"मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोटतले आरोपी १९ वर्षांनी निर्दोष सुटले. तर मालेगाव बॉम्बस्फोटातले आरोपी १७ वर्षांनी! हिरवा विरुद्ध भगवा हा कृत्रिम सामना बरोबरीत सुटला. फिट्टम फाट झालीय. फक्त आमचा तपास चोख असतो असा पिसारा फुलवत नाचणाऱ्या एटीएसचा पार्श्वभाग उघडा पडलाय! सारे आरोपी निर्दोष आहेत, मग बॉम्बस्फोट घडवले कुणी. ज्या पामरांचा जीव यात गेला त्या बिचाऱ्यांचा दोष काय होता. दोन दिवस याबाबत उलटसुलट बातम्या येतील. मग सारं विसरलं जाईल. लोकांची स्मृती क्षीण झालीय. विचार करण्याची बुद्धी कुंठीत झालीय. नैतिकतेचं अधिष्ठान कुठंच दिसत नाही. एकच कायदा पण कायदेतज्ञ दोन्ही मान्यवर न्यायाधीश इतका भिन्न भिन्न अन्वयार्थ काढतात, एक आरोपींना फाशी देतो तर दुसरा निर्दोष सोडतो. धन्य आहे तो कायदा आणि न्यायव्यवस्था! याला समाजही जबाबदार आहे. त्याचं सत्वच हरवलंय, ते समाज धुरिणांनी जागवायला हवंय..!"
--------------------------------------
आपल्या देशातल्या न्यायसंहितेची पानं पूर्णपणे सड़लेलीत, अशी भावना लोकांची होतेय. ही गंभीर बाब आहे. दहशतवादी आरोपी जर निर्दोष सुटत असतील तर मग निष्पापरित्या या बॉम्बस्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या असहाय नातेवाईकांनी न्यायची भीककुणाकडे मागायची? बॉम्बस्फोट झाला होता की नाही, हे तरी आता तपास यंत्रणांनी सिद्ध करावं म्हणजे झालं! निकालासाठी इतक्या वर्षाचा लागलेला कालावधी, संशयितांची ससेहोलपट याला काय म्हणावं? एनआयए ही काही कोणत्या पक्षाची नाही तर ती भारत सरकारची तपास यंत्रणा आहे. 'नॅशनल इन्व्हेस्टिकेशन एजन्सी'! त्यांनी या साऱ्या आरोपींना फाशी देण्यात यावी अशी हायकोर्टात मागणी केली होती. पण कोर्टानं त्यांना निर्दोष सोडून दिलंय. मालेगाव खटल्यातल्या आरोपी ठाकूर या तर पाच वर्षे संसदेत भाजपच्या खासदार होत्या. निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ' ही भगव्याची जीत आहे, भगवा कधीच दहशतवादी असू शकत नाही...!' अशी टिपण्णी केली. शिवाय या निकालाच्या विरोधात राज्य सरकार काही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही असंही स्पष्ट केलं. मात्र मुंबई बॉम्बस्फोट निकालाविरोधात सरकार जाणार आहे. हा तर सरकारचा धार्मिक, जात समूहपरत्वे विरोधाभास स्पष्ट दिसतोय. ब्रिटिश सरकारनं १९१९ मध्ये असा निष्कर्ष काढला होता की, भारतीय लोकांमध्ये न्यायबुद्धी नाहीये. ज्युडिशियल सेन्स नाही! त्यामुळं इथं आपला-परका असं न्याय देताना केलं, पाहिलं जाईल. हे तपास यंत्रणा, न्यायालय यांच्याकडून खरं होताना दिसतंय. या खटल्यातले सरकारी वकील रोहिणी सालियान यांना सत्ताबदल झाल्यानंतर एनआयएनं न्यायालयात कामकाज हळू चालविण्याचा आदेश दिला होता. या केसचा तपास करणारे हेमंत करकरे यांची मुंबई बॉम्बहल्ल्यातल्या दहशतवाद्यांनी हत्या केली तेव्हा याच खासदार आरोपीनं 'माझा शाप करकरेंना लागला म्हणून त्यांची हत्या झालीय...!' असं म्हटलं होतं. पोलिस कमिशनर परमजीत सिंग यांनी तर सरसंघचालक मोहन भागवत यांनाच मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात अटक करावी असं सांगितलं होतं असं या केसमधले एनआयएचे तपास अधिकारी मुजावर यांनी नुकतंच स्पष्ट केलंय. ही बिघडत चाललेली व्यवस्था आपण आज पाहतोय म्हणून थोडीशी खटल्यांच्या निकालाची पार्श्वभूमी सांगितली.
सामाजिक क्षेत्रात स्वातंत्र्यपूर्व काळातल्यापेक्षा कितीतरी अधिक समाजसेवक निरपेक्षपणे काम आज करताहेत. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. संसदेत आणि बाहेरही जे कायदे मोडतात अशांनाच भरपूर प्रसिद्धी दिली जाते. मानवतेसाठी शांतपणे कामं करणारेच या देशाला आणि समाजाला तारू शकतील. अजून सारं काही संपलेलं नाही, अजूनही या देशाला आशा आहे. या देशात फार मोठे राजकीय पुढारी आहेत, कार्यशूर नोकरशहा आहेत, वैज्ञानिक आहेत, विद्वान आहेत म्हणून नाही, निष्काम, निर्लेप काम करणारे समाजसेवक आहेत म्हणून. आज कुणीच नैतिक धर्म पाळत नाही. प्रत्येकानं आपला धर्म पाळायला हवा. राजकारण्यांनी, नोकरशहांनी त्यांचा धर्म पाळावा. शिक्षकांनी शिक्षकांचा धर्म पाळावा. त्यांनी समाजसेवेचा मार्ग अनुसरायला हवा. चोहीकडे अंधार असताना शिवाजी महाराज लोकमान्य टिळक, महात्मा गांधी हे प्रकाश झाले. त्यांच्यामध्ये एक सत्व होतं. क्रियेची सिद्धी या सत्वातूनच होते, साधनानं नाही. सत्वात शक्ती असते. लोकात सत्व नसेल तर लोकशाही फुकट जाईल. कंबरडं मोडलेला रडका, पिचका, मोडका माणूस तुटेल, मोडेल, पडेल, पैशाने विकला जाईल तर लोकशाहीला काही अर्थच राहणार नाही!
विवेकानंद तरुण होते तेव्हाची गोष्ट. ते गंगेवर गेले तेव्हा त्यांच्या मागं माकडं लागली. ते पळायला लागले तसा माकडांना चेव आला. ती अधिक जोरानं त्यांच्यामागे पळू लागली. तेव्हा एका वृद्धानं ओरडून म्हटलं, तरुण संन्याशा, असा पळू नकोस. माकडं त्यानं पाठ सोडणार नाहीत. तोंड फिरवून उभा राहा. माकडांकडे डोळे रोख. विवेकानंद तसं उभं होताच एकेक माकड पळून गेलं. दुःखाकडे असं बघता यायला हवं. रडका-मोडका माणूस या देशाला नाही चालणार. आज माणूस पडलाय, मोडलाय. माणूस विकत मिळतो. गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना विकत घेता येतं. जिथं माणसाचा विक्रय सुरू होतो तिथं सगळं संपतं. माणसाला कणाच राहिलेला नाही. भक्ती संप्रदायातही वेगळेवेगळे पंथ, विचार आहेत. त्यांच्यात हाणामाऱ्या, द्वैती, अद्वैती, विशिष्ट अद्वैती आहेत. आमच्या भांड्याला अनेक भोकं पडलीत त्यातून सगळ्या चांगल्या गोष्टी गळून चालल्यात. विहिरीत पाणी खूप चांगलं आहे, पण ते वर आणण्यासाठी भोक पडलेलं भांडं वापरलं तर पाणी वर येणार कसं? समाजाची उन्नती करणारेही भोकं पडलेले. प्रत्येक पार्टीचं वेगळं भोक. प्रत्येक पक्षाला, समाजाला वर आणायचंय. गरिबी मिटवायचीय. मग एकमेकाला विरोध का? ही भोकं बुजवायला हवीत. माणसाला जागवायचं नाही. माणूस जागा झाला तर आपलं काय, अशी भीती वाटतेय. धार्मिकांनी जे केले तेच राजकारणी करताहेत. माणसाला नशेत, झोपेत ठेवलं जातंय.
समाजाला उन्नतीकडे न्यायचं असेल तर संप्रदाय, पक्ष, वाद, भेदभाव उपयोगाचे नाहीत. समाजात धार्मिक विरुद्ध बुद्धीवादी असे भेद पाडू नका. धर्म पडका, सडका, जातीवादाने भरलेलाय. पण त्यात जे चांगलं आहे त्याचाही त्याग कशासाठी करायचा? या समाजाचा धार्मिकांनी नाश केला, असं बुद्धीवादी म्हणतात तर ह्या बुद्धीवाद्यांनी समाजाचा सत्यानाश केला असा कट्टर धार्मिक दावा करतात, हे आता थांबायला हवं. धार्मिकांनी थोडा बुद्धीवाद घ्यावा. बुद्धीवाद्यांनी थोडा धर्म मानावा, पिडलेल्या, पिळलेल्या माणसाला आत्मविश्वास देण्यासाठी हे करावं. कॉमरेडशिपचे युग संपलंय. रिलेशनशिपचे युग सुरू झालंय. समाजातल्या अंतिम माणसाला जवळ घ्यायला हवं. सरकारी मदतीनं, पैसे, तुकडे फेकून माणसं उभी राहात नाहीत, तर कुत्री उभी राहतात. लोकांना काय हवं, ते त्यांना कसं द्यायचं, कसं वळवायचं, कसं जागवायचं, कसं कामात गुंतवायचं याची विलक्षण जाण ज्यांना असते ते लोकशक्तीच्या सहाय्यानं लोकोत्तर गोष्टी करून दाखवतात लोकविश्वास जागवतात. लोकसेवेची नवी क्षेत्रं व्यापून लोकांमध्ये प्रेरणा पेरतात, चैतन्य जागवतात. मी हे केलं, माझ्यामुळं हे झालं असा दर्पही त्यांना येत नाही. ही माणसं तुटत, फुटत, मोडत, साथ सोडत नाहीत आणि मुख्य म्हणजे विकली जात नाहीत. कंबरडे मोडलेला रडका माणूस, राष्ट्र उभं करू शकत नाही. सामाजिक क्षेत्रात स्वातंत्र्यपूर्व काळातल्यापेक्षा कितीतरी अधिक समाजसेवक निरपेक्षपणे काम करत आहेत. त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. संसदेत आणि बाहेरही जे कायदे मोडतात अशांनाच भरपूर प्रसिद्धी दिली जाते. मानवतेसाठी शांतपणे कामं करणारेच या देशाला, समाजाला तारू शकतील. अजून सारं काही संपलेलं नाही, अजूनही या देशाला आशा आहे. या देशात मोठे पुढारी, कार्यशूर नोकरशहा, वैज्ञानिक, विद्वान आहेत म्हणून नाही, निष्काम, निर्लेप काम करणारे समाजसेवक आहेत म्हणून. कुणीच धर्म पाळत नाही. प्रत्येकानं आपला धर्म पाळायला हवा. राजकारण्यांनी, नोकरशहांनी त्यांचा धर्म पाळावा. शिक्षकांनी शिक्षकांचा धर्म पाळावा. कंबरडं मोडलेला रडका, पिचका, मोडका माणूस तुटेल, मोडेल, पडेल, पैशाने विकला गेला तर लोकशाहीला अर्थच राहणार नाही!
स्वतःला हिंदुत्वाचे सर्वेसर्वा म्हणवून घेणारे तथाकथित हिंदुत्ववादी नेते इस्लामभोवतीच विनाकारण घोटाळत आहेत. हिंदुत्व जागवायला इस्लामचा बागुलबुवा नाचवत आहेत. एकाचं भय दाखवलं की, दुसऱ्याबद्दल प्रेम वाटतं हा समज बालीश आहे. हिंदुत्वाची साऱ्या हिंदूंना आत्मीयता वाटावी याचा हा मार्ग नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, सगळ्यांतला होणारा आणि सगळ्यांचं वेगळेपण विसरायला लावणाराच समाजातला संघटित पुरुषार्थ जागवू शकतो. मी तोंडाची वाफ सोडून निखारे फुलवीन म्हणणाऱ्याला तोंडाची मर्यादा आणि निखाऱ्यांचं जळणं या दोन्ही गोष्टी समजलेल्या नसतात. राष्ट्राला चेतना, प्रेरणा प्राप्त होण्यासाठी निखारे पुरे नसतात. एकमेकाला चेतवणारं, ऊर्जा निर्माण करणारं, स्फुल्लिंग जागवणारा एखादाच पुरुष बऱ्याच काळानं निर्माण होतो. ज्यांचा उल्लेख आपण भगवान म्हणून करतो ते श्रीकृष्ण हे असं स्फुल्लिंग निर्माण करणारे महापुरुष होते. 'समाजाचं नैतिक आणि सांस्कृतिक स्थैर्य हाच धर्म,...!' असं सांगून त्यांनी फाजील धर्मश्रद्धेनं दुबळ्या बनलेल्या धर्मराजाला धक्का देऊन खऱ्या धर्माकडे नेलं. पांडवांनो, धर्म मार्ग सोडून लढा, 'आस्थियतां जये योगः धर्ममुत्सृज्य पांडवा...!,' असं सांगून आणि समजावून त्यांनी पांडवांना विजयी केलं. भीष्म-द्रोणांना कसं मारू म्हणणाऱ्या अर्जुनाला, मार त्यांना असं श्रीकृष्णानंच ठणकावलं. श्रीकृष्ण समाजउद्धारक होते. समाजसंघटक होते. सत्ता आणि संपत्ती यांचा कैफ चढलेल्या सम्राटांविरुद्ध त्यांनी सामान्य माणसाला लढायची प्रेरणा दिली. या सत्तासम्राटांचे धर्मनिष्ठेचे ढोंग लोकांपुढं उघडं करून, श्रीकृष्णांनी त्यांचा नाश करवला. सत्ता आणि संपत्ती यांचा कैफ चढलेल्या मोगलाईची मस्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसाचं संघटन करून, त्यांच्यात प्रेरणा निर्माण करून उतरवली. कालचक्र त्यांनी उलटं फिरवलं. लोकमानसातला अंधार संपवून कर्तृत्वाचे, निष्ठेचे शेकडो स्फुल्लिंग त्यांनी ह्या मातीतून उभे केले.
विवेकानंद तरुण होते तेव्हाची गोष्ट. ते गंगेवर गेले तेव्हा त्यांच्या पाठीमागं माकडं लागली. ते पळायला लागले तसा माकडांना चेव आला. ती अधिक जोरानं त्यांच्यामागे पळू लागली. तेव्हा एका वृद्धानं ओरडून म्हटलं, तरुण संन्याशा, असा पळू नकोस. माकडं त्यानं पाठ सोडणार नाहीत. तोंड फिरवून उभा राहा. माकडांकडे डोळे रोख. आणि विवेकानंद तसं उभं होताच एकेक माकड पळून गेलं. दुःखाकडे असं बघता यायला हवं. रडका-मोडका माणूस या देशाला नाही चालणार. आज माणूस पडलाय, मोडलाय. माणूस विकत मिळतो. गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना विकत घेता येतं. जिथं माणसाचा विक्रय सुरू होतो तिथं सगळं संपतं. धर्मात खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण आज एक दुसऱ्याला मारतो, उच्चनीचता जपतोय. कुठं गेलं ते तत्त्वज्ञान? भक्ती संप्रदायातही पंथ, विचार आहेत. त्यांच्यात हाणामाऱ्या, द्वैती, अद्वैती, विशिष्ट अद्वैती! आमच्या भांड्याला अशी अनेक भोकं पडलीत त्यातून सगळ्या चांगल्या गोष्टी गळून चालल्यात. विहिरीत पाणी खूप चांगलं आहे, पण ते वर आणण्यासाठी भोकं पडलेलं भांडं वापरलं तर पाणी वर येणार कसं? समाजाची उन्नती करणारेही भोकं पडलेले. प्रत्येक पार्टीचं वेगळं भोक. प्रत्येक पक्षाला, समाजाला वर आणायचंय. गरिबी मिटवायचीय. मग एकमेकाला विरोध का? ही भोकं बुजवायला हवीत. माणूस जागा झाला तर आपलं काय, अशी भीती वाटतेय सगळ्यांना. धार्मिकांनी जे केले तेच राजकारणी करताहेत. माणसाला नशेत, झोपेत ठेवलं जातंय. त्याला खऱ्या सत्याचा शोध घेऊ दिला जात नाही. एक श्रीमंत बाई आपल्या मोटारीनं कुठं तरी निघाली. पुढं ड्रायव्हर, मागं ती बाई आणि तिची मुलगी. तेवढ्यात नणंद म्हणाली, मीही येते. ती मुलीजवळ बसली. मावशी आणि आत्याबाईही आल्या. त्या ड्रायव्हरशेजारी बसल्या. आता गाडी निघणार तेवढ्यात विहिणबाई आल्या. तेव्हा ड्रायव्हरला खाली उतरायला सांगून ती जागा विहिणबाईंना दिली. सगळ्यांची सोय झाली, पण गाडी जागच्या जागीच. ड्रायव्हरला खाली उतरवल्यावर गाडी चालणार कशी? आपण हेच केलंय. सर्व जीवन चालवणाऱ्या ड्रायव्हरलाच आपण खाली उतरवलाय. जीवन मग चालणार कसं?
बुद्धीवादी म्हणतात, आम्हाला देव नको. रडक्या, मोडक्या, खचलेल्या, पिचलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या माणसाला आत्मगौरवातून सामर्थ्य मिळवून देण्यासाठी, ताठ मानेनं उभं करण्यासाठी साधन म्हणून देवाचा वापर करायला काय हरकत आहे? समाजाला उन्नतीकडे न्यायचं असेल तर संप्रदाय, पक्ष, वाद, भेदभाव उपयोगाचे नाहीत. समाजात धार्मिक विरुद्ध बुद्धीवादी असे भेद पाडू नका. धर्म पडका-सडका-जातीवादाने भरलेलाय. पण त्यात जे चांगलं आहे त्याचाही त्याग कशासाठी करायचा? या समाजाचा धार्मिकांनी नाश केला, असं बुद्धीवादी म्हणतात, तर ह्या बुद्धीवाद्यांनी समाजाचा सत्यानाश केला असा कट्टर धार्मिक दावा करतात. धार्मिकांनी थोडा बुद्धीवाद स्वीकारावा, बुद्धीवाद्यांनी थोडा धर्म मानावा, पिडलेल्या, पिळलेल्या माणसाला आत्मविश्वास देण्यासाठी हे करावं. कॉमरेडशिपचे युग संपलंय. रिलेशनशिपचे युग आता सुरू झालंय. समाजातल्या अंतिम माणसाला आपण जवळ घ्यायला हवं. सरकारी मदतीनं, पैसे, तुकडे फेकून माणसं उभी राहात नाहीत, तर कुत्री उभी राहतात. माणसानं माणसाजवळ जायला हवं. प्रेमाचा उबारा देऊन सर्वसामान्य माणसाचं सत्व जागवावं...!'
चौकट
'नरोटीची उपासना...!'
या लेखाचा जो मथळा दिलाय 'नरोटीची उपासना...!' याचा अर्थ नारळाची उपासना न करता त्याच्या करवंटीची उपासना करायची असा त्याचा अर्थ आहे.
कोणत्याही समाजाची धारणा व्यवस्थित व्हावी, योगक्षेम नीट चालावा, उन्नती व्हावी, म्हणून समाज धुरीणांनी वेळोवेळी काही तत्त्वं निश्चित करून काही नियम, काही शासने आहेत. त्या शासनांच्या मागचा जो मूळ हेतू आहे, त्याकडे लक्ष ठेवून जोपर्यंत समाज त्यांचं पालन करत असतो, तोपर्यंत ती फलदायी होतात. समाजाच्या धारणपोषणाला, रक्षणाला, अभ्युदयाला त्यांचं साह्य होतं. पण कालांतरानं स्वार्थामुळं, मोहामुळं, अज्ञानामुळं, आळसामुळं, श्रद्धाशून्यतेमुळं त्या मूलतत्त्वांचा विसर पडून समाज त्या शासनाच्या केवळ जडस्वरूपाचा उपासक बनतो. तो फक्त त्याची चौकट, त्याचा सांगाडा, त्याचं बाह्यस्वरूपच तेवढं जाणतो. अंतरीचं सत्त्व, त्याचा आत्मा तो जाणत नाही. नारळाची नरोटीच फक्त त्याला दिसते. आतलं खोबरं कोणी नेले, ते नासले तरी त्याच्या ध्यानातच येत नाही. तो फक्त त्या नरोटीची उपासना करत असतो. पण त्याची श्रद्धा मात्र अशी असते की आपण श्रीफळाची उपासना करतो आहोत. समाजाचा अधःपात तेथूनच सुरू होतो. धर्म, विद्या, नीती, राजकारण, समाजव्यवस्था या प्रत्येक क्षेत्रात, जेव्हा जेव्हा जड, बाह्य स्वरूपावर, केवळ कर्मठ आचारांवर, टिळेटोपी-गंधमाळांवर, यांत्रिक कसरतींवर समाज आपलं लक्ष केंद्रित करतो त्यावेळी त्या त्या संस्थेचा ऱ्हास होऊ लागतो. आणि सर्वच क्षेत्रांत नरोटीची उपासना सुरू झाली की, एकंदर समाज रसातळाला जातो. हिंदुधर्माचा आणि हिंदुसमाजाच्या धारणेचा, रक्षणाचा, स्वातंत्र्याचा, योगक्षेमाचा, संपन्नतेचा, अभ्युदयाचा काही संबंध आहे ही कल्पना मनाला शिवत नाही. धारण, पोषण, रक्षण, समृद्धी, स्वातंत्र्य, अभ्युदय हे ज्यानं साध्य होईल तो धर्म, याची जाणीव त्यांच्या मनातून लुप्त होते, यालाच नरोटीची उपासना म्हणतात!.
हरीश केंची,
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment