Sunday, 5 April 2026

क्रांतीची झाली फुले....!



"वैयक्तिक स्वार्थासाठी महात्मा फुले यांचा वापर  करणाऱ्या मंडळींनी त्यांचा विचार कधीच गुंडाळून ठेवलाय. सध्याचा काळ हा मोठा विचित्र आहे. जे गाडण्यासारखं आहे ते मिरवलं जातंय आणि मिरवावं ते दडवलं जातंय. दिवसेंदिवस देवाला मानणाऱ्यांची संख्या, देवादिकांचे स्तोम वाढतंच चाललंय. आपण एकीकडं सुधारणेचा आव आणतो तर दुसरीकडं देवाला नवस घालतो, हे ढोंग आहे. अशा ढोंगींकडून  सामाजिक सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा समाजाला फुले कळलेच नाहीत. त्यांची बहुजन समाजाची चळवळही कळली नाही. महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाला येत्या शनिवार ११ एप्रिलपासून प्रारंभ होतोय. त्यांनी सनातनी कर्मकांडवाद्यांच्या ब्रह्मकपटाला मुळासकट खणून बुद्धीवादाचा नांगर फिरवला. सत्यशोधनाला धर्माचं अधिष्ठान दिलं. वैश्विक विज्ञान समजून घेण्यासाठी त्यांनी निर्मिक ही संकल्पना मांडली. आज त्यांच्या विचारांची कधी नव्हे इतकी निकड निर्माण झालीय!"
---------------------------------------------------
दरवर्षी ११ एप्रिलला पुण्यात महात्मा जोतीराव फुले यांच्या गंजपेठेतल्या वाड्यावर, स्मृतिस्थळावर म्हणजे समताभूमीवर त्यांच्या भक्तांची वर्दळ असते. येत्या शनिवारपासून कृतिशील समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या 'द्विजन्मशताब्दी वर्षा'ला प्रारंभ होतेय. त्यांनी ज्या मूर्तीभंजन विचाराचा ध्यास आयुष्यभर घेतला, त्याच विचाराला हरताळ फासला जातोय. त्यांच्या मूळ विचारांपासून दूर गेलेल्यांना त्या विचारांची निदान आठवण व्हावी असा या द्विजन्मशताब्दी वर्ष प्रारंभाचा हेतू आहे पण त्याचाच विसर पडलेला. सामाजिक विषमता आणि धर्मांधता विरोधात रान पेटविण्यासाठी सिद्ध व्हायला हवंय अशी स्थिती असताना त्यांच्या विचारांचे पाईक मात्र निद्रिस्तावस्थेतच आहेत. सामाजिक समतेची त्यांची लढाई समाजाची मानसिक उंची वाढविणारी ठरलीय. या समतेच्या लढाईत अस्पृश्यतेची खांडोळी झाली, वर्णाभिमान धुडकावला गेला. जातीयतेला चाप बसला, स्त्रिया स्वयंसिद्ध झाल्या, परंतु हे परिवर्तन हिंदुधर्माचा शक्तिपात करणाऱ्या जातीसंस्थेचा नायनाट करणारं ठरलं नाही. याचं दुःख आहे. कारण जातीअंताची लढाई स्वार्थसाधकांच्या हातात गेल्यानं ती जाती अहंकाराची झाली. विशेष म्हणजे ही लढाई सामाजिक समतेचा आग्रह धरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे घेत लढली जाते, ही मात्र हरामखोरी आहे. ती आता नेत्यांप्रमाणे अनुयायांनीही आत्मसात केलीय. त्या सोंगाढोंगावर तुटून पडण्याचं काम करायला हवंय. भारतीय घटनेनं जातीयता नष्ट करण्याचा आग्रह धरलेलाय. परंतु शासकांनी, राजकारण्यांनी त्याउलट व्यवहार करण्यासाठी जाती संघटनांचा आधार घेतलाय. सत्ता मिळविण्यासाठी, ती टिकविण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली जाती अहंकार माजवलाय. असत्य, अन्याय, भ्रष्टाचार, अपमार यांच्याविरोधासाठीच नव्हे तर सत्याच्या आग्रहासाठी, हक्काच्या, मानाच्या पानासाठीही महाराष्ट्रातली माणसं एकत्र येऊ शकत नाहीत. इतकी जाती, प्रदेश, पक्ष अहंकारात तुटलेली, फुटलेली आहेत. या स्वार्थी तुटीफुटीवर प्रकाश टाकावा, अवघा समाज एकवटावा या अपेक्षेनं सामाजिक कार्य फुले यांना मानणाऱ्यांकडून व्हायला हवंय. जातीयतेचा नायनाट करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी आपल्या आयुष्याची राख केली. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी ती विभूती मानली. पुरोगाम्यांकडे सामाजिक समतेचं चांगलं बियाणं होतं, पण ते त्यांनी आपसातल्या भांडणात रुजण्यापूर्वीच सडवलं म्हणूनच जातीयवादी पक्ष-संघटनांचे निवडुंग आज फोफावलंय. आत्मनाशी अन् कार्यनाशी यात फरक करणाऱ्यांची गरज नाही. जातीचा अहंकार अन् अस्मिता हुंडारत हुंदडणारे सगळेच मनुवादी आहेत. स्वार्थासाठी त्यांना मनुनं केलेली जातीय मांडणी हवीच असते. "ब्राह्मणांचा बडेजाव, मराठापणाचा माज, बहुजनांची बनेल बलुतेदारी, दलितत्वाची दळभद्री दडपणं या साऱ्याची निर्मिती मनुवादाच्या आधारात आहे. ज्यांना हा आधार नको त्यांना पांचवा वर्ण आहे. चारही वर्णांना धिक्कारणारा, गुणवंतांना योग्यवेळी संधी आणि गरजवंताला योग्यवेळी सहाय्य हेच लोकशाहीचं अर्थात स्वराज्याचं आद्य अन् अंतिम कर्तव्य आहे असं मानणारा पाचवा वर्ण आहे....!" एखादी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली वा देवाधर्माच्या नावानं कुणी नंगानाच सुरू केला की, पुरोगामी विचारवंत आणि नेत्यांना इथल्या संस्कृतीची आणि प्रबोधनाच्या चळवळीची पार्श्वभूमी हमखास आठवते. मग त्यावर भाष्य करताना ते, "या फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात...!" अशी सुरुवात करून आपलं मत मांडतात. 'फुले-शाहू-आंबेडकर' हा आताशी महाराष्ट्रात परवलीचा शब्द झालाय. डॉ.आंबेडकर यांनी, 'माझ्या वैचारिक जडण-घडणीसाठी बुद्ध, कबीर आणि फुले यांचा विचार प्रेरणादायी ठरला; त्यांना मी गुरू मानतो...!' असं जाहीरपणे सांगितलंय. हे तीनही महापुरुष त्यांच्या जातीचे नव्हते, तसंच, या तिघांना त्यांनी कधी पाहिलंही नव्हतं. म्हणजे, प्रत्यक्षपणे त्यांच्यात गुरु-शिष्य संबंध प्रस्थापित झाले नव्हते. तरीही त्यांनी या तीन महापुरुषांना आपल्या गुरुस्थानी मानलं, यामागे जी भूमिका होती, ती समजून घेतली पाहिजे. सत्य तोच धर्म करावा कायम। मानावा आराम। सर्वाठायी।मानवांचा धर्म, सत्य हीच नीती। बाकीची कुनीती। जोती म्हणे।। यासारख्या अखंडातून महात्मा फुलेंचं हे विचारवैभव उपलब्ध आहे. द्विजन्मशताब्दी वर्ष प्रारंभा निमित्तानं त्यांचे विचार स्वीकारणं, रुजवणं, वाढवणं, मानव्याला जे अनिष्ट ते नष्ट करण्यासाठी त्याचा वापर करणं हाच फुले यांच्या विचारांचा सार्थ गौरव आहे. याची जाणीव खरं तर व्हायला हवी, महात्मा फुले यांच्या निवासस्थानी समताभूमीवर जमणारी गर्दी दांभिकपणा स्पष्ट करणारीच जाणवते. समाजाला जसे फुले कळले नाहीत. तशी त्यांची बहुजन समाजाची चळवळही कळली नाही. कारण 'बहुजन' या शब्दाचा अर्थच आपल्याला कळलेला नाही. काहींनी 'बहुजन' म्हणजे मराठा असा सोयीस्कर अर्थ लावून फुले अन् त्यांच्या चळवळींचा आपल्या सोयीसाठी, स्वार्थासाठी, राजकारणात तरून जाण्यासाठी वापर करून घेतलाय. त्यांना राजकारणाची, आपल्या जातीची, स्वार्थाची चिंता आहे. मात्र जोतिरावांच्या विचारांचं त्यांना सोयर सुतक नाही. वास्तविक फुले विचार हा तळागाळाच्या माणसांनाच नव्हे तर, राष्ट्राला समर्थ बनवणारा आहे. अनेक सामाजिक विकासाची बीजे ही फुले यांच्या सामाजिक क्रान्तीत आहेत. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, आरोग्यविषयक सेवाकार्य, सामाजिक-आर्थिक समानता, श्रममूल्यांचा पुरस्कार यासारखे अनेक उत्क्रांतीकारक विषय फुले यांच्या विचारात सामावलेलेत. सामाजिक सुधारणांचे निर्णय सरकार घेतं, तेव्हा त्यावेळी होणाऱ्या चर्चेचं दुसरं टोक हे फुले विचारांपर्यंत असतं. त्यांचे विचार पेलवण्याचं आणि समाजाच्या, सत्ताधीशांच्या गळी उतरवण्याचं सामर्थ्य केवळ छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलं. फुले यांच्या निधनानंतर क्षीण झालेली सत्यशोधक समाजाची चळवळ शाहू महाराजांनी समर्थ केली. अतिरेकी शिवराळपणामुळं ही चळवळ ब्राह्मण्याकडून ब्राह्मणांकडं सरकली, अन् ती चळवळ ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात फसली. या मोडीत निघालेल्या चळवळीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला जोतीराव फुले यांचे अनुयायी मानल्यामुळं जीवनदानाबरोबरच व्यापकता मिळाली. आज या चळवळीची आणि फुले यांच्या विचारांची, खुद्द जोतिरावांनी ज्यांच्या उद्धारासाठी सपत्निक शेणधोंड्याचा मार खाल्ला. त्या बहुजनांनी तरी काय पत्रास ठेवलीय? फुले विचारांनी अनेकजण घडले. ते स्वतः समाजसुधारकच नव्हते तर त्यांच्या कृतिशील विचारांनी असंख्य सुधारक घडवले. फुले यांच्या विचारांनी सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या अनेकांची सामाजिक परिवर्तनाच्या ऐतिहासीक कार्याची प्रेरणा जोतिराव फुलेंचे विचार हीच होती. या साऱ्यांनी फुले यांच्या विचाराचं ऋण जाहीरपणे मानलं होतं. शुद्रातिशूद्र माणसाच्या उन्नतीचा, त्यांच्या सन्मानाचा विचार फुले यांनी सांगितला त्यासाठी समाजाला धर्मकर्मकांडात घोळवून फसवणाऱ्या पोटभरुवृत्तीचा त्यांनी तडाखेबंद समाचार घेतला. सामाजिक समानते बरोबरच स्त्रीशिक्षणाचा पुरस्कारही केला. फुले यांनी हा विचार कृतीत आणण्यासाठी या व्यापात आपल्या कुटुंबियांनाही गुंतवलं. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या विचाराला कृतीत आणण्याचं काम अगदी मनापासून केलं. जीवघेणे हल्ले सोसले. पण त्या हटल्या नाहीत. महात्मा फुले यांच्या निधनानंतर इतकी वर्षे लोटली, पण तरीही सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात त्यांचे विचार आपले सर्वश्रेष्ठत्व टिकवून आहे. हा महात्मा फुले यांच्या समर्थ विचारांचा गौरव असला तरी, सामाजिकदृष्ट्या ते लांच्छन आहे. कारण फुले यांच्या विचारांचा आधार वाटू नये, अशी सामाजिक स्थिती अजून निर्माण झालेली नाही. किंबहुना यांच्याच विचारांची आवश्यकता तीव्रपणे जाणवतेय. दलित वस्त्या बळकट झाल्यात. स्त्रिया सुशिक्षित होऊ लागल्या, कमावत्या झाल्या तरी, बहुतांश संसारात त्यांचं स्थान अद्यापही दुय्यम आहे. स्त्री अजूनही उपभोगाची वस्तू आहे, अशीच भावना समाजात आहे. देवळं वाढलीत, त्याच्यासमोर रांगाही वाढल्यात. अधिक लांबल्यात. अफरातफर व्हावी इतका गल्ला जमू लागलाय. हे सारं चित्र पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात दिसतंय. तरी देखील फुले यांचं नांव घेऊन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. फुले विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनीही आपली वागणूक बदललीय. फुले नावाचा डिमडिम वाजवत आपला स्वार्थ साधण्यातच ते धन्यता मानू लागलेत. सदासर्वदा त्यांचेच नांव घेऊन, त्यांच्याच विचाराला हरताळ फासणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी फुले यांच्या विचारांचा पराभव केलाय. त्यांनी वाईट म्हणून ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या गाडण्याऐवजी त्या डोक्यावर घेऊन मिरवण्यातच धन्यता मानताहेत. हे सारं बदलण्यासाठी त्यांचे विचारच समर्थ आहेत. यासाठी हवी केवळ जिद्द आणि इच्छा.!
माणूसपण गमावलेल्या माणसात जो आत्मविश्वास, स्वाभिमान फुले यांनी जागवला तसा आत्मविश्वास, स्वाभिमान पुन्हा जागवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. फुले यांनी ज्या त्वेषाने अन्यायाला टकरावर टकरा देऊन समानतेचं वारं समाजात खेळतं ठेवलं ती तडफ लोकांत निर्माण होईल असं वातावरण जाणीवपूर्वक ठेवण्याचं भान आपण दाखवलं पाहिजे. पुरोगामी विचारात जनआंदोलन उभं करण्याची ताकद आहे. "रामकृष्णांना रथात घालून भाजपेयींनी दौड केली. शिवाजी महाराजांना शिवसेनेच्या मावळ्यांनी कडेकोट किल्ल्यात ठेवलंय. आंबेडकरांना दलित दुसऱ्या कुणाच्या हाती लागू देत नाहीत. महात्मा गांधींना आपण कधीच 'हे राम' म्हणायला लावलंय...!" आता आधार केवळ या विचारांचाच आहे. कर्मकांडाच्या, पुरोहितशाहीच्या, जन्माधिष्ठित उच्च नीचतेच्या, विषमतेच्या चक्रव्यूहात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नावानं कुणी समाजाला गुंतवू बघत असेल तर त्याचा प्राणपणानं मुकाबला करण्याची तयारी पुरोगामी विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना करावीच लागेल. समाजवादानं उन्नत अन् समृद्ध समाजाचं स्वप्न दिलंय. महाराष्ट्र हा राष्ट्रवाद आणि मानवी समता या दोन्हीमध्ये या देशाला मार्गदर्शक ठरेल असं मानलं जात होतं. महात्मा जोतिबा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, सुधारकाचार्य गोपाळराव आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, आचार्य जावडेकर, या सगळ्यांनी मराठी माणसाला रूढी-परंपरा-कर्मकांड यांच्या फेऱ्यातून बाहेर आणलं. जन्माधिष्ठित उच्चनीचतेचा अहंगंड सुटावा, माणसांमाणसात बंधुभाव जागावा म्हणून आयुष्यभर या सर्वांनी जे प्रयत्न केले त्यामुळेच अठरापगड जातीतल्या शतकानुशतके मुकाट दबून आला दिवस ढकलत जगणाऱ्या लोकांना खरोखरच  जाग आली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगाव शिक्षणाची ज्योत नेली. महर्षी कर्वे यांनी स्त्रीला हिंमत दिली. लोकांच्या उद्धाराचा ठेका परमेश्वराने आपल्यालाच दिलाय अशा गुर्मीत जगणारे आणि वर्णवर्चस्वाचा प्रत्यय पावलोपावली देणारे एकाकी पडत गेले. आपण माणूस आहोत, या समाजाच्या जडणघडणीत आपलाही वाटा आहे, आपले काही हक्क आहेत, आपण एकजुटीने आपले हक्क मिळवू शकतो, विकास साधू शकतो, त्यासाठी कुणाच्या परवानगीची कुणाच्या कृपेची आवश्यकता नाही हा विश्वास सर्वत्र आला. महाराष्ट्राच्या राजकारणावर, सामाजिक व्यवहारावर याचा फार मोठा परिणाम झाला. विसाव्या शतकात समाजवादी विचार लोकप्रिय झाले. महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करत केलेला कारभार, समाजवादाला नकार देत जनतेच्या सहभागावर अन् विकेंद्रीकरणावर भर देणारे पक्ष, ही समाजवादाचीच वेगवेगळी रूपं आहेत; कारण फुले यांच्या विचारानं देशांत कार्यरत असणाऱ्या लोकांना एका उन्नत, समृद्ध समाजाची स्थापना करण्याचं स्वप्न दिलंय, याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवायला हवीय.
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमके काय?

चौथ्या इयत्तेत शिवछत्रपतींचा इतिहास शिकला नसेल, असा मराठी माणूस विरळाच. शिवाजी महाराजांनी १६४५ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पुण्याजवळील रायरेश्वर मंदिरात आपल्या मावळ्यांसोबत 'हिंदवी स्वराज्य' स्थापनेची शपथ घेतली होती. असे काही वाचले की, ते त्या कोवळ्या वयात संस्कार करून जाते. 
......................................
'हिंदवी स्वराज्य' हे महाराजांचे स्वप्न होते, हे कायमचे मनात पक्के बिंबते. माझ्याही मनात ते तसेच बिंबले. त्या वेळी 'हिंदवी स्वराज्य' म्हणजे काय याचा खूप विचार केला नाही. ते वयही नव्हते. पण पुढे जसजसे वाचत गेलो, तसे या शिवछत्रपतींच्या स्वप्नाचे आकलन माझ्यापुरते हळूहळू होत गेले. यातला हिंदवी शब्द शब्दकोशातून सापडला.  व्युत्पत्तीनुसार तो फार्शीतून आलेला. फारसच्या फार्शी भाषेत  सर्वप्रथम 'हिंद' या शब्दाचा उगम दिसला. सिंधू नदीच्या पलीकडील प्रदेशाला संबोधण्यासाठी तिथल्या लोकांनी तो प्रचलनात आणला. भौगोलिक ओळख दर्शवणाऱ्या मूळ 'हिंद' शब्दाला फार्शी व्याकरणातील '-ई' हा प्रत्यय लागून 'हिंदवी' किंवा हिंदुई हा शब्द आकाराला आला. हिंदू शब्दही त्यांनीच तयार केलेला. 'हिंदवी'चा शब्दशः आणि ऐतिहासिक अर्थ "भारतीय" किंवा 'हिंदुस्तानाचा रहिवासी" असा होतो. मध्ययुगीन कालखंडात हा शब्द केवळ धार्मिक संदर्भात न वापरता, या भूमीतील लोक, त्यांची स्थानिक संस्कृती आणि प्रामुख्याने इथल्या बोलीभाषांची ओळख पटवून देण्यासाठी वापरला जात असे. दखनी भाषेचा उल्लेख दक्षिणेत आलेल्या सुफी संतांनी 'हिंदुइ' असाच केलेला १३व्या शतकापासून आढळतो. हा शब्द पुढे शिवछत्रपतींनी थेट त्यांच्या शपथेत वापरला आहे. महाराजांना 'हिंदवी' म्हणजे दक्षिणेतल्या मूळ लोकांचे स्वराज्य असा अर्थ अभिप्रेत असेल, असे माझे मत झाले. कारण ‘दखनची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहे.’ असे शिवछत्रपतींनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला पत्रात लिहिलेले आहे. दक्षिणी लोक विरुद्ध उत्तरेतले साम्राज्यवादी राजे अशी लढ्याची स्पष्ट विभागणी महाराजांना अपेक्षित होती आणि त्या दृष्टीने 'स्वराज्य निर्मितीच्या' स्वप्नासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले.
स्वराज्य या संकल्पनेने आपल्या स्वातंत्र्यलढ्याला अभूतपूर्व बळ दिले आणि या प्रेरणेचा मूळ स्त्रोत शिवछत्रपतीच होते, हे सत्य नाकारता येणार नाही. महात्मा फुले आणि लोकमान्य टिळकांनी ही शिवस्मृती पुन्हा जागृत करून तिला जनमानसात रुजवले; टिळकांनी तर 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे' अशी गर्जनाच केली. पुढे महात्मा गांधींनी हीच संकल्पना अंत्योदयाची धेयेनिश्चिती  करतना अधिक व्यापक  केली. गांधीजींनी स्पष्ट केले की, स्वराज्य म्हणजे केवळ ब्रिटिशांपासून मिळालेली मुक्ती नव्हे, तर “माझ्यासाठी हिंद स्वराज्य म्हणजे सर्व लोकांचे, वंचित राहिलेल्या शेवटच्या माणसासाठी न्यायाचे राज्य होय.” 'सर्व लोकांचे आणि न्यायाचे राज्य' हे आकलन 'हिंदवी स्वराज्याची' कल्पना अधिक विस्तारणारे ठरले माझ्यासाठी. संविधान निर्मितीच्या काळात "हिंदवी स्वराज्य" हा शब्द प्रत्यक्ष मसुद्यात नसला, तरी त्यातील मूल्ये आणि प्रेरणा संविधान सभेतील चर्चेचा महत्त्वाचा भाग होत्या. शिवछत्रपतींच्या प्रशासनातील विकेंद्रीकरण आणि लोक-कल्याणकारी धोरणांमध्ये आधुनिक भारतीय लोकशाहीची बीजे दडलेली होती असे मला आढळले; जेव्हा 'जनतेचे राज्य' स्थापणे, हा विषय आपल्यासमोर आला, तेव्हा शिवछत्रपतींनी स्थापलेले 'रयतेचे राज्य' हे दीपस्तंभाप्रमाणे ऐतिहासिक उदाहरण म्हणून संविधाननिर्मात्यांच्या समोर होते. "हिंदवी स्वराज्य" हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून ते 'या मातीतील' लोकांचे राज्य होते, जे संविधानातील समता, न्याय, बंधुता यांच्याशी सुसंगत होते.  शिवरायांनी जपलेली सर्वसमावेशकता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला 'सामाजिक न्याय व समतेचा विचार’ हा आधुनिक हिंदवी स्वराज्याच्या नैतिक पायाभरणीचाच एक भाग होता असे माझे आकलन झाले.
मात्र हल्ली भारताच्या सार्वजनिक जीवनात “हिंदवी स्वराज्य” हा शब्द जेव्हा ऐकू येतो तेव्हा ‘हिंदू धर्मियांचे तेच फक्त काय ते’ इतका कोता अर्थ घेऊन येतो असे वाटते किंवा तसेच ते म्हणावयाचे असते. काहींना तो निव्वळ हिंदूंच्या अभिमानाचा विषय वाटतो आणि मुसलमानांना मात्र वगळले जाण्याच्या भीतीतून अस्वस्थ करणारा वाटू लागतो. आज या संकल्पनेचा अर्थ जर आपण ध्रुवीकरणाच्या चश्म्याऐवजी व्यापक ऐतिहासिक आणि नैतिक दृष्टीकोनातून पाहिला, तर ती कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नसून न्याय, स्वाभिमान आणि स्थानिक लोकांच्या सक्षमीकरणाची कल्पना आहे, हे कळायला फार अवघड जाऊ नये. आजच्या भारतीय मुस्लीम समाजाच्या संदर्भात या संकल्पनेचे नव्याने आकलन करण्याची गरज आहे. गेल्या काही कालखंडात देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात संशय प्रचंड धुमसत आहे, जिथे मुस्लीम समाजाला वारंवार राष्ट्रनिष्ठेची साक्ष द्यावी लागते आणि ऐतिहासिक घटनांसाठी त्यांना सामूहिकरीत्या जबाबदार धरले जाते. अशा काळात जर "स्वराज्य" या शब्दाचा अर्थ केवळ बहुसंख्याकांच्या सांस्कृतिक वर्चस्वाशी जोडला गेला, तर ते शिवछत्रपतींच्या स्वप्नाला, लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारे ठरेल; कारण स्वराज्याचा खरा अर्थ हा सर्वांच्या सहभागातून, सर्वांच्या हितासाठी आणि न्यायाच्या आधारावर उभारलेली सत्ता हाच होता. भारतीय मुसलमान हे या भूमीचे समान हक्कांचे नागरिक असून त्यांची ओळख केवळ धार्मिक चौकटीत मर्यादित नाही; भाषा, संस्कृती, आर्थिक योगदान आणि कला-साहित्यातील त्यांचा सहभाग मोलाचा आहे. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात होता त्याप्रमाणेच. त्यामुळे, जर "हिंदवी" ही संकल्पना या भूमीशी असलेल्या नात्याची ओळख मानली, तर मुसलमान भाऊ-बहिणी निश्चितपणे त्या संकल्पनेचा अविभाज्य भाग आहेत. शिवछत्रपतींना हेच अभिप्रेत होते अन्यथा त्यांच्यासोबत लढताना जे अनेक मुस्लीम त्यांनी सोबत घेतले तसे त्यांनी केले नसते.
मुस्लिम समाजासमोर आज शैक्षणिक मागासलेपणा, आर्थिक असुरक्षितता आणि सामाजिक प्रतिनिधित्वाचा अभाव अशी वास्तविक आव्हाने आहेत, ज्यांचे निराकरण केवळ भावनिक राजकारणातून होणे शक्य नाही. स्वराज्याची खरी कसोटी समाजाच्या अंतर्गत प्रगतीत आहे  मग ते दर्जेदार शिक्षण असो, कौशल्यविकास, उद्योजकता, महिला सक्षमीकरण किंवा नागरी हक्कांची प्रगल्भ जाणीव असो. असे मला वाटते. त्याचबरोबर, बहुसंख्य समाजाचीही यामध्ये मोठी जबाबदारी आहे, कारण राष्ट्रनिर्मिती ही एकतर्फी प्रक्रिया नसते. संशयापेक्षा विश्वास, भेदाभेद करण्याऐवजी संवाद आणि बहिष्काराऐवजी सहभाग हीच लोकशाहीची खरी मूल्ये आहेत. जर “हिंदवी स्वराज्य” हा शब्द खरोखरच लोकाधारित आणि न्यायाधारित राज्यव्यवस्थेचे प्रतिक असेल, तर त्या रचनेत कोणत्याही नागरिकाला परके मानण्यास जागा असता कामा नये. आजच्या भारतात सर्वात कळीचा प्रश्न हा आहे की, आपण राष्ट्राची व्याख्या केवळ हिंदू धर्म आणि हिंदू सांस्कृतिक एकरूपतेवर करतो की भारतभूमीत हजारो वर्ष नांदलेल्या विविधतेतील एकतेवर? भारतीय संविधानाने विविधतेचा मार्ग स्वीकारला असल्याने, मुस्लीम समाजानेही आपली भूमिका केवळ बचावात्मक न ठेवता, घटनात्मक मूल्यांच्या आधारावर सकारात्मक ठेवायला हवी. शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि आंतरधर्मीय संवादाद्वारे विश्वासाचे पूल बांधणे ही आजच्या काळाची गरज आहे. स्वराज्य म्हणजे केवळ राजकीय सत्ता मिळवणे नसून ती एक नैतिक जबाबदारी आहे राष्ट्रनिर्माणाची, लोककल्याणाची. राष्ट्राच्या प्रगतीत कोणत्याही समाजाला वगळून दीर्घकाळ परिघावर ठेवता येत नाही कारण तसे केले तर कमकुवत दुबळे राष्ट्र आकारास येईल. भारताची खरी ताकद त्याच्या विविधतेतील एकतेत दडलेली आहे. "हिंदवी स्वराज्य" ही संकल्पना जर या विविधतेला न्याय देणारी असेल तरच शिवछत्रपतींना अभिप्रेत स्वराज्याचे स्वप्न साकार होईल, जेव्हा प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माच्या, समूहाच्या, जातीच्या पलीकडे जाऊन समान सन्मान आणि संधी मिळेल तेव्हा खरे 'हिंदवी स्वराज्य' स्थापन झाले असे आपण अभिमानाने म्हणू शकतो. इथे माझे आकलन पूर्ण झाले असे मला वाटते.  

सावरकर.... मिथके आणि सत्य


भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नुसत्याच प्रतीकात्मक गौरवाच्या पलीकडचा आहे. हा लढा काही लोकांनी फावल्या वेळात आनंदासाठी साजरा केलेला सोहळा नव्हे. त्याग, निष्ठा, श्रद्धा यांची कठोर मागणी करणारं ते धगधगतं यज्ञकुंड होतं. मायभूमीचे स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापायी अनेकांनी त्यात हसत हसत प्राणांची आहुती दिली, तुरुंगवास भोगला, छळ सहन केला. ब्रिटिशांच्या प्रत्येक जुलमाला ते ताठ मानेने सामोरे गेले. त्यांच्या निधड्या छातीच्या अभेद्य भिंती तुरुंग ओलांडून आकाशाला भिडल्या. हा असीम अजोड त्याग हे आपल्या देशाचे राष्ट्रीय चारित्र्य होते त्यावेळी....!
................................................ 
असा आपला स्वातंत्र्यलढा म्हणजे तत्त्वनिष्ठा आणि अपराजित ध्येयवादाचा एक अढळ दस्तऐवज आहे, करोडो लोकांच्या निःस्वार्थ त्यागाची साक्ष देणारा. तो काही कुणा एकाच्याच व्यक्तीपूजेचा उत्सव नव्हता. फक्त एकच एक व्यक्तीच्या नावामागच्या पदव्यांनी, पदं आणि पुरस्कारांनी या इतिहासाला झळाळी येते असे आम्हांस वाटत नाही. आणि स्वातंत्र्य मिळाल्याला पाऊण शतक लोटल्यानंतरच्या सांप्रत काळात जर कुणाला स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीसाठी केवळ राजकारण म्हणून हे पुरस्कार आणि पदं खिरापतीसारखी देण्याची मागणी पुढे येत असेल तर त्या व्यक्तीच्या त्याग आणि नैतिक अधिष्ठानाची चिकित्सा करणे  उचित आणि प्रासंगिकच ठरते.
विषय सावरकरांचा सुरू आहे. सावरकरांच्या मूल्यमापनाचा विषय येतो तेव्हा दस्तऐवज, त्यांच्या प्रत्यक्ष कृती आणि ऐतिहासिक नोंदी काय सांगतात, ते तपासले पाहिजे. 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी स्वतःच स्वतःस बहाल करणाऱ्या सावरकरांचा प्रवास शौर्यापेक्षा शरणागतीचा, ध्येयनिष्ठेपेक्षा तडजोडीचा आणि परकीय सत्ताधाऱ्यांशी वारंवार निष्ठा व्यक्त करणाऱ्या अर्जांचा अधिक आहे. ४ जुलै १९११ रोजी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाऊल ठेवल्यापासून ते ६ जानेवारी १९२४ रोजी सशर्त सुटकेपर्यंत सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे किमान सहा वेळा दयायाचना अर्ज आणि माफीनामे सादर केले. हा केवळ राजकीय आरोप नाही, तर ब्रिटिश सरकारच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये, कारागृह नोंदींमध्ये आणि संसदीय चर्चांमध्ये नोंदलेले ऐतिहासिक सत्य आहे.
सावरकरांच्या तथाकथित ‘क्रांतिकारक’ या प्रतिमेला पहिलाच गंभीर असा तडा जातो तो १९११–१२ या त्यांच्या तुरुंगवासाच्या पहिल्याच वर्षी. ज्या अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेत तिथल्या सेल्युलर जेलच्या काळकोठडीत फजले-हक़-खैराबादी, बटुकेश्वर दत्त, उल्हासकर दत्त, त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती यांसारख्या असंख्य क्रांतिकारकांनी अमानुष छळ सहन केला, फाशी जाण्याची तयारी ठेवली, पण सरकारपुढे दयेच्या याचनेचा एक चुकार शब्दही टाकला नाही, त्याच ठिकाणी सावरकरांनी अवघ्या पहिल्या सहा महिन्यांतच माफीनामा दाखल केला होता. या अर्जात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, “माझे पूर्वीचे कृत्य चुकीचे होते आणि भविष्यात मी सरकारविरोधात कोणतीही हिंसक किंवा क्रांतिकारक कृती करणार नाही...!” माफीनामे लिहिण्याची ही मालिका त्यानंतर सुरूच राहते. १४ नोव्हेंबर १९१३ रोजी सावरकरांनी ब्रिटिश सरकारला पाठवलेल्या अर्जात तर शरणागतीचा कळस गाठला आहे. या पत्रात ते लिहितात: “If the Government in their mercy release me, I shall be the staunchest advocate of constitutional progress and loyalty to the English Government.” म्हणजेच, सरकार  सांगेल त्या स्वरूपात सेवा करण्याची त्यांनी लेखी तयारी दर्शवली. 
सरकारने दयादृष्टीने सुटका केल्यास सावरकर घटनात्मक मार्गाचे आणि इंग्रजी सत्तेप्रती निष्ठेचे सर्वात ठाम समर्थक बनतील, तसेच सरकारने घालून दिलेल्या अटींनुसार वागण्यास तयार राहतील ,अशी या माफीपत्रातली एकूण भाषा आहे. ही भाषा एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाची नव्हे, तर स्वतःच्या सुटकेसाठी राजकीय संघर्षाचा संपूर्ण त्याग करणाऱ्या हतबल आणि भित्रट कैद्याची आहे.
१९१४ मध्ये, अंदमानच्या सेल्युलर जेलमधून भारत सरकारच्या गृहविभागाला पाठवलेल्या आपल्या तिसऱ्या माफीपत्रात सावरकरांनी शरणागतीची त्यांची भूमिका अधिकच स्पष्टपणे मांडली. या पत्रात त्यांनी हिंसक क्रांतीच्या मार्गाचा उघडपणे त्याग केला आहे, असे म्हटले आणि भविष्यात केवळ ब्रिटिश घटनात्मक चौकटीतच राहण्याची लेखी हमी दिली. सावरकर त्यात नमूद करतात की, त्यांनी पूर्वी स्वीकारलेला मार्ग हा “परिस्थितीच्या दबावामुळे” under the stress of circumstances होता आणि आता ते कायद्याचे पालन करणारे एक शांत व निष्ठावान नागरिक म्हणून जगण्यास तयार आहेत. सरकारला आश्वस्त करताना ते म्हणतात की, त्यांच्यापासून आता सत्तेला कोणताही धोका उरलेला नाही आणि सुटका झाल्यास ते सरकारविरोधी कोणत्याही कारवायांत सहभागी होणार नाहीत. ही पत्रं पुढे ब्रिटिश सरकार सार्वजनिक करेल याची सावरकरांना कल्पना नसावी.
१९१७ साली लिहिलेले सावरकरांचे चौथे माफीपत्र हे केवळ अंदमानातील कारागृह नोंदींपुरते मर्यादित राहिले नाही, तर त्याचा अधिकृत उल्लेख २२ मार्च १९२० रोजी ब्रिटिश कायदेमंडळात करण्यात आला. सावरकरांच्या समर्थकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले की, “Savarkar has submitted petitions for mercy in the years 1914 and 1917” म्हणजेच सावरकरांकडून १९१४ आणि १९१७ साली माफीपत्रे प्राप्त झाली असून, त्यांचा तपशील सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. ब्रिटीश सरकारचे हे संसदीय उत्तर सावरकरांच्या माफीपत्रांचे अस्तित्व निर्विवादपणे सिद्ध करते. यावरून हे स्पष्ट होते की १९१७ चे माफीपत्र हा केवळ विरोधाचा किंवा आरोपांचा भाग नाही, तर ब्रिटीश गृहखात्याने स्वीकारलेला आणि चक्क संसदेच्या पटलावर मांडलेला एक अधिकृत दस्तऐवज आहे. या १९१७ साली लिहिलेल्या अर्जाचा सूरही त्यांच्या मागील पत्रांशी सुसंगत होता; ज्यात त्यांनी हिंसक राजकारणापासून फारकत घेण्याची, कायद्याच्या चौकटीत राहण्याची आणि स्वतःला ब्रिटीश सत्तेसाठी 'निरुपद्रवी' सिद्ध करण्याची भूमिका ठळकपणे मांडली होती.
१९११, १९१३, १९१४ आणि १९१७ ही सगळी माफीपत्रे अंदमानातूनच लिहिली गेली. १९२० मधील प्रतिज्ञापत्र आणि त्यानंतरची ६ जानेवारी १९२४ रोजीची अंदमानातून सशर्त सुटका हे सावरकरांच्या शरणागतीच्या प्रक्रियेतील पुढचे टप्पे आहेत. १९२० साली ब्रिटिश सरकारने राजबंदी म्हणून दिलेल्या माफीच्या संदर्भात सावरकरांनी लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या पूर्वीच्या क्रांतिकारक भूमिकेवर स्पष्ट माघार घेत, हिंसक मार्गाचा निषेध केला आणि घटनात्मक चौकटीत काम करण्याची तयारी दर्शवली. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी कायद्याचे पालन, शासनाशी संघर्ष न करणे आणि राजकीय मर्यादांचे पालन याबाबत सहमती दर्शवली ज्याचा आशय पुढे सुटकेसाठीच्या अटींचा पाया ठरला. या पत्रांचा परिणाम म्हणून ६ जानेवारी १९२४ रोजी त्यांची अंदमानातून सुटका झाली, या सशर्त सुटकेसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणेत सावरकरांनी लिहून दिलेले एक विधान विशेष लक्षवेधी आहे “I hereby acknowledge that I had a fair trial and a just sentence… and am willing to uphold the law and the constitution to the best of my powers.”
अंदमानातील सुटकेनंतर आणि भारतातील नजरकैदेच्या काळात सावरकरांनी १९३० मध्ये दिलेले हमीपत्र त्यांच्या तडजोडीच्या मालिकेतील एक अत्यंत निर्णायक टप्पा ठरते. या पत्राद्वारे सावरकरांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर आपले बंधू बाबाराव सावरकर यांच्या वतीनेही राजकारणातून पूर्णपणे दूर राहण्याची लेखी हमी ब्रिटिश सरकारला दिली. सावरकर त्यात स्पष्टपणे नमूद करतात “I and my brother are perfectly willing to give a pledge of not participating in politics for a definite and reasonable period that the Government would indicate.” अर्थात, सरकार जो काळ निश्चित करेल, त्या विशिष्ट आणि रास्त कालावधीसाठी राजकारणात सहभागी न होण्याची शपथ घेण्यास मी आणि माझे बंधू पूर्णतः तयार आहोत. या विधानावरून हे निर्विवादपणे स्पष्ट होते की, ही भूमिका केवळ एखादा क्षणिक डावपेच किंवा तात्पुरती सवलत मागण्यापुरती नव्हती; तर सरकारने निर्देशित केलेल्या कोणत्याही ‘रास्त कालावधीसाठी’ definite and reasonable period राजकीय संन्यास स्वीकारण्याची ती पूर्ण तयारी होती. विशेष लक्षणीय बाब म्हणजे, हे हमीपत्र अंदमानच्या अमानुष छळातून बाहेर आल्यानंतर, भारतातील नियंत्रित कारावास आणि राजकीय देखरेखीच्या काळात लिहिले गेले होते. ब्रिटिश सत्तेला आपण आता राजकीयदृष्ट्या कोणत्याही प्रकारे ‘धोकादायक उरलेलो नाही, हा विश्वास सिद्ध करणे हाच या पत्राचा मुख्य हेतू होता. म्हणूनच, १९३० चे हे हमीपत्र म्हणजे स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाचे सातत्य नसून, राजकीय निष्क्रियतेची लेखी हमी देणाऱ्या शरणागतीचा एक स्पष्ट दस्तऐवज म्हणून इतिहासात नोंदले जाते. 
सावरकरांना १९२४ ते १९३७ या कालावधीत रत्नागिरीतील नजरकैदेच्या काळात ब्रिटिश सरकारकडून ६० रुपये मासिक निर्वाह भत्ता मिळत होता. राजकीय कृती, सभा, लेखन किंवा सरकारविरोधी हालचाल केल्यास तो तत्काळ बंद होऊ शकत होता, हा भत्ता नजरकैद बंद होईस्तो सुरूच राहिला. म्हणजे सावरकरांनी १९२४ ते १९३७ या तेरा वर्षां्च्या काळात स्वातंत्र्यलढ्यात कुठलाही भाग घेतला नाही, हे स्वयंस्पष्ट आहे. १९३७ मध्ये रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यानंतर सावरकर एका नव्या अवतारात देशासमोर आले, पण हे नवं रूप क्रांतिकारक कमी आणि एक द्वेष पसरविणाऱ्या राजकारण्याचं अधिक होतं. ज्या सावरकरांनी एकेकाळी 'स्वदेशी' आणि 'ब्रिटिशांविरोधात बंडा'ची भाषा केली होती, त्यांनीच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात "हिंदूंनो, सैन्यात भरती व्हा आणि ब्रिटिशांना सहकार्य करा..!" असे आवाहन करावे, हा त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा विरोधाभास होता. ज्या वेळी संपूर्ण देश, सामान्य पुरूष आणि स्त्रियादेखील महात्मा गांधींच्या हाकेला ओ देत 'छोडो भारत' आंदोलनात स्वतःला झोकून देत होता, त्या वेळी सावरकरांनी ब्रिटिश सत्तेशी घेतलेली सहकार्याची भूमिका ही राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याला बगल देणे होते. एकीकडे, नेताजी सुभाषचंद्र बोस जपानच्या मदतीने ब्रिटिशांविरुद्ध 'आझाद हिंद सेना' उभी करत होते. तर दुसरीकडे  सावरकरांनी ब्रिटिशांशी सहकार्याची भूमिका घेणे. दोन भिन्न  विरोधी टोके. एका बाजूला सुभाषबाबूंची ब्रिटिशांविरोधी क्रांतीची भाषा आणि दुसऱ्या बाजूला सावरकरांची  ब्रिटिशांना अंकित राहाण्याची भाषा.  यातून सावरकरांची राजकीय दिशा नेमकी कोणती, ते लख्खपणे कळते. 
द्विराष्ट्र सिद्धांताबाबतची त्यांची भूमिका अत्यंत वादग्रस्त राहिली. १९३७ च्या अहमदाबाद येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनात सावरकरांनी स्पष्टपणे मांडले की, “भारत आज एकसंध राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ शकत नाही; उलट येथे हिंदू आणि मुस्लीम अशी दोन प्रमुख राष्ट्रे शेजारी राहत आहेत...!” या विधानातून त्यांनी देशांतर्गत धार्मिक ओळखींचे राजकीय द्वंद्वात रूपांतर केले आणि त्याचा थेट परिणाम भारतीय राष्ट्रीय एकात्मतेच्या कल्पनेवर झाला. मुस्लीम लीगने १९४० मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्याच्या तब्बल तीन वर्षांआधीच सावरकरांनी ही विभागणी वैचारिक स्तरावर मान्य केली होती. “हिंदू हे स्वतःहूनच एक राष्ट्र आहेत,” या त्यांच्या मांडणीने आधुनिक नागरिकत्वाच्या तत्त्वाऐवजी धर्माधारित ध्रुवीकरणाला भक्कम वैचारिक आधार दिला. जरी सावरकरांनी पाकिस्तानच्या निर्मितीला औपचारिक विरोध केला असला, तरी “दोन राष्ट्रे”ही संकल्पना रुजवण्यात त्यांच्या भूमिकेने मुहम्मद अली जिन्ना यांच्या ‘टू-नेशन थिअरी’ला वैचारिक खतपाणीच घातले. परिणामी, राष्ट्रीय एकात्मतेऐवजी समुदाय-केंद्रित राजकारणाला धार मिळाली आणि हाच त्यांच्या राजकीय विचारांचा सर्वात गंभीर वादग्रस्त आणि काळाकुट्ट वारसा ठरला.
गांधी हत्येनंतर सावरकरांच्या कारकिर्दीला एकूणच डाग लागला. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाल्यानंतर हत्येच्या कटात सामील असण्याच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सावरकरांना अटक करण्यात आली. २२ फेब्रुवारी १९४८ रोजी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात पुन्हा एकदा सावरकरांनी शरणागतीचीच भाषा स्वीकारली. त्या माफीनाम्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले—“I shall refrain from taking part in any communal or political public activity for any period the Government may require.”  हे आश्वासन केवळ तात्पुरते नव्हते, तर स्वतःला राजकीयदृष्ट्या निरुपद्रवी सिद्ध करण्याच्या जुन्या प्रयत्नांचाच भाग होता. हीच माफीपत्राची मालिका पुढे १३ जुलै १९५० रोजी मुंबई हायकोर्टाला दिलेल्या पत्रात त्यांनी अधिक ठामपणे पुढे नेली गेली. त्या पत्रात सावरकर लिहितात की ते “… would not take any part whatever in political activity and would remain in my house in Bombay” आणि तेही एक वर्षभर. याच वेळी त्यांनी हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, ज्यामुळे सार्वजनिक राजकारणातून त्यांची औपचारिक माघार निश्चित झाली. या दोन पत्रांमधील भाषा, आशय आणि कालानुक्रम पाहता, १९४८ ते १९५० या कालखंडात सावरकरांचा प्रवास हा कायदेशीर बचावापुरता मर्यादित नसून स्वतःहून स्वीकारलेल्या राजकीय निष्क्रियतेच्या भूमिकेचा होता. त्यांनी राष्ट्रीय राजकारणातून घेतलेली निवृत्ती हे 'वैराग्य' नसून, मुख्य राष्ट्रीय प्रवाहापासून तुटल्यामुळे आलेली हतबलता आणि नैतिक पराभवाची कबुलीच होती.
सावरकरांना 'भारतरत्न' देण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून पुन्हा एकदा लावून धरली जात आहे. त्यावर वादही सुरू आहे पण ही मागणी केवळ या वादापुरती मर्यादित नाही. अशी मागणी करणे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नैतिक अधिष्ठानाला आणि त्यासाठी अनेकांनी केलेल्या प्राणांतिक त्यागाला प्रश्नचिन्हांकित करण्यासारखे आहे. ज्या भारतरत्न पुरस्काराचा निकष 'सर्वोच्च राष्ट्रसेवा' हा असतो, तो निकष सावरकरांच्या बाबतीत लावताना त्यांच्या कारकिर्दीतली अनेक काळी पाने डोळ्याआड कशी करणार? ते शक्यच नाही आणि हीच भागवतांच्या मागणीतील सर्वात मोठी शोकांतिका आहे.
