पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी यांच्या भाषणांमधला फरक असा की, एक भविष्याबद्दल चिंता व्यक्त करतो, तर दुसरा आपलं कर्तृत्व सांगतो. १९५८ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात नेहरूंनी अणुभौतिकशास्त्र, आईनस्टाईन, औद्योगिक क्रांती, भांडवलशाही, साम्यवाद, सामाजिक न्याय, भारतीय संस्कृती आणि आधुनिक तांत्रिक सभ्यतेमुळे निर्माण झालेले आध्यात्मिक संकट यांचा आढावा घेतला होता. तर दुसरीकडे, दिल्ली विद्यापीठातले मोदींचं भाषण वेव्ह, इम्पॅक्ट, टार्गेट, अँग्री फूफा, दिमाखी नक्षल, फ्लॅस, ओजी, या शब्दांनी, राजकीय विनोदांनी भरलेलंय. नेहरूंनी ६ डिसेंबर १९५८ ला दिल्ली विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भाषण दिलं. मोदींनी ५ सप्टेंबर २०२६ ला दिल्ली विद्यापीठाच्याच श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात भाषण दिलं. दोन्ही भाषणं विद्यार्थ्यांपुढं दिलेली. नेहरूंसमोरचे विद्यार्थी हे स्वातंत्र्यलढ्यातून देश निर्माणाच्या पिढीतले, तर मोदी 'जनरेशन झेड'ला संबोधित करत होते. दोन्ही भाषणांची लांबीही जवळपास सारखी. नेहरूंचं इंग्रजी भाषण ३९०० शब्दांचं, तर मोदींचं हिंदी भाषण ३१०० शब्दांचं होतं. दोघांनीही भाषणं अशा वयात दिली, जेव्हा एखाद्या राजकारण्याकडून आपल्या काळाला, समाजाला, अन् पुढच्या पिढीला केवळ प्रोत्साहनपर घोषणांपेक्षा अधिक काहीतरी देण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
*स्वातंत्र्यपूर्व अन् स्वातंत्र्योत्तर तरुण पिढी*
नेहरू हे व्यापक अर्थानं स्वदेशी पिढीचे होते. ही पिढी पारतंत्र्यात जन्मली, राष्ट्रीय चळवळीच्या वातावरणात वाढली अन् स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. नेहरू या भाषणात म्हणतात की, 'त्यांची पिढी मूलतः गांधीयुगातल्या लोकांपैकी...!' या पिढीनं परकीय राजवट पाहिली, तिच्याविरुद्ध लढा दिला, स्वातंत्र्य मिळवलं. फाळणी अन् स्वातंत्र्य आपल्या डोळ्यांनी पाहिलंय. मोदींचा जन्म स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनी झाला. त्यांच्या पिढीचं ध्येय ब्रिटिशांकडून देश हिसकावून घेणं हे नव्हतं, तर एका स्वतंत्र राष्ट्राच्या संस्था, अर्थव्यवस्था, समाजाची उभारणी करणं हे होतं. नेहरूंपेक्षा मोदींना स्वतंत्र भारताचा खूप मोठा काळ अनुभवलाय. त्यांच्यासमोर भारताचं यश-अपयश, लोकशाही संस्थांचा इतिहास, हरित क्रांती,
औद्योगिकीकरण, विज्ञान, शिक्षण, सामाजिक चळवळी, आर्थिक परिवर्तने यांचा सात दशकांचा अनुभव होता. परंतु या दोघांची भाषणं वाचल्यावर नेमका उलट प्रभाव पडतो. ६९ वर्षीय नेहरूंचं भाषण भविष्याकडं पाहण्याच्या चिंतेनं भरलेलं, तर ७५ वर्षीय मोदींचं भाषण आपल्या सरकारच्या कामगिरीचा आत्मप्रचार करण्याच्या चिंतेनं भरलेलं. नेहरू आपल्या मर्यादा, प्रश्न, भविष्यातली अनिश्चितता यांवर चर्चा करून सुरुवात करतात. याउलट, मोदी आपला प्रभाव, कर्तृत्व, अन् नेतृत्वाची महानता यांचं गुणगान करतात. नेहरू तरुणांना आपल्या पुढची पिढी मानतात, तर मोदी त्यांना आपल्या सरकारच्या कामगिरीचं श्रोतृवर्ग बनवतात. एक भाषण तरुणांच्या बुद्धिमत्तेला आव्हान देतं, तर दुसरं आपल्या यशासाठी त्यांची मान्यता मिळवू पाहतं. हा फरक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, इथं दोन्ही भाषणांतले काही उतारे पाहणार आहोत. भाषणाच्या प्रारंभी, नेहरू स्वतः आणि तरुण यांच्यातलं अंतर मान्य करत म्हणतात, 'तुमच्या म्हणजे नव्या पिढीच्या विचारसरणीशी जुळवून घेणं मला सोपं नाही, जसं तुम्हाला स्वतःला माझ्या जागी ठेवणं कठीण वाटत असेल..!' हा अशा व्यक्तीचा आवाज आहे, जो आपलं वय अन् सत्ता असूनही, हे ओळखतो की, नव्या पिढीचं जग त्याच्या स्वतःच्या जगापेक्षा वेगळं आहे. ते त्याला कदाचित पूर्णपणे समजणार नाही. मोदी आपल्या पूर्वीच्या भाषणाच्या प्रभावाबद्दल अभिमान बाळगतात. पंतप्रधान होण्यापूर्वी, २०१३ ला त्याच महाविद्यालयातल्या आपल्या भाषणाची आठवण करून देत ते म्हणतात, 'मी म्हणू शकतो की, त्या भाषणानं एक लाट, एक चळवळ निर्माण केली. आजही, १३-१४ वर्षांनंतरही, त्या सभेचा, त्या भाषणाचा प्रभाव कायम आहे...!' त्यानंतर ते स्पष्ट करतात की, त्यांनी ती स्वप्ने जगली आणि स्वतःला देशासाठी समर्पित केलं...!
*नेहरूंची नम्रता अन् मोदींची आत्मप्रशंसा*
नेहरू तरुणांसमोर आपल्या मर्यादांपासून सुरुवात करतात, तिथं मोदी स्वतःच्या महत्त्वापासून भाषणाचा. प्रारंभ करतात. मोदींचा हाच सूर त्यांच्या भाषणात कायम होता. जन धन योजनेबद्दल मोदी म्हणतात, 'पण हे मोदी आहेत. जे पालक-बाल संस्कृतीला प्राधान्य देतात, त्यांच्या विरोधात ते खडकासारखे उभे राहतात...!' आणि पुढं, 'माझ्यात धैर्य आहे, म्हणूनच मी त्या दिवशी काय बोललो याचा अहवाल घेऊन आज तुमच्यासमोर आलोय! मी लहान आणि सोपी ध्येयं स्वीकारणारी व्यक्ती नाही. मी देशासाठी मोठी ध्येयं ठेवतो आणि ती साध्य करण्यासाठी माझं आयुष्य समर्पित करतो...!' ही देशाच्या कर्तृत्वाची कहाणी नाही, तर एका व्यक्तीच्या, खुद्द मोदींच्या, महानतेची कहाणी आहे, त्यांच्याच शब्दांत. स्वार्थीपणापेक्षा अधिक आत्मप्रशंसा करणारं! नेहरू जवळपास विरुद्ध भूमिकेत उभे आहेत. दिल्लीच्या इतिहासाचं स्मरण करून ते म्हणतात, 'असंख्य पिढ्यांचा एक काफिला आपल्या डोळ्यांसमोरून जातो. माझी स्वतःची पिढीही त्या काफिल्यामध्ये सामील होईल...!' आणि मग ते तरुणांना म्हणतात, 'तर मग, तरुण-तरुणींनो, आपण ज्या उदात्त ध्येयांसाठी जगतो, जी साध्य करण्याची आकांक्षा बाळगतो, त्या सर्वांचा झेंडा तुम्ही हाती घेतलाच पाहिजे...!' एकीकडे, 'मी मोदी आहे, मी विशेष आहे, मी वर्तमान आहे, मी भविष्यही आहे...!' अशी आरोळी आहे, तर दुसरीकडे, 'माझी स्वतःची पिढी त्या काफिल्यामध्ये सामील होईल...!' ही नेहरूंची नम्रता आहे. यावरून दोन्ही भाषणांमागील मानसिक रचना उघड होते. नेहरूंच्या भाषणात, व्यक्ती लहान, इतिहास मोठा आहे. तर दुसरीकडं, मोदी आपल्या कामगिरीसाठी इतिहासाला एक व्यासपीठ म्हणून घोषित करतात.
*दिमाखी नक्षल ते फूफा*
नेहरू म्हणतात, 'जेव्हा जीवन महान उद्दिष्टांशी जोडले जाते, तेव्हाच ते महान बनतं...!' मोदी म्हणतात की, ते स्वतः महान ध्येयं निश्चित करतात आणि ती साध्य करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करतात. एकाच्या भाषणात, महानता उद्देशातून येते; तर दुसऱ्याच्या भाषणात, महानता ही वक्त्याच्या स्वतःच्या औदार्याची आणि दृढनिश्चयाची साक्ष बनते. याहूनही मोठा फरक, हे दोघे आपापसातले मतभेद कसे हाताळतात यात आहे. नेहरू मार्क्सवादाशी सहमत नव्हते. आपल्या भाषणात, त्यांनी त्यातला हिंसाचार अन् व्यक्तीवरील दडपशाहीवर स्पष्टपणे टीका केलीय. तरीही, लाखो लोक त्याकडं का आकर्षित झाले, हे समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात. ते म्हणतात, 'माझा विश्वास आहे की, लाखो लोकांसाठी मार्क्सवादाचं मूळ आकर्षण हे वैज्ञानिक सिद्धांत मांडण्याच्या त्याच्या प्रयत्नात नसून, सामाजिक न्यायाप्रती असलेल्या त्याच्या तीव्र वचनबद्धतेत आहे...!' हे विरोधी मताशी सहमत होण्याबद्दल नाही. तर ते गांभीर्याने घेण्याबद्दल आहे. आपल्या विरोधकामध्येही नैतिक आकांक्षा ओळखणं हे बौद्धिक आत्मविश्वासाचं लक्षण आहे. दुसरीकडं, मोदी विरोधकांना देशद्रोही ठरवतात. ते वैचारिक विरोधकांना म्हणतात, 'दिमाखी नक्षलवादी!' मग, विरोधाला एक आजार अन् स्वतःला एक वैद्य असे रूपक वापरून, ते 'दिमाखी नक्षलवादी' या संज्ञेला एक होमिओपॅथिक गोळी म्हणतात, आणि रोगाच्या उद्रेकाविषयी, उपचाराच्या विषयी बोलतात. नेहरू भाषणात मतभेदांबाबत म्हणतात, 'दोघाचं सहअस्तित्व आवश्यक झालंय...!' ते पुढे म्हणतात, 'आपण आपली मतं, विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये...!' नेहरू असंही म्हणतात की, विरोधी समाजांमधला सततचा संघर्ष 'एकमेकांकडून हळूहळू शिकण्याच्या अन् आत्मसात करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतो...!' मोदी म्हणतात की, त्यांच्या कार्यकाळापूर्वी पाकिस्तान अधिक धाडसी होता, तर आज, 'जर पाकिस्ताननं कोणतं ही दुष्कृत्य केलं, तर सैन्य घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करतं..!' जणू काही देशाच्या समस्यांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे. तर दुसरीकडं नेहरू, विद्यार्थ्यांना काम करण्याचं आवाहन करताना म्हणाले होते की, 'आपण 'संकीर्ण राष्ट्रवादा'ला बळी पडता कामा नये, ज्याला आजच्या जगात स्थान नाही आणि जो आपल्या उदात्त आदर्शांशी विसंगत आहे...!' या फरकाला स्पष्टीकरणाची गरज नाही. जे सरकारी धोरणांवर, प्रकल्पांवर प्रश्न विचारतात, त्यांना मोदी तरुणांसमोर एक वेगळी "प्रजाती" म्हणून संबोधतात. ते म्हणतात, ही दुसरी प्रजाती अशी की, कोणतेही काम सुरू होताच ते 'रागीट फुफा' बनतात. मोदी टीकाकारांची खिल्ली उडवत म्हणतात, ''अस्पष्ट' लोकांचा सततचा प्रश्न असतो, 'याची गरज काय आहे?' ते तक्रार करतात की त्यांचे "अस्पष्ट" टीकाकार, सरकारनं अमुक एक पुतळा का उभारला किंवा अमुक एक योजना का राबवली...? असे प्रश्न विचारतात. एखाद्या प्रकल्पाबद्दल 'याची गरज काय आहे...?' असा प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा एक मूलभूत प्रश्न आहे. यासाठी किती खर्च येतो? कशाला प्राधान्य द्यायला हवं? याचा फायदा कोणाला होईल? तोच पैसा इतरत्र अधिक चांगल्या प्रकारे खर्च करता येईल का? हे असे प्रश्न आहेत जे विरोधी पक्ष, विचारवंत अन् पत्रकारांनी उपस्थित करायला हवेत. विशेषतः विद्यापीठे ही अशी ठिकाणे आहेत जिथं हे प्रश्न निर्माण व्हायला हवेत. या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी, मोदी प्रश्न विचारणाऱ्याला 'रागीट फूफा' बनवतात! एक पंतप्रधान स्वतःच्या मताच्या विरोधात असलेल्या दृष्टिकोनातूनही शिकण्याची शक्यता पाहतात, तर दुसरे आपल्या वैचारिक विरोधकाला आजार मानतात. एकजण विरोधी दृष्टिकोनासाठी सर्वोत्तम युक्तिवाद शोधण्याचा प्रयत्न करतो; तर दुसरा विरोधकाची सर्वोत्तम खिल्ली उडवतो. इथंच मोदींचं भाषण केवळ राजकीयदृष्ट्या आक्रमकच नव्हे, तर बौद्धिकदृष्ट्याही कमकुवत दिसतं.
*भौतिक प्रगती विरुद्ध नैतिक प्रगती*
नेहरूंचं भाषण सोपं नाही. यात अणुभौतिकशास्त्र, आईनस्टाईन, पदार्थ आणि ऊर्जेचा प्रश्न, औद्योगिक क्रांती, भांडवलशाही आणि साम्यवाद, उत्पादनाची साधने, सामाजिक न्याय, वैयक्तिक स्वातंत्र्य, साधन आणि साध्याचा नैतिक प्रश्न, भारतीय संस्कृती आणि आधुनिक तांत्रिक सभ्यतेतून निर्माण होणारे आध्यात्मिक संकट यांचा समावेश आहे. याउलट, मोदींचे भाषण वेव्ह, इम्पॅक्ट, टार्गेट, अँग्री अंकल फुफा, दिमाखी नक्षल, फ्लॅस, ओजी यांसारख्या संज्ञा अन् राजकीय विनोदांनी पुढं सरकतं. यामागील युक्तिवाद असा की, काळानुसार भाषा बदलते आणि प्रत्येक नेत्याला आपल्या काळातल्या तरुणांच्या भाषेत बोलायचं असतं. पण सोपी भाषा आणि सोप्या कल्पना या एकच गोष्टी नाहीत. गहन विचार अगदी बोली भाषेतही शक्य आहेत. समस्या मोदींच्या भाषेच्या आधुनिकतेची नाही, तर त्यांच्या विचारांच्या उथळपणाची आहे. ज्या काळात नेहरू भाषण देत होते, तो काळ आत्मविश्वासपूर्ण, स्वतंत्र भारताचाही होता. धरणे बांधली जात होती, उद्योग उभारले जात होते, वैज्ञानिक संस्था स्थापन होत होत्या आणि नियोजित विकासासाठी उत्साह होता. जर त्यांची इच्छा असती, तर त्यांनी या सर्व यशाचं रूपांतर आपल्या सरकारच्या विजयात केलं असतं. पण त्याऐवजी, ते आपल्या भाषणात प्रश्न विचारतात, भौतिक प्रगतीच्या काळात मानवतेचं काय होईल? समाज आपला नैतिक पाया गमावेल का? तंत्रज्ञान मानवतेला महान बनवेल, की बाह्य जगावर विजय मिळवण्याच्या नादात ती स्वतःमध्येच हरवून जाईल? मोदींच्या कर्तृत्वाच्या यादीतून आत्मशंका पूर्णपणे गायब आहे. कदाचित याचं कारण असं असेल की, २०२४ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांना वाटते की ते 'अजैविक" आहेत. त्यांच्यासाठी भूतकाळ आणि वर्तमानकाळाची रचना सरळ आहे. पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काही नकारात्मक बातम्या आठवून ते म्हणतात, 'तेव्हा निराशा अन् वैफल्य याशिवाय काहीही नव्हतं...!' आजचा भारत विजयी असला तरी ‘धोरणात्मक निष्क्रियते’ची जागा ‘धोरणात्मक गतिशीलते’ने घेतलीय. ही अशी भाषा आहे जी इतिहासाची गैरसोयीची गुंतागुंत दूर करते. आपल्या भाषणात नेहरू भूतकाळाबद्दल म्हणतात, 'भारताचा भूतकाळ हा त्याच्या वैभवासह आणि अपयशांसहित, आपला वारसा आहे...!' आणि ते लगेचच विचारतात, 'पण आपण त्या भूतकाळात जगू शकतो का...?' इथंही तोच फरक आहे. नेहरूंना इतिहास समजून घ्यायचाय; मोदी राजकीय विरोधाभास निर्माण करण्यासाठी इतिहासाचा वापर करतात.
*मी, माझे, माझेच....!*
जेव्हा मोदी जागतिक घटनांचं श्रेय घेऊ लागतात, तेव्हा त्यांच्या भाषणातला आत्मकेंद्रितपणा कधीकधी विचित्र पातळीवर पोहोचतो. कोरोना विषाणू महामारी, रशिया-युक्रेन युद्ध, व्यापार संकट आणि पश्चिम आशियातल्या परिस्थितीचा संदर्भ देत ते म्हणतात की, या प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या टीकाकारांना वाटलं, ‘आता मोदी अडकलेत, आता मोदी पडतील, आता मोदी चिरडले जातील...!' त्यानंतर ते म्हणतात की, 'भारताची प्रत्येक इच्छा, म्हणजेच भारताचे वाईट चिंतणाऱ्यांची इच्छा, पूर्ण होतेय...!' ते जगातल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना स्वतःभोवती फिरत असल्याचं भासवण्याचाही प्रयत्न करतात. जागतिक घटनांना स्वतःवर केंद्रित करण्याऐवजी, नेहरू त्या घटनांमधल्या मानवी स्थितीचा शोध घेतात. कदाचित या दोन्ही भाषणांमधला हा सर्वात मूलभूत फरक आहे. नेहरूंच्या भाषणात, जग वक्त्यापेक्षा मोठे होते. मोदींच्या भाषणात, ते जगाला स्वतःपेक्षा लहान असल्याचं वारंवार भासवण्याचा प्रयत्न करतात. नेहरू आपल्यापेक्षा खूपच लहान असलेल्या पिढीसमोर हे मान्य करण्यास तयार आहेत की, जग बदललेय, जुन्या पिढीची मूल्ये अपुरी असू शकतात आणि नवीन तांत्रिक संस्कृती असे प्रश्न निर्माण करतेय, ज्यासाठी ते स्वतःसुद्धा तयार नाहीत. मोदींच्या भाषणात अशी बौद्धिक नम्रता दुर्मिळ! त्यांच्याकडं सर्व प्रश्नांची उत्तरं आधीच आहेत अन् त्या उत्तरांमुळेच त्यांच्या नेतृत्वाला यश मिळाल्याचं भासतं.
*नम्रतेची जाणीव आणि तिचा अभाव*
आणखी एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे, नेहरू आपल्या भाषणाची सुरुवात हलक्याफुलक्या विनोदानं करतात. त्यांचे शब्द पुढीलप्रमाणे, 'आज, जेव्हा मला या दीक्षांत समारंभात बोलण्यासाठी आमंत्रण मिळालं, तेव्हा कुलगुरूंनी आग्रह धरला की, मी काहीतरी लिखित स्वरूपात आणावं. मी ते टाळण्याचा प्रयत्न केला. कारण, जेव्हा कोणी लिहितो, तेव्हा त्याच्याकडून गहन गोष्टी सांगण्याची अपेक्षा असते. तयारीशिवाय बोलणं आणि आपल्या बोलण्यात गांभीर्य असल्याचा आभास निर्माण करणं खूप सोपं असतं. पण त्यांचा आग्रह कायम होता आणि अखेरीस मी तयार झालो. तर, सर, आपल्या परवानगीनं, मी जे काही लिहिलं होतं ते वाचून दाखवतो...!' दिल्ली विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू अर्थशास्त्रज्ञ व्ही.के.आर.व्ही.राव होते. भारतीय अर्थव्यवस्था समजून घेण्यामधलं त्यांचं योगदान राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाजाशी निगडित होते. एक कुलगुरू देशाच्या पंतप्रधानांना सांगू शकत होते की, जर त्यांना त्यांच्या विद्यापीठात बोलायचं असेल, तर त्यांनी तयारी करून आणि लिखित भाषण घेऊन यावं. नेहरूंनीही तसंच केलं, समारंभात लिखित भाषण वाचून दाखवलं. याउलट, भाजप सरकारच्या प्रमुखांकडून अशा नम्रतेची अपेक्षा केली जाऊ शकते का, ज्यांनी देशभरातील विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या पदांवर आरएसएसच्या कार्यकर्त्यांना बसवलंय! त्यांच्या राजवटीत कोणताही कुलगुरू असं काही बोलू शकेल का? दोन्ही भाषणं एकत्र वाचण्याची अनेक कारणं आहेत.
हरीश केंची,
९४२२३१०६०९.
No comments:
Post a Comment