"धार्मिक, जातीय, सनातनी उन्माद वाढलाय. भावना संकुचित झाल्यात. भिक्षुकी, भटीपाशाचा विळखा करकचून आवळला गेलाय. व्रतवैकल्ये वाढलीत. हिंदु नव्हे सनातनी धर्माचा जागर अन् प्रागतिक, सुधारणावादी, प्रबोधिनी विचारांना विरोध होतोय. सनातनी अभिनिवेश दाखवत सर्वोच्च न्यायालयात कुणी सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारतो तर कुणी प्रबोधिनी विचारांची पुस्तकं वाटली म्हणून ती फेकून मारतो. एवढं कौर्य येतं कुठून? 'सनातनी धर्माचा अपमान सहन करणार नाही..!' अशी मखलाशी केली जाते. सारी वैचारिक दिवाळखोरी! सनातनधर्मातल्या देव-धर्माच्या नावानं सोकावलेल्या सामाजिक रूढी-परंपरांचा, भिक्षुकी, भटीपाशाविरोधात 'हिंदू मिशनरी' बनून हिंदुत्वनिष्ठ प्रबोधनकारांनी समाचार घेतला होता. आज त्यांना धर्मविरोधी ठरवलं जातंय! एवढंच नाही संत साहित्याची अनुभूती न घेता वारकऱ्यांना नक्षलवादी ठरवलं जातंय. आज 'कोदंडाचा टणत्कार' आम्हाला आठवतोय. प्रबोधनकार, माफी असावी..! आम्ही तुमचा विचार पुढं नेऊ शकलो नाही...!"
------------------------
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातले अधिकारी राजेंद्र कदम यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्यावेळी समाज प्रबोधनात्मक प्रबोधनकार ठाकरे यांचं ‘धर्माची देवळे अन् देवळांचा धर्म....’, दिनकरराव जवळकर यांचं 'देशाचे दुश्मन...' ही पुस्तकं वितरित केली. रुग्णालयाच्या अधिसेविकेने कदम यांना बोलावून अपमानित करत या पुस्तकामुळे आमच्या भावना दुखावल्यात, असा आक्षेप घेतला. ही पुस्तकं का वाटली? असा जाब विचारला. सर्व सहकाऱ्यांसमोर हात जोडून माफी मागायला लावली. त्यानंतर महिलांनी कदम यांच्या अंगावर प्रबोधनकारांचे आणि दिनकरराव जवळकर यांची पुस्तकं फेकून मारली. या घटनेची ध्वनीचित्रफित बनवून ती प्रसारित केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात समाजप्रबोधनाचे काम सातत्याने होत आलंय. समाजप्रबोधन करणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून, पुस्तकं लिहिणं, वितरीत करणं, चर्चासत्र करणं, अंधश्रद्धा निर्मूलन हा त्याचाच भाग आहे. समाज सुधारणेवरचं पुस्तकं देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविताना शासनाने बंदी न घातलेल्या पुस्तकांचं वितरण करणाऱ्याला ही वागणूक देणं योग्य नाही. ही घटना महापालिका सेवा आणि नियमावलीचा भंग करणारी असून, दखलपात्र गुन्हा आहे. अधिसेविका अन् परिचारिका महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला हवी. प्रबोधनकार ठाकरेंनी सत्य मांडलं, तर्कनिष्ठ, विवेकपूर्ण, अभ्यासू पद्धतीची वास्तव्यवादी मांडणी केलीय. पुस्तकं भेट दिली तर ती वाचायची, समजून घ्यायचं, एकाच विचारधारेच वाचून माणूस बौध्दिक दृष्ट्या प्रगल्भ होत नाही. एकांगी बनतो. दोन्ही विचारधारा वाचल्या की सत्य समजतं. प्रबोधनकार ठाकरे आणि दिनकरराव जवळकर यांनी जे लिहिलंय ते त्यांनी अनुभव आणि वाचनातून लिहिलंय. रुग्णालयातील या सुशिक्षित, प्रशिक्षित कर्मचारीवर्गाने प्रबोधनकार ठाकरे आणि दिनकरराव जवळकर सारख्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांच्या पुस्तकांना विरोध करावा हे मोठे आश्चर्य, तेवढेच घृणास्पदही आहे. त्यामध्ये काही कट्टर हिंदूत्ववादीचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भावना भडकवण्याचे संबध असू शकतो. प्रबोधनकार यांनी १९२९ साली ही पुस्तक लिहिलीत अलीकडे बरीच वर्ष या पुस्तकावर चर्चा नव्हती. आता नवीन पिढी या निमित्ताने ही पुस्तकं आणि यातील कंटेंटवर चर्चा करील. पोलिसात तक्रार केली नाहीतर माफी मागून तिथंच मिटलं असतं तर चर्चा झाली नसती.
प्रबोधनकारांची पुस्तके फेकणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, प्रबोधनकारांचा नाही! मुंबईत प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांची विटंबना करण्यात आली आणि त्यांना हिंदुविरोधी ठरवण्याचा प्रयत्न झाला, हे अत्यंत निंदनीय, संतापजनक आहे. ज्यांनी आयुष्यभर समाजातली अंधश्रद्धा, विषमता, अन्यायाविरुद्ध लढा दिला, त्या प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर असा आरोप करणं म्हणजे इतिहासाची थेट विटंबना आहे. विचारांचा आदर सोडून विचारवंतांचा अपमान करणं ही समाजाच्या पतनाची सुरूवात असते. सध्या आपण त्याच दिशेने जातो आहोत. प्रबोधनकार ठाकरे हे खरे हिंदुत्त्ववादी सुधारक होते. त्यांनी धर्मातली अंधश्रद्धा, भोंदूपणा जातिभेदाविरुद्ध संघर्ष केला, कारण त्यांना हिंदू धर्म अधिक सशक्त अन् विवेकी करायचा होता. त्यांच्या लेखनात धर्माविषयी टीका असली तरी ती विध्वंसक नव्हती, ती सुधारक होती. त्यांनी सांगितलेलं हिंदुत्त्व हे समानता, बंधुता अन् विवेकावर आधारलेलं होतं. त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करून हिंदू समाजात एकात्मतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे प्रबोधनकार यांनीच सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. तोच उत्सव आज सर्व हिंदुत्ववादी लोक ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीभावानं साजरा करतात. त्याकाळी या उत्सवाचा उद्देश धार्मिक नसून सामाजिक होता. समाजातला भेद मिटवून सर्व हिंदूंना एकत्र आणणं, समाजातील दुर्बल घटकांनाही या सणात सहभागी करून घेणं हा त्यामागचा खरा हेतू होता. त्यामुळे प्रबोधनकार यांना हिंदुविरोधी ठरवणं म्हणजे अज्ञानाचं प्रदर्शन आहे. प्रबोधनकार केवळ विचारवंत नव्हते, तर महान समाजसुधारक, पत्रकार, लेखक होते. त्यांचं 'प्रबोधन ' मासिक वादळासारखा प्रभाव टाकणारा ठरलं. अस्पृश्यता, स्त्रीशिक्षण, स्वातंत्र्य आंदोलन, आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलं. कौटुंबिक दृष्ट्या पाहिलं, तर प्रबोधनकार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख ठाकरे कुटुंबाचा पाया हाच विचारवंत, समाजसुधारक आणि खरा हिंदुत्त्ववादी आहे. अशा थोर व्यक्तींच्या पुस्तकांना फेकून देणं म्हणजे त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा, हिंदुत्वाच्या खऱ्या आत्म्याचा अपमान आहे. हा प्रकार ढोंगी हिंदुत्त्ववादी राजकारणाचं जिवंत उदाहरण आहे. एकीकडे हिंदुत्त्वाचा नारा दिला जातो आणि दुसरीकडे खऱ्या हिंदुत्त्वाचे प्रवर्तक असलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांचा अपमान केला जातो. समाजाने अशा प्रकाराचा तीव्र निषेध करावा आणि प्रबोधनकारांच्या विचारांचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित ठेवण्याची जबाबदारी आता प्रत्येक मराठी माणसाची आहे.
न्यायालयात नेमंक काय घडलं? सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर यांनी थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट फेकला. त्याचवेळी सुरक्षा कर्मचारी किशोर यांना घेऊन जात असताना 'आम्ही सनातनचा कोणताही अपमान सहन करणार नाही...!' असं म्हणत आरडाओरड केली. पण सरन्यायाधीशांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. १६ सप्टेंबर रोजी, सर्वोच्च न्यायालयाने खजुराहो येथील ज्वारी मंदिरातील भगवान विष्णूच्या सात फूट उंच मूर्तीची पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करण्याचे निर्देश मागणारी याचिका फेटाळून लावली. ती याचिका प्रसिद्धीसाठीची असल्याची टिप्पण्णीही केली. 'जा आणि देवाला काहीतरी करायला सांगा. तुम्ही म्हणता की, तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात. मग आत्ताच जाऊन प्रार्थना करा. हे एक पुरातत्वीय स्थळ आहे आणि एएसआयने परवानगी द्यावी लागते....!' अशी प्रतिक्रीया सरन्यायाधीशांनी दिली होती. या गोष्टीचा राग मनात धरुन राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला केला. पण या हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई इतर वकिलांना म्हणाले की, 'या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. मी विचलित झालेलो नाही. या गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही...!' भूषण गवईंच्या या टिप्पणीने सोशल मीडियावर गोंधळ उडाला. सरन्यायाधीशांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप काहींनि केला. सरन्यायाधीश म्हणाले की, 'माझा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी सर्व धर्मांचा आदर करतो...!' सरकारचे सॉलिसिटर तुषार मेहता यांनी सरन्यायाधीशांचे समर्थन केलंय. अनेक वरिष्ठ वकील, कायदेतज्ज्ञांनी आरोपी वकिलावर कठोर कारवाईची मागणी केली. 'या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. हा सर्वोच्च न्यायालयावर झालेला जातीयवादी हल्ला आहे. सर्व न्यायाधीशांनी हल्ल्याचा निषेध करावा आणि हे स्पष्ट करावे की, न्यायालय वैचारिक हल्ले सहन करणार नाही. न्यायालयाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करत, सरन्यायाधीश यांनी व्यत्ययाशिवाय न्यायालयीन कर्तव्ये पार पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक
कायदेतज्ज्ञांनी केलंय .
सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट कुणी मारला असेल तर तो, ज्यांनी शंबुक मारला, चार्वाक जाळला, एकलव्याचा अंगठा मागितला, ज्ञानेश्वर माऊलीना वाळीत टाकलं, चक्रधरांचा खून केला, तुकारामबुवांचा खून केला, बसवण्णा, त्यांचे शरण मारले, त्यांची वचन नष्ट केली, एकनाथांच्या मुलाला जिवंतपणी बापाचा दिवस घालायला लावला, शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक नाकारला, जिजामातेचा चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, ज्योतिबा-सावित्रीमाईवर शेणाचे गोळे फेकले, राजर्षींच्याबद्दल घाणेरडे विनोद पसरवले, आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली, गांधीजींची हत्या केली, प्रतीसरकारचे क्रांतिकारक पकडून दिले, प्रबोधनकारांना कडाडून विरोध केला, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेशना मारलं,
माणसाचं माणूसपण नाकारलं, समता नाकारली
त्यांनीच प्रत्येक भारतीयाच्या थोबाडावर बूट फेकून मारलाय आणि नुसता बूट फेकून मारलेला नाही
तर स्पष्टपणे सांगितलेलंय की, 'हिंदू म्हणून तुम्ही कितीही उड्या मारल्या आणि कितीही बलिदानं दिली, त्याग केला, स्वतःच्या बोकांडी कोर्टकज्जे खटले घेतले, लोकांची डोकी फोडली तरीही तुम्ही आमच्या बरोबरीला नाहीत, तुम्ही शुद्र आहात. गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हेच अंतिम सत्य आहे....!' त्यांनी बूट तुमच्या थोबाडावर फेकलाय. याचं उत्तर काय असाव हे संविधानानं सांगितलेलंय. बुट फेकणारा केवळ एक व्यक्ती नसुन हा बुट त्या व्यवस्थेनं फेकलाय जी व्यवस्था शुद्रातिशुद्रांना ज्ञानार्जन करण्यास बंदी घालत होती. चुकून कोणी ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न जरी केलं, तर तुमच्या कानात गरमतेल ओतत होती, हा बुट त्या मानसिकतेनं मारला. तुम्ही रस्यावरून चालतांना तुमची सावलीच काय, तुमच्या पाऊलखुणादेखील त्यांना सहन होत नव्हत्या म्हणुन तोंडाला मडक अन् कमरेला झाडु बांधला.! हा बुट त्या मानसिकतेने मारला. जी मानसीकता त्या बोबळ्या बोलातुन बाहेर पडलेलं ब्राम्हणी वचन देखील बरदाश्त करू शकली नाही. शुद्रातिशुद्रांच्या जमावासमोर त्या लहान मुलाची जीभ हासडून लावली! तरीदेखील हा खालच्या जातीचा, सर्वोच्च पदावर बसलाच कसा? याचा द्वेष म्हणुन, हा बुट त्याच मानसिकतेने मारला, जी संविधानापुर्वीची व्यवस्था लागु करू पाहतेय, जी भारताला हिंदुराष्ट्र बनवू पाहतेय! फक्त आणि फक्त संविधानामुळेच खालच्या जातीतील पोर सरन्यायाधीश झालाय! होय हा बुट त्याच नीच मानसिकतेने मारलाय. सरन्यायाधीश बूट फेकणारा वर कारवाई न करण्याबद्दल कुणाला घाबरले? फेकलेला बूट, की तिवारी नावाच्या वकील व्यक्तीला, की सनातन धर्माला? आम्ही या घटनेचा धिक्कार केला पण सरन्यायाधीश यांनी गुन्हेगाराला माफ केलं! भर कोर्टात अनवधानाने मोबाईलची रिंग वाजली तरी कोर्टाचा अपमान झाला असे समजून कारवाई होते. इथे तर जाणून बुजून बूट फेकून मारलाय. गुन्हा करणारा साठ वर्ष वयापेक्षा कमी असेल किंवा ठार वेडा असेल, तर तो गुन्हा ठरत नाही. पण तसं इथं काही नाही. गुन्हेगाराने आपला गुन्हा मान्य केलाय आणि त्यामागे दैवी शक्ती असल्याचे जाहीर केलंय. आरोपीचा बचाव हा कायद्याच्या कक्षेत बसत नाही. सरन्यायाधीश यांनी ’कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ खाली शिक्षा करायला हवी. सरन्यायाधीशांनी उच्चारलेले वाक्य योग्य की अयोग्य याचं विवेचन करायला हवंय. बूट फेकला तो सरन्यायाधीशवर. राज्य घटनेचा योग्य अर्थ सांगून ती अबाधित राखणाऱ्यावर. तो फेकला राज्यघटना, संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारावर, अनुयायावर! गुन्हेगाराला माफ केलं हा मोठेपणा नाही, तो डरपोकपणा आहे! इतिहासातील ती मोठी घोडचूक ठरेल. तसं नाही घडलं तर इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही.
चौकट
ज्या महिलांनी प्रबोधनकारांच्या पुस्तकाला विरोध केला अन् त्यांची पाठराखण शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं, ही प्रबोधनकारांशी केलेली प्रतारणा आहे. त्यांनी ते पुस्तक वाचलेलं दिसत नाही. प्रबोधनकारांनी महिलांसाठी आपल्या साहित्यात अनेक पानं खरडलीत. प्रबोधनकारांनी 'माझी जीवनगाथा' या प्रकाशन समारंभात अखेरच्या भाषणात म्हटलं होतं, 'स्त्रिया आता खूप शिकल्या. खूप पुढं गेल्या. रूढी-परंपरेत त्याचा विकास खुंटून राहिला होता. पण त्यांनी आता इतकं पुढं जावं की, पुरुषांना वाटलं पाहिजे, स्त्रिया आपल्यावर सूड उगवत आहेत...!' तुमच्या या आशावादानं स्त्रियांना भटी छूमंतरच्या धुपाऱ्यानं सॉफ्ट टार्गेट करणारे पुरुषसत्ताकवादी सावध झाले असावेत. तुम्ही 'भिक्षुकशाहीचे बण्ड' या ग्रंथाच्या अखेरीला भट-ब्राह्मणांच्या भेज्यात काय रटरटत असतं ते सांगताना म्हटलंय, 'जावत्काल हिंदूसमाजातला स्त्रीवर्ग आम्हा भिक्षुकांच्या भजनी लागलेला आहे, तावत्काल आमच्या भिक्षुकशाहीचे वर्चस्व हाणून पाडण्याचे यत्न जेहेत्ते फोलच होणार...!' आपला हा मर्मवेध आजही सत्यात उतरताना दिसतो. स्त्रिया शिकल्या. पुरुषांच्या बरोबरीनं काम करताना त्या दिसतात. राजकारणात, समाजकारणातही मोठ्या पदावर आहेत. राष्ट्रपतीही आहेत. अवकाशात भरारी मारण्यातही त्या यशस्वी झाल्यात. असं असूनही त्या मोठ्या प्रमाणात भटीपाशात अडकल्यात. प्रबोधनकार, तुम्ही जो स्त्रियांच्या शोषणाविरोधात विचारांचा जबरदस्त सोटा चालवला, तो त्यांना ठाऊक नसावा. 'स्त्रियांच्या परवशतेचा, राष्ट्रदेवतांच्या गुलामगिरीचा, माताभगिनींच्या बौद्धिक अधःपाताचा प्रश्न स्वच्छ सुटल्याशिवाय 'भिक्षुकशाहीचे बण्ड'सुद्धा पुनःपुन्हा उपटल्याशिवाय राहाणार नाही...!' हा इशारा तुम्ही शंभर वर्षांपूर्वी दिलात. तेच वर्तमान असावं, त्याची साक्ष तुम्हाला विरोध करताना मिळावी, ही विचारीमनाला शरमिंदं करणारी घटना आहे. प्रबोधनकार, अशा घटना तुमच्या हयातीतही होत होत्या. पण तुमच्या लेखणी-वाणीत समाजमनाला भानावर आणणारी ताकत होती. या ताकतीला सत्यशोधक कार्यकर्त्यांची, शोषित कष्टकरी जनतेची साथ होती. आज समाजाला भूलथापा मारून त्यांना स्वार्थी राजकारणासाठी गुंगवणाऱ्यांची चलती आहे. त्यांचं मार्केटिंग करणारेही आहेत. अशा वातावरणात गरज असूनही तुमच्या विचारांचा प्रसार कुणी करायचा? स्पष्ट सांगायचं, तर बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय ओळख आहे म्हणून तुमचं नाव तरी घेतलं जातं. क्रांती आपली पिल्लं खाते, असं म्हणतात. पण आपल्या देशाचा न्याय याबाबतीतही उफराटाच आहे. ज्यांनी समाज सुधारणेसाठी खस्ता खाऊन, समाज विकास घडवून आणला, त्या विकासाच्या लाभार्थीनीच सुधारकांना, क्रांतिकारकांना विस्मरणाच्या आवंढ्यात गिळंकृत केलंय. प्रबोधनकार, तुमच्या या नेमक्या संवादात धनाने, मनाने आणि अकलेनेही श्रीमंत होऊनही भटी व्यवस्थेपुढे लाचार होणाऱ्या भारतीयांच्या मानसिकतेचं सार आहे. तुमच्या 'सत्य परमोधर्माः' या ब्रीदाशी प्रामाणिक राहून सांगतो; प्रबोधनकार, माफी असावी, तुम्ही आता नावापुरते आहात आणि तसबिरीतून दिसण्यापुरते आहात! तुमचं विचार-कार्य शासकीय प्रकाशनाच्या पाच खंडी ग्रंथांत बंदिस्त आहे. पत्थरी देव-देवता जागृत झाल्यावर तुमच्यासारख्या प्रबोधनकाराच्या वाट्याला दुसरं काय येणार? आजच्या तरुण पिढीचं हे दुर्दैव आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
जेव्हा २०१४ची बॅच विकासाचा नारा देऊन नंतर सत्ता टिकविण्यासाठी धर्माचा आधार घेउ पाहते, तेव्हा, त्यांना नाईलाजाने सनातन धर्मचाच आसरा घ्यावा लागतो ! हिंदू धर्म हा खरं तर व्यापक आहे. त्यात कुठेच जातीचा उल्लेख पूर्वी आलेला नव्हता. कोणत्याही धार्मिक ग्रंथात असा जातींचा उल्लेख नाही. जातींचा उल्लेख यायला सुरुवात झाली ती मनुस्मृती पासून. हिंदू धर्माची व्याख्या काय आहे ? किंवा सनातन धर्माची व्याख्या काय आहे ?
ReplyDeleteसनातन धर्माची सुद्धा अशीच परिस्थिती आहे. हिंदू धर्माची किंवा सनातन धर्माची व्याख्या मी तरी आजवर ऐकलेली नाही. कोणाला हे दोन धर्म एकच आहेत किंवा वेगवेगळे आहेत, वेगवेगळे असतील तर काय फरक आहे, एकच असले तर, कसे काय एकच आहेत, हे सांगणार कोण ?