Friday, 1 August 2025

शाहीर अण्णाभाऊ साठे

"जग बदल घालूनी घाव। 
सांगुनी गेले मज भीमराव l
गुलामगिरीच्या या चिखलात। 
रुतुन बसला का ऐरावत l
अंग झाडूनी निघ बाहेरी l 
घे बिनीवरती घाव ll"
डॉ बाबासाहेबआंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून जातीअंताचा लढा उभारणारे थोर समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन...! कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतले अण्णाभाऊंनी लेखन केलेलं, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक. अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावचा, उपेक्षित समजल्या गेलेल्या मातंग समाजातला. त्यांच्या वडिलांचं नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचं नाव वालबाई. त्यांचं मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव ता. वाळवा जि. सांगली. लौकिक अर्थानं त्यांचं शालेय शिक्षण झालेलं नव्हतं; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविलं. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणं, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडं घेऊन हिंडणं, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामं त्यांनी केली. मुंबईत कामगारांचं कष्टमय, दुःखाचं जीवन त्यांनी पाहिलं. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणं त्यांनी ऐकली. पक्षाचं कामही ते करीत होतेच, तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्यानं ते पुन्हा आपल्या गावी आले. तिथं बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. तमाशातून जुन्या चालीचा सुरवातीचा साठा अण्णाभाऊंनी आत्मसात केला. मुंबईत परतताच त्यांना 'मॅक्झिम गोर्की'चं साहित्य वाचायला मिळालं. लिखाणाची उर्मी त्यांना याच साहित्यानं दिली. तो काळ १९४२ च्या चळवळीचा. ते स्वातंत्र्य समरांगणात सहभागी झाले, म्हणून इंग्रज सरकारनं त्यांच्यावर पकड वारण्ट काढलं. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले, त्याच काळात त्यांची भेट शाहीर अमर शेख, द.ना.गव्हाणकरांशी झाली. आपसातले हेवेदावे, गरीब जनतेला, शेतकऱ्यांना मिळणारा, छळणारा दारिद्र्याचा झगडा त्यांनी न्याहाळला होता. त्यातच 'मॅक्झिम गोर्की'च्या साहित्यानं प्रभावित झालेल्या त्यांच्या अंतरीच्या उर्मीं प्रतिभेला बहर आला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागलं. त्यांनी लिहिलेला ‘स्टालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख आणि गव्हाणकर यांच्या मदतीनं ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केलं. या कलापथकावर सरकारनं बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्ध झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतताचे आवाहन त्यांनी केलं होतं.
वर्गीय क्रांतीची उकल करण्यासाठी त्यांनी तमाशाचा बाज नेमकेपणानं उचलला. तमाशातल्या नृत्यांगनेचे चाळ काढून टाकलं आणि वीररसाच्या अंगाराचे चाळ चेतावणारा बंडखोर बंडागळी उभा केला. जुन्या कथेचा ढाचा ठेऊन नव्या युगाचा अकलेचा मोर्चा बांधला. तमाशात परंपरेनं चालत आलेला गण बदलून टाकला. त्याजागी श्रमशक्तीला अभिवादन करणारा गण मोठ्या तडफेनं साकारला. आरंभलाच खऱ्या-खोट्याचं कोडं घालून सामान्यातल्या सामान्य माणसाचं कुतूहल वाढवत त्यांनी आदिवासींची, कोळी-भिल्लांची, मांग-महार, रामोशांच्या व्यथा, वेदनांचा हुंकार शाहिरीच्या लोकबाजातून कथा-कादंबऱ्यांतून मांडला. पुढे अण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं स्मरण देऊन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकरांसमवेत “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतेया काहिली” ही लावणी अजरामर केली.
अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची काही लोकनाट्य होत. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिलं. अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्या कंजारी (१९६० ), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा  हे त्यांचे काही कथासंग्रह. त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९ , आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता  ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्य सूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१, कादंबरी–वैजयंता), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी–आवडी), डोंगरची मैना (१९६९, कादंबरी–माकडीचा माळ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी–चिखलातील कमळ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी–वारणेचा वाघ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी–अलगूज), फकिरा (कादंबरी –फकिरा ). या शिवाय इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.
अण्णाभाऊ साठे हे देशातल्या उपेक्षित लोक जीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांचा व्यथा-वेदना कथा कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात, अशी त्यांची धारणा होती. अण्णाभाऊंचे साहित्य देशाबाहेर अगदी पोलंड, रशियातही लोकप्रिय झालं. जनमानसात प्रसिद्ध पावलं अण्णाभाऊंच्या मते ग्रामीण जीवन टिकाऊ काया आहे, तर शहरी जीवन दिलखुलास आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, लोकहितवादी, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीचा ग्रामीण दलित जीवनातच पाया आहे आणि त्याच पायावर लिहिलेल्या अण्णाभाऊंच्या कथा-कादंबऱ्या ही साहित्यक्षेत्रात समाज संक्रमणाची पहिली किमया आहे. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिकही होऊ शकतो, हे अण्णाभाऊंनी दाखवून दिलं. अण्णाभाऊंची लेखणी धारदार होती. 'पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तारली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे...!' असं ते म्हणत. यांच्या लेखनाचा प्रेरणास्त्रोत सोशीत-उपेक्षितच होता. अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा आगळा-वेगळा गुण. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभूती घेतली, त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवत राहतो. लेखनातील लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखन शैलीवर त्यांनी सर्वस्व अर्पण केलं होतं. रशियाच्या इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी च्या निमंत्रणावरुन ते १९६१ साली रशियात गेले. त्यांवर त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन लोकप्रिय झाले. त्यांचं व्यक्तिमत्व विविध कलागुणांनी भरलेलं होतं. ते उत्तम अभिनय करीत. हातात डफ घेऊन शाहिरी कवनं मोठ्या तडफेनं गात. बुलबुल, बासरी, हार्मोनियम अशी वाद्येही ते वाजवीत. दांडपट्टा फिरवीत. शिवाय स्वतःच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी नवयुग, युगांतर आणि आचार्य अत्रेंच्या मराठा वर्तमानपत्रातून अनेक लेख आणि पुस्तकांची परीक्षण लिहिली.
अण्णाभाऊंच्या शेवटच्या काळ मात्र हलाखीत गेला. दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं. मराठी साहित्यातल्या प्रतिष्ठितांकडून त्यांची तशी उपेक्षाच झाली. विपन्नावस्थेत गोरेगावच्या सिध्दार्थनगरात त्याचं निधन झालं. ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्याचदिवशी अण्णाभाऊच निधन झालं. नेहमीप्रमाणे ते रात्रीचं काम आटोपून घरी आले आणि झोपले. ते तिथं एकटेच राहत होते. दुसऱ्या दिवशी दुपार झाली तरी ते उठले नाहीत म्हणून शेजारी राहणाऱ्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. मग वस्तीतल्या लोकांनी दरवाजा तोडला. पाहिलं तर अण्णाभाऊ गत:प्राण झाले होते. वस्ती गोळा झाली. कुणीतरी तत्कालीन समाजकल्याण मंत्री बाबुराव बारस्कर यांना निधनाची बातमी कळवली. भारस्कर तिथं दाखल झाले. त्यांनी सारी चौकशी केली. त्यांच्या घरात शोध घेतला पण कुठेच काही नव्हतं. मग भारस्करांनी तिथं पुढारपण करणाऱ्या समाजाच्या एकाला जवळ बोलावलं. खिशातून काही रक्कम काढून त्याच्या हातावर ठेवली. अण्णाभाऊ यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी ते पैसे त्यांनी दिले होते. निधनाची वार्ता समजताच अनेक लोक सिद्धार्थनगर इथं दाखल होत होते. मोठी गर्दी जमली होती. त्या गर्दीचा फायदा घेऊन ज्याच्याकडे भारस्करांनी पैसे दिले तो गायब झाला. अंत्यविधी होणार कसा? मग अण्णाभाऊचे मित्र शाहीर अमर शेख यांनी वस्तीभर फिरून पैसे गोळा केले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला गेला. अण्णाभाऊंच्या अस्थी विसर्जनापर्यंतचे सारे सोपस्कार अमर शेखांनी मैत्रीच्या नात्यानं पार पाडले. आज अण्णाभाऊंच्या नावाने मोठा उत्सव केला जातो. पण तोच खर्च समाजातल्या अनेक सुप्त अण्णाभाऊ शोधून त्यांना मदत केली जाऊ शकते. तसं घडलं तर अनेक अण्णाभाऊ निर्माण होतील. आज अनेक विद्यापीठातून अल्पशिक्षित अण्णाभाऊंवर अनेक प्रबंध लिहिले गेले आहेत. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरं झाली आहेत. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...! पायात मोडलेल्या काट्यावरही साहित्यिक सौंदर्य कोरुन थेट अंतःकरणाला जाऊन भिडणारी साहित्यसंपदा निर्माण करणारे लोकशाहिर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन, लाल सलाम

No comments:

Post a Comment

राजसत्तेची कोंडी...!

"देशात 'मतचोरी'च्या आरोपामुळं वातावरण ढवळून निघालंय. अनेक बाबी उघड झाल्यात. हरियाणातला ईव्हीएम घोटाळा सर्वोच्च न्या...