अरेबियन नाईटस् कथांमधील निरोप्याचं काम करणारी कबुतरं मुंबईत राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेली आहेत. दोन महिन्यांपूर्वी भूतदयावादी जैन बांधवांनी दादर कबुतरखान्यावर आच्छादलेल्या ताडपत्र्या, चाकू-कात्र्या घेऊन, कापून काढल्या होत्या, त्यामध्ये महिला आघाडीवर होत्या. सर्वत्र टीका झाल्यावर त्यांच्यावर महानगरपालिकेनं गुन्हे नोंदवलेले होते. त्यानंतर परम अहिंसक मुनींनी सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान दिलं होतं. न्यायालयाचा निर्णय मानणार नाही. असा पवित्रा घेतला होता. अध्यात्म कायद्याचं राज्य मानत नाही. याला असं म्हणावं काय? पण कायद्याचं राज्य तर ,सर्वच धर्मांना, गुण्यागोविंदानं नांदण्याचं स्वातंत्र्य देतं. कायद्याला न जुमानणाऱ्या मुनींमधील अहंकार किती पराकोटीचा आहे. हे त्यांच्या ताज्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे.
"एखाद-दुसरा माणूस मेला तरी हरकत नाही,पण कबुतर जगलं पाहिजे" असं प्रवचन देणाऱ्या मुनींनी आपलेही पाय मातीचेच आहेत, याची कबुली दिली आहे. धर्म तर्कशास्त्र मानणारा आहे, विज्ञानवादी आहे, असं समजलं जातं. ते खरंही असेल पण सध्या मुंबईत जे काही चाललं आहे, त्यावरुन ही जैनबुध्दी नसून राजकारणासाठी दुसराच मेंदू सध्या मुंबईत फिरत आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवलेल्या होत्या. त्या आता जानेवारीपर्यंत उरकावयाच्या आहेत. गेली पाचसहा वर्षे महाराष्ट्राच्या दूषित राजकारणाचा गळू फुटून वाहात आहे. त्याचे ओघळ एका मुनीच्या बैठकीखाली वाहात आलेले आहेत. त्याच्या संसर्गानं मुनीची सगळी तपश्चर्या वाया घालवली आहे. मुंबईतील सगळेच जैन बांधव मुनींच्या मतांचे नाहीत. हे इथं ध्यानात घ्यावं लागेल. काही डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात हे सिद्ध केलेलं आहे की, कबुतरांच्या विष्ठेमुळं आणि पंखातील विषाणूंमुळं श्वसनाचे विकार होऊन फुफ्फुसे निकामी होतात. यावर मुनींनी डॉक्टरांना मूर्ख म्हणून आगपाखड केली आहे. त्यामध्ये जैन डॉक्टरांचाही समावेश आहे. जैन प्रॅक्टिशनर अधिक तर होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात. कांदा-लसूण या उग्रांचं वावडं असल्यानं, सात्विकता म्हणून होमिओपॅथी प्रॅक्टिस करीत आहेत. पण बोलणं आणि कृती यांमध्ये जी ठासून भरलेली हिंसा आहे. ती होमिओपॅथी साबुदाणा गोळ्यांनाही दाद देत नाही. एका बाजूला व्यापारातून आर्थिक शोषण करायचं. दुसऱ्या बाजूला कबुतरांना दाणे टाकून पापक्षालन करायचं.
जर्दा-गुटक्याची लत लाऊन अन् कॅंसरचं इस्पितळही खोलायचं आणि पुण्यात्मा म्हणून मिरवूनही घ्यायचं. चोवीस तिर्थंकरांच्या शिकवणुकीवर पार बोळा फिरवला आहे.
कबुतरांबद्दल आकस असण्याचं काही कारण नाही, इतर पक्षांमुळंही असं होऊ शकतं. पण कबुतर माणसांच्या घराच्या आसपास सतत गिरक्या घेत असतात. वळचणीला त्यांनी संसार थाटलेला असतो. त्यामुळं कबुतरांच्या उपद्रवाचा अनुभव आला आहे. म्हणूनच कबुतरांबद्दल बोललं जातं. इतर पक्षांचा अनुभव आला तर, त्याबद्दलही बोललं जाईल. "जगा आणि जगू द्या" या वचनाला हरकत असण्याचं काही कारण नाही. पण कबुतरं जगविण्यासाठी माणसं मेली तरी हरकत नाही. असं म्हणणारे मुनी म्हणजे अहिंसेतही स्पृश्यास्पृश्य मानणारे म्हणावे लागतील. आपण कोणत्या थराला जात आहेत याचं भान त्यांनाही नाही. असो.
मुंबई हा देशाचा खजिना आहे. त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न अनेक दशकं चाललेला आहे. पण यश आले नाही. अनेकांनी,शंका व्यक्त केली आहे की, मुंबईतील काही राजकारण्यांनी ठरवलेलं आहे की, मुंबई बिगर मराठी माणसांनीताब्यात घेऊन पालिकेत ठराव करायचा की, मुंबईला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यायचा. कालांतरानं मुंबई गुजरातला जोडून घ्यायची. शंका व्यक्त करणाऱ्यांना हे ठाऊक नाही की, मुंबईसाठी मराठी माणसांनी जे रक्त सांडले होते त्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वाभिमानाची परंपरा आहे. सुरतेवर हल्ला करुन सुरतेला तेव्हाच इशारा दिला होता की, मराठी माणसांच्या नादी लागू नका. नाहीतर बद-सुरत करु.
वास्तविक कबुतर पालनाचा या राजकारणाशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्रात एकेकाळी, कबुतरांच्या अनेक ढाबळी होत्या. पण कालौघात जागेचं अपुरेपण शहारांची महानगरं बनली माणसांनाच खुराडी अपुरी पडू लागली आहेत, तेथे कबुतरांवर गंडांतर येणारच दाट लोकसंख्येच्या घनतेमुळं रोगराई लवकर पसरते. औद्योगिक मुंबई चोवीस तास जागी असते. त्यामुळं आसपासचं पक्षी जगतही जागं असतं. माणसांच्या सवयी पाखरांनाही लागतात. उडणाऱ्या पक्षांना वळचणीसाठी सातबाराच्या दाखल्याची आवश्यकता नसते. माणसांसारखी हाव पक्षांना नसली तरी निवाऱ्याला वळचण लागतेच. मानवी वस्तीत अन्नाची गरज भागते. हे त्यांना माहित झालं आहे. पण कबुतरांची गरज माणसांना नाही म्हणून निर्मनुष्य ठिकाणी कबुतरांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा आहे. जैनांना जे काही पुण्य कमवायचं आहे. ते त्या ठिकाणी जाऊन कमवावं. पण मतांसाठी माणसांचे बळी घेऊ नयेत. एकाच पक्षावर लक्ष्य केंद्रित करुन राजकीय पक्ष काय साधणार आहेत ? राजकीय सत्तेसाठी मतांची अशी गोळाबेरीज होणार असेल तर भारताचा प्रमुख उद्योग राजकारण आहे. तो घरांघरात चालत आहे. या कुटिरोद्योगापायी, नितीमत्ता हा शब्दही लुप्त होईल. तेव्हा पंचविसावे तीर्थंकर अवतरतील.
कबुतरखाना...
कबुतरखाने पुन्हा सुरू करुन सरकारने जैन समाजापुढं नमतं घेतल्याच्या बातम्या येत आहेत. काही दिवस आंदोलन होऊन हा निर्णयही जैनेतर समाज मान्य करतील. जैन समाजाचे अस्तित्व आणि योगदान मोठे आहे. कोपऱ्यावरचा वाणी असो किंवा मेडिकलवाला, जर जैन असेल तर तुमच्याकडे वस्तू वेळेवर येण्याची खात्री असते. ती वस्तू बदलायची असेल तर लगेच बदलून देणारे, वेळप्रसंगी उधारीने वस्तू देणारे, पैशांसाठी कटकट न करणारे जैन व्यापारी खरा व्यापार जाणतात. जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करणारे कष्टकरी आहेत हे. या समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समाजाला धरून आणि समाजाच्या विकासासाठी काम करतात. त्यांची एवढी प्रगती होण्याचे कारण हेच आहे. व्यापारासाठी लागणारे साम दाम दंड भेद या सगळ्या मार्गांचा वापर करुन वाढणाऱ्या जैन जमातीकडे मुंबईचा सगळा पैसा आहे. बहुतेक जैन जरी हिंदू देवदेवतांना मानत असले तरी आपला धर्म वेगळा मानतात. (मराठी समाजातली सून म्हणून जैन कुटुंबात मान न मिळालेली उदाहरणे माहित आहेत). हिंदूंना जैन हिंदू धर्माचा भाग वाटतात, पण इतिहास आठवला तर हिंदू धर्मापासून वेगळे झालेले मोठे धर्म म्हणजे बौद्ध आणि जैन. या दोन्ही धर्मांनी फार चांगली शिकवण दिली. त्यांच्याबरोबर एकोप्याने आपण राहिले पाहिजे अशीच शिकवण आपल्याला आहे. हे धर्मही कालांतराने हिंदू समाजाबरोबर एकोप्याने राहिले. एकाच समाजाचा हिस्सा बनून राहिले. पण ते अल्पसंख्य होते आणि अल्पसंख्याकांना स्वतःचे अस्तित्व राखून ठेवायचे असेल तर रोटी बेटी व्यवहार धर्माबाहेर होणार नाहीत याची काळजी घ्यावीच लागते. मग तुमचा उदारपणा या दोन बाबतीत कडक होतो. आता पैशाच्या जोरावर त्यांची रोटी सगळीकडे असेल अशी व्यवस्था या श्रीमंत समाजाने केली आहे. अगदी आमच्या शाळेतील पिकनिकला सुद्धा जैन आणि नॉन जैन असा मेनू असतो, शाकाहारी आणि मांसाहारी असा नाही. म्हणजे शाकाहारातले कंद त्यांना वर्ज्य म्हणून इतर शाकाहारींना स्वतःला अॅडजस्ट करायचे असा प्रकार आहे. पाचगणी, महाबळेश्वरला जुने पारशी हॉटेल कमी झालेत आणि जैन रेस्टॉरंट जास्त झाले आहेत. कोणत्याही सहलीच्या ठिकाणी आता जैन पदार्थ मिळतात, एवढे ते श्रीमंत आहेत आणि आग्रही आहेत. आणि शिवाय ते एवढा प्रवास करतात, एंजॉय करतात. विचार करा एवढा पैसा समजा मराठी समाजाकडे आलाय आणि आपण शिमला, कुलू मनालीला जाऊन चुलीवरचं मटण किंवा उकडीचे मोदक खातोय (उकडीचे मोदक जैनमान्य असल्याने ती शक्यता आहे). आपली धाव पश्चिम महाराष्ट्रातल्या हायवेवर चुलीवरचे मटण आणि अमृततुल्य चहा तो ही अस्वच्छ कपातला विकण्याची.
मराठी समाजाचा प्रॉब्लेम एवढाच नाही की तो गरीब आहे, त्याच्याकडे पैसा नाही. मोठा प्रॉब्लेम हा आहे की तो समाजाला धरून राहत नाही. उच्चवर्णीयांमध्ये विभागणी आहे, मागसवर्गामध्ये विभागणी आहे, इतकचं नाही तर सगळ्यात मोठे विभाजन राजकीय आहे. मोठा मराठी समाज आज कबुतरखान्यांना पाठिंबा देतोय कारण त्यांच्या मराठी राजकीय नेत्यांनी त्याचे समर्थन केले आहे. कल्पना करा की मंगलप्रभात लोढांनी आरोग्यासाठी कबुतरखाने नकोत अशी भूमिका घेतली असती तर त्याला इतर जैनांनी, त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी, जैन मतदारांनी पाठिंबा दिला असता का? मुंबईत टीबीचे प्रमाण प्रचंड आहे, त्यात कबुतरांच्या विष्ठेने होणाऱ्या आजारांचेही प्रमाण आहे. काही इमारतीतल्या रेफ्युज एरियात जमा होणाऱ्या कबुतरांमुळे लोक आजारी पडल्याचीही उदाहरणे आहेत. पण जैन लोक समाजाबाहेर किंवा धर्माबाहेर जाणार नाहीत. बरं जैन धर्म माणसांच्या जीवाला धोका असलेल्या चालीरितींचे समर्थन करतो का? नाही. ज्याची निर्मितीच सत्प्रवृत्तींना जागृत करण्यासाठी झाली आहे, तो धर्म असे म्हणणार नाही. मग आपणही एकत्र येऊ शकतो का? मुंबई बकाल झाली आहे, इथल्या आकाशावर धुळीचा ढग तयार होऊन लोक आजारी पडत आहेत, तुमच्या माझ्या घरातली लहान मुलं रात्रंदिवस खोकत आहेत. सतत साथीचे आजार आहेत. खोकला वाढला की डॉक्टर छातीचा एक्सरे काढायला सांगत आहेत. विचार करा कबुतरखान्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांची परिस्थिती काय असेल. पण मला वाटत नाही की कबुतरखाने बंद करण्यासाठी मोठे आंदोलन होईल, जे फक्त मुद्द्यांवर लढले जाईल. माझा ज्याला पाठिंबा तोच नेता खरा. आताचे राज्याचे नेते दिल्लीवर लक्ष ठेवून आहेत. आज जैन धर्मियांना मदत केल्याचा मोबदला त्यांना तेंव्हा मिळणार आहे. मराठी राजकारणी खोके आणि ओकेच्या पलिकडे नाहीत. ते कधी व्हिडियो गेम्स खेळतात, कधी पैशांच्या बॅगा मोजतात.
विरोधी पक्षांकडून फारशी आशा नाही. मराठीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव एकत्र आल्याच्या आनंदात नाचतो मराठी समाज पण आझाद मैदानावर मराठीवादी लोक करत असलेल्या आंदोलनात त्यांचे कार्यकर्ते मदतीला जात नाहीत किंवा तिथे गर्दी वाढवत नाहीत, आपल्या सोशल मिडियावर आंदोलनाचे रान उठवत नाहीत, पेटतात कुठे तर कुणी तरी चिरकुट माणूस मराठीत बोलायला नकार देतो तेंव्हा. तो माणूस एकटा असतो आणि कार्यकर्ते दहा. मग ते त्याला कानफटवतात. आता मराठीवाद्यांना इतके वैफल्य आले आहे की ते म्हणतात की एक वेळ कानफटववा, पण मराठीचे अस्तित्व राहू द्या या राज्यात. पैशांपुढे मराठी राजकारणी गप्प आहे. कबुतरखाने प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदले जाईल, मराठी समाजाची शेवटची घरघर म्हणून. याच राजकारणाची विष्ठा मराठी समाजाच्या आकाशात पसरली आहे, ती रोज गिळत आपण जगतो, अंताची वाट बघत.
No comments:
Post a Comment