्याचा नातं. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट असल्याचा आरोप दादांनी केला. ह्यानंतर निर्माण झालेल्या मराठी माणसाच्या संतापावर शिवसेनेनं मुंबई महापालिकेत सत्ता हस्तगत केली. १९९२ ते ९७ हा अपवाद वगळता शिवसेना या महापालिकेवर सत्ता गाजवते आणि सत्तेच्या जोरावर शिवसेनेचे ‘पारितोषिक राजकारण’ - रिवॉर्ड इकॉनॉमी चालतं हे विशेष. अर्थात, ह्याच दशकात १९८० मध्ये शिवसेनेचे काँग्रेस सोबतचे रस्ते दुभंगले.
१९८७ मध्ये झालेल्या विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेनं हिंदुत्वाची झूल अधिकृतपणे पांघरली. त्याच्या आदल्या वर्षी शरद पवार यांनी आपली काँग्रेस-एस इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन केली होती. तेव्हा पवारांच्या मागे असणारा वर्ग हा गावोगावी असणाऱ्या काँग्रेसमधल्या सरंजामशाही नेत्यांशी संघर्ष करत होता. हा बिथरलेल्या वर्ग मग शिवसेनेसोबत गेला. नंतरच्या काळात शिवसेनेचे नेते म्हणून उदयाला आलेले बसमतचे डॉ. जयप्रकाश मुंदडा हे मूळचे काँग्रेसचे-एस चे. १९८२ मध्ये पवार आणि मुंबईचे बंदसम्राट, शिवसेनेचे कधी काळचे राजकीय विरोधक जॉर्ज फर्नांडिस हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित होते. ह्याच पवारांना १९९० च्या दशकात बाळासाहेब खास ठाकरी शैलीत मैद्याचं पोतं, बारामतीचा ममद्या कसं म्हणत हे लोकांना आठवतं…! तर, काळाची पावलं ओळखून भाजप नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनेसोबत युतीचं पाऊल उचललं. आज भाजपच्या मित्रपक्षांची यादी मोठी असली, तरीसुद्धा हिंदुत्वाच्या विषयावर मित्र असलेला शिवसेना हा भाजपचा एकमेव नैसर्गिक मित्र होता. ही भगवी युती टिकून राहिली २०१४ पर्यंत. आणखी एका गोष्टीची आठवण द्यायची तर २००७ आणि २०१२ ही दोन उदाहरण देता येतील. मराठी राष्ट्रपती हा मुद्दा घेत शिवसेनेनं प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती २०१२ मध्ये प्रणब मुखर्जी यांच्याबाबतीत झाली. गमतीचा भाग म्हणजे मित्रपक्ष असलेल्या भाजपनं मुखर्जींना नाही तर पी.ए.संगमांना पाठिंबा दिला होता. तसंच २००८ मध्येही राष्ट्रवादीशी युती करण्याचा अल्पजीवी प्रयत्न शिवसेनेनं केला होता. 'पब्लिक मेमरी इज शॉर्ट' असं म्हणतात. शिवसेनेनं केलेल्या अश्या आघाड्या ह्या काळाच्या कसोटीवर उतरल्या. पण एवढ्या उलट-सुलट उड्या मारून पण शिवसेना टिकून कशी राहिली? त्याची एक कारण म्हणजे शिवसेनेची कट्टर फौज आणि दुसरी, पक्षाला नसलेली सैद्धांतिक बैठक. १९८४ त्याकाळात समाजवादाशी फ्लर्ट करणाऱ्या बाळासाहेबांनी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात शिवसेनेची राज्यव्यापी बैठक बोलावली होती. त्याला संबोधित करायला उपस्थित होते ते भारतातले कम्युनिस्टांचे भीष्माचार्य कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. तेंव्हा डांगे ह्यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मधून हकालपट्टी झाली होती. आपल्या भाषणात डांगे साहेब म्हणाले होते कि, 'शिवसेनेची सैद्धांतिक बैठक नाही, आणि त्यामुळे अशी संघटना तग धरणे मुश्किल असते!' म्हणूनच सतत भूमिका बदलणं भाग पडलं होतं. आज जी ठाकरे सेनेवर बाळासाहेबांचे विचार सोडले असं जे म्हटलं जातंय ते गैरलागू ठरतेय!
चौकट
*भाजपची गरज आणि शिवसेनेची अपरिहार्यता*
१९८७ मध्ये विलेपार्लेची पोटनिवडणूक काँग्रेसच्या हंसराज भुग्रा यांच्या निधनाने जाहीर झाली. त्यासाठी शिवसेनेने डॉ. प्रभू यांना उभे केले. ते त्यावेळी मुंबईचे महापौर होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रभाकर कुंटे, जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा उभे होते. तेव्हा जनसंघ जनता पक्षात आणि शिवसेनेच्या विरोधात होता. शिवसेनेच्या एका प्रचारसभेत शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी गर्वसे कहो हम हिंदू है! अशी घोषणा दिली आणि मतदारांना हिंदूत्वावर मतं मागितली. या पोटनिवडणुकीत डॉ. प्रभू यांचा विजय झाला, ते निवडून आले. त्याविरोधात काँग्रेसचे प्रभाकर कुंटे हे कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे गेले. तिथं हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून डॉ. प्रभू यांची निवड कोर्टानं रद्द केली, तर निवडणूक आयोगानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. रमेश प्रभू यांचा मताधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला. हिंदुत्वाचा प्रचार करून मतं मागितली यावर असा निर्णय होण्याचा देशातला पहिलाच प्रकार होता. पण य घटनेनं हिंदू मतांचे लक्ष शिवसेनेकडे वेधले गेले. हिंदूत्वावर मतं मागण्याला कचरणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ सरसावले. हिंदुत्वाचा प्रचार केल्यानंतर मतं मिळू शकतात हे लक्षांत आल्यानंतर संघाशी संबंधित पत्रकार ग.वा.बेहरे, दि.बा गोखले, विद्याधर गोखले आणि प्रमोद महाजन यांच्या मातोश्रीवरच्या फेऱ्या वाढल्या. त्यांनी शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना युती करायची गळ घातली. केवळ मराठीचा आग्रह धरून आपला पक्ष विस्तारणार नाही हे माहीत असल्यानं त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार अवलंबला होता. दरम्यान भाजपने आपला 'गांधीवाद समाजवाद सोडून हिंदुत्वाचा स्वीकार करण्याचे हरियाणातल्या राष्ट्रीय अधिवेशनात घेतला. त्यासाठी प्रमोद महाजन आग्रही होते. अशाप्रकारे १९८९ मध्ये भाजपची गरज आणि शिवसेनेची अपरिहार्यता यामुळं शिवसेना भाजप युती झाली ती २०१४ पर्यंत टिकली. काही दिवसांच्या खंडानंतर ती २०१९ पर्यंत टिकली!
हरीश केंची
९४२२३१०६०९