"सामाजिक, राजकीय बदलांचा वास शाहिरांनाच प्रथम लागतो. ते शरीरानंच नाही तर मनानंही समाजाच्या तळागाळात असतात. या शाहिरांच्या लेखणी-वाणीत इतिहास सांगण्याचीच नव्हे, तर इतिहास घडवण्याचीही ताकद असते. शाहीर साबळेंनी उभं केलेलं मराठी मुंबईच्या दुर्दशेचं चित्र पाहिलं की, सरकारच्या खोडसाळपणाला व्यक्त होण्याची शक्ती कोणी दिली, हे सांगायला पाहिजे का? ज्या नजरेनं परप्रांतीय मुंबई आपली मानतात, त्यादृष्टीनं महाराष्ट्रातले मराठी आपल्या राजधानीकडे पाहात नाहीत, ती आपलीच राहावी यासाठी झटत नाहीत, हे स्पष्टपणे दिसतं. हा मुर्दाडपणा आपण आणखी किती काळ कवटाळून बसणार? महाराष्ट्र कैलासवासी झालाय का? तसं असेल तर भोळा शंकराचा अवतार धारण करून आपला गोळा करून घेण्याऐवजी मराठीजनांनी आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या हक्काच्या मुंबईसाठी तांडव केलं पाहिजे, ते आकांडतांडव झालं तरी चालेल. ते करण्याचं बळ लाभावं ही तमाम शाहिरांची इच्छा...!"
--------------------------------------
'मुंबई फक्त आमचीच' असं मराठी लोकांनी कधीही म्हटलेलं नाही. परंतु, ज्यांना मुंबई ही धर्मशाळाच वाटते, ते नानाप्रकारे मराठींना डिवचत असतात. मुंबईत जन्म घालवायचा, इथल्या मराठी मुलीशी लग्न करायचं, मुंबईतल्या मराठी मतांवर निवडून येऊन वर आम्ही भाषिक अल्पसंख्य आहोत, असं म्हणत मराठी भाषेवर, मराठी माणसावर कुरघोड्या करण्याचे नीच डाव महाराष्ट्राला आता नवीन नाहीत. अशांना आमदारक्या-खासदारक्या, बरोबरच मंत्रिपदंही मिळतात. पक्ष नेत्यांना पैसा आणि मोटारी पुरवल्या की अशांना मराठी माणसाच्या तोंडावर थुंकत मुंबईत मिरवता येतं, ही बाब एकदा नव्हे, तर अनेकदा दिसलीय. अशांना कधी रजनी पटेल, कधी मुरली देवरा, मुकेश पटेल, किरीट सोमय्या, कृपाशंकर सिंह, मंगलप्रभात लोढा, संजय निरुपम यांच्यासारखा अमराठी तारणहार गवसतो. या साऱ्यांना मागं टाकण्याचं काम राज्य सरकार कडून घडलंय 'मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी गेले, तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत काय उरेल,' असा मराठींची बेइज्जत करणारा प्रश्न राज्यपाल कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात विचारला होता; तो वादग्रस्त ठरला. राज्यपालांना अनाठायी वाद निर्माण करून क्षमायाचनेचे शेण खाण्याची खोडच असावी. काही महिन्यांपूर्वी त्यांनी 'रामदास स्वामी गुरू नसते, तर शिवाजी छत्रपती झाले असते का?' असा प्रश्न उपस्थित करून शब्दांचा यथेच्छ मार खाल्ला. हा वाद शमत नाही, तोच 'पुणे विद्यापीठ'च्या कार्यक्रमात 'जोतिबा फुले आणि सावित्रीबाई यांचा विवाह झाला, तेव्हा त्यांचे वय १३-१२ वर्षांचं होतं. ये उमर मे बच्चे लोग क्या करते है?' असा प्रश्न विचारून राज्यपालांनी वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर 'मुंबई विद्यापीठ'च्या 'कलिना कॅम्पस'मधील 'इंटरनॅशनल स्टुडंट' हॉस्टेलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी या हॉस्टेलला 'वीर सावरकर' यांचं नाव द्यावं, अशी सूचना केली. राज्यपाल हे राज्यातल्या सर्व शासकीय विद्यापीठांचे 'कुलपती'ही असतात. त्यांच्या सूचनेचा मान राखायचा असतो. मात्र, त्यांच्या ह्या सूचनेला विद्यार्थी संघटनांनी विरोध केला. 'छात्रभारती'च्या रोहित ढाले याच्या नेतृत्वाखाली आंदोलनही झाले. त्याचं म्हणणं, 'सावरकरांचा हॉस्टेल व्यवस्थेशी संबंध काय ? भारतात विद्यार्थी हॉस्टेल व्यवस्थेचा पाया कोल्हापुरात राजर्षि शाहू महाराज यांनी रचला. हे लक्षात घेऊन शाहूराजांचं नाव मुंबई विद्यापीठाच्या 'इंटरनॅशनल स्टुडंट हॉस्टेल'ला देणे उचित ठरेल. विद्यार्थी संघटनांचा हा आग्रह योग्य आहे. शाहूराजांनी गरीब-कष्टकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मांडलेला हॉस्टेलचा मोठा पसारा आजही कोल्हापूरच्या दसरा चौक परिसरात पाहायला मिळतो. मराठी-अमराठी अशी भांडणं लावून देणाऱ्या राज्यपालांनी मराठींतही जमेल तिथं भांडण लावण्याचा, फूट पाडण्याचा हलकटपणा केला होता. 'ठाकरे सरकार'च्या विरोधात 'भाजप'नं जितक्या कारवाया केल्या त्यालाही हातभार लावला होता, किंबहुना त्याच केंद्रबिंदूच ते होतं. राज्यपाल हे संविधानात्मक पद आहे. ते राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. 'संविधाना'नुसार, राज्यकारभार चालतो की नाही, ते पाहाण्याची अन् त्याचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवण्यापुरतीच त्यांची मर्यादित जबाबदारी आहे. तथापि, 'मोदी-शहा सरकार'च्या आजवरच्या कार्यकाळात 'भाजप' विरोधी राज्य सरकारांना अडचणीत आणण्यासाठी राज्यपालांचा वापर केला जात असल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय. सत्तेच्या वाटा अडवणारी ही पेंद्यागिरी राजकारणापुरती ठीक आहे. ती मराठी माणसाचा अपमान करणारी ठरणार असेल, तर ह्या आगाऊपणाला विरोध हा होणारच ! तसा राज्यपालांच्या त्या विधानावर तेव्हा झाला होता. त्यावर त्यांनी '... असे बोलून माझ्याकडून चूक झाली. राज्यातील जनतेने विशाल अंतःकरणाने क्षमा करावी, 'अशी माफी मागितली होती. ही क्षमायाचना विस्मरणात जाण्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारींना राजीनामा द्यायला लागला. तथापि, त्याने इतिहास आणि वर्तमान बदलत नाही. 
*मुंबईचा लगाम कुणाच्या हाती राहिलाय*
मराठींनी जी मुंबई ५ वर्षांचा 'संयुक्त महाराष्ट्र'चा लढा देऊन महाराष्ट्रात राखली, ती 'आर्थिक राजधानी'च्या मोहापायी नाही. भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार मुंबई मराठी भाषिक प्रदेशात आली. ती सर्वांची आणि सर्वांसाठी आहे; पण ती मराठी भाषिक महाराष्ट्राचीच आहे. हा इतिहास आहे! त्यात १०६ जणांचे हौतात्म्य आहे. वर्तमान मात्र भयाण आहे. काळ हा घोड्यासारखा असतो त्यावर हुकमतीनं स्वार झालात, तर तो तुमचा होतो. तुम्हाला पाहिजे तिथं पोहोचवतो. अन्यथा फरफट अटळ असते. 'संयुक्त महाराष्ट्र'चा लढा मराठींनी जिंकला. मुंबईसह मराठींचा महाराष्ट्र झाला मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. पण लगाम कुणाच्या हाती राहिलाय? काँग्रेस, भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांना मुंबईचं प्रदेशाध्यक्षपद देवरा, सोमय्या, लोढा, संजय निरुपम यांच्याकडे द्यावसं वाटतं, यातच या प्रश्नाचं उत्तर दडलंय. आज आर्थिक उलाढालीचं एकतरी क्षेत्र मराठी माणसाच्या ताब्यात आहे का? मोठे व्यवसाय जाऊ देत. मच्छी विक्री वा फळ-फूल-भाजी बाजारातले पारंपरिक हक्काचे धंदेही मराठींच्या हातून निसटलेत. औद्योगिकीकरण, शिक्षण, सहकार यातून असंख्य कुटुंबांना आर्थिक स्वस्थता लाभलीय. पण सामाजिक आणि मानसिक प्रगतीचं काय? अस्पृश्यता संपली; पण जाती-धर्माचा अहंकार माजत चाललाय. ६०-७० वर्षांपूर्वी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्यासारखे संत भक्तीच्या माध्यमातून अंधश्रद्धांचं निर्मूलन करत. खचलेल्यांना जगण्याचं बळ देत. आज श्रद्धावंतांवर अंधश्रद्धांचा संस्कार करणाऱ्या स्वयंघोषित परमपूज्य सदगुरू मंडळींचा आणि टीव्ही मालिका, चित्रपटांचा सुळसुळाट आहे. विज्ञान आहे, पण त्यासोबत कॉम्प्युटर, लॅपटॉपचा प्रारंभ नारळ फोडून करणारे अज्ञानही आहे. धनाची श्रीमंती आहे, तशी ज्ञानाची गरिबीही आहे. नामवंत सज्जनाला निवडणूक उमेदवारी स्वीकारण्यासाठी राजकीय नेत्यांनी विनंती करण्याचे दिवस खूप मागे पडलेत. सध्या उमेदवारीसाठी 'फिक्सिंग' करण्याचे दिवस आहेत. पूर्वी राजकारणी लोक गुंड पाळायचे. आता गुंडच राजकारणी पाळतात. पोलीस, न्यायाधीश, तुरुंगाधिकारी, पत्रकार, कलाकारांना विकत घेऊ शकतात. भ्रष्टाचारानं तर प्रसूतिगृहापासून ते स्मशानापर्यंतच्या जीवनप्रवासाला स्पर्श करणारं एकही क्षेत्र सोडलेलं नाही. डोळे दीपवणारी प्रगती महाराष्ट्रात खूप झालीय; तरीही पाऊल टाकताच मराठी माणूस अडखळत असेल; तर कोश्यारींसारखे खोडसाळ राज्यपाल मराठींच्या डोक्यावर आपली 'काळी टोपी' झटकणारच ना ?
*मुंबई नगरीचं लावण्य...!*
'मुडद्यातही जान यावी,' अशा नाना गोष्टी मुंबईत क्षणोक्षणी घडत असतात. त्याचा अनुभव घेण्यासाठीच परप्रांतीयांचे रोज हजारोंचे लोंढे मुंबईत धडकत असतात. मुंबई वाढत्या लोकसंख्येनं त्रासलेली असली तरी तिनं अजून कुणाला झिडकारलेलं नाही. अशा मुंबापुरीचं अनेकांनी रसभरित वर्णन केलंय. शाहीर पठ्ठे बापूराव म्हणतात-'मुंबई नगरी बडी बाँका। जशी रावणाची लंका।' तर 'माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली...!' ही अजरामर 'छक्कड' लिहिणारे शाहीर अण्णाभाऊ साठे 'मुंबईची लावणी'मध्ये लिहितात ,
मुंबईतील उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी l
कुबेरांची वस्ती, इथं सुख भोगतो ll
परळात राहणारे, रात्रंदिवस राबणारे l
मिळेल ते खाऊन,घाम गाळती ll
शाहीर आत्माराम पाटील यांनीही महाराष्ट्राप्रमाणेच मुंबईची ओळख सांगणारी 'शाहिरी गीतं' लिहिली आहेत. अनिरुद्ध पुनर्वसू ऊर्फ नारायण आठवले यांनी तर 'मुंबई गीता' नावानं विडंबनात्मक खंडकाव्यच लिहिलंय. नामदेव ढसाळांचा 'गोलपीठा' आणि 'भाऊ पाध्येंच्या कथाही दृष्टीआडच्या मुंबईत फिरवतात. ह्या साऱ्यात शाहीर साबळेंच्या 'मुंबावतीची लावणी'चं लावण्य काही और आहे. ते असं आहे-
डौल तुझा परी थाट आगळा, 
सुभग सुलक्षणि तू मुंबावती । 
वदन विलोभस मूर्ती गोंडस, 
सुगंधमति तू पुष्पवती ।। 
भ्रमर भुरळती मधुरस पिऊनी, 
अवती भवती मरगळती। 
रूपगुणांच्या खुणा सांगतो, 
रसिकवरा आपसुक कळती ।।१
विपुल केशसंभार कुलाबा, 
दीपगृह खोवून आकडा । 
नक्षीदार जाळीत गुंफला, 
मलबार हिल तो आंबाडा ।। 
मरीनलाइन ठळक मोगरा, 
पुष्पांचा जणू सुबक तिढा। 
नीलकमल लवलवे भोवती, 
शोभिवंत दिसतो मुखडा ।।२
ताजमहाल-गेटवे म्युझियम, 
सोनफुले नक्षी खुलती। 
सचिवालय बिंदी भांगावर, 
चंचल दो बाजूस डुलती ।। 
केसबटा गोदी चौपाटी, 
भाळावर भुरूभुरू हलती ।
सटवीअक्षर युनिव्हर्सिटी जणू, 
टॉवर बुगडी रत्नवती।।३
भाग्य ललाटी ठळक उमटल्या, 
एकशे पाच त्या गोंद खुणा l 
ढळढळीत सौभाग्य लाभले, 
उरली ना शंका कुणा ll 
सेंट्रल टेलिग्राफ जीपीओ, 
कान सुबक दोन्हीच म्हणा. 
लायब्ररी हायकोर्ट हिरकणी, 
कर्णफुले खुलवित जना ll४
चर्चगेट अन् बोरीबंदर, 
डोळे गहिरे चमक उठे।
दिपून भुंगे मधुपोळ्यावर, 
घोंघावत मोहाळ सुटे।। 
म्युनिसिपालिटी कळी नासिका, 
नथनी मोत्याचीच नटे ।। 
चिरीमिरीच्या शिंका सर्दी, 
तरीही मोती कधि न फुटे ।।५
चमकी डाव्या नाकी खुलते, 
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट असे। 
रंगखड्यांचे कितीही बदलो, 
चित्र नेमके तेच दिसे ।। 
सीआयडी- पोलीस केंद्र जणू, 
गालावरचा तीळ असे। 
लहान नाजुक तोवर सुंदर, 
चरता गाली डाग दिसे ।।६
मुळजी जेठा बाजारपेठा, 
मार्केट तोटा कुठे नसे l
गोफ सोनेरी बारा पदरी, 
घट्ट गळ्याला धरून बसे। 
धान्य मसाला काथ्या जव्हेरी, 
बाजार सारे विसरू कसे । 
भवती पुतळ्या चितंग मध्ये, 
जय्या लोखंडी उठून दिसे ॥॥७
दागदागिने बहुत त्यातला, 
एक दागिना ठळक दिसे। 
काळ्या मण्यांची पोत डोरलं, 
गिरगावाची शान असे।। 
रोलगोल्डचा एक दागिना, 
सर्वाहून वेगळा दिसे।। 
भायखळ्याचा चर्च मधोमध, 
लांब साखळी रुजत असे ।।८
भुज्या दोन त्या महालक्ष्मी, 
आणि डोंगरी पुण्य घड़े। 
राणीबाग रेसकोर्स दंड ते, 
बाहीतून अर्धे उघडे ।। 
वक्षस्थल लालबाग बरळी, 
भर छातीचा दोहिकडे । 
करकचली कंचुकी तटातट, 
तारुण्याची ध्वजा उडे।।९
गिरमदुनि बांधली चोळीची गाठ, 
परळ टी.टी.त खरी। 
विटलेल्या चोळीत ज्वानीच्या, 
सौंदर्याची जादुगिरी ॥ 
दादर टी.टी. देठ बेंबीचा, 
सिंहकटि निरखली पुरी । 
टिळकपूल हा सलग बांधला, 
पट्टा नारीच्या कमरेवरी ।।१०
