Sunday, 19 October 2025

*विचारांची दिवाळी....!*

"दीपप्रज्वलन काय असतं. समाज कर्मकांडांत जखडला. पण समाजाची चिंतनशील वृत्ती तप्त ज्वालामुखीसारखी चार्वाकांच्या, गौतम बुद्धांच्या, महानुभावांच्या, ज्ञानदेवांच्या, नामदेवांच्या, तुकोबांच्या, महात्मा फुलेंच्या तोंडून रुढींवर तप्त लाव्हारस फेकत राहिली. बुद्धांच्या 'अत्त दीपो भव' मध्ये चिंतनशील होण्याचा संदेश होता. ज्ञानदेवांच्या 'का घराचिये उजेडू करावाl पराविये अंधारू करावाl हे नणेचि गा पांडवाl दीपु जैसाll' मधून दिव्यासारखं समतावादी होण्याचा आग्रह होता. नामदेवांच्या 'नाचू कीर्तनाचे रंगीl ज्ञानदीप लावू जगीll' असा उपदेश होता. महात्मा जोतिबा समाजहितैषी परंपरेतून जीवनाची ज्योत पाजळूनच अज्ञानांधकार दूर करण्या कटिबद्ध झाले. दीपावलीच्या दीपोत्सवाला महात्म्यांच्या चिंतनाने अर्थपूर्णता लाभली. देव-धर्मवादी उन्मादाने जगाला विनाशाच्या अंधारात ढकलण्याचा चंग बांधलाय. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनोमंदिरात विवेकाचे दिवे उजळणं आवश्यक झालंय. समतेचा, बंधुत्वाचा, स्वातंत्र्यदीप पाजळला तर मानवजातीचं कल्याण दूर नाही!"
........................................................
*ये* दिवाळी ये...... विघ्नहर्ता गणेश घरी निघाले की, आम्ही 'पुढच्या वर्षी लवकर या...' म्हणून त्यांची आळवणी करतो. तुला असं आम्ही आळवत नाही, पण तू यावीस अशी इच्छा मात्र आम्ही मनात सतत तेवत ठेवतो. तू आलीस की, आम्हाला बरं वाटतं, हे आता तुझ्या लक्षात आलं असेल. घरोघर आम्ही दिवे लावतो. तुझ्या येण्याने तरी आमच्या अंधारल्या जीवनात प्रकाश यावा या आशेनेच हे घडतं. पण अजूनही सगळीकडचं अंधाराचं सावट आहे तसंच आहे. अंधार घालवायचा असेल तर एक चिमुकला दिवा लावा, असं कुणा साधुपुरुषानं केव्हातरी कुणाला तरी सांगितलंय म्हणतात. दिवे लावताना आम्ही ते आठवत असतो. दिवे लावतो, दीपोत्सव घडवतो, पण ह्या प्रकाशाच्या साक्षीने अंधारच अधिक दाटतो. आम्ही बाहेर दिवे लावतो, अंतरीचा ज्ञानदिवा विझून गेलाय याची आम्हाला दादच नसते. दिवाळी, कधीतरी तू आम्हाला साहिरोबांप्रमाणे 'अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे' असं निक्षून सांगशील का? तुझ्या लक्षात आलं असेल, आम्ही सोंगट्या बदलून नवा डाव खेळायला सुरुवात केलीय. बुद्धिबळात काळ्या आणि पांढऱ्या दोनच रंगाच्या सोंगट्या असतात, पण रंग वेगळे असले तरी दोन्ही सोंगट्यांची चाल सारखीच असते. पांढरा उंट तिरका जातो, तसाच काळा उंटही तिरकाच जातो. पांढरा घोडा अडीच घरे उडतो, तसाच काळा घोडाही अडीच घरेच उडतो. आमच्या नव्या सोंगट्यासुद्धा जुन्या सोंगट्यांसारखाच खेळ रंगवतील असं दिसतंय. आम्ही खिलाडू आहोत. आम्हाला 'बकअप' म्हणून सीमेबाहेरून ओरडायची हौस आहे. घोषणा करण्यात आमचे पुढारी जसे पटाईत आहेत तसेच 'की जय'चा घोष करण्यात आम्हीही पटाईत आहोत. जयजयकाराचा घोष सतत कानात दुमदुमत असला की, हरल्याची खंतच उरात उरत नाही. गांधीजींनी वाईट कधी बघणार नाही, वाईट कधी बोलणार नाही, वाईट कधी ऐकणार नाही असा संदेश तीन माकडांच्या द्वारा दिला. तोंड, डोळे, कान झाकणाऱ्या त्या माकडांना आम्ही आमचा आदर्श मानलंय. आम्ही तोंड असून न बोलण्याचा, डोळे असून न बघण्याचा, कान असून न ऐकण्याचा वसा घेतलाय. गांधींनी वाईट बोलणं, वाईट बघणं, वाईट ऐकणं नको म्हटलं होतं, पण त्यांच्यात चांगलं-वाईट पारखण्याची पात्रता होती. आम्हाला चांगलं काय वाईट काय हे ओळखणे कठीण झालंय.
जिब्रानची एक छान रूपक कथा आहे. परमेश्वरानं जग बनवतानाच एक सौंदर्यदेवी आणि कुरूपतेची देवी बनवली. दोघींना त्यांची ओळख पटावी अशी वस्त्रे-अलंकार दिले. दोन्ही देवींना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. दोघी तो कंटाळवाणा लांबचा प्रवास करून पृथ्वीवर आल्या आणि एक नितांत सुंदर सरोवर बघून त्यांनी तिथे आंघोळ करण्याचे ठरवले. दोघींनी आपली वस्त्रे-आभरणे काढून व्यवस्थित ठेवली आणि त्या सरोवरात शिरल्या. कुरूपता देवीने आपले स्नान झटपट ओटोपले, बाहेर पडून सौंदर्यदेवीची वस्त्रे-आभरणे अंगावर चढवली आणि ती निघून गेली. सौंदर्यदेवी बाहेर आली. आपली वस्त्रे नाहीत. करायचं काय ! शेवटी कुरूपता देवीची वस्त्रे चढवणे तिला भाग पडले. तेव्हापासून सौंदर्यदेवीची वस्त्रे लेवून कुरूपतादेवी वावरते आहे. कुरूपतेची वस्त्रे लेवून सौंदर्यदेवी वावरते आहे. जिब्रानच्या कथेत सौंदर्य-कुरूपता देवी आहेत. पण हीच कथा सत्य-असत्य, सुख-दुःख यांचीही आहे. सत्याची वस्त्रे लेवून असत्य वावरते, सुखाची वस्त्रे लेवून दुःख वावरते असे आपण अनुभवतो ते यामुळेच. दिवाळी, निदान सत्यात दडलेले असत्य, दुःखात दडलेला आनंद ओळखता येईल एवढा प्रकाश तू आमच्या डोक्यात पाडू शकशील ?
उरातले दुःख, निराशा आणि सदैवच मागे लागलेल्या विविध चिंता-आपदा विसरून आम्ही तुझे स्वागत 'आज आनंदी आनंद झाला' म्हणत करतो, हे तुला ठाऊक आहे. यावेळी निर्मल मनाने तुझे स्वागत करता येईल असे वाटले होते, पण तशी परिस्थिती नाही. राजसत्तेनं साखर, तेल, बेसनडाळ असलेला 'आनंदाचा शिधा' देण्याचे गोड सरकारी वचन दिलं होतं, ते मात्र राजसत्तेनं पाळले नाही. महागाईने जेरीस आलेल्या घरात बेसनलाडू बनवण्याचे बळ कुठून येणार? फटाक्यांचा कडकडाट ऐकतानाही काळजाला कंप फुटतो. कुठेही केव्हाही बॉम्ब फुटण्याचे भय कायमचेच माध्यावर टांगले गेले आहे.
शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुलाबाळांना सुट्ट्या असल्याने ती घरातच डोळ्यापुढे असणार. पण यांच्या नशिबात काय आहे, ह्या मुंग्यांनी मेंदू पोखरून काढलाय. लिगपिसाट-धनपिसाट सैतानांच्या सावल्या भोवती फेर धरून नाचत आहेत असं वाटून सरळमार्गी सज्जन अजूनही थरथरत आहेत, तरी आम्ही दिवे लावून तुझे स्वागत करत आहोत. तू म्हणशील तर आणखीही रोषणाई करू, वीजटंचाईची चिंता आम्ही करत नाही. तू करू नकोस. तुझ्यासाठी सारे काही करायला आम्ही सिद्ध आहोत. दुःखाचे फाजील प्रदर्शन करण्यात आम्ही जसे पटाईत आहोत, तसेच साऱ्या संकटांची, धोक्यांची दैन्याची, दुःखाचीही तमा न बाळगता सोहळ्यांचा जल्लोष उडवण्यातही आम्ही पटाईत आहोत. ज्यांना भवितव्यच नसते ते असेच आपल्यापुरते उन्मादी आत्मानंदात वर्तमान उधळून टाकतात, असं म्हटलं जातं. दिवाळी, कुणाला सांगणार नाही. मला सांग, खरंच का आम्हाला काही भवितव्य नाही?
जगाला दहशतवादाने आणि माणसाला अनेक ताणतणावांनी ग्रासलंय. या दोन्ही समस्या आजच्या नाहीत. पृथ्वीवर कधी काळी माणूस निर्माण झाला, तेव्हापासून या समस्या आहेत; आणि त्या मानवनिर्मित आहेत. या समस्यांचं मूळ मानवी स्वभावाच्या अहंगंडात आणि उणिवात आहे. साहित्यकार प्र. के. अत्रे यांनी ज्यांना 'कारुण्याचा विनोदी शाहीर' म्हटलं, त्या दत्तू बांदेकरांची आधुनिक काळातील आदम आणि ईव्ह ही कथा आहे. हे दोघेही कापडाच्या दुष्काळामुळे त्रस्त असतात. काळ्या बाजारातील महागडं कापड त्यांना परवडत नसतं. ते गरीब असतात; जेमतेम आडोशाच्या झोपडीत ते राहात असतात. लाजेस्तव ते रात्रीच्या वेळी नदीवर आंघोळीला जातात. ईव्ह आधी परतते. आदमनंतर येतो. तो दार ठोठावतो. ईव्ह दार उघडत नाही. ती आतून म्हणते, 'मी वस्त्रहीन आहे...!'. 'तो म्हणतो, 'अगं, दिवा विझवून टाक. म्हणजे अंधारात तू मला दिसणार नाही....!' ईव्ह लटक्या रागात म्हणते, 'जनाची नाही, तरी मनाची लाज...!' आदम हैराण होतो. तो म्हणतो, 'अगं, लवकर दत्तू दार उघड. मीदेखील बाहेर दिगंबर अवस्थेतच आहे...!' ईव्ह विचारते, 'अहो, तुमच्या अंगावर लंगोटी होती ना...?' आदम म्हणतो, 'नदीवर आंघोळ करायला गेलो, तेव्हा लंगोटी धुऊन वाळत टाकली. ती कुत्र्याने पळवली. अंधारात तसाच नागवा पळत आलोय! पण तूही अशी कशी? कालच मी तुला पिंपळाच्या पानांची साडी बनवून दिली होती ना! तिचं काय झालं...?' ती म्हणते, 'ती बकरीनं खाऊन टाकली...!' आदम विचार करून म्हणतो, 'मग आंब्याच्या डहाळ्यांनी तरी लाज झाकायची...!' ईव्ह म्हणते, 'त्याला मोठ-मोठे मुंगळे लागलेत...!' तो म्हणतो, 'अगं, मग केळीच्या पानाचा तरी उपयोग करायचा...!' ती म्हणते, 'केळीची पानं नेसली की गाई-म्हशी माझ्या अंगाला भिडतात. सकाळीच केळीच्या पानाची चड्डी शेजारच्या बैलानं खाल्ली! सरकार कपडा देत नाही आणि जनावरं झाडपाला नेसू देत नाहीत. आता मी करू तरी काय...?' आदम बाहेरून ओरडतो, 'मी तरी काय करू? लोकं म्हणे प्रेतावरचं वस्त्र पळवतात. म्हणून मी स्मशानात जाऊन तोही प्रयत्न करून पाहिला. एका प्रेतावरचं वस्त्र हळूच उचलण्याचा प्रयत्न केला. आणि तुला काय सांगू? ते प्रेतच जिवंत झालं. आपल्या प्रेतावरचं वस्त्र कुणी चोरील या भीतीने लोकही आजकाल फार मरत नाहीत...!' ईव्ह म्हणते, 'म्हणजे सारेच उपाय हरलेत म्हणायचे...!' आदम म्हणतो, 'म्हणून मी म्हणतोय. दार उघड. अंधार आहे तोपर्यंत पळत जाऊन गुहेत लपून बसू या. हा पहा सूर्योदय होत आलाय. चल, पळ लवकर. नाही तर आपल्या दोघांना अशा अवस्थेत पाहून उगवलेला सूर्यसुद्धा मागे परतायचा...!' ही गोष्ट बरीच मोठी आहे. तिचं हे सार आहे. ते आज भेडसावणाऱ्या समस्येवर विचार करताना, त्यावर उपाय शोधताना आपण मानवी जीवनाच्या सुरुवातीपर्यंत नकळत कसे पोहोचतो, याचा अनुभव देणारं आहे. अपायांवर शोधून योजलेले उपाय-उपचार हेच आपल्या ताणतणावांचे आणि समस्यांचे कारण आहेत. ब्लड प्रेशर मोजण्याच्या यंत्राचा शोध लागला नव्हता, तोपर्यंत ताण कळत नव्हता. आधुनिक एमआरआय तपासणीत रुग्णाच्या शरीरातले सर्व ताणतणाव-बिघाड कळतात. पण त्याचा रिपोर्ट मिळेपर्यंत रुग्णाच्या आप्तांच्या ताणतणावांत वाढ झालेली असते. माहिती तंत्रज्ञानामुळे जगातल्या घडामोडीचं काही संकेदांत सार्वत्रिकीकरण होते. हे काम प्रसारमाध्यमं चोखपणे पार पाडतात. परिणामी, कुठेतरी दूर घडलेली दुर्घटना आपल्याला हादरवते. दहशतवाद असाच जागतिक झालाय. अनेक वर्षांपासून माणूस राजेशाही, धर्म-भटशाही आणि परतंत्रशाहीचे प्रहार सोसतोय. आजच्या लोकशाहीव्यवस्थेत तो पब्लिक ओपिनियनचे छुपे प्रहार झेलतोय. यासाठी राजकीय पक्षांचं सत्ताकेंद्री बनेल राजकारण आणि प्रसारमाध्यमांची टीआरपी वाढवण्यासाठीची छटेल स्पर्धा विश्वासघातकी हत्यारासारखी वापरली जातेय. परिणामी, लोकशाहीमुळे राजेशाही आवळून त्याची जागा राजकारणातल्याच नाही, तर सर्वच क्षेत्रातल्या घराणेशाहीने घेतलेली दिसतेय. विज्ञानयुगात नटवी-फसवी धर्म-भटशाही संपली पाहिजे होती. पण ती नव्यानं वाढलेल्या मार्केटिंग आणि मीडिया एक्स्पर्टाच्या जोडीने टिकून राहिली आहे. ह्या सर्व धर्म-भटशाहीची मंत्र-तंत्रीय पोपटपंची लोकांना समजत नव्हती. तरी तिचा समाजावर अंमल होता. राजसत्तेला झुकवण्याची तिच्यात शक्ती होती. तथापि, त्यांची ही करामत लोकल होती. 