Thursday, 25 June 2026

"सत्तातुराणां न भयं न लज्जा"

"आज निष्ठा, गद्दारी, पक्ष, नेतृत्वाची, मतदारांची फसवणूक याहीपेक्षा सर्वात गंभीर एक मुद्दा आहे ज्याची फार चर्चा होत नाहीये. त्यात सर्वांत मोठा खलनायक 'मतदार' देखील आहे. हजार - दोन हजारांसाठी मतं विकणाऱ्यांनी लोकशाही संकटात आणलीय. राजकारणाला, राजकारण्यांना अवास्तव महत्व देतोय, त्यांना राजा मानतोय. मानसिक गुलामगिरीत राहायची सवय झालीय, त्यामुळे त्यांना दररोज कोणी ना कोणी मसीहा पाहिजे असतो, भले त्याने अन्याय-अत्याचार करो. अशा मानसिकतेच्या प्रजेकडून फार प्रगल्भतेची अपेक्षा ही करणे योग्य नाही. दिशा दाखवण्याचं काम राज्यकर्त्यांवर सोडणं ही सर्वांत मोठी चूक आहे. यातून निम्न दर्जाचे राज्यकर्ते जन्माला आले, आज याचमुळे देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक-शैक्षणिक-राजकीय पातळ्यांवर देश रसातळाला जातोय. सध्याच्या राजकीय व्यवस्थेतून देशाच्या भवितव्याचा सर्वनाश झाल्याशिवाय यातून सुटका नाही, पुनःनिर्माण शक्य नाही. जेव्हा मस्तवाल हत्तीच्या गंडस्थळावर हल्ला करायचा असतो. तेव्हा लोकं इकडे तिकडे हल्ला करण्याचा दिखावा करतात, फिक्सींग आहे. सर्व यंत्रणांचं साटंलोटं झालंय, त्यामुळे एकमेकांवर अंकुश ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या लोकशाहीची सर्व आयुधं निष्प्रभ ठरलीत!"
..............................................
*"का*मातुराणां न भयं न लज्जा" असं एक संस्कृत सुभाषित आहे. लैंगिक वासनेने पछाडलेल्या व्यक्तीला दुसऱ्याची भीती नसते अन् स्वतःला स्वतःची लाजही वाटत नसते, असा त्या सुभाषिताचा अर्थ होतो. लैंगिक आकर्षण अन् सत्तेचे आकर्षण या दोन्ही समान गोष्टी आहेत. राजसत्तेचं सध्या जे सुरू आहे ते लोकशाही तत्वाशी विसंगत आहे. सत्य नागडं असते. सत्य कटू असतं. पण सत्याकडं दुर्लक्ष करून आत्मवंचनेत जगणाऱ्यांना सत्य माफ करत नसते. 'सत्तातुराणां न भयं न लज्जा' या सुभाषितचं स्मरण फुटणारे विरोधक आणि फोडणारे सत्ताधारी या दोघांनी करावं असं मला वाटतं. विरोधी पक्ष फोडून त्याला सत्तेत सामावून घेणं, विरोधी पक्ष फोडून दोन विरोधक निर्माण करणं, एकच विरोधी पक्ष केंद्रात अन् राज्यात दोन वेगवेगळ्या प्रकारे फोडणं, एकच पक्ष दोनदा फोडणं, विरोधी पक्षच मॅनेज करणं इत्यादी जे सर्व अशक्य आहे ते राजसत्तेनं शक्य करून दाखवलंय. घराच्या राखणदारांना वश केलं की भुरटे चोर घरफोडी करतात. तशाप्रकारे निवडणूक आयोग, न्यायपालिका, नोकरशाही, संविधात्मक संस्था या लोकशाहीचे राखणदार आहेत. राजसत्तेनं त्यांनाच ताब्यात घेतलंय. त्यामुळे लोकशाहीची स्थिती 'बडा घर, पोकळ वासा' अशी झालीय. आजी-माजी सरन्यायाधीश याला जबाबदार आहेत. सत्ताधारी राजकीय पक्ष फोडत जातात. मेनस्ट्रीम मीडिया त्याला 'ऑपरेशन टायगर' सारखी नावं देऊन उदात्तीकरण करतात. ते तरी काय करतील म्हणा. त्यांच्या मालकांनी त्यांच्या संस्थांना पत्रकारितेतून फोडून कधीच सत्ताधाऱ्यांचे भाट बनवलंय. स्वतःचे अजेंडे राबवण्यासाठी, राक्षसी बहुमतासाठी शासकीय संस्थांचा वापर करून सतत निवडणुका मॅनेज करायच्या नंतर, विरोधी पक्षांचे, त्यांच्या नेत्यांचे वीिकास निधी बंद करायचं, पक्ष सरळ सरळ फोडायचं, त्यासाठी ईडी, आयकर विभाग, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, या सगळ्याचा निर्लज्जपणे वापर करायचा, हे सगळं करून अंधभक्त म्हणणार, हे सगळं देशाच्या भल्यासाठी होतंय! एवढं करून सगळे लोकं विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच दूषणं देत बसणार. उद्धव संपला, पवार संपले, ममता संपली! हे काही ऑर्गॅनिकली संपलेले नाहीयेत, त्यांना रीतसर संपवण्यात आलंय. कितीही भ्रष्टाचार असला, तरी एवढा मोठा, वैविध्यपूर्ण देश हा या देशाच्या लोकशाही संस्था, राष्ट्रीय आणि तेवढेच महत्त्वाचे असलेले प्रादेशिक पक्ष, राज्यांना असलेले हक्क, स्वायत्तता, शक्य तेवढ्या मुक्त निवडणुका, केंद्रात सत्ता असलेल्यांना प्रश्न विचारण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध यंत्रणा, यामुळं आजवर टिकलाय. आज राजसत्ता हीच व्यवस्था संपवायला निघालीय. यामुळं आता यापुढं याचे जे काही परिणाम होतील, ते फक्त विरोधकांनाच नाही, तर वाट्टेल तशी मनमानी करू इच्छिणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनासुद्धा भोगावे लागणार आहेत, हे कोणी आणि कसं सांगायचं? 
