Monday, 20 April 2026

समरांगण वंगभूमीचं...!

"वंगभूमीवर लढलं जाणारं युद्ध हे समुद्रमंथनाप्रमाणे आहे. ज्यातून अमृत अन् विष दोन्ही निघणारं आहे. हे समुद्रमंथन केवळ मोदी अन् ममता यांच्यासाठीच नव्हे तर भाजप, तृणमुलसाठीही अस्तित्वाचं आहे. वंगभूमीतल्या यशपयशानं एकाला 'सत्ता संजीवनी'चं अमृत मिळणार तर दुसऱ्याला 'सत्ता स्वप्नभंगा'चं विष...! सत्ताभ्रष्ट होऊ नये यासाठी ममता आवेशानं वंगभूमीवरच्या रणांगणात लढताहेत! त्यांची चौफेर फटकेबाजी सुरुय. मोदी-शहांनी घेरलेल्या या प्रचार युद्धात अभिमन्युच्या त्वेषानं ममतादीदी चक्रव्यूहात शिरल्यात. वंगभूमी सत्तासंपादनासाठीचं समरांगण बनलंय. सत्तासुत्रं कुणाच्या हाती जाणार? मोदी की ममता? हे ठरणारं असल्यानं देशातलं आगामी राजकारण कसं असेल याकडं, इथल्या घडामोडींकडं राजकीय निरीक्षकांच लक्ष लागलेलंय!"
---------------------------------------------------
तीन राज्यात मतदान झालं असलं तरीही लक्ष्य आहे ते बंगालमध्ये! अन् तिथं प्रचाराची रणधुमाळी उडालीय. याकाळात बंगालमधलं वातावरण अधिकच गंभीर बनलंय. बंगालमध्ये जेव्हा सीपीएम-डाव्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांचा बोलबाला होता, दबदबा होता. त्यांची घोषणा होती ....तुमार नाम आमार नाम... व्हिएतनाम... व्हिएतनाम...!  डाव्यांना 'कम्युनिझम' विचार हा केवळ देशातच नाही तर जगात पोहोचवायचा होता. पण ते त्यांना जमलं नाही! त्यांनी आयडियालॉजीशिवाय काहीच काम केलं नाही. शेतकऱ्याच्या जमिनी वाचविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी ममता बॅनर्जींनी नंतर आंदोलन उभं केलं. तेव्हा त्यांची घोषणा होती ....तुमार नाम आमार नाम... नोंदीग्राम... नोंदीग्राम...! ममतांच्या या आंदोलनानंतर टाटांचा नॅनोकार प्रकल्प अन् डाव्यांचं सरकार दोन्हीही बंगालच्या बाहेर फेकलं गेलं! आज भाजप बंगालमध्ये फुलफोर्सनं घुसलाय. त्यासाठी त्यांची घोषणा आहे ...तुमार नाम आमार नाम...जोय श्रीराम...जोय श्रीराम...! भाजपच्या या घोषणेनं ममतादीदी व्यथित झाल्या नसल्या तरी बंगालमधली निवडणूक 'आयडियालॉजी'ची नाहीतर 'आयडेंटिटी'ची ठरतेय! २०१९ मध्ये लोकसभेत यश मिळाल्यानंतर भाजपला बंगाल बळकावयाचा होता. पण बंगालमध्ये सत्ता मिळवणं हे इतकं सोपं, सहजसाध्य नाही हे एव्हाना लक्षांत आलं असेल. तेव्हा मोदीचं 'रवींद्रनाथ टागोर' रूप कामाला आलं नाही. पण आता ममतांची 'मा, माटी, मानूष...!' ही घोषणा चौथ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी जादू करील का? या दोघांच्या झगड्यात 'डावे, काँग्रेस, आयएसएफ' यांची आघाडी किंगमेकर तर बनणार नाही ना! भाजपला वाटतं की, आपली सत्ता इथं आली तर बंगालमध्ये 'अच्छे दिन आने वाले हैं..।' बंगालमधल्या घडामोडी पाहणाऱ्याला वाटेल की, लोकसभेत भाजपला यश मिळालं याचा अर्थ त्यांना इथं सत्ता मिळेल. परंतु जमिनीवरची वास्तविकता अशी आहे की, इथं संघ हळूहळू काम करत आलाय. संघाच्या शाखा इथं वाढल्यात. अनेक लोक संघाशी जोडले गेलेत. त्यामुळं इथं संघ, भाजप एकत्रितरित्या सत्ता मिळवण्यासाठी काम करताहेत. २०१४ ला मोदी लाट असताना बंगालमध्ये सारं काही शांत होतं. तेव्हा भाजपकडं ना कार्यालये होती ना उमेदवार ना व्यूहरचना! त्यामुळं भाजपला जाणवलं की, आपल्या 'आत्मनिर्भर' नेत्यांकडून सत्तेचा सोपान गाठता येणार नाही. मग त्यांनी तृणमूल काँग्रेस फोडायला सुरुवात केली. त्यांनी हात घातला तो ममतादीदींच्या मुकुल रॉयना, पाठोपाठ शुभेन्दू अधिकारी, सुमोन चॅटर्जी यांना पक्षात घेतलं. ही सारी मंडळी शारदा चिटफंड, नारदा स्टिंग अशा घोटाळ्यात अडकलेले. अशांना भाजपच्या 'वॉशिंग मशीन'मधून शुद्ध केलं अन् भाजपच्या वरिष्ठ पदांवर त्यांना विराजमान केलं! त्यामुळं बीजेपी ही बीजेपी राहिलेली नाही तर ती 'बीजमूल' बनलीय! वस्तुस्थिती अशी आहे की, भाजपने जो फॉर्म्युला वापरुन इतर राज्यात सत्ता मिळवली. तेोच फॉर्म्युला वापरून इतर पक्षातले नेते आपल्या पक्षात घेऊन त्यांच्या साथीने सत्ता हस्तगत केली. ममतादीदींची प्रतिमा ही साधी, साफसुधरी, स्वच्छ आहे. जसं डॉ. मनमोहनसिंग यांचं होतं. त्यांच्या पक्षातले लोक एका स्कॅममधून दुसऱ्या स्कॅममध्ये अडकत गेले. सर्वात मोठं स्कॅम हे शारदा चिटफंडचं होतं. यापेक्षा बंगालच्या लोकांना खुपतंय ते इथलं 'कटमनी'चं! कोणतंही सरकारी काम असो त्यात इथले नेते कटमनी म्हणजे आपला हिस्सा ठेवत असत. भाजपचा प्रचार या कटमनीवरच अवलंबून आहे. तेच त्यांचं लक्ष्य बनलंय. भाजपचा आणखी एक आरोप आहे की, ममतादीदी राज्यात मुस्लिमांचं तुष्टीकरण करतात. भाजपने याला एक धर्मसंकट बनवलंय. यात त्यांनी 'सीएए', 'एनआरसी' अन् 'एसआयआर' ला जोडून टाकलंय. बांगलादेशी घुसखोर बंगालचं भवितव्य धोक्यात आणताहेत. ही वाळवी लागलीय. यांना भाजप हुसकून लावेल. बांगला देश सीमेवर तारेचं कुंपण घालू, असं अमित शहांनी म्हटलंय. यामुळं मतांचं ध्रुवीकरण होईल. याचा त्यांना फायदाही मिळू शकतो. इथं 'मतका कम्युनिटी'चा खास विशेष असा दबदबा राहिलाय. ही मंडळी जेव्हा पूर्व बंगाल बनलं तेव्हा तिकडून इकडं आलेत. त्यांना ममतादीदींनी जमीन दिली, रेशनकार्ड दिलं, मताचा अधिकार दिला. पण त्यांना नागरिकत्व मात्र मिळालेलं नाही. अमित शहांनी नागरिकत्व देण्याचं त्यांना आश्वासन दिलंय. हे आश्वासन त्यांना भाजपकडं वळवू शकतं. ममतादीदींचा एक भाचा आकाश बॅनर्जी अन् दुसरा अभिषेक बॅनर्जी. यावरून ममतादीदींना घेरलं गेलंय की, दीदींनी 'परिवारवाद' पोसलाय. इडी, सीबीआयनं अभिषेक यांचा दरवाजा ठोठावला होता. त्यांच्या पत्नीचीही चौकशी झाली होती. ममतादीदीं सत्तेत येण्यापूर्वी ३० वर्षे डाव्यांचं-सीपीएमचं इथं राज्य होतं. पण सीपीएमचा दिल्लीवर प्रभाव कधी पडलाच नाही. त्यामुळं बंगालला विशेष पॅकेज मिळालं नाही. तृणमूल काँग्रेस हा एनडीएचा सत्तासाथीदार असतानाही फारसं काही बंगालला मिळालं नाही. इथं परिवर्तन झालं नाही. त्यामुळं भाजप नेते आता म्हणतात की आम्हीच 'असोल परिवर्तन' घडवून आणू. केंद्राप्रमाणे राज्यातदेखील भाजपचं राज्य आलं तर इथं 'अच्छे दिन येतील...!' २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत ममतादीदींना इथल्या प्रसारमाध्यमांनी भरपूर साथ दिली होती. २०१९ ला मात्र प्रसारमाध्यमांबरोबरच भाजपच्या आयटी सेलनं त्याचा ताबा घेतला होता. आजही तशीच स्थिती आहे. इथं प्रचारयुद्ध सुरू झालंय. भाजपच्या व्यूहरचनेला छेद देणं एखाद्या राष्ट्रीय पक्षाला शक्य असेल पण प्रांतिक पक्षाला हे शक्य नाही. भाजपच्या मेळाव्यात अमित शहा यांनी भाषण करताना, 'ही अस्तित्वाची लढाई आहे. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला अन् देशावर दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य आलं, तशीच वेळ आलेलीय तेंव्हा जागे व्हा, लढ्याला सिद्ध व्हा,...!' असं म्हटलं होतं. पण ती लढाई पंजाबात होती. आज ती बंगालच्या रणभूमीत 'बंगभूमीत' खेळली जातेय. २५० वर्षांपूर्वी प्लासीची लढाई ही हिंदुस्थानचा इतिहास बदलायला कारणीभूत ठरली होती. आता तीच बंगभूमी म्हणजे बंगालमधल्या निवडणुका ह्या नव्या लढाईचं, सत्ता संघर्षाचं कारण ठरलंय. प्लासीच्या युद्धात सिराज उदौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह होते. आताची सत्ता संघर्षाची लढाई ही मुख्यमंत्री अन् प्रधानमंत्री यांच्यात आहे. तृणमूल काँग्रेस अन् भाजप यांच्यात आहे. युद्धाचा प्रकार बदललाय. मैदानही तेच आहे अन् हे युद्धही त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक आहे! निवडणुकीतल्या यशापयश ठरविणाऱ्या या युद्धाचा प्रारंभ झाला तो फक्त १५ पैशाच्या sms पासून! भाजपला आता बंगाल, बंगाली भाषा यावर विशेष प्रेम आल्याचं दिसतंय. प्रधानमंत्री तर बंगालीभाषेतून भाषणाची सुरुवात करताहेत. निर्मला सीतारामन तर रवींद्रनाथ टागोर, बिरसा मुंडा यांची आठवण काढताहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस कुणाचे यावर लढाई सुरू आहे. बंगाली लोक संवेदनशील आहेत. त्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळं भाजपवर 'बाहेरचे' म्हणून टीका केली जातेय. स्थानिक अन् बाहेरचे असा वाद इथंही उदभवलाय. भाजप नेते हे नागपूर, दिल्लीचे म्हणजेच बाहेरचे आहेत. हा मुद्दा तृणमूलनं लावून धरलाय. भावनिक मुद्दयावरची चाल ५६ इंच छातीपेक्षा परिणामकारक ठरतेय. गत १५ वर्षाची अंँटी इन्कनबन्सी असतानाही 'आम्हीच सत्ता जिंकू...!' असं ममतादीदीं म्हणताहेत ! कट्टर शत्रुत्व निर्माण झालेल्या मोदी अन् ममता यांच्यात विलक्षण साम्य आढळतं. मोदी हे सर्वसाधारण कुटुंबातून आलेत. त्यांचे वडील वडनगर रेल्वेस्थानकावर चहा विकत. तिथं नरेंद्र मोदीही चहा विकत असं सांगितलं जातं. संघाचे कर्मठ प्रचारक म्हणून भाजपत ते सक्रिय बनले. महामंत्री म्हणून ख्यातकीर्त झाल्यानं त्यांना गुजरातच्या बाहेर जाणं भाग पडलं. पुन्हा त्यांनी आपल्या बळावर सत्तेच्या राजकारणात येऊन सर्वाधिक लोकप्रिय अन् चर्चित मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलं. स्वतः निर्माण केलेलं गुजरात मॉडेल देशातल्या लोकांपुढे ठेऊन प्रधानमंत्री होण्यापर्यंतची मजल त्यांनी मारलीय. ममतादीदींची पार्श्वभूमी देखील निम्न मध्यमवर्गीय आहे. वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्याचं निधन झाल्यानं कुटुंबाची सारी जबाबदारी ममतादीदींवर आली. त्यांनी दूध विक्रीचा व्यवसाय केला. त्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर ममतांनी मोदींप्रमाणेच परिवाराला, नातेवाईकांना आपल्यापासून, लाईटलाईमपासून दूर ठेवलं. मोदींनी पत्नीचा त्याग करून आपलं जीवन राजकारणाला समर्पित केलंय. ममतादीदी देखील आजीवन अविवाहित राहिल्या. काँग्रेस नेत्या म्हणून त्या डाव्यांच्या विरोधात लढत होत्या. काँग्रेसमधल्या गटबाजीमुळं त्यांची दोनदा पक्षातून हकालपट्टी झाली होती. शेवटी कंटाळून त्यांनी 'तृणमूल काँग्रेस'ची स्थापना केली. डाव्यांच्या विरोधात लढून त्या मुख्यमंत्री बनल्या. मोदी जितके जिद्दी समजले जातात तितक्याच ममता देखील हट्टी असल्याचं दिसून आलंय. मोदी हे त्यांच्या विरोधकांना कधी माफ करत नाहीत. वेळ आली की, त्याचा काटा काढतात. तर ममता या देखील जुनी शत्रूता कायम लक्षांत ठेऊन वागतात. मोदी आपली सत्ता अत्यंत कडक शिस्तीनं राबवतात. तर ममतादीदी हाती हंटर घेऊन सत्ता कशी चालवावी हे चांगलंच जाणतात. दोघांनाही त्यांच्या पक्षांत पर्याय नाही, किंबहुना ते पर्याय तयार होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर ते दोघेही आपापल्या प्रांतात लोकप्रिय आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक असले तरी बंगालमध्ये कधीही संघ, जनसंघ, भाजप यांना पाठिंबा, समर्थन मिळालेलं नाही. तिथल्या लोकांनी स्वीकारलंच नाही. २०१९, २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण करून अमित शहा यांनी जातीय दंगलीचा राजकीय फायदा घेत व्यूहरचना आखली. ममतांनी भाजपचा अश्वमेघ रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. जिथं एक तृण देखील हाती लागत नव्हतं, तिथं नंदनवन फुलण्यासारखं यश आहे असं भाजप नेते समजतात त्यामुळं त्यांनी इथं लक्ष केंद्रीत केलंय. बंगालमधली ही फलद्रूपता पाहून भाजपने इथं गेली १०-१२ वर्षे सतत आक्रमकता कायम ठेवलीय. त्यामुळं मोदी आणि ममतादीदी यांच्यातलं वैमनस्य याकाळात आणखीनच वाढीला लागलंय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट 
*दीदींचं निवडणूक व्यवस्थापन!*
बंगालमध्ये १५ मार्चला विधानसभा निवडणुक जाहीर झाली अन् अवघ्या दोन दिवसातच १७ मार्चला ममता यांनी मित्रपक्षांसाठी तीन जागा सोडून २९४ पैकी सर्व २९१ उमेदवारांची घोषणा केली. भाजप, सी.पी.आय-एम, काँग्रेसनेही उमेदवार जाहीर केलेत. ममता यांनी आधीच उमेदवार निश्चित केले होते. त्या सर्व उमेदवारांना अप्रत्यक्षपणे प्रचार करायलाही सांगितलं होतं. महत्त्वाचं म्हणजे ममता यांनी विद्यमान २१५ आमदारांपैकी ७७ जणांची उमेदवारी कापली. नव्या चेहऱ्यांना संधी दिलीय. साम, दाम, दंड, भेद नीती वापरणाऱ्या दमनकारी भाजपच्या सत्तेसमोर भल्या भल्या रथी-महारथींनी नांग्या टाकल्या तिथं भाजपशी एकांगी लढा देत मोदी, शाह अन् भाजपला जेरीस आणणाऱ्या ममता यांच्या नेतृत्व कौशल्यांमध्ये नक्कीच काहीतरी खास आहे. राजकीय नैिरीक्षकांच्या मते ५ मे २०२६ रोजी ममता बॅनर्जी किमान १८० ते १९० आमदारांसह सत्ता कायम राखतील अन् सलग चौथ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर दिमाखात विराजमान होतील. असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

   

No comments:

Post a Comment

समरांगण वंगभूमीचं...!

"वंगभूमीवर लढलं जाणारं युद्ध हे समुद्रमंथनाप्रमाणे आहे. ज्यातून अमृत अन् विष दोन्ही निघणारं आहे. हे समुद्रमंथन केवळ मोदी अन...