Saturday, 15 February 2025

सावरकरांवर अरुण शौरींचे नवे पुस्तक

विनायक दामोदर सावरकरांच्या फ्रान्सच्या मार्सेच्या समुद्रात मारलेल्या उडीचं महाराष्ट्रात आणि देशभरातही कायम अप्रूप राहिलंय. त्याचं वर्णन सावरकर समर्थकांच्या लिखाणात आणि बोलण्यात बऱ्याचदा 'त्रिखंडात गाजलेली उडी' असं होत आलंय. मंगळवारी, ११ फेब्रुवारीला 'आर्टिफिशिअल इंजेलिजन्स समिट' साठी फ्रान्समध्ये पोहोचलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीही मार्सेला उतरल्यावर तिथून लगेच 'एक्स' या माध्यमावर लिहितांना सावरकरांच्या या उडीचा उल्लेख केला. पण आता प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार लेखक अरुण शौरी यांनी या प्रकरणाबद्दल नवे दावे केले आहेत. त्यांच्या मते सावरकरांची समुद्रातल्या उडीची वर्णनं 'अतिरंजित' आहे. शौरींनी केवळ या एकाच घटनेबद्दल काही नवे दावे केलेत असं नाही. सावरकरांशी संबंधित इतर अनेक घटनांबद्दलही त्यांनी लिहिलंय आणि त्याची सध्या बरीच चर्चा होते आहे. पत्रकार आणि अनेक चर्चित पुस्तकांचे लेखक असण्यासोबतच अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रिय मंत्री राहिलेले अरुण शौरी भाजपाचे राज्यसभेतले खासदारही होते.अलिकडेच, म्हणजे गांधी पुण्यतिथीला ३० जानेवारीला अरुण शौरींचं सावरकरांवरचं नवं पुस्तक प्रसिद्ध झालं. इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाचं नाव आहे 'द न्यू आयकन: सावरकर अँड द फॅक्ट्स (The New icon: Savarkar and the facts). या पुस्तकात शौरींनी सावरकरांशी जोडल्या गेलेल्या अनेक घटनांचा, दाव्यांचा, मिथकांचा आणि त्यातून तयार झालेल्या त्यांच्या विविध प्रतिमांचा उहापोह केला आहे. त्यात सावरकरांबद्दल तयार झालेल्या अनेक समजुतींचा आणि एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल विमर्श शौरी करतात. विनायक दामोदर सावरकर हे नाव अनेक विषयांवरुन सतत चर्चेत असतं. सावरकरांच्या हिंदुत्वापासून ते त्यांच्या अंदमानच्या तुरुंगातून सुटकेपर्यंत, महात्मा गांधी हत्या प्रकरणातल्या कथित आरोपांपासून ते त्यांच्या राजकीय विचारांपर्यंत, त्यांच्याभोवतालच्या वादांना विराम नाही. त्यांचे समर्थक आणि टीकाकार, दोघेही त्यात भाग घेत असतात. एका प्रकारे समकालीन मुख्य प्रवाह बनलेल्या हिंदुत्ववादी राजकारणाच्या केंद्रस्थानीही सावरकर आहेत. सध्या त्यात शौरींच्या या नव्या पुस्तकानं एका नव्या चर्चेची भर पडलीय.
फ्रान्सच्या समुद्रातली उडी
सावरकरांच्या या उडीचा संदर्भ ८ जुलै १०१९ रोजी फ्रान्सच्या मार्से या बंदरावर घडलेल्या घटनेचा आहे. डिसेंबर १९०९ मध्ये अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे तत्कालिन ब्रिटिश जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घालून मारले. ज्या पिस्तुलातून या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या ते इंग्लंडमधून भारतात पाठवण्यात आलं होतं आणि या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरुन तेव्हा लंडनमध्ये असलेल्या सावरकरांना पकडण्यात आलं. सावरकरांना अटक करुन भारतात आणलं जात होतं. 'एस एस मोरीआ' हे त्यांना घेऊन येणारं जहाज जेव्हा फ्रान्सच्या मार्से या बंदरात उभं होतं, तेव्हा त्यावरुन सावरकरांनी उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न जरी अयशस्वी ठरला, तरीही त्यांची ही उडी गाजली आणि आजही त्याविषयी चर्चा होत असते. त्याविषयीच अरुण शौरी त्यांच्या या नव्या पुस्तकात लिहितात. शौरी जरी सावरकरांनी उडी मारली आणि सुटण्याचा तो एक धाडसी प्रयत्न होता असं म्हणत असले तरीही, त्याबद्दल सांगण्यात येणारी कहाणी ते अतिशयोक्तीपूर्ण किंवा अतिरंजित मानतात. ते लिहितात, "छोट्याशा खिडकीतून उडी मारणं हा निश्चित धाडसी प्रयत्न होता, पण 'खवळलेल्या समुद्रातून, लाटांशी झुंजत पोहून गेले' हे का म्हणावं?" शौरी लिहितात. त्यांच्या मते तथ्य न माहिती करुन घेता काही कविकल्पना या घटनेला जोडल्या गेल्या. त्यासाठी ते उदाहरण म्हणून ज्यांच्या नेतृत्वात ते भाजपात आणि केंद्रीय मंत्रिमंडळात होते, अटलबिहारी वाजपेयींचं सावरकरांबद्दलच्या प्रसिद्ध भाषणाचं उदाहरण देतात. या उडीच्या प्रकरणासाठी संदर्भ म्हणून शौरी स्वत: सावरकरांनी त्यांच्या लिखाणात केलेले उल्लेख, त्यांचं चित्रगुप्त या नावानं लिहिण्यात आलेले चरित्र ज्याविषयी कायम असा प्रवाद आहे की ते स्वत: सावकरकरांनीच टोपणनावानं लिहिलं आहे, असा उल्लेख शौरी यांनी आणि १९८६ सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत डॉ. रविंद्र वामन रामदास यांनी केला आहे आणि तत्कालिन उपलब्ध असलेले काही दफ्तरी कागदपत्रं वापरली आहेत. सावरकरांच्या समुद्रातल्या उडीबद्दल शौरींचा पहिला आक्षेप आहे की, जेवढा पल्ला त्यांनी पोहून गाठला असं सांगितलं तो तेवढा नव्हता. ते म्हणतात, उपलब्ध कागदपत्रांवरुन असं दिसतं, की सावरकरांना नेणारं जहाज कोळसा भरण्यासाठी मार्से बंदरात थांबलं होतं आणि ज्या धक्क्यापाशी ते थांबलं होतं तिथून किनारा केवळ १० ते १२ फूट होता. "हे अगोदर थोडं जरी तपासलं असतं, तरी समजलं असतं की जहाज समुद्रात लांब थांबलं नव्हतं," शौरी लिहितात.
अरुण शौरी इथं त्यांच्या बाजूचा पुरावा म्हणून सावरकरांच्याच 'माझी जन्मठेप' या तुरुंगकाळातल्या आत्मचरित्रात्मक लिखाणाचा दाखला देतात. अंदमानला नेण्याअगोदर जेव्हा सावरकरांना अलिपूरच्या तुरुंगात नेण्यात आलं, तेव्हाचा प्रसंग जो त्यांनी लिहून ठेवला आहे, तो शौरी उधृत करतात. सावरकर लिहितात, "दुसऱ्या शिपायानं मला विचारलं, किती दिवस आणि रात्री तुम्ही समुद्रात पोहत होतात? सहाजिकच तो मार्सेबद्दल विचारत होता. मी उत्तरलो, "कसले दिवस आणि रात्री? मी केवळ १० मिनीटं पोहलो आणि किनाऱ्याला पोहोचलो." हा 'माझी जन्मठेप' मधला उतारा देऊन शौरी लिहितात, "हे लिहितांना सावरकर स्वत: सत्याच्या अधिक जवळ होते. पण माझ्या मते त्यांना १० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला असावा." शौरी असाही प्रश्न विचारतात, जर सावरकर समुद्रातला मोठा पल्ला पार करुन पोहत आले असतील, तर त्यांच्या पाळतीवर असलेले दोन भारतीय पोलीस किनाऱ्यावर कसे आले? कोणीही म्हणत नाही की तेही पोहून आले. शौरी म्हणतात की, जहाजावर किनाऱ्यावर उतरणारा एक जोडपूल त्यावेळेस सर्वत्र असायचा, त्यावरुनच ते पोलीस आले. शौरी या सगळ्या प्रकरणावर तत्कालिन मुंबई सरकारनं तिथे असलेल्या दोन भारतीय आणि दोन ब्रिटिश अशा एकूण ४ पोलीस शिपायांची चौकशी करुन एक अहवाल केला, तो उपलब्ध आहे. शौरी त्यांच्या पुस्तकात असाही दावा करतात की, या समुद्रातल्या उडी घटनेवर जे जे नंतर अतिशयोक्तीपूर्ण लिहिलं आणि बोललं गेलं, त्या मिथकांची पेरणी चित्रगुप्त लिखित 'द लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर' या पुस्तकातून पहिल्यांदा केली गेली.
"या पुस्तकात एक संपूर्ण प्रकरण 'एस एस मोरिआ' जहाजावरुन पलायनावर लिहिलं आहे आणि एक मिथक तयार होण्याचे सगळे घटक त्यात आहेत," शौरी लिहितात. शौरी यांच्या अगोदरही अनेक लेखकांनी सावरकरांशी संबंधित या घटनांवर, त्यांच्या राजकारणावर आणि त्यांच्या परिणामांवर लिहिलं आहे. वैभव पुरंदरे यांनी इंग्रजीमध्ये 'सावरकर: द ट्रू स्टोरी ऑफ फादर ऑफ हिंदुत्व' हे सावरकरांचं चरित्र लिहिलं आहे. पुरंदरेंच्या मते, सावरकरांच्या या उडीबद्दल अतिशयोक्तीपूर्ण लिहिलं गेलं आहे हे नक्की पण त्याचा दोष सावरकरांना देता येणार नाही. "त्यांनी जी उडी मारली आणि जे घडलं ते तर खरं आहे. पण नंतर त्यात जी अतिशयोक्ती घातली गेली, ते सावरकरांमुळे झालं असं कसं म्हणायचं? किंबहुना स्वत: सावरकरांनी जेव्हा त्याबद्दल काही म्हटलं अथवा लिहिलं आहे, ते एका मर्यादेतच लिहिलं आहे. पुस्तक लिहितांना मला असंही दिसलं की इतर कोणी लोक सावरकरांपाशी येऊन या घटनेविषयी अतिशयोक्तीपूर्ण बोलायचे, तेव्हा सावरकरही त्यांना म्हणायचे की तुम्ही सांगता आहात तेवढं ते नाही. त्यामुळे अतिशयोक्तीसाठी त्यांना जबाबदार धरावं असं मला वाटत नाही," वैभव पुरंदरे म्हणतात. सुभाषचंद्र बोसांना भारतातून पळून जाऊन सैन्य उभं करण्याची 'सूचना' सावरकरांची?
सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकात अरुण शौरींनी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या 'आझाद हिंद सेने'बाबत केलेल्या दाव्यांचाही विषय हाताळला आहे. या दाव्यांची चर्चाही समर्थक विरुद्ध टीकाकार अशी सतत होत आली आहे. पण सुभाषचंद्रांच्या या साहसामागची, परदेशात सैन्य उभारुन ब्रिटिशांशी युद्ध करण्याची रणनीति या सगळ्याशी सावरकरांचा काहीही संबंध नव्हता, अशी मांडणी शौरींनी केली आहे. सावरकरांनी हा दावा १९५२ सालच्या मे महिन्यातल्या त्यांच्या पुण्यातल्या भाषणांमध्ये केला होता. पारतंत्र्यकाळात सशस्त्र क्रांतीसाठी 'अभिनव भारत' ही संघटना सावरकरांनी स्थापन केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर उद्देश सफल झाला असं म्हणून ही संघटना विसर्जित करण्यात आली. संघटनेचा हा सांगता समारंभ पुण्यात झाला. तीन दिवस चाललेल्या या सभारंभात केलेल्या भाषणांमध्ये सावरकरांनी स्वातंत्र्ययुद्धातल्या क्रांतिकार्याचा आढावा घेतला. तो घेत असतांना 'माझ्या सूचनेस स्वीकारुन' भारतातून पळून जर्मनीत जाणऱ्या सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या 'आझाद हिंद सेने' बद्दल विस्तारानं बोलत आपण सुभाषचंद्रांना मुंबईतल्या भेटीत या क्रांतिकार्याची कल्पना कशी दिली आणि त्यानुसार बोसांनी कृती कशी केली, हे सावरकरांनी सांगितल
११ मे १९५२ रोजीच्या त्यांच्या या मालिकेतल्या दुसऱ्या दिवशीच्या भाषणात सावरकर २२ जून १९४० रोजी सुभाषचंद्र बोसांनी मुंबईतल्या 'सावरकर सदन'मध्ये घेतलेल्या त्यांच्या भेटीची हकीकत सांगतात. अरूण शौरी 'सावरकर समग्र' या हिंदी भाषांतरित तिसऱ्या खंडात प्रकाशित करण्यात आलेल्या भाषणांचा संदर्भ त्यांच्या अभ्यासासाठी वापरतात. 'सावरकरस्मारक डॉट कॉम' या वेबसाईटवर हा तीनही भाषणांची मराठी लिखित आवृत्ती उपलब्ध आहे. या भाषणात 'सुभाषचंद्र बोसांची अवचित भेट' या प्रकरणात सावरकरांनी या भेटीचा इतिवृत्तांत सांगितला आणि तो सांगण्या अगोदर सुरुवातीला या भेटीचा वृत्तांत काहींना अगोदर माहित असला तरीही 'त्याचा प्रकट सभेत असा उच्चार मी प्रथमच आणि हेतुपूर्वक करत आहे' असं सावरकर म्हणतात. 'मुस्लीम लिग'च्या महंमद अलि जिना यांची भेट झाल्यावर बोस सावरकरांना भेटायला आले होते. या भेटीचे इतर तपशील सांगितल्यावर सावरकरांनी स्वत: बोसांना केलेल्या सूचनेसंदर्भात सांगितले. सावरकर म्हणाले, "रासबिहारीसारखे अनेक सशस्त्र क्रांतिकारक पुढारी जसे ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन जपान जर्मनी येथे निसटून गेले तसे आपणही तत्काल हुलकांडी देऊन निसटून जावे. तिकडे इटली, जर्मनीच्या हाती पडलेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांचे पुढारीपण उघडपणे स्वीकारावे."
"हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्याची प्रकट घोषणा करावी आणि जपान युद्धात पडताच साधेल त्या मार्गाने बंगालच्या उपसागरातून म्हणा किंवा ब्रम्हदेशातून म्हणा, हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेवर बाहेरून स्वारी करावी. असा काही तरी सशस्त्र नि साहसी पराक्रम केल्यावाचून आपण हिंदुस्थान स्वतंत्र करू शकणार नाही. असा पराक्रम नि साहस करण्यासाठी जी दोन तीन माणसे आज मला समर्थ दिसतात त्यात आपण एक आहात. त्यातही माझा आपणावरच डोळा आहे." सावरकरांच्या या भाषणांतले सुभाषचंद्र बोसांसंदर्भात असलेले उल्लेख घेऊन अरुण शौरी त्यांच्या पुस्तकात 'भारतातून पळून जाणं आणि जर्मनी-जपानची मदत घेऊन बाहेरून ब्रिटिशांविरुद्ध सैन्याचा उठाव करणं' ही सावरकरांनी बोसांना केलेली सूचना वा दिलेली कल्पना होती' या सावरकरांच्या दाव्याला चूक ठरवतात. हा दावा अनैतिहासिक असून त्याला कोणताही पुरावा नाही, असंही शौरी म्हणतात. 'छाननी वा तपासणी केली, तर हे दावे कोसळून पडतात' असंही शौरी म्हणतात. या दाव्यांविरोधात दाखले देतांना शौरींनी खुद्द सुभाषचंद्र बोसांनीच लिहून ठेवलेला वृत्तांत दिला आहे. बोसांनी त्यांच्या 'द इंडियन स्ट्रगल' या पुस्तकात दिलेला सावरकरांच्या भेटीचा उल्लेख पाहिला तर सावरकरांनी सांगितलं त्यापेक्षा वेगळं दिसेल, शौरी लिहितात. बोसांनी युरोपात सुरु झालेल्या दुस-या महायुद्धाचा उपयोग कसा करुन घेता येईल या हेतूनं गांधी, नेहरु, जिना आणि सावरकरांसह अन्य काहींच्या भेटी घेतल्या होत्या. बोसांनी या भेटीबद्दल लिहिलं आहे: 'सावरकरांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं असं दिसतं आणि ते केवळ हिंदूंनी ब्रिटिश सैन्यात प्रवेश करुन सैनिकी प्रशिक्षण कसं घ्यावं, याचा विचार करतात. या भेटींनंतर प्रस्तुत लेखकाला अपरिहार्यपणे या निष्कर्षाशी यावं लागलं की मुस्लिम लिग असो वा हिंदु महासभा, यांच्याकडून काहीही अपेक्षा करता येणार नाहीत.' सावरकरांच्या भेटीबद्दल स्वत: बोसांनी एवढाच उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे असं सांगून शौरी हे नोंदवतात की, सावरकर म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या प्रभावानं बोसांनी पुढची कृती केली, हे शक्य नाही.
शौरी सावरकरांच्या या दाव्याबद्दल या विषयावर संशोधन केलेल्या इतरही काही अभ्यासकांचे निष्कर्ष देतात. लेनर्ड गॉर्डन या इतिहासकाराच्या संशोधनाचा उल्लेख करत शौरी म्हणतात की सावरकरांसह इतर काहींशी या देशातून पळून जाऊन उठाव करण्याची मूळ कल्पना जोडली जाते, पण ती केवळ सुभाषचंद्र बोसांची होती. 'प्रत्यक्ष कृती करण्याअगोदर बोस किमान एक दशक अगोदर इटली, जर्मनी, जपान आणि इतर देशांच्या अधिका-यांशी संपर्कात होते' असं गॉर्डन नमूद करत असल्याचं शौरी लिहितात. शिवाय ही रणनीति सावरकरांची होती हे सांगणारा कोणताही पुरावा आपल्याला मिळाला नसल्याचा आणि ती केवळ सुभाषचंद्र बोसांचीच असल्याचं गॉर्डन यांनी आपल्याला पत्रव्यवहारात सांगितल्याचं, शौरी त्यांच्या पुस्तकात लिहितात. "या मुद्द्यावर मी माझ्या पुस्तकातही विस्तारानं लिहिलं आहे. सुभाषचंद्र बोसांचं पळून जाणं आणि त्यांच्या कारवायांची कल्पना अथवा सूचना आपली होती असं म्हणणं, या सावरकरांच्या दाव्यात तथ्य दिसत नाही. किंबहुना सुभाषबाबूंनी सावरकरांना मुंबईत भेटून गेल्यावर त्यांच्यावर टीकाच केली आहे. परदेशात जाणं, इतर देशांशी हातमिळवणी करणं, 'आझाद हिंद सेना' स्थापन करणं याची कल्पना आणि प्रेरणा केवळ सुभाषबाबूंची स्वत:ची होती. अन्य कोणाचीही नाही," वैभव पुरंदरे 'बीबीसी मराठी'शी बोलतांना आपलं मत मांडतात.
अर्थात, केवळ या दोन घटनांबद्दलच शौरींनी या त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे असं नाही. सावरकरांशी संबंधित अन्य घटनांबद्दल, वादांबद्दल लिहून, काही पुरावे, संदर्भ यांच्या सहाय्यानं या व्यक्तिमत्वाचा शोध घेतला आहे. उदाहरणार्थ, गांधींबद्दलचे त्यांचे विचार, मित्रत्वाचे कथित दावे, हेही शौरी शोधायचा प्रयत्न करतात. अंदमानातल्या, तिथून बाहेर पडतानाचा घटनाक्रमावर, त्याच्या कारणांबद्दल शौरी त्यांच्या पद्धतीनं लिहितात. मुख्य म्हणजे, हिंदुत्वाच्या राजकारणाच्या सध्याच्या काळात सावरकरांच्या हिंदुत्वाचाही ते वेध घेतात. त्यात गायींबद्दलच्या सावरकरांच्या उपयुक्तावादी भूमिकेपासून धर्माबद्दलचे, इतिहासाबद्दलचे त्यांचे विचारही या विश्लेषणाच्या कक्षेत येतात. एवढ्या वर्षांनंतरही असणा-या भारतीय राजकारणावरचा महात्मा गांधींचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या सावरकरांचा उपयोग करुन घेतला जातो आहे का, या प्रश्नाचं उत्तरही शौरी शोधायचा प्रयत्न करतात. "सध्या ज्या दिशेला आपला देश जातो आहे, त्याबद्दल अनेकांप्रमाणेच मलाही चिंता आहे. तसं होतं आहे, याची मुळं कुठे आहेत, हे शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो. हे नेमकं कुठे सुरु झालं? तेव्हा मी रा.स्व.संघ, गोळवळकरांसारखे त्यांचे सरसंघचालक यांचं लिखाण वाचणं सुरु केलं. पण मला सापडलं की आजच्या हिंदुत्वाची मूळ कल्पना ही सावरकरांपासून सुरु झाली आहे," असं अरुण शौरी या पुस्तकाबद्दल 'बीबीसी'शी बोलतांना म्हणाले. "सावरकरांवर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. पण त्यात सावरकरांनी स्वत:बद्दल आणि विविध घटनांबद्दल काय लिहिलं आहे, तेच परत सांगितलं होतं. त्यामुळे मी केवळ त्यांनी जे म्हटलं, जे स्वत: लिहिलं, त्यावरच लक्ष केंद्रित केलं. हे त्यांनी स्वत: जे लिहिलं त्याचं विश्लेषण आहे. त्यामुळे ते नाकारणं अवघड आहे," शौरी म्हणतात. वाद, चर्चा आणि सावरकर हा संबंध नवा नव्हे. त्यामुळे या नव्या पुस्तकातल्या नव्या दाव्यांनी पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. पण नुसतेच वाद न होता त्या मंथनातून कोणतं नवं सत्य समोर येतं, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.


 

No comments:

Post a Comment

आत्मनिर्भर म्हणजे काय?

ज्यांना सतत परावलंबी जगायला शिकवलेलं असतं, त्यांना स्वावलंबी म्हणजे काय ते समजू शकत नाही. तो त्यांचाही दोष नसतो. मानसिक किंवा बौ...