सावरकरांचा इतिहास हा जेवढा क्रांतिकारी उपक्रमांशी जोडला गेला आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक तो ब्रिटीश सत्तेपुढील 'शरणागती' आणि 'माफीनाम्यांनी' डागाळलेला आहे. अंदमानातील काळकोठडीत असताना ब्रिटिशांना सादर केलेली लेखी आश्वासने आणि "सरकार सांगेल त्या स्वरूपात सेवा करण्याची" तयारी, ही कृती क्रांतीच्या कोणत्या व्याख्येत बसते?  ज्या काळात हजारो देशभक्तांनी फासावर चढणे पसंत केले, तिथे माफीनाम्यांचा आधार घेणाऱ्या व्यक्तीने स्वतःलाच 'स्वातंत्र्यवीर' ठरवणे, हे देशासाठी बलिदान देणाऱ्या खऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींचा अवमान करणारे नाही का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अस्वस्थता समजण्यासारखी आहे. स्वातंत्र्यलढ्यात स्वतःचे कोणतेही ठोस आणि व्यापक योगदान नसल्यामुळे, संघाला नेहमीच एका 'आयात केलेल्या' नायकाची किंवा 'सोयीस्कर' इतिहासाची गरज भासली आहे. सावरकरांना भारतरत्न देऊन त्यांच्या वादग्रस्त वारशाला अधिकृत मान्यता मिळवून देण्याचा हा प्रयत्न म्हणजे इतिहासाचे भगवेकरण करण्याचाच एक भाग आहे. शरणागतीला राष्ट्रभक्तीचे आवरण चढवून आणि राष्ट्रविभाजनाच्या विचारसरणीला आणि राजकारणाला वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देऊन, संघ आजच्या काळातील ध्रुवीकरणाला खतपाणी घालत आहे. मशिदी पाडणे,  मशिदींच्या पुढ्यात जय श्रीरामचे अचकट विचकट नारे देणे, गावोगावच्या दर्ग्यांमध्ये जबरदस्तीने मूर्ती बसवणे,  धर्माच्या नावे होणारी हिंसा आणि सामाजिक द्वेष या सर्व प्रवृत्तींना सावरकरांच्या 'हिंदुत्ववादी' विचारांतूनच ऊर्जा मिळते, हे खरे नाही का? पण अखेर, कुठलाही सन्मान हा मागून मिळत नसतो, तो चारित्र्यातून आणि कर्मातून झळकावा लागतो. 'भारतरत्न' हा देशाचा सर्वोच्च गौरव आहे; तो राजकीय हट्टापायी एखाद्या संशयास्पद आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाला बहाल करणे म्हणजे त्या पुरस्काराचेच मूल्य कमी करण्यासारखे आहे. इतिहासाचे पुनर्लेखन करून कुठलाही 'माफीनामा' ही 'शौर्यगाथा' कधीच बनू शकत नाही. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पायावर उभ्या असलेल्या भारतात अशा प्रकारचा गौरव म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या पवित्र स्मृतींशी केलेले अक्षम्य प्रतारणाच ठरेल.
*उदात्तीकरण सावरकर यांचे...!*
सावरकरांच्या बढाईकरणाचं सांस्कृतिक षड्यंत्र !
सन २०१४ पासून विविध कारणांनी ‘विनायक दामोदर सावरकर’ नावाभोवती वाद-विवाद सातत्याने उफाळून येत आहेत. स्वाभाविक समर्थक आणि विरोधकांमध्ये असलेला हा वैचारिक वाद अनेकवेळा टोकाचा म्हणून प्रचारित होतो. अर्थातच बहुतांश वाद राजकीय स्वरूपाचे असतात, म्हणजे राजकीय हित साधण्यासाठी त्यांना प्रचारित केलं जातं. शिवाय बहुतेक आरोप, वाद त्यांच्या भारतविरोधी भूमिकेला घेऊन असतात. एक गट सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून प्रचारित करतो; त्याउलट दुसरा त्यांना भारतद्रोही, इंग्रजांचा हस्तक म्हणून ‘माफीवीर’ पेश करतो. समर्थन व विरोध करणाऱ्यांनी ‘दि कारवाँ’ मासिकात जानेवारी २०२०ला धीरेंद्र के. झा लिखित ‘TheApostle of Hate’ स्टोरी जरूर वाचावी. संबंधित मासिकाच्या वेबसाइटवर तो लेख आहे. दीर्घ असला तरी वेळ काढून त्याचं पारायण करणे गरजेचं आहे. किंबहुना अशा पद्धतीने अनेक स्टोरी व रिर्पोताज इंग्रजी व हिंदी मीडियाने केलेले आहेत. मराठी मीडियातील मंडळी, अभ्यासक, लेखक, संवादक, विचारवंत अजूनही ‘स्वातंत्र्यवीर’ या कथित मिथकांभोवती अडकलेले आढळून येतात. त्यांना ‘कारवाँ’’ची उपर्युक्त स्टोरी नक्कीच वेगळा दृष्टिकोण जर पूर्वग्रह बाजूला ठेवून वाचलं तर! देऊ शकेल.
गेल्या दशकात सावरकर नावाच्या व्यक्तिपूजेच्या मिथकांना तोडणारी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इंग्रजीत असं महत्त्वाचं पुस्तक डॉ. शम्सुल इस्लाम यांचं ‘सावरकर : मिथ अँड फॅक्ट्स’ फार चर्चेत आहे. शिवाय मराठीत मदन पाटील यांचं ‘अकथित सावरकर’ हेदेखील महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. याशिवाय हिंदी-इंग्रजीत अनेक चांगले रिपोर्ट प्रकाशित झालेले आहेत. बीबीसी हिंदीवर रेहान फ़जल यांनी सावरकरांवर काही रिपोर्ट केलेले आहेत. त्यातूनही वेगळी बाजू वाचकांसमोर येते.
‘दि वीक’चे तत्कालीन प्रतिनिधी श्रीयुत निरंजन टकले यांनी २४ जानेवारी, २०१६ रोजी विनायक सावरकर यांच्यावर महत्त्वाचा लेख लिहिला होता. त्यासाठी तब्बल १० हजार कागदपत्रांचा आधार घेतल्याचं त्यांनी खासगी चर्चेत सांगितलं होतं. त्या लेखाचं शीर्षक होतं ‘लॅम्ब लायोनाइज्ड’ (Lamb Lionised) म्हणजे सिंहाचे कातडे पांघरलेले भित्रे कोकरू!
संबंधित लेखात टकलेंनी सावरकरांना ‘हिरो टू जीरो’ पेश केलेलं आहे. ही अफाट स्टोरी मुळातून वाचण्यासारखी आहे. नंतर लेखक, संपादक, प्रकाशकाविरोधात ‘प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया’त तक्रार केली गेली. परिणामी त्यांच्यावर खटलादेखील भरण्यात आला. पाच वर्षे हा खटला सुरू होता. अखेर झुंडीच्या धमक्यांना बळी पडून १४ मे २०२१ रोजी ‘दि वीक’ने माफी मागत माघार घेतली. परंतु निरंजन टकले कायदेशीर प्रक्रियेला सामोरे गेले. प्रस्तुत लेखकाशी झालेल्या एका खासगी चर्चेत टकलेंनी कोर्टात संबंधित प्रकरणी झालेल्या युक्तिवादाचे मजेदार अनुभव शेअर केले. रणजित सावरकरांशी झालेल्या आरोप-आरोपप्रत्यारोपात त्यांनी बरंच काही सांगितलं. म्हणजे टकले अप्रत्यक्षपणे सूचित करीत होते की, रणजित सावरकर यांनीदेखील विनायक सावरकर यांची माफीची परंपरा पुढे चालवली. असो..वास्तविक, राहुल गांधींनी भिवंडी येथे केलेल्या भाषण वादात निरंजन टकलेंनी लिहिलेल्या लेखाचा आधार घेतला गेला. टकलेंनी सांगितलं की, हा खटला त्यांनी जिंकला आहे. विशेष म्हणजे त्यांनी तक्रारदाराकडून अशा कुरघोड्या परत होणार नाही, अशी लिखित स्वरूपात माफी लिहून घेतली. विशेष बाब म्हणून नोंदवता येईल की, मराठी वृत्त वाहिनी ‘एबीपी माझा’ने देखील एका प्राइम टाइम शोमध्ये चुकीचा मथळा वापरल्याने माफी मागितली. चॅनलने २८ मे २०१९ रोजी ‘सावरकर : नायक की खलनायक’ अशी पॅनल चर्चा घेतली होती. या कार्यक्रमामुळे सावरकरांची बदनामी झाली, असा आरोप केला गेला. परिणामी एबीपी माझाच्या जाहिरातदारांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात केलं गेलं. झुंडशाहीपुढे चॅनलने शरणागती पत्करत दिलगिरी व्यक्त केली. अर्थात चॅनलने भूमिका म्हणून हा शो केला नव्हता, तर नियोजितपणे केवळ आकर्षक हेडर वापरलं होतं.
मुद्दा असा की सावरकर गुंगी सारखं गारूड आहे, जे वस्तुनिष्ठ वाचन जोपर्यंत करत नाही; तोपर्यंत टिकून राहतं. एकदा की ब्रिटिशांच्या समर्थनाची कारणे, भारतद्रोहाची भूमिका, माफीनामे, इंग्रजांकडून घेतलेली दरमहा ६० रुपयांची पेंशन, मुस्लीम लिगचं समर्थन, गांधी हत्येचं पाप, दलितांविषयीची भूमिका, हिंदूराष्ट्र स्थापनेची कारणे, इत्यादीबाबत अतिरिक्त माहिती, भूमिका व तपशील हाती लागले की, तो (वाचक) कथित अँटीनॅशनल  होतो. सावरकरांबद्दल ऐकून माहीत असलेल्या समर्थकांना अशा प्रकारची माहिती नवीन व परिणामी असह्य असते. त्यामुळे त्याला स्वीकारण्यास त्यांचे मन धजत नाही. संबंधित खुलासे ऐकीव माहितीशी विसंगत असल्याने अर्थात ते त्यांच्यासाठी अडचणीची ठरतात. परिणामी त्यांच्या धारणा व मनोभावनांचा विच्छेद होतो व आत्मा दुखावला जातो. स्वाभाविक मग ते प्रतिक्रियात्मक आणि हल्लेखोर होतात. नवीन संशोधन, संदर्भ, पुस्तकं, ग्रंथालये, लिंक व रिपोर्टकडे ठरवून दुर्लक्ष करतात. म्हणजे अजाण राहण्यातच भलं मानतात. त्यामुळे ते माहिती आणि ज्ञानापासून ठरवून वंचित राहतात. परिणामी वैचारिक भूमिकेशी सुसंगत वास्तवाकडे डोळेझाक करू लागतात. मग खोटी विधाने, एकांगी घटना, व दिशाभूल आणि बुद्धिभेद करणारी माहिती वापरून खुलाश्यांना उत्तरे दिली जातात.
एका अर्थाने दोन्ही गट चुकीचे नसतात. सावरकरभक्त किंवा हिंदुत्ववाद्यांना ‘१८५७चा उठाव’ लिहिणारे विनायक सावरकर स्वातंत्र्य सैनिक तर गाईला पशू मानणारे विज्ञानवादी (काही प्रमाणात पुरोगाम्यांनाही (!)) वाटतात. उलट विरोधकांना अंदमान जेलमधून सुटल्यानंतर बदलेले सावरकर, इंग्रजांच्या विस्तारवादी धोरणाला पोषण देणारे सावरकर, चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं समर्थन करणारे भारतद्रोही वि.दा. स्मरतात. म्हणजे ज्याने जसा चश्मा वापरला, त्यांना ते तसे सावरकर दिसू लागतात. निमित्त कुठलेही असो, सावरकर नावाला जोडून नेहमी चर्चा रंगवली जाते व ती अधिक विस्तारित कशी होईल, याचं नियोजन व आखणी केली जाते. त्यासाठी निरर्थक मुद्दे, विषय पुढे करून वाद उकरून काढले जातात. गांधी, नेहरू, हिंदुत्व, भाषा शुद्धीकरण, उपयुक्त पशू, अभिनव भारत, उर्दू गज़ल, थोर व्यक्ती, क्रांतिकारी, स्वातंत्र्य सैनिक इत्यादी घटक पुढे करून कल्पित कथांचे चर्चा-मंथन रंगवले जाते. संबंधित वादाला किंवा आरोपाला नाकारून व बढाईगिरी करून चर्चेचा फड तयार केला जातो. त्यांचा हेतू सावरकरांची वकिली करणे, उदात्तीकरण करणे किंवा बढाई करणे हा तर असतोच, पण त्याहीपेक्षा सावरकरांचे ब्राह्मणी उदात्तीकरण करून सतत कसं चर्चेत ठेवता येईल, याचं प्रयोजन अधिक असतं. त्यासाठी ते चलाखीने गैर-ब्राह्मणी फूट-सोल्जरचा वापर करतात. त्यांचा हेतू विनायक सावरकरांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून नव्हे तर थोर व्यक्ती म्हणून त्यांना ‘भारतरत्न’ मिळवून घेता येईल, यासाठी वातावरणनिर्मिती, समाजमान्यता आणि मतप्रवाह तयार करणे इत्यादी छुपी उद्दिष्ट साध्य करण्याचं हे षड्‌यंत्र आहे.
गेली अनेक वर्षे सावरकर आणि गोडसे हे महाराष्ट्रातील कडव्या राजकारणाचं प्रतीकं म्हणून वापरली गेली आहेत. दुसरीकडे त्याच तीव्रतेने टोकाचा विरोध करत त्यांना नाकारणारा एक वर्ग सक्रिय झालेला आहे. माझ्या मते सावरकर-गोडसे केवळ हिंदुत्ववादी राजकारणाचं प्रतीक नसून महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक राजकारणाचे प्यादे आहेत. आणि त्यांचं लादणं व नाकारणं हे देखील एका प्रकारचं सांस्कृतिक राजकारणच आहे.
समर्थक हिंदूधर्माभिमानी, शिवरायांचं स्वराज्य व मराठाद्वेष, महिलांचा अवमान व पेशवा शासकांच्या बढाईगिरीसाठी त्यांचा वापर करतात. आपलं वर्णवादी राजकारण बलशाली करून त्यातून मुस्लिमद्वेष साध्य होईल, असंही प्रयोजन योजलं जातं. ही कृती काहीवेळा थेटपणे, तर अनेकदा सुप्त व अप्रत्यक्षपणे राबवली जाते. जशी कोरोना प्रादुर्भावाला जबाबदार ठरवून मुस्लिमांचे आर्थिक बहिष्करण करणे किंवा मुस्लिमांबद्दल घृणात्मक वातावरण तयार करून त्यांच्याविरोधात हेत्वारोपाच्या प्रक्रियेला सुरुवात करणे. मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेवर शंका उपस्थित करणे, बहुसंख्य समुदायाच्या तिरस्कृत धारणांना बळकटी प्रदान करण्यासाठी कानगोष्टी मोहिमा राबविणे. मुस्लीम व इस्लाम फोबियाचे बिजारोपण करून त्यास खतपाणी घालणे इत्यादी विकृत प्रकार आखले जातात. त्यासाठी सावरकरप्रणित ‘राजकीय हिंदुत्व’ भूमिकेचा आधार घेतला जातो. सावरकरांच्या कथित जाज्वल्ययुक्त देशप्रेमाची मांडणी करणारे लेखनप्रेमी त्या सांस्कृतिक विकृतीकरणाचे खरे नायक असतात. सावरकरांच्या मूळ लिखाणासह त्यांच्या समर्थक लेखकांची साहित्य प्रागतिक विचारांचे वाहक आजही संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात. त्या कथित संदर्भ साधनांची उलटतपासणी तटस्थ, धर्मनिरपेक्ष असलेली लेखकीय जमातसुद्धा करत नाही. किंवा त्यांच्या पुस्तकात न आढळलेल्या संदर्भ साधनाची उलटतपासणी, चौकशी, विचारपूस, उत्खनन केलं जात नाही.
भारतात एक म्हण प्रचलित आहे, लिहिणारा इतिहासाचा मालक असतो; त्याप्रमाणे लेखक किंवा इतिहासकार म्हणवणारा एकांगी, पूर्वग्रह बाळगून व धर्मीय/पंथीय अस्मिता जोपासून जे काही लिहितो, त्यालाच सत्य मानून प्रत्येकजण आपापले मते व आडाखे बांधायला लागतो. स्मरण असावे की, सावरकर इतिहास लिहिताना प्रखर व जाज्वल्य हिंदुत्वाचे प्रवक्ते आहेत. ‘पुण्यभू’ व ‘पितृभ्रू’चू व्याख्या करीत त्यांनी जाती व वर्णावर आधारित त्यांनी इतिहासाची आखणी केलेली आढळते.
प्रस्तुत लेखकाला सावरकर ‘वीर’ होते का नाही, यात काडीचा रस नाही. किंबहुना आचार्य अत्रे यांनी विनायक सावरकरांना त्यांच्या हयातीत राष्ट्राचे शत्रू घोषित केलं होतं. साप्ताहिक नवयुगच्या १४ सप्टेंबर १९४१च्या अंकात अत्रे म्हणतात, “सरकारशी सहकार्य करण्याची भाषा आज ते उघड-उघड बोलतात, आणि सरकार देशात अनंतकाळ राहील असले राजकारण लढविण्यात आज ते गुंतले आहेत. म्हणून आम्हाला ते आज ‘स्वातंत्र्यवीर’ वाटत नाहीत, किंबहुना आमच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे शत्रू आहेत तसेच मोठ्या दुःखाने आम्हांला म्हणावे लागते.” पण त्यामागील घडणाऱ्या सांस्कृतिक राजकारण व त्यातून निर्माण होणाऱ्या विकृती व सामाजिक तंटे, बखेडे, कलहाची चिंता वाटते. या कथित मांडणीचे ज्या वेळी ‘पुरोगामी’ म्हणवणारे वाहक होतात; त्या वेळी ही चिंता अधिक प्रबळ होत जाते.
दुर्दैवाने आजही सुधारक व अब्राह्मणी चळवळी, त्यांचे प्रमुख आणि वाहक सनातनी, ब्राह्मणी हिंदुत्ववाद्यांच्या सांस्कृतिक राजकारणाला ओळखू शकले नाहीत. (किंवा ते दुर्लक्ष करत असावेत) ज्या वेळी शरद पवार उघड भूमिका घेऊन सांगतात की, “रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते” त्या वेळी इथली ब्राह्मणी/सनातनी मंडळी अंतर्गत कुरघोड्या करते. इतकंच नाही तर त्याचवेळी अधिक प्रकर्षाने पुरदरेंना इतिहासकार म्हणून प्रचारित करते. वास्तविक, त्यांच्याकडे युक्तिवाद करण्यासारखं फारसं काही नसतं. म्हणून ते बुद्धिभेद करून सांस्कृतिक अधिक्षेप घडवून आणतात. इतकंच नाही तर विरोधकांना हिंदूंचे शत्रू ठरवतात. रामदास नको म्हणणाऱ्या शरद पवारांना ‘अहिंदू’ म्हणून प्रचारित केलं जाते. कारण थेटपणे ते पवार व त्याआड मराठ्यांचा विरोध करू शकत नाहीत. त्यासाठी ते खोट्या मिथकांचा सहारा घेतात. त्याचवेळी ते इंदोरीकरांवर तोंडसुख घेतात. (कारण त्यांचं प्रबोधन वास्तविक हेतूसाठी असतं. या क्रोनोलॉजीचा बारकाईने अभ्यास केला तर तुकोबाचा बळी कोणी व का घेतला, याचा अंदाज लागतो.) त्याचवेळी ते बलात्कारी आसारामचे भक्त असतात व संस्कृतीरक्षक म्हणून १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाइनला मातृ-पितृ दिन साजरा करण्यास भाग पाडतात.
