"वैयक्तिक स्वार्थासाठी महात्मा फुले यांचा वापर करणाऱ्या मंडळींनी त्यांचा विचार कधीच गुंडाळून ठेवलाय. सध्याचा काळ हा मोठा विचित्र आहे. जे गाडण्यासारखं आहे ते मिरवलं जातंय आणि मिरवावं ते दडवलं जातंय. दिवसेंदिवस देवाला मानणाऱ्यांची संख्या, देवादिकांचे स्तोम वाढतंच चाललंय. आपण एकीकडं सुधारणेचा आव आणतो तर दुसरीकडं देवाला नवस घालतो, हे ढोंग आहे. अशा ढोंगींकडून सामाजिक सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा समाजाला फुले कळलेच नाहीत. त्यांची बहुजन समाजाची चळवळही कळली नाही. महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाला येत्या शनिवार ११ एप्रिलपासून प्रारंभ होतोय. त्यांनी सनातनी कर्मकांडवाद्यांच्या ब्रह्मकपटाला मुळासकट खणून बुद्धीवादाचा नांगर फिरवला. सत्यशोधनाला धर्माचं अधिष्ठान दिलं. वैश्विक विज्ञान समजून घेण्यासाठी त्यांनी निर्मिक ही संकल्पना मांडली. आज त्यांच्या विचारांची कधी नव्हे इतकी निकड निर्माण झालीय!"
---------------------------------------------------
दरवर्षी ११ एप्रिलला पुण्यात महात्मा जोतीराव फुले यांच्या गंजपेठेतल्या वाड्यावर, स्मृतिस्थळावर म्हणजे समताभूमीवर त्यांच्या भक्तांची वर्दळ असते. येत्या शनिवारपासून कृतिशील समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या 'द्विजन्मशताब्दी वर्षा'ला प्रारंभ होतेय. त्यांनी ज्या मूर्तीभंजन विचाराचा ध्यास आयुष्यभर घेतला, त्याच विचाराला हरताळ फासला जातोय. त्यांच्या मूळ विचारांपासून दूर गेलेल्यांना त्या विचारांची निदान आठवण व्हावी असा या द्विजन्मशताब्दी वर्ष प्रारंभाचा हेतू आहे पण त्याचाच विसर पडलेला. सामाजिक विषमता आणि धर्मांधता विरोधात रान पेटविण्यासाठी सिद्ध व्हायला हवंय अशी स्थिती असताना त्यांच्या विचारांचे पाईक मात्र निद्रिस्तावस्थेतच आहेत. सामाजिक समतेची त्यांची लढाई समाजाची मानसिक उंची वाढविणारी ठरलीय. या समतेच्या लढाईत अस्पृश्यतेची खांडोळी झाली, वर्णाभिमान धुडकावला गेला. जातीयतेला चाप बसला, स्त्रिया स्वयंसिद्ध झाल्या, परंतु हे परिवर्तन हिंदुधर्माचा शक्तिपात करणाऱ्या जातीसंस्थेचा नायनाट करणारं ठरलं नाही. याचं दुःख आहे. कारण जातीअंताची लढाई स्वार्थसाधकांच्या हातात गेल्यानं ती जाती अहंकाराची झाली. विशेष म्हणजे ही लढाई सामाजिक समतेचा आग्रह धरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे घेत लढली जाते, ही मात्र हरामखोरी आहे. ती आता नेत्यांप्रमाणे अनुयायांनीही आत्मसात केलीय. त्या सोंगाढोंगावर तुटून पडण्याचं काम करायला हवंय. भारतीय घटनेनं जातीयता नष्ट करण्याचा आग्रह धरलेलाय. परंतु शासकांनी, राजकारण्यांनी त्याउलट व्यवहार करण्यासाठी जाती संघटनांचा आधार घेतलाय. सत्ता मिळविण्यासाठी, ती टिकविण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली जाती अहंकार माजवलाय. असत्य, अन्याय, भ्रष्टाचार, अपमार यांच्याविरोधासाठीच नव्हे तर सत्याच्या आग्रहासाठी, हक्काच्या, मानाच्या पानासाठीही महाराष्ट्रातली माणसं एकत्र येऊ शकत नाहीत. इतकी जाती, प्रदेश, पक्ष अहंकारात तुटलेली, फुटलेली आहेत. या स्वार्थी तुटीफुटीवर प्रकाश टाकावा, अवघा समाज एकवटावा या अपेक्षेनं सामाजिक कार्य फुले यांना मानणाऱ्यांकडून व्हायला हवंय. जातीयतेचा नायनाट करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी आपल्या आयुष्याची राख केली. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी ती विभूती मानली. पुरोगाम्यांकडे सामाजिक समतेचं चांगलं बियाणं होतं, पण ते त्यांनी आपसातल्या भांडणात रुजण्यापूर्वीच सडवलं म्हणूनच जातीयवादी पक्ष-संघटनांचे निवडुंग आज फोफावलंय. आत्मनाशी अन् कार्यनाशी यात फरक करणाऱ्यांची गरज नाही. जातीचा अहंकार अन् अस्मिता हुंडारत हुंदडणारे सगळेच मनुवादी आहेत. स्वार्थासाठी त्यांना मनुनं केलेली जातीय मांडणी हवीच असते. "ब्राह्मणांचा बडेजाव, मराठापणाचा माज, बहुजनांची बनेल बलुतेदारी, दलितत्वाची दळभद्री दडपणं या साऱ्याची निर्मिती मनुवादाच्या आधारात आहे. ज्यांना हा आधार नको त्यांना पांचवा वर्ण आहे. चारही वर्णांना धिक्कारणारा, गुणवंतांना योग्यवेळी संधी आणि गरजवंताला योग्यवेळी सहाय्य हेच लोकशाहीचं अर्थात स्वराज्याचं आद्य अन् अंतिम कर्तव्य आहे असं मानणारा पाचवा वर्ण आहे....!" एखादी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली वा देवाधर्माच्या नावानं कुणी नंगानाच सुरू केला की, पुरोगामी विचारवंत आणि नेत्यांना इथल्या संस्कृतीची आणि प्रबोधनाच्या चळवळीची पार्श्वभूमी हमखास आठवते. मग त्यावर भाष्य करताना ते, "या फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात...!" अशी सुरुवात करून आपलं मत मांडतात. 'फुले-शाहू-आंबेडकर' हा आताशी महाराष्ट्रात परवलीचा शब्द झालाय. डॉ.आंबेडकर यांनी, 'माझ्या वैचारिक जडण-घडणीसाठी बुद्ध, कबीर आणि फुले यांचा विचार प्रेरणादायी ठरला; त्यांना मी गुरू मानतो...!' असं जाहीरपणे सांगितलंय. हे तीनही महापुरुष त्यांच्या जातीचे नव्हते, तसंच, या तिघांना त्यांनी कधी पाहिलंही नव्हतं. म्हणजे, प्रत्यक्षपणे त्यांच्यात गुरु-शिष्य संबंध प्रस्थापित झाले नव्हते. तरीही त्यांनी या तीन महापुरुषांना आपल्या गुरुस्थानी मानलं, यामागे जी भूमिका होती, ती समजून घेतली पाहिजे. सत्य तोच धर्म करावा कायम। मानावा आराम। सर्वाठायी।मानवांचा धर्म, सत्य हीच नीती। बाकीची कुनीती। जोती म्हणे।। यासारख्या अखंडातून महात्मा फुलेंचं हे विचारवैभव उपलब्ध आहे. द्विजन्मशताब्दी वर्ष प्रारंभा निमित्तानं त्यांचे विचार स्वीकारणं, रुजवणं, वाढवणं, मानव्याला जे अनिष्ट ते नष्ट करण्यासाठी त्याचा वापर करणं हाच फुले यांच्या विचारांचा सार्थ गौरव आहे. याची जाणीव खरं तर व्हायला हवी, महात्मा फुले यांच्या निवासस्थानी समताभूमीवर जमणारी गर्दी दांभिकपणा स्पष्ट करणारीच जाणवते. समाजाला जसे फुले कळले नाहीत. तशी त्यांची बहुजन समाजाची चळवळही कळली नाही. कारण 'बहुजन' या शब्दाचा अर्थच आपल्याला कळलेला नाही. काहींनी 'बहुजन' म्हणजे मराठा असा सोयीस्कर अर्थ लावून फुले अन् त्यांच्या चळवळींचा आपल्या सोयीसाठी, स्वार्थासाठी, राजकारणात तरून जाण्यासाठी वापर करून घेतलाय. त्यांना राजकारणाची, आपल्या जातीची, स्वार्थाची चिंता आहे. मात्र जोतिरावांच्या विचारांचं त्यांना सोयर सुतक नाही. वास्तविक फुले विचार हा तळागाळाच्या माणसांनाच नव्हे तर, राष्ट्राला समर्थ बनवणारा आहे. अनेक सामाजिक विकासाची बीजे ही फुले यांच्या सामाजिक क्रान्तीत आहेत. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, आरोग्यविषयक सेवाकार्य, सामाजिक-आर्थिक समानता, श्रममूल्यांचा पुरस्कार यासारखे अनेक उत्क्रांतीकारक विषय फुले यांच्या विचारात सामावलेलेत. सामाजिक सुधारणांचे निर्णय सरकार घेतं, तेव्हा त्यावेळी होणाऱ्या चर्चेचं दुसरं टोक हे फुले विचारांपर्यंत असतं. त्यांचे विचार पेलवण्याचं आणि समाजाच्या, सत्ताधीशांच्या गळी उतरवण्याचं सामर्थ्य केवळ छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलं. फुले यांच्या निधनानंतर क्षीण झालेली सत्यशोधक समाजाची चळवळ शाहू महाराजांनी समर्थ केली. अतिरेकी शिवराळपणामुळं ही चळवळ ब्राह्मण्याकडून ब्राह्मणांकडं सरकली, अन् ती चळवळ ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात फसली. या मोडीत निघालेल्या चळवळीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला जोतीराव फुले यांचे अनुयायी मानल्यामुळं जीवनदानाबरोबरच व्यापकता मिळाली. आज या चळवळीची आणि फुले यांच्या विचारांची, खुद्द जोतिरावांनी ज्यांच्या उद्धारासाठी सपत्निक शेणधोंड्याचा मार खाल्ला. त्या बहुजनांनी तरी काय पत्रास ठेवलीय? फुले विचारांनी अनेकजण घडले. ते स्वतः समाजसुधारकच नव्हते तर त्यांच्या कृतिशील विचारांनी असंख्य सुधारक घडवले. फुले यांच्या विचारांनी सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या अनेकांची सामाजिक परिवर्तनाच्या ऐतिहासीक कार्याची प्रेरणा जोतिराव फुलेंचे विचार हीच होती. या साऱ्यांनी फुले यांच्या विचाराचं ऋण जाहीरपणे मानलं होतं. शुद्रातिशूद्र माणसाच्या उन्नतीचा, त्यांच्या सन्मानाचा विचार फुले यांनी सांगितला त्यासाठी समाजाला धर्मकर्मकांडात घोळवून फसवणाऱ्या पोटभरुवृत्तीचा त्यांनी तडाखेबंद समाचार घेतला. सामाजिक समानते बरोबरच स्त्रीशिक्षणाचा पुरस्कारही केला. फुले यांनी हा विचार कृतीत आणण्यासाठी या व्यापात आपल्या कुटुंबियांनाही गुंतवलं. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या विचाराला कृतीत आणण्याचं काम अगदी मनापासून केलं. जीवघेणे हल्ले सोसले. पण त्या हटल्या नाहीत. महात्मा फुले यांच्या निधनानंतर इतकी वर्षे लोटली, पण तरीही सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात त्यांचे विचार आपले सर्वश्रेष्ठत्व टिकवून आहे. हा महात्मा फुले यांच्या समर्थ विचारांचा गौरव असला तरी, सामाजिकदृष्ट्या ते लांच्छन आहे. कारण फुले यांच्या विचारांचा आधार वाटू नये, अशी सामाजिक स्थिती अजून निर्माण झालेली नाही. किंबहुना यांच्याच विचारांची आवश्यकता तीव्रपणे जाणवतेय. दलित वस्त्या बळकट झाल्यात. स्त्रिया सुशिक्षित होऊ लागल्या, कमावत्या झाल्या तरी, बहुतांश संसारात त्यांचं स्थान अद्यापही दुय्यम आहे. स्त्री अजूनही उपभोगाची वस्तू आहे, अशीच भावना समाजात आहे. देवळं वाढलीत, त्याच्यासमोर रांगाही वाढल्यात. अधिक लांबल्यात. अफरातफर व्हावी इतका गल्ला जमू लागलाय. हे सारं चित्र पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात दिसतंय. तरी देखील फुले यांचं नांव घेऊन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. फुले विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनीही आपली वागणूक बदललीय. फुले नावाचा डिमडिम वाजवत आपला स्वार्थ साधण्यातच ते धन्यता मानू लागलेत. सदासर्वदा त्यांचेच नांव घेऊन, त्यांच्याच विचाराला हरताळ फासणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी फुले यांच्या विचारांचा पराभव केलाय. त्यांनी वाईट म्हणून ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या गाडण्याऐवजी त्या डोक्यावर घेऊन मिरवण्यातच धन्यता मानताहेत. हे सारं बदलण्यासाठी त्यांचे विचारच समर्थ आहेत. यासाठी हवी केवळ जिद्द आणि इच्छा.!
