Saturday, 11 October 2025

मोदी-शहा यांच हिटलर गोबेल्स नीती....!

"सर्कल इज कंप्लीट, पिश्चर इज क्लिअर....! असं म्हटलं जातं. अगदी तशीच स्थिती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या एकत्र येण्याबाबत म्हणता येईल. प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरे यांची बदलती भूमिका असली तरी लक्षांत राहिली ती २०१९ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक! 'लाव रे तो व्हिडिओ...!' म्हणत त्यांनी मोदी-शहा यांच्यावर जो काही प्रहार केला होता त्याची आठवण आल्याशिवाय राहात नाही. मोदी-शहा यांचं वर्णन थेट हिटलर-गोबेल्स यांच्याशी केली होती. त्यावेळी त्याचं गांभीर्य लक्षांत आलं नाही. पण नंतर या वाक्याचा संदर्भ पाहिला आणि घडलेल्या घटना पाहिल्या तर त्यातली सत्यता जाणवू लागलीय. त्या घडामोडी पाहताना काही साम्यस्थळं आढळली. त्याचा घेतलेला हा धांडोळा आणि केलेली उठाठेव...!" 
-------------------------------------
राज्यात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर सर्वाधिक प्रभाव राज ठाकरे यांच्या भाषणांनी आणि प्रसारमाध्यमांना त्यांनी दिलेल्या मुलाखतींनी पाडला जातो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत असाच प्रभाव नरेंद्र मोदी यांच्या 'अच्छे दिन'च्या घोषणांनी पाडला होता. त्या भूलथापांवरच भाजपला देशाची सत्ता आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकात अनेक राज्यं जिंकता आली होती. दरम्यानच्या ५ वर्षांत 'आज बाळासाहेब ठाकरे असते, तर काय केले असते? काय बोलले असते...?' असे प्रश्न पडण्यासारखे अनेक प्रसंग शिवसेनालाच नव्हे, तर मोदीभक्तीत फसलेल्या भाजपनिष्ठांना आणि देशाला भोगावे लागलेत. त्याची 'उत्तरक्रिया' राज ठाकरेंच्या १० भाषणांच्या आणि मुलाखतींच्या मालेने २०१९ मध्ये मोठ्या ताकदीने केली होती. या निवडणुकीत 'मनसे'चा एकही उमेदवार उभा नव्हता; पण राज ठाकरेंच्या लाखांच्या सभांनी भाषणांनी थापाड्या-बाताड्यांच्या सत्तेचा अंत करता येतो; तो केला पाहिजे, ही उमेद महाराष्ट्रासह देशभरातल्या मतदारांत जागवली होती. लोकशाहीतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विराट आविष्कार घडवला होता. यासाठी ते मोदी सरकारचा खोटेपणा, मनमानीपणा पुराव्यांसह दाखवत असताना अखेरीस, 'ही निवडणूक यापुढे लोकशाही राहाणार की हुकूमशाही येणार, या प्रश्नाचे उत्तर तुमचे मत देणार...' असल्याचा सावधतेचा इशारा लोकांना देत होते. संभाव्य हुकूमशाहीसाठी अॅडॉल्फ हिटलरचा दाखला देत होते. लोकशाहीच्याच माध्यमातून हुकूमशाही आणणाऱ्या आणि ज्यूंचा वंशद्वेष करत त्यांचा अमानुष छळ कत्तल करणाऱ्या अॅडॉल्फ हिटलर याचा कार्यकाल पहिले महायुद्ध २८ जुलै १९१४ ते ११ नोव्हें. १९१८ ते दुसरे महायुद्ध १९३९ ते २ सप्टेंबर १९४५ असा आहे. पहिले महायुद्ध दोस्त राष्ट्र किंवा ट्रिपल आँताँत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियन साम्राज्य, फ्रेंच प्रजासत्ताक ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र विरुद्ध जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी देशांच्या राजवटी या दोन गटात झाले. २८ जून १९१४ रोजी 'जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी' गॅव्हिलो प्रिन्सिप याने सारायेव्हो इथं ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनाचा वारसदार असलेल्या 'आर्चड्यूक' फ्रांझ फर्डिनांड्यो याची हत्या केली आणि पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. पुढे या महायुद्धात जगातले सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. या महायुद्धाची अखेर जर्मन, रशियन, ऑस्ट्रो-हंगेरीयन आणि ऑट्टोमन साम्राज्यं नष्ट होऊन झाली. यातून अनेक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. त्यांनी आपल्या सीमारेषा निश्चित केल्या. नवीन शासन यंत्रणा निर्माण केल्या. त्यांना मान्यता मिळण्यासाठी तह, ताबा, उत्तराधिकाऱ्याचे नूतनीकरण याच्या प्रक्रिया सुरू झाल्या. त्यात अपमानित करण्यात आलेल्या अटी-शर्तीतूनच दुसऱ्या महायुद्धाची बीजं पेरली गेली. पहिल्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्समधील व्हर्साय इथं शरणागती पत्करल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव टाकण्यासाठी अटी लादल्या. पराभूत जर्मनीला युद्ध लादल्याची शिक्षा म्हणून दोस्त राष्ट्रांना ६५० कोटी पौंडची रक्कम द्यावी; जर्मनीचे लष्कर १ लाख सैनिकांपेक्षा अधिक असू नये; नाविक दल - नेव्ही उभारू नये; जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत १५ वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा; हाइन नदीलगतच्या ५० किलोमीटर परिसरात जर्मनीने लष्कर ठेवू नये, अशा अपमानित करणाऱ्या अटी जर्मनीला मान्य कराव्या लागल्या. त्यानंतर पहिले महायुद्ध समाप्तीचा ऐतिहासिक 'व्हर्सायचा तह' ११ नोव्हें. १९१८ ला झाला. या पहिल्या महायुद्धात अॅडॉल्फ हिटलर शिपाईगडी म्हणून सामील झाला होता. तो मूळचा जर्मनीच्या सीमेजवळील ऑस्ट्रियातील गावातला. जन्मः २० एप्रिल १८८९ मधला. वडिलांबरोबर तोही जर्मनीत स्थायिक झाला. त्याच्या पूर्वजांची ओळख गुंतागुंतीची आहे. त्यात अनेक वंश-प्रांताची सरमिसळ आहे. हिटलर अभ्यासात हुशार होता. उत्तम चित्रकार होता. पण त्याला 'आर्ट स्कूल' मध्ये प्रवेश मिळाला नाही. पोटापाण्यासाठी त्याने रस्त्यावरचा बर्फ साफ करण्याची; रंगरंगोटीची कामं केली. लष्कर भरतीत तो नापास झाला. पण पहिले महायुद्ध सुरू होताच सामाजिक संस्था-संघटनांतर्फे सैनिक भरती होऊ लागली. त्या माध्यमातून तो सैनिक झाला. युद्ध संपल्यावर त्याला पाद्री - फादर-ख्रिस्ती धर्मोपदेशक व्हायचे होते. पण जर्मनींना अपमानित करणाऱ्या व्हायच्या तहाची सल त्याच्या उरात रुतली होती. कारण या तहामुळे जर्मनी स्वबळावर उभी न राहाता अमेरिकेच्या भांडवलावर जगू लागली होती. जर्मनीतील अनेक शासकीय उद्योग भांडवलदारांच्या ताब्यात गेले. गरीब, मध्यमवर्ग, छोटे दुकानदार, कमी पगारवाले नोकरदार आर्थिक ओढाताणीने मेटाकुटीला आले. या पार्श्वभूमीवर हिटलरने लष्कराचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करण्याचा १९१९ मध्ये निर्णय घेतला. 'जर्मन वर्कर्स पार्टी'त तो सामील झाला. अवघ्या सहा महिन्यांत त्याने वक्तृत्वाच्या बळावर पक्ष कार्यकर्त्यांना जिंकले आणि पार्टीचा 'नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी' असा नामविस्तार करून तो पक्षप्रमुखही झाला. या पक्षाची 'नाझी' अशी ओळख आहे. या संघटनेच्या माध्यमातून हिटलरने व्हर्साय तहाविरोधात असलेली जर्मनांची लोकभावना व्यक्त करायला आणि जर्मन लोकांत ज्यूविरोधी द्वेषभावना वाढवायला सुरुवात केली. जर्मनीचा महायुद्धात पराभव होताच जर्मनीचा राजा कैसर विलियम सहकुटुंब देश सोडून गेला. त्यानंतर दोस्त राष्ट्रांनी आपल्या इशाऱ्यानुसार चालणारं सिव्हिलियन सरकार स्थापन केलं. सद्दाम हुसेनला ठार केल्यावर अमेरिकेने इराकमध्ये रिपब्लिकन सरकार स्थापन केलं, तसाच हा प्रकार होता. जर्मन लष्करप्रमुखाऐवजी या रिपब्लिकन सरकारनेच व्हर्साय तहावर मान्यतेची स्वाक्षरी केली होती. त्यामुळे राष्ट्रप्रेम जागवत सरकारविरोधात लोकभावना संघटित करीत स्वतःची आणि पक्षाची ताकद वाढवत जाणे, हिटलरला सोपे गेले. या बळावर त्याने १९२३ मध्ये सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला. तो असफल झाला. परिणामी, हिटलर देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलबंद झाला. तुरुंगातल्या वास्तव्यात त्याने आपलं आयुष्य आणि राजकीय लक्ष्य सांगणारं पुस्तक लिहिलं. जर्मन भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचा 'माय स्ट्रगल' नावाने इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला. या पुस्तकाने हिटलर अधिक लोकप्रिय झाला. त्याची जेलमधून सुटका झाली, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने समर्थक जमले. त्याने हिटलरची आणि त्याच्या नाझी पक्षाची ताकद पूर्वीपेक्षा अधिक वाढली. पण त्यापेक्षा अधिक १९२९ मध्ये अमेरिकेचा शेअरबाजार कोसळल्यावर वाढली. या घटनेनंतर अमेरिकेने आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी जर्मनीकडे दिलेला पैसा मागण्याचा तगादा लावला. तो पैसा देण्याच्या प्रयत्नात जर्मनीची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली. या संधीचा फायदा उठवत हिटलरने रिपब्लिक सरकारला धारेवर धरून, ते जर्मन जनतेच्या नजरेत नालायक ठरवण्यात यश मिळवलं. जसे नरेंद्र मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात आधीच्या मनमोहन सिंग सरकारला नालायक ठरवलं तसं ! यानंतर केंद्र सत्तेसाठीच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्या निवडणुकीत जर्मनीच्या सत्ताधारी पक्षासह कम्युनिस्ट पार्टी आणि हिटलरची नाझी पार्टी हे तीन मुख्य पक्ष म्हणून रिंगणात होते. पण जर्मनीच्या जनतेने यापैकी कुणाही एकाला सत्तेसाठीचं पूर्ण बहुमत दिलं नाही. अशा परिस्थितीत हिटलरने आपल्या भाषणकलेच्या जोरावर जर्मनीचं लोकमत आपल्याच बाजूने असल्याचं चित्र उभं केलं. त्यासाठी मोठमोठ्या रॅलीजचं आयोजन केलं. परिणामी, जर्मनीचे प्रेसिडेंट - राष्ट्रपती पॉल वॉन हिन्डेनबर्ग यांना जानेवारी १९३३मध्ये हिटलरला जर्मनीचा चान्सलर - प्रधानमंत्री बनवावं लागलं. कारण तोपर्यंत 'जर्मनीने गमावलेला सन्मान मीच पुन्हा मिळवून देऊ शकतो....' असा विश्वास समस्त जर्मनींच्या मनात रुजवण्यात हिटलर यशस्वी झाला होता. मात्र सत्ता मिळाल्यानंतर मोदी कसे बदलले, ते राज ठाकरे सांगतात; तसा माणूसच बदलावा तसा हिटलर बदलला.
*संघ दक्ष हिटलरकडे लक्ष*
हिटलर जर्मनीचा चान्सलर होताच, त्याच्या पुढे-मागे भांडवलदार हात जोडून उभे राहू लागले. 'एक राष्ट्र, एक ध्वज, एक पक्ष, एक नेता...!' ही नाझी पक्षाची घोषणा होती. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी हिटलरने जर्मनीतील लोकशाही संपवण्याचे भव्य स्वप्न रंगवले होते. त्यासाठी त्याला जर्मनीचं संविधान बदलून अध्यक्षीय पद्धतीची हुकूमशाही - फॅसिस्ट राज्य व्यवस्था आणायची होती. १९३४ मध्ये हिटलरला चान्सलर बनवणाऱ्या प्रेसिडेंट पॉल वॉन यांचं निधन झालं आणि ती संधी साधून हिटलरने संविधान बदलण्याचा डाव टाकला. पण त्याला विरोधी पक्ष असलेल्या कम्युनिस्टांचा विरोध होता. त्यामुळे संविधान बदलासाठी आवश्यक असलेलं बहुमत त्याला मिळणार नव्हतं. तो अडला, पण थांबला नाही. त्याने बुद्धी शक्तीने मार्ग काढला. २७ फेब्रुवारी १९३३ रोजी त्याने जर्मनीच्या राजकीय व्यवहार खात्याच्या इमारतीला आग लावली आणि त्याचा ठपका कम्युनिस्टांवर ठेवून त्यांना तुरुंगात टाकलं. ४,००० कम्युनिस्ट जेलबंद होताच; हिटलरने निवडणुका जाहीर केल्या. त्यात विरोधकच नसल्याने हिटलरच्या नाझी पक्षाच्या खासदारांची संख्या १०० ने वाढून २९९ झाली. अशाचप्रकारे नोटाबंदीचा डाव खेळून भाजपची सत्ता ताकद वाढवण्यात आणि व्यापक करण्यात आली. असो. हिटलरच्या हातात पूर्णपणे जर्मनीची सत्ता येताच, त्याने जनतेच्या मनात प्रथम भीती, असुरक्षिततेची भावना निर्माण केली. मग तोच त्यांचा पालनकर्ता, तारणकर्ता झाला. देशभक्तीचे धडे देत, नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याचे म्हणजेच 'अच्छे दिन आनेवाले हैl' स्वप्न दाखवू लागला. 'तुम्ही पूर्वीच्या सरकारमुळे दुःखी आहात,' हे त्यांना पुनःपुन्हा सांगू लागला. जसे नरेंद्र मोदी गेली काही वर्ष पंडित नेहरू आणि इंदिरा गांदी यांच्या सरकारच्या नावाने खडे फोडत होते, तसाच हा मामला होता. दरम्यान, हिटलरच्या नाझी पक्षाच्या ऑल जर्मन स्टुडंटस् युनियनने सर्व विद्यापीठातली विरोधी विचारांची पुस्तकं जाळली. मोदी सरकारच्या काळात अशी जाळपोळ झाली नाही. पण पुण्याची फिल्म अकादमी, हैद्राबाद विद्यापीठ, दिल्लीची जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी - जेएनयू वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त करण्यात आली. अभ्यासक्रमात, क्रमिक पुस्तकात, 'विश्वकोश' सारख्या उपक्रमांच्या नोंदीत सोयीस्कर बदल करण्यात आलेत. हिटलरने एनएसडीएपी ही सशस्त्र संघटना उभारली होती. तिच्या कवायती, शस्त्रे, बॅण्ड लष्करासारखीच होती. सेवानिवृत्त पायलट हर्मन गोरिंग आणि लष्कर कॅप्टन अर्नेस्ट रोहोम हे या संघटनेचे प्रमुख होते. या संघटनेचं टोपणनाव 'ब्राऊन शर्ट' म्हणजे 'खाकी शर्ट' होते. या संघटनेला लष्कराचा दर्जा मिळावा, यासाठी हिटलर प्रयत्नशील होता. त्यामागे विरोधकांचे सरळसोट कायदेशीर हत्याकांड घडवून आणण्याचा हेतू होता. या संघटनेची तुलना रा.स्व. संघाशी करता येणार नाही. तथापि, संघाचं हिटलरच्या संघटनात्मक कामाकडे लक्ष आहे. तो त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून 'संघ स्वयंसेवकांना १५ दिवसाचं प्रशिक्षण दिल्यास ते जवानांचं काम करू शकतील...!' असं वादग्रस्त विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी करून, हिटलरची बरोबरी साधली होती. संघ परिवाराच्या संघटनांच्या कार्यक्रमात मोदीजी भावुक होऊन बोलतात; तसाच हिटलर एनएसडीएपीच्या शिबिरात बोलायचा. सदस्यांना, प्रशिक्षणार्थीना 'शुद्ध रक्ताच्या जर्मन देशासाठी सर्वस्वाचा त्याग करा...!' असं आवाहन करायचा. आपली राजकीय ताकद वाढविण्यासाठी हिटलरने प्रसारमाध्यमांतील जाहिरातींवर, पोस्टर, भिंतीपत्रकावर प्रचंड पैसा खर्च केला. सत्तेच्या या देखाव्याला भुलून, घाबरून विरोधी पक्षातील काही नेत्यांनी सत्तेसाठी, पैशासाठी, सुरक्षेसाठी हिटलरबरोबर तडजोड केली. सत्ताधारी हिटलर सर्वसत्ताधीश झाला. त्याने एकेक करत स्वतंत्रपणे काम करणाऱ्या सरकारी व्यवस्थांवर ताबा मिळवला. गेस्टोपो ही जर्मन सिक्रेट पोलीस गुप्तहेर संघटना त्याने ताब्यात घेतली. १९३९ पासून हिटलरने जर्मन आणि जर्मनीने जिंकलेल्या युरोप भागातील ज्यूंना, सिक्रेट पोलिसांच्या माध्यमातून छळछावणीत धाडायला सुरुवात केली. तिथे ज्यूंचा ताबा नाझींच्या एसएस म्हणजे सिक्रेट सर्व्हिस गार्डकडे सोपवला जाई. याच काळात हिटलरने खास राजकीय खटले चालवण्यासाठी कोर्ट स्थापन केलं होतं. त्यात हजारोंना मृत्युदंडाची सजा सुनावण्यात आली. या मनमानी न्यायदानात कसलाही अडथळा येऊ नये, यासाठी समाजवादी आणि ज्यू सरकारी वकील, न्यायाधीशांना पदमुक्त करण्यात आले होते. वंशवादावर आधारित न्याय व्यवस्था आणि नवे कायदे हिटलरने सुरू केले. या व्यवस्थेला त्याने पीपल्स कोर्ट असे गोंडस नाव दिले होते. जर्मनीवर पूर्णपणे हुकूमत मिळवल्यानंतर हिटलरने व्हर्राय तहाच्या अटी मोडीत काढण्यास आणि जर्मनीच्या भोवतालच्या छोट्या राष्ट्रांना आपले अंकीत बनवण्यास सुरुवात केली. त्याच्या विस्तारवादाची पहिली शिकार त्याची जन्मभूमी असलेला देश ऑस्ट्रिया ठरला. त्यानंतर त्याने चेकोस्लाविया, पोलंड, नॉर्वे, डेन्मार्क, फ्रान्स आणि रशिया जिंकण्याचा क्रम लावला होता. यातील पोलंडवर १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने हल्ला केला. त्यानंतर हिटलरच्या नाझी पक्षाने केलेल्या मैत्री-करारानुसार, सोव्हिएत संघाने पूर्वेकडून पोलंडवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून ग्रेट ब्रिटन - युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सने जर्मनीवर हल्ला केला. त्यानंतर एकेक राष्ट्र त्यात सामील झाल्याने त्याला दुसऱ्या महायुद्धाचे स्वरूप आले. यात जवळपास ७० देशाचे सैनिक सामील झाले होते. जर्मनीच्या बाजूला जपान आणि इटाली हे दोनच देश मोठे होते. तर त्यांच्या विरोधात ग्रेट ब्रिटनच्या बरोबर अमेरिका, रशिया, चीन, भारत हे मोठे देश उतरले होते. १९३९ ते ४५ असे सहा वर्षं चाललेलं हे महायुद्ध हिटलरच्या हुकूमशाही बरोबरच त्याच्या नाझी पक्षाला संपवूनच संपलं. पण यात दोन्ही बाजूचे मिळून २ कोटी २० लाखापेक्षा अधिक सैनिकांचे आणि ४ कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे बळी गेले. मालमत्तेचे तर अगणित नुकसान झाले, हा महाविनाश हिटलरच्या शुद्ध राष्ट्रवादाच्या अतिरेकीपणामुळे घडला. या अतिरेकीपणातल्या शिस्तीचे, राष्ट्रप्रेमाचे कौतुक करणारे बरेच लोक आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे आहेत; आणि राज ठाकरेही आहेत. नाझी पक्षाच्या स्वस्तिक ध्वज चिन्हामुळे बऱ्याच हिंदुत्ववाद्यांना हिटलर आपला 'आर्य' वाटतो. तथापि, हिटलरचं भारताबद्दल आणि हिंदूधर्माविषयीचं मत चांगलं नव्हतं. ते गैरसमज आणि चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरला एका भेटीत सुनावलं होतं. प्रधानमंत्री मोदी यांनी ज्याप्रकारे मंत्रिमंडळाला गुंडाळून ठेवून आपणच सर्वसत्ताधारी आहोत, असं चित्र उभं केलं, ज्याप्रकारे स्वतंत्रपणे चालणाऱ्या सरकारी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या, मोडीत काढल्या; स्वतःच्या जाहिरातींवर, विदेशवाऱ्यांवर सरकारी पैसा खर्च केला; जवानांच्या बलिदानाला दुर्लक्षित करून मतांसाठी लष्कराच्या कर्तबगारीला वापरण्याचा प्रयत्न केला, ते पाहिल्यास त्यांची पावलं हिटलर सारखीच पडत असल्याचे वाटणे साहजिकच आहे. या लोकशाहीविरोधी बदचालीला कठोर विरोधही झालाय. तरीही अनंत काळ नुकसान, यातना सोसलेल्या भारतीय जनतेने मोदी पक्षाला सत्ता यश दिले, तर मोदीजींना हिटलरी सत्तावर्तन करण्याचा हक्क आपसूक लाभतो. तथापि, हिटलरबरोबर मुसोलिनी - इटाली) आणि टोजो - जपान हेही हुकूमशहा होते. यातील दोघांनी आत्महत्या केल्या; तर मुसोलिनीला लोकांनी जाहीर चौकात फाशी दिली.
*देशी-विदेशी गोबेल्स*
राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक भाषणात 'मोदी आणि शहा या दोन व्यक्ती या निवडणुकीत भारताच्या राजकीय क्षितिजावरून कायमसाठी हटवल्या गेल्या पाहिजेत; यासाठी त्यांना पुन्हा सत्ताशक्ती देणाऱ्या कोणत्याही म्हणजे भाजप आणि शिवसेना पक्षास मतं देऊ नका...!' असं आवाहन लोकांना केलंय. नरेंद्र मोदी हे जनसंघ वा भाजपचे कार्यकर्ते वा पदाधिकारी नव्हते. ते रा.स्व. संघाचे 'पूर्ण वेळ प्रचारक' होते. ज्या प्रचारकाला राजकारणात रुची असते; त्याला त्याच्या कुवतीनुसार भाजपच्या शहर, जिल्हा वा प्रदेश कार्यकारिणीवर पिंडीवरच्या नागोबासारखे बसवले जाते. मोदींचाही गुजरातच्या राजकारणात प्रवेश झाला आणि केशुभाई पटेल-वाघेला यांच्या सत्तासाठमारीत आमदार नसताना त्यांची थेट गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. अशाच प्रकारे नितीन गडकरीही १९९५-९९ या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंत्री झाले होते. मोदींच्या या राजकीय उदयानंतर झालेल्या प्रत्येक वादग्रस्त घटनेत मोदींबरोबरच अमित शहा यांचं नाव चर्चेत येऊ लागलं. मोदी प्रधानमंत्री झाले, तसे अमित शहा भाजपचे 'राष्ट्रीय अध्यक्ष' झाले. हिटलरबरोबरच गोबेल्स हे नाव येतंच; तशी ही मोदी-शहा यांची जोडी आहे. मोदी सरकारमध्ये केंद्रीय सत्तेचा अधिक अनुभव असलेले सुषमा स्वराज, अरुण जेटली हे मंत्री होते. पण सरकारचा त्यांच्यापेक्षा अधिक धोरणात्मक निर्णय वा माहिती; कोणताही संविधानिक अधिकार नसताना अमित शहा यांनी जाहीर केला हाोता. 'स्वीस बँकेत असलेला भारतीयांचा ब्लॅकमनी देशात आणून प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, हा जुमला होता...!' हे अमित शहा यांनीच निर्लज्जपणे सांगितलं आणि एकाही दहशतवाद्याच्या मुडद्याचा फोटो न दाखवता; 'ऑपरेशन बालाकोट' मध्ये २५० दहशतवादी मारल्याचंही त्यांनीच जाहीर केलं. खोट्या गोष्टी पुनःपुन्हा नव्या उत्साहाने सांगण्याला गोबेल्स-नीती म्हणतात. पॉल जोसेफ गोबेल्स याचा जन्म २९ ऑक्टो. १८८७ ला झाला. हा हिटलरचा प्रचारप्रमुख होता. त्याचे वडील कापड गिरणीत फोरमन होते. तो हिटलरच्या नाझी संघटनेतला सर्वात उच्च शिक्षित होता. इतिहास, वाङ्मय, तत्त्वज्ञान या विषयांचा तो अभ्यासक होता. पायातील व्यंगामुळे त्याची महत्त्वाकांक्षा अडखळली होती. ती कसर त्याने आपल्या पाताळयंत्री कारनाम्यांनी भरून काढली. कट्टर समर्थक असल्याने तो हिटलरचा खास विश्वासातला माणूस झाला. 'एखादी गोष्ट वारंवार सांगितली की, ती लोकांना सत्य वाटू लागते. यासाठी ती गोष्ट कमी शब्दांत असायला हवी आणि त्यातील काही मुद्दे ठळक असायला हवेत...!' हे हिटलरच्या प्रचाराबाबतचं मुख्य सूत्र होतं. ते प्रत्यक्षात आणणारा सूत्रधार जोसेफ गोबेल्स हा होता. यातूनच तो प्रचारतंत्र जनक म्हणूनही ओळखला जाऊ लागला. गोबेल्सने प्रोपगंडा आणि सेन्सॉरशिप ही दोन माध्यमं वापरून लोकांचं ब्रेनवॉश केलं. अलीकडच्या काळात, आपल्या इथे जशा श्रीराम सेना, हिंद जन जागृती, सनातन, बजरंग दल, गोरक्षासारख्या संघटनांचा वापर करण्यात आला; तशी हिटलरला विरोध करणाऱ्यांना रोखण्या-संपवण्यासाठी 'शूट्सस्टाफल' Schutzstaffel-SS ही सेना आघाडीवर होती. ती गोबेल्सच्या प्रचारतंत्राने क्रिया-प्रतिक्रिया करायची. या SSच्या माध्यमातूनच ६० लाख ज्यूंची छळछावण्यांतून कत्तल करण्यात आली. या गोबेल्स प्रचारतंत्रामुळे हिटलर सत्तेवर आला आणि १९३३ ते ४५ अशी १२ वर्ष सत्ता टिकवू शकला. १९३४ मध्ये हिटलर जर्मनीचा प्रेसिडेंट झाला आणि त्याने गोबेल्सला Enlightenment and Propaganda खात्याचा मंत्री केलं. 'सरकारी प्रचार हा अदृश्य; पण सर्वत्र असावा,' असं धोरण गोबेल्सने प्रचारमंत्री म्हणून अंमलात आणलं. त्यासाठी प्रसारमाध्यमं, साहित्य आणि कलानिर्मिती यावर निर्बंध घातले. हलकेफुलके मनोरंजनाचे कार्यक्रम अथवा नाझी विचाराचा प्रचार करणारे साहित्य, चित्रपट यांनाच परवानगी दिली जायची. 'चला, हवा येऊ द्या'सारखे- थुकरट वाडीतले टीव्ही शो, विज्ञानयुगात चेटकिणीभोवती फिरणारी 'अलबत्या-गलबत्या' सारखी जोरात चालणारी मोठ्या प्रेक्षकांच्या गर्दीची बालनाट्य किंवा राज ठाकरे यांनी सांगितलेले पॅडमॅन, सुईधागा, टॉयलेट यासारखे सरकारी योजनांचा प्रसार करणारे चित्रपट; हादेखील 'गोबेल्स' नीतीचा गावठी अवतार आहे. त्यात मराठा मोर्चा, बहुजन मोर्चा, दलित आक्रोश मोर्चा याची पेरणी करणाऱ्या सैराट चित्रपटाचाही समावेश करता येईल.
*वंशाचा चाळा भक्तांचा गळा*
गोबेल्स प्रचारमंत्री होताच त्याने 'आर्यन वंश हा सर्वात शुद्ध आहे आणि ज्यू हे देशद्रोही आहेत...!' या संदेशाचा मारा लोकांवर केला. ज्यू पत्रकारांवर बंदी घालण्यात आली. परिणामी, १९३५ मध्ये जर्मनीतील १,६०० नियतकालिकं बंद पडली आणि १९३९ पर्यंत सुरू असलेल्या पैकी ६९ टक्के नियतकालिकं नाझीवाद्यांच्या मालकीची झाली. या बदलाच्या मुळाशी असलेल्या वंशवादाची जागा मोदी सरकारच्या विचारवादाने घेतली. त्यानुसार बदल झाले. हिटलरच्या काळातच जर्मनीत रेडिओ लोकप्रिय होऊ लागला होता. त्याचा वापर करता येईल, हे गोबेल्सने ओळखले आणि प्रत्येक जर्मन माणसाला विकत घेता येईल, इतक्या अल्पदरात रेडिओ उपलब्ध करून देण्यात आले. त्यावरून हिटलर आणि गोबेल्स यांचीच भाषणं अधिकाधिक वाजत. ती लोकांच्या कानी सतत पडावी, यासाठी रस्त्यावर, पार्कात, रेस्टॉरंटमध्ये, सर्व सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावून त्यावरून रेडिओ ऐकवला जात असे. हिटलरच्या भव्य रॅलीज व्हायच्या. त्याचीही कॉमेंट्री रेडिओवरून सुरू असे. अशाच प्रकारे मोदीजींच्या सततच्या विदेश वाऱ्या आणि विदेशी राष्ट्रप्रमुख, मंत्र्यांच्या गुजरातेतल्या रोड शोचे रिपोर्ट टीव्हीवर साजरे करण्यात आले. हिटलरच्या १२ वर्षांच्या सत्ताकाळात नाझी विचारधारेला विरोध करणाऱ्या २,५०० साहित्यिकांवर बंदी घालण्यात आली; तर ज्यू धर्माविषयी आणि शांततावादी, समाजवादी, साम्यवादी विचारांचं समर्थन करणारी २०,००० पुस्तकं जाळण्यात आली. ज्यू संगीतकार आणि त्यांच्या जॅझ म्युझिक्चर संपूर्ण बंदी होती. मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या विचारवंत, लेखकांच्या हत्येच्या निषेधार्थ ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी केलेली 'पुरस्कार वापसी' आणि सहा महिन्यांपूर्वी यवतमाळ येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे 'निमंत्रण रद्द' केल्यानंतर झालेली 'निमंत्रण वापसी' हे गोबेल्स नीतीला दिलेलं प्रत्युत्तर होतं. आदर्श साहित्य कसं असावं, याचं उदाहरण देण्यासाठी गोबेल्सने 'मायकल' नावाची कादंबरी लिहिली होती. बदलत्या काळानुसार, १० वर्ष प्रधानमंत्रीपद सांभाळलेल्या मनमोहन सिंग यांची थट्टा उडविणारा 'अॅन अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर' हा चित्रपट आला; आणि मोदींचं गुणगान करणारा चित्रपट तयार झाला. सततच्या ज्यूविरोधी प्रचाराचा जर्मन नागरिकांवर असा परिणाम झाला, की त्यांना ज्यूविरोधात कोणतीही कृती करणं गैर वाटेनासं झालं. तेच मोदी सरकारच्या काळात गोमांसच्या निमित्ताने दलित आणि मुस्लिमांवर जीवघेणं संकट बनून कोसळलं. नाझी चळवळ सुरू होण्यापूर्वी जर्मन नागरिक आणि ज्यू यांचे सलोख्याचे संबंध होते. हिटलर सत्तेवर आल्यावर जर्मन नागरिक ज्यूंकडे संशयाने पाहू लागले. काहींनी ज्यूंशी संबंध ठेवले तर आपण अडचणीत येऊ, या भयाने ज्यूंशी असलेले संबंध तोडले. हा अतिरंजित वाटणारा इतिहास काही मोदीभक्तांनी सत्यात उतरवून दाखवला आहे. या कामगिरीबद्दल अमित शहा आणि त्यांच्यासारख्या वाढवलेल्या देशी गोबेल्सना मोदींनी काय दिलं, ते अजून उघड झालेलं नाही. परंतु प्रचारमंत्री म्हणून गोबेल्सने केलेल्या कामगिरीबद्दल हिटलरने त्याला अनेक सन्मानाची पदं दिली. दुसऱ्या महायुद्ध काळात १९४४ मध्ये गोबेल्सला युद्धमंत्री केलं. या पदाची हौस अमित शहा यांनी 'ऑपरेशन बालाकोट' मध्ये ठार झालेल्या दहशतवादींचा वादग्रस्त आकडा जाहीर करून भागवून घेतली. रशियाच्या फौजा जर्मनीत घुसताच हिटलरने आत्महत्या ३० एप्रिल १९४५ करण्याचा निर्णय घेतला. पण त्यापूर्वी त्याने गोबेल्सला जर्मनीचा चान्सलर - प्रमुख म्हणून घोषित केलं. गोबेल्स एकच दिवस जर्मनीचा राष्ट्रप्रमुख होता. १ मे १९४५ रोजी तो आत्महत्या करून मोकळा झाला. जाताना मागे तो गोबेल्स-नीती हा शब्द ठेवून गेला. एखादा राजकीय नेता स्वार्थासाठी खोटं रेटून बोलून लोकांत भ्रम निर्माण करतो, तेव्हा त्याच्या वागण्याचा उल्लेख गोबेल्स नीती असा केला जातो. मोदी-शहा यांना कठोर शब्दांत विरोध करताना राज ठाकरे हुकूमशाहीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी हिटलरचं चरित्र वाचा, असं सभांतून सांगत होते. हिटलरबरोबर गोबेल्स येणारच. या गोबेल्सच्या तंत्रानुसार, सोशल मीडियातून धिंगाणा घालणाऱ्या ट्रोल्सरना राज ठाकरे 'लावारिस कार्टी' म्हणतात. म्हणजे त्यांना जन्माला घालणाऱ्या गावठी गोबेल्सनी निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच आत्महत्या करायची का ?
*लोकांच्या भीती आणि आशेचा फायदा*
कदाचित २० व्या शतकातील सर्वात कुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, अ‍ॅडॉल्फ हिटलर हा राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्ष, नाझी पक्षाचा प्रमुख होता आणि १९३० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते १९४५ मध्ये आत्महत्या होईपर्यंत तो जर्मनीचा हुकूमशहा बनला. १९३३ मध्ये जर्मन फ्युहरर नेता किंवा मार्गदर्शक ही पदवी धारण केल्यानंतर लगेचच  हिटलरने जोसेफ गोबेल्स यांनी काळजीपूर्वक आयोजित केलेल्या प्रचार मोहिमांद्वारे आपली शक्ती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या महायुद्धातील पराभवामुळे अपमानित झालेल्या आणि आर्थिक मंदीतून त्रस्त झालेल्या जर्मन लोकांच्या भीती आणि आशेचा फायदा घेऊन गोबेल्स आणि हिटलरने जर्मनीच्या भविष्याबद्दल राष्ट्रवादी, विस्तारवादी, वर्णद्वेषी दृष्टिकोनाला चालना दिली. त्यांच्या मोहिमेने अनेक जर्मन लोकांना नाझी राजवटीत सामील करून घेतले आणि अनेकांना हे पटवून दिले की विरोध निरर्थक आहे. नाझींनी सत्ता मिळवल्यानंतर, त्यांनी भाषण आणि सभा स्वातंत्र्य रद्द केले आणि यहूदी-विरोधी वातावरण निर्माण केले ज्यामुळे यहूदी, समलैंगिक आणि इतर अल्पसंख्याकांवर भयंकर अत्याचार झाले ज्याचा परिणाम होलोकॉस्टमध्ये झाला.
*रेडिओची ताकद*
हिटलरने १९३३ मध्ये गोबेल्सना रीच चेंबर ऑफ कल्चरची स्थापना करण्यासाठी नियुक्त केले. चेंबरचे फक्त सदस्यच सांस्कृतिक व्यवसायात काम करू शकत होते आणि गोबेल्सने खात्री केली की यहूदी, मार्क्सवादी आणि नाझीवादाला विरोध करणारे इतर सदस्य बनू नयेत. नाझी संस्कृती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी गोबेल्सने मान्यताप्राप्त कला आणि संगीताचा प्रचार केला. रेडिओच्या तुलनेने नवीन माध्यमाचा फायदा घेत, त्याने 'पीपल्स रिसीव्हर्स' नावाच्या स्वस्त रेडिओ सेटची विक्री आयोजित केली आणि हिटलरची भाषणे आणि इतर प्रचार कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी सार्वजनिक लाऊडस्पीकरची एक प्रणाली स्थापित केली.
दर सप्टेंबरमध्ये, नाझींनी न्युरेमबर्ग रॅलीआयोजित केली, जी पक्ष निष्ठा आणि शक्तीचे प्रदर्शन होते. १९३८ पर्यंत दहा लाखांहून अधिक लोक नाझीवादाच्या आठवडाभराच्या उत्सवासाठी जमले होते. लेनी रिफेनस्टाहल यांनी १९३४ च्या रॅलीचे चित्रीकरण तिच्या 'ट्रायम्फ ऑफ द विल' या प्रचार चित्रपटासाठी केले. सर्वात उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे पक्ष नेत्यांची बाहेरील संध्याकाळची रॅली. १९३५ मध्ये हिटलरचे वास्तुविशारद अल्बर्ट स्पीअर यांनी १५० सर्चलाइट्स मैदानाभोवती ठेवण्याची व्यवस्था केली, सरळ वर निर्देशित केले, ज्याला ब्रिटिश राजदूत सर नेव्हिल हेंडरसन यांनी 'प्रकाशाचे कॅथेड्रल' म्हटले. १९४२ मध्ये हिटलरने असे निरीक्षण केले, 'डॉ. गोबेल्स यांना बर्लिनमधील परिस्थिती ज्या दोन गोष्टींशिवाय नियंत्रित करता आली नसती अशा दोन गोष्टींची देणगी होती. मौखिक सुविधा आणि बुद्धिमत्ता....!' हिटलरकडे त्याच्या सहकाऱ्याचे कौतुक करण्याचे चांगले कारण होते, कारण गोबेल्सनेच फुहरर मिथक तयार केली होती, ज्यू, नफाखोर आणि मार्क्सवाद्यांपासून जर्मनीचा तारणहार म्हणून हिटलरची छद्म-धार्मिक उपासना आयोजित केली होती. ३० एप्रिल १९४५ रोजी, पराभवाच्या उंबरठ्यावर असताना, हिटलरने त्याच्या बंकरमध्ये आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी गोबेल्सनेही तेच केले, शेवटपर्यंत त्याच्या नेत्याशी एकनिष्ठ राहून.
हरीश केंची,
९४२२३१०६०९



No comments:

Post a Comment

लडाख आंदोलनामागचे वास्तव

"भारताच्या उत्तरेकडे वसलेला एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे स्वर्गाची अनुभूती म्हणजे लडाख. शांत, प्रसन्न, आल्हाददायक लडाख मात्...