पार्क शिवाजी हिंदू कॉलनी, 
नितंब नित आनंदभरी। 
सेंट्रल वेस्टर्न निऱ्या साडीच्या, 
पायघोळ पसरल्या दुरी। 
माहीम माटुंगा मांड्या रेखीव, 
साडीचा चुरगळा करी । 
शीव बांदरा घट्ट पोटऱ्या, 
सळसळ हलते निरीनिरी ।।११
निळाशार सागर भवती जणू, 
मोरपिशी पैठणी जरी।
नीटनेटकी नार नेसली, 
काट रुपेरी चमकभरी ।।१२
विरार वसई कल्याण ठाणे, 
नेकीचे पाऊल पड़े। 
उपनगरे दाही बोटांची, 
संगत त्यांना सदा जडे ।। 
उभी आकृती सुकृतसुंदर, 
पाप्यांची पापणी उडे। 
मर्दमराठी तुझाच मालक, 
चिरडून टाकील दुष्ट किडे ।।१३
शाहीर साबळेंची ही कलाकारी मुद्दाम संपूर्ण दिलीय. कारण छापील रूपात उपलब्ध नाही. १९६६ मध्ये शाहीर साबळेचं 'आंधळं दळतंय' हे मुक्तनाट्य रंगभूमीवर आलं होतं. तेव्हा मुंबईतली मराठी मनं परप्रांतीयांच्या आक्रमणानं तगमगत होती. तिला वाचा फोडण्यासाठी-
महाराष्ट्राच्या मर्द मराठ्या, ध्यानी जरा घेई, स्वाभिमानाला आग लागली, शुद्धी कशी नाही?
परके आले घरात शिरले, मालक ते झाले !
हक्कावाचूनी वणवण फिरणे, तुझ्या नशिबी आले!
अशी ललकारी देत मराठींना संघटित करण्याची गरज होती. शाहिरांनी मराठींचा स्वाभिमान जागवणारी ललकारी 'आंधळं दळतंय' मधून दिली; तर मराठींना संघटित करण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी 'शिवसेना'च्या माध्यमातून केलं. 'बेस्ट'च्या बसवरचं फ्लोरा फाऊंटनचं 'हुतात्मा स्मारक' असं नामांतर 'आंधळं दळलंय'नं केलंय. मराठी माणूस संघटित झाला, तसा शाहिरांनाही आनंद झाला. आता मुंबईचं मराठीपण ज्वलंत होणार, फुलणार, बहरणार असं त्यांना वाटू लागलं. त्या मस्तीत त्यांनी त्यांना मुंबई जशी दिसली, तशी लावणीत आणली. या लावणीची जन्मतारीख १ ऑगस्ट १९६७ अशी आहे. १ ऑक्टोबर १९६७ ला 'आंधळं दळतंय' चा शतक महोत्सवी प्रयोग झाला. त्यावेळी ही लावणी शाहिरांनी सादर केली. त्यानंतर ही लावणी चोपडीत राहिली.
*युतीमुळे मराठी अशी झुकली..!*
'पद्मश्री' शाहीर साबळे यांना 'संपूर्ण महाराष्ट्र समिती'ने २००० च्या 'महाराष्ट्र दिनी' हुतात्मा स्मारकाच्या साक्षीने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र वंदना'च्या कार्यक्रमात बोलाविले होते. तेव्हा -
मराठीच धरणी, मराठीच शाळा । 
परंतु उमाळा कुणाला नसे।। 
मराठी निमाली, मराठी हमाली। 
नसे कुणी वाली हे झाले कसे ।। 
हा 'आंधळं दळतंय' मधला फटका त्यांनी उपस्थितांना ऐकवला. हा कार्यक्रम त्यांना अस्वस्थ करून गेला असावा. ते सांगत होते, "गेली ५० वर्ष मी मुंबईत राहातो. सर्व बदल मी अनुभवलेत. आताचा वेग मात्र महाभयंकर आहे. आता जे काही पाहातोय, अनुभवतोय, ते सहन होत नाहीये. परंतु त्याला आपणच जबाबदार आहोत. वयपरत्वे पूर्वीसारखी रचना करणं जमत नाही. पण मनातली तगमग आवरत नाही म्हणून एक रचना लिहून काढलीय. तगमगीला वाट मोकळी करून देण्याचा हा प्रयत्न आहे...!" तेव्हा वयाची ७८ वर्षे गाठलेल्या शाहिरांकडून जी रचना झाली. ती आणखी अस्वस्थ करणारी होती. ती वाचताना तुम्हालाही आजच्या सत्ताकेंद्री राजकारणाचा उघडा-नागडा पाया दिसेल. त्यात शाहीर लिहितात -
मराठीचा मळवट पुसला, राहिली टिकली 
आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली।। ध्रु
शिवतीर्थावर गर्जला मराठी बाणा 
एकजात मराठागडी जाहला शहाणा 
तेव्हा नव्हता कुणी सजविला सत्तेचा मेणा 
मराठीचं गणित मांडले पण बेरीज चुकली ।।१
मुंबईसह महाराष्ट्र केली घोषणा 
भाळावर एकशे सहा गोंदल्या खुणा l
हुतात्म्यांच्या स्मारकापुढे घेतल्या आणा 
तत्त्वाला देऊन डूब, सत्तेची ऊब, मराठी झुकली ।।२
मराठीच्या रक्षणासाठी सजविली सेना 
काही काळ उडवली घुसखोरांची दैना 
पण मधे डोईवर चढली सत्तेची मैना 
आम्ही खुर्चीपायी मराठी अस्मिता फुंकली ।।३
एकसंध मराठी बंधु घरोबा होता 
'जय महाराष्ट्र' म्हणायचो आम्ही जाता येता 
गिरगाव, गिरणगाव, दादर कोठे आता डोंबिवलीपासून उपनगरे आम्ही जिंकली ।।४
पूर्वी शिवतीर्थावर गर्जत होता मराठी 
आता बिहारी यादव फिरवित येती काठी 
कुणी आम्हास छेडील त्यास करू आडकाठी 
झालो थंड आम्ही त्यांच्यापुढे मराठी झुकली ।।५
सारे पक्ष आजारी झाले बदलती खांदा 
ही सत्ता गेल्यावर होईल आपला वांदा 
महाराष्ट्र तोडायचा म्हणून काढला धंदा आकाशातल्या खुर्चीची नशा जमिनीला टेकली ।।६
सामाजिक, राजकीय बदलांचा वास शाहिरांनाच प्रथम लागतो, असा इतिहास आहे. कारण ते शरीरानंच नाही तर मनानंही समाजाच्या तळागाळात-मनात असतात. या शाहिरांच्या लेखणी-वाणीत इतिहास सांगण्याचीच नव्हे, तर इतिहास घडवण्याचीही ताकद असते. शाहीर साबळेंनी उभं केलेलं मराठी मुंबईच्या दुर्दशेचं चित्र पाहिलं की, सरकारच्या खोडसाळपणाला व्यक्त होण्याची शक्ती कोणी दिली, हे सांगायला पाहिजे का? ज्या नजरेनं परप्रांतीय मुंबई आपली मानतात, त्यादृष्टीनं महाराष्ट्रातले मराठी आपल्या राजधानीकडे पाहात नाहीत, ती आपलीच राहावी यासाठी झटत नाहीत, हे स्पष्टपणे दिसतं. हा मुर्दाडपणा आपण आणखी किती काळ कवटाळून बसणार? महाराष्ट्र कैलासवासी झालाय का? तसं असेल तर भोळा शंकराचा अवतार धारण करून आपला गोळा करून घेण्याऐवजी मराठीजनांनी आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या हक्काच्या मुंबईसाठी तांडव केलं पाहिजे, ते आकांडतांडव झालं तरी चालेल. ते करण्याचं बळ लाभावं यासाठी शाहीर साबळे खणखणीत शब्दांत सुनावतात -
संपूर्ण महाराष्ट्र राखाया जो झटतो 
तो मातेच्या गळसरी कोंदणी नटतो 
बुझदिल षंढ जो असेल मागे हटतो 
आता पुन्हा करा घोषणा ही मुंबई आपली 
हे मराठी राजा काळजापरिस तू जपली ।।७
शाहीर साबळे १० वर्षांपूर्वी गेले. त्यांचे जन्मशताब्दी वर्षही कधीच सरलंय. लेखणी-वाणी आणि कलाकारीनं 'महाराष्ट्राचा बाणा' तेजस्वी राखणाऱ्या शाहिरांची अपेक्षा फोल ठरू नये.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
 
No comments:
Post a Comment