"देशाचं भवितव्य ज्या पिढीच्या खांद्यावर आहे ती पिढी अस्वस्थ बनलीय. त्यांना सांभाळण्याऐवजी त्यांची अवहेलना, टिंगल करण्यातच सत्ताधारी लोक धन्यता मानताहेत. नीट पेपरफुटी, सीबीएससी आणि इतर केंद्रीय परीक्षेतला सावळागोंधळ प्रशासनाने सावरायला हवा होता, पण त्यांना पाठीशी घातलं गेलं. विद्यार्थ्यांनाच या केंद्रीय परीक्षांमधला फोलपणा उघड करावा लागला. एकीकडे सत्ताधारी पक्षाला एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकण्याचा सोस लागलाय, तर दुसरीकडं नोकऱ्या उपलब्ध नाहीत, बेरोजगारी, महागाई भडकलीय, आर्थिक अस्थिरता निर्माण झालीय. परराष्ट्र धोरण कचखाऊ बनलंय. देशातले विरोधक क्षीण झालेत, लढण्याची उर्मीच राहिलेली नाही. कोणी नेता पुढं येईल असं वातावरण नाही. अशावेळी अस्वस्थ तरुण मोबाईलवर समाज माध्यमातून पुढं येताहेत. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ही स्थिती सावरण्यासाठी इथं अस्थिरता निर्माण होणार नाही ही जबाबदारी केवळ सरकार, विरोधकांची नाही तर तुमची आमची सर्वांची आहे!"
...........................................................
*आ*जच्या या लेखाचा मथळा मुद्दाम हिंदीतून दिलाय. राष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या जेन-झी तरुणांच्या जनजागरणासाठी 'अंगडाई' शिवाय दुसरा कोणताच शब्द साकार होत नाहीये. 'अंगडाई' या हिंदी शब्दाचा अर्थ मराठीत 'सुप्तावस्थेचा त्याग करून म्हणजेच झोपेतून जागे होत, शरीराला आळोखे पिळोखे देत आळस झटकून परिवर्तनाच्या आकांक्षेसाठी सज्ज होणं वा कार्यरत होणं....!' असा आहे. आज अगदी तशाच प्रकारे देशातला जेन-झी तरुण जागा झालाय, अन् अन्यायाविरोधात एकवटतोय. काल शनिवारी सहा जूनला तथाकथित कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून दिल्लीत डेरे दाखल झाला. सरकारने कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं आंदोलन कसं हाताळलं, हे आपण पाहीलं. मोबाईलवर विविध समाज माध्यमांतून अभिजित दिपकेच्या मुलाखती पाहिल्या, त्याची भूमिका ही आशा निर्माण करणारी आहे. त्यांचा शांततामय आणि लोकशाही मार्गावर विश्वास दिसतो आहे. त्यामुळे सरकारने परवानगी नाकारण्याचं कारणच नव्हतं. कारण सध्याचं सरकार हे देखील अशाच प्रकारच्या एका टप्प्यावर अण्णा हजारे यांच्या उत्स्फूर्त आंदोलनातून पुढं आलेलंय. पण तेंव्हा देशात किमान साधनशुचिता असलेली माणसं सत्तेत होती. राजीनामा देणं, ही नैतिकता तेव्हा मानली जात होती. मात्र आता तशी परिस्थिती नाही. नुसत्या राजीनामा देण्यामुळे प्रश्न सुटणारे नाहीत. पण भ्रष्टाचारी नेत्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करणं म्हणजे लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. तशी सध्याच्या भारतातल्या लोकशाहीच्या जिवंतपणाचीच ही परीक्षा आहे. लोकशाहीत अशा परीक्षेचे परीक्षक सामान्य लोक असतात, त्यादृष्टीने काल शनिवारी सहा जून रोजी ही प्रतिकात्मकदृष्ट्या परीक्षेची तारीख होती. ही परीक्षा नीटपणे झाली.
अभिजित दिपकेला या सगळ्या परिस्थितीचं भान आहे. आजचे सत्ताधारी पक्ष केवळ हिंदू-मुस्लीम मुद्द्यांवरून लोकांच्या भावना कशा वापरतात आणि त्या आड सर्व प्रकारचं अपयश झाकण्याचं प्रयत्न कशाप्रकारे करतात, याची तपशीलवार माहिती त्याने मुलाखतीत सांगितलीय. त्याचा आता भारतातल्या विवेकनिष्ठ तरुणांच्या अहिंसक लढ्यावर विश्वास आहे. त्याने त्याच्या या आंदोलनाच्या प्रेरणाही सांगितल्यात. महात्मा गांधी यांच्या नि:शस्त्र लढ्याने या देशाला स्वातंत्र्य मिळालं. सर्व मतभेद विसरून सामान्य लोक त्या लढ्यात सहभागी झाले होते, हे तो वारंवार सांगत होता. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या विषमतेविरुद्धच्या लढ्यामुळेच तो स्वत: अमेरिकेपर्यंत जाऊन शिक्षण घेऊ शकला. त्यांच्याच वैचारिक बांधणीमुळे आजही देशात लोकशाही व्यवस्था मजबूत आहे, असं तो सांगतो. पंडित नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळेच स्वतंत्र भारत शून्यातून उभा राहू शकला, याचीही त्याने आठवण करून दिलीय. थोडक्यात, वयाने तरुण असूनही त्याची सध्याच्या राष्ट्रीय, सामाजिक-आर्थिक-राजकीय समस्येकडं पाहण्याची दृष्टी फार व्यापक आहे. तो कुठंही हवेत नाही. किंवा हवेतल्या क्रांतीचं स्वप्न त्याच्या डोक्यात नाही. त्याच्या आंदोलनाच्या मागे कोणाची रसद आहे का? या प्रश्नाचंही त्याने नीटपणे उत्तर दिलंय. केवळ व्यंग म्हणून सोशल मीडियावर उभं केलेल्या या पार्टीवर देशातल्या तरुणांनी अचानक वास्तवातली जबाबदारी टाकली आणि त्यानेही ही जबाबदारी डोळसपणे स्वीकारलीय, यासाठी त्याचं कौतुक करावंसं वाटतं अन् आपण देखील नवनिर्माणासाठी
त्याच्या पाठीशी असलं पाहिजे, असं मला वाटतं.
दुसरीकडं तरुणांच्या कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा जोरात सुरू असताना मला मात्र वेदांत श्रीवास्तव, सार्थक सिद्धांत, निसर्ग अधिकारी, तसंच सिद्धार्थ रायलान, अनिल तीर्थ परमार या १७-१८-१९ वर्ष वयाच्या मुलांनी देशातल्या शिक्षणव्यवस्थेचा जो पर्दाफाश केलाय, ते अधिक महत्वाचं वाटतं. या सरकारचे फक्त गोडवेच गाणे चाललेलं असताना, चुकीच्या गोष्टी बोलायला लोक घाबरत असताना, सामान्य लोक सगळा गैरकारभार मुकाट्याने सहन करत असताना या १२ वीच्या विद्यार्थ्यांनी धाडसाने, त्यांचं सगळं कौशल्य, विचारशक्ती पणाला लावून शिक्षणक्षेत्रातला भ्रष्टाचार उघडकीला आणलाय. सरकारसाठी, सरकारच्या समर्थकांसाठी याहून लाजिरवाणं ते काय असू शकतं? या विद्यार्थ्यांना ‘डीप स्टेट’चे एजंट, देशद्रोही, दहशतवादी अन् पाकिस्तानी म्हटलं गेलं. नेहमीप्रमाणे ‘सोरोस’चंही नाव घेतलं गेलं. देशातली, घराघरातली मोठी माणसं हिंदू-मुस्लिम खेळात दंग आहेत. सरकारच्या प्रत्येक चुकीवर पांघरूण घालण्यात ते व्यस्त आहेत. या मुलांनी मात्र सीबीएसई सर्व्हरपासून टेंडरपर्यंतच्या झालेल्या सर्व गडबडी, गैरव्यवहार निर्भयपणे उघड केलेत. दोन अधिकार्यांना सरकारला हटवावं लागलं, इतका परिणाम घडवून आणणारं काम या मुलांनी केलं. या मुलांनी माझ्यासारख्यांची उमेद जागवलीय. त्यांना शाबासकी द्यायला हवी. त्यांच्या पाठीशी राहुल गांधी उभे राहिलेत. आपणही राहायला हवं.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दर प्रत्येक १०-१५ वर्षापर्यंत देशांत अशीच अशांतता निर्माण होत आली आहे, त्यानंतर सरकार विरोधी वातावरण तापलं जातं, मग तशा हालचाली विरोधकांकडून सुरू होतात असा आजवरचा इतिहास आहे. अशाच प्रकारचं वातावरण आज देशात निर्माण झालंय. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला. त्यानंतर दहा बारा वर्षानं काँग्रेसच्या राजवटीवर नाराजी व्यक्त होऊ लागली. प्रधानमंत्री पंडित नेहरूंच्या विरोधातही वातावरण तयार झालं होतं. त्यांचा करिष्मा ओसरू लागला होता. १९५७ नंतर समाजवादी विचारांची मंडळी आणि डाव्यांनी
सत्ता विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली होती. 'देश की जनता भूखी है, ये आझादी झूठी है....!' नेहरूंसारख्या प्रभावशाली, प्रतिभावंत नेत्याला या स्थितीला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी काही राज्यात समाजवादी विचारांची सरकारे अस्तित्वात आली होती. दहा वर्षांनंतर म्हणजे १९६७ नंतरच्या कालखंडात काँग्रेसचे देशभरातलं वर्चस्व संपुष्टात यायला सुरुवात झाली. उत्तर प्रदेश अन् इतर काही राज्यांत संमिश्र सरकारे अस्तित्वात आली. १९७० साली तर केंद्रामधलं काँग्रेससरकार सत्तेपासून दूर गेलं. १९७४ पासून काँग्रेसविरोधी आंदोलनं देशात सुरू झाली १९७७ दरम्यान विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेसमधुून बाहेर पडले. प्रथमच काँग्रेसचे ४०० हून अधिक खासदारांची संख्या असलेलं सरकार तेव्हा कोसळलं. विरोधकांना सोबत घेऊन मग विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे प्रधानमंत्री बनले. त्यानंतर त्यांच्या
'मंडल कमंडल' या समाजाचं ध्रुवीकरण करणाऱ्या धोरणाविरोधात वाद सुरू झाला. पाठोपाठ संघ आणि विश्व हिंदू परिषदेचा रामजन्मभूमीचा वाद सुरू झाला. आंदोलन उभं राहिलं. १९९६ मध्ये सत्ताबदल झाला. भाजप आणि इतर मित्र पक्षांचं अटलबिहारी वाजपेयींचं आधीचं १३ दिवसाचं सरकार पडलं. नंतर देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर यांची अल्पजीवी
सरकारं अस्तित्वात आली. पुन्हा अटलजींचं सरकार. त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेसच्या अधिपत्याखाली यूपीएचं सरकार आलं, ते २०१४ पर्यंत सत्तेवर होते. या २०१४ मध्ये पुन्हा एकदा देशात सत्ताबदल झाला. भाजपच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असलेलं सरकार पहिल्यांदा अस्तित्वात आलं. २०१४ नंतर १० वर्षांनं म्हणजे २०२४ मध्ये अशीच सत्ताबदलाची अल्प हालचाल झाली, पण ती कमजोर बनली अन् तेव्हा भाजप २४० खासदारांच्या संख्येवर विसावली. सरकार भाजपचं आलं पण पूर्ण बहुमत काही मिळालं नाही. तेलुगू देशम आणि इतर मित्र यांच्या पाठिंब्यावर भाजपचं सरकार सत्तेवर आलं. आताचा कालखंड हा मी म्हणतो त्याप्रमाणे १०-१५ वर्षाचा अस्वस्थतेचा कालखंड दिसतोय. आज देशातला विरोधीपक्ष कमकुवत, असहाय, क्षीण झाला असला तरी बेरोजगारी, परीक्षांमध्ये होणारा गोंधळ, पेपरफुटी, गैर व्यवस्थापन यामुळं तरुणामध्ये बेचैनी, अस्वस्थता वाढीला लागलीय. ती व्यक्त होऊ लागली. जशी आणीबाणीच्या विरोधात विद्यार्थी नेते सरसावले होते. त्यात प्रमोद महाजन, नीतीश कुमार, लालू प्रसाद यादव, अरुण जेटली, सीताराम येचुरी या विद्यार्थी नेत्यांचा पुढाकार होता. जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनाला अनुसरून त्यांनी आपली अलग विचारधारा बाजूला ठेऊन आंदोलन उभं केलं होतं. तेव्हा काँग्रेसविरोधी वातावरण ढवळून निघालं होतं. काँग्रेसचा पराभव करून जनता दलाचं सरकार अस्तित्वात आलं! देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या होणाऱ्या घडामोडीचा हा एक संक्षिप्त लेखाजोखा.
इथं आणखी महत्वाची नोंद करायला हवी की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झारखंड आणि जम्मू काश्मीर सोडून भारतात ज्या काही इतर ठिकाणी राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या भाजपने अत्यंत शानदारपणे जिंकल्या आहेत. हरियाणाबाबत सर्वांचं मत होतं की, तिथं भाजपचा पराभव होईल. पण भाजपने ती निवडणूक जिंकली. महाराष्ट्रात आपण पाहिलं की, २०१९ ला लोकसभा निवडणुकीत भाजपने ४८ पैकी केवळ ९ जागा जिंकल्या होत्या. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने एकट्याच्या १३२ जागा जिंकून आणल्या. मित्रपक्षाच्या मदतीने २/३ हून अधिक जागा जिंकल्या. आणि महायुतीचं सरकार राज्यात अस्तित्वात आलं. त्यानंतर दिल्ली, बिहार विधानसभा सहजपणे जिंकल्या. बंगालमध्येही त्यांनी आता आपलं वर्चस्व निर्माण केलं, तिथं पहिल्यांदाच सत्ता खेचून आणली. एकीकडे साऱ्या निवडणुका जिंकण्याचा भाजपचा रिरस्ता राहिला असला तरी दुसरीकडं देशात अनेक प्रश्न आ वासून उभे राहिलेत. महागाई मोठ्या प्रमाणात भडकलीय. ती लोकांना त्रासदायक ठरतेय. आरोग्य क्षेत्रातही मोठा प्रश्न उभा राहिला असतानाच शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडालाय. नीट परीक्षेचे पेपर फुटल्यानं विद्यार्थी उद्विग्न बनलेत. काहींनी आत्महत्या केल्यात. सीबीएससी आणि इतर केंद्रीय परीक्षेतला अनागोंदी कारभार उघड झाला. त्यामुळं तरुणांची सरकार विरोधी नाराजी शिगेला पोहोचलीय. त्याशिवाय गल्फ, इराण आणि अमेरिका यांच्यात जे युद्ध सुरू असताना त्याबाबत भारत सरकारची जी भूमिका राहिली आहे त्यावर अनेक प्रश्न उभे राहिलेत. परराष्ट्र धोरणाबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झालीय. देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचं अर्थ विश्लेषक म्हणताहेत. दिवसेंदिवस रुपयाची किंमत घसरत चाललीय. युद्धजन्य परिस्थिती म्हणा किंवा असंतुलित झालेली अर्थव्यवस्था म्हणा, पण पेट्रोल, डिझेल, तेलांच्या किमती सतत वाढताहेत. त्यानं लोक त्रस्त झालेत. शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतांच्या किंमती वाढतच चालल्यात. यापुढील काळात ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होतेय. अशीच स्थिती राहिली तर अन्नधान्याच्या किंमतीही वाढू शकतात. ही सारी आव्हानं सरकार आणि देशासमोर आहेत. आर्थिक स्थिती बरोबरच औद्योगिक क्षेत्रात देखील अडचणी उभ्या राहताहेत. देशातली उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चाललीय. नव्यानं गुंतवणूक येत नाहीये आणि आहे ती काढून घेण्यात परदेशी गुंतवणूकदार सरसावलेत. परदेशी गुंतवणूक देशातून निघून चाललीय. देशात अशी सारी अस्वस्थ करणारी परिस्थिती असताना भाजपचं निवडणुकीतलं यश या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचं उठलेलं वादळ अन् समाज माध्यमांतून दिसून आलेला झंझावात महत्वाचा ठरतोय. बोस्टनमध्ये राहणाऱ्या अभिजित दिपकेने सर्वोच न्यायालयाच्या तरुणांवर केलेल्या शेरेबाजीनंतर, टिपणीनंतर सुरू केलेल्या समाज माध्यमांतल्या मोहिमेला तरुणांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद. त्यानंतर त्यांच्या त्या समाज माध्यमांवर सरकारने आणलेली बंदी. साऱ्या राजकीय पक्षांच्या फॉलोअर्सना त्यानं मागं टाकलं. हा एक संकेत आहे की, तरुणांमध्ये, नव्या पिढीत असंतोष पसरलेलाय. दिपके कोण आहेत हे माहित नसतानाही त्याला जो प्रतिसाद मिळतोय तो साऱ्यांना अचंबित करणारा ठरतोय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९


No comments:
Post a Comment