ब्रिटीश राजवटीचा तो काळ होता. साध्या; पण निटनेटक्या कपड्यातली ती भारतीय व्यक्ती रेल्वेत शांत बसली होती. रेल्वेगाडी आपल्या गतीनं पुढं जात होती. सोबत काही सहप्रवासी इंग्रजदेखील होते. ते त्या भारतीयाकडे तुच्छतेनं बघत होते. काही कळायच्या आत ती व्यक्ती अचानक जागेवरून उठते. क्षणाचाही विलंब न करता रेल्वेची चैन ओढते. रेल्वे थांबते. कोणलाच काही कळत नाही. गाडीतले इंग्रज ओरडयला लागतात. कारण विचारतात. ती सावळीशी भारतीय व्यक्ती शांतपणे उत्तर देते. ‘पुढे काही अंतरावर रेल्वे रुळात काही गडबड आहे....’ खरंच काही अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले होते. एक मोठा अपघात ‘त्या’ भारतीयामुळे टळला होता. सगळेजण कुतूहलानं विचारतात. त्यांना हे कसं कळलं. त्यावर ती भारतीय व्यक्ती म्हणाली, केवळ गाडीच्या आवाजावरून. गाडी चालताना एक विशिष्ट तालात आवाज येतो. तो ताल चुकल्याचे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी गाडी थांबविली. इंग्रजांसह सगळेच सहप्रवासी ऐकून आश्चर्यचकित होतात. ती तीक्ष्ण बुद्धीची व्यक्ती होती, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या...! शतकोत्तर आयुष्य जगणाऱ्या विश्वेश्वरय्या यांची १५ सप्टेंबरला जयंती असते. हा दिवस भारतात ‘अभियंतादिन’ म्हणून साजरा होतो. त्यामागेही खूप मोठी कहाणी आहे.
एम. व्ही. म्हणजे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. त्यांचं मूळ गाव आंध्रप्रदेशातले मोक्षगुंडम. तेव्हाच्या मैसूर आणि आताच्या कर्नाटक राज्यातले चिकबळ्ळापुरच्या मुद्देनहळ्ळी इथं त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री तर आई व्यंकटलक्षअम्मा होत्या. विश्वेश्वरय्या यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. एम. व्ही. हे त्यांचं टोपण नाव. तसं त्यांचं नाव विश्वेश्वरय्या, विश्वेश्वरया, विश्वेश्वराया असंही लिहिलं किंवा उच्चारलं जातं. रामय्या मामांकडे राहून त्यांनी शिक्षण सुरू केलं. त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग लोकहितांसाठी केला. पदवी मिळाल्यानंतर त्यांना बांधकाम खात्यात नोकरी मिळाली. ते नियमित विविध प्रयोग करीत. धरणांच्या, जलसाठ्यांच्या पाण्याचे नियोजन आणि नियंत्रण करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केलं. पूरनियंत्रणासाठी त्यांनी गेट सिस्टीम अर्थात द्वारप्रणाली डेव्हलप केली. त्याचा यशस्वी प्रयोग पुण्याजवळील खडकवासला येथे सन १९०३ साली झाला. नद्यांच्या पाणीवाटपात तेव्हा असमानता होती. विषमता होती. त्यामुळे विश्वेश्वरय्या यांनी पाणीवाटपाची एक नवी ब्लॉक सिस्टीम विकसित केली. त्यामुळे विविध भागांतील पिकांना चक्राकार पाणी मिळू लागलं. पाण्याचं समान वाटप होऊ लागलं. पुराचा धोकाही कमी झाला. ही सिस्टीम आजही वापरली जाते. कावेरी नदीवरील कृष्णराज सागर प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी प्रत्येक कामावर अत्यंत बारीक लक्ष ठेवलं. त्याकाळात देशात सिमेंट तयार होत नव्हतं. तेव्हा तत्कालीन इंजिनियर्स ‘मोर्टार’ हा पदार्थ बांधकामात वापरत. कृष्णराजसागरमध्ये हेच वापरण्यात आलं. हैद्राबाद शहराला पुरापासून मुक्ती दिली. विशाखापट्टणमचा किनारा वाचवला. ओडिसादेखील पुरांमुळे त्रस्त होतं. त्याकाळात त्यांनी यावर सोल्युशन देणारा अहवाल सादर केला. त्यानुसार हिराकुंड आणि अनेक बांध तयार झालेत. ओडिसाच्या पुरामुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी झाली. विश्वेश्वरय्या यांच्या प्रयत्नांतून शिक्षणक्षेत्रात मोठी क्रांती झाली. मुलींसाठी स्वतंत्र होस्टेल सुरू झालेत. देशातलं पहिलं फर्स्ट ग्रेड महाराणी कॉलेज सर विश्वेश्वरय्या यांच्या पुढाकारातूनच सुरू झालं. म्हैसूर विद्यापीठाची स्थापना तर त्यांच्या अनेक स्वप्नांपैकी एक होतं. तेही पूर्ण झालं. इंडस्ट्रियल आणि अॅग्रिकल्चरल कॉलेजही पुढं सुरू झालेत. विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप आणि विदेशातील शिक्षणासाठी मदतीचीही तरतूद झाली.
देशातील विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांनी ‘इकॉनॉमिक काँफ्रन्स’ ही संकल्पना मांडली. विश्वेश्वरय्या यांच्या कार्यांची सर्वत्र दखल घेतली जाऊ लागली. त्यांना ‘नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडियन एंपायर’ हा तेव्हाचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. त्यांना ‘केसर ए हिंद’ म्हणून गौरविलं होतं. भारत सरकारनं १९५५ साली त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान केला. त्यांच्या १०० व्या जन्मदिवसानिमित्त पोस्टाचं तिकीटही निघालं. विश्वेश्वरय्या विविध संस्थांचे सदस्य होते. इंस्टिस्टूट ऑफ सिव्हील इंजिनिअर्स या आंतराष्ट्रीय संस्थेचे ते सदस्य होते. इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या बंगलोर ब्रँचने त्यांना फेलोशीप दिली. अनेक विद्यापिठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी आयुष्यभर शरीरस्वास्थ्य जपले. म्हातारपणाबद्दल त्यांना कुणीतरी विचारलं होतं. तेव्हा त्यांनी गमतीनं उत्तर दिलं. ते म्हणालेत, ‘‘म्हातारपण जेव्हा माझं दार ठोठावतं; तेव्हा मी आतून आवाज देतो, की विश्वेश्वरय्या घरात नाहीत. तेव्हा ते निराश होऊन परत जातं. त्यामुळे म्हातारपणाची नि माझी भेटच होत नाही. मग ते माझ्यावर कशी सत्ता गाजवेल?’’ त्यांचं वय वाढल्यावरही त्यांचा उत्साह आणि काम करण्याची ऊर्जा कमी झालेली नव्हती. एकदा त्यांच्यासह काही भारतीय अमेरिकेत फॅक्टरींच्या अभ्यासाठी गेलेत. तिथल्या एका फॅक्टरीत खूप मोठी मशीन होती. ती पाहण्यासाठी ७५ फूट उंच शिडी चढावी लागायची. त्याही वयात विश्वेश्वरय्या ती शिडी चढलेत. मशीनचं अभ्यासपूर्ण सूक्ष्म निरीक्षण केलं. विश्वेश्वरय्या यांनी जवळपास अकरा पुस्तकं लिहिलीत. भारत पुननिर्माण, अर्थव्यवस्था, समाज, उद्योग अशा अनेक विषयांचा त्यात समावेश होता. एवढंच नव्हे वयाच्या 98व्या वर्षीदेखील ते एका पुस्तकाचं लेखन करीतच होते. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांची लोकहितासाठी तळमळ होती. इंजिनिअरिंगचा समाजहितासाठी कसा उपयोग करावा याचा ते आदर्श होते. त्यांची कार्य करण्याची दिशा, नियोजन आणि शिस्त वाखाणण्याजोगी होती. शेवटच्या श्वासापर्यंत ते लोकांसाठी झटत राहिलेत.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. त्यांची आठवण आज मला आली ती ‘इंजिनिअर्स डे’मुळे. आज ‘अभियंता दिन’ आहे. विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा ‘इंजिनिअर्स डे’ साजरा केला जातो. गंमत म्हणजे, भारत- श्रीलंका आणि टांझानिया अशा तीन देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. विश्वेश्वरय्यांविषयी बोलताना मला एक मुद्दा फार महत्त्वाचा वाटला. हे विश्वेश्वरय्या इंग्रज सरकारकडे नोकरी करत होते. निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी पन्नास वर्षे काम केलं! हा माणूस जगला १०१ वर्षं. प्रकृतीची फार छान काळजी त्यांनी आयुष्यभर घेतली. ते मिताहारी होते. आयुष्यात ना कधी तंबाखू खाल्ली, सिगारेट ओढली, ना दारू प्यायली. दररोज व्यायाम. त्यांनी स्वतःला खूप जपलं. त्यांना विचारलं की, तुम्ही प्रकृतीची एवढी काळजी का घेत आहात? तेव्हा ते म्हणाले, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मला कार्यरत राहायचं आहे. मला खूप काम करायचं आहे. आणि, अक्षरशः या माणसानं अखेरच्या क्षणापर्यंत वेड्यासारखं काम केलं. इंजिनिअर म्हणून सरकारी सेवेतून १९०९ ला ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी ठरवलं की, माझ्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग करून मी आता वेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करणार. मग ते म्हैसूर संस्थानाचे दिवाण झाले. आज जे म्हैसूर आहे, त्यावर विश्वेश्वरय्या यांचा ठसा आहे. या माणसाला इंग्रज सरकारने ‘सर’ हा किताब दिला आणि भारत सरकारनेही ‘भारतरत्न’ दिले.
मला फार गंमत वाटते. पुण्यामध्ये एक काळ असा असेल की, जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातले चार अभ्यासक एकत्र छान चहा पीत असतील! अर्थात तेव्हाच्या पुण्यात हॉटेलात जाऊन चहा पिणं एवढं सोपं नव्हतं. हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायला म्हणून खुद्द महादेव गोविंद रानडे यांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. पण ते असो. चार अभ्यासक एकत्र बसून गप्पा मारताहेत, असं दृश्य. बरं हे चार अभ्यासक कोण? डॉ. भांडारकर, नामदार गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या! रानडे, गोखले आणि विश्वेश्वरय्या हे तसे समकालीन. मात्र, रानडे अठ्ठावन्नाव्या वर्षी गेले. गोखलेंनी तर पन्नाशीही पूर्ण केली नाही. पण, हे चौघेही चांगले मित्र होते. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १८६१चा. ते गेले १९६२मध्ये. त्यामुळे काळाचा खूप मोठा तुकडा त्यांच्या वाट्याला आला आणि त्यावर त्यांनी ठसा उमटवला.
विश्वेश्वरय्यांचा जन्म म्हैसूरचा. ते वारलेही तिकडेच. पण, दरम्यानच्या काळात त्यांचे महाराष्ट्राशी एक वेगळे नाते तयार झालेले होते. आता पुण्यात ‘सीओइपी’ आहे, त्याच कॉलेजमधून ते इंजिनियर झाले. इंजिनिअर झाल्यावर लगेचच ते सरकारी नोकरीत गेले. त्यांचे पहिले पोस्टिंग होते धुळे. त्या नोकरीच्या काळात त्यांनी धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धुळ्यापासून सात मैलावर तिखी गावाला लागून असलेल्या डेडरगाव येथे एक नाला अडवून तलाव बांधला. आजही तो डेडरगाव तलाव याच नावाने प्रसिद्ध आहे. नद्यांचे पूर रोखायचे कसे, हा मोठा प्रश्न तेव्हा सगळ्यांच्या समोर आ वासून उभा होता. त्यावर त्यांनी खूप काम केले. हैदराबादला पूरमुक्त करण्यात त्यांचा वाटा फार मोठा. दूर कशाला, आपल्या पुण्यातही त्यांच्या खाणाखुणा दिसतात. खडकवासला धरण तुम्ही कधी पाहिले आहे? तिथं त्यांनी ‘फ्लड गेट्स’ म्हणजे पूरनियंत्रक दरवाजे बसवले. पावसाळ्यातील पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ही यंत्रणा खूपच उपयुक्त ठरली. नंतर ही योजना जगभर राबवली गेली.
असं बरंच सांगता येईल. भारतातच काय, जगभर त्यांनी काम केले. कावेरी नदीवर कृष्णसागर धरण उभारण्याची योजना मांडली गेली, तेव्हा अनेकांनी ती अशक्य असल्याचं म्हटलं. तांत्रिक साधनं, यंत्रसामग्री मर्यादित होती. निधीची कमतरता होती. बर्याच अधिकाऱ्यांनी थेट सांगितले, “हे धरण उभारता येणार नाही. इतका पैसा, इतके परिश्रम वाया घालवू नका.” पण सर विश्वेश्वरय्या शांतपणे म्हणाले, “हे धरण उभारलं गेलं नाही, तर या प्रदेशाचं भविष्य कायमचं अंधारात जाईल. हे बांधायचंच!” १९३१ मध्ये हे भव्य धरण उभारलं गेलं. त्यावेळी लोकांना विश्वासच बसत नव्हता. हे धरण बांधून पूर्ण झालं, तेव्हा महात्मा गांधींनी ते पाहिलं. गांधीजी प्रचंड प्रभावित झाले. विश्वेश्वरय्या यांना ते म्हणाले, “हे एवढंच एक काम तुम्ही केलं असतं तरीही तुम्ही अजरामर झाला असतात...!”
गंमत बघा. ज्या म्हैसूर संस्थानाचे दिवाण म्हणून विश्वेश्वरय्या यांनी काम पाहिले, त्या संस्थानाचा राजा किती मोठा माणूस असेल! म्हणजे आपल्या राजर्षी शाहू महाराजांची किंवा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांची आठवण यावी, असाच हा राजा. कृष्णराज वोडेयार असे त्याचे नाव. हा राजा गेला, तेव्हा त्याची व्यक्तिगत संपत्ती तेव्हा काही हजार कोटींच्या घरात होती. जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांपैकी एक असा हा राजा. अत्यंत प्रगल्भ आणि पुरोगामी. खुद्द महात्मा गांधींनी त्यांचे अनेक वेळा कौतुक केले होते. त्यांच्यामुळेच म्हैसूर, बंगळूर ही शहरे उदयाला आली. १९०२ ते १९४० अशी जवळपास चार दशके हा राजा सिंहासनावर होता. त्या कालावधीमध्ये अधिकृतपणे अस्पृश्यता उच्चाटन करणारा, बालविवाहावर बंदी घालणारा आणि बालविधवा मुलींसाठी शिष्यवृत्ती सुरू करणारा हा संस्थानिक. नोकरीमध्ये २५ टक्के जागा या ब्राह्मणेतर मुलांसाठी राखीव असाव्यात, असा कायदा त्याने १९१८ मध्ये केला. इंग्लंड आणि अमेरिकेत जेव्हा महिलांना मताचा अधिकार नव्हता, तेव्हा तो अधिकार देणारे जे राजे भारतामध्ये होते, त्यापैकी एक सयाजीराव गायकवाड आपल्याला ठाऊक असतात. दुसरा हा मैसूरचा राजा. १९११ मध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ बंगळुरूमध्ये सुरू झाले, त्यासाठी आपली ३७१ एकर जागा त्याने दिली आणि मोठा निधीही दिला. एकीकडे बँक सुरू केली. दुसरीकडे कृषी विद्यापीठ स्थापन केले. तिसरीकडे कन्नड साहित्य परिषदेची स्थापना केली. कृष्णराज हे बनारस हिंदू विद्यापीठाचे पहिले कुलगुरू. सर सी. व्ही. रामन यांच्या संस्थेसाठीही त्यांनी दहा एकर जागा दिली.
असा हा द्रष्टा राजा. म्हणून त्याने विश्वेश्वरय्यांना दिवाण म्हणून पाचारण केले. काही वर्षे विश्वेश्वरय्या तिथे राहिले. त्या पदावर रमले. त्यांनी फार महत्त्वाचे काम केले. आरक्षणाला विरोध म्हणून विश्वेश्वरय्या यांनी दिवाणपद सोडले, असा एक आरोप त्यांच्यावर होत असतो. धक्कादायकच आहे हे. पण, विश्वेश्वरय्या एकूणच मोठ्या उंचीचा माणूस. त्यांना ब्रिटिशांनी ‘सर’ म्हटले. गांधींनी कौतुक केले. नेहरूंनी ‘भारतरत्न’ दिले. कृष्णराजाने दिवाण केले.१९६२ ला विश्वेश्वरय्या गेले. त्यांचे शेवटचे पुस्तक १९६०ला आले. ते गेले, तेव्हाही त्यांच्या टेबलवर काही अप्रकाशित लेख दिसत होते.
मित्राला मी विश्वेश्वरय्यांची गोष्ट सांगत होतो. निवृत्त झाल्यानंतर पन्नास वर्षे वेगळे काम करणारा असा हा माणूस. निवृत्तीनंतर प्रशासन, राजकारण यातही ते रमले. स्टेट्समन, लेखक, अध्यापक, प्रशासक अशा स्वरूपाचं काम करत राहिले. ज्या सीओईपीमध्ये ते शिकले, ते कॉलेज आता बदलले आहे. ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’मध्ये विश्वेश्वरय्या यांनी डिप्लोमा मिळवला. आता एआयपर्यंत जग पोहोचले आहे. पण, तरीही विश्वभरातल्या इंजिनिअर्सना या मोक्षगुंडमचे नाव घेतल्याशिवाय आजही मोक्ष मिळत नाही, ही खरी गंमत आहे! त्यांच्या जयंतीदिनी अर्थात अभियंतादिनी त्यांना विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment