Sunday, 8 March 2026

उद्धव ठाकरे इथं चुकताहेत...!

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांतून भाजपने महाराष्ट्रात सर्वदूर आपली पाळंमुळं घट्ट केल्याचं दिसून आलंय. त्याचवेळी मुंबई वगळता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे महाराष्ट्रातून उच्चाटन झाल्याचं निकालाचे आकडे सांगताहेत. परभणीत काही अंशी यश मिळालं असलं तरी त्याला यश म्हणता येणार नाही. ठाकरे सेनेचं जे काही अस्तित्व आहे, ते आता मुंबईपुरतेच उरलंय. अगदी ठाणे, भिवंडी, कल्याण, वसई-विरार, नवी मुंबई, पनवेल, मीरा-भाईंदर या मुंबईलगतच्या महापालिकातूनही हा पक्ष हद्दपार झाल्याचं पाहायला मिळालंय. तीनदा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगलेल्या पक्षाची आतापर्यंतची सर्वांत मोठी दयनीय अवस्था आहे. विधानसभा अन् नगरपरिषदा, महापालिका निवडणूक निकालाने उद्धव ठाकरे यांचं नेमकं कुठं चुकतेय? याचा हा ऊहापोह..!
.......................................
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महाराष्ट्रात होत असलेल्या वाताहतीची चिकित्सा करण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांना समजून घ्यावं लागेल. बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून ऐन बहरातली कारकीर्द खूप जवळून पाहता आली. जाज्वल्य विचारांचा धगधगता अंगार लोकांमध्ये कसा वणवा पेटवू शकतो, हे १९८० ते २००० या २० वर्षांच्या कालखंडात फक्त मुंबई-महाराष्ट्रानेच नव्हे तर उभ्या देशाने पाहिलेय. अगदी विदेशी माध्यमेही बाळासाहेब नावाच्या वादळाची दखल घेत. त्या काळात 'मुंबईचा अनभिषिक्त सम्राट' अशी ओळख बाळासाहेबांची होती. बाळासाहेब हिंदू अस्मितेचे प्रतीक असले तरी त्यांचे हिंदुत्व खूप व्यापक होते. ते हिंदू जीवनपद्धतीचा पुरस्कार करणारं होतं, कर्मकांडाचे नव्हे. कारण, त्यांच्यावर प्रबोधनकारांच्या विचारांचा पगडा होता. राष्ट्राभिमानी प्रत्येक घटकाला त्यांच्या हिंदुत्वात स्थान होते. मग तो धर्माने मुसलमान, शीख असो अथवा इतर कोणत्याही धर्माचा! म्हणूनच साबीर शेख नावाचा त्यांचा देशभक्त मुस्लिम शिवसैनिक १९९५ च्या युती सरकारमध्ये मंत्री होऊ शकला. पीडित काश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात आश्रय देणारे हेच बाळासाहेब १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निष्पाप शिखांच्या मदतीला धावले होते. मुंबईतील एकाही शिखाला हात लावू दिला नव्हता. बाळासाहेबांमध्ये मराठी अस्मिता ठासून भरलेली होती, हे खरंय. पण, त्यांची भूमिका भूमिपुत्रांना न्याय देण्याची होती, त्यात धर्मवाद, जातीयवाद किंवा प्रांतवाद कदापि नव्हता, हेच त्यांच्या कृतीतून दिसून येतं. त्यामुळेच बाळासाहेबांचे नेतृत्व सर्वमान्य होतं. सर्वच काँग्रेस नेत्यांशी मित्रत्वाचं अन् घनिष्ठ संबंध होते. पण, ते काँग्रेस विचारसरणीच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांनी ‘त्या’ विचारसरणीच्या लोकांसोबत कधीही राजकीय घरोबा केला नाही. विचार हेच बाळासाहेबांची, शिवसेनेची संपत्ती होती. आपल्या वैचारिक श्रीमंतीचा उपयोग त्यांनी कधीही ‘संधिसाधू’ सत्तेसाठी केला नाही. अन्यथा, महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी शिवसेनेला तीन दशके लागली नसती.
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जात बाळासाहेबांनी मागील ५० वर्षांत कमावलेल्या वैचारिक श्रीमंतीवर डाका टाकला. संजय राऊत यांच्या प्रलोभनाला बळी पडत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घेऊन जाणे कितेी महागात पडलंय, याची प्रचिती उद्धव ठाकरे यांना येत असेल. ज्या पक्षांच्या विचारांविरोधात बाळासाहेबांचा लढा होता, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणं शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना आवडलेले नाही, हेच मागील एक-दीड वर्षांतील निवडणूक निकाल दर्शवतो. भाजप अन् मोदी यांना विरोध करण्याच्या प्रयत्नात उद्धव, संजय राऊतसारख्या नेत्यांच्या तोंडून नकळत धार्मिक आणि राष्ट्रीय अस्मितेला ठेच पोहोचवणारी वक्तव्ये केली गेली. तीही लोकांना रुचलेली नाहीत. दुसरीकडे पक्षाकडे आज कुठलेही स्पष्ट धोरण नाही. हिंदुत्व अन् धर्मनिरपेक्षता अशा दोन्ही दगडावर पाय ठेऊन उद्धव यांचं राजकारण सुरूय. त्यामुळे मतदार गोंधळलेलाय. 
एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेत बंड झाले. त्यातून शिवसेनेची दोन शकले झाली. ज्यासाठी हट्टाहास केला होता, ती सत्ता तर गेलीच, शिवाय पदाधिकाऱ्यांनीही पक्षाकडे पाठ फिरवली. लढवय्ये नेतेही शिंदेंच्या सोबत गेले. सत्तेच्या मोहात पक्षाची कधी नव्हे इतकी मोठी हानी झाली. यावर उद्धव यांनी आपले काय चुकतंय यावर मंथन करणं  आवश्यक होतं. पण, राऊतसारख्या नेत्यांनी त्यांची दिशाभूल करत विचार-विनिमयांच्या भूमिकेपासून नेहमीच परावृत्त केले. त्याचा सातत्याने पक्षाला फटका बसतोय. पराभवातून शिकून पुढं जाणे हेच यशस्वी होण्याचं रहस्य आहे, अन्यथा ते अपयश कायम राहू शकते. नेमकं हेच उद्धव यांच्या बाबतीत घडतंय. चुकांमधून शिकले नाही तर त्या पुन्हा होतात आणि अपयशातून बोध घेतला नाही तर पुढच्या वाटचालीला दिशा मिळत नाही! सध्या ठाकरेंच्या शिवसेनेची हीच अवस्था आहे. पराभवाचे शल्य न बाळगता त्यातून शिकून पुढं जाणे, हे एका मुत्सदी राजकारण्याचे लक्षण आहे. इथं उद्धव ठाकरे कमी पडताहेत.
संजय राऊतसारखी माणसे पराभवाची कारणे शोधण्याऐवजी त्याचे खापर दुसऱ्यावर फोडून स्वतःचे समाधान करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा पक्ष रसातळाला गेल्याशिवाय राहात नाही. मतदानाच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत प्रसारित झाली तेव्हा मुंबईतील पराभवानंतर ठाकरे बंधूंचे काय होणार, यावर ते राजकारणातून संपतील, असं उत्तर देतील, असं वाटलं होतं, पण त्यांचं उत्तर खूपच अर्थबोधक होतं. “राजकारणातून कोण कुणाला संपवू शकत नाही. जनता मूल्यांकन करून निर्णय घेत असते. आपल्या चुका-उणीवा सुधारून जनतेपुढे गेल्यास पुन्हा ‘बाऊन्स बॅक’ होता येते. उभारी घेता येते..!” त्यांच्या या एका ओळीच्या उत्तरात बराच मतीतार्थ दडलाय. मुंबईचा निकाल पाहता ठाकरे यांची सद्दी संपली, असा अर्थ काढणे गैर ठरेल. लोकसभा असो की विधानसभा किंवा महापालिका मुंबईत भाजपला निर्भेळ यश मिळालेलं नाही, हे भाजप नेतृत्वही मान्य करेल. मुंबईत ठाकरे त्यांच्यापुढंच मोठे आव्हान आहे, हे भाजप नेते खाजगीत मान्य करतात. ठाकरेंना मुंबईतच काय, महाराष्ट्रात पुन्हा उभारी घेण्याची आजही संधी आहे. इथं अब्राहम लिंकन यांचं उदाहरण उद्धव यांच्यासाठी खूपच उदबोधक ठरेल. अब्राहन लिंकन यांचा जनतेने मोठा पराभव केला होता. पण, ते अपयशाने खचून गेले नाहीत की पराभवाचे दुसऱ्यावर खापर फोडत बसले नाहीत. त्यांनी आपल्यातील उणीवा शोधल्या, त्यावर काम केले. प्रचंड मेहनत घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आज मुंबईतील पराभवानंतर उद्धव ठाकरे-संजय राऊत नेहमीप्रमाणे आपल्या पराभवाचे खापर एकनाथ शिंदेंवर फोडत होते. हे कोतेपणाचे भावच पक्षाच्या प्रगतीतले अडसर आहेत. भाजप वा शिंदे हे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, हेच उद्धव वा राऊत यांच्या लक्षात येत नाही. वास्तविक विरोधकांना नामोहरण करण्यात आपण कमी पडलो, ही बाब प्रथम मान्य करावी लागेल, तरच पुढे जाणे शक्य होईल.
पराभव हा कधीच शेवट नसतो तर शिकण्याची नवी संधी असते, या विचाराने त्यातील उणिवा शोधून त्या सुधारल्यास पुढील यशाचा मार्ग पक्का होतो. पराभवासाठी दुसऱ्याला दूषणे देण्याऐवजी ती वेदना भावी यशासाठी प्रेरक ठरायला हवी, ही बाबच ठाकरे यांच्या लक्षात येत नाही. यशासाठी कठोर परिश्रम, रणनीती, योग्य नियोजन, समन्वय आणि संवाद या बरोबरच मानसिकता आणि सभोवतालचे वातावरण खूप महत्वाचे असते. उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच्या वातावरणात आज संजय राऊत यांच्यासारख्या मंडळीत प्रचंड नकारात्मकता पसरवली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राऊत यांच्यासारख्या बोलघेवडया नेत्यांच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही. त्यांची असंस्कृत वक्तव्ये मतदारांना दूर सारत आहेत. राजकारणात विचारांशी ठाम राहावे लागते. रान तुडवावे लागते, कार्यकर्त्यांना वेळ आणि बळ द्यावे लागते. पण, यापैकी काहीच होताना दिसत नाही. सोबत असलेला लोकांचा कोंडवळा उद्धव ठाकरे यांना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येऊ देत नाही, असेच दिसते. दुसरीकडे पक्षाकडे आज कुठलेही स्पष्ट धोरण नाही. हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षता अशा दोन्ही दगडावर पाय ठेऊन उद्धव ठाकरे यांचे राजकारण सुरू आहे.
शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात अनेकदा राजकीय समझोते झाले, असा अनेकांचा युक्तिवाद असतो. मात्र आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे, 

शिवसेनेचे काँग्रेस सोबतचा राजकीय स्नेह हा खूप अगोदर म्हणजे ८० च्या दशकापूर्वी होता. त्यावेळी शिवसेना मराठीच्या मुद्द्यावर लढत होती. शिवसेनेला खूप मर्यादित जनसमर्थन होते. मुंबईतील कम्युनिस्टांना शह देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला अनेकदा मदत तसेच ७० च्या दशकांत महापालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना बाळासाहेबांनी समर्थन दिल्याचे संदर्भ मिळतात. अगदी १९७७ ला महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मुरली देवरा यांनाही पाठिंबा दिला होता. १९८० ला विधानसभा न लढण्याच्या मोबदल्यात शिवसेनेच्या दोन नेत्यांना कॉँग्रेसकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. काँग्रेस नेते आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचा प्रचारही बाळासाहेबांनी केला होता. हा सर्व घटनाक्रम पाहिला तर लक्षात येईल, त्यांनी व्यक्तिगत संबंधातून तत्कालीन कॉँग्रेस नेत्यांना मदत केली होती. १९८४ नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगीकार केल्यानंतर कॉँग्रेसशी विचारधारेच्या आधारावर फारकत घेतली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेसला वैचारिक विरोध करत स्वत:ची व्होटबॅंक निर्माण केली. ती २०१९ पर्यंत कायम राहिली. २०१९ नंतर काँग्रेसशी राजकीय आघाडी केल्यानंतर या व्होटबॅंकेत घसरण निर्माण झाली, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
पक्षाला बाळासाहेबांच्या मूळ विचारावर आणणे हाच सध्याच्या परिस्थितील काळाची गरज आहे. बाळासाहेब हिंदुत्वाच्या विचारांचे होते, पण ते नक्कीच भाजपला अपेक्षित असलेल्या हिंदुत्वापेक्षा वेगळे होते. त्यात कदापि कट्टरता नव्हती. आज महाराष्ट्रातील हिंदू नक्कीच धर्माभिमानी आहे, त्याची देवीदेवतांवर अपार श्रद्धा आहे. पण, तो हिंदू स्तोम माजवणाच्या विरोधात आहे. बाळासाहेब नेमके त्याच विचारांचे होते. आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, बाळासाहेबांनी प्रस्थापित राजकारण्यांच्या भाऊगर्दीत हरवलेल्या बहुजन वर्गातील तरुणांना शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणाची आणि पुढे सत्तेची कवाडे खुली करून दिली. कुणाचीही जातपात न पाहता उपेक्षित वर्गाला राजकीय प्रवाहात आणले. हे त्या काळात त्यांनी केलेले सोशल इंजिनीअरिंगच होते. उद्धव ठाकरे यांना आपल्या शिवसेनेला उभारी द्यायची असेल तर बाळासाहेब पुन्हा एकदा अभ्यासावे लागतील. त्यांच्या ध्येयधोरणांवरच राजकीय दिशा ठरवावी लागेल, तरच त्यांचा राजकीय मार्ग सुकर होईल.

चौकट 
मुंबई काँग्रेसनं उद्धव ठाकरेंशी आघाडी तोडून मतविभागणी करून दाखवली आणि तीस जागा भाजप-शिंदेंना बहाल करून दाखवल्या. कारण काय? तर राज ठाकरे सोबत आहेत आणि उत्तर प्रदेश आणि बिहारचा मतदार दुखावतो! गंमत आहे सगळी. उत्तरप्रदेशींनी आणि बिहारींनी काँग्रेसशी घटस्फोट घेऊन आता पाव शतक लोटलं आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेसचा शेवटचा मुख्यमंत्री झाला १९८९ साली म्हणजे तब्बल ३७ वर्षांपूर्वी. बिहारात काँग्रेसचा शेवटचा मुख्यमंत्री झाला १९९० साली म्हणजे तब्बल ३६ वर्षांपूर्वी. त्यानंतर दोन्ही राज्यातली जनता काँग्रेसशी इतकी वफादार राहिली की काँग्रेसला तिथं डबल डिजीटचे वांधे झाले. तरीही या घटस्फोटित पत्नीला वाईट वाटेल म्हणून आजचं लग्न तोडण्याचा व्यावहारिक वेडेपणा मुंबई काँग्रेसनं करून दाखवला. मराठी मतं दोन ठिकाणी करून दाखवली आणि भाजप-शहासेनेला ३० जागा बहाल करून मुंबईत मविआ महापौर बसवण्याची संधी घालवून टाकली. वर्षा गायकवाड यांचा वेळीच राजीनामा घेतला नाही तर ही हाराकिरी अशीच चालू राहील. स्वतःच्या मतदारसंघाच्या धारावी भागात सातपैकी सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंचे निवडून येतात या घटनेची संगती जरी वर्षा गायकवाड यांना लावता आली तरी ठाकरेंशी युती न केल्याची किंमत त्यांना कळू शकेल.

No comments:

Post a Comment

राज्यसभेच्या निवडणुूकात काँग्रेसचा आत्मघात.!

"राज्यसभेच्या निवडणुूकात शरद पवारांना पाठिंबा देण्यात आला. काँग्रेसनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता सतत घेतलेली पडती बा...