परिसीमन बिलच्या माध्यमातून सत्ताकारण, राजकारण यांची घुसळण होतेय. साऱ्या राजकारण्यांचे मुखवटे गळून पडताहेत. या समुद्रमंथनातून कुणाला 'हलाहल ' तर कुणाला राजसत्तेचं अमरत्व मिळविण्यासाठीचं 'अमृत ' मिळेल. राजसत्तेसाठी हे बिल अत्यंत महत्वाचं आहे. मतदारसंघ पुनर्रचना करतांना 'आसाम मॉडेल' वापरून सोयीचं सीमांकन करायचंय. खासदारांची संख्या थेट ८०० हून अधिक करायचीय. त्याचा वाढता आर्थिक बोजा हा करदात्यांवर पडणारंय. या अस्वस्थ वातावरणात साऱ्या राजकारण्यांची परीक्षा घेणारं हे बिल आहे. भाजपसाठी जसं हे बिल फायदेशीर आहे. तसंच ते काँग्रेससाठीही डोळे उघडणारंय. आजवर जे सोबत दिसले होते, ते 'सत्तासाथीदार ' बनल्याचं दिसेल. दक्षिणेतल्या आणि उत्तरेतल्या जागा यामध्ये मोठी तफावत असेल. यामुळं उत्तरेचं वर्चस्व राजसत्तेवर, राजकारणावर अन् प्रशासनावर असेल. यातून दुहीची बीजं पेरली जाणार तर नाही ना? याची खबरदारी राजसत्तेला घ्यावी लागेल!"
.........................................
येत्या ३० नोव्हेंबरपासून, १०० दिवसांहून अधिक काळ स्थगित असलेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन केवळ चार दिवसांसाठी होतेय. यात भाजपच्या अजेंड्यावर दीर्घकाळापासून असलेल्या दोन प्रमुख घटनात्मक उद्दिष्टांकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झालंय. एक, देशभरातल्या लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना - डीलिमिटेशन - परिसीमन आणि सदस्य संख्या वाढ; दुसरी, संसद अन् विधिमंडळांत महिलांसाठीचं आरक्षण लागू करणं. भाजप-'एनडीए' या उद्दिष्ट पूर्ततेसाठी आवश्यक ३/४ संसदीय संख्याबळ मिळवू शकेल अशी चिन्हे आहेत. आज लोकसभेत ५४३ सदस्य संख्या आहे. यात ३ जागा रिक्त आहेत. म्हणजे ५४० सदस्य आहेत. अमृत पाल सिंग अन् राशिद इंजिनिअर हे दोघे तुरुंगात आहेत. तृणमूलचे कल्याण बॅनर्जी हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित आहेत. राहिले ५३७ सदस्य भाजपला हे विधेयक संमत करण्यासाठी ३/४ म्हणजे ३५८ सदस्यांची आवश्यकता आहे. आज भाजपकडे ३२० सदस्य आहेत. २२ द्रमुक आणि ८ राष्ट्रवादी शरद पवार गट, ४ जगन मोहन रेड्डी अशी ३४ संख्या जोडली तर भाजपकडे ३५४ सदस्य आहेत. आम आदमी पार्टीचे ३ सदस्य भाजपला मतदान करतील अशी शक्यता आहे. नाहीतर ४-६ सदस्यांना अनुपस्थित राजसत्ता ठेऊ शकते. पण इथं महत्वाचं हे आहे की, काँग्रेसला या परिसीमन बिल प्रक्रियेतून खरंतर खुश व्हायला हवंय, असं मला वाटतं; कदाचित ते चुकीचंही असू शकतं. जी मंडळी इंडिया आघाडीत आज आहेत. जे रामलीला मैदानावर 'संविधान बचाओ' मोर्चाची गर्दी पाहून राहुल, प्रियांका सोबत सुप्रिया सुळे आणि इतर नाचत होते, ते आज काँग्रेसला मदत करणार नाहीत असं दिसतंय. पण नाराज व्हायला नको. कारण या परिसीमन बिलच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणाची सफाई होणार आहे. काँग्रेससोबत जे विरोधी पक्ष आहेत त्यांचे सारे मुखवटे गळून पडतील. साऱ्या देशाला दिसून येईल की, कोण भाजपची बी टीम म्हणून इंडिया आघाडीत वावरत होते, कोण भाजप विरोधाचं नाटक करत होते, कोण भाजपच्या पे रोलवर आहेत, संधिसाधू, धोकेबाज आहेत आणि कोण खरंच विरोधात उभं राहतात, हे स्पष्ट होईल. काँग्रेसला हेही समजून येईल की, नेमकं कुणाला या पुढच्या काळात बरोबर घ्यायचंय!
राजसत्तेनं ही एक चांगली गोष्ट केलीय की, लोकसभा निवडणुकीच्या तब्बल अडीच वर्षाआधी हे परिसीमन बिल आणलंय. ज्यामुळं साऱ्यांचे चेहरे उघड झालेत, नाहीतर काँग्रेस याच भ्रमात राहिली असती की, हे 'बहुरूपी भामटे' आपल्या सोबत आहेत. पण हे सारे अडीच वर्षे सोबत राहिले असते अन् २०२९ ला ऐन निवडणुकीत धोका दिला असता! यापुढे द्रमुक आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत मैत्री नकोय. समाजवादी पक्षाची भूमिका देखील संदिग्ध दिसतेय. यातले काहीजण अनुपस्थित राहू शकतात. कोणावर विश्वास, भरोसा ठेवायचा याचा विचार काँग्रेसला आता करावा लागेल. आगामी राजकारण कसं आणि कशापद्धतीनं करायचं हे ठरवायला देखील हे बिल सहाय्यभूत ठरणारंय. काँग्रेसनं 'इंडिया आघाडी' असा म्हणून जो फुगा फुगवलाय त्याबाबतही पुन्हा विचार करावा लागेल. 'एकला चलो रे...!' भूमिका घ्यावी लागेल! देशभरात जिथं जिथं इतर पक्षांशी मग ममता, तेजस्वी, अखिलेश, ठाकरे, सोरेन, अन् इतरांशी केलेल्या आघाडीचा पुनर्विचार करायला लागेल! स्वतःचा मार्ग स्वतःलाच निवडावा लागेल. एकट्याने वाटचाल करायला लागेल. आज राहुलच्या नेतृत्वाखाली तरुण रस्त्यावर उतरलाय त्यांना सोबत ठेवायचं असेल तर हे करावंच लागेल. काँग्रेसची भूमिका या बिलाबाबत स्पष्ट आहे. २०२३ मध्ये संमत झालेलं महिला आरक्षण जी आज संसदेची सदस्य संख्या आहे त्यातूनच आरक्षण लागू करा. मागासवर्गीयांसाठीचं आरक्षण द्या! दुसरं, द्रमुकनं जी अट टाकलीय त्यातून त्यांना फायदा होताना दिसत नाही. कारण संसदेच्या ज्या ७.१४ टक्के जागा त्यांना हव्यात त्या भाजपनं जे ५० जागा टक्के वाढीचं आश्वासन दिलंय त्यातून द्रमुकला ६२ जागा मिळू शकतात. पण द्रमुकच्या म्हणण्यानुसार ६० जागाच त्यांना मिळतील. हीच परिस्थिती दक्षिणेकडच्या इतर राज्यांची असणारंय. राष्ट्रवादीची भूमिका ही कायमच सत्तेच्या सोबत जाणारी ठरलीय. ३७० कलम रद्द करण्याच्यावेळीही अनुपस्थितीत राहून त्यांनी राजसत्तेला मदत केली होती. एवढंच नाहीतर राज्यात आणि देशात कायमच त्यांनी सत्तेबरोबर जाण्याचा प्रयत्न आजवर केलाय.
अटलजींच्या भाजपनं स्वतःची प्रतिमा आघाडीत परस्पर सहमती अन् घटनात्मक संयम पाळणारा पक्ष अशी निर्माण केली होती. आमिषे दाखवून, पक्षांतरे घडवून बहुमत मिळवण्याच्या पद्धतीवर वाजपेयींनी कठोर टीकाही केलेली होती. वाजपेयींच्या उलट नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या भाजपने आपल्या राजकीय विस्तारासाठी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. विविध राज्यांत नसलेली सत्ता आणण्यासाठी आणि असलेली सत्ता अधिक बळकट, मजबूत करणं यासाठी आताचा नवा भाजप 'नैतिकता' बासनात गुंडाळून ठेवून कुणाशी, कशाही आघाड्या केल्यात, पक्षांतरं, घोडेबाजार, वरपासून खाली अगदी शेवटच्या सत्ताकेंद्रांपर्यंत संघटनात्मक वर्चस्व निर्माण करण्यावर काम करतोय. याकडं कुणी राजकीय व्यावहारिकता म्हणून बघोत किंवा त्याला राजकीय आचरणाच्या पूर्वीच्या मूल्यांचं अधःपतन मानलं जावो, स्पष्ट दिसतंय ते हेच की, आपल्या पूर्वसुरींच्या नेतृत्वाच्या तुलनेत सध्याचा भाजप स्वतःच्या सत्तेचं दीर्घकालीन व्यवस्थापन अन् त्यासाठी संरचनात्मक राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक त्या राजकीय व्यूहरचनेवर लक्ष केंद्रित केलेला आहे.
नियमानुसार हे लोकसभा मतदासंघाची पुनर्रचना - परिसीमन बिल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर करावं लागतं. त्या सभागृहाच्या सदस्यसंख्येचं बहुमत हे उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांचं दोन-तृतियांश आवश्यक असतं. त्यानंतर, किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांनी साध्या बहुमतानं या विधेयकाला मंजुरी समर्थन देणं आवश्यक असतं. यासाठी तीन मुख्य अटी आहेत. पहिली अट, संसदेच्या प्रत्येक सभागृहातल्या किमान निम्म्या सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते; दुसरी अट, संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांचं दोन-तृतियांश बहुमत आवश्यक असावं लागतं; आणि तिसरी अट, किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांची या बिलाला मंजुरी प्रत्येक सभागृहात बहुमतासह हवी! भाजपची बहुतांश राज्यांमध्ये स्वतःची सरकारं वा मित्रपक्षांची सरकारं आहेत, त्यामुळे तिसरी अट सहजपणे पूर्ण होऊ शकते. हे बिल आणण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला होता. तो अयशस्वी ठरला. एप्रिल २०२६ मध्ये, 'संविधान-१३१ वी घटनादुरुस्ती बिल, २०२६' वर मतदान करणाऱ्या सदस्यांचं दोन-तृतियांश बहुमत मिळवण्यात तेव्हा सरकारला अपयश आलं होतं.
भाजपच्या केशवप्रसाद मौर्य, ओमप्रकाश राजभर यांनी दावा केलाय की, समाजवादी पक्षाचे २५-२६ लोकसभा खासदार पक्ष सोडण्यास तयार आहेत. मात्र, अखिलेश यादव यांनी हे वृत्त फेटाळून लावलंय. तामिळनाडूत काँग्रेसने थलपती विजय यांच्या पक्षाशी युती करून सत्तेत सहभागी झाल्यानंतर द्रमुकनं युती काँग्रेसशी युती तोडली, त्यानंतर द्रमुक 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडल्याचं सांगण्यात आलं. मात्र द्रमुककडून काही विशिष्ट मुद्द्यांवर भाजपने पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न केलेत. म्हणजेच द्रमुक स्वतंत्र राहून विशिष्ट बिलावर सरकारच्या बाजूनं मतदान करेल. होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेमुळे उत्तरेच्या तुलनेत तामिळनाडूतल्या लोकसभेच्या जागा कमी होणार होत्या, शिवाय महिला आरक्षण झाल्यास विद्यमान काही खासदार आपल्या जागा गमावण्याची शक्यता होती, त्यामुळं द्रमुक मधले काही खासदार पक्ष सोडण्याची शक्यता असल्याचं मानलं जातेय; पक्षस्तरावरचा सशर्त पाठिंबा हाच एकमेव वास्तववादी मार्ग उरतो, जरी त्याबाबत मात्र अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. इथं धनशक्ती वापरली जाऊ शकते आणि अशा मिळालेल्या पाठिंब्यामुळे २२ जागांची भर पडेल त्यामुळं एनडीएची एकूण संख्या ३७० पर्यंत पोहोचू शकते.
राज्यसभेसाठी २४५ पैकी एनडीएकडे १४९ जागा असून, दोन-तृतीयांश जागांसाठी १६४ जागांचा टप्पा आहे. पण राज्यसभेत सध्या १२ जागा रिक्त आहेत, त्यामुळे दोन-तृतीयांश जागां म्हणजे १५५ जागांपर्यंत खाली येईल. म्हणून, जर भाजपला राज्यसभेतील ९ जागांसाठी द्रमुकचा पाठिंबा मिळवता आला, तर भाजप दोन-तृतीयांश जागांचा टप्पा इथंही सहजपणे ओलांडेल असं स्पष्ट दिसतं. त्यामुळे, दोन्ही सभागृहांमध्ये हे लोकसभा मतदारसंघाचे सीमांकन बिल मंजूर करणं सरकारला शक्य होईल. महिला आरक्षणाची अंमलबजावणी करणं तर त्यांच्या अगदी हातचा मळ ठरेल. मोदी-शाह यांची भाजप भारताच्या राजकीय इतिहासातल्या सर्वात आक्रमक अन् महत्त्वाकांक्षी स्वरूप आहे. ते आपल्या राजकीय अजेंड्यावर एखाद्या 'लष्करी मोहिमे'प्रमाणे काम करतात. अन् ही पक्षाची महत्त्वाकांक्षा फलित होण्यासाठी मोदी-शाह जोडी हरप्रकारे नैतिकता धाब्यावर बसवून, कुठलाही विधिनिषेध न बाळगता, जनक्षोभाची पर्वा न करता मनमानी करतात. हे वास्तव आहे; पण असं पूर्वी वाजपेयींच्या भाजपमध्ये नव्हतं. थोडक्यात सांगायचं झालं तर गेल्या १२ वर्षांत लोकांच्या अपेक्षांमध्ये मोठी वाढ झालीय. लोक विकासकामांकडे केवळ राजकीय नेत्यांच्या कष्टाचं फळ म्हणून आता पाहत नाहीत; त्याऐवजी, ती विकासकामे कोणामार्फतही घडून आली तरी तो आपला हक्क आहे, असं त्यांना वाटतं.
मतदारसंघाची पुनर्रचना लोकसंख्येच्या आधारावर केली जाते. पण आज राजसत्तेनं सीमांकनं कसे होईल हे स्पष्ट केलेलं नाही. त्यासाठी कदाचित 'आसाम मॉडेल' वापरणार अशी चर्चा आहे. तिथं अल्पसंख्याकांना अलग ठेवून बहुसंख्यांकांचे मतदारसंघ तयार केलेत. ज्यामुळं तिथं जे काँग्रेसचे आमदार निवडून आलेत ते सारे मुस्लिम आहेत हे इथं नोंदवावं लागेल. 'आम्हाला मुस्लिमांची मतं नकोत' असं सांगणारी राजसत्ता लोकसभा सीमांकन कशाप्रकारे करेल हे वेगळं सांगायला नको!
मतदारसंघ पुनर्रचनेसाठी १९५२, १९६३, १९७३ आणि २००२ साली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. मात्र १९७६ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुनर्रचनेवर बंदी घातली. २००१ साली जनगणनेनंतर मतदारसंघ पुनर्रचना झाली. मात्र त्यानंतर मतदार संघांच्या संख्येत बदल झाला नव्हता. वाजपेयी यांनी पुनर्रचनेला २५ वर्षाची मुदतवाढ दिलीय. ती आता होतेय. मतदारसंघ पुनर्रचनेचा थेट संबंध देशाची लोकसंख्या, लोकसभेच्या एकूण जागांवर पडतो. जर एखाद्या राज्याची लोकसंख्या वाढली असेल तर तिथले लोकसभा मतदारसंघही वाढतात असं ते गणित आहे. भारताची लोकसंख्या ही २०२६ पर्यंत अंदाजे १४२ कोटी आहे. ढोबळमानाने एका लोकसभा मतदारसंघात १० लाख नागरिक असतात. वाढलेल्या लोकसंख्येचा अंदाज घेता एक लोकसभा मतदारसंघ २० लाख नागरिकांचा जरी झाला तरी खासदारांची संख्या ७५० पेक्षा अधिक होईल, असा अंदाज आहे. पण राजसत्तेला ८१५ ते ८५० जागा निर्माण करायच्या आहेत मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास कर्नाटकमधल्या लोकसभेच्या जागा २८ वरुन ३६ होतील म्हणजेच ८ जागांची वाढ होईल. तेलंगणात संख्या तीनने वाढून ती १७ वरुन २० होईल, तर आंध्र प्रदेशात जागा २५ वरुन तीनने वाढून २८ होतील. तमिळनाडूत जागा दोनने वाढून ३९ वरुन ४१ होतील. केरळमधील जागा एकने कमी होऊन २० वरुन १९ होतील. उत्तर प्रदेशात पुनर्रचनेनंतर त्या ८० वरुन थेट १२८ होतील. म्हणजेच ४८ ने जागा वाढतील. बिहारमध्ये जागा ४० वरुन ७० होतील. म्हणजेच त्या ३० ने वाढतील. मध्य प्रदेशमध्ये २९ लोकसभा मतदारसंघ असून ते ४७ होतील. म्हणजेच तिथे १८ जागा वाढतील महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ४८ जागा असून त्या २० ने वाढून ६८ होतील. बंगालमध्ये सध्या ४२ जागा आहेत, त्या ११ ने वाढून ५३ होतील. यामुळेच दक्षिणेकडची राज्ये संतापली आहेत. लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केलेल्या राज्यांमधल्या लोकसभेच्या जागांमध्ये किरकोळ संख्येने वाढ होताना दिसतेय. ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तुलनेने कमी प्रयत्न केले, किंवा केलेच नाहीत त्यांचे प्रतिनिधीत्व जास्त असेल. दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधीत्व कमी असेल. ज्यामुळे दक्षिणेकडच्या राज्यांबाबत भविष्यात भेदभाव जास्त होऊ शकतो अशी भीती तिथल्या राजकारण्यांना सतावत आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९.
चौकट
लोकसभेतले सुधारित पक्षीय बलाबल
सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृततेनुसार, १८ राजकीय पक्षांची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे:
भारतीय जनता पक्ष : २३९, भारतीय नॅशनल काँग्रेस : ९८, समाजवादी पक्ष : ३७, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस : २८, यापैकी २० जण नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया पक्षात गेलेत पण अद्याप त्याला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली नाही. द्रविड मुन्नेत्र कळघम : २२, तेलगू देसम : १६, शिवसेना - शिंदेगट : १३, जनता दल युनायटे पार्टी : १२, राष्ट्रवादी पक्ष - शरदचंद्र पवार : ८, जनवादी पक्ष रामविलासऑफ कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय जनता दल : ४, युवजन श्रमिक रयतू काँग्रेस वायएसआर काँग्रेस पक्ष : ४ आम आदमी पक्ष : ३, झारखंड मुक्ती दल : ३, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे : ३ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्स-लेनिनन-लिबरेशन : २, जम्मू-कश्मीर काँग्रेस : २, काँग्रेस - सेक्युलर : २, राष्ट्रीय लोक दल : २, विदुथलाई चिरुथाईगल कात्ची : २, आझाद समाज पक्ष - कनराम : १, आजसू पक्ष : १, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन : १, अपना दल - सोनेलाल : १, आसाम गण परिषद : १, भारत आदिवासी पक्ष : १, हिंदुस्तानी अवाम मोर्चा - सेक्युरल : १, केरल आपला पक्ष : १ केरल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : १ राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष : १, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पक्ष : १, शिरोमणी अकाली दल : १ सिक्कीम पार्टी : १, युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल : १, झोराम पीपल्स मूव्हमेंट : १, अपक्ष : ७ या ७ अपक्ष सदस्यांमध्ये. विशाल प्रकाशबापू पाटील, राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव, अमृतपाल सिंह, सरबजीत सिंह खालसा, उमेशभाई बाबूभाई पटेल, अब्दुल रशीद शेख आणि मोहम्मद हनीफा यांचा समावेश आहे.
चौकट
सात राज्याची लोकसंख्या खालील प्रमाणे :
उत्तर प्रदेश २४ कोटी, पश्चिम बंगाल १० कोटी, बिहार १३ कोटी, मध्य प्रदेश ९ कोटी, राजस्थान ८.५ कोटी, गुजरात ७.५ कोटी, हिमाचल प्रदेश ७५ लाख
भारताची लोकसंख्या १४२ कोटी जवळपास आहे. आणि या ७ राज्याची लोकसंख्या ८१+ कोटी भरत आहे. आता डिलिमिटेशन बिल पास झाले तर लोकसंख्येच्या अनुपात भारताच्या २८ राज्यांपैकी फक्त ७ राज्यांना जवळपास ६० टक्के प्रतिनिधित्व जाईल. बहुसंख्य बनण्याच्या आकड्यापेक्षा जास्त आकडा फक्त ७ राज्यात मिळवता येऊ शकतो. २८ पैकी २१ राज्यात भाजप हरला तरी तो या ७ राज्याच्या भरवशावर कायम सत्तेत राहु शकतो. उर्वरित राज्यात नावाला दरवर्षी मतदान तर पार पाडले जाईल परंतु शासक बदलण्याचा अधिकार मात्र शिल्लक राहणार नाही. ही सात गायपट्टातील राज्यात लोक अन्न, वस्र, निवारा मागत नाही. त्यांना पाहिजे जात धर्माची कट्टरता आणि पोटाला पोटभर शेण आणि गोमूत्र. ही गायपट्टातील भौतिक विकासाची दुश्मन जनता संपुर्ण भारताचं भवितव्य हिरावून घेणार आहे. डिलिमिटेशन म्हणजे उर्वरित भारताचा मतदानाचा अधिकार तर असणार पण फायदा मात्र शून्य!
No comments:
Post a Comment