Wednesday, 4 March 2026

कुसुमाग्रजांच्या जीवन-लहरी

वि.वा. शिरवाडकरांनी मराठी साहित्य नाटककार, पत्रकार, कवी, निबंधकार, समीक्षक अशा विविध अंगाने समृद्ध केलंय. मराठी भाषेचा दर्जा आणि विचारही वाढवला. पण त्याचबरोबर पत्रकार, साहित्यिक, कलावंतांत अभावानेच आढळते, ती सामाजिक बांधिलकीही मानली. नाशकात मागासवर्गीय मुलीच्या शैक्षणिक उन्नतीचं कार्य करणाऱ्या शांताबाई दाणी यांच्या कार्यात त्यांचा सुरुवातीपासून सहभाग होता. कुठल्या राजकीय पक्ष-विचारसरणीच्या प्रचारासाठी त्यांनी आपली लेखणी वापरली नाही, की आपली प्रतिभा बाजारू होऊन दिली नाही. अनेक अपरिचित, होतकरू लेखकांना त्यांनी वेळीच कौतुकाची थाप दिली. ह्यात ना.धों. महानोर, विठ्ठल वाघ यांसारख्या श्रेष्ठ कवींचा समावेश आहे. 'छावा'कार शिवाजी सावंत यांच्या थांबलेल्या हाताला त्यांनी प्रेरणादायी शब्दांचं बळ देत पुन्हा लिहितं केलं. ते माणसांत रमायचे, माणसांसाठी लिहायचे. त्यांचं सार्वजनिक जीवन खुलं होतं; पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल कायम गूढ राहिलं.
नात्यास नाव अपुल्या, देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्याची, जगतास जाण नाही 
अशी प्रेमालाही हुलकावणी देणारे कुसुमाग्रज 'तेव्हाही' या कवितेत म्हणतात-
जेव्हा मी नसेन, तेव्हाही मी असेन
तुझ्या पापणीच्या आत
अवघडलेल्या एका थेंबामध्ये !
आणि आजच्यासारखाच तेव्हाही हसेन 
आणि म्हणेन, अजून मी अवघडच !
हा अवघड गुंता सोडवण्याचं काम तात्यासाहेबांचे जवळचे आणि अखेरच्या पर्यातले स्नेही श्री.शं. बाळासाहेब सराफ यांनी केलं आहे. सराफ नाशकात राहाणारे नाशिकच्या 'पेठे विद्यालया'चे मुख्याध्यापक म्हणून ते १९८८ मध्ये निवृत्त झाले. तात्यासाहेबांची प्रतिमा आणि प्रतिभा हा सराफ कायांच्या प्रेमाचा आणि लेखनाचा विषय. यापोटी त्यांनी तात्यासाहेबांच्या की हयातीत विविध नियतकालिकांतून प्रसंगविशेष लेखही लिहिले. तसं तात्यासाहेबांवर अनेकांनी भरपूर लेखन केलंय पण ते त्यांच्या साहित्य निर्मिती आणि सामाजिक कार्यापुरतंच मर्यादित होतं. तात्यासाहेब दीर्घायुषी होते. (जन्मः २७ फेब्रु. १९१२; मृत्यूः १० मार्च १९९९) पण ते कधी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल कुठे बोलले नाही की, त्यांनी काही बा लिहिलं नाही. तथापि, तात्यासाहेबांनी आपल्याजवळची बरीचशी कागदपत्रं बाळासाहेब सराफ यांच्या हवाली केली होती. एकप्रकारे त्यांनी सराफांना करून दिली होती. प्रत्यक्षात हे काम किती अवघड होतं, हे 'कहाणी कुसुमाग्रजांची' (पॉप्युलर प्रकाशन, मूल्य ३५० रुपये) या ग्रंथाच्या ३१४ पृष्ठांतून ठळकपणे दिसतं. तात्यासाहेबांच्या बालपणापासून झालेल्या कहाणींचा पट त्यांच्या प्रतिमे आणि प्रतिभेसारखाच कुतूहल वाढवणारा आणि सात्विक आहे. तात्यासाहेब आडनाव बंधूंकडेच दत्तक गेले आणि गजाननचे विष्णू झाले. पण हा बदल नाममात्र झाला नाही. तात्यासाहेबांनी सुरुवातीच्या काही कविता गजानन ह्याच नावाने लिहिल्या होत्या. या गजाननला नाट्याभिनय आणि क्रिकेटची आवड होती. शाळेच्या हस्तलिखितात शब्दकोड्यांपासून ते दीर्घकाव्य लिहिण्यापर्यंतचा भार तो उचलत असे. तथापि, तात्यासाहेबांच्या कवितेच्या प्रेरणा ठरल्या, त्या गोदूबाई सोनवणी. त्या आणि त्यांचं कुटुंबच प्रागतिक विचाराचं होतं. तात्यासाहेब तेव्हा त्यांचा उल्लेख प्रिय भगिनी असा करीत. सराफांच्या मते, गजाननने 'प्रिय भगिनी...!' लिहून मैत्रीसाठी लक्ष्मण रेषा आखून घेतल्याचं आणि ती जाणीव गोदूबाईना सुचवल्याचं पत्रात दिसतं. पण एका पत्रात कुसुमाग्रज गोदूबाईना लिहितात-
सखे ना राग मानावा। जरी हा वेळ पत्राला 
लिहाया गोष्ट गे घेता। मुळी ना वेळ हाताला 
दिनी ज्या येथ मी आलो। तुझ्याशी वागलो दुष्ट 
पुरी ही कल्पना खोटी। उगा का होशि तू रुष्ट?
गोदूबाईबरोबरच्या 'प्लेटॉनिक प्रेम' याविषयी वि.वा. शिरवाडकरांनी 'एखादे पान-एखादे फूल' या पुस्तकातल्या 'जखमी पंखाचा आकाशवेध' या लेखात सविस्तर लिहिलं आहे. प्रत्यक्षात तात्यासाहेबांनी प्रेमविवाह केला, तो गंगूबाई सोनवणी यांच्याशी. हा आंतरजातीय विवाह होता. बाई तात्यासाहेबांपेक्षा ७ वर्षांनी मोठ्या; उत्तम शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून नाशकात प्रसिद्ध होत्या, 'जीवन लहरी' या काव्य संग्रहातील बहुतेक कविता गंगूबाईंबद्दल प्रेम व्यक्त करणाऱ्या आहेत. पण त्यात कुसुमाग्रजांचं चाचपडणंच अधिक आहे. ते म्हणतात-
दुर्बल मम जीभ अशी, शब्दपुजा बांधू कशी? 
भाव आता मूक मनी, उमजून घे तू देवी 
वाचेचा मी दुबळा, भाव न का म्हणुनी मुळी 
शांती जळी पृष्ठ जळा, कोलाहल दरियातळी
अशा मनातल्या प्रेमभावना सांगणाऱ्या कुसुमाग्रजांचा विवाह किती साधेपणाने व्हावा आणि त्यांचं सहजीवन किती गुंतागुंतीचं असावं, ते समजून घेण्यासाठी 'कुसुमाग्रजांची कहाणी' वाचली पाहिजे. २७ वर्षाच्या सहजीवनानंतर ३१ डिसेंबर १९७१ रोजी गंगूबाई यांचं (लग्नानंतर-मनोरमाबाई) कर्करोगाने निधन झालं. शिरवाडकर दांपत्य विनाअपत्य होतं. एव्हाना तात्यासाहेबांच्या मान-सन्मानाचा काळ सुरू झाला होता. सहजीवनानंतरचा अखेरपर्यंत २८ वर्षांचा काळ तात्यासाहेबांनी साहित्य-कला आणि सार्वजनिक जीवनात कसा घालवला, ते बाळासाहेब सराफ यांनी उत्तम पद्धतीने सादर केलं आहे. याशिवाय तात्यासाहेबांच्या साहित्य संपदेचा, पुरस्कारांचा, त्यांच्यावरील पुस्तकांचा नियतकालिकांतील लेखांचा तपशीलही 'कहाणी कुसुमाग्रजांची' मध्ये आहे. ही कहाणी वाचताना-
चिंब चिंब भिजतो आहे,
भिजता भिजता मातीमध्ये, पुन्हा एकदा रुजतो आहे! हिरवे कोवळे कोंब माती, माझ्याभोवती बांधते आहे ! 
विरते पाश सरते नाते, पुन्हा पुन्हा सांधते आहे !
ही कुसुमाग्रजांची कविता आठवते आणि कवीचं 'जीवन' इतकं 'लहरी' असावं का, असा प्रश्न पडतो.

No comments:

Post a Comment

सत्यमेव जयते !

"अखेर दिल्लीतल्या राउस एव्हेन्यू न्यायालयाने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह इतर २३ आरोपीं...