Wednesday, 25 March 2026

लोकनेते यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जात तसेच ते लोकांचे नेते म्हणून ही जनतेमध्ये लोकप्रिय होते. यशवंतरावांनी आपल्या भाषणांमधून आणि लेखणी मधून कायमच सामाजिक लोकशाहीचा पुरस्कार केला होता. शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील यशवंतराव सजग आणि हळवे होते त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महाराष्ट्रात सहकारी संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. यशवंतराव बळवंतराव चव्हाण असे यशवंतरावांचे पूर्ण नाव होते. अगदी सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या यशवंतरावांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान होते त्यांनी बॉम्बे स्टेटचे शेवटचे मुख्यमंत्री म्हणून काम केले तसेच बॉम्बे स्टेटच्या विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. काही काळ त्यांनी चौधरी चरण सिंग यांच्या सरकारमध्ये भारताचे उपपंतप्रधान म्हणूनही काम पाहिले. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म महाराष्ट्रातील तत्कालीन सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या छोट्याशा गावात *मराठा कुणबी* कुटुंबात झाला. यशवंतराव चव्हाण यांना तीन भावंडे होती. यशवंतरावांचे वडील लहानपणीच गमावले गेल्याने त्यांचे संगोपन त्यांच्या काका आणि आईने केले. त्यांची आई अतिशय कष्टाळू होती. त्यांच्या आईंकडून त्यांना प्रामाणिकपणा, आत्मनिर्भरता आणि देशभक्ती याची शिकवण मिळाली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असताना १९३९ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना तत्कालीन इंग्रज सरकारकडून दंड थोठविण्यात आला होता त्याचबरोबर १९३२ मध्ये साताऱ्यात भारतीय ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली होती. या काळात ते स्वामी रामानंद भारती, धुळप्पा भाऊराव नवले, गौरीहर उर्फ आप्पासाहेब सिंहासने, व्ही एस पेज आणि गोविंद कृपाराम वाणी यांच्या संपर्कात आले. टिळक हायस्कूल कराड येथून १९३४ मध्ये हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये दाखल झाले. १९३८ मध्ये इतिहास आणि राज्यशास्त्रा मध्ये बीएची पदवी मिळवल्यानंतर ते पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये दाखल झाले. १९४१ मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटी मधून कायद्याची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी कराड येथे फौजदारी वकील म्हणून प्रॅक्टिस ची सुरुवात केली. 
पुढे १९४२ मध्ये त्यांचे लग्न सातारा जिल्ह्यातील फलटण येथील वेणूताई यांच्याशी झाले.  
महाविद्यालयीन काळात यशवंतराव वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक चळवळीत आणि कार्यात गुंतलेले होते त्यामुळे अर्थातच त्यांचा संबंध काँग्रेस पक्ष आणि त्यातील सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, केशवराव जेथे यांच्यासारख्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी जवळचा संबंध आला. १९४० मध्ये ते सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९४२ मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात त्यांनी भाग घेतला आणि भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. अर्थातच आंदोलनात सहभागी झाल्यामुळे इंग्रज सरकारची त्यांच्यावर नजर पडली आणि यशवंतरावांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली.
१९४६ मध्ये यशवंतराव प्रथम दक्षिण सातारा मतदारसंघातून मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले त्याच वर्षी त्यांची मुंबई राज्याच्या गृहमंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून नियुक्ती झाली.नंतरच्या मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये त्यांची नागरी पुरवठा समाज कल्याण व वनमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९५३ जो नागपूर करार झाला त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये यशवंतरावांचा समावेश होतो ज्या कराराद्वारे महाराष्ट्राच्या विविध विभागांच्या समान विकासाची हमी दिली गेली होती. १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत यशवंतराव चव्हाण कराड मतदार संघातून निवडून आले त्यावेळी त्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आणि ते द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीला यश आले आणि यशवंतरावांच्या पुढाकाराने संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे १९६० रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले १९५७ ते १९६० या काळात त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणीवर काम केले. यशवंतरावांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर दिला. लोकशाहीचे आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्था व कमाल भूमी कायदा त्यांच्या काळात संमत करण्यात आला.
*हिमालयाच्या मदतीला सह्याद्री*
भारत चीन सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री कृष्ण मेमन यांनी १९६२ मध्ये राजीनामा दिल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतरावांना संकटकाळात या पदावर काम करण्याचे आवाहन केले.  युद्धा नंतरच्या नाजूक परिस्थितीत ते पद सक्षमपणे हाताळले. यशवंतरावांनी सशस्त्र दलांना सक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि शत्रुत्व संपवण्यासाठी पंडित नेहरू सोबत चीनबरोबर वाटागती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सप्टेंबर १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान त्यांनी लाल बहादूर शास्त्री सरकारमध्ये संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळली होती ज्यामध्ये भारताचा पाकिस्तानवर देदीप्यमान विजय झालेला होता. १९६२ च्या पोटनिवडणुकीत यशवंतराव नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून बिनविरोध निवडून आले. १४ नोव्हेंबर १९६६ रोजी त्यांची पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताचे गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली. १९६९ मध्ये काँग्रेसच्या पहिल्या फुटीच्या वेळी यशवंतरावांवर टीका झाली तरीही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजीव रेड्डी यांना मतदान करण्याच्या त्यांच्या पूर्वीच्या वचनबद्धतेवर ते ठाम राहिले आणि तसे करताना त्यांनी इंदिराजींच्या संतापाला निमंत्रणही दिले. १९७० मध्ये यशवंतरावांनी अर्थमंत्री म्हणून अल्पकाळ काम केले आणि१९७४ मध्ये त्यांची नियुक्ती परराष्ट्र मंत्री म्हणून करण्यात आली. पुढे जून १९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने भारतात अंतर्गत आणीबाणी घोषित केली. पुढे १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी सह काँग्रेसचा दारुण पराभव झाला त्यामुळे नवीन संसदेत यशवंतरावांनी काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेते पदाची धुरा सांभाळले त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले. १९७८ च्या काँग्रेस अधिवेशनात बेंगलोर येथे झालेल्या फुटी नंतर यशवंतरावांनी इंदिरा गांधींची साथ सोडली आणि काँग्रेस उर्स या स्वतंत्र राजकीय पक्षांमध्ये आपला सहभाग नोंदवला पण इंदिरा गांधींपासून दूर जाण्याच्या निर्णयामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का बसला कारण देवराज उर्स स्वतः नंतर जनता पक्षात सामील झाले आणि काँग्रेस उर्स चे नामकरण भारतीय काँग्रेस समाजवादी असे नामकरण करण्यात आले. १९७९ मध्ये पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या अल्पायुषी मंत्रिमंडळात यशवंतरावांची भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
जानेवारी १९८० च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काँग्रेस आईला बहुमत मिळाले आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण हे एस काँग्रेसच्या तिकिटावर महाराष्ट्रातून खासदार म्हणून निवडून आलेले एकमेव उमेदवार होते. पुढे १९८१ मध्ये यशवंतरावांनी इंदिराजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या त्यांच्या निर्णयाबद्दल त्यांच्यावर टीका देखील झाली. केंद्र सरकारमधील सर्वात ताकतवान आणि महत्त्वाचे खाती असलेल्या गृह, परराष्ट्र, संरक्षण, वित्त अशा महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळणारे एकमेव महाराष्ट्रीयन नेते असल्याचा विक्रम यशवंतराव चव्हाण यांच्या नावावर आहे. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने महाराष्ट्रातील मराठा परिवारातील या महान सुपुत्राचे निधन झाले.
२७ नोव्हेंबर १९८४ ला कराड येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कराड येथे कृष्णा कोयना प्रीतीसंगम येथे त्यांची समाधी आहे. १९६० आणि ७० च्या दशकात सुरुवातीच्या काळात जेव्हा यशवंतराव त्यांच्या शक्ती आणि प्रभावाच्या शिखरावर होते तेव्हा त्यांना प्रति शिवाजी किंवा नवीन शिवाजी असेही संबोधले जात असे इतके ते प्रभावी झाले होते. १९८५ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली. त्याचबरोबर विविध संस्था आणि प्रकल्पांना यशवंतरावांचे नाव देण्यात आले. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे चे नामकरण यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे असे करण्यात आले. उजनी जलाशयाला यशवंत सागर हे नाव देण्यात आले. नागपुरातील इंजिनिअरिंग कॉलेजला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले. १९७९ ला महाराष्ट्रातील नाशिक येथे स्थापन करण्यात आलेल्या मुक्त विद्यापीठाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असे नाव देण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील प्रसिद्ध सायन्स कॉलेजला यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा असे नाव देण्यात आले.
पुणे येथील कोथरूड उपनगरातील सभागृहाला, मुंबईतील नरिमन पॉईंट आणि कराड मधील टाऊन हॉल अशा सभागृहांना त्यांचे नाव देण्यात आले.
तसेच पिंपरी चिंचवड मधील शासकीय हॉस्पिटल ला देखील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असे नाव देण्यात आले.अशाप्रकारे महाराष्ट्रातील विविध संस्था आणि प्रकल्पांना यशवंतरावांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती राखल्या गेल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण हे मुख्यतः सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जात.
यशवंतरावांना साहित्यात प्रचंड रस होता त्यांनी मराठी साहित्य मंडळाची स्थापना केली आणि मराठी साहित्य संमेलनाला आपला पाठिंबा दिला. त्यांचा अनेक कवी संपादक आणि लेखकांची जवळचा संबंध होता त्यांनी मराठी विश्वकोशाची स्थापना करून संकलन सुरू केले त्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे नियुक्ती केली. त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र देखील लिहिले. खरंतर तीन भागात आपले आत्मचरित्र असावे अशी त्यांची योजना होती त्यातील पहिल्या भागात सातारा जिल्ह्यातील त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांचा समावेश आहे त्यांचे मूळ गाव कृष्णा नदीच्या काठावर असल्याने त्यांनी पहिल्या खंडाचे नाव कृष्णाकाठ असे ठेवले. द्विभाषक राज्याचे मुख्यमंत्री ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या कारकीर्दीत त्यांनी मुंबईमध्ये आपले आयुष्य घालवले त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या खंडाला सागर तीर असे नाव सुचवले होते तर १९८४ मध्ये मृत्यू होईपर्यंत ते दिल्लीत होते म्हणून त्यांनी त्यांच्या तिसऱ्या खंडासाठी यमुना काठ हे नाव सुचवले होते परंतु त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले व फक्त पहिला खंड प्रकाशित होऊ शकला.

No comments:

Post a Comment

ऐसे कैसे झाले भोंदू...!

'प्लेबॉय' म्हणून शोभेल अशा लीला करणारा भोंदू, रुपाली चाकणकर यांचा 'पांडुरंग', कथित ज्योतिषी अशोक खरा...