*आम्ही मूर्ख झालोत. अंध झालोत...!*
देशात अशी परिस्थिती असताना लोकभावना थंड, निपचित हाोऊन पडल्यात. कारण आम्ही जन्माला घातलेला मुलगा बदमाश निघू शकतो, पण आम्ही निवडलेली सरकारं बदमाश निघूच शकत नाहीत, अशी मतदारांची मानसिक स्थिती बनलीय. विविध साम्राज्यांच्या आक्रमणातून, करोडो लोकांच्या आत्म बलिदानातून, हजारोंच्या आंदोलनातून, त्यांनी  केलेल्या शिस्तबद्ध विरोधातून, धर्मनिरपेक्षतेच्या गाजावाजानं, लोकशाहीच्या मिरवणुकीनं, संविधानाच्या मार्गावर दिमाखदार तोऱ्यात उभा झालेला आमचा देश, विकला गेला! आता कुठं विकासाची स्वप्नं हा देश आतुरतेनं पाहू लागला होता, करोडो रोजगाराच्या गोतावळ्यात गुंतून राहणारा, पाठीवर दणके मारून शाळेत पाठविणारा, शिक्षणानं मुलं घडविणारा, नोकरी लागल्यावर आई वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहणारा, अर्थव्यवस्थेला सातासमुद्रापार नेण्याचं स्वप्न पाहणारा, रुपयाला डाॅलरच्या शर्यतीत जिंकवणार म्हणणारा, पाच वर्षांत बँकेत पैसे डबल करणारा, देश हा आमचा! आमची बैलं रडतात, त्यांना विकल्यावर! मालकही रडतो, पैसे हातात घेतल्यावर! पण राजकारणी मिरवतात देश विकल्यावर! शेतकरी शेतीत हरला, तर आत्महत्या करतो! पण राजकारणी निवडणूक हरला तर ते आत्महत्या करत नाही! शेतकरी मेला तर, त्याची पोरं उघड्यावर पडतात अन् राजकारणी मेला तर, त्याची पोरं सहानुभूतीच्या लाटेनं आपोआप निवडून येतात! हा टोकाचा विरोधाभास समजण्याला आम्ही घेतलेलं शिक्षण कामी आलं नाही, याची लाज वाटूनही,आम्ही निर्लज्जपणे गप्प बसलो.पण आम्ही तरी काय करू? आम्ही व्यसनी झालोत, अगदी दारूड्यासारखा! अचानक असंख्याना धर्माचं व्यसन लावलं गेलंय, आम्हाला अचानक धर्म... धर्म... असा खेळ आवडायला लागलाय, दुसऱ्या धर्माचा राग यायला लागलाय, न दिसणारा ईश्वर आता आपला वाटायला लागलाय, झेंड्याच्या रंगात आपलेपणा वाटायला लागलाय, अचानक पक्ष आवडायला लागलाय, कधी नव्हे तो आज माईकवर विश्वास बसायला लागलाय, सरकारनं सांगितलेल्या समस्या, आपल्या वाटायला लागल्यात, सरकारचं सर्वच काही पटायला लागलंय, सरकार जसं म्हणेल तसं करायला आनंद वाटायला लागलाय, देशातल्या पत्रकारांवर विश्वास बसायला लागलाय, विरोधक मूर्ख वाटायला लागलेत, पक्षाचा मानसिक गुलाम म्हणून मिरवायला आम्हाला गर्व वाटायला लागलाय, प्रश्न विचारणारा तुच्छ वाटायला लागलाय!