माणूसपण गमावलेल्या माणसात जो आत्मविश्वास, स्वाभिमान फुले यांनी जागवला तसा आत्मविश्वास, स्वाभिमान पुन्हा जागवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. फुले यांनी ज्या त्वेषाने अन्यायाला टकरावर टकरा देऊन समानतेचं वारं समाजात खेळतं ठेवलं ती तडफ लोकांत निर्माण होईल असं वातावरण जाणीवपूर्वक ठेवण्याचं भान आपण दाखवलं पाहिजे. पुरोगामी विचारात जनआंदोलन उभं करण्याची ताकद आहे. "रामकृष्णांना रथात घालून भाजपेयींनी दौड केली. शिवाजी महाराजांना शिवसेनेच्या मावळ्यांनी कडेकोट किल्ल्यात ठेवलंय. आंबेडकरांना दलित दुसऱ्या कुणाच्या हाती लागू देत नाहीत. महात्मा गांधींना आपण कधीच 'हे राम' म्हणायला लावलंय...!" आता आधार केवळ या विचारांचाच आहे. कर्मकांडाच्या, पुरोहितशाहीच्या, जन्माधिष्ठित उच्च नीचतेच्या, विषमतेच्या चक्रव्यूहात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नावानं कुणी समाजाला गुंतवू बघत असेल तर त्याचा प्राणपणानं मुकाबला करण्याची तयारी पुरोगामी विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना करावीच लागेल. समाजवादानं उन्नत अन् समृद्ध समाजाचं स्वप्न दिलंय. महाराष्ट्र हा राष्ट्रवाद आणि मानवी समता या दोन्हीमध्ये या देशाला मार्गदर्शक ठरेल असं मानलं जात होतं. महात्मा जोतिबा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, सुधारकाचार्य गोपाळराव आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, आचार्य जावडेकर, या सगळ्यांनी मराठी माणसाला रूढी-परंपरा-कर्मकांड यांच्या फेऱ्यातून बाहेर आणलं. जन्माधिष्ठित उच्चनीचतेचा अहंगंड सुटावा, माणसांमाणसात बंधुभाव जागावा म्हणून आयुष्यभर या सर्वांनी जे प्रयत्न केले त्यामुळेच अठरापगड जातीतल्या शतकानुशतके मुकाट दबून आला दिवस ढकलत जगणाऱ्या लोकांना खरोखरच जाग आली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगाव शिक्षणाची ज्योत नेली. महर्षी कर्वे यांनी स्त्रीला हिंमत दिली. लोकांच्या उद्धाराचा ठेका परमेश्वराने आपल्यालाच दिलाय अशा गुर्मीत जगणारे आणि वर्णवर्चस्वाचा प्रत्यय पावलोपावली देणारे एकाकी पडत गेले. आपण माणूस आहोत, या समाजाच्या जडणघडणीत आपलाही वाटा आहे, आपले काही हक्क आहेत, आपण एकजुटीने आपले हक्क मिळवू शकतो, विकास साधू शकतो, त्यासाठी कुणाच्या परवानगीची कुणाच्या कृपेची आवश्यकता नाही हा विश्वास सर्वत्र आला. महाराष्ट्राच्या राजकारणावर, सामाजिक व्यवहारावर याचा फार मोठा परिणाम झाला. विसाव्या शतकात समाजवादी विचार लोकप्रिय झाले. महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करत केलेला कारभार, समाजवादाला नकार देत जनतेच्या सहभागावर अन् विकेंद्रीकरणावर भर देणारे पक्ष, ही समाजवादाचीच वेगवेगळी रूपं आहेत; कारण फुले यांच्या विचारानं देशांत कार्यरत असणाऱ्या लोकांना एका उन्नत, समृद्ध समाजाची स्थापना करण्याचं स्वप्न दिलंय, याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवायला हवीय.
- हरीश केंची,
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment