पुण्याच्या रमणबागेत ज्येष्ठ लेखक रविंद्र भट यांच्या स्वा.सावरकर यांच्या जीवनावरील 'अनादी मी अनंत मी...!' या कादंबरीचं प्रकाशन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होतं. मोठ्यासंख्येनं महिला उपस्थित होत्या. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी खुदिराम बोस या तरुणानं स्वातंत्र्य लढ्यासाठी कसा लढा दिला, बॉम्ब कसा बनवला अन् इंग्रज अधिकाऱ्यावर तो फोडण्याचा प्रयत्न कसा केला. त्यानंतरचा खुदिरामचा जीवाच्या आकांतानं पळून जाण्याचा प्रयत्न. कोर्टात त्याला सुनावलेली फाशी. त्यानंतर आईशी त्याची झालेली अखेरची भेट. तिच्याशी बोलताना त्यानं आईला पुनर्जन्माचा दिलेला विश्वास. या साऱ्याचं शिवसेनाप्रमुखांनी अत्यंत हृदयस्पशी वर्णन ऐकताना उपस्थित महिलाच नव्हे तर पुरुषही ढसाढसा रडत होते. शिवसेनाप्रमुख खुदीरामच्या भाषेत सांगत होते, 'ए आई... मी तुला पुत्रसुख देऊ शकलो नाही. पण हा जन्म माझ्या मातृभूमीसाठी होता. माझा पुनर्जन्म होणार आहे. आज माझे वडील हयात नाहीत पण आजपासून ९ महिने ९ दिवसांनी मी माझ्या मावशीच्या पोटी जन्म घेऊन पुन्हा येईन. तेव्हा तू मला कशी ओळखशील? जर ओळखू शकली नाहीस तर माझ्या गळ्याकडे बघ, माझ्या गळ्यावर फासाचे वळ असतील, ते पाहून तू ओळखू शकशील की तोच तुझा खुदिराम आहे....!' अशा या खुदिराम बोस यांचा आज ११ ऑगस्ट रोजी स्मृतिदिन. त्याला विनम्र अभिवादन...!
खुदिराम बोस हा हातात गीतेची प्रत घेऊन १८ व्या वर्षी फासावर गेलेला तरुण क्रांतिकारक होता.
१९ जुलै १९०५ रोजी लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी केली. त्यामुळे बंगालच नाही तर सगळ्या भारतभरात इंग्रजांच्या विरोधात आक्रोश व्यक्त होऊ लागला होता. सर्वत्र निदर्शनं, मोर्चे, परदेशी मालावर बहिष्कार घातला जाऊ लागला. तसेच वर्तमानपत्रात इंग्रजांविरोधात लेखांचा ओघच सुरू झाला. त्याच काळात स्वामी विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त यांच्या ‘युगांतर’ वर्तमानपत्रात एक लिहिला होता. इंग्रज सरकारने त्याला राजद्रोह मानलं आणि कारवाई सुरू केली. कलकत्ता प्रांताचे मॅजिस्ट्रेट डग्लस किंग्जफोर्ड यांनी सगळा छापखाना जप्त करायचा आदेश दिला आणि तो लेख लिहिल्याबद्दल भूपेंद्रनाथ यांना एका वर्षाचा कारावास ठोठावला. या निर्णयामुळे आगीत तेल ओतल्यासारखंच झालं.
इतकंच नाही तर किंग्जफोर्ड यांनी वंदे मातरमची घोषणा देणाऱ्या एका १५ वर्षांच्या मुलाला वेताचे १५ फटके देण्याची शिक्षा केली. यानंतर ६ डिसेंबर, १९०७ च्या रात्री मिदनापूर जिल्ह्यातील नारायणगडजवळ बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर अँड्र्यू फ्रेजर यांची रेल्वे बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न झाला. त्यात बरिंद्र घोष, उलासकर दत्त आणि प्रफुल्ल चाकी सहभागी होते.
१९०६ साली मिदनापूर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सत्येंद्रनाथ बोस यांनी वंदे मातरम शीर्षकासह एक पत्रक प्रसिद्ध केलं आणि या कार्यक्रमात त्याचं वितरण करण्याचं काम खुदिराम बोस याला दिलं होतं. या पत्रकात ब्रिटिश सरकारविरोधात मजकूर होता. खुदिराम ही पत्रकं वाटत असल्याचं इंग्रजांच्याप्रती प्रामाणिक असणाऱ्या रामचरण सेन यानं पाहिलं. ही माहिती त्यानं तिथं तैनात असलेल्या शिपायाला दिली.
त्या पोलीस शिपायानं खुदिरामला पकडण्याचा प्रयत्न केला, पण खुदिराम यानं त्या शिपायाच्या तोंडावर एक ठोसा दिला. तितक्यात तिथं दुसरे पोलीस आले आणि सर्वांनी मिळून खुदिराम बोस याला पकडलं. खुदिराम बोस यांचं चरित्र लिहिणारे लक्ष्मेंद्र चोपडा लिहितात, "सत्येंद्रनाथही त्याच कार्यकर्मात फिरत होते. त्यांनी शिपायांना ओरडून सांगितलं, तुम्ही डेप्युटी मॅजिस्ट्रेटच