*प्रश्न विचारण्याची हिंमत, धाडस नाही*
सनातन शिक्षणात इतकी ताकद असेल तर, मग परकीय विद्यापीठे इथं सुरु कशाला आहेत? शिक्षण जर मुलभूत हक्क आहे तर, मग शाळा बंद कशाला होताहेत? नोकऱ्या जर विकास करतात तर, मग ते त्याचे खाजगीकरण कशाला? रेल्वे जर आमच्या पैशानं बनलीय तर मग, डबे अदानीचे कशाला? भ्रष्टाचार संपणार म्हणे मग, नोटबंदी कशाला केलीत? ''We the people...!'' हे जर आपलं पहिलं वाक्य असेल तर, मग धर्म कशाला? सत्ता जर बहुजनांची चाबी असेल तर, निवडणुकीत भांडवलशाहीचं कुलूप कशाला लावायचं? विरोध जर लोकशाहीचं ब्रह्मास्त्र असेल तर, विरोधासाठी झेंडे कशाला हवेत? रस्ता आमच्याच पैशातून बांधलाय ना मग, त्यावरून जाण्यासाठी पुन्हा पैसे, टोल कशाला? पोट भरण्यासाठी आम्ही धडपडतोय, मेहनत करतोय मग, ५ किलो धान्य फुकट कशाला? आत्मनिर्भर भारताचं स्वप्न दाखवून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर ६ हजार रूपयांचं उपकार कशाला? भांडवलदार मित्रांचं बुडीत कर्जे गरीबांच्या अकांऊटमधून का कापताय? आम्ही कर्ज घेत नाही मग आमच्या उरावर देशाचं कर्ज कशाला? असे कितीतरी प्रश्न समोर असतांनाही, आम्ही सरकारची थोरवी गात राहिलो. आम्ही सुद्धा चलाक आहोत, आम्हाला  सोयीच्या गोष्टी पटकन पटतात, ज्याठिकाणी आम्हाला आमचं शिक्षण वापरणं गरजेचं असतं, त्याठिकाणी आम्ही हमखास पळ काढतो, आमच्या जातीशी, समाजाशी संबंधित प्रत्येक गोष्ट आम्ही अनुकरणाने पाळतो, यामध्ये तर्काचा वापर करत नाही, आम्ही निवडलेल्या सरकारनं शेण जरी खाल्लं तरी, ते का खाल्लं? हे पटविण्यात आम्ही आमची शक्ती पणाला लावतो, आमच्या पक्षाचा झेंडा दुसऱ्या झेंड्यापेक्षा श्रेष्ठ वाटायला लागलाय, धार्मिक टोळीत सक्रिय राहण्यात मजा वाटायला लागलीय, चुकीचा इतिहास जरी आमच्या ताटात वाढला गेला तरी, त्याचे घास आमच्या मेंदूत भरण्यात आम्हाला मजा वाटायला लागलीय, भारत भविष्यात महान होणार आहे! असं आमच्यावर, आम्ही निवडलेली सरकारं बिंबवत आहेत, पण तो कसा महान करणार आहात? हे विचारण्याची तिळभरही हिंमत, धाडस नाही, विकासाच्या गोष्टी माईकवर ऐकून रात्री झोप यायला लागलीय, याच धार्मिक झोपेत झोपूनच राहिलो! एक काळ असाही होता विमानतळे, रेल्वे, बॅका, इन्शुरन्स, बंदरे, विद्यापीठे, मोबाईल सेवा, संरक्षण क्षेत्र, खाणी, वीज आणि इतर आमच्याच होत्या, या क्षेत्रातल्या नोकऱ्या आमच्याच होत्या, पण त्या आता नाहीत. का नाहीत? हे विचारण्याचं धाडस आता आमच्यात नाही. कारण दुसऱ्याला चूक म्हणायला! शिक्षणाचा वापर करावा लागतो, जे आता आम्ही विसरलोय. एरव्ही आमच्या शेजाऱ्यानं जर दोन इंच कांपाऊंड वॉल इकडं आणला तर, आम्ही कुऱ्हाड घेऊन उभा होतो. पण सरकारनं आमचं सर्वच विकलं तरी, आम्ही नुसता मूुर्खासारखे बघत बसतोय कारण सरकार आम्ही निवडलेलं आहे म्हणून! की आमची आणि सर्वांची यात फसगत आहे म्हणून! 
