Sunday, 22 November 2026

प्रधानमंत्री मनमोहन सिंग

हजारो जवाबों से अच्छी हैं मेरी खामोशी
ये जब्र भी देखा है तारीख की नजरों ने l
लम्हों ने खता की थी सदियों ने सजा पायी ll
प्रख्यात शायर मुजफ्फर रज्मी यांचा एक शेर मनमोहन सिंग अनेकदा भाषणांत सांगायचे. तो त्यांच्या बाबतीतही खरा ठरला. त्यांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या छोट्या छोट्या चुका फार मोठ्या ठरल्या. आज देशाला त्याची किंमत चुकवावी लागतेय. तो शेर होता, 'सध्याच्या माध्यमांपेक्षा, विरोधकांपेक्षा इतिहास हा माझ्याकडे अधिक कनवाळूपणे पाहील, अशी माझी अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सरकारी यंत्रणेत नेमकं काय घडत असतं, हे काही मी उघड करू शकत नाही. पण सध्याची परिस्थिती आणि आघाडी सरकारमधे काही तडजोडी कराव्याच लागतात. त्याचा विचार करता, मला जेवढं शक्य होतं. तेवढं मी खरोखरच केलंय....!' ती डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून शेवटची प्रेस कॉन्फरन्स ठरणार होती. काळ आपल्याला न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त करणारं त्यांचं वाक्य त्या पत्रकार परिषदेतल्या अनेकांच्या मनात रूतलं. पण ते फारसं कुणी गांभीर्याने घेतलं नाही. ३ जानेवारी २०१४चं वातावरणच तसं होतं. चारही बाजूंनी पंतप्रधानांवर टीका होत होती. भ्रष्टाचाराच्या एकामागून एक प्रकरणांमुळे त्यांच्या सरकारची प्रतिमा डागाळलेली होती. देशभर आंदोलनं सुरू होती. देशातल्या पाच प्रमुख राज्यांच्या निवडणुकांत काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. त्यांचा स्वतःचा काँग्रेस पक्षही त्यांच्यासोबत ठामपणे उभा असल्यासारखा वाटत नव्हता. अशावेळेस मनमोहन सिंग पत्रकार परिषदांना आपल्या परीने ठामपणे सामोरे जात होते. आपल्याला योग्य वाटतील ती उत्तरं मोकळेपणाने देत होते. सातत्याने वाभाडे काढणाऱ्या पत्रकारांचंही लोकशाहीतलं महत्त्व त्यांना मान्य होतं. त्यांच्याकडे अमोघ वगैरे वक्तृत्व नव्हतंच. पण ते मनापासून बोलायचे. हे वाक्य तर ते फारच मनापासून बोलले होते. मनमोहन सिंग म्हणाले ते इतक्या लवकर खरं होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. ते सिद्ध करण्याचं श्रेय सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यावं लागतं. एखादी रेष छोटी करण्यासाठी आपण एक मोठी रेष आखावी, असं सांगितलं जातं. पण मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या १०-१२ वर्षात आपली रेष इतकी छोटी केलीय, की मनमोहनसिंगांची रेष अचानक मोठी वाटायला लागलीय. आता हा मोदींचा करंटेपणा आहे की मनमोहनसिंगांचं कर्तृत्व? पण बहुतेक हे दोन्ही असावं. मनमोहनसिंग सोशल मीडियावर टिंगल टवाळी आणि त्याहीपुढे जाऊन द्वेषाचा विषय बनले होते. त्याच मनमोहनसिंगांचा वाढदिवसाच्या २६ सप्टेंबरला झाला. तेव्हा त्यांच्या कारकीर्दीचं कौतूक करणारे मॅसेज व्हॉट्सअपवरून फिरत होते. त्यांना शिव्या घालणारे लोकच ते मॅसेज उत्साहाने फॉरवर्ड करत होते. 
या २६ सप्टेंबरला मनमोहनसिंग ९४ वर्षांचे झाले असते. पण त्यांचा खरा जन्मदिवस कुणालाच माहीत नाही. त्यांचं गाव दूर आजच्या पाकिस्तानात. इस्लामाबादपासून साधारण १०० किलोमीटर अंतरावरचं. शेतकऱ्यांच्या त्या गावात तेव्हा ना वीज होती, ना रस्ते, ना कोणत्या सुविधा. वडील गुरमुख सिंग चारशे किलोमीटर दूर पेशावरमधे सुकामेवा व्यापाऱ्याकडे हिशेब लिहायचे. आई अमरित कौर गाहमधेच. मोठा मुलगा लहान असतानाच दगावला होता. तसंच हा मुलगाही जगेल वाचेल माहीत नव्हतं. त्यामुळे त्याच्या जन्मतारखेचा हिशेब कोण ठेवणार?  पण तो मुलगा जगला. त्याची आई जगू शकली नाही. मनमोहन अवघ्या चार वर्षांचे असताना त्यांची आई वारली. आईविणा आणि बापाशिवाय वाढणाऱ्या पोराला संत सिंग आणि जमना देवी या आजी आजोबांनी खूप जीव लावला. आज आजोबांना लिहितावाचता येत नव्हतं. पण नातवाला चार वर्षांचा असतानाच गुरुद्वारात गुरुमुखी शिकायला पाठवलं. पुढच्याच वर्षी उर्दू शाळेत घातलं. रजिस्टरमधे आजही त्याची नोंद सापडते. नंबरः १८७. वडिलांचं नावः गुरमुख सिंग. जातः कोहली. धंदाः दुकानदार. तारीखः १७ एप्रिल १९३७. 
मनमोहन यांचे गाहमधले बालपणीचे मित्र अजूनही त्यांची आठवण काढतात. त्यांचा जन्म झाला ते घर आज काही अस्तित्वात नाही. ते गुरुमुखी शिकले त्या गुरुद्वाराचं कधीचंच सरकारी ऑफिस बनलंय. आणि उर्दू शिकले त्या शाळेचं नाव बदललंय. पाकिस्तान सरकारनेच नवं नाव ठेवलंय, `मनमोहन सिंग गवर्न्मेंट बॉइज प्रायमरी स्कूल`. त्या गावाला भेट देणारे परिचित त्यांच्यासाठी काहीतरी आठवणी घेऊन येतात. गावच्या शेतांचं एक जलरंगातलं चित्र तर थेट मुशर्रफांनी त्यांना भेट दिलंय. ते त्यांच्या बेडरूममधे आहे. पण फाळणीनंतर मनमोहन परतून कधीच गाहला गेलेले नाहीत. अनेकदा ते तिथे जाता जाता राहिले. अनेकदा जाण्याची इच्छाही व्यक्त केली. पण ते गेले नाहीत. त्याचं कारण होतं. त्यांच्यावर जिवापाड प्रेम केलेल्या आजोबांची तिथे हत्या झाली होती. 
आजोबांना फक्त शेतीच यायची. पण जमीन जास्त नव्हती. व्यापारी जातीचे असल्यामुळे जमीन विकत मिळायचीही नाही. त्यामुळे उत्पन्न नव्हतं. मनमोहनला शिकवणं ऐपतीपलीकडे होतं. त्यामुळे त्यांचा प्रवास आधी काकांकडे चकवाल आणि पुढे पेशावरपर्यंत झाला. तिथे वडिलांनी नवं बिऱ्हाड केलं होतं. १९४७ च्या मार्चला त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. तेव्हाच गाहमधे हिंदू आणि शिखांच्या कत्तली झाल्या. ८० घरं जाळली. ३० जणांना ठार केलं. त्यात मनमोहन सिंगांचे आजोबाही होते. एका मुस्लीम कुटुंबाने आधार दिला म्हणून आजी वाचली. मनमोहन सिंगांच्या वडिलांना आपल्या हुशार पोराला डॉक्टर बनवायचं होतं. मनमोहन सिंगांनी त्यासाठी ॲडमिशन घेतलं. पण ते जमलं नाही. ते हिंदू कॉलेजमधे इकॉनॉमिक्स शिकण्यात रमले. क्रिकेट, हॉकी, फूटबॉल खेळणं. वादविवाद स्पर्धांमधे भाग घेणं. कॉलेज मॅगझिनचं संपादन करणं. राममनोहर लोहिया, अरुणा आसफ अली यांच्याबरोबरच पंतप्रधान पंडित नेहरू आणि उपपंतप्रधान सरदार पटेल यांची भाषणं ऐकणं. पंजाबी उर्दू साहित्यिकांना भेटणं. त्यांचं वाचणं. असं ते कॉलेज लाईफ एन्जॉय करत होते. मनमोहन सिंग यांची मुलगी दमन सिंग यांनी `स्ट्रिक्टली पर्सनल` या नावाने त्यांच्यावर चरित्रवजा पुस्तक लिहिलंय. त्यात या सगळ्याचं वर्णन आहे. त्यात दमन सिंग लिहितात, 'माझे वडील मैदानावर बॉलच्या मागे धावताहेत, असं चित्र मी डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. पण ते मला शक्य झालं नाही...' पण ते वादविवाद स्पर्धेत तावातावाने भाग घेत आहेत, हे चित्रही कुणाला पचण्यासारखं नाही. फक्त ते स्टुडंट्स युनियनच्या निवडणुकीत हरले होते, हे आपण सगळेच सहजपणे मान्य करू. आश्चर्य म्हणजे ते अकाली दलाच्या विद्यार्थी शाखेचे कार्यकर्ते होते. या सगळ्यात ते इकॉनॉमिक्स ऑनर्समधे बीए झाले. पहिले आले. युनिवर्सिटीने त्यांना स्कॉलरशिप दिली. त्याची त्यांना खूप गरज होती. 
पुढच्या शिक्षणासाठी पंजाब युनिवर्सिटीच्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटमधे होशियारपूरला पोचले. एमएला ते पुन्हा पहिले आले. केम्ब्रिज युनिवर्सिटी रिटर्न्ड प्राध्यापक डॉ. रांगणेकरांचा या नव्याकोऱ्या डिपार्टमेंटवर प्रभाव होता. त्यांच्याच आग्रहामुळे मनमोहन सिंगांनी केम्ब्रिज युनिवर्सिटीसाठी अर्ज केला. १९५५ ला मनमोहन सिंग केम्ब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधे जॉइन झाले. दोन वर्षांच्या शेवटी त्यांनी त्यांनी ट्रायपोस ही विशेष परीक्षा फर्स्ट क्लासमधे पास केली. ते त्यांच्यासारख्या हुशार मुलासाठी सोपं होतं. पण त्यांची नजर ॲडम स्मिथ प्राईजवर होती. सर्वोत्कृष्ट प्रबंध लिहिणाऱ्याला ते मिळत असे. १९५० च्या आधी फक्त एकाच भारतीयाला ते मिळालं होतं. मात्र ५० च्या दशकात तीन भारतीयांनी त्यावर आपलं नाव कोरलं. अमर्त्य सेन, जगदीश भगवती आणि मनमोहन सिंग. न्यूजवीकचे माजी संपादक फरीद झकेरिया यांच्याशी बोलताना जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती यांनी नोंदवलंय, 'केम्ब्रिज युनिवर्सिटीत शिकत असताना  एका गरीब खेडवळ कुटुंबातल्या या मुलाची एक गोष्ट मला भावली. ती दररोज भल्या पहाटे चार वाजता तो थंड पाण्याने आंघोळ करत होता. तेही इंग्लंडच्या थंडीत. तेव्हाच मला वाटलं होतं, हा मुलगा फार मोठ्या उंचीवर पोचेल....!' मनमोहन सिंग फार मोठ्या उंचीवर पोचले. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर मनमोहन सिंगांची उंची फारच मोठी झालीय. नोटबंदीनंतर मनमोहन सिंगांनी राज्यसभेत जोरदार टीका केली. ही संघटित लूट असल्याचं सांगितलं. यातून अराजकाशिवाय काहीच हाती लागणार नाही, असं सांगितलं. ते सारं खरं ठरलं. पण मोदी रागावले होते. ते राष्ट्रपतींच्या भाषणावरच्या या चर्चेला हजरच राहिले नाहीत. शेवटच्या दिवशी उगवले आणि मनमोहन सिंगांवर टीका केली, 'रेनकोट घालून बाथरूममधे शॉवर घेण्याची कला डॉक्टर साहेबांसारखी दुसऱ्या कुणालाच अवगत नाही. इतका भ्रष्टाचार झाला. पण त्यांच्यावर एकही शिंतोडा उडाला नाही...!' 
नरेंद्र मोदींनी ही टीका करण्याआधी त्यांचे गुरुजी जगदीश भगवतींकडून मनमोहन सिंगांच्या केम्ब्रिजमधल्या आंघोळीची कहाणी ऐकायलाच हवी होती. मनमोहन सिंगांनी चहा विकला नव्हता. पण फक्त गरिबीच नाही, तर आपल्या घरातून बेघर, गावातून परागंदा होण्याचं दुःखही त्यांनी पचवलं होतं. फक्त त्याचं मार्केटिंग त्यांना करता आलं नाही. तो त्यांचा स्वभाव नव्हता. तो त्यांचा संस्कारही नव्हता. खूप कष्ट करून मिळवलेल्या विद्वत्तेने नम्रताही कमावली होती. केम्ब्रिजमधून परतल्यावर ते पंजाब युनिवर्सिटीत प्राध्यापक झाले. चंदीगड या नव्या शहरात रुळले. गुरुशरण कौर या उच्चशिक्षित आणि स्वतःची मतं असणाऱ्या मुलीबरोबर त्यांचं अरेंज्ड लग्न झालं. पुढे १९६२ ला ऑक्सफर्डमधून त्यांनी डॉक्टरेट केलं. त्यांचा विषय होता, 'इंडियाज एक्स्पोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स!' तेव्हा देश स्वावलंबी बनण्याच्या पलीकडे विचार करत नव्हता. मनमोहन मात्र काळाच्या पुढे होते. ते निर्यातीच्या दिशा शोधत होते. १९६६ मधे ते जिनिवा येथील संयुक्त राष्ट्राच्या व्यापार अन् विकास परिषदेत म्हणजे यूएनसीटीएडी मध्ये रुजू झाले. पण तीनच वर्षांनी त्यांना दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधे बोलावणं आले. परदेशातलं इतकी चांगली संधी सोडून ते मायदेशात परतले. 
त्यानंतर तीन वर्षांनी ते विदेश व्यापार खात्याचे आर्थिक सल्लागार बनले. गरिबी हटावचा नारा देऊन इंदिरा गांधी सत्तेत आल्या होत्या. त्यांना देशाचं अर्थकारण बदलायचं होतं. त्या वाटेवर मनमोहन सिंग सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अर्थखात्याचे मुख्य आर्थिक सल्लागार, अर्थखात्यात सचिव, अणुऊर्जा आयोगाच्या वित्त खात्याचे सदस्य, अंतरिक्ष आयोगाच्या वित्त खात्याचे सदस्य, नियोजन आयोगाचे सदस्य बनले. पुढे सरकारं बदलत गेली. पण ते रिझर्व बँकेचे गवर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, साऊथ कमिशनचे सेक्रेटरी जनरल आणि कमिशनर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, यूजीसीचे चेअरमन बनले. राजीव गांधींची हत्या झाली नसती तर त्यांच्या मंत्रिमंडळात मनमोहन सिंग अर्थमंत्री असले असतेच, असं म्हणतात. अर्थात ते नरसिंह राव यांनी केलं. राव पंतप्रधान बनल्यावर कॅबिनेट सचिव नरेश चंद्रा यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल मांडला. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. नरसिंह राव यांनी आपल्या दीर्घ कारकीर्दीत सगळी महत्त्वाची खाती भूषवली होती. पण ते कधीही अर्थमंत्री झाले नव्हते. त्यांना आय.जी. पटेल अर्थमंत्री म्हणून हवे होते. पण पटेलांना बडोद्याला जाऊन म्हाताऱ्या आईची सेवा करायची होती. तेव्हा पी.सी. अलेक्झांडर यांनी मनमोहन यांचं नाव सूचवलं. अलेक्झांडर यांनी ती ऑफर देणारा फोन केला. पण तेव्हा मनमोहन विदेशवारी करून नुकतेच झोपले होते. त्यांचा त्यावर विश्वास बसला नाही. मंत्रिमंडळ शपथविधीला तीन तास बाकी असताना यूजीसीच्या ऑफिसात पंतप्रधानांनी फोन केला. तेव्हा ते धावतपळत शपथविधीसाठी आले. शपथ घेण्याआधी नरसिंह रावांनी मनमोहन सिंगांना सांगितलं होतं, 'यात आपण यशस्वी झालो, तर यशाचं श्रेय आपल्या दोघांनाही मिळेल. आणि अपयश आलं तर त्याचं अपश्रेय फक्त तुम्हालाच असेल...!' पण मनमोहन सिंगांना आर्थिक स्थितीचा चांगलाच अंदाज होता. स्वतःवर भरोसा होता. २४ जुलै १९९१ ला मनमोहन सिंगांनी आपलं पहिलं बजेट सादर केलं. त्याचा शेवट त्यांनी असा केला, `विक्टर ह्युगोने म्हटलंय नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप ॲन आयडिया व्हूज टाइम हॅज कम. मी सभागृहाला सांगू इच्छितो, भारताचा जगातली महत्त्वाची आर्थिक सत्ता म्हणून उदय ही एक तशी आयडिया आहे. अख्ख्या जगाला आता खणखणीत ऐकू दे की, भारत आता सताड जागा झालाय. आम्ही आता जिंकणार आहोत. आम्ही अडचणींवर मात करणार आहोत...'
मनमोहन सिंगांनी आणलेल्या उदारीकरणाने क्रांती घडवली. भारतात सगळी उलटापालट झाली. नव्या विचारांचं वारं फिरू लागलं. नवा मध्यमवर्ग तयार होऊ लागला. भारत एक आर्थिक सत्ता म्हणून जगाला दखल घ्यायला लावू लागली. त्यांनी चार्ली रोज या अमेरिकी टॉक शो प्रेझेंटरला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, 'भारतात १९९१ला आयटी इंडस्ट्री एकाएकी उफाळून येण्याचं एकमेव कारण म्हणजे या उद्योगावर बसवलेला प्रॉपर्टी टॅक्स मागे घेण्यात आला. ती उद्योजकांसाठी मोठीच डोकेदुखी होती. हा कर मागे घेतल्यानंतर उद्योजकांमधील ऊर्जा एकदम जागृत झाली. त्यांच्या कौशल्याला संपत्तीची जोड मिळाल्याने उद्योग वेगाने भरभराटीला जाऊ लागले. आजचे नारायण मूर्ती आणि अजीज प्रेमजींसारखे आयटी जायंट उदारीकरणाचे पहिली अपत्यं आहेत. भारताची सक्सेस स्टोरी इथून सुरू होते...!' आर्थिक उदारीकरणाचा प्रयोग यशस्वी होऊनही मतदारांनी नरसिंह रावांना निवडणुकीत पाडलं. त्यानंतर डावी उजवी सरकारं आली. पण मनमोहन सिंगांनी आखून दिलेल्या आर्थिक सुधारणांच्या रस्त्यावरूनच सगळ्यांना जावं लागलं. मनमोहन राज्यसभेत खासदार होतेच. शिवाय त्यांनी १९९९ ची लोकसभा निवडणूकही लढवून पाहिली. निवडणूक लढवण्याचं तंत्र त्यांना अवगत नव्हतंच. शिवाय काँग्रेसच्या लोकांनीच त्यांचा घात केला. दक्षिण दिल्लीत भाजपच्या विजय मल्होत्रा यांनी मनमोहनसिंगांचा ३० हजार मतांनी दणदणीत पराभव केला. अर्थात त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रगतीवर काही दुष्परिणाम झाला नाही. ते ९८ पासूनच राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेते होते. त्या पदावर ते पंतप्रधान बनेपर्यंत राहिले. 
मनमोहन सिंग पंतप्रधान बनणं हा एक चमत्कारच होता. असे चमत्कार भारतीय राजकारणात अनेकदा झालेत. पण एकदाही लोकांमधून थेट निवडून न आलेला रूढ अर्थाने राजकारणी नसणारा नेता पंतप्रधान पहिल्यांदाच बनत होता. सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारलं होतं. त्यांना आघाडीचं राजकारण सांभाळायचं होतं. अशा वेळेस सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, प्रामाणिक, निष्ठावान पर्याय म्हणून मनमोहन सोनियांच्या समोर आले असल्यास नवल नव्हतं. दरम्यानच्या काळात राजीव गांधी फाऊंडेशनच्या कामामुळे त्यांच्यात परस्परविश्वासही निर्माण झाला होता. सोनिया गांधी यांची निवड योग्यच होती हे मनमोहन सिंग यांनी सिद्ध केलं. किमान यूपीए १ मध्ये म्हणजे २००४ ते २००९ या कार्यकाळात. २००९च्या निवडणुकीत देशभरातल्या मतदारांनीही त्यावर शिक्कामोर्तब केलं. काँग्रेसला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळवून दिल्या. पण नंतर मात्र यशाचा तो टेम्पो शाबूत राहू शकला नाही. २०१४ पर्यंत देशाचं मन मोहणारे मनमोहन सिंग हे मौनमोहन सिंग ठरले होते. ते अशा चक्रव्यूहात अडकले होते की त्यातून बाहेर येणारी वाट फक्त पराभवाचीच होती. तरीही या दहा वर्षांत मनमोहन सिंगांनी खूप काही केलं. भारत निर्माण, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी सुधार योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, सर्व शिक्षा अभियानात केलेली दहापट तरतूद, आधार कार्ड आणि सर्वात महत्त्वाची अन्नसुरक्षा योजना. कुणीही बेरोजगार, अशिक्षित आणि भुकेलं राहू नये, यासाठी तिजोरीचा विचार न करता मनमोहन सिंगांनी बरंच काही घडवलं. केम्ब्रिज युनिवर्सिटीने आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर एक पुस्तक काढलंय. त्यात बीबीसीचे प्रतिनिधी म्हणून दीर्घकाळ काम केलेले सर मार्क टली यांनी मनमोहन सिंगांवर एक लेख लिहिलाय. त्याचं नाव आहे, 'आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया...!'. टली हे उगाच कुणाची स्तुती करणाऱ्यातले नाहीत. आज मागे वळून बघताना ती अतिशयोक्ती नसल्याचं वाटत राहतं. 
'अणुऊर्जा कार्यक्रम, जेनेटिकली मॉडिफाईड पिकं आणि अवकाश कार्यक्रम हाती घेतल्याशिवाय तरणोपाय नाही...!' अशी मांडणी डॉ. मनमोहनसिंग यांनी जानेवारी २०१३ला कोलकाता येथे झालेल्या इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेसच्या शंभराव्या अधिवेशनात केली होती. ही नव्या भारताची ब्ल्यू प्रिंट होती. त्यानुसार अवकाश कार्यक्रमातलं त्यांचं यश फारच महत्त्वाचं होतं. पण त्याचं श्रेय शास्त्रज्ञांना मिळालं. त्यामागची दूरदृष्टी असणाऱ्या मनमोहन सिंग यांना नाही. मनमोहन सिंग यांनी २०१२ च्या स्वातंत्र्यदिनी भारताच्या मंगळ मोहिमेची घोषणा केली. सव्वा वर्षात इस्रोने अवकाशात मंगळयान सोडलं. २२ ऑक्टोबर २००८ ला चांद्रयान एकचं यशस्वी उड्डाण झालं होतंच. त्यापेक्षा मोठं यश क्रायोजेनिक इंजिनांचं होतं. २५ डिसेंबर २०१०ला इस्रोने क्रायोजेनिक इंजिन असफल ठरल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने जीएसएलवी रॉकेट निर्मितीसाठी नवी समिती नेमली. तिने पुढचे एक हजार दिवस दिवसरात्र मेहनत घेतली. आणि जानेवारी २०१४ ला स्वदेशी बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन तयार केलं. त्यातून आपला जीसॅट १४ हा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडला. आर्थिक धोरण आणि त्यानुसार कार्यक्रम असेल तरच त्यातून परराष्ट्र धोरण तयार होतं, हे पंडित नेहरू यांचं वक्तव्य प्रसिद्ध आहे. मनमोहन सिंग यांचा तर तो अनुभवच होता. त्यातून त्यांची एक विजन तयार झाली होती. त्यांनी आर्थिक आघाडीवर केलेल्या कामापेक्षाही त्यांचं परराष्ट्र संबंधांवरचं काम अधिक मोलाचं ठरलं. 'सरहद्दी बदलत्या आल्या नाहीत, तरी त्या निरर्थक बनवता येतात...!' हा त्यांचा विचार मनमोहन ड्रॉक्ट्रिन म्हणून गाजला. फाळणीचं दुःख भोगलेले मनमोहन पाकिस्तानशी दोस्ती करण्यासाठी आग्रही होते. परवेझ मुशर्रफांसारख्या पाताळयंत्री राष्ट्राध्यक्षाबरोबर त्यांनी आपल्या चांगुलपणाच्या जोरावर विश्वास उभा केला होता. दोन्ही देशांच्या सीमांवरचे सैनिक मागे घेण्यात येतील. परस्परांमधे व्यापार सुरू होईल. अशा दिशेने त्यांनी पावलं टाकली. एप्रिल २००५ मुशर्रफ भेटीत श्रीनगर मुजफ्फराबाद बस सेवा सुरू केली. काश्मीरमधे गोलमेज परिषदा घेऊन फुटीरवाद्याशी चर्चा केल्या. पुढे २००८ ला मुशर्रफ यांचं सरकार पडलं. बेनझीर भुत्तो यांची हत्या झाली. इथे त्याच वर्षी मुंबईवर हल्ला झाला. त्यांच्याही प्रायोरिटी बदलल्या. त्यामुळे त्यांचे सारे प्रयत्न मातीमोल ठरले. पण त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचं मोल कमी होत नाही. ८ जानेवारी २००५ या दिवशी फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मनमोहन सिंगांनी हे स्वप्न मांडलं होतं. ते म्हणाले होते, 'मी अशा दिवसाचं स्वप्न पाहतो, जेव्हा आपण आपली राष्ट्रीय ओळख कायम ठेवून अमृतसरमधे नाश्ता, लाहोरमधे दुपारचं आणि काबूलमधे रात्रीचं जेवण घेऊ शकू. माझे पूर्वज असेच राहत होते. आपल्या नातवंडांनी पण अशाच जगात राहावं, ही माझी इच्छा आहे...!' 
मनमोहनसिंग २००५ ला अमेरिकेच्या भेटीवर गेले, तेव्हा रेड कार्पेट आणि २१ तोफांची सलामीने त्यांचं स्वागत झालं. भारत अमेरिका अणुकरार हे त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. ते नसते तर हा करार झाला नसता. शीतयुद्धानंतरच्या जगाचं भान त्यांना होतं. ते भान भारतातल्या डाव्यांना नव्हतं. त्यामुळे देशाच्या भल्याचा विचार करत ते कराराच्या बाजूने ठाम राहिले. त्यासाठी राजीनामा देऊ केला. पण आपल्याला हवं ते करून दाखवलं. शेवटच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मनमोहन यांना विचारलं, 'तुमच्या कारकीर्दीतला सर्वात महत्त्वाचा क्षण कोणता...?' त्यावर क्षणाचाही विलंब न लावता मनमोहनसिंग म्हणाले, 'भारत अमेरिका अणुकरार संसदेने संमत केला, तो ऐतिहासिक क्षण...!' जी ट्वेंटीमध्ये भारताचा प्रवेश मनमोहन सिंगांमुळेच सुकर झाला. पहिल्या दोन जी ट्वेंटी परिषदांमधे तर त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. लंडन येथे झालेल्या जी २० परिषदेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जर्मनीला गेले होते. तेव्हा तिथल्या एका तरुण विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न केला. जगातील कोणत्या राजकीय नेत्याविषयी तुम्हाला सर्वात जास्त आदर वाटतो? त्यावर ओबामा उत्तरले, 'भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग...!' पण कुणीही हे लक्षात ठेवलं नाही. २०१४ पर्यंत मनमोहन सिंग यांचं परराष्ट्र धोरणातलं अपयश म्हणून सरबजीत मृत्यू प्रकरण, भारतीय सैनिकांची क्रूर हत्या आणि बलुचिस्तानमधील असंतोषाचा उल्लेख इतक्यापुरतंच राहिलं.
मनमोहन सिंग यांचे पहिले माध्यम सल्लागार संजय बारू यांनी ‘द ॲक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’ नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात ते लिहितात, 'मनमोहन सिंग यांच्या जीवनाची कहाणी पुष्कळशी बराक ओबामा यांच्यासारखी आहे. पण त्यांनी जे यश संपादन केलंय, ते बराक ओबामा यांच्याहून कितीतरी मोठं आहे. बराक ओबामा यांनी अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मिळवून इतिहास घडवला. डॉ. सिंग यांनीही भारताचे पहिले अल्पसंख्याक समाजातील पंतप्रधान होण्याचा मान मिळवून इतिहास घडवला. पंतप्रधान होण्यापूर्वी भारताचं आर्थिक धोरण ठरवण्यासंबंधीच्या प्रत्येक महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. परंतु ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदी येण्यासाठी जनमताचा कौल मिळवला. डॉ. सिंग यांनी मात्र तसं कधी केलं नाही. त्यामुळेच या दोघांनी वैयक्तिक आयुष्यात जे यश मिळवलं होतं, त्याकडे त्यांच्या देशातील जनतेनं वेगवेगळ्या नजरेनं पाहिलं...!'
नोव्हेंबर २०१० हा महिना वादळ घेऊन आला. कॅगचा अहवाल फुटला. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला. १६ ऑगस्ट २०११ अण्णा हजारे रामलीला मैदानात उतरले. त्यांनी भ्रष्टाचारावून देश पेटवला. लष्करप्रमुख व्हीके सिंग यांच्या जन्मतारखेवरून वाद झाला. त्यांनी रणगाडे दिल्लीच्या दिशेने वळवले. इस्रोत ज्येष्ठ शास्त्रज्ञ जी माधवन नायर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून हकालपट्टी केल्याने नामुष्की पत्करावी लागली. कोळसा खाणीतील परवान्यांच्या वाटपावरून आरोपांनी थेट पंतप्रधान कार्यालयाचे उंबरठे ओलांडले. सीबीआयचे महासंचालक रणजीत सिंग यांच्या वक्तव्यामुळे सीबीआयच्या स्वायत्तेतेवरून वातावरण चिघळलं. रिटेल एफडीआयमधे विदेशी गुंतवणुकीचा मित्रपक्षच विरोध करत होते. एकीकडे कोर्ट ताशेरे ओढत होती. दुसरीकडे न्यूज चॅनल आणि पत्रकार झोडून काढत होते. हे सगळेच आरोपांच्या पिंजऱ्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना खेचत होते. स्वतःचा पक्षही सोबत नसल्यासारखा झाला होता. राहुल गांधी यांनी स्वतःच्याच सरकारने आणलेला वटहुकूम भाषण करताना फाडून त्यांना एकटं पाडलं होतं. नटवरसिंग, मणिशंकर अय्यर, सुरेश कलमाडी, ए राजा, अश्विनीकुमार, पवनकुमार बन्सल या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते. परिस्थिती हाताबाहेर चालली होती. या साऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी मनमोहनसिंग यांचीही एक बाजू होती. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं, 'स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आणि त्यांच्याच कार्यकाळात भ्रष्टाचाराविरोधात तातडीने पावलं उचलली गेली. माहिती अधिकारासारखा मूलभूत कायदा पोलादी प्रशासनाला हादरे देऊ लागला. या एकाच कायद्याने प्रशासन आणि जनतेमधील संघर्ष कमी होत जाऊन संवाद वाढू लागला. हा कायदा नसता तर भ्रष्टाचाराची जी चर्चा आज होताना दिसतेय, ती दिसलीही नसती...!' पण हे कधीच लोकांसमोर येत नव्हतं. मनमोहन सिंग काही बोलतच नव्हते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत १ हजार १९८ भाषणं केली. म्हणजे तीन दिवसांआड ते भाषण करत होते. पण ती भाषण लोकांच्या कानापर्यंत पोचलीच नाहीत. फक्त विरोधकांच्या गदारोळामुळे हे झालं नव्हतं. पण त्यांचा लोकांशी संवाद संपला होता, हे खरं होतं. एकतर ते फड जिंकणारे वक्ते नव्हते. ते इंग्रजीतून आपल्या एलिट बुद्धिवंतांशी संवाद साधायचे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्यांच्यापासून लांबच राहिला. ते सोनिया गांधी यांच्या हातातले कठपुतली आहेत, हा त्यांच्यावरचा आरोप गडद होत गेला. ते कमीच बोलणारे होते. मौन हा त्यांचा स्वभाव होता. पण ते शेवटी शेवटी कोषात गेले होते. ते सभ्य, सुसंस्कृत आणि संवेदनशील होते. त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या लोकांनी केलेला विश्वासघात त्यांना दुःखी करत होता. त्यांच्या देहबोलीतून ते जाणवत राहिलं. पण तरीही परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन त्यांनी देशाला घसरू दिलं नाही. जगभर असंतोषाचं वारं वाहत होतं. त्यात सगळी व्यवस्था उद्ध्वस्त होत होती. तसं भारतात झालं नाही. त्याचं क्रेडिट मनमोहन सिंगांना द्यायला हवं. आपल्या मौनाविषयी बोलताना त्यांनी एकदा शेर सांगितला होता,

हजारो जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, l
न जाने कितने सवालों की आबरू रखी ll

मनमोहन सिंग यांच्या मौनाने अनेकांची आबरू राखली, हे खरंच. पण त्यांनी स्वतःवर आरोप होऊ दिले. प्रामाणिकपणाच्या बळावर त्यातून पार होण्याची त्यांना खात्री होतीच. तसे ते झालेही. पंतप्रधानपद गेल्यावर उलट ते आता अधिक मोकळे वाटू लागले. त्यांनी निवडणुकांतल्या पराभवानंतर वक्तव्य दिलं, त्यातून त्यांचं मोठपणच अधोरेखित झालं, 'या देशाने मला नेहमीच प्रेम दिलंय. फाळणीमुळे बेघर झालेल्या एका मुलाला एवढ्या उंचीच्या पदावर पोचवलंय. हा असा सन्मान आहे, ज्यावर मला नेहमीच गर्व असेल. हे असं कर्ज आहे जे मी कधीच फेडू शकत नाही...!' पण त्या फाळणीत बेघर झालेल्या मुलाचं देशावर जे कर्ज आहे, ते आपण कसं फेडणार? त्याच्यावर अर्वाच्च्य भाषेत लिहिलेल्या पोस्ट फॉरवर्ड करण्याचं पाप आपण केलंय, ते कसं फेडणार? त्याच्यावरच्या भयानक जोकवर वारंवार हसण्याची चूक आपण केलीय, ती कशी सुधारणार? कमी बोलणाऱ्या आणि भरपूर करणाऱ्या पंतप्रधानाला हटवून आपण भरपूर बोलणारा आणि कमी करणारा पंतप्रधान आणलाय. आपण बहुतेक आपलं तेच पाप फेडत आहोत....! या मोठ्या माणसाचे आपण फार ऋणी असायला हवी, अशीच भावना आहे. त्यांनी जे केलं, त्याचा सगळ्यात मोठी लाभार्थी पिढी ही माझीच पिढी होती. थँक्यू डॉक्टरसाहेब....!

संदर्भ :
'डॉ. मनमोहनसिंगः एक वादळी पर्व' – सुजय शास्त्री, 'द अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' – संजय बारू आणि 'स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अँड गुरशरण' – दमन सिंग .... या तीन पुस्तकांची हा लेख लिहिताना खूप मदत झालीय.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

निवडणूक आयोगाचं वस्त्रहरण...!

"निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. केलेल्या एसआयआरमधून १३ कोटी मतदार वगळले गेलेत. त्यावर काहूर माजलंय. त...