अस्पृश्यांच्या मुक्ती - संग्रामाचे एकमेव नेते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र आंबेडकरी चळवळीतील सान-थोर कार्यकर्त्यांच्या लेखी पवित्र स्थानी आहे. या जीवनचरित्राचे मोल काय वर्णावि! आम्ही जाती निर्मूलनासाठी, वर्गविषमतेच्या अंतासाठी मैदानात ठाकलो, हा सर्व स्फूर्तिदायी करिश्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राचाच म्हटला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड आणि भैयासाहेब आंबेडकर आमच्या आदरस्थानी आहेत. माता रमाई बाबासाहेबांच्या पूर्वार्धातील आयुष्यात सहचारिणी होत्या. त्यांनी भोगलेल्या अपार कष्टखस्ता, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपले सर्वस्व पणाला लावून डॉ. बाबासाहेबांच्या कार्यास त्यांनी लावलेला हातभार अथवा दिलेले योगदान एखादा करंटा माणूसच नाकारील. माता रमाईच्या देहांतानंतर बाबासाहेबांचे आयुष्य सावरून धरणाऱ्या त्यांच्या द्वितीय पत्नी माईसाहेब आंबेडकरच होत्या. व्यवसायाने डॉक्टर. तीस-चाळीसच्या शतकात एमबीबीएस वैद्यकीय पदवी मिळविणे येरागबाळ्याचे काम नाही. ज्या क्षणी बाबासाहेबांसाठी आणि त्यांच्या कार्यउद्दिष्टांसाठी जगण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो दलितांच्या भाग्याचा दिवस म्हटला पाहिजे.
बाबासाहेबांच्या महान कार्यात कसलेही विघ्न येऊ नये म्हणून व्याधींनी ग्रस्त असणाऱ्या, अजोड असणाऱ्या आंबेडकरांशी त्या लग्न करून मोकळ्या झाल्या. स्वतःचे सर्व आयुष्य बाबासाहेबांच्या चरणी कायमचे समर्पित करून टाकले.
माई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कहाणीतला पत्रोपत्री मजकुराचा काही संदर्भ इथे दिल्यावाचून राहवत नाही. बाबासाहेबांनी माईना पत्र लिहिले ते असे-
"दैवी योग तर आहेच. तो दैवी योग नसता तर कोठे काठेवाडात वावरता असणारी शरू आणि कोठे राजकारणाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात असलेला तिचा राजा यांची भेट कशी झाली असती? पण हा योग आत्मैक्य योग आहे असेही म्हटले पाहिजे. एका जीवात्म्याने दुसऱ्या जीवात्म्यास पाहिले. समानशील ओळखले आणि मिठी मारली. ही मिठी कधीतरी सुटेल का? मृत्यूशिवाय ही मिठी कोणी सोडवू शकणार नाही अशी राजाची खात्री आहे...!" आणि झालेही असेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी- महापुरुषाची महानायिका बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर या महानायिकेचा जो शोकांत अंत झाला त्याचे दुःख आजही माझ्या उरात साचून आहे.
माई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी खरंच तुम्ही तुमच्या जिंदगानीची राखरांगोळी करून घेतलीत. किती सहन केलंत तुम्ही? ज्या माणसावर तुम्ही निर्व्याज प्रेम केलंत त्याच्या पश्चात त्याच्या अनुयायांनी तुमच्याशी क्रूर वागून हिंस्रतेचा, कृतघ्नतेचा अमानुष नमुना पेश केला. माई, तुम्ही तुमच्या राजाला विष घालून मारले असा आरोप या करंट्यांनी करून तुमच्या उर्वरित आयुष्यात तुमचा अनन्वित छळ केला. त्यात तुमचा अंत झाला. सर्व निमूटपणे सहन केलंत. तुम्ही ब्राह्मण कुळातील अथवा सीकेपी. कोण कुठे कुठल्या जातीत जन्माला येणार हे जन्माला येणाऱ्यांच्या हाती थोडेच आहे! श्रेष्ठ जातीत जन्म घेऊन संस्कार घेऊन विद्याविभूषत होऊन आंबेडकरांच्या आयुष्याला देदीप्यमान बनविण्यात माई तुमचाही वाटा आहे. तुम्ही बौद्ध धर्मदीक्षेसाठी विकलांग बाबासाहेबांना शक्तिस्रोत पुरविला आणि त्यांच्यासोबत तुम्हीं काषायवस्त्रे मनापासून परिधान करून बौद्ध धर्म स्वीकारला. पण माई, या कृत्यापोटी तुमच्या वाट्याला आली निर्भत्सना, द्वेष आणि जिवंतपणी विटंबना. पश्चात्तापदग्ध म्हणून आम्ही तुमच्या चांगुलपणाची परतफेड तेव्हाच करू शकू. तुमच्या राजाच्या स्मृती अवशेषाशेजारी म्हणजे चैत्यभूमीवर तुमची समाधी सन्मानाने बांधू तेव्हाच आमच्या कृतघ्नपणाचा अंत होईल.
माई, तुमची तुमच्या शब्दांत असलेली कैफियत खाली उद्धृत केल्याशिवाय राहवत नाही. माई, तुम्हीं हे सर्व लपविलेत. मी मात्र ही कैफियत खाली सार्वत्रिक करण्याचा गुन्हा करतो आहे. माई, यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा मला मंजूर आहे. तुम्ही लिहिले, "डॉ.आंबेडकर म्हणजे स्वच्छ सार्वजनिक जीवनाचे मूर्तिमंत आदर्श होते. आमच्या जीवनात दडवण्यासारखं काहीही नव्हतं. डॉ. आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर राजकारणात आंबेडकर कुटुंबीयांची अडगळ नको म्हणून तत्कालीन दलित नेत्यांनी यशवंत आणि माझ्यात जाणीवपूर्वक दरी निर्माण केली आणि यशवंतला बौद्ध महासंघाचे अध्यक्षपद देऊन त्याला दौरे आणि धर्मकारण करण्यात व्यस्त ठेवले, तर दुसरीकडे माझ्याविरूद्ध दलित समाजात पद्धतशीरपणे विषपेरणी करून डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूविषयी संशयाचे कुभांड रचले. राजकीय हेतूसाठी आणि नेतृत्वाच्या महत्वाकांक्षेपोटी माणसे किती हीन पातळी गाठू शकतात याचा पुरावा म्हणजे हे सारे कुभांड होते. अशा प्रकारे दलित समाजात तसेच आम्हा मायलेकांत योजनाबद्ध रीतीने दरी निर्माण करण्याचे सत्कार्य काही हितसंबंधितांनी पार पाडले, जेणेकरून आंबेडकराना अभिप्रेत असलेल्या राजकीय प्रवाहातून मी आपोआप बाहेर फेकले जावे. त्यासाठीच हा सारा आटापिटा होता. कौटुंबिक आणि राजकीय दृष्टीने हे फार वाईट झाले. त्यामुळेच समाजाची वाताहत झाली असे माझे मत आहे. आंबेडकराच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी हितसंबंधी दलित नेत्यांनी केली. त्याप्रमाणे सरकारने चौकशी केली आणि गृहमंत्री पं. गोबिंद वल्लभ पंत यानी २६ नोव्हेंबर १९५७ रोजी निवेदन करून आंबेडकरांचा मृत्यू सर्वसामान्य स्थितीत आणि नैसर्गिकरीत्या झाला असे लोकसभेत जाहीर केले पण तरीही राजकीय हेतूने आणि नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित झालेल्या या नेत्यांचे ताबूत थंड झाले नाहीत. संशयास्पद मृत्यु व चौकशी रिपोर्ट ही रेकार्ड अधूनमधून वाजविणे त्यांना त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी अपरिहार्य होऊन बसले. डॉ. आंबेडकरांच्या आजारपणात त्यांना योग्य ती पूर्ण विश्रांती मिळावी म्हणून प्रसंगी ज्या पुढाऱ्यांना मी त्यांची भेट घेऊ दिली नाही त्या पुढाऱ्यांनी आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर माझ्यावर भलतेसलते आरोप करून मला समाजातून उठवून लावण्याचा प्रयत्न केला. असे करण्याचा पुढार्यांचा काय डाव होता हे समजणे फारसे कठीण नाही. असे करण्याचे एकमेव कारण म्हणजे आंबेडकरांनंतर समाजाचे सर्वागीण आणि सर्वसामान्य नेतृत्व आपोआप माझ्याकडेच आले असते. पुढाऱ्यांच्या अपप्रचाराने आंबेडकरी जनतेचे माझ्याविषयीचे मत कलुषित झाले होते, हे कोणीही नाकारणार नाही. पण असे करून जनतेने माझ्यावर अन्याय तर केलाच, परंतु आपल्या उद्धारकर्त्या थोर सत्पुरुषाचा डॉ. आंबेडकरांचाही घोर अवमान केला...."
No comments:
Post a Comment