Monday, 3 February 2025

राज कुणाच्या मनातलं बोलले?

"अपेक्षेप्रमाणे महापालिका निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं राज ठाकरे यांना जाग आलीय. 'कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा...!' दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मोदींच्या कारभाराची लक्तरं काढलीत. राज यांची प्रत्येक निवडणुकीतली बदलती भूमिका अनाकलनीय नाही तर, ज्या बाजूला उद्धव ठाकरे असतील त्याच्या विरोधात उभं राहायचं असं त्याचं सूत्र दिसून येतं. आताही असंच घडलंय. उद्धव यांनी महाआघाडी आणि महायुती यांच्याशी फारकत घेत स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचं ठरवलंय. म्हणून मग शरद पवार, काँग्रेसचे थोरात यांचं गुणगान गात भाजप, अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यामुळं ते नेमकं कुणाच्या मनातलं बोलताहेत हे कार्यकर्त्यांना समजलं नाही. बदलत्या राजकीय भूमिकांच्या धरसोडवृत्तीनं त्यांच्यात संभ्रम निर्माण झालाय!"
--------------------------------------------
*लो*कसभा निवडणुकीत महायुतीच्या मागे उभं राहात राज ठाकरे यांनी 'कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा...!' दिला होता. आज मोदींवर टीका करताना अजित पवार, राधाकृष्ण विखेपाटील, अशोक चव्हाण यांच्यापासून अनेकांची नावं भाषणात घेतली ती सारी मंडळी तेव्हाही भाजपसोबत होती, आजही आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरं किरीट सोमय्या यांनी ती यापूर्वीच टांगलीही होती. त्याचा आधार घेऊन प्रधानमंत्री मोदींनीही जाहीर सभांमधून टीकेची झोड त्या भ्रष्टाचारी नेत्यांवर उठवली होती. असं असतानाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज यांनी मोदींना पाठिंबा दिला हे कसं विसरता येईल? ते तेव्हा भ्रष्टाचारी नव्हते का? त्यांना भाजपनं त्यावेळी मांडीवर घेतलेलं नव्हतं का? मग आताच साक्षात्कार झाल्यासारखं राज यांनी भूमिका मांडली ती किती संयुक्तिक होती? मतदारांना हे समजत नाही का? ते मतदारांना गृहीत धरतात याचा फटका त्यांनाच बसलाय. राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा त्यातही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव व्हावा म्हणून १२८ उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना केवळ दीड टक्का मतं मिळाली आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन गोठविण्याची देखील शक्यता निर्माण झालीय.
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्धिमाध्यमांचे लाडके, वंडरबॉय राज ठाकरे यांनी तीन महिन्यांनंतर आपल्या पक्षाच्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पराभवाचं विश्लेषण केलं अन् त्यावर जाहीर मतप्रदर्शन केलं. 'काय घडलंय आणि काय घडतंय...!' यासाठी त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. नेहमीप्रमाणे गर्दी ही होतीच. राजच्या सभांना सामान्यांच्यापेक्षा माध्यमांचच अधिक लक्ष असतं. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज यांनी गाजावाजा करून भाजपचे चाणक्य अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली, त्यात नेमकं काय घडलं हे कधी सांगितलं नाही. एका जाहीर सभेत नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून त्यांनी 'मोदींना बिनशर्त पाठिंबा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा...!' असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. कदाचित हाच निरोप अमित शहा यांनी दिला असावा. मात्र महाराष्ट्र सैनिकांचा तेव्हा भ्रमनिरास झाल्याचं जाणवलं. मोदींना पाठींबा देताना त्यांनी महायुतीला पाठिंबा वा महायुतीत जाणार हे स्पष्ट केलं नव्हतं. पण महायुती आपल्या काही उमेदवारांसाठी छुपा पाठिंबा देईल असं गृहीत धरलं होतं. आणि त्या निवडून येणाऱ्या आपल्या आमदारांच्या संख्येनुसार कुणाचं सरकार आणायचं हे मी ठरविन अशी दर्पोक्तीही त्यांनी केली होती. राज यांना गोंजारणाऱ्या भाजपनं राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करायचा डाव टाकला. पण शिंदे त्याला बधले नाहीत. त्यांनी राज यांच्या मुलाच्या विरोधातही आपला उमेदवार उभा केला होता. तेव्हा जे व्हायचं होतं ते झालं. राज्याच्या सत्तेची सूत्रं आपल्या हाती येतील. मग आपण महाराष्ट्राचं हे राज्यशकट आपण चालवू अशी दिवास्वप्न पाहणाऱ्या राज ठाकरे यांचा इथं स्वप्नभंग झाला. मतदारांनी आणि ज्यांना पाठींबा दिला होता त्या महायुतीतल्या पक्षांनी त्यांना अस्मान दाखवलं. विधानसभा निकालानंतर भ्रमनिरास झालेल्या राज यांनी त्या निकालाबाबत 'केवळ अनाकलनीय...!' हा एकच शब्द उच्चारून आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी बंद झाले ते परवाच प्रकट झाले.
विधानसभा निवडणूक दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचा ताबा राज घेणार अशा बातम्या चालवल्या गेल्या पण 'मी माझं अपत्य मनसे आणि कष्टानं मिळवलेलं इंजिन चिन्ह सोडणार नाही...!' हे सांगताना त्यांनी शिंदे यांच्याबद्दल जे 'शी..ss !' असं जे तुच्छतेनं म्हटलं त्यातून त्यांना काय अभिप्रेत आहे हे दिसून आलं होतं. त्यामुळं उद्धव यांच्या विरोधात शिंदे यांना जवळ करणाऱ्या राजना शिंदेंनी इंगा दाखवला. ठाकरे यांचं जोखड पुन्हा वाहायचं नाही असं ठरवूनच त्यांनी त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले. विधानसभा निवडणूक पूर्वीच्या सभेत राज यांनी 'राजकीय व्यभिचार' हा शब्द वापरला आणि लोकांना आवाहन केलं की, या राजकीय व्याभिचाराच्या विरोधात मतदान करा...! व्याभिचार जर शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलं असेल तर, ती करायला लावणारी त्यामागची महाशक्ती भाजप ही व्यभिचारी नव्हती का? मग महाशक्तीचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा राज यांनी कसा काय दिला होता? त्यांच्या मते उद्धव आणि शरद पवारांनी राजकीय व्यभिचार केलाय, तर त्यांना मतं देऊ नका असं सांगणं राजना शक्य होतं, मग त्यांनी राजकीय व्याभिचार संबोधून महायुतीला देखील लक्ष्य केल्याचं दिसलं. राज हे २०१९ ला लोकसभा निवडणूक लढवत नव्हते तरी देखील एकदा मोदींवर 'लाव रे तो व्हिडिओ...!' असा अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रचार करत कडाडून टीका केली होती. तर २०२४ ला कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठींबा देत महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. त्यांच्या या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे  कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे. पण त्यांनी केवळ आपणच आपली भूमिका बदलत नाहीतर सगळेच पक्ष भूमिका बदलत असतात असं म्हणत त्यांनी शरद पवार, शिवसेना यांनी कशी भूमिका बदलल्या याचा पाढा वाचला. देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक ही १९५२ ला झाली. त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा म्हणजे 'जनसंघ' होता. १९७५ ला इंदिरा गांधींच्या आणीबाणीनंतर निवडणूक झाली त्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला अन् १९७८ ला जनता पक्षाचं सरकार आलं. त्यात जनसंघ होता. पुढे जनता पक्ष फुटला, सरकार कोसळलं आणि त्यातून १९८० ला भाजप जन्माला आला. अध्यक्ष झाले अटलबिहारी वाजपेयी. अटलजींनी पक्षाची भूमिका बदलली आणि त्यांनी गांधीवादी समाजवाद स्वीकारला. १९७८ ला शरद पवार वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्री झाले. त्या पुलोदमध्ये जनसंघ पण सामील होता. त्याच काळात शिवसेनेनं आणीबाणीला पाठींबा दिला. १९८० ला शिवसेना काँग्रेस युती होती आणि तेंव्हा शिवसेनेनं एकही जागा लढवली नाही. पुढे १९८० ला इंदिरा गांधींनी पवारांचं सरकार बरखास्त केलं पुढे शरद पवार पुन्हा १९८६ साली काँग्रेसमध्ये गेले. १९८६ ला महापालिकेची निवडणूक झाली शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ती लढवली. १९८४ ला शिवसेनेचे २ उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे होते. १९८९ ला शिवसेना भाजप युती झाली. १९९५ ला शिवसेना भाजप सत्तेत गेले. १९९९ ला शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस सुरू केला आणि ज्या कॉग्रेसला शिव्या दिल्या त्याच काँग्रेससोबत येऊन त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली.  'केवळ मीच नाही तर सगळ्याच पक्षांनी, नेत्यांनी आपली भूमिका बदललीय. देवेंद्र फडणवीस यांनी आपद् धर्म, शाश्वत धर्म अश्या कोणत्याच स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती नाही म्हणजे नाही.... अजित पवार चक्की पिसिंग अँड पीसिंग...! म्हटलं होतं. आता ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. शरद पवारांनी शिवसेनेवर गेली ३०-४० वर्षे जातीयवादी म्हणून टीका केलीय. काँग्रेसनं देखील शिवसेनेवर टीका केलीय. तसंच शिवसेनेनेही काँग्रेस, राष्ट्रवादीवर कडाडून टीका केलीय. आज मात्र ते एकत्र आलेत. मग मलाच का लक्ष्य केलं जातंय....?' शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्ष ते मुस्लिम लीगसोबत युती केली. पुढे काँग्रेससोबत पण युती केली. थोडक्यात त्या त्या वेळेला गरज बघून युती केली. सगळ्यांनी भूमिका बदलल्या, वाट्टेल त्या युत्या केल्या, त्या चालतात. पण त्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार! हा कुठला न्याय? असा सवाल त्यांनी केला
हे सगळं का मी सांगतोय, कारण सगळ्यांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या, पण मला सांगा की मी कुठल्या स्वार्थासाठी भूमिका बदलली? माध्यमं एककल्ली झालीत, त्यांचा अभ्यास नसतो. माझ्याबद्दल काय पसरवलं जातंय की मी मोदींना पाठींबा दिला, पुढे विरोध केला आणि माझ्यामागे ईडी लावली म्हणून पुन्हा मोदींना पाठींबा दिला. त्या ईडी प्रकरणावर आज मी बोलणार आहे. महाराजांची शपथ घेऊन सांगतो जे सांगतोय ते खरं आहे. मी २००५ ला बातमी वाचली की सुप्रीम कोर्टानं आदेश दिला, की एनटीएससीच्या अंतर्गत ज्या मिल येतात यांच्या कामगारांचे पैसे देऊन टाका. त्या यादीत कोहिनुर मिल होती. मी माझ्या व्यावसायिक सहकाऱ्याला सांगितलं की कोहिनुर मिलसाठी टेंडर भरा. टेंडर भरलं. टेंडर आम्हाला मिळालं. पण त्यासाठी लागणारे ४०० कोटी कुठून आणायचे? मला पण जरा चिंता होती मग आम्ही आयएल अँड एफएस ला विचारलं, त्यांनी ४०० कोटी द्यायची तयारी दाखवली. पुढे ते प्रकरण परत कोर्टात गेलं.. यामधल्या काळात आमच्या लक्षात आलं की हा पांढरा हत्ती आहे, आम्ही ठरवलं की आपण यातून बाहेर पडायचं. आम्ही आमचा हिस्सा विकला. पुढे ईडीची नोटीस आली. मला कळलं नाही की नक्की काय घडलं? कारण आम्हाला जे पैसे आले त्यावर आम्ही आमचा टॅक्स भरला. पण पुढे कळलं की, आमच्यातल्या एका पार्टनरनं टॅक्स नाही भरला. त्यावर आमच्या सीएने सल्ला दिला की परत टॅक्स भरावा लागेल आम्ही तोही पण भरला. राज ठाकरेचे व्यवहार इतके स्वच्छ असतात, तो ईडीला घाबरेल ? असा खुलासा करताना मोदींना पाठींबा अन् इडी याचा काही संबंध नसल्याचं पहिल्यांदाच स्पष्ट केलं.
पक्ष स्थापन होऊन १८ वर्षे झाली. तारुण्याचा जोश, उत्साह आणि प्रगल्भता पक्षात असायला हवी. पण धरसोडवृत्तीमुळे पक्षाचं प्रतिनिधीत्व आज शिल्लक राहिलेलं नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवल्या. २००६ मध्ये मुंबई महापालिकेत नवख्या मनसेनं २७ नगरसेवक निवडून आणले. नाशिक महापालिका ताब्यात घेतली. पुण्यात २८ नगरसेवक निवडून आले. २००९ मध्ये मनसेचे १३ आमदार निवडून आले. आज एकही आमदार निवडून आलेला नाही. राज यांच्या त्या यशामुळे शिवसेनेसमोर आव्हान उभं झालं होतं. मात्र, यशाची ही घोडदौड राजना कायम ठेवता आली नाही. त्यानंतर पक्षाची भूमिका सतत बदलत गेल्यानं यशाचा आलेख खालावत गेला. पक्ष स्थापना करतानाची श्रद्धास्थाने बदलली. झेंडा बदलला. झेंड्यातले रंग हरवले. भगवा रंग अन् शिवमुद्रा स्वीकारली. स्वतः बदलले, नेहमीचा पेहराव बदलला अंगाभोवती बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी शाल आली. पक्ष स्थापन करताना करताना व्यासपीठावर केवळ शिशिर शिंदे होते, ते बाहेर पडलेत. याशिवाय प्रवीण दरेकर, राम कदम, अवधूत वाघ, शिरीष पारकर, दीपक पायगुडे, संजय धाडी, श्वेता परुळेकर, दिलीप लांडे, वसंत मोरे, हाजी अराफत, किर्तिकुमार शिंदे अशी अनेक नावं घेता येतील. २००६ पासून मनसेची जी वाटचाल आहे त्यात एक एक जण बाहेर पडलाय. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश चव्हाण अशी काहीजण सोबत आहेत पण तळागाळातले कार्यकर्ते हे फ्लोटिंग असल्याचं दिसून येईल. कार्यकर्तेही पक्ष सोडून जाताना दिसताहेत. ही पडझड का होतेय? ही वस्तुस्थिती नाकारता येतं नाही. राज यांच्या सभांना गर्दी होते, त्यांच्यामागे लोकभावना आहे, त्यांना गर्दी जमवावी लागत नाही, त्यांचं वक्तव्य अमोघ आहे. पण लोकांमध्ये मिसळणं, कार्यकर्त्यांना वेळ देणं हे त्यांना फारसं जमत नाही. त्यामुळं कार्यकर्ते, नेते दुरावले जाताहेत हे लक्षांत येऊनही त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. कार्यकर्ते फक्त आंदोलनासाठी वापरले जातात. राज यांच्या भूमिकेत सातत्य राहिलेलं नाही. मोदींचा स्वीकार, त्यांना प्रधानमंत्री करण्याची मागणी, नंतर त्यांना राजकीय पटलावरून दूर करण्याची भूमिका, पुन्हा कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठींबा, पुन्हा टीकेची झोड या बदलत्या भूमिकांमुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर जसा प्रश्नचिन्ह उभं राहतो. मोदींचे वाभाडे काढले, नंतर भलामण केली ते खरं होतं की, आजची भूमिका खरी आहे? असं वाटणं स्वाभाविक आहे. 
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

आत्मनिर्भर म्हणजे काय?

ज्यांना सतत परावलंबी जगायला शिकवलेलं असतं, त्यांना स्वावलंबी म्हणजे काय ते समजू शकत नाही. तो त्यांचाही दोष नसतो. मानसिक किंवा बौ...