Tuesday, 29 September 2026

मामा परमानंद

पुन्हा लग्न करणाऱ्या विधवांना घरात घेणारा हा ‘मामा’ माहित्येय? मुंबईत मामा परमानंद मार्ग आहे. चर्नीरोड स्टेशनवरून ऑपेरा हाऊसच्या दिशेने चालायला लागलो की मामा परमानंद मार्ग लागतो. हे मामा परमानंद कोण, असा प्रश्न अनेकदा पडला पण घरी आलो की विसरून जायला व्हायचं. पण काही दिवसांपूर्वी एक पुस्तक पाहण्यात आलं, The Birth of Indian Liberalism: Mama Parmanand’s Letters to an Indian Raja. हे पुस्तक पाहिलं आणि मामा परमानंद सापडले. जेव्हा त्यांच्याबद्दल वाचलं तेव्हा कळलं की, केवढा मोठ्ठा माणूस होता हा. आपल्याला कोणी कधी सांगितलंच नाही. 
विचार करा, १८५० ते १८७० वगैरेचा काळ आहे. किती कर्मठ वातावरण असणार तेव्हा. त्या काळात विधवा विवाह केलेल्यांसाठी हा माणूस आपलं घर खुलं करतो. त्यांना आपल्या घरात आश्रय देतो. पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेतील संस्थापक सदस्य असतो. आयुष्याच्या उत्तरार्धात तो भारतीय राज्य कसं असावं, त्यासाठी तेव्हाच्या राजांनी काय करायला हवं अशा आशयांचं लेखन करतात. आधुनिक भारताची ही पहिली राजकीय मांडणी आहे, असं विद्वानांचं म्हणणं आहे. 
तर हे पुस्तक आहे, मँचेस्टर युनिव्हर्सिटी प्रेसने यावर्षीच प्रकाशित केलेलं राहुल सागर यांनी संपादीत केलेलं मामा परमानंदांच्या पत्रांचा संग्रहाबद्दलचं. खरं तर हा १८९१मध्ये प्रसिद्ध झालेल्या Letters to an Indian Raja या ग्रंथाचं नवं संपादन आहे. मूळ ग्रंथासोबत या पुस्तकात मामांच्या आयुष्याची, विचारांची आणि त्या काळच्या महाराष्ट्रातील बौद्धिक वातावरणाची सविस्तर ओळख करून दिली आहे.
हे पुस्तक लिहित असताना मामा परमानंदांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. पार्किन्सनच्या आजारामुळे स्वतः लिहिणं कठीण झालं होतं. ते आपले विचार मदतनीसाला हळू आवाजात सांगत आणि त्यातून हा ग्रंथ तयार झाला. त्यांनी तो ‘A Political Recluse’ या टोपणनावाने प्रकाशित केला आणि मग गंमत अशी घडली की हा ग्रंथ जवळजवळ विस्मृतीत गेला.
इतका विस्मरणात गेला की, राहुल सागर यांच्या म्हणण्यानुसार, पुढच्या शतकात त्याचा संदर्भ जवळजवळ कुठेच दिसत नाही. भारतीय उदारमतवादाच्या इतिहासावर लिहिणाऱ्या प्रसिद्ध इतिहासकार ख्रिस बेली यांनी त्याचा एकदा उल्लेख केला होता; पण पुस्तकाचा प्रत्यक्ष अभ्यास केला नव्हता. मामा परमानंद हे नावही बहुतांश लोकांच्या स्मरणातून नाहीसं झालं. मुंबईत त्यांच्या नावाचा रस्ता आणि मुंबई विद्यापीठातील त्यांच्या नावाची शिष्यवृत्ती, इतक्याच खुणा उरल्या होत्या.
राहुल सागर यांचं पुस्तक याच विस्मृतीत गेलेल्या माणसाला पुन्हा आपल्या बौद्धिक इतिहासात आणतं. पण, या विचारवंताकडे पाहण्याआधी त्यांचं आयुष्य पाहिलं, तर हा माणूस आणखी जवळचा वाटतो.
नारायण महादेव परमानंद यांचा जन्म ३ जुलै १८३८ रोजी सावंतवाडीजवळच्या माणगावात झाला. ते अगदी लहान असतानाच वडील महादेव वारले. आई गंगाबाईंनी आपल्या भावाच्या मदतीने दुकान चालवत मुलाचं प्राथमिक शिक्षण केलं. पुढे मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या नारायणरावांनी एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलं. पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरावी लागली. तिथे शिकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुढे प्रसिद्ध झालेले काशिनाथ त्र्यंबक तेलंगही होते.
पुढचं आयुष्य पत्रकारिता, सरकारी नोकरी, सामाजिक सुधारणा, प्रार्थना समाज आणि सार्वजनिक जीवन अशा अनेक दिशांनी विस्तारत गेलं. इंदुप्रकाश, Native Opinion, Indian Spectator आणि प्रार्थना समाजाचं मुखपत्र सुबोध पत्रिका अशा वृत्तपत्रांशी त्यांचा संबंध होता. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, काशिनाथ त्र्यंबक तेलंग, नारायण चंदावरकर, बहरामजी मलाबारी अशा त्या काळातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी त्यांचे निकटचे संबंध होते. सयाजीराव गायकवाड यांच्यासारखे संस्थानिकही त्यांचा सल्ला घेत.
सार्वजनिक आयुष्याइतकंच त्यांचं घरही त्यांच्या विचारांचं एक छोटं केंद्र होतं. पत्नी जानकीबाईंनी त्यांच्या सामाजिक कामाला अखेरपर्यंत साथ दिली. विद्यार्थी, देशभरातून येणारे पाहुणे आणि सुधारक यांच्यासाठी त्यांच्या घराची दारं उघडी असत. पुनर्विवाह करणाऱ्या स्त्री-पुरुषांना त्या काळात सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागायचं. विशेषतः पुनर्विवाह करणाऱ्या विधवा स्त्रियांचे माहेरच्या आणि सासरच्या लोकांनी नाते तोडलेले असायचे. अशा वेळी निराधार झालेल्या या स्त्रियांना मामा परमानंदांनी माहेरच्या माणसासारखा आधार दिला. त्यांचं घर अक्षरशः ‘पुनर्विवाहितांचा आश्रम’ बनलं होतं.
कदाचित म्हणूनच, एका ‘मामा’सारखा आधार देणारा माणूस म्हणून त्यांना ‘मामा’ म्हटलं जाऊ लागलं असावं, असं मला वाटतं. मात्र याला पुष्टी देणारा ठोस संदर्भ मला अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे हा केवळ एक अंदाज आहे. याबद्दल कुणाला अधिक माहिती किंवा संदर्भ माहीत असेल, तर नक्की सांगा. चूक-भूल द्यावी-घ्यावी.
मामा परमानंद हे त्या काळातले माणूस होते, जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनाही झालेली नव्हती. १८६७मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना झाली आणि त्या काळापासून ते सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या चळवळीत सक्रिय होते. काँग्रेसची स्थापना १८८५मध्ये झाली; पण त्याआधीची जवळजवळ दोन दशके मामा परमानंद मुंबईच्या सार्वजनिक जीवनात काम करत होते.
त्यामुळे त्यांच्यासमोरचा प्रश्न केवळ ‘ब्रिटिशांपासून भारत कधी स्वतंत्र होणार?’ असा नव्हता. भारत स्वतंत्र होण्याआधीच भारतीय समाज कसा बदलणार, धर्माकडे कसं पाहणार, स्त्रियांना किती स्वातंत्र्य मिळणार, जात आणि रूढींच्या पलीकडे व्यक्तीचं स्थान काय असणार, हे प्रश्नही त्यांच्या काळात ऐरणीवर होते.
आणि याच ठिकाणी त्यांच्या सामाजिक सुधारणांपासून त्यांच्या राजकीय विचारांपर्यंतचा धागा जोडला जातो. आज आपण ‘उदारमतवाद’ म्हटलं की त्याची सुरुवात युरोपात झाली आणि इंग्रजी शिक्षणातून तो विचार भारतात आला, अशी एक सरळ कथा सांगितली जाते. राहुल सागर या कथेलाच प्रश्न विचारतात.
त्यांच्या मते, १९व्या शतकात भारतीय विचारवंत आपले प्रश्न स्वतःच्या अनुभवातून विचारत होते. भारतात स्वातंत्र्याचा प्रश्न फक्त परकीय सत्तेपासून मुक्त होण्याचा नव्हता. जात, रूढी, सामाजिक दबाव आणि समुदायाची सत्ता यांपासून व्यक्तीला किती स्वातंत्र्य मिळणार, हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न होता.
मामा परमानंदांनी Letters to an Indian Raja या आपल्या इंग्रजी ग्रंथात त्यावेळच्या राजांना याबद्दल सांगितलं आहे. इथे एक प्रश्न सहज पडतो की, Letters to an Indian Raja म्हणजे नेमकी कोणाला लिहिलेली पत्रं? पुस्तकाच्या नावात एखाद्या विशिष्ट राजाचं नाव नाही. खरं तर, ही पत्रं एखाद्या बंद पाकिटात ठेवून एका राजाला पाठवलेली खासगी पत्रं नव्हती. त्यांची सुरुवात Indian Spectator मधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालेतून झाली आणि नंतर त्याचं सुधारित रूप पुस्तक म्हणून प्रकाशित झालं. त्यांचा प्रमुख संदर्भ बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी होता; पण ‘An Indian Raja’ हे संबोधन वापरून मामा परमानंदांनी आपला प्रश्न एका राजापुरता मर्यादित ठेवला नाही.
भारतीय संस्थानिक राजा नेमका कसा असावा? त्याची सत्ता प्रजेच्या स्वातंत्र्याशी आणि अधिकारांशी कशी जोडली जावी? एखादं भारतीय संस्थान ब्रिटिश सत्तेची केवळ सावली न राहता स्वतःच्या उदारमतवादी आणि घटनात्मक शासनाचा आदर्श कसं उभं करू शकतं? हा त्यांचा खरा प्रश्न होता.
राजा म्हणजे सर्वशक्तिमान शासक नव्हे. राज्यघटना, कायदा आणि प्रजेचे अधिकार यांना मानणारा राजा असावा, असा त्यांचा आग्रह होता. भारतीय संस्थानांनी चांगलं, जबाबदार आणि घटनात्मक शासन उभं केलं तर ती संस्थानं केवळ ब्रिटिशांच्या आश्रयावर जगणारी राज्यं राहणार नाहीत; उलट ब्रिटिश सत्तेला पर्यायी राजकीय आदर्श उभा करू शकतील, असा विचार त्यांनी मांडला.
यातली गंमत अशी की मामा परमानंद फक्त ब्रिटिश सत्तेवर टीका करणारे नव्हते; भारतीय राजांच्या स्वेच्छाचारालाही ते प्रश्न विचारत होते. त्यांना सत्ता कोणाच्या हातात आहे, यापेक्षा ती सत्ता कशी वापरली जाते, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटत होता. म्हणूनच राहुल सागर Letters to an Indian Rajaला आधुनिक भारतात प्रकाशित झालेलं पहिलं राजकीय सिद्धान्ताचं पुस्तक म्हणतात. हा त्यांच्या अभ्यासातून पुढे आलेला दावा आहे; आणि त्यातूनच पुस्तकाचं शीर्षक आलं आहे, The Birth of Indian Liberalism.
मामा परमानंदांच्या सामाजिक सुधारणांकडे आणि त्यांच्या राजकीय विचारांकडे एकत्र पाहिलं, तर त्यांच्या उदारमतवादाचा गाभा आणखी स्पष्ट होतो. विधवा पुनर्विवाहासाठी स्वतःच्या घराची दारं उघडणारा माणूस आणि भारतीय राजाला घटनात्मक शासनाचा सल्ला देणारा विचारवंत, हे दोन वेगळे मामा परमानंद नव्हते. तोच त्यांच्या विचारांचा एक सलग धागा होता. व्यक्तीला समाजाच्या रूढींपासून स्वातंत्र्य हवं, आणि प्रजेला राजाच्या मनमानीपासूनही स्वातंत्र्य हवं, या दोन गोष्टी त्यांच्या विचारांत एकमेकींपासून वेगळ्या नव्हत्या.
या सगळ्या कामाची किंमत त्यांच्या शरीरालाही मोजावी लागली. कामाच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि १८८३पासून शेवटपर्यंत जवळजवळ दहा वर्षे ते घरीच बिछान्यावर होते. आयुष्याच्या अखेरीस पार्किन्सनच्या आजारामुळे स्वतः लिहिणं कठीण झालं होतं; तरीही विचार थांबले नाहीत. त्याच अवस्थेत त्यांनी आपले विचार सांगून Letters to an Indian Raja तयार करून घेतला.
१३ सप्टेंबर १८९३ रोजी, वयाच्या अवघ्या ५५व्या वर्षी, मुंबईतील आपल्या घरी मामा परमानंदांचं निधन झालं. शेवटच्या क्षणी त्यांच्या भोवती डॉ. रामकृष्ण भांडारकर, शांताराम विठ्ठल, तुकाराम तात्या, नारायण चंदावरकर, भास्कर हरि भागवत, श्रीधरपंत भांडारकर अशी आयुष्यभराची मित्रमंडळी होती. 
मामा परमानंद या नावामागे एक संघर्षमय आयुष्य आहे. अभावातून वर आलेला एक शिक्षक आहे. समाजाच्या रूढींना प्रश्न विचारणारा सुधारक आहे. इतरांनी घराची दारं बंद केलेल्या माणसांसाठी स्वतःच्या घराची दारं उघडणारा गृहस्थ आहे. आणि अखेरच्या आजारपणातही एका भारतीय राजाला स्वातंत्र्य, अधिकार आणि घटनात्मक शासनाचा अर्थ समजावून सांगणारा विचारवंत आहे.
आजही विधवा विवाह हा ज्या समाजात टॅबू आहे, तिथं जवळपास दीडशे वर्षांपूर्वी पुन्हा लग्न करणाऱ्या विधवांना घरात घेणारा हा ‘मामा’ समजून घ्यायला हवा.

No comments:

Post a Comment

आमुची भाषा कळेना’…!

तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी माहीर असलेल्या भाजपसारख्या पक्षालाही एका परीनं या तंत्रस्नेही पिढीनं चकवा दिलाय. तंत्रस्नेही काळात जन्मलेल्या ...