'इंटेलेक्च्युअल' म्हणवणाऱ्या आजच्या मीडिया आणि मार्केटिंग एक्स्पर्टाचा आवाका फार मोठा आहे. ग्लोबल आहे. धर्म-भटशाहीने माणसाच्या विचारशक्तीवर पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, उच्च-नीच आदि भेदांचे आघात करीत ती बथ्थड केली आणि आपले स्वार्थ साधले. तेच काम आजचे ग्लोबल एक्स्पर्ट करीत आहेत. एडस् आणि योग या विरोधी विकार आचारांचं असंच ग्लोबलायझेशन झालंय. दोन्हींच्या वाढीत माणसाच्या सुख-शांतीचा हव्यास आहे. स्वतःला ओळखण्याची कुवत नसलेली माणसं अशा हव्यासात फसतात. माणसाला सुख-शांतीच्या समृद्धीची ओढ असते; त्याला ती आवडते. पण गरिबीवर उपचार करण्यास तो तयार नसतो. गरिबी म्हणजे विचारांची गरिबी. रूढी-परंपरा जपणाऱ्या धार्मिकतेने मानवी चेहऱ्याला नालायकीचं काळं फासलंय. मानवता ग्लोबल होण्याआधी सनातनी-कट्टर धर्मवादाने माजलेला दहशतवाद ग्लोबल झालाय. हे विचारांच्या दारिद्र्यामुळे घडलंय, घडतंय. विचार म्हणजे काय? आदिमानवाने मोठ्या दगडाला हटवण्यासाठी त्या दगडाखाली लाकडाचा ओंडका घालून तो दगड हवा तिथे ढकलत नेला, हा पहिला विचार! ज्याने एखाद्या वस्तूला गोलाकार चक्राकृती बनवून त्यावस्तूला गतिशील बनवलं, तो दुसरा विचार! हा प्रयत्न करणाऱ्याला लोकांनी आधी चक्रम ठरवलंय. पण विचारवंत काकासाहेब कालेकरांनी त्याला चक्रऋषी म्हटलंय. तिसरा विचारक अग्नीचा शोध लावणारा. चौथा विचारक गायीला उपयुक्त पशू बनवणारा. पाचवा विचारक शेतीला सुरुवात करणारा. 
या आद्य विचारांमुळेच मानवी विचारांना आणि जीवनाला गती मिळून मानव नव्या-नव्या विचारांनी इतिहास घडवत भविष्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. विचार केवळ मानवी जीवन सुसह्य, समृद्ध करणाऱ्या शोधांचाच नसतो; तर माणूसपण टिकवणारा, गुलामी झिडकणारा, स्वाभिमान दाखवणाराही असतो. 'फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहा...!' असं भगवद्गीतेतला श्रीकृष्ण सांगतो. तोदेखील विचार आहे. पण व्यवहारात तो निष्काम कर्मयोग ठरतो. विचार कृतीत येणं, तो साकार होणं, हा खरा विचार! छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या मंत्र मावळ्यांत भिनवला आणि तसं स्वराज्य निर्माण केलं, महात्मा जोतिराव फुलेंनी सत्याचा आग्रह धरला आणि धर्माच्या नावाखाली जातीभेदाच्या भिंती निर्माण करणाऱ्या भटीव्यवस्थेचा चेंदामेंदा करण्याचा विचार समाजाला दिला. शिक्षण-स्त्री शिक्षण सर्वांसाठी खुलं करण्याचा आग्रह धरला आणि तो तडीस नेला. शाहूराजांनी जातिनिशी शूद्र ठरवून दारिद्रय लादलेल्यांसाठी आरक्षण हा विचार दिला आणि तो आपल्या कोल्हापूर संस्थानात अंमलातही आणला. आजच्या आरक्षणाच्या भूमिकेमागे शाहूराजांचाच विचार आहे. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यांचा आणि अस्पृश्यता विरोधी विचार दिला. त्यासाठी ते झटले-झगडले. स्वातंत्र्य मिळालं, अस्पृशता पाळणं हा गुन्हा ठरला. त्यांनी सत्य हाच परमेश्वर हा विचारही दिला. पण सत्तालोभी गांधीवाद्यांनी गांधीनाच फोटोत लटकवलं आणि पुतळ्यात कोंबलं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा विचार आपल्या अनुयायांना दिला. यामुळे करोडों लोकांना आपल्या विकासाचा मार्ग मिळाला. जगविख्यात विचारवंत आइनस्टाइनने E=mc² हा विचार दिला. त्यामुळे विज्ञान आणि गणितातले अनेक बुंले सुटले, नवे शोध लागले. हा सारा इतिहास म्हणजे विचारांची यात्रा आहे. विचाराच्या प्रक्रिया निर्मितीतच आजचा अंधार दूर करणारा प्रकाश उजळेल. त्यासाठी दिवाळी विचारांचीही हवी. दिवाळी आली किंवा एखादा सण आला की, आपण घराचे काने कोपरे साफ करतो. त्याचप्रमाणे मनातील कटुता, वाईट आठवणी किंवा एखाद्याने केलेली फसवणूक आपण मोठ्या मनाने विसरून जायला हवी. आज धकाधकीच्या जीवनात माणसाच्या मनावर कुटुंब, नोकरी-धंदा, मित्र परिवार याचं माठं ओझं असतं. त्यात रोज नव्या दुःखाची वाढ होत असते. अशा परिस्थितीत अनावश्यक कचरा कशाला मनात ठेवायचा? कष्ट शरीराला थकवतात; तर कडवेपणा मेंदूला थकवतो. काही वेळा हा कडवेपणा स्वतःबद्दलही असतो. तो आपल्याला संपवतो. खऱ्या अर्थाने दोनच प्रकारची माणसं जगत असतात. एक, ऐश्वर्य आणि सत्ता-अधिकार असूनही ज्यांच्या अंगी क्षमाशीलता आहे, असे; दोन, गरीब असूनही आपल्या अर्ध्या घासातला अर्धा घास गरजूला द्यावासा वाटतो असे. हा विचार आहे, माणूसपणाची कसोटी घेणारा. या कसोटीसाठी मनाची साफसफाई करावी लागते. त्याशिवाय विचारांची उजळणी कशी होणार? दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विचारांची दिवाळी आवश्यक आहे. अन्यथा बांदेकरांच्या आधुनिक आदम आणि ईव्ह सारखंच आपल्यावरही गुहेत राहाण्याचे दिवस येतील. जो माणूस, समाज विचारांना टाळतो, विचार करण्याचंही टाळतो; त्यांना गरिबीही टाळता येत नाही. सुख-शांतींच्या समृद्धीसाठी विचार हा हवाच. विचार कधी मरत नाही आणि फार काळ दडपलाही जात नाही. माणसाच्या विचार निर्मितीचं केंद्र मन आहे. ते स्वच्छ असेल तर आणि तरच लोकोपयोगी विचार निर्मिती होणार. असं मन विश्वमनाशी युनिव्हर्सल माईंड जोडलं जाणार! कारण विचार हा सर्वसंचारी असतो. महात्मा गांधींनी स्वच्छ मनाने स्वातंत्र्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी ते सत्याग्रही झाले. इतरांतही सत्याग्रह रुजवला-वाढवला. म्हणूनच त्यांचं विचारकार्य ग्लोबल झालं. बुद्धाचे विचार विश्वशांतीचा संदेश देणारे झाले. अशांच्या विचारांनी आपण व्यवहारात वागलो, तरी दिवाळीचा आनंद चार दिवसांपुरताच मर्यादित देणारा राहाणार नाही; तर त्याने आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण आनंददायी होईल. असा चिरंतन आनंद आपणास लाभो !
हरीश केंची 
९४२२३१०६०९




No comments:

Post a Comment

लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्...