Sunday, 8 March 2026

बिहारमध्ये ऑपरेशन लोटसची चर्चा!

बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल युनायटेड पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात तब्बल दोन दशकांनंतर एक मोठा बदल घडणार असल्याचे स्पष्ट झाले. नितीश कुमार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. गुरुवारी त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल करताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यादरम्यान बिहारमध्ये ऑपरेशन लोटसची चर्चा रंगली असून, जनता दल युनायटेड पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

ऑपरेशन लोटसची का रंगली चर्चा?
नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करताच त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले. जनता दल युनायटेड पक्षाचे (जेडीयू) राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय कुमार झा व केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याविरोधात बिहारमध्ये आक्रमक निदर्शने करण्यात आली. या दोन्ही नेत्यांनीच नितीश कुमार यांना सत्तेचा त्याग करण्यासाठी व मुख्यमंत्रिपद सोडण्यासाठी बळजबरीने तयार केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनादरम्यान संजय झा यांचा उल्लेख बिभीषण असा करण्यात आला. त्यांनी भाजपाच्या ऑपरेशन लोटसला मदत करण्यासाठी नितीश कुमार यांच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. नितीश कुमार यांच्या राज्यसभेतील प्रवेशामुळे बिहारच्या मुख्यमंत्रिपद आता कोणाकडे जाणार, याबाबत अनेक कयास बांधले जात आहेत.
नितीश कुमार यांच्या पोस्टमध्ये काय?
गुरुवारी बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला उद्देशून आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “मागच्या दोन दशकांमध्ये तुम्ही माझ्यावर मोठा विश्वास दाखवला. त्याच विश्वासाच्या जोरावर आम्ही बिहार आणि तुम्हा सर्वांची सेवा केली आहे. तुमच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळेच आज बिहार विकास आणि आदराचा एक नवीन आयाम सादर करत आहे. संसदीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासूनच मला बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती. त्यासाठीच मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य होण्याचा प्रयत्न करीत आहे. मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे खात्री देऊ इच्छितो की, तुमच्याशी असलेले हे संबंध भविष्यातही कायम राहतील आणि विकसित बिहार उभारण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्याचा माझा संकल्प अबाधित राहील. नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल”, असे नितीश यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

आणखी वाचा : अरविंद केजरीवालांच्या पुनरागमनामुळे भाजपाच्या गोटात खळबळ का उडाली? कारण काय?
मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर मोठा राडा
नितीश कुमार यांच्या निर्णयानंतर बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जाते; परंतु त्यांच्या या निर्णयामुळे जेडीयूच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. गुरुवारी जेडीयूच्या काही कार्यकर्त्यांनी बिहारचे मंत्री सुरेंद्र मेहता व पक्षाचे नेते संजय झा यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात प्रवेश करण्यापासून रोखले. निदर्शने करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने मुस्लीम आणि ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. या दोन्ही समुदायांतील लोक हे नितीश कुमार यांचे पारंपरिक मतदार मानले जातात. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना जेडीयूचे नेते व भूमी संघर्ष सेनेचे प्रमुख रूपेश पटेल यांनी थेट संजय झा यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्याचे सर्व कटकारस्थान संजय झा यांचेच आहे. त्यांनी ललन सिंग यांच्यासोबत मिळून जेडीयूवर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. हे दोन्ही नेते भाजपाच्या इशाऱ्यावर काम करून पक्षाला संपवण्याचे काम करीत असल्याचा आरोप पटेल यांनी केला.

बिहारमध्ये भाजपाचे ऑपरेशन लोटस?
जनता दल युनायटेडचे नेते संजय मेहता यांनीही ललन सिंग व संजय झा यांच्यावर तोंडसुख घेतले. राज्यात भाजपाचे ऑपरेशन लोटस आता पूर्ण झाले आहे. त्यासाठी जेडीयूतील दोन प्रमुख नेत्यांनी त्यांना मदत केली आहे. नितीश कुमार यांचे राज्यातील महत्त्व कमी करण्याचा हा डाव आहे, असा आरोप संजय मेहता यांनी केला. यादरम्यान कार्यकर्त्यांचा वाढता संताप पाहून बिहार पोलिसांनी मुख्यमंत्री निवासाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले. जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी केवळ संजय झा व ललन सिंगच नव्हे, तर लल्लन सराफ आणि विजय कुमार चौधरी यांसारख्या वरिष्ठ नेत्यांविरोधातही जोरदार निदर्शने केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या इतर नेत्यांनाही आमच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही संतप्त आंदोलकांनी दिला.

नितीश कुमार यांचे समर्थक भावूक
गुरुवारी पाटण्यातील रस्त्यांवर उतरलेल्या नितीश कुमार यांच्या समर्थकांनी माध्यमांशी बोलताना आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. एका संतप्त समर्थकाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, ज्या नितीश कुमारांनी बिहारमध्ये ‘सुशासनाचे’ मॉडेल उभे केले, त्यांनाच हे लोक पदावरून कसे हटवू शकतात? हा निर्णय ऐकल्यापासून आम्हाला रात्रभर झोप लागली नाही. आम्ही या दुःखात होळीचा सणसुद्धा साजरा केला नाही. नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या निर्णय बिहारच्या जनतेवर अन्याय करणारा आहे. अतिमागास प्रवर्ग, मागासवर्गीय आणि महिलांनी केवळ विकासाच्या नावावर नितीश कुमारांना मतदान केले होते. आता काही लोक हा कौल उलथवून लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप दुसऱ्या एका कार्यकर्त्याने केला. नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे महिला आणि मागासवर्गीय मतदारांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आगामी काळात पक्षाला याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्रिपदावर असताना राज्यसभेचा अर्ज भरणारे कदाचित ते एकमेव उमेदवार असावेत. त्यांनी स्वत: सोशल मीडियातून आपली राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. पण केवळ राज्यसभेसाठी मुख्यमंत्रिपद सोडणारेही ते एकमेव नेते ठरतील. पण खरंतर हे केवळ जनतेला सांगण्यासाठी होते. नितीश कुमार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याने मुख्यमंत्रिपद सोडणे तेही शपथ घेतल्यानंतर काही महिन्यांत हे राजकीय दबाव असल्याखेरीज शक्य नाही, अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.

नितीश कुमार हे २००५ पासून मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे सध्या त्यांच्यासोबत असलेल्या भाजपविरोधात निवडणूक लढवूनही ते मुख्यमंत्री झाले. अनेकदा राजकीय उलथापालथ होऊनही त्यांनी आपले पद शाबूत ठेवले होते. मग यावेळीच त्यांना राज्यसभा कशी आठवली, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विशेश म्हणजे मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या संयुक्त जनता दलाने भाजपच्या तोडीस तोड कामगिरी करत तब्बल ८५ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला ८९ जागा मिळाल्या होत्या. राज्यात पक्षाची स्थिती अत्यंत मजबूत असताना नितीश कुमार यांनी असा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामध्ये चार कारणे सांगितली जात आहेत.
२०२० च्या निवडणुकीत नितीश कुमार यांना भाजपच्या तुलनेत जवळपास निम्म्याच जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरही भाजपने मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. २०२५ च्या निवडणुकीतही तेच घडले. नितीश कुमारांना चार जागा कमी मिळाल्या, मात्र, भाजपने त्यांनाच सीएम करत शब्द पाळला. पण निवडणुकीआधी विरोधकांनी दाखविलेली महाराष्ट्र फॉर्म्यूल्याची भीती खरी ठरली. विधानसभेतील आकड्यांचे गणित पाहिल्यास जेडीयूला सोडूनही भाजप सरकार बनवू शकते. भाजपकडे सध्या ८९ आमदार आहेत. चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, जीतनराम मांझी, एमआयएम, बीएसपी या पक्षांना सोबत घेऊन किंवा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचे आमदार फोडूनही भाजप सत्ता काबीज करू शकते.
२. आकड्यांचे गणित जुळेना
विधानसभा निवडणुकीत आरजेडी आणि काँग्रेसला केवळ ३१ जागा मिळाल्या आहेत. या आघाडीला किमान ४० ते ४५ जागा मिळाल्या असत्या तरी नितीश कुमार भाजपसमोर झुकले नसते. कारण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी ते आघाडीसोबत जाऊ शकले असते. पण आता तशी शक्यता नाही. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदावर राहण्यासाठी अजूनही महिनाभराचा वेळ आहे. राज्यसभेची शपथ घेईपर्यंत ते या पदावर राहतील. पण या कालावधीत त्यांना काहीच हालचाल करता येणार नाही, अशी स्थिती आहे. आघाडीसह एमआयएम आणि बीएसपीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला तरी भाजपच्या रणनीतीपुढे ते फार काळ टिकणार नाही.

३. केंद्रात एनडीएचे सरकार सुरक्षित
केंद्रात एनडीए सरकारमध्ये जेडीयू असून पक्षाचे १२ खासदार आहेत. नितीश कुमारांनी मोदी सरकारचा पाठिंबा काढला तरी सरकारला कसलाही धोका नाही. जेडीयू बाहेर पडल्यास सरकारकडे २८० खासदारांचे पाठबळ उरते. अशा स्थितीत नितीश कुमार कोणताही धोका पत्करणार नाहीत

४. नितीश कुमार यांचे वय
नितीश कुमार यांनी नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या तब्बेतीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणूक २०३० मध्ये आहे. तोपर्यंत त्यांचे वय ७९ होईल. नितीश कुमार यांच्या तोडीस तोड नेता सध्या भाजपमध्ये नाही. पण पुढील चार वर्षे भाजपला त्यासाठी प्रयत्न करता येतील. त्यामुळेच भाजपने वेळ साधत नितीश कुमारांना राज्यसभेवर जाण्यासाठी दबाव टाकल्याची चर्चा आहे. पुढील निवडणुकीत नितीश कुमार सोबत राहिले तर त्यांना आताएवढे महत्व राहणार नाही, हे स्पष्टच आहे.  


No comments:

Post a Comment

राज्यसभेच्या निवडणुूकात काँग्रेसचा आत्मघात.!

"राज्यसभेच्या निवडणुूकात शरद पवारांना पाठिंबा देण्यात आला. काँग्रेसनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता सतत घेतलेली पडती बा...