Tuesday, 29 September 2026

'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह...!'

काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांचं आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह...!' हे नोव्हेंबरमध्ये येणार आहे. इंग्रजी पुस्तकांना ग्राहक, वाचक आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. प्रसिद्धी मिळाली की पुस्तक सहज विकलं जातं. चरित्र आणि आत्मचरित्र यात फरक आहे. चरित्र अन्य व्यक्ती लिहू शकते. सोनियांच्यासंदर्भात दोन पुस्तके माझ्या माहितीत आहेत. त्यात एक चरित्र अन् एक काल्पनिक आहे. सोनिया यांचं बालपण, शिक्षण, त्यांची जडणघडण यासंदर्भात जनतेत काँग्रेस वा गांधी घराण्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना हे आकर्षण असेल. सोनिया गांधी कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हत्या. पण त्या दहा वर्षे राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्ष होत्या. कायदे कसे करावेत, याची चर्चा या परिषदेत होत असे. याचा तपशील सोनिया गांधी आपल्या पुस्तकात प्रकाशझोत टाकतील, हे अपेक्षित आहे. सोनियांच्या या पुस्तकात जे मुद्दे असतील ते वादग्रस्त ठरतील असं वाटतं, त्यात त्यांनी भाजप अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात व्यक्त केलेली मतं असू शकतात. २०१४ च्या निवडणुकीला काँग्रेस पक्ष आत्मविश्वासाने सामोरा गेला नाही. सोनियांना २००४ मध्ये मिळालेलं यश तसं हंगामी होतं. २००९ मध्ये जनतेने डॉ. मनमोहन सिंग यांना पाठबळ दिलं, पण त्यांना त्यांचं श्रेय मिळालं नाही. नरसिंह राव यांना काँग्रेसनं अवमानित केलं होतं. एक संदर्भ असा आहे की, नरसिंह राव यांना सोनियांनी विचारलं होतं की, 'जर मी तुमची मुलगी असते तर तुम्ही मला राजकारणात येण्याच्या संदर्भात काय सल्ला दिला असता?' यावर नरसिंह राव यांनी, सोनियांना राजकारणात येऊ नका असं सांगितलं होतं. 'मी राहुल, प्रियंका यांना पुढे तयार करतो. त्यांना माझ्याबरोबर नेत जाईन, तयार करीन!' असं नरसिंह राव म्हणाले होते. यासंदर्भात सोनिया गांधी पुस्तकात काय लिहिलंय, याचं औत्सुक्य वाचकांना असणं स्वाभाविक आहे. नरसिंह राव यांनी सोनिया गांधी यांच्याशी सौहार्दाचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 
काँग्रेसमध्ये अन्य सक्षम नेते असतानाही सोनियांनी काँग्रेसचं सदस्यत्व घेतल्यानंतर लगेचच त्यांना अध्यक्ष करण्यासाठी सीताराम केसरी यांना बाजूला करण्यात आलं. सोनियांनी या पुस्तकात त्यावर काही प्रकाश टाकला असेल की कसे, हे गुलदस्त्यात आहे. शरद पवार यांनी सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा आणला, त्यानंतर काँग्रेसला मोठा फटका बसला. त्याबाबत सोनियांना नेमकं काय वाटतं? नंतर शरद पवार पुन्हा त्यांच्या गोटात गेले. ते सगळं कसं घडलं हेही लोकांना वाचायला आवडेल. त्यांचं शिक्षण, अनुभव, वाचन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सोनिया गांधी अजूनही क्रियाशील असल्याने यापुढील काळात काँग्रेसपक्षात तीन सत्ताकेंद्रे तयार होतील, हे लक्षात घ्यायला हवं. राहुल, प्रियंका यांना मानणारे अनेक नेते आहेत. हे लक्षात घेता सोनिया गांधी यांचे पुस्तक हे पक्षात स्पर्धा निर्माण करण्यासाठी एक कारण होईल असं वाटतं. २०१४ च्या निवडणुकीच्या मागेपुढे जी काही पुस्तके आली त्यात काँग्रेसनेते माजी मंत्री नटवर सिंग यांचं ‘One life is not enough’ आणि पंतप्रधानांचे सल्लागार संजय बारू यांचं ‘Accidental prime minister’ ही पुस्तके गाजली आणि काँग्रेसला त्याचा फटका बसला. आता कदाचित सोनियांच्या पुस्तकानंतर मनेका गांधी यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनेका गांधी यांना घराबाहेर पडावे लागण्यात सोनियांनी काही भूमिका बजावली होती का? वा त्यांनी मनेका गांधी यांना रोखण्यासाठी काही प्रयत्न केले होते का हेही महत्त्वाचं आहे. तसं नसेल वा असेल तरी चर्चा होणारच. या आत्मचरित्रातून उलगडेल गांधी कुटुंबाचं गुपित !
१९९८ मध्ये सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या, तेव्हा त्या नवख्या, अपरिचित नेत्या होत्या. इटलीत जन्मलेल्या, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी सोनियांनी काँग्रेसची सूत्रे घेण्यापूर्वी अनेक वर्षे राजकारणापासून स्वतःला दूर ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसपक्षाची जबाबदारी स्वीकारली. त्या फारशा बोलत नसत, कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे लोकांपासून त्या दूर होत्या. कमी बोलण्यामागे सत्ता कशी वापरायची, हे शिकणाऱ्या एक राजकारणी त्या दिसत होत्या. वेगवेगळी, परस्परविरोधी मतं ऐकून त्या घेत, माहिती गोळा करत, त्यानंतर स्वतः निर्णय घेत. साधारण तीन दशकांनंतर, काँग्रेससारख्या जुन्या पक्षात 'बाहेरची व्यक्ती ते सर्वात शक्तिशाली नेत्या...' असा प्रवास करणाऱ्या सोनिया गांधी आता या संपूर्ण राजकीय प्रवासाची कहाणी सांगताहेत. ७९ वर्षीय सोनियांना आयुष्यात अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय. सोनियांचं आत्मचरित्र अमेरिकेत अल्फ्रेड ए नॉफ आणि ब्रिटनमध्ये विल्यम कॉलिन्स या प्रकाशन संस्थेकडून नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होणार आहे. अल्फ्रेड ए. नॉफ यांच्या माध्यमातून सोनियांनी दिलेल्या निवेदनात म्हणतात की, 'माझ्या आयुष्यात आलेले सुखाचे क्षण अन् गडद अंधाराचे दिवस यांचा हा भावनिक प्रवास या आत्मचरित्रातून मांडायचाय!' विल्यम कॉलिन्स यांच्या माहितीनुसार, या पुस्तकाची सुरुवात १९६५ मध्ये केंब्रिज इथून होते. त्यावेळी १९ वर्षांच्या इटालियन विद्यार्थिनी सोनिया माइनो या राजीव गांधींच्या प्रेमात पडल्या. या आत्मचरित्रातून सोनिया गांधी आपल्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगताहेत. प्रकाशकांच्या मते, त्यांच्या आयुष्यातले प्रेम, देशाबाहेर राहण्याचे दिवस, राजकारण आणि आयुष्यात आलेले मोठे दुःख यांचा या पुस्तकात आढावा घेण्यात आलाय. .
सोनिया गांधी यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ रोजी इटलीत लुसियाना इथं झाला. इंग्लंडमध्ये त्यांची भेट राजीव गांधी यांच्याशी झाली. २५ फेब्रुवारी १९६८ रोजी दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर सोनिया भारतात परतल्या. हळूहळू गांधी कुटुंबाचा भाग बनल्या. बराच काळ त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहून प्रामुख्यानं आपल्या कुटुंबासोबत वास्तव्य केलं. त्यांची राजकीय कारकीर्द खरोखरच परिस्थितीनं घडवली. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यावेळी सोनिया गांधी स्वतः राजकारणात उतरल्या नाहीत. पण २१ मे १९९१ रोजी झालेली राजीव गांधींची हत्या त्यांच्या आयुष्यातली दुसरी मोठी शोकांतिका ठरली. तरीही, त्यांनी काँग्रेसची सूत्रं स्वीकारण्यास नकार दिला. अनेक वर्षे राजकारणापासून दूर राहिल्यानंतर, सोनिया गांधी १९९७ मध्ये काँग्रेस पक्षात सामील झाल्या. १९९८ मध्ये पक्षाच्या अध्यक्ष झाल्या. हा तो काळ होता जेव्हा काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर कमकुवत होत होता. भाजपचा प्रभाव वाढत होता. सोनियांनी पक्षाची पुनर्रचना करण्यासाठी अन् विविध प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्यासाठी काम केले. सोनिया गांधींच्या राजकीय कारकिर्दीत सर्वात महत्त्वाचा, वादग्रस्त अध्याय म्हणजे २००४ च्या लोकसभा निवडणुका होत्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. सोनिया पंतप्रधानपदाच्या सर्वात संभाव्य दावेदार म्हणून पुढे आल्या. याच काळात त्यांच्या परदेशी वंशाबद्दलचा प्रचार शिगेला पोहोचला. परदेशी वंशाचा मुद्दा केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, भाजपने उपस्थित केला होता. फेब्रुवारी २००४ मध्ये, सोनियांनी स्वतः म्हटलं होतं की, भाजप त्यांच्या परदेशी वंशाला निवडणुकीचा मुद्दा बनवतेय.
मे २००४ मध्ये, जेव्हा काँग्रेस सत्तेवर आली, तेव्हा संघाचा विरोध अधिक तीव्र झाला. सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांनी सोनियांच्या कुटुंबाबद्दल, परदेशी वंशाबद्दलही गंभीर आरोप केले. ऑगस्ट २००४ मध्ये, त्यांनी आरोप केला की सोनियांचे वडील, अँटोनियो मायनो, यांचं केजीबी आणि इटालियन फॅसिस्ट पक्षाशी संबंध होते आणि त्यांनी त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  पण प्रस्थापित तथ्ये नव्हती. संघाच्या मोहिमेला समांतर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही पंतप्रधानपदासाठी परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केला. भाजप अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी मे २००४ मध्ये म्हटलं होतं की, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांसारखी सर्वोच्च पदे भारतीय वंशाच्या व्यक्तींनीच भूषवावीत. सुषमा स्वराज, उमा भारती यांनीही सोनिया गांधी पंतप्रधान होण्याच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली. तत्कालीन भाजप विचारवंत के. एन. गोविंदचार्य यांनी सोनियांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी 'राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन' सुरू केलं आणि या नियुक्तीला 'सांस्कृतिक आत्महत्या' असंही म्हटलं. मार्च २००४ मध्ये, राजनाथ सिंह यांनीही सोनियांच्या परदेशी वंशाला राष्ट्रीय अभिमानाशी जोडलं आणि हा लोकसभा निवडणुकीतला एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं. या मोहिमेचा मुख्य युक्तिवाद हा होता की, भारतासारख्या देशाला भारतीय वंशाचा पंतप्रधान मिळाला पाहिजे. दुसरीकडे, काँग्रेस आणि सोनिया गांधींच्या समर्थकांनी असा युक्तिवाद केला की, भारतीय संविधान नागरिकत्वाच्या आधारावर हक्क प्रदान करतं, जन्मस्थानाच्या आधारावर नाही. हा वाद वैयक्तिक नव्हता. 
१८ मे २००४ रोजी सोनियांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी आपल्या या निर्णयाचे कारण 'अंतरात्म्याचा आवाज' असल्याचं सांगितलं. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. त्यांनी हा निर्णय तीव्र विरोध, परकीय राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर घेतला होता. काँग्रेसनं याला वैयक्तिक पदत्याग, त्यागाचे उदाहरण म्हणून सादर केलं. टीकाकारांनी याकडं राजकीय दबावाचा परिणाम,  धोरणात्मक निर्णय म्हणून पाहिलं. खरं तर, सोनियांनी पंतप्रधानपद स्वीकारलं नाही. ही एक निर्विवाद वस्तुस्थिती आहे; काँग्रेस नेते आणि परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी आत्मचरित्रात लिहिलंय की, सोनियांनी पंतप्रधान होऊ नये, याला त्यांचा मुलगा राहुल गांधी यांचाच 'ठाम' विरोध होता. आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्यासारखीच अवस्था आईचीही होईल, अशी त्यांना भीती वाटत होती. नटवर सिंह यांच्या मते, या प्रकरणाला निर्णायक वळण आलं, जेव्हा राहुल गांधींनी आईला पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी 'काहीही करण्याची' तयारी असल्याचं म्हटलं होतं. सोनियांच्या आत्मचरित्रातून या निर्णयामागची खरी कहाणी समोर येईल का? किंवा पडद्यामागे नेमकं काय घडलं, याची वेगळीच बाजू त्या सांगतील का? २००४ नंतर, सोनिया यूपीएच्या अध्यक्षा झाल्या. अन् केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, सोनियांनी काँग्रेस अन् आघाडीच्या राजकारणात आपली प्रभावी भूमिका बजावणं सुरूच ठेवलं. या काळात माहितीचा अधिकार कायदा, मनरेगा, अन्न सुरक्षा यांसारखी धोरणं प्रमुख राजकीय यश म्हणून उदयास आली. 
२००९ मध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए पुन्हा सत्तेवर आले. हे सोनियांच्या नेतृत्वाचं एक मोठे यश होतं. २००४ च्या तुलनेत काँग्रेसनं चांगली स्थिती मिळवली. मनमोहन सिंग पुन्हा पंतप्रधान झाले. सोनिया गांधींवरील प्रमुख टीकांपैकी एक म्हणजे घराणेशाही. राहुल आणि नंतर प्रियांका यांच्या सक्रिय राजकीय भूमिकेने या चर्चेला आणखी बळ दिलं. दुसरी टीका होती की सोनियांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये काँग्रेस संघटना कमकुवत झाली. २०१४ नंतर, काँग्रेसला वाढत्या गंभीर निवडणूक आव्हानांना सामोरं जावं लागलं आणि भाजप राष्ट्रीय स्तरावर एक प्रमुख राजकीय शक्ती बनली. ज्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी तीव्र विरोध केला होता, त्या राजीव गांधींच्या राजकीय प्रवासाबद्दल त्या काय बोलणार? आपल्या मुलांच्या सुरक्षेबद्दल त्यांना कोणत्या चिंता होत्या? गांधी घराण्याची राजकीय परंपरा अशीच सोडून देता येणार नाही, असा निर्णय त्यांनी कधी, का घेतला? बोफोर्स प्रकरणाबद्दलही सोनिया आत्मचरित्रात बोलणार का? इटालियन व्यावसायिक ओटाव्हिओ क्वात्रोचीशी गांधी कुटुंबाच्या संबंधांवरूनही अनेक वर्षे वाद होता. या आरोपांबद्दल सोनिया बोलतील का? त्यांच्या इटलीतल्या जन्मामुळे झालेल्या वादाबद्दल त्या काय सांगणार? १९९९ मध्येच शरद पवार आणि काही नेत्यांनीही त्यांच्या परदेशी जन्माबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हा सोनियांनी भारत सोडून जाण्याचा विचार केला होता का? हे पुस्तक २००४ ते २०१४  काळात काँग्रेस अन् सरकारमधील गुंतागुंतीच्या गोष्टींवरही प्रकाश टाकेल, अशी अपेक्षा आहे. २०१७ मध्ये काँग्रेसचं नेतृत्व त्यांनी मुलगा राहुल यांच्याकडे सोपवलं. १९९४ मध्ये प्रकाशित 'राजीव' पुस्तकात सोनियांनी लिहिलं होतं की, राजीव गांधींनी राजकारणात येऊ नये यासाठी त्यांनी 'वाघिणीसारखा लढा दिला !' राहुल गांधींची राजकीय शैली आणि त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सोनियांना कसा वाटतो? त्या राहुल यांच्या राजकारणाचं किती समर्थन करतात? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून मिळतील. गांधी घराण्याची राजकीय परंपरा पुढे नेण्यासाठी सोनियांनी लोकप्रिय अन् करिष्माई मुलगी प्रियांका यांच्याऐवजी राहुल गांधींची निवड का केली? प्रियांका राजकारणात येणार अशी चर्चा असतानाही त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात २०१९ मध्येच प्रवेश का केला? राजकारणात यायचं की नाही, हा निर्णय माझ्या मुलांनीच घ्यायचाय, असं सोनिया म्हणायच्या. याशिवाय ज्या राजकारणावर सोनियांचा प्रभाव राहिला, त्या भारताविषयी त्यांना नेमकं काय वाटतं? भाजपने 'काँग्रेसमुक्त भारत'चा नारा दिलाय. तर काँग्रेसचे टीकाकार पक्षाच्या विरोधातला लढा हा घराणेशाहीच्या राजकारणाविरोधातला लढा म्हणून पाहताहेत. काँग्रेसला वारंवार निवडणुकांमध्ये पराभव सहन करावा लागला. अनेक नेत्यांनी पक्ष सोडून विरोधकांची साथ धरली. त्यामुळे आता प्रश्न केवळ गांधी घराणं काँग्रेसला मजबूत करू शकेल का, इतकाच राहिलेला नाही; तर ते पक्षाला एकत्र ठेवू शकतील का, हाही मोठा प्रश्न आहे. सोनियांना त्यांच्या आत्मचरित्रातून नेमकं काय सांगायचंय, याच्या मुळाशी जातो. "माझ्या कुटुंबाबद्दल खूप काही लिहिलं गेलंय. पण त्यांच्या निर्णयांमागची कारणं, त्यांनी केलेल्या गोष्टी, त्यांच्या मानवी चुका किंवा उणिवा याबद्दल फार कमी माहिती समोर आलीय. हे पुस्तक त्यांच्या माणूसपणाला, मानवी पैलूला समर्पित आहे,...!" असं सोनियांनी या पुस्तकाबद्दल म्हटलंय. त्यामुळे सोनियांचं आत्मचरित्र हे राजकारणाचा हिशेब मांडण्यापेक्षा, गांधी घराण्याशी असलेलं त्यांचं नातं, वारसा त्यांच्यासाठी का महत्त्वाचा आहे, हे सांगणारं किंवा स्पष्ट करणारं अधिक असू शकतं.
हरीश केंची,
९४२२३१०६०९.

No comments:

Post a Comment

आमुची भाषा कळेना’…!

तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी माहीर असलेल्या भाजपसारख्या पक्षालाही एका परीनं या तंत्रस्नेही पिढीनं चकवा दिलाय. तंत्रस्नेही काळात जन्मलेल्या ...