*आम्ही आता मुके झालोत..!* 
आमच्या मुकेपणाचा फायदा घेऊन, आमचा देश ढोल ताशाच्या धार्मिक मिरवणुकीत विकून टाकला जातोय अन् आम्ही बघत बसलोय.! खरं सांगायचं तर! आम्ही आता नपुंसक झालोत. षंढ झालोत, आमच्या मनगटात दम राहीलेला नाही. लढाई सोडाच! साधं विरोधात अन् समाजाच्या भल्यासाठी बोलायची आमच्यात हिंमत नाही. वेळ तर अजिबातच नाही. धर्माच्या सुयांनी पार पोखरला गेलोत आम्ही, आम्हाला आता देवदूताचे स्वप्न पडायला लागलेत, कुणीतरी येईल अन् आमचे आयुष्य सफल करेल इतका आम्ही फिल्मी झालोय! आमच्या महामानवांनी जी लोकशाही रूजवली, ती कशी टिकवायची? त्याचा सिलॅबस आता जातोय याची काळजी नाही. आता आम्ही लक्झरी लाईफ जगतोय त्यामुळे दुसऱ्यांवरचा अन्याय काल्पनिक वाटायला लागलाय, आमचे सातबारे, बॅक बॅलेंस बघून देशाचा विकास होतोय आणि दुसऱ्यांना पिवळं रेशन कार्ड मिळतोय यातला विरोधाभास आम्हाला हुकूमशाही वाटत नाही, किमती वाढताहेत, पण आम्ही श्रीमंत असल्यानं आम्हाला उपभोग घेता येतोय. तिकडे काहींना ताप आल्यावर बचत गटातून कर्ज काढावं लागतंय, या कृतीचा आजकाल फरक पडत नाही, गरीबी ही गरीबांच्या कर्तृत्वानं मिळालीय, अश्या मतांचे आता आम्ही झालोत, आमची चारचाकी आम्ही सुसाट पळवतोय पण काहींची पायपीट ही पिढीजात असायला हवी इतके आम्ही आज श्रेष्ठ झालोत, या सर्व विरोधाभासांचा आता आमच्यावर फरक पडत नाही आता उद्या नद्या, नाले, जंगलं, डोंगर, पहाड, धरणं, आमची अंगणं, रस्ते, वन्यजीव, पक्षी सुध्दा विका आणि कमीच पडले तर आमच्या किडण्या, डोळे आणि आतड्या सुध्दा विका, पण धर्माला धोक्याच्या बाहेर काढा, इकडं मुलांचं भविष्य पिढ्यांपासून धोक्यात राहीलं तरी चालेल, पण त्या धर्माला धोक्याबाहेर काढा. कारण तो धर्म धोक्यात आलाय. आम्हाला धोक्याची सवय झालीय मात्र धर्माला धोक्याची सवय नाही. तो घाबरेल, दचकेल कदाचित बदला म्हणून तोच तुमच्या जीवावर आज नाही उद्या उठेल. आमच्या पिढ्या आणखी अंधारात जगतील, पण गैरसोय नको म्हणून धर्माला सदैव जगवतील. असाच देश विकत राहा, आम्ही असाच धर्म जागवत राहू आणि उद्या एकमेकांना कापून खाऊ..!
*अस्थैर्याचं आणि अविश्वासाचं वातावरण*
'ही सृष्टी माणसाची गरज भागवू शकते, पण लोभ नाही....!'  ‘तुंबाड’ या चित्रपटातला हा एक संवाद आज २०२६ मध्येही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय सद्यस्थितीला जसाच्या तसा लागू पडतो. आज जेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या महाराष्ट्राकडे पाहतो, तेव्हा तुंबाडचा हाच संदेश थेट डोळ्यासमोर उभा राहतो. चित्रपटाचा नायक विनायक राव हस्तरच्या खजिन्यातून सोन्याची नाणी काढत राहतो. त्याची भूक कधीच संपत नाही आणि शेवटी हाच अतिलोभ त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरतो. आज आपल्या महाराष्ट्रात डोकावून पाहिलं, तर प्रत्येक क्षेत्रात एक 'विनायक राव' दडलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे अस्थैर्याचं आणि अविश्वासाचं वातावरण आहे, त्यामागेही सत्तेचा आणि पैशाचा अतिलोभच आहे. तत्त्व, निष्ठा आणि विचारधारा बाजूला सारून फक्त 'सत्ता आणि संपत्ती' या एकाच गोष्टीच्या मागे धावणारी व्यवस्था आज आपण पाहत आहोत. नैतिकतेचा बळी देऊन 'शॉर्टकट'ने श्रीमंत आणि शक्तिशाली होण्याची चढाओढ समाजात लागली आहे. आपल्याला आपल्या 'गरजा' आणि 'लोभ' यातील पुसटशी रेषा ओळखता आली पाहिजे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९.



No comments:

Post a Comment

राजकारण लई वंगाळ झालंय...!

"ज्याची निष्ठा मूल्यांशी नसते, पैशाशी असते; तो केवळ पक्षाशीच नव्हे तर राष्ट्राशीही गद्दारी करू शकतो! गद्दारी ही...