"मोदींविरोधात उभे ठाकलेले शरद पवार, उद्धव, ममता, अखिलेश, मायावती, लालूप्रसाद, केजरीवाल आणि इतरांचं राजकीय अस्तित्व संकटात आलंय. राहुल अन् काँग्रेस दिशाहीन बनलीय. साम, दाम, दंड, भेद या चाणक्यनीतीने मोदी, शहांनी गतकाळातल्या दिग्गजांचा, वर्तमानातल्या धुरंधरांचा, भविष्यातल्या उत्साही अन् उथळ प्रतिस्पर्धकांचा सफाया चालवलाय, नितीशकुमारांचे आव्हानही संपुष्टात येईल अशी स्थिती आहे. भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' करण्याच्या निर्धारातून 'विपक्षमुक्त भारत' होईल काय याची भीती वाटतेय. असं झालं तर 'लोकशाही'तल्या 'एकाधिकारयुगा'चा आरंभ होईल. संघानं पाहिलेले 'एकचालकानुवर्तीत साम्राज्या'चे स्वप्न साकार होईल! भाजपने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असं सिद्ध करण्याची भूमिका घेतलीय. मात्र आपल्या या भीषण असण्याला त्यांनी बिभीषण असं सोज्वळ पौराणिक संबोधन घेतलंय अन् वाटचाल आरंभलीय!
.....................................................
*दि*ल्लीत भ्रष्टाचार विरोधातल्या चळवळीतून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाचा पराजय झालाय. त्यांची तिथली १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आलीय. गेली १२ वर्षे देशात आपली सत्ता असली तरी राजधानी दिल्लीत आपली सत्ता नाही हे शल्य एक तप सलत होतं. दिल्लीतलं केजरीवाल यांचं सरकार उलथून टाकण्याचे भाजपचे हरेक प्रयत्न अपयशी ठरले होते. ते सलत असलेलं शल्य भाजपने अखेर दूर केलंय. २७ वर्षापूर्वी तिथं भाजपची सत्ता होती. आज त्यानंतर तिथली सत्ता भाजपने पुन्हा मिळवलीय! जगात सर्वाधिक सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षानं आपली ओळख 'पार्टी विथ डिफ़रन्स...!' अशी मागल्या शतकाच्या अखेरीला देशाला करून दिलेली होती. त्याची आज काय स्थिती आहे? हे आपल्याला दिसतंच आहे. इतर पक्षात जसे गणंग आहेत अगदी तसेच किंबहुना त्याहून अधिक गणंग भाजपत दिसून येतात. प्रधानमंत्री नरसिंहराव यांच्या कारकिर्दीनंतर काँग्रेसचा अस्त होऊ लागल्यावर भाजपने देशातला प्रमुख राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने पाऊल टाकताना, अन्य राजकीय पक्ष आणि त्यांच्या शैलीपेक्षा वेगळ्या मार्गाने जाण्याचा पवित्रा घेतला होता. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, म्हणजेच आपण फारच सभ्य आणि सुसंस्कृत आहोत, असा टेंभा भाजप मिरवत होता. म्हणूनच अन्य पक्षातले गुंड गुन्हेगार वा भ्रष्ट नेत्यांवर आरोप करत, आपली साधनशुचिता दाखवण्यावर भाजपचा भर असायचा. पण मागल्या लोकसभा निवडणुकीत संसदेतल्या बहुमतापर्यंत मजल मारली आणि भाजपने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असं सिद्ध करण्याचीच भूमिका घेतली. मात्र त्यांनी आपल्या या 'भीषण असण्याला बिभीषण' असं सोज्वळ पौराणिक संबोधन घेतलं. मागल्या दोन वर्षात देशभर सोडाच महाराष्ट्रातही एकामागून एक नमूने शोधून त्यांना भाजपत आणण्याची प्रक्रिया इतकी वेगवान केली की, निष्ठावान कार्यकर्त्यालाही आपल्या पक्षाची मूळची ओळख जाणवेनाशी झालीय. आचार, विचार, निष्ठा वा चारित्र्य! म्हणजेच भाजपच्या भाषेत चाल, चलन, अन् चरित्र....! याच्याशी जणू काडीमोड घेतल्यासारखा पक्षाचा विस्तार करत, कुठलाही कचरा गोळा करण्याचा सपाटा लावला गेला. सत्तेसाठी बहूमत आणि बहूमतासाठी काय पण, कोणी पण; हा एककलमी कार्यक्रम हाती घेतला गेला. त्याविषयी बोलताना विधानसभा प्रचाराच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी बिभीषणाची कहाणी सांगत, आपण रामराज्य आणणार असल्याची ग्वाही दिलेली. रामालाही विजय संपादन करण्यासाठी रावणाच्या गोटातला बिभीषण आपल्याकडे घ्यावा लागला होता. हा निकष लावताना भाजपने कुठले कुठले हिरण्यकश्यपू वा दु:शासन पक्षामध्ये भरती करून घेतलेत, तेही आता मुख्यमंत्र्याना आठवेनासे झाले आहेत. कारण दोन मंत्र्यांपैकी एकाला न्यायालयाने शिक्षा सुनावलीय तर दुसरा आरोपी म्हणून वावरतोय. हे मित्रपक्षांचे असले तरी पक्षात घेतलेले काही नेते असेच आहेत. मित्रपक्षांचे हे मंत्री जात्यात दळले जाताहेत अन् काही भाजपचे मंत्री सुपात पडून हसत राहिलेत. तेही जात्यात येतील!
*आम्ही 'शठ्यम प्रती शाठ्यम...!'*
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा केली होती. आता आपण केवळ साधनसुचिता धारण करणारे नाही तर 'शठ्यम प्रती शाठ्यम...!' म्हणत आक्रमकपणे चाल करून जाणारे बनलो आहोत, याचा प्रत्यय त्यांनी आजवरच्या निवडणुकांमधून देशाला करून दिलाय. राजकारणात विरोधी पक्षावर कुरघोडी करत एक एक राज्याची सत्ता मिळवणं हा त्यांचा एकमेव हेतू असतो. ते त्यांनी साध्य करून दाखवलंय. पण प्रतिस्पर्धकांची पुरती ओळखच पुसून टाकण्या इतपत आक्रमकता भाजपच्या कार्यकाळात जनतेला दिसून आलीय. साम, दाम, दंड, भेद यासारख्या चाणक्यनीतीतल्या आयुधांचा वापर करण्यात तरबेज असलेल्या शिर्षस्थ भाजप नेतृत्वाने काँग्रेसचं नाही तर, विरोधीपक्षानांही संपविण्याचा प्रयत्न नव्हे सपाटा चालविलाय. लोकसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवलं नसलं तरी सत्ता हाती घेण्याचे राजकीय चातुर्य दाखवत सत्ता हस्तगत केलीय. ५४१ सदस्यांच्या संसदेत २४० जागा भाजपने जिंकल्या अन् मित्रपक्षाच्या मदतीनं बहुमत मिळवलं. सत्ता हस्तगत केलीय. तब्बल तीस वर्षे आघाडी सरकारांनी ग्रासलेल्या संसदेला एकदा पुन्हा आघाडी सरकार येणार असं वाटत असतानाच धूर्तपणे राजकीय खेळी करत भाजपने पुन्हा सत्ता मिळविलीय. आज भाजप अशा स्थितीत जाऊन पोहोचलाय की, निवडणुकीतल्या टीकेला, होणाऱ्या आरोपांना सणसणीत उत्तर देईल.
*दांभिकपणा पदोपदी जाणवतोय!*
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचा एक करिश्मा होता, जनमानसावर त्यांचा पगडा होता, तरीही त्यांना कधीच ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळविता आलेली नाहीत. फक्त एकदाच इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसनं ५१४ पैकी ४१४ जागा जिंकल्या होत्या, तेव्हा काँग्रेसला ४९.१ टक्के मते होती. आजवरचा तो एक विक्रमच आहे. त्याला आजवर कुणी धक्का लावलेला नाही. भाजपने मात्र 'सत्तेसाठी सारं काही...!' म्हणत; त्याज्य-स्वीकार्य, नैतिक-अनैतिक या साधनसुचिता दर्शविणाऱ्या बाबी दूर सारून नीती-अनितीचे सारे मार्ग अवलंबिलेत. हे सारं पाहता २०२९ च्या निवडणुकीत भाजपने विक्रमी मतं मिळविली तर आश्चर्य वाटायला नको. कारण भाजप सरकारनं कोणताही निर्णय घेतला की, तो जनसामान्यासाठी योग्यच आहे असं समजलं जाऊ लागलंय. आता खोटं देखील खरं वाटायला लागलंय. भाजपचा दांभिकपणा पदोपदी जाणवतोय. महागाई भडकली तरी ती आता राष्ट्रहिताची वाटू लागलीय. सरकारच्या कोणत्याही धोरणाचं, निर्णयाचं कौतुक करताना केवळ मंत्री, नेतेच नव्हे तर कार्यकर्तेही थकत नाहीत. ही राजकीय स्थिती पक्षासाठी उत्साहवर्धक असली तरी लोकशाहीच्या दृष्टीनं हितावह खचितच नाही.
*जनाधारकी ऐसी की तैसी'!*
विरोधीपक्षांत असताना भाजप 'सीबीआयचा दुरुपयोग' सत्ताधारी काँग्रेस करतेय...!' अशी कडाडून टीका करत असे. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमेही टीकेची राळ उठवीत. सत्तेचा दुरुपयोग होतोय असा कांगावा केला गेला तर जनतेमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते. इंदिरा गांधींच्या काळात सीबीआयचा दुरुपयोग विरोधकांना तुरुंगात डांबण्यासाठी झाला होता, परंतु त्याचा परिणामाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण आज तशी भीती भाजपला अजिबात वाटतच नाही. कारण विरोधकांवर जनतेचा विश्वासच राहिलेला नाहीये तसाच तो प्रसिद्धी माध्यमांवरही राहिलेला नाही. शिवाय सरकार अशा बाबतीत कशाचीही दखल घ्यायलाही तयार नाही. सगळं राजकारण एका वेगळ्या दिशेनं वाटचाल करतेय. सीबीआय, आयकर, इडी वा इतर कोणत्याही तपास यंत्रणेने निष्ठेनं, प्रामाणिकपणे काम केलं तर, स्वच्छ चारित्र्याचा, प्रामाणिक राजकीय नेता शोधायला त्यांना फार कष्ट घ्यावे लागतील. तपास यंत्रणेचा वापर सत्ताधारी करतात हे आता लपून राहिलेलं नाही. काँग्रेस आघाडीचं सरकार असताना मोदी विरोधात असा वापर झाला होता. आता पलटवार सुरू आहे. तेच हत्यार अधिक धारदारपणे तीव्रपणे परिणामकारकरित्या वापरलं जातंय. पूर्वी या कारवाया निंदनीय ठरत, पण आज त्या अभिनंदनीय ठरताहेत. या साऱ्या प्रकारामुळे राजकारणाचीच नाही तर लोकांच्या बदलत्या मानसिकतेची चिंता वाटतेय. याबाबत विरोधकही तेवढेच जबाबदार आहेत. देशातला प्रत्येक राजकीय नेता हा कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकलेला आहे. लालूप्रसाद यादवांसारखा खुलेआम भ्रष्टाचार करणारा, दोषी ठरलेला नेता, नव्या पिढीच्या मानसिकतेचा विचार न करता अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करणारे अखिलेश यादव, अन् दिशाहीन, प्रभावहीन, अविश्वसनीय ठरलेले राहुल गांधींसारखे राजकीय नेते, कधीकाळी भाजपच्या सोबत असलेले अकाली दल, शिवसेना, बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती, आसाम गण परिषद यासारखे पक्ष आज हवालदिल, गलितगात्र झाले असताना ते भाजप समोर असतील तर निवडणुकीत भाजपला फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. कारण प्रभावी विरोधक समजले जाणारे नेते भाजपच्या वळचणीला आले आहेत. त्यातही विरोधकांनी आपल्या वागण्यानेच भाजपचा मार्ग सोपा केलाय. कधीकाळी मोदींना पर्याय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं त्या नितीशकुमारांना भाजपने बिहारमध्ये आपल्या दावणीला बांधून टाकलंय. त्यांच्या साथीनं तिथली सत्ता हस्तगत केलीय. खरं तर तिथं भाजपचे पक्ष संघटन विस्कळीत झालं होतं, सत्तेशिवाय त्याचं संघटन होणं कठीण आहे याची जाणीव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना झाली, त्या तुलनेत राजदची पक्ष संघटना मजबूत होती. अमित शहांनी मागील दाराने का होईना बिहारची सत्ता पक्षाला मिळवून दिली. 'जनाधारकी ऐसी की तैसी'! शेवटी जो जिता वही सिकंदर...! हे त्यांनी सिद्ध केलंय!
*इंडिया आघाडीत चलबिचल*
बंगालमधली राजकीय स्थिती संवेदनशील बनलीय. ममता बॅनर्जी तिथं एवढया अडकल्यात की, त्यांना कलकत्ता सोडणं शक्य नाही. गुरखालँड आंदोलनाने उग्र रूप धारण केलंय. हे थांबलं तर नारदा, शारदा, रोझवेली, आणि इतर चिटफंडच्या केसेस सुरू होतील, शिवाय मिदनापोर, २४ परगणा इथं जातीय दंगली उसळल्यात. अशा वातावरणात राष्ट्रीय राजकारणात येऊन मोदींना आव्हान देण्याची ताकदच त्यांच्यात उरलेली नाहीये, शिवाय वेळही नाही. कर्नाटकात सत्तेने पुनरागमन करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. कर्नाटकात संख्येने सर्वाधिक आणि राजकारणावर प्रभाव असलेल्या लिंगायत समाजाला आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आलंय. आंध्रप्रदेशात आणि तेलंगणात भाजप कमकुवत आहे, त्यांचं तिथं अस्तित्वच दिसत नाही. पण चंद्राबाबूंच्या तेलुगु देशम आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनाशी भाजपने युती केलीय अन् आंध्रप्रदेशात सत्तेत सहभागी झालीय. तेलंगण राष्ट्र समितीची अवस्था विचित्र बनलीय. ते ना काँग्रेसबरोबर आहेत ना भाजपबरोबर. तामिळनाडूत भाजपने कंबर कसलीय. शशिकला, पनीरसेल्वम, रजनीकांत यासारख्या मोहरांवर त्यांनी गळ टाकला मात्र त्यांना तिथं फारसं यश आलं नाही. आता नव्या नेत्यांची जुळवाजुळव सुरू आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस एवढी निष्प्रभ होईल असं कधी वाटलंच नव्हतं, कारण काँग्रेसची पाळंमुळं खोलवर रुजलेली होती, काही वर्षापूर्वी काँग्रेसकडे देशात एकहाती सत्ता होती, आज मात्र ती गलितगात्र झालीय. लालू, अखिलेश, मायावती, ममता, केजरीवाल, पवार, आणि तत्सम नेत्यांची सद्दी आता संपत आलीय. वाचाळ केजरीवाल यांनी मौन धारण केलंय. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोदींविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीमध्ये चलबिचल सुरू आहे. काँग्रेसचे साथीदार काँग्रेसचेच नेतृत्व नाकारताहेत. आधी नुसत्या कुरबुरी होत्या. दिल्लीच्या निवडणुकांनंतर तर त्या उघडपणे व्यक्त होऊ लागल्यात. २०२९ पर्यंत अशीच स्थिती देशात राहिली तर देश केवळ भाजपच्या इच्छेनुसार 'काँग्रेसमुक्त भारत' नव्हे तर 'विपक्षमुक्त भारत' सुद्धा होऊ शकेल आणि देशात ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळविणारा पक्ष म्हणून भाजप उदयाला आला तर आश्चर्य वाटणार नाही. शेवटी हे यश, ही सफलता भाजपची असेल. यात लोकशाहीने काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार राजकीय निरीक्षकांना, विचारवंतांना करावा लागेल.
- हरीश केंची,
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment