Saturday, 25 October 2025

'नाही मी बोलत आता... !'

भारताइतपत बडबड-पटू वाचाळ देश दुसरा नसेल! इथली ताडित, पीडित नि शोषित गरीब जनता मुक्या मेंढराप्रमाणे असली, तरी बुद्धिजीवी 'पुढारी' क्लास भलताच बोलघेवडा आहे. म्हणूनच 'मौन' हे दुर्मिळ नि महत्वाचं...! काही वर्षापूर्वी मौन हे एक वाचिक हत्यार समजलं जात असे. महात्मा गांधींपासून विनोबाजी भावे यांच्यापर्यंत अनेकांनी ही मौन धारण केलं होतं. आज मात्र वाचाळ नेत्यांची मांदियाळी झालीय. ताल, तोल, बोल यांचा मनसोक्तपणे अन् उदंड वापर करत विरोधकांवर हल्लाबोल करत असतात. त्याचं कुणालाच वैषम्य वाटत नाही. याबाबत त्यांच्या मालकांना, चालकांना ना खेद, ना चीड, ना चाड राहिलीय. या पार्श्वभूमीवर मौन हे किती महत्वाचं असतं, त्याचं सामर्थ्य किती असतं ते दिसून येईल. मौनाचं हे महत्व आचार्य विनोबाजी भावे यांच्या 'मौनवता'च्या घोषणेनं अधिकच वाढवलं होत. 'आचार्यांचं वर्षभराचं मौनव्रत ही एक कठोर साधना होती. त्यायोगे ते उच्चतर आध्यात्मिक शिखरं पादाक्रांत केलं आहे. सर्वोच्च तत्त्वांवर त्यांची दृष्टी स्थिर होत आहे...', असं जे भाष्य जयप्रकाश नारायण यांनी केलं होत, त्यावरूनही विनोबाजीच्या मौनाचं माहात्म्य लक्षात येईल. अध्यात्म-साधनेतच नव्हे, तर व्यवहारसाधनेतही मौन फार उपयुक्त ठरतं, हे आपल्या शहाण्या पूर्वजांनी ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी अनेक 'मौन-प्रकार' सुचविलं होतं. उदाहरणार्थ, मूर्खत्व झाकणारं मौन ! विद्वानांच्या सभेत अ-विद्वानांनी गप्प बसणंच श्रेयस्कर "विभूषणं मौनम पंडितानाम् ....!' त्यामुळं अ-विद्वानांचं अज्ञान प्रकट न होता तथाकथित विद्वत्तेची झाकली मूठ सव्वालाखाची ठरतं! बेसूर गवय्यांना संगीत सभेत 'गानमीन' भूषणावह ठरतं. जसं सुरेल नि सुमधुर कोकिळांच्या मैफलीत कर्णकटू कावळ्यांनी 'कौरव' न करणंच शोभादायक! अलीकडं राजकीय आजाराप्रमाणेच 'राजकीय मौन' ही बरंच प्रचारात आलंय. पत्रकारांनी विचारलेल्या खोचक प्रश्नांना राजकीय पुढारी उत्तर देण्याचं टाळतात नि 'नाही मी बोलत आता....!' असं म्हणतात तेव्हा अनेक तर्ककुतर्कांना जन्म देणारं 'राजकीय मौन' आकारास येतं !
'नाही मी बोलत नाथा...', असं म्हणणाऱ्या प्रणयिनीचं खोट्याखोट्या रागातील 'अनुरागमौन' तर रसिकांच्या चांगल्याच परिचयाचं आहे. प्रियकराच्या गळ्यात गळा घालून उद्यानातल्या निवांत कोपऱ्यात केलेल्या कुंजकूजनाहूनही, शयन मंदिरात केलेलं हे 'अनुराग मौन' अधिक लज्जतदार असतं कारण ते प्रियकराच्या अनुनय कौशल्याला उधाण आणतं. 
'नच सुंदरी करू कोपा...' पासून ते 
'हम भी मुंह में जवान रखते हैं।
काश पूछों के मुद्दुआ क्या है...॥' 
ह्या अर्ज-विनंतीपर्यंत शेकडो गोड गोड शब्दांचे नाजूक बुडबुडे त्याला उधळावे लागतात! इतकंच नव्हे, तर 'पाया पडतो. राणीसरकार, दासाला क्षमा करावी अन् आपल्या साखरओठांतून साखरेहून गोड शब्द बाहेर येऊ द्यावेत अशी शरणागती देऊन प्रेयसीच्या चरणारविंदी मिलिंदायमान व्हावं लागतं आणि मग त्या लटक्या क्षणभंगुर-अबोल्याची ऊर्फ मौनाची शृंखला जेव्हा खुदकन हास्यानं ताटकन तुटतं तेव्हा शृंगारही उत्-शृंखल होतो! इतका की प्रेयसी पुनश्च मुक्याचं व्रत आचरतं पण त्याचं कारण, तिच्या नाजुक ओठावर शंभर मुक्यांची अखंड बरसात होतं हेच! मग  "जे शब्देवीण संवादिजे..!' असं रतिरंगनाट्य बहरास येतं !
विविध प्रकारांच्या ह्या मौनांची महती ठाऊक असूनही विनोबाजीच्या मौनव्रतांनं व्यथित झालेले लाखो लोक ह्या देशात होते कारण, विनोबांनी केवळ अध्यात्मसाधनेसाठी 'नाही मी बोलत आता...!' हा बाणा वर्षभरासाठी स्वीकारला असावा असं त्यांना वाटत नाही आचार्य विनोबांचे सर्वोदयी विचार सर्वांना पटतील असं नाही. किंबहुना या तामसीयुगात नि भोगवादी दुनियेत ते बहुतेकांना अव्यवहार्यच वाटतात आणि तरीही ज्यांनी काही बोलावं, देशकालपरिस्थितीवर आपलं मौलिक विचार मांडावेत; विचारांना धक्के देऊन विचार प्रवर्तक भाष्य करावं, अशा मोजक्या चितनशील विद्वानांत त्यांचा समावेश जरूर होतो. अशा ज्ञानयोगी संतपुरुषाला प्रदीर्घ मौन स्वीकारणंच श्रेयस्कर वाटावं, हीच सध्याच्या स्वार्थग्रस्त भ्रष्ट जमान्यावर अत्यंत बोलकी टीका होय, असंच अनेकांना वाटतं होत. 'महाभारता'चे निर्माते व्यासमहर्षी एके ठिकाणी वैतागानं म्हणतात.
'ऊर्ध्ववाहु विरोम्येष नहि कश्चित् शृणोतु मे...l'
मी बाहू उंचावून आक्रंदन करीत आहे, पण माझे कोणीही ऐकत नाही....! 
व्यासमहर्षीप्रमाणेच ह्या सर्वोदयमहर्षीला तेव्हा वाटलं असेल काय? आणि म्हणूनच त्यांनी हे प्रदीर्घ मौनव्रत स्वीकारलं असेल काय ? 'राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय' अशा घोषणा करत कैक सत्ताधारी साधनशुचितेला पायदळी तुडवीत आहेत आणि त्यांना विरोध करणारेही कैक महात्मे 'End justifies the means' ह्या कम्युनिस्ट धोरणाचा कळत-नकळत पाठपुरावा करताहेत, केवळ प्रक्षोभाचं सनसनाटी राजकारण खेळताहेत.
तर मग कोणाला निंदावं? कोणाला वंदावं? कोणाला शहाणपण सांगावं ? मद्यप्याच्या मदहोष मैफलीत सात्त्विक मार्गाचा मंत्रघोष काय कामाचा ? ह्या वैतागातूनच आचार्य विनोबांचं हे सांवत्सरिक मौन अवतरलं होत काय ? मिर्झा गालिबप्रमाणेच हा संतपुरुष मनातल्या मनात
'है ऐसीही कुछ बात जो चुप हूं। 
वर्ना क्या बात करनी नहीं आती?...॥'
अशाच काही जीवघेण्या घटना घडल्या आहेत म्हणून मी चूप बसलो आहे. एरव्ही काय मला उत्तम वक्तृत्व करता येत नाही? असं म्हणत असेल काय ?
अहो, विनोबाच का? ह्या देशातील हजारो सुज्ञ पुरुषांना 'मौन बरं वाटतं...!' बुद्धिमंतांना हतबुद्ध करणाऱ्या ह्या सत्तांध राजकारणाच्या नि भ्रष्ट अर्थकारणाच्या जमान्यात कुणाला काही शहाणपण सांगणं हाच वेडेपणा, असं खऱ्या विद्वानांना वाटू लागलं आहे. हा लोकशाहीचा नव्हे, तर झुंडशाहीचा वर्षाकाळ ह्या काळी कैक विद्वत्-कोकीळ स्वतःला म्हणताहेत,
भद्रं भद्रं कृतं मौन। 
कोकिळाः जलदागमे ॥
अरे, जिथं डबक्यातले बेडूक महान वक्ते बनले आहेत, तेथे कोकिळांनी आपला गळा न शिणविणेच चांगले !
-कृष्णद्वैपायन

No comments:

Post a Comment

लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्...