"प्रयागराजच्या कुंभमेळ्यात गंगा यमुना नदीच्या संगमावर मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर स्नान करून पुण्य मिळविण्यासाठी गेलेल्या काहींना पुण्यात्मा तर अनेकांना जायबंदी व्हावं लागलंय. साऱ्या यंत्रणा हाती असतानाही मृतांची संख्या निश्चित करायला १८ तासाहून अधिक काळ लागला. सामान्य भक्तांऐवजी व्हीआयपीच्या आदरतिथ्यात प्रशासन गुंतल्यानं साधू संत आखाड्यांनी संताप व्यक्त केलाय. ८७४ व्हीआयपीच्या सुविधांसाठी सारं सरकार तैनात होतं पण १२ कोटी सामान्य भक्तांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्यानं साधूंनी कुंभमेळ्याची व्यवस्था लष्कराकडे द्या, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनाम्याची मागणी केलीय! येत्या ५ फेब्रुवारीला प्रधानमंत्री इथं येताहेत, त्यांनी येऊ नये अशी विनंती साधूंनी केलीय!"
.................................................
*म*हाकुंभमेळ्यात शाहीस्नानसाठीची संगमावरची यंत्रणा कमकुवत होती. तिथली व्यवस्थाच गायब झालेली. ४० कोटी लोक येणार आहेत अशावेळी स्थानिक व्यवस्था ऐवजी ती लष्कराकडे द्यायला हवी होती असं मत महामंडलेश्वर प्रेमानंद यांनी व्यक्त केलंय. त्यांच्यामते, केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री, विविध राज्याचे मुख्यमंत्री, उद्योगपती, सनदी अधिकारी अशा व्हीआयपींसाठी त्यांचं स्वागत, वाहतूक, दर्शन, स्नान, प्रसाद यासाठी जी यंत्रणा तैनात केली होती. त्यासाठी सारे प्रोटोकॉलचे कर्मचारी राबत होते. त्यामुळं सामान्य भक्तांकडे दुर्लक्ष झालं होतं. त्याचा फटका बसलाय. जो रस्ता संगमाकडं जातो त्यातला निम्मा रस्ता हा केवळ व्हीआयपीसाठी राखून ठेवलाय अन् निम्मा हा सर्वसामान्य भक्तांसाठी! एवढंच नाही तर रेल्वे स्थानक, महामार्ग, विमानतळ इथंही अशीच व्यवस्था होती. हा कुंभमेळा सामान्य भक्तांसाठी आहे की व्हीआयपीसाठी? अशी परिस्थिती आहे. कारण २३ केंद्रीय मंत्री, ५२ इतर मंत्री, काही मुख्यमंत्री, आमदार, खासदार असे जवळपास दुर्घटना होणाऱ्या दिवसापर्यंत ८७४ व्हीआयपी तिथं आले तर १२ कोटी सामान्य भक्त! जी यंत्रणा ८७४ व्हीआयपीना देण्यासाठी राबली, तेवढीच १२ कोटीं सामान्यांसाठी ठेवली गेली. रस्ते तेवढेच, जागा तेवढीच, गाड्या, पोलीस यावरचा ताण वाढला होता. निम्मा रस्ताच सामान्यांसाठी होता मग गर्दी अन् चेंगराचेंगरी होणारच! सुरुवातीचे काही दिवस होणाऱ्या या गैरसोयी पाहता व्हीव्हीआयपीची यंत्रणा पाहणारे प्रोटोकॉल प्रमुख ईशान प्रशांतसिंग यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना दोन पानी पत्र कुंभमेळापूर्वी पाठवलं होतं. त्यात त्यांनी ५ फेब्रुवारी पर्यंत कुणीही प्रयागराजला येऊ नये, त्यातही १२ ते १५ आणि त्याचबरोबर २६ ते ३१ जानेवारी त्यातही ३, ६, १२ आणि २६ या दिवशी फिरकू नये अशी विनंती केली होती. पौष पौर्णिमा, संक्रांत, मौनी अमावस्या, वसंत पंचमी यादिवशी गर्दी होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं होतं. पण त्याची दखल घेतली गेली नाही. या कुंभ दरम्यान ४५ कोटी लोक येण्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय. त्यासाठी ४ हजार हेक्टर जमिनीवर नगर वसविण्यात आलंय. ५० हजार पोलिस तैनात आहेत. १ हजार २५० किलोमिटर लांबीची पाण्याची पाईप लाईन टाकलीय. ६७ हजार एलईडी लाइट्स लावण्यात आल्यात. पण ज्यादिवशी चेंगराचेंगरी झाली तेव्हा काही भागात लाइट्स नव्हत्या. इथं दीड लाख शौचालये बांधण्यात आलीत, त्याच्या स्वच्छतेसाठी १० हजार कर्मचारी नेमण्यात आलेत. नदीवरून ये जा करण्यासाठी ३० अस्थायी पुल बांधलेत. ४८८ किलोमिटर नवे रस्ते बांधलेत. टेन्ट सिटी उभारलीय. तिथं ३२८ एआय कॅमेरे लावलेत. देशभरातून १३ हजार रेल्वे इकडे आणल्या जाणार आहेत. त्यासाठी ५ हजार कोटी खर्चाच्या नियोजन रेल्वे खात्यानं केल्याचं सांगण्यात आलंय. मात्र दुर्घटनेनंतर रेल्वे वाहतूक बंद केलीय. अशी सारी यंत्रणा सज्ज असली तरी संतांचे आखाडे नाराज आहेत. ते सरकारी यंत्रणेवर चिडलेत. त्यांनी सरकारनं व्हीआयपींसाठी जे नवं कल्चर उभं केलंय. त्यामुळं हा कुंभमेळा, संगमावरचं स्नान हे संतांसाठी, त्यांच्या भक्तांसाठी आहे की, व्हीआयपींसाठी असा सवाल त्यांनी केलाय!
"जेव्हा लोक एकाच ठिकाणी एकाच उद्देशानं आलेले असतात, तेव्हा कोणत्या संविधानानं त्यांना दोन वर्गात विभागण्याचा अधिकार दिलाय? एका ठिकाणी एकाच उद्देशानं जमलेल्या लोकांना विभागून, एकाला जनरल आणि दुसऱ्याला व्हीआयपी बनवलं गेलं. हा अधिकार कोणत्या संविधानानं दिला? ४० कोटी लोक आले आहेत त्यांना असा दूजाभाव का ...?" शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी महाकुंभमेळ्यासंदर्भात दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलंय. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खरं तर, संगमात स्नान करण्यासाठी व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यवस्थेबद्दल लोक संतापलेत. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीमागेही हेच सरकारचं गैरव्यवस्थापन असल्याचं म्हटलं गेलंय. इथं सोशल मीडियावर व्हीआयपी संस्कृतीबाबत अनेक प्रकारची नाराजी समोर येतेय. लोक विविधप्रकारे आपला राग व्यक्त करताहेत. जिथं गरीब लोक स्नान करण्यासाठी धावपळ करताहेत तर श्रीमंत लोकांना व्हीआयपी वागणूक, बडदास्त ठेवली जातेय. एका मंत्र्यांच्या मुलाला व्हीआयपी वागणूक देण्याचा व्हिडिओही व्हायरल होतोय. मंत्र्यांच्या मुलाचं हेलिकॉप्टर आणि फॉर्च्युनरनं थेट संगमावर स्नान असा हा अद्भुत महाकुंभ दौरा होता, एक व्हीआयपी प्रोटोकॉल. दुसऱ्या बाजूला, चेंगराचेंगरी आणि गोंधळाचे बळी पडलेत. मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान चेंगराचेंगरी झाली ती अतिरेकी व्हीव्हीआयपी संस्कृतीमुळे! सामान्य माणसाला १५ ते २० किमी चालायला लावलं जातेय आणि नंतर त्याला जिथं मिळेल तिथं आंघोळ करायला सांगितलं जातेय. स्टीमर बोटीतून प्रवास करताना व्हीव्हीआयपी लोकांना संगमावर आंघोळ घालण्यात येत होती. एकीकडे सामान्य भाविक १०-१५ किलोमीटर पायी येताहेत अन् हे लोक कुंभ परिसरात आपलं स्टेट्स दाखवताहेत.
भारतामध्ये धार्मिक समारंभात दरवर्षी शेकडो भाविक आपला जीव गमावतात. त्या जीव गमावलेल्या भाविकांना मुक्ती मिळाल्याचं समर्थनही होत असतं. त्यांना मग पुण्यात्माही संबोधलं जातं जसं प्रधानमंत्र्यांनी प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यातल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांबद्दल संबोधलं. मागे उत्तरप्रदेशातल्या हाथरस इथं सत्संगातल्या भाविकांमध्येही असाच गोंधळ उडाला होता. त्यात चेंगराचेंगरी होऊन १२१ मानवी बळी गेले होते. जखमींची संख्याही मोठी होती. मृतांमध्ये महिला आणि बालकांची संख्या अधिक होती. कोणी 'साकार हरी उर्फ भोलेबाबा नामक' लफंगा सत्संगाच्या नावाखाली मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांना नादाला लावून त्यांच्या जीवावर चैनबाजी करत होता. तो उत्तरप्रदेशातल्या एटातल्या बहादुरनगरचा रहिवासी. सूरजपालसिंह असं त्याचं नांव. हा गृहस्थ गुप्तचर खात्यातली शाश्वत नोकरी सोडून पंधरा वर्षे भोंदूगिरी करत होता. सर्व बाजूंनी वेढलेल्या संकटांनी अगतिक झालेले नागरिक सोपा जीवनमार्ग निवडण्यापायी बुध्दी गहाण टाकून आपलं जीवन नासवून टाकताहेत. दारिद्रयामुळे कचरापेटी भरल्यासारखी माणसांनी खच्चून भरललेला हा आपला देश आहे. कचरापेटी भरुन जशी ओसंडून वाहते, सांडते तशी माणसं अती झाली की, ती अशी धार्मिक अंदाधुंदीत सांडतात आणि जीव गमावून बसतात. कुंभमेळा ही तर जीव गमावण्याची पर्वणी असते. शालेय शिक्षणात अवैज्ञानिक अंधश्रद्धा जोपासणारे धडे शिकविले की, असंच घडणार! मनोरंजन वाहिन्या ह्या मनोरंजनाच्या नावाखाली देवताळेपणाची बीजं पेरत असतात. भोंदूगिरी आणि चमत्कारांच्या मालिकांचा रतिब सुरु असतो. एकाबाजूला राज्यकर्ते जनतेचे खिसे कापताहेत, तेच दुसऱ्या बाजूला जनतेचं बधीरत्व कायम राखण्यासाठी अशा मालिकांचा भडिमार करीताहेत. त्यामुळं अंधश्रद्धेचा पूर आलाय. आम्ही पूरग्रस्त त्यात वाहात चाललो आहोत.
गेल्या वर्षी मुंबईत धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोलावण्यात आलं होतं. ती एक प्रकारची चाटुगिरी होती, पण त्यापायी उन्हाच्या झळांनी चौदा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या कार्यक्रमाचे आयोजक राज्य शासन होतं. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यांनी आपली समारंभाची खाज मिटवून घेतली, त्यात चौदा डोकेबंद भाविक जीव गमावून बसले होते. त्याची चौकशी करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांची समिती नेमली होती. ते आता निवृत्त झालेत. मग त्या चौकशीचं काय झालं? सरकार गप्प, आम्ही विरोधक, अन् धर्माधिकारी त्यांचे भक्तगण, पत्रकारही मौन धारण करून आहेत. गेल्यावर्षीच राजस्थान इथल्या एका मंदीराचं छप्पर कोसळून ३० भाविक यमसदनास गेले होते. त्याआधी रामजानकी प्रतापगड इथं ६३ भाविक जीव गमावून बसले होते. ऑक्टोबर २०१३ साली रतनगड इथल्या मंदिरातल्या चेंगराचेंगरीत ११५ भाविक ठार झाले होते. प्रयागराज कुंभमेळ्यात फेब्रुवारी २०१३ मध्येही ४२ भाविकांनी जीव गमावला होता. २००३ साली नाशिक कुंभमेळ्यात ४० जण ठार झाले होते. २०११ साली केरळच्या शबरीमाला मंदिरात चेंगराचेंगरीत १०६ भाविक ठार झाले होते. २००५ साली आपल्या इथं साताऱ्यातल्या मांढरदेवी मंदिरात ३४० भाविक जीव गमावून बसले होते. नवरात्रीत चामुंडादेवी मंदिरात २२४ भाविकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं. २००६ साली नैनादेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १६० भाविकांचा मृत्यू झाला होता.
भारतात सर्वधर्मीयांची दुकानदारी, कारखानदारी सुरु आहे. गेल्या दहा वर्षांत हा धंदा अधिक बरकतीत आणला गेलाय. धर्म ही कोणत्याच राष्ट्राची आधारशिला होऊ शकत नाही. अफगाणीस्तान, इराण, पाकिस्तान, इराक ही राष्ट्रे गलिच्छवस्ती म्हणून ओळखली जातात. भारत हा देश धर्म मूर्च्छित बनत चाललाय काय? अशी भीती वाटू लागलीय. कारण जगभरातली वृत्तपत्रं आपल्या देशाविषयी निकृष्ट मनुष्यबळ म्हणून लिहितात की काय अशा बेतानं निर्यात वाढवलीय. कोणताही मानवी बळी ही संवेदनशील बाब बनते, पण आपल्या देशातली असंवेदनशीलता अस्वस्थ करणारी आहे. किड्यामुंग्यासारखी माणसं चिरडली जातात. जाहिरातीचे फलक हे यमदूताचं हत्यार बनताहेत. असंच म्हणावं लागेल. सर्वच राजकीय पक्ष जनतेचा कर ढापण्यासाठी सत्ता मिळवू पाहतात. भारतातल्या रोजच्या बळींची संख्या पाहता रोज एक छोटं शहर मरतंय. असं दृश्य दिसतंय. नोटबंदी काळात रांगेत उभं राहून माणसं मेली होती. आता निवडणुकीच्या काळात तीन महिन्यांसाठी लाडली बहन ही योजना आणलीय. त्या बहिणी गर्दीतही बळी जाणार नाहीत याची दक्षता सरकारनं घ्यावी. सरकारनं प्रत्येक महिलेला १५०० रुपये दिले होते, आता ते २१०० रुपये देणार आहेत. अडीच वर्षे सरकार सत्तेवर होतं आता आणखी पाच वर्षे ते सत्तेवर असेल, मग पाच वर्षांचे पैसे एकदम खात्यावर जमा का करीत नाहीत? निवडणुकीपुरती भीक पदरात घालून मतं मिळतील? पुढे पहिले पाढे पंचावन्न...!
हरीश केंची
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment