Sunday, 22 November 2026

सोनिया मनेका संबंध अन् राहुलचा भाऊ.....!

सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र, "बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह,....!" नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात सोनिया यांनी स्वतःशी अन् गांधी कुटुंबाशी संबंधित अनेक आठवणी सांगितल्यात. अशीच एक कहाणी आहे धाकटी सून मनेकाबद्दल. जेव्हा मनेका आनंद 'धाकटी सून' म्हणून गांधी कुटुंबात आली, तेव्हा ती १८ वर्षांची होती. घरात धाकटी सून असणं हा सोनियांसाठी एक अद्भुत अनुभव होता, पण नंतर त्यांचे नातं बिघडलं. संजय गांधींची पत्नी, मनेका गांधी, घर सोडून गेली. सोनियांनी मनेकाच्या गांधी कुटुंबातल्या आगमनाची, त्यांच्यात हळूहळू वाढत गेलेल्या दुराव्याची कहाणी मांडलीय. 
१९७३ च्या अखेरीस, संजय गांधी मनेका नावाच्या एका अतिशय सुंदर, उत्साही मुलीला भेटले, जी संजयपेक्षा १० वर्षांनी लहान अन् अल्पवयीन होती. एका वर्षाच्या आत त्यांचं लग्न झालं. मनेका गांधी कुटुंबाचा एक भाग बनली. मनेका खूप उत्साही, बोलकी मुलगी होती, नेहमी उत्साहानं भरलेली. सुरुवातीला, घरात एक धाकटी जाऊ असणं खूप छान वाटलं. कधीकधी, मला आंटी एमीच्या खोलीतून तिच्या हसण्याचा आवाज ऐकू यायचा. मी तिथं जाऊन विचारायचे की, हा सगळा विनोद कशाबद्दल आहे आणि मग तिथं बसून तिचं बोलणं  ऐकायचे, मग ते तिच्या मित्रांबद्दल असो किंवा ती वाचत असलेल्या पुस्तकाबद्दल....! प्रियांका  मनेकाच्या खोलीत बसायची. तिनं सांगितलेल्या गोष्टींमध्ये रमून जायची. पण संबंधात कटुता कशी आली? यावर सोनिया लिहितात, 'हळूहळू घरातले वातावरण बदलू लागलं, चिडचिड निर्माण होऊ लागली. याची सुरुवात दोन्ही सुनांना दिल्या जाणाऱ्या नावांवरून झाली...!' घरातले नोकरचाकर थोरली सून सोनिया हिला 'बहुरानी' म्हणत, तर धाकट्या मुलाची पत्नी असलेल्या मनेकाला 'छोटी बहू' म्हटलं जात असे. इंदिराजीं त्या दोघींनाही 'घरातील समान मुली' मानत, पण त्या म्हणतात की, मनेकाला कदाचित हा अनादर वाटला असावा. 
सोनिया आठवण सांगतात, 'जेव्हा मनेका उद्धटपणे बोलायची, तेव्हा शांतता राखण्यासाठी मी अनेकदा गप्प राहायचे. पण जेव्हा मला वाटायचं की, गोष्टी खूपच हाताबाहेर गेल्यात, तेव्हा मी मागं हटायचं नाही आणि कठोरपणे प्रत्युत्तर द्यायचं....!' संजय आणि मनेका यांच्यातले मतभेद त्यांच्या बेडरूमच्या बाहेर पडत होते, कारण त्यांचे वाद अधिक तीव्र अन् तापदायक होत गेले होते. राग आल्यावर मनेका शिवीगाळ करायची. अगदी तिच्या सासूबाईंसमोर सुद्धा, घरात कोणीही तशी भाषा वापरत नसे. यामुळे त्यांना लाज वाटायची. आम्हा सर्वांना आश्चर्य वाटायचं. एका मनमिळाऊ, समाजात मिसळणाऱ्या तरुण मुलीला, एकत्र कुटुंबात राहणं अजिबात सोपं नसावं. मनेकाला गांधी कुटुंबाचं घर कंटाळवाणे अन्  शिस्तबद्ध वाटलं असावं, कारण प्रत्येकजण नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असायचा. असं दिसतं की, जेव्हा ती संजय सोबत राजकीय कार्यक्रमांना, समारंभांना उपस्थित राहू लागली, तेव्हाच ती या वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेऊ शकली. मात्र, मनेकाचा संजयवरचा प्रभाव त्याच्या आणि त्याचा भाऊ राजीव यांच्या नात्यात अडथळा आणू लागला. सोनियांच्या मते, जे भाऊ कधीही वेगळे झाले नव्हते, त्यांच्यातले संबंध बिघडले.
मार्च १९७७ मध्ये आणीबाणी संपल्यानंतर लगेचच, काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. इंदिराजीं अन् संजय दोघेही आपापले रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ हरले. आणीबाणीला संजयलाच मुख्य गुन्हेगार म्हणून पाहिलं जाऊ लागल्यानं, त्यानं त्याकाळात मुलाखतींमधून नोकरशाहीच्या सुस्त कामकाजावर आपली मतं व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यानं अशी विधानं केली, ज्यांचा अर्थ 'पंतप्रधानांवरची टीका' असा लावला जाऊ शकत होता. संजयच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना पक्षातल्या काही गटांमध्ये पाठिंबा मिळू लागला, जे इंदिराजींना आवडलं नाही. त्यांच्या आईला वाटत होतं की, मनेका संजयच्या कारवायांना प्रोत्साहन देताहेत. त्यांनी कॅबिनेट सचिव पी. एन. धर यांना आपल्या तरुण सुनेबद्दल सांगितलं, 'तिला आतापासूनच पंख फुटू लागलेत....!' जेव्हा राजीवना वाटलं की, १९७८ च्या निवडणुकीच्या निकालांसाठी संजय जबाबदार आहे, तेव्हा मनेका यांचा कुटुंबाप्रतीचा विरोध आणखी वाढला. संजयच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं  गेलं. त्यांना वाटत होतं की, या निकालांमध्ये संजयची मोठी भूमिका होती. त्याचा हट्टीपणा, घाई, अविचारी कार्यक्रम राबवण्याची घाई, चांगल्या हेतूने दिलेला सल्ला न ऐकण्याची वृत्ती आणि काही वेळा आईच्या नकळत निर्णय घेणं....! एका कौटुंबिक संभाषणादरम्यान राजीव रागाने म्हणाले, संजय, मी तुला माफ करू शकत नाही...! तुम्ही आईला या अवस्थेत आणलंय.....! माझी सासू, जी खूप अस्वस्थ आणि संतप्त होती, तिनं राजीवला पाठिंबा दिला. 'संजय, राजीव जे म्हणतोय ते खरं आहे! तू माझ्या नकळत किती वेळा आदेश दिले आहेतच...!' जेव्हा मनेकानं मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या सासूनं आवाज चढवला. ते खोटं असल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान दिलं. मनेका लगेच मागे हटली, पण तिचा आमच्याबद्दलचा द्वेष मात्र वाढतच गेला....! सोनियाच्या मते, मनेकाची उपहासात्मक टिप्पणी सतत त्रासाचं कारण बनली होती. तिच्या नजरेत आम्ही शत्रू होतो. तिच्या संपर्कात असलेल्या पत्रकारांमार्फत आमच्याबद्दल सर्व प्रकारच्या अफवा पसरवल्या. दुःखदायक गोष्ट म्हणजे, निवडणूक हरल्यानंतर मी आणि राजीव देश सोडून पळून जाण्याचा विचार करत आहोत, ही खोटी गोष्ट पसरवली! संजयच्या मृत्यूनंतर कुटुंबात फूट पडली! २३ जून १९८० रोजी विमान अपघातात संजयच्या मृत्यूनंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली. मनेकासाठी राजकीय पदाची मागणी करण्यासाठी मनेकाची आई संजयच्या निष्ठावंतांना भडकवत होती. पण इंदिराजीं वाटलं की, २३ वर्षांची मनेका नेतृत्वाची भूमिका देण्यासाठी खूप लहान आणि अपरिपक्व आहे. शिवाय, त्यांना तीन महिन्यांचं बाळ होते, ज्याकडं त्यांना लक्ष देणं आवश्यक होतं. त्यांनी थोडा संयम ठेवायला हवा होता; त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ होता. पण हे स्पष्ट झालं की, त्यांचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं.
मार्च १९८१ मध्ये परिस्थिती आणखी बिघडली, जेव्हा मनेकाने फिरोज वरुण गांधीचा पहिला वाढदिवस वसुंधरा राजे यांच्या घरी साजरा केला. वसुंधरा राजे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कट्टर समर्थक आणि इंदिराजींच्या राजकीय विरोधक होत्या. नंतर, जेव्हा तिची सासू लंडनला गेली होती, तेव्हा मनेकाने घरातून आपले सामान हलवायला सुरुवात केली. परत आल्यावर, इंदिराजींनी नाराजी व्यक्त केली आणि मनेकासमोर एक पर्याय ठेवला. 'एकतर तू इथेच राहा, नाहीतर तू दुसरीकडे जाऊन राहू शकतेस....!' मनेकाने आरोपांनी भरलेले एक पत्र पुन्हा पाठवलं, ज्याचा उद्देश स्पष्टपणे तिच्या सासूला बदनाम करणं हा होता. तिला मोठा गदारोळ निर्माण करायचा होता, जेणेकरून घर सोडताना ती सोनियावर जाहीरपणे दोषारोप करू शकेल. तिनं ही योजना काही आठवडे आधीच एका पत्रकार मित्राला सांगितली होती. मनेकाच्या जाण्याने जेव्हा वाद निर्माण झाला, तेव्हा राजीव आणि सोनिया घरी नव्हते. तरीही, दोष त्या दोघांवर टाकण्यात आला. ज्या प्रकारे संपूर्ण घटनेला चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले, त्यानंतर जे प्रसिद्धीचे नाट्य घडले, त्यामुळे या कुरूप घटनेला आजच्या भाषेत 'रिॲलिटी शो' म्हटले जाईल. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, गांधी कुटुंबाने वरुणला भेटण्याच्या हक्कासाठी मनेकाविरुद्ध कायदेशीर लढा दिला, परंतु तिच्या आईने त्याला परवानगी देण्यास नकार दिला. मनेकाला कुटुंबापासून वेगळं करण्याच्या तिच्या योजनेत तिच्या जवळचे पत्रकारही सामील होते. संजय गांधींच्या मृत्यूनंतरच्या घटनांचा संदर्भ देत सोनियांनी लिहिलंय की, संजयच्या मृत्यूनंतर, मनेकाची आई काँग्रेसमधील संजयच्या निष्ठावंतांना मनेकासाठी पदाची मागणी करण्यास प्रवृत्त करत होती. कदाचित त्यांना भीती वाटत होती की, या बाजूमुळे त्यांना बाजूला सारले जाईल. संजय जिवंत असताना त्यांना मिळालेली सत्ता त्या गमावून बसतील. संजयच्या मृत्यूनंतर एका आठवड्याच्या आत, मनेकाने, जी तिच्या आईच्या जवळची एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित पत्रकार होती, तिच्याबद्दल त्यांच्या स्तंभात लिहिले, तिला 'संजयच्या राजकीय प्रतिमेची एकमेव संभाव्य उत्तराधिकारी' म्हटलं...!' स्पष्टपणे, ही एक सुनियोजित योजना होती. इंदिराजींचा विश्वास होता की; वयाच्या २३ व्या वर्षी, मनेका नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी खूपच लहान आणि अपरिपक्व होती. शिवाय, तिला तीन महिन्यांचे बाळ  होतं आणि तिनं  त्या लहान बाळावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं. तिनं संयम बाळगायला हवा होता, तिच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुढे भरपूर वेळ होता. पण हे स्पष्ट झालं की, तिची नजर दुसरीकडेच होती. मनेकाच्या राजकीयपद मिळवण्याच्या घाईच्या प्रयत्नामुळे माझ्या सासूबाई खूप अस्वस्थ झाल्या. मार्च १९८१ मध्ये जेव्हा लहान फिरोजचा पहिला वाढदिवस जवळ आला, तेव्हा माझ्या सासूबाईंनी मनेकाच्या काही मैत्रिणी आणि त्यांच्या मुलांसोबत एक छोटी पार्टी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला. तथापि, त्यांचा प्रस्ताव नाकारण्यात आला. नंतर त्यांना कळलं की, त्यांच्या नातवाची वाढदिवसाची पार्टी झाली होती, पण ती वसुंधराराजे यांच्या घरी....! वसुंधराराजे शिंदे या ग्वाल्हेरच्या राजमातेच्या कन्या होत्या. त्या संघाच्या कट्टर समर्थक, श्रीमती गांधींच्या राजकीय विरोधक होत्या. हे त्यांना दुखावण्याच्या स्पष्ट हेतूने केलं गेलं होतं. नंतर, वसुंधराने एक असं काम घडवून आणलं, ज्यामुळे माझ्या सासूबाईंच्या या गाढ संशयाला दुजोरा मिळाला की, मनेका घर सोडून जाण्याचा विचार करत होती. हे काम म्हणजे, राजमातेच्याशी संबंधित असलेल्या एका जवळच्या सहकाऱ्याला 'सूर्य' हे मासिक विकलं होतं. माझ्या सासूबाईंसाठी, हे केवळ त्यांच्याच नव्हे, तर त्यांच्या मुलाच्या, वडिलांच्या आणि संघाच्या जातीयवादी विचारसरणीविरुद्ध शौर्याने लढलेल्या त्या सर्वांच्या स्मृतीचा अपमान करण्यासारखे होते....! 
चौकट.....
राहुलचा थोरला भाऊ..... 
सोनियांच्या आत्मचरित्रात पहिल्या मुलाचा उल्लेख आहे, हे त्यांचे अन्, राजीव यांचे पहिलं मूल होतं, ज्यांना या दांपत्याने राहुलच्या जन्माआधी गमावलं होतं. सोनिया लिहितात की, 'ही दुर्दैवी घटना जानेवारी १९६९ मध्ये घडली होती. याच्या काही महिने आधी जेव्हा ती गर्भवती असल्याच्या वृत्तानं गांधी कुटुंबात आनंदाची लाट पसरली होती. लोकांसमोर आपल्या भावना उघडपणे न व्यक्त करणाऱ्या इंदिराजीं यांनीही या बातमीचं उत्साहात स्वागत केलं होतं अन् सुनेला मिठी मारली होती. इंदिराजीं आनंदानं म्हटलं होतं की, एक मोठं मूल दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. नियोजित वेळेच्या सुमारे दोन महिने आधीच सोनियांना प्रसववेदना सुरू झाल्या. १८ जानेवारी १९६९ रोजी त्यांनी एका मुलाला जन्म दिला. अपूर्ण महिन्याचा प्री-मॅच्युर असला तरी, नवजात बालक पाहताना निरोगी दिसत होतं. जेव्हा त्या बाळाला इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आलं, तेव्हा मी त्याच्या रडण्याचा पहिला आवाज ऐकला. नंतर राजीव मला त्याला दाखवायला घेऊन गेले, गर्द काळे केस आणि लांब, बारीक बोटांचे एक छोटेसं सुंदर बाळ होतं ते, पाहताच त्याच्यावर अफाट प्रेम जडलं. परंतु तो चिमुकला जीव केवळ काही तास जगू शकला. डॉक्टरांनी राजीवना आधीच सावध केलं होतं की, बाळ वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा या दांपत्याला बाळ नसल्याची बातमी मिळाली, तेव्हा दोघेही तीव्र धक्क्याखाली गेले. नेहमी संयमी राहणारे राजीवही स्वतःला रोखू शकले नाहीत.ते त्यांच्यासोबत हुंदके देऊन रडू लागले. त्यावेळी दौऱ्यावर असलेल्या इंदिराजीं दौरा सोडून रुग्णालयात पोहोचल्या. बाळ गेल्यानंतर कुटुंबासमोर हा प्रश्न उभा ठाकला की, त्याचे अंत्यसंस्कार कसे करावेत. पारंपरिकरित्या जेव्हा बाळाचं पार्थिव नदीत विसर्जित करण्याची चर्चा निघाली, तेव्हा त्या घाबरल्या. दिल्लीच्या ओखला बॅरेजजवळ एक मृतदेह अडकलेला पाहिल्याची जुनी आठवण जागी झाली. त्यांनी सांगितलं की, काहीही झालं तरी मी बाळाला नदीत टाकू देणार नाही. यानंतर कुटुंबानं ठरवले की, बाळाला दिल्लीतील फिरोज गांधी यांच्या फार्मवर पुरण्यात येईल. राजीव आणि संजय यांनी मिळून गुलाबी बोगनवेलीच्या झुडुपाखाली त्या चिमुकल्या बाळाला पुरलं. हा निर्णय अत्यंत वेदनादायी होता. त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत जेव्हा कधी ते तिथं जात, तेव्हा त्या जागेवर आवर्जून फुलं वाहत असत. या वैयक्तिक दुःखात सोनिया अनेक महिने दुःख, आत्मक्लेशामध्ये राहिल्या. त्याचवर्षाच्या शेवटी सोनिया पुन्हा गर्भवती झाल्या. मात्र, मागील घटनेच्या धक्क्यामुळे कुटुंबानं उत्सव साजरा करण्याऐवजी यावेळी चिंता व्यक्त केली. शेवटी, १९ जून १९७० रोजी राहुलचा जन्म झाला आणि कुटुंबाची ही चिंता दूर झाली!
हरीश केंची,
९४२२३१०६०९.


No comments:

Post a Comment

निवडणूक आयोगाचं वस्त्रहरण...!

"निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. केलेल्या एसआयआरमधून १३ कोटी मतदार वगळले गेलेत. त्यावर काहूर माजलंय. त...