तरुण मुलींनी बापाला मिठी मारू नये, याचं उदात्तीकरण करतात. (दुसऱ्यांच्या) मुलींनी जास्त शिकू नये, चूल-मूल सांभाळावं, घरात राहावं, डोईवर पदर घ्यावा, जीन्स व तत्सम आधुनिक कपडे, मोबाइल वापरू नये असे उपदेशही करतात. त्याचवेळी ‘कल्चरल कॅपिटलच्या जोरावर आपले शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक उत्थान घडवून आणतात. एकीकडे ब्राह्मण म्हणून आरक्षण देण्याची मागणी करतात, तर त्याचवेळी गुणवत्तेला पुढे करीत दलित, मागासांचं आरक्षण संपवलं पाहिजे, अशी भूमिका घेतात. याच्याही पुढे जाऊन सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण करतात, सार्वजनिक मालमत्ता विक्रीस काढतात. उलट युक्तिवाद केला जातो की, (भाजप) सरकारे व्यापार करत नाहीत. अर्थात जनमानस घडविण्यासाठी प्रचारक मोहीम सुरू केली जाते. अशा रितीने स्पर्धा बाजारात सामाजिक समता व आरक्षणाची वासलात लावली जाते. म्हणजे पब्लिक सेक्टरच राहिलं नाही, तर दलित, मागास अर्थात शूद्रांना आरक्षण कुठून मिळणार? म्हणजे एकाच वेळी आर्थिक केंद्रीकरण केलं जाते तर दुसरीकडे वर्गीय चौकट अधिक मजबूत केली जाते.
जातिव्यवस्था आता कुठे अस्तित्वात राहिली, असं चलाखीने सांगत त्याचे निवडक दाखले देत सुटतात. तेच सावरकर शुद्रातिशुद्रांना प्रस्थापितांच्या मंदिरापासून दूर ठेवण्यासाठी स्वतंत्र मंदिराची उभारणी करतात. याचाच आधार घेऊन वर्णद्वेष्टी जमात म्हणू लागते, १२ प्रतिज्ञांचे वाहक असलेल्या दलितांनी मंदिरात का जावं मग? या वर्णीय जात-परंपरेत भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपतीही सुटू शकत नाही, कारण तो जातीने दलित असतो. मार्च २०१८ साली पुरीच्या जगन्नाथ मंदिराबाहेर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रोखलं गेलं. त्यांना व त्यांच्या सुविद्य पत्नीला गर्भगृहात प्रवेश वर्जित करण्यात आला, त्यांच्याशी धक्काबुक्की केली गेली. प्रत्येक क्षुल्लक घटनेवर ट्वीट करणारे राष्ट्रपती आपल्या अवमानाविरुद्ध उघडपणे बोलूदेखील शकले नाहीत. कारण ते ब्राह्मणी हिंदुत्वप्रणित राजकीय सत्तेचे लाभदायक घटक होते. स्मरण असावे की, या हिंदुत्ववादी विचारांच्या (योगी) सत्तेने ऑक्टोबर २०१७ साली राष्ट्रपतींना आभासी देवासमोर नमन करायला झुकवलं होतं. त्या पौराणिक दिवाळी फेस्टिव्हलमध्ये लोककलावंतांना राम-सीतेच्या रूपाने कार्यक्रमात आणलं गेलं. त्यांच्यासमोर घटनात्मक पद बहाल असलेले राष्ट्रपती मुख्यमंत्री आदित्यनाथांसोबत वाकून अभिवादन करत होते. ही ब्राह्मणी वर्णीय व वर्गीय परंपरा बहुसंख्य व प्रागतिक तसंच विवेकवादी गट सहज स्वीकारतो. याविषयी कोणाला काहीच वाटत नाही.
महात्मा गांधींच्या हत्येनंतर भारतात सांस्कृतिक राजकारणाचं छुपं नग्न नृत्य सुरू केलं गेलं. तिरस्कार, द्वेष, हत्यांना राजकीय अर्थ देऊन त्याचं सरसकटीकरण करून टाकण्यात आलं. संमिश्र राष्ट्रवादाचे शत्रुकरण करून सांस्कृतिक अधिक्षेप करण्यात आला. मुस्लिमांना देशातून काढून टाकणे, त्यासाठी त्यांचं राक्षसी चित्र उभं करून त्यांना समाजात अपवित्र घोषित करणे, त्यांच्याविरोधात द्वेष व घृणेची मोहीम राबवणे आदी दुष्कृत्य राबवली गेली व आजही राबवली जात आहेत. गांधीहत्येनंतर पुढची २०-२५ वर्षे छुप्या व उघडपणे गांधी हत्येचं समर्थन केलं गेले. त्यातून ब्राह्मणी हिंदू विरुद्ध गैरब्राह्मणी हिंदू अशी वर्गवारी करण्यात आली. ब्राह्मणांनी उघडपणे गांधी हत्येला कारक मानलं. इतकचे नाही तर मारेकरी नथुराम व त्याच्या साथीदारांची बाजू घेतली गेली. अग्रलेख लिहिले गेले. पुस्तिका लिहिल्या गेल्या. गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नथुरामशी राजकीय नातं तोडलं, तो आमचा नव्हे अशी भूमिका घेतली. परंतु त्याचवेळी अनेक संघभक्त नथुरामच्या समर्थनार्थ उघडपणे बाहेर आली. त्यात बहुतांश सावरकरभक्तही होते.
१९६४ साली गांधी हत्येतून जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या गोपाळ गोडसे व विष्णू करकरे यांचा पुण्यात जाहीर सत्कार करण्यात आला. १२ नोव्हेंबर १९६४ रोजी पुण्यातील उद्यान कार्यालयात सत्यनारायणाचा कार्यक्रम योजला गेला. त्यात गांधी हत्येचे उदात्तीकरण करून पुणेरी ब्राह्मणांनी नथुरामला नायकत्व प्रदान केलं.  २१ नोव्हेंबर १९६४च्या साधना साप्ताहिकात ग.प्र. प्रधान यांनी लिहिले होते, “तीनशे स्त्री-पुरुषांच्या या मेळाव्यात ग.वि. केतकर, न.गो. अभ्यंकर, विसुभाऊ बापट इत्यादी लोकांनी मुक्ताफळे उधळली. नथुराम गोडसे याचे मृत्युपत्र वाचून दाखवण्यात आले. आपटे व गोडसे यांचा हुतात्मा म्हणून गौरव करण्यात आला. गोडसे शिवाजीचा बच्चा होता असे म्हणून शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात आली.” राष्ट्रपित्याच्या हत्येचं समर्थन करणे हा विकृती व विक्षिप्तपणा आहे. हा विक्षिप्तपणा पुणेरी ब्राह्मण उघडपणे करण्याचे धाडस करू शकतात, याचे आश्चर्य वाटते.  या मेळाव्यात अभ्यंकरने  “मला गोडसे खून करणार आहेत” हे माहीत होते असं उघडपणे कबूल केलं होतं. वास्तविक, ‘तरुण भारत’चे संपादक असलेले ग.वि. केतकर हे बाळ गंगाधर टिळकांचे (मुलगी पार्वतीबाई केतकरचा मुलगा) नातू होते. सावरकरप्रेमी म्हणून त्यांची ख्याती होती. त्या वेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभेत सक्रिय होते. विनायक सावरकरांशी त्यांचे निकटचे संबंध होते. गांधीहत्येच्या केतकर केसरीचे संपादक होते व उघडपणे गांधी हत्या व नथुरामची पाठराखण करत होते. त्यांच्यावर गांधीहत्येची योजना आखण्यात आल्याचे माहीत असूनही सरकारला ती माहिती पुरवण्यात हयगय केली, असा त्यांच्यावर आरोप होता. त्यासंबंधी तीस वर्षे त्यांच्यावर खटला सुरू होता.
वास्तविक, गांधी हत्या खटल्यातून सावरकर बचावले असले तरी न्या. कपूर आयोगाने ‘या सर्व गोष्टींचा विचार केल्यास गांधींच्या खुनाचे कारस्थान सावरकर आणि त्यांच्या गटाने केले होते’ असे विधान केलेलं आहे. (न्या. कपूर आयोगाचा अहवाल, पा. क्र. ३०३ परिच्छेद क्र.२५. १०६) मुळात ते फक्त नथुरामची पाठराखण करीत नव्हते तर सावरकरांच्या दृष्कृत्यावरही पडदा टाकत होते. उपलब्ध संदर्भ पाहाता असं दिसते की, गांधी हत्या प्रकरणात सावरकरांची चौकशी व तपासात गलथानपणा केला गेला. अनेक अभ्यासकांचे मत आहे की, हे जाणूनबुजून केलं गेलं. गांधीजींचे वंशज व नातू तुषार गांधी यांनी याबाबत उघडपणे लिहिले आहे. लिहितात, “सावरकरांना शिक्षा झाली असती तर कट्टर हिंदुत्ववाद्यांकडून उग्र प्रतिक्रिया उमटली असती असे सरदार पटेलांचे मत होते आणि काँग्रेसला या असंतोषाची पुरती धास्ती होती. सावरकरांचा गांधी हत्येशी काही संबंध नाही, हे स्वीकारण्यास चौकशी अधिकारी नागरवाला यांनी साफ नकार दिला होता. हे मात्र विसरता येणार नाही.” तत्पूर्वी तुषार गांधीनी लिहिलं आहे की, सावरकरांना दोषी ठरवलं असतं तर मुसलमानांसाठी ती अडचण ठरली असती आणि हिंदूंच्या रोषाला सांभाळणे अशक्य झाले असते, असं पटेल यांना वाटत असावे. हल्ली यापेक्षा वेगळं काही घडत नाही. जाणूनबुजून दोषींचा तपास करायचा नाही, उणिवा व त्रुटीवर लक्ष द्यायचे आहेव निर्दोषांना शिक्षा करायची, असं धोरण आहे. गैरसोयीचे झाकून ठेवायचं व सोयीचं पुढे करत कल्पनारंजन करण्याचा इतिहास फार जुना आहे. सावरकरांच्या बाबतीत हे नेहमी घडते. गौरवीकरण करणारे इथपर्यंत थांबत नाहीत तर प्रत्येकवेळी जाज्वल्य हिंदुत्वाची उपमा सावरकरांना चिकटवायला ते अग्रेसर असतात. त्यातून ते ब्राह्मणेतर मंडळीचं हिंदुत्वाच्या नावाने ध्रुवीकरण करतात. अर्थात सावरकरप्रेमींची ही सांस्कृतिक कुरघोडी असते. ब्राह्मणवादाचे राजकीय  व सांस्कृतिकरित्या बीजारोपण करण्याची प्रक्रिया फार जुनी आहे. समाजावर ब्राह्मणी वर्चस्व स्थापण्यासाठी अनेक कुरघोड्या राबवल्या गेल्या. इतिहासकार शेजवलकर यांनी या ब्राह्मणी कूटनीतीचा उघड समाचार त्यांच्या ‘महाराष्ट्राच्या इतिहासाची आबाळ आणि तिचे दुष्परिणाम’ या लेखात घेतला होता. संबंधित लेखात त्यांनी ब्राह्मणी इतिहास कथन पद्धती, इतिहास लेखन व आत्मस्तुतीपर मांडणीचा चांगला समाचार घेतला होता.
लेखातील एक उतारा,
“महाराष्ट्र इतिहासाबद्दल निश्चित मते उघडपणे सांगण्यात आजवर ब्राह्मणांकडून अक्षम्य टाळाटाळ झालेली आहे. संशोधक ब्राह्मण, इतिहास लेखक व विवेचक ब्राह्मण, विषय ब्राह्मणांच्या अभिमानाच्या राज्याचा, संपादक ब्राह्मण, शिक्षक ब्राह्मण, व्याख्याते ब्राह्मण, चळवळी त्यांनीच काढलेल्या आणि या सर्वांचे श्रोते, वाचक व अनुयायी तेही ब्राह्मण, यात क्वचित कोट अपवादात्मक ब्राह्मणेतर, या सर्व बनावाचा दुष्परिणाम असा की ब्राह्मणांची कर्तबगारी अगदी गागा भट्ट रामदासांपासून आरंभ करून तो 'अप्रबुद्ध' गोळवलकरांपर्यंत अशा तऱ्हेने फुगवण्यात, सोज्ज्वळ करण्यात, चुकीची व म्हणूनच खोटी करून सांगण्यात शक्य तेवढी जास्त कोशिश करण्यात आली आहे‌.” (निवडक साधना, खंड-६, पान-९९)
असं असलं तरी शेजवलकर देखील या बहुचर्चित आरोपातून सुटू शकले नाहीत. त्यांच्यावर देखील ब्राह्मण्यप्रणित इतिहासाचा ठपका लावला गेला.. गेल्या ३०-४० वर्षात अनेक लेखक, विचारवंत व अभ्यासकांनी ब्राह्मणी इतिहास लेखन पद्धतीवर सडेतोड टीका करणारे लिखाण प्रसिद्ध केलं आहे. वर्तमान राजकीय संस्कृतीत ब्राह्मणी वर्चस्ववादाचे सांस्कृतिक प्राबल्य व कुरघोड्या कळत-नकळत वाढत आहे. २०१४ नंतर यात झपाट्याने बदल झालेला दिसून येतो. दैवतीकरणाची प्रक्रिया शासन स्तरावर निर्धास्तपणे राबवली जात आहे. सरकारची ध्येय-धोरणे हिंदू ब्राह्मणी धर्मकेंद्री होऊ लागली आहे. राम मंदिर मोहिमेत घटनात्मक पद बहाल असलेले पंतप्रधान मोठा इव्हेन्ट घडवून पूजा-अर्चा करतात. हिंदुधर्माच्या रामाच्या नावाने लोकनिधी संकलित केला जातो. त्यात कोट्यवधीचा भ्रष्टाचार रामाच्या नावाने खपवला जातो. म्हणजे धर्माच्या नावाने हजारो कोटी लुबाडले जातात. हा निधी देणाऱ्या सामान्य जनांना त्याचं काहीच वाटत नाही, गप्प बसून राहतात. अर्थात सांस्कृतिक व धार्मिक वर्चस्ववाद सुप्तपणे काम करतो तो असा! राम मंदिर मोहिमेतून बहुजनांचे राजकीय केंद्रीकरण केलं गेलं. विशेष म्हणजे ही मोहिम मंडल आयोगाने मागास समुदायांना दिलेल्या सामाजिक व आर्थिक सवलतींना विरोध करून ही मोहीम राबवली गेली. म्हणजे शैक्षणिक व आर्थिक विकासाकडे चलाखीने डोळेझाक करायला लावून धर्माच्या नावाने, त्याच मागास समुदायाचे राजकीय संघटन केलं गेलं. मागास समुदायानेही शैक्षणिक व आर्थिक विकास साध्य करण्याचे सोडून भाजपच्या ब्राह्मणी हिंदू धर्मीय राजकीय हित साधण्यासाठी कंबर कसली.
बाबरी उद्ध्वस्तीकरणानंतर थेटपणे ‘हिंदू खतरे में’ आल्याची बतावणी करत बहुसंख्य गैर ब्राह्मणांना भगव्या झेंड्याखाली संघटित केलं गेलं. विशेष म्हणजे ज्या वैदिक परंपरेने आणि हिंदू धर्माने चातुर्वर्ण्य अबाधित राखण्यासाठी बहुसंख्य समाजाला मंदिरात येऊ दिलं नाही, त्याच गटाला ‘मंदिर वहीं बनाऐगे’ मोहिमेसाठी चलाखीने वापरले. ज्या वर्गाच्या विकृत मेंदूतून ही मोहीम बाहेर आली, तो सिलिकॉन व्हॅलीमध्ये ग्रीन कार्ड होल्डर झाला. राजकीय भगवा धारण केलेला व मंदिर मोहिमेत अडकून (ब्राह्मणी परंपरेच्या सांस्कृतिक राजकारणाचं खेळणं झालेल्यांनी) असणाऱ्यांनी धर्माच्या नावाने आपल्याच जवळच्या लोकांचे तुझा धर्म व संस्कृती वेगळी म्हणत गळे चिरले. वर्ग व जात वेगळी म्हणत आया-बहिणींवर हात घातला. बहुजनांची औकात काढत त्यांची ऑनर किलिंग घडवली. मंदिर मोहिमेसाठी राबविल्या गेलेल्या विनाशक हल्ल्यात मुस्लिमांसह सर्वच गैरब्राह्मण जात-समुदाय भरडले गेले. अर्थातच ब्राह्मणी विचारांचा वाहक अब्राह्मणी समाजच झाला. त्यातच कुणीतरी सावरकर-हिंदुत्वभक्त मनसेवाला (ब्राह्मणी राजकीय हित घेऊन) जागा होतो आणि बहुजन मुलांना हाती दगड व तलवारी घेण्याची भाषा करतो. अर्थातच राजकीय संधिसाधू आणि अतिसामान्य असलेल्या बहुजन मुलं बिनडोकपणे मेंदूत धर्मांधता संचारून मुस्लिमद्वेष कवटाळतात. सावरकरांनी भारतीय समाजातील सहिष्णू व गंगा-जमुनी संस्कृतीला खिंडारे पाडण्यासाठी शिवाजी महाराजांचा वापर केला. त्यांनी (शत्रू पक्षातील) महिलांशी कसं वागू नये याचे ‘उपदेश’ शिवरायांना दिले. वास्तविक सावरकरांनी इथं बलात्काराला एक राजकीय शस्त्र घोषित केलं आहे. पुढे हिंदू राष्ट्रवादी व ब्राह्मण्यवादी राजकीय संघटनांना याला प्रत्यक्षात उतरवलं. गुजरात दंगलीचे बीभत्स रूप इतिहासात नोंद झालेलं आहे. किंबहुना त्यानंतर अनेक विकृत पद्धतीने या शस्त्राचा वापर करण्यात आलेला दिसतो. याच मोहिमेचा भाग म्हणून आसिफा सारख्या चिमुरडीच्या बलात्कारीची तिरंगा यात्रा काढून समर्थन मिरवणूक काढली जाते. जघन्य कृत्य करणाऱ्या विरोधात वकील संघ समर्थन मार्च करतात. कारण पीडित मुस्लिम धर्मीय असते आणि सावकरांच्या ‘पितृभू’ या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे विवेक विसरून बलात्कार सारख्या विकृत गुन्ह्याचं समर्थन करू लागतात. इतकंच नाही तर मुस्लिम महिला पत्रकार, सोशल अक्टिव्हिस्ट इत्यादींची आभासी शरीरविक्रय बाजारात बोली लावली जाते. त्यांच्याविरोधात लैंगिक गुन्हे केले जातात. ही जमात इथपर्यंत थांबत नाही तर आसाराम व चिन्मयानंद सारख्या बलात्काराच्या गुन्ह्याचं हिंदू धर्माच्या नावाने उदात्तीकरण करू लागतात. कारण इथंही पीडित तरुणी/महिला ब्राह्मणी जातीय/वर्णीय वर्चस्ववादाच्या उतरंडीतील अशुद्ध असतात. म्हणजे गैरब्राह्मण समुदायांना पायाखाली चिरडण्याच्या भूमिकेचा ते पुरस्कार करू लागतात. बहुसंख्य समुदाय, सिव्हिल सोसायटी या प्रकरणावर गप्प राहते, म्हणजे मूठभरांचे ब्राह्मणी सांस्कृतिक राजकारण यशस्वी होऊ लागते.
ब्राह्मण्याने ग्रासलेल्या सावरकरांच्या जाज्वल्य विचारांचे रसग्रहण करणाऱ्यांमध्ये बहुजनांतील गैरब्राह्मण असणारे सर्व लोक होतेच की! हीच मंडळी वर्ण, वंश व जातिव्यवस्था आणि चातुर्वर्ण्याकडे दुर्लक्ष करून ते सावरकरांच्या ब्राह्मण्यप्रणित हिंदुत्वाचे वाहक होतात. हिंदुत्व व कथित हिंदुराष्ट्राच्या व्याख्येत दलित, ख्रिश्चन, मुस्लिमांना स्थानच देत नाहीत. दुर्दैवाने अशा व्यक्तीला ‘भारतरत्न’ मिळवून देण्याच्या योजनेसाठी बहुजन लोकंच वापरली जातात. बहुजन मंडळीसुद्धा निर्बुद्ध होत ब्राह्मणी सांस्कृतिक वर्चस्वाकडे डोळेझाक करत ट्रोलरची भूमिका पार पाडते. वास्तविक, तथाकथित सेक्युलर व प्रागतिक विचारसरणीला आजही ब्राह्मणी संस्कृतीच्या नावाने होणारी ‘मॉरल पोलिसिंग’ व ‘सांस्कृतिक चौकीदारी’ कळली नाही. त्यामुळे ते जाणता-अजाणता पद्धतीने त्याचे वाहक झाले. आजही होतच आहेत. वर्चस्ववादी राजकारणाला प्रतिक्रियात्मक उत्तरे न देता त्याला शरण जातात. ‘खरा शिवाजी’ लेखनद्वेषी परंपरेतून बाहेर येण्यास ‘मराठा सेवा संघ’सारखी संघटना निपजावी लागली. पुढे ‘शिवाजी अंडरग्राऊड इन भीमनगर मोहल्ला’चं सांस्कृतिक राजकारण करावं लागलं. ह्या नाटकाला काही समीक्षक नावाच्या बनचुके मंडळींनी नाट्यअभिव्यक्तीच्या पारंपरिक चौकटीत बसत नसल्याचा शेरा मारला. पण बावळ्यांन्नो, ती परंपरा मोडण्यासाठीच तर तो सांस्कृतिक विद्रोह होता. सफदर असो वा शाहिद त्यासाठीच मारले गेले, हेदेखील विसरता कामा नये.
शेवटी, असं म्हणता येईल, ह्या वर्णवादी सांस्कृतिक राजकारणाला जो पर्यंत बहुजन समुदाय समजून घेत नाही, त्याची परिणामकारकता उमजून घेत नाही, त्याला उत्तर देण्यासाठी सांस्कृतिक कुरघोडी करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या आणि वंश, वर्ण, कूळ आणि धर्माभिमानी रूढी-परंपरेची आणि विकृत विचारांची वासलात लावता येणार नाही.


आसाम : सत्तेचा उन्माद, द्वेषाचा 'पॉईंट ब्लँक'...!

लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री हे पद राज्याच्या सर्व जनतेचे पालकत्व स्वीकारण्यासाठी असते, केवळ एका विशिष्ट विचारधारेच्या मतदारांचे लांगूलचालन करण्यासाठी नाही. मात्र, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी गेल्या काही महिन्यांत ज्या प्रकारचे वर्तन आणि वक्तव्ये केली आहेत, ती पाहता ते संविधानाची शपथ विसरले आहेत की काय, असा प्रश्न पडतो. अलीकडेच भाजप आसामच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित झालेला ‘Point Blank Shot’ हा AI-निर्मित व्हिडिओ केवळ राजकीय प्रचाराचा भाग नव्हता, तर तो उघडपणे हिंसा आणि धार्मिक द्वेषाचे उदात्तीकरण करणारा एक भयानक प्रकार होता. 
............................................
‘Point Blank Shot’ म्हणजेच अत्यंत जवळून गोळी झाडणे हे शीर्षकच मुळात हिंसेला दिलेले थेट आवाहन करणारे होते. या व्हिडियोमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना एका ‘अ‍ॅक्शन हिरो’च्या रूपात, हातात बंदूक घेऊन थेट गोळीबार करताना दाखवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, हा गोळीबार पारंपरिक मुस्लीम पेहरावातील, विशेषतः ‘मियां’ म्हणजे बंगाली भाषिक मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींवर होताना दाखवला गेला. विशिष्ट समुदायाचा “बंदोबस्त” करणारा एक कठोर नेता अशी सरमांची प्रतिमा उभी करणे, हाच यामागचा मुख्य हेतू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या प्रक्षोभक चित्रफितीवर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांनंतर अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याला मुस्लिमांविरोधातील द्वेष आणि “नरसंहाराला चिथावणी” देणारा प्रकार असल्याचे म्हटले. 
वाढत्या वादामुळे अखेर हा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून हटवण्यात आला असला, तरी तोपर्यंत तो मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला होता. हा व्हिडिओ हटवण्यात आला असला, तरी त्यातून जाणारा संदेश पोहोचला होता. असदुद्दीन ओवैसी यांनी या विरोधात तक्रार नोंदवली आहे, मात्र प्रश्न केवळ कायदेशीर कारवाईचा नाही, तर राजकीय संस्कृती इतक्या खालच्या थराला कशी गेली, हा आहे. मुख्यमंत्री इतका बेजबाबदार वागू लागला तर संविधानाचे रक्षण कोण करणार? निवडणुकीच्या गणितात मते मिळवण्यासाठी घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि लोकशाही मूल्ये किती बेदरकारपणे पायदळी तुडवली जात आहेत, याचेच हे जळजळीत उदाहरण आहे. सरमा यांची गेल्या काही दिवसांतील विधाने पाहिल्यास एक भयंकर पॅटर्न समोर येतोय. जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी निवडणूक तयारीच्या नावाखाली "मियाँ मुसलमानांना त्रास द्या...!" असे उघड आवाहन केले. 
"माझे आणि भाजपचे काम मियाँ मुसलमानांना त्रास देणे हेच आहे जोपर्यंत त्यांना त्रास दिला जात नाही, तोपर्यंत ते आसाम सोडून जाणार नाहीत" 
"जर एखाद्या मियाँ रिक्षाचालकाने ५ रुपये भाडे मागितले, तर त्याला ४ रुपयेच द्या. जेव्हा त्यांना छोट्या छोट्या गोष्टींतून त्रास होईल, तेव्हाच ते राज्य सोडून जातील" ही वरची सरमाच्या तोंडची वाक्ये आहेत.
आपल्या कार्यकर्त्यांना 'मियाँ' मतदारांच्या नावांवर जास्तीत जास्त आक्षेप Form 7 चा वापर करून घेण्याचे त्यांनी आदेश दिले. आगामी 'विशेष गहन पुनर्रीक्षण' प्रक्रियेतून ४ ते ५ लाख नावे वगळण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. सरमा यांनी या मियाँ समुदायाला "डेमोग्राफिक थ्रेट" लोकसंख्याशास्त्रीय धोका म्हणून संबोधले. मतदारांच्या विशेष पुनर्रीक्षण प्रक्रियेत एका विशिष्ट समुदायाला निशाणा बनवण्याचा त्यांचा आग्रह, हा त्यांच्या मताधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा राज्याचा प्रमुखच एखाद्या समुदायाला 'धोका' म्हणून घोषित करतो, तेव्हा तो समाजातील इतर घटकांना त्या समुदायाविरुद्ध हिंसा करण्यासाठी चिथावणी देत असतो. हे केवळ बेजबाबदारपणाचे नसून गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. या विधानामुळे 'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने याला "धोकादायक आणि देशासाठी विभाजनकारक" ठरवले आहे, तर काँग्रेसने  या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हर्ष मंदर  यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक कायदेतज्ञांनी या द्वेषपूर्ण भाषेविरुद्ध आवाज उठवला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींनी या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची गरज आहे. जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री उघडपणे धार्मिक वैमनस्य पसरवत असेल, तर तो पदावर राहण्यास पात्र आहे का? हिमंत बिस्वा सरमा यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, द्वेष पसरवून निवडणुका जिंकता येतील, पण समाज जिंकता येत नाही. आसाममधील या द्वेषाच्या राजकारणामुळे सामाजिक सलोख्याची जी हानी होत आहे, ती भरून काढणे भविष्यात अशक्य होईल. सत्तेच्या नशेतील हा हिंसक उन्माद रोखणे, हीच आजच्या लोकशाहीची सर्वात मोठी गरज आहे.

मुस्लिम आरक्षण : राज्य सरकार

अगा जे घडलेचि नाही | तेचि जाले जैसे भासे?  
महाराष्ट्राच्या राजकारणात 'आरक्षण' हा विषय नेहमीच संवेदनशील राहिला आहे. मात्र, मुस्लीम आरक्षणाच्या बाबतीत जो घटनाक्रम गेल्या दशकात घडला, तो पाहता या समाजाच्या पदरी केवळ राजकीय आश्वासने आणि तांत्रिक फसवणूकच पडल्याचे दिसून येते. महाराष्ट्र राज्य सरकारने  २०१४ चा आरक्षण प्रस्ताव अधिकृतपणे रद्द करण्याचा घेतलेला निर्णय, हा या प्रदीर्घ अन्यायावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे. 
............................................
सच्चर समिती आणि रंगनाथ मिश्रा आयोग या दोन अहवालांनी भारतीय मुस्लीम समुदायाच्या सामाजिक-आर्थिक वास्तवाचे जे चित्र उभे केले, त्याने देशाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. २००६ च्या सुमारास आलेल्या या अहवालांनी आकडेवारीनिशी दाखवून दिले होते की, भारतातील मुस्लिमांची स्थिती अनेक बाबतीत अनुसूचित जाती आणि जमातींपेक्षाही खालावलेली आहे. त्यानंतर २०१३ साली महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या डॉ. मेहमूदुर रहमान समितीने शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ८% आरक्षणाची शिफारस केली होती. मुळातूनच हे धर्मावर आधारित आरक्षण नव्हते तर लोकांच्या मागासलेपणावर, सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर आधारित आरक्षण होते. या तिन्ही अहवालांच्या आधारे २०१४ मध्ये महराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने ५ टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढला. हे केवळ निवडणुकीचे गाजर होते की प्रामाणिक प्रयत्न, हा मुद्दा बाजूला ठेवला, तरी त्यानंतरच्या मुस्लीम आरक्षणाच्या कायदेशीर लढाईत एक महत्त्वाची संधी निर्माण झाली होती.
त्यानंतर आरक्षणाच्या या शासन निर्णयावर चाललेल्या खटल्यात १४ नोव्हेंबर २०१४ रोजी बॉम्बे हायकोर्टाने दिलेला निकाल हा या प्रकरणातील सर्वात मोठी कलाटणी होती. त्या वेळी निर्णय देताना न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती आणि मुस्लिमांच्या नोकरीतील आरक्षणालाही नकार दिला होता. मात्र, न्यायालयाने मुस्लिमांच्या शैक्षणिक मागासलेपणाची दखल घेत शिक्षणातील ५% आरक्षण कायम ठेवण्यास स्पष्ट संमती दिली होती. 
ही संमती एक अतिशय सकारात्मक पाऊल होते. ज्याद्वारे मुस्लीम समाजातील हजारो तरुणांच्या शिक्षणाद्वारे प्रगतीचा मार्ग मोकळा झाला असता. हजारो तरुणांना व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक अभ्यासक्रम, उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाची हमी मिळू शकली असती. पण दुर्दैव असे की, त्यानंतर सत्ताबदल झाला आणि सत्तेवर आलेल्या हिंदुत्ववादी सरकारांनी या न्यायालयीन संमतीचे कायद्यात रूपांतर करण्याची कोणतीही तत्परता दाखवली नाही. प्रत्येक गोष्टीला मुस्लीमांचे लांगुलचालन असे लेबल लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यात भाजप पटाईत आहेच. त्यांना हे सोयीस्कररीत्या करता आले. लोकशाहीत अध्यादेशाचे रूपांतर सहा महिन्यांत कायद्यात होणे अनिवार्य असते. २०१४ साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने ५ टक्के आरक्षणाचा जो अध्यादेश काढला होता त्यानुसार २०१४ ते २०१५ दरम्यान आधी आणि नंतरच्या फडणीस सरकारांनी विधीमंडळात हे विधेयक मांडलेच नाही. परिणामी, २३ डिसेंबर २०१४ रोजी तो अध्यादेश तांत्रिक कारणास्तव 'रद्द' झाला. न्यायालय पाठीशी असतानाही केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे एका समाजाच्या हक्काचा बळी दिला गेला. 
३ मार्च २०१५ रोजी तत्कालीन सरकारने एक शासन निर्णय GR काढून २०१४ चा अध्यादेश अधिकृतपणे रद्द केला. हायकोर्टाची परवानगी असूनही सरकारने कायदा न केल्यामुळे मुस्लिमांना मिळणारे शिक्षणातील ५% आरक्षण कायमचे बंद झाले. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडीच्या काळातही केवळ आश्वासनांचे फुगे हवेत सोडले गेले. या सरकारच्या काळात मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणासाठी कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सरकार कोसळेपर्यंत त्यावर कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. 'आरक्षण देऊ' असे छातीठोक म्हणणाऱ्यांनीही सत्ता असेपर्यंत कुठलीही ठाम पावले उचलली नाहीत. 'सबका साथ-सबका विकास' ची घोषणा देणारे असोत की, 'धर्मनिरपेक्षते'चे झेंडे मिरवणारे या संवेदनशील मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी आपापल्या राजकीय सोयीनुसारच भूमिका घेतल्याचे दिसले. एका गटाने निर्णयाची फाईल दप्तरदिरंगाईच्या लाल फितीत अडकवून हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला, तर दुसऱ्या गटाने या विषयाचा वापर केवळ निवडणुकांपुरते भावनिक राजकारण करण्यासाठी केला. आता फेब्रुवारी २०२६ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने २०१४ चा ५% मुस्लिम आरक्षणाचा प्रलंबित प्रस्ताव पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रशासकीय दप्तरी हे प्रकरण बंद करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सरकारने म्हटले आहे. म्हणजे नक्की काय केले हे त्यांचे तेच जाणोत. 'अगा जे घडलेचि नाही | तेचि (रद्द) जाले जैसे भासे ? " 
कोणत्याही समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षणातील आरक्षणाची परवानगी नाकारणे, ही केवळ तांत्रिक चूक नसून ती एक जाणीवपूर्वक केलेली राजकीय टाळाटाळ होती आणि आहे. भाजप असो की इतर धर्मनिरपेक्ष पक्ष दोन्ही बाजूंनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर सोयीची भूमिका घेतली. आज जेव्हा आपण या आरक्षणाच्या टाइमलाइनकडे पाहतो, तेव्हा स्पष्ट दिसतंय, अहवालांचे निष्कर्ष होते, कागदोपत्री पुरावे होते, न्यायालयाची संमती होती आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने गरजही होती पण सरकारांची नियतच नव्हतीच देण्याची. मुस्लिम आरक्षणाचा हा प्रवास म्हणजे "न्यायालयाने दिलेले सरकारने हिरावले" अशा शब्दांतच मांडता येईल. लोकशाहीत जेव्हा न्यायालये मार्ग मोकळा करून देतात आणि शासन तो मार्ग अडवून धरते, तेव्हा त्याला 'फसवणूक' नाही तर दुसरे काय म्हणायचे?

धर्मांधतेवर आधुनिकतेचा विजय

बांगलादेशच्या निवडणुकांनी दक्षिण आशियाई राजकारणात एक नवा अध्याय लिहिला गेलाय. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी BNPने ३०० पैकी २०० पेक्षा जास्त जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलेय. बांग्लादेशी राजकारणात १९७०-८० च्या दशकात किंगमेकर ठरणारी 'जमात-ए-इस्लामी' मात्र ६० ते ७० जागांतच संपुष्टात आलीय. २०१३ मध्ये बांग्लादेशच्या उच्च न्यायालयाने जमातच्या नोंदणीवर बंदी घातली होती, त्यानंतर आता झालेल्या या निवडणुकीत स्वतंत्रपणे किंवा छुप्या युतीत लढणाऱ्या त्यांच्या समर्थकांना मतदारांनी साफच नाकारले. जमातची स्थिती दयनीय झाली आहे. 
.................................................
बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने BNP मिळवलेला विजय हा केवळ एका पक्षाचा विजय नसून, तो कट्टरवादी विचारसरणीला, धर्मवादाला आणि सित्रीविरोधाला बांग्लादेशी जनतेने दिलेली सणसणीत चपराक आहे. विशेषतः 'जमात-ए-इस्लामी' सारख्या कट्टरवादी शक्तींना जनतेने नाकारून हे स्पष्ट केले आहे की, आता देश प्रतिगामी राजकारणाकडे मागे वळून पाहण्यास तयार नाही.
*जमातच्या पराभवाचे मूळ स्त्रीशक्तीचा अपमान*
बांगलादेशची अर्थव्यवस्था आज जगाच्या नकाशावर ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याचा कणा तिथल्या महिला आहेत. बांगलादेशची अर्थव्यवस्था आज $४५० अब्ज डॉलरच्या टप्प्यावर आहे आणि या यशाचा मोठा वाटा कापड उद्योगात राबणाऱ्या सुमारे ४० लाख महिलांचा आहे. कापड उद्योग असो वा सूक्ष्म वित्तपुरवठा, वा बचत गट, बांग्लादेशी महिलांनी आपल्या कष्टाने देशाला गरिबीतून बाहेर काढले आहे. जमातच्या नेत्यांनी याच महिलांच्या स्वातंत्र्यावर आणि अस्तित्वावर घाला घालणारी विधाने केली. तीच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरली. कट्टरपंथीयांच्या वाढत्या प्रभावामुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येण्याची भीती मतदारांमध्ये होती. बांग्ला देशात पुरूष मतदारांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या जास्त आहे. जमातने तर स्त्री उमेदवार दिल्याच नव्हत्या. एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमध्ये जी नंतर हटवण्यात आली, जमात-ए-इस्लामीचे अमीर शफीकुर रहमान यांनी घराबाहेर काम करणाऱ्या महिलांची तुलना वेश्याव्यवसायाशी केली होती. त्यांनी म्हटले की, "आधुनिकतेच्या नावाखाली जेव्हा महिलांना घराबाहेर ढकलले जाते, तेव्हा त्यांचे शोषण होते, हे नैतिक अध:पतनाचे लक्षण आहे...!". एका मुलाखतीत रहमान यांनी स्पष्ट केले की, "अल्लाहने महिलांना नेतृत्वाची परवानगी दिलेली नाही. जमातमध्ये स्त्री नेतृत्व अशक्य आहे...!". जिथे प्रचंड मोठा काळ दोन महिला प्रधानमंत्री पदावर काम करून बांग्लादेशाचा विकास घडवून आणत्या झाल्या तिथे हा माणूस असं बोलत होता. 
"स्त्री तिच्या घरातच खरी राणी आहे. जर तिला घराचे महत्त्व समजले, तर ती नोकरीसाठी बाहेर जाणार नाही...!" अशा आशयाची शुगरकोटेड विधानं याने केली होती. जमातच्या महिला आघाडीच्या सचिव नुरुन्निसा सिद्दिका यांनीही या भूमिकेचे समर्थन करताना म्हटले की, "पुरुष हे महिलांचे पालक आहेत, त्यामुळे महिला सर्वोच्च पदावर असू शकत नाहीत...!". इथे आपल्याकडच्या एका राजकीय संघटनेची आठवण येणे अपरिहार्यच आहे. 'जमात-ए-इस्लामी'सारखे पक्ष महिलांच्या कामावर निर्बंध घालण्याची, त्यांना घराच्या चार भिंतीत बंदिस्त करण्याची किंवा बुरख्याची सक्ती करणारी भाषा बोलत असताना त्यांना पराभव पत्करावा लागणार,  हे निश्चितच होते. आधुनिक बांगलादेशी महिलांना आपले स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वावलंबन कोणत्याही धर्मांध अजेंड्यासाठी पणाला लावायचे नव्हते. जमात नेत्यांच्या विधानांनंतर ढाका आणि इतर शहरांमध्ये हजारो महिला रस्त्यावर निदर्शनं करत उतरल्या. जमातने ३०० जागांपैकी २७६ उमेदवार उभे केले होते, परंतु त्यामध्ये एकही महिला उमेदवार नव्हती. यावरून त्यांचा महिलांना सत्तेत वाटा देण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट झाले.
बांगलादेशच्या जीडीपीमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. जर जमात सत्तेवर आली असती, तर आंतरराष्ट्रीय कापड खरेदीदार ब्रॅण्ड्स बांगलादेशमधून बाहेर पडले असते, अशी भीती उद्योजकांना होती. NDTV च्या मते, जमातच्या 'तालिबानी' विचारसरणीमुळे बांगलादेशच्या आर्थिक प्रगतीला ब्रेक लागला असता. जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांनी महिलांना "राष्ट्राचा मुकुट" म्हणत असतानाच त्यांच्या हक्कांना नाकारले. हा दुटप्पीपणा बांगलादेशच्या सुजाण मतदारांनी ओळखून मतपेटीतून त्यांना धडा शिकवला.
*धर्मांध राजकारण नाकारले*
जमात-ए-इस्लामीने नेहमीच धर्माचा आधार घेऊन राजकारण केले आहे. जमातने बांग्लादेशात नेहमीच 'धर्मावर आधारित राष्ट्र' ही संकल्पना मांडली, परंतु आधुनिक बांग्लादेशी मतदाराने, विशेषतः तरुणांनी, या संकल्पनेला 'कालबाह्य' ठरवले आहे. आपल्याकडच्या हिंदुराष्ट्र संकल्पनेप्रमाणेच जमातचेही राजकीय तत्त्वज्ञान इस्लामिक राष्ट्राचे आहे. मात्र, बांगलादेशचा तरुण मतदार आता रोजगार, तंत्रज्ञान आणि जागतिक संधींकडे पाहत आहे. कट्टरवाद हा विकासाच्या आड येतो, याची जाणीव नागरिकांना झाली आहे. द डेली स्टार सारख्या स्थानिक माध्यमांमधील वृत्तांकनानुसार, मतदारांनी कट्टरपंथीयांच्या 'इस्लामी राज्य' संकल्पनेपेक्षा लोकशाही मूल्यांना अधिक पसंती दिली. २०२४ च्या सत्ताबदलानंतर आणि २०२५ च्या सुरुवातीला बांगलादेशात हिंदू समुदायावर झालेल्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा डागाळली होती. जमात-ए-इस्लामी आणि त्यांच्याशी संबंधित कट्टरवादी गटांवर या हिंसाचाराचे आरोप झाले होते. हिंसाचाराच्या काळात जमातच्या काही स्थानिक नेत्यांनी "बांगलादेश हा केवळ मुस्लिमांचा आहे" अशा आशयाची विधाने केली होती. एका सभे दरम्यान कट्टर नेत्यांनी हिंदूंच्या मालमत्तेवर हक्क सांगणारी चिथावणीखोर भाषणे केली होती, ज्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटले. जेव्हा कट्टरपंथीयांनी मंदिरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अनेक ठिकाणी मुस्लीम तरुण आणि विद्यार्थ्यांनी रात्रभर पहारा देऊन मंदिरांचे रक्षण केले. हा जमातच्या 'धर्मांधारित फूट पाडण्याच्या राजकारणाला केला गेलेला सर्वात मोठा सामाजिक विरोध होता.
हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या सुमारे ८ ते १०% आहे. या मतदारांनी एकजुटीने जमातविरोधी मतदान केले. कट्टरवादाला खतपाणी घातल्यास देश यादवीकडे जाईल, ही भीती बहुसंख्य मुस्लीम मतदारांमध्येही निर्माण झाली होती. बांगलादेशातील सुमारे ३५% मतदार १८ ते ३५ वयोगटातील आहेत. या पिढीला "इस्लामी राज्य" नको, तर "डिजिटल बांगलादेश" आणि जागतिक बाजारपेठेत संधी हवी आहे. आम्हाला पाश्चात्त्य लोकशाही नको, तर कुरआनवर आधारित शासन हवे आहे...," हे जमातचे अधिकृत धोरण होते. यावर प्रत्युत्तर म्हणून, ढाका ट्रिब्यून मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांनुसार, तरुणांनी "आम्हाला धर्म हवा आहे, पण धर्मांध सत्ता नको...." असा पवित्रा घेतला. हिंदू समुदायावरील हल्ल्यांनी बांगलादेशला जगासमोर लज्जित केले होते. या निवडणुकीद्वारे तिथल्या नागरिकांनी हे सिद्ध केले की, त्यांना 'हिंदू-मुस्लीम द्वेष' पसरवणारी शक्ती नको, तर सर्वांना सोबत घेऊन जाणारी लोकशाही हवी आहे. जमात-ए-इस्लामीचा हा ऐतिहासिक पराभव म्हणजे दक्षिण आशियातील कट्टरवादी राजकारणाला मिळालेलं प्रागतिक वळण आहे. आपण भारतातले लोकही यातून शिकू शकतो.
*आर्थिक प्रगतीची ओढ*
जमातच्या पराभवात आर्थिक घटकही महत्त्वाचा ठरला. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला कापड उद्योग वर्षाला सुमारे $४५ अब्ज डॉलरची निर्यात करतो. कट्टरतावादामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कमी होते आणि निर्बंधांची टांगती तलवार असते, हे मतदारांना ठाऊक होते. स्त्रियांना काम करू न देणे म्हणजे देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घट करणे, हा साधा हिशोब जनतेने मांडला. मतदारांना भीती होती की, जर जमात सत्तेत आली, तर बांगलादेशची अवस्था 'अफगाणिस्तान' किंवा 'पाकिस्तान' सारखी होईल, जिथे परकीय गुंतवणूक जवळपास शून्यावर आली आहे. वर्ल्ड बँक च्या अहवालांनुसार, बांगलादेशच्या विकासासाठी जागतिक बाजारपेठेशी जोडलेले राहणे अनिवार्य आहे. बांगलादेशात 'ग्रामीण बँक' आणि इतर संस्थांद्वारे महिलांना मिळणारे छोटे कर्ज Micro-finance ही मोठी ताकद आहे. जमातने या कर्ज पद्धतीला 'व्याजखोरी' Riba म्हणून विरोध केला होता. ग्रामीण भागातील लाखो महिला ज्या या कर्जावर आपले छोटे उद्योग चालवतात, त्यांनी जमातच्या या भूमिकेला आपल्या उदरनिर्वाहावरचा हल्ला मानले. ढाका ट्रिब्यून च्या विश्लेषणानुसार, ग्रामीण महिलांनी जमातच्या उमेदवारांना पूर्णपणे नाकारले. बांगलादेशातील तरुण मोठ्या संख्येने परदेशात मध्य पूर्व, युरोपमध्ये कामासाठी जातात. जमातच्या कट्टरवादी धोरणांमुळे बांगलादेशी नागरिकांना 'व्हिसा' मिळणे कठीण झाले असते, याची जाणीव तिथल्या स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबांना होती. बांगलादेशी जनतेने 'कट्टरवाद विरुद्ध कापड उद्योग' अशा संघर्षात आपल्या भविष्याची आणि प्रगतीची निवड केली. जमातचा पराभव हेच दर्शवतो की, आता धर्मांधतेपेक्षा 'आर्थिक सुरक्षितता' ही मतदारांसाठी अधिक महत्त्वाची आहे. बांग्लादेशच्या निवडणुकीचा हा निकाल म्हणजे जनमताचा कौल तर आहेच पण त्याहूनही आधुनिक बांगलादेशने स्वतःच्या अस्तित्वासाठी मतपेटीतून दिलेली एक झुंज आहे. बांगलादेश 'तालिबानी' मानसिकतेच्या काळोखात ढकलला जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत असतानाच तिथल्या जनतेने, विशेषतः रणरागिणींसारख्या उभ्या राहिलेल्या महिलांनी, कट्टरतावादाचा बुरुजच ध्वस्त करून टाकला आहे. बांगलादेशच्या गल्लीबोळातील गारमेंट फॅक्टरीमध्ये राबणाऱ्या कष्टकरी पुरुष-स्त्रियांपासून ते ढाका विद्यापीठातील उच्चशिक्षित तरुण-तरुणींपर्यंत सर्वांनी हे ठामपणे सिद्ध केले आहे की, प्रगतीची आणि स्वातंत्र्याची वाट ही कोणत्याही धर्मांध आणि प्रतिगामी धर्मवेडापेक्षा कितीतरी अधिक सुखकर आणि समृद्ध आहे. भारत यापासून धडा घेईल का?

Saturday, 4 April 2026

किशोर सरपोतदार : अस्सल पुणेकर

आमचे सन्मित्र, पाककला क्षेत्रातले दिग्गज पूना गेस्ट हाऊसचे आणि सरपोतदार केटरर्सचे किशोर सरपोतदार यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रभुचरणी प्रार्थना....! 
किशोर सरपोतदार यांचा जन्म ४ एप्रिल १९५९ रोजी पुण्याचा. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी, उत्साही व्यक्तिमत्त्व! जगन्मित्र, अजातशत्रू स्वर्गीय चारुदत्त उर्फ चारूकाका सरपोतदार यांचे पुत्र! किशोर सरपोतदार हे देखील असंच वेगळं व्यक्तिमत्त्वच आहे. नानासाहेब सरपोतदार यांचा वारसा किशोरजींना लाभलाय. पुण्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांचं विशेष स्थान आहे. गेल्या तीन पिढ्यांमधले नाट्य-चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी ‘पुण्यातला घरचा हक्काचा माणूस’ अशी ख्याती त्यांनी मिळवलीय. ते अनेक संस्थांचे व्यक्तींचे आधारस्तंभ आहेत. त्यांचा चवीपासून सामाजिक कार्यापर्यंतचा चारूकाका यांचा वारसा जपलाय. पायंडे जपत पूना गेस्ट हाऊस, सरपोतदार केटरर्स याची वाटचाल सुरू आहे. किशोर यांचं शालेय शिक्षण शिशु विहार, मॉडर्न हायस्कूल आणि गरवारे महाविद्यालयात झालंय. व्यवस्थापन शास्त्राची डिग्री घेतलीय. किशोर यांनी ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटात राजा परांजपे यांच्या लहानपणाची भुमिका, मृणाल कुलकर्णी यांच्या ‘रमा माधव’ सह अशा अनेक चित्रपटात भुमिका साकारल्यात. अनेक व्यावसायिक ब्रँडसाठी मॉडेलिंग केलेलंय. मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन घरच्याच व्यवसायात लक्ष घातलं. काळाची गरज ओळखून  उपाहारगृहात बदल केले. नवनव्या गोष्टी करण्याचा, आव्हानं स्वीकारण्याचा चारूकाकांचा वारसाही त्यांनी आत्मसात केलाय. त्यामुळे अनेक मोठ्या कार्यक्रमांना केटरिंगची जबाबदारी त्यांच्याकडेच असते. तळजाई पठारावर ४० हजार स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पार पडलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर असो, ‘उंबरठा’चं शूटिंग असो, की ‘जाणता राजा’चे राज्यभरातले प्रयोग असोत; खानपान व्यवस्थेसाठी किशोर सरपोतदार हे एकमेव नाव असतं. राजीव गांधी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या उपस्थितीत पुण्यात एक मोठा कार्यकर्ता मेळावा झाला. तेव्हा हजारो लोकांना एकावेळी बुफे तोही पुण्यात पहिल्यांदाच पुरविण्याचा पराक्रम किशोर यांनी केलाय. पुण्यात झालेली अखिल भारतीय मराठी साहित्य आणि नाट्य संमेलनातल्या रसिकांची जेवणाची व्यवस्था किशोर यांच्याकडेच असते. अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान कलावंतांना जेवू घालणाऱ्या किशोर यांनी १९८५ मध्ये देशातला पहिला ‘फूड फेस्टिव्हल’ फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर केला. शंभरहून अधिक पदार्थ अगदी हुरड्यापासून चायनीजपर्यंत अशी रेंज असलेल्या या महोत्सवाला तुफान प्रतिसाद मिळाला. यातल्या  उत्पन्नातले एक लाख रुपये ‘श्रीवत्स’ला दिले गेले. केईएम रुग्णालयातल्या वीस रुग्णांचे जेवणाचे डबे  मोफत पुरविले जातात. शहरात समारंभ, कार्यक्रमातले जेवणावळीनंतर शिल्लक अन्न स्वखर्चानं वाहतूक करून ते गरिबांना वाटण्याचं काम किशोर करतात.‘एमसीसीआय’चे सर्व उपक्रम, कन्स्ट्रो, एक्सपो, महाटेक, किसान अशा मोठमोठ्या उपक्रमांमध्ये केटरिंगची सारी व्यवस्था किशोरकडेच असते. पुण्यात पँव्हेलियन मॉलमध्ये मराठी पदार्थांचे आऊटलेट सुरू केलंय. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी मोदक बनविण्याची कार्यशाळा घेतात. गणेशोत्सवात मोदक आणि दिवाळीत फराळ विक्री केली जाते. सणासुदीच्या काळात समाजात सर्वांना अत्यंत रास्त दरात मिठाई मिळावी, या हेतूने किशोर यांनी गेल्या ४० वर्षांपासून 'ना नफा ना तोटा' या तत्वाने मोतीचुर लाडू, चिवडा विक्रीची योजना सुरू केलीय. त्याद्वारे लो कॅलरी फराळ, डाएट फराळ, मिक्स फराळ आदी योजना सुरू केल्यात. सामाजिक बांधिलकी आणि रोजीरोटीसाठीचा व्यवहार यांचा समन्वय साधलाय.  व्यवसाय सांभाळून सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रांत सतत कार्यरत असतात किशोर यांचे चिरंजीव सनत हे आता त्यांच्या व्यवसायात मदत करत असतात. किशोर यांनी अनेक संस्थांना हातभार लावलाय. ‘प्रिझम ट्रस्ट’, ‘रेडक्रॉस’, स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व समिती, पुणे केटरिंग असोसिएशन, पुणे हॉटेल असोसिएशनचे सचिव, पूना रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन, हॉस्पिटॅलिटी वर्ल्ड असोसिएशन या अनेक संस्थांचे काम ते करतात. पर्सिस्टंट कंपनीच्या ‘दे आसरा', या उद्योजक उद्योग घडविणाऱ्या संस्थेत फूड इंडस्ट्री विषयी मार्गदर्शक - मेंटोर म्हणून किशोर  आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हॉस्पिटॅलिटी विषयक 'तज्ञ सल्लागार या नात्याने किशोर काम पाहतात. निवारा वृद्धाश्रमाशी ते निगडीत आहेत. अनेक वर्तमानपत्रांत त्यांचे फूड इंडस्ट्री विषयी लेख आजपर्यंत प्रसिद्ध झाले आहेत.
किशोर यांनी 'पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच' हे स्टेज कलाकारांना उपलब्ध करून दिले असून मंचावरून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले आहेत. सध्या दर सोमवारी एखाद्या उद्योजकाला बोलावून त्यांची मुलाखत घेण्याचा उपक्रम ते राबवित असतात. संगीतातील नव्हें तर लहान मुलांच्या  कार्यक्रमापासून. पपेट शो असे कार्यक्रम करून 'पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच' आणि अजित कुमठेकर यांनी लोकांना एका धाग्यात  गुंफण्याचे काम केलंय. सरपोतदार बंधूंच्या तर्फे कामशेत रस्त्यावर ‘मिराघर’ या नावाने वृद्धाश्रम उभारले आहे. किशोर आणि अभय सरपोतदार यांच्या पूना गेस्ट हाऊसला अनेक
विविध संस्थानी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. २०२२ मध्ये पुणे गेस्ट हाऊसने  आपली शाखा  पी.एन. गाडगीळ अँड सन्स यांच्या कुडजे इथं 'झपुर्झा' या प्रकल्पात उघडली आहे. सरपोतदार कुटुंबातल्या चौथ्या पिढीनं सनत किशोर सरपोतदार आणि त्यांची पत्नी आदितीनं नव्या युगात प्रवेश केलाय. 'पूना गेस्ट हाऊस' मध्ये लोकप्रिय ठरलेली रुचकर आणि स्वादिष्ट "मिसळ, पातळ अळूची भाजी, मटार उसळ आणि मसाले भात...!" याला देशविदेशातून मागणी असल्यानं 'रेडी टू इट' पाकीटं तयार केली आहेत. त्याचा शुभारंभ अनंत चतुर्दशी आणि ९० व्या वर्धापनदिनी करण्यात आलाय. त्याचे डिझाईन आणि पॅकेजिंग माझ्या मुलानं मृणाल यानं आमच्या 'फायर फ्लाय क्रिएटिव्ह सोल्युशन' या जाहिरात संस्थेनं तयार केलंय. याचा आम्हाला अभिमान वाटतो. ही संधी सनत आणि किशोर सरपोतदार कुटुंबानं आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

समरांगण वंगभूमीचं...!

"वंगभूमीवर लढलं जाणारं युद्ध हे समुद्रमंथनाप्रमाणे आहे. ज्यातून अमृत अन् विष दोन्ही निघणारं आहे. हे समुद्रमंथन केवळ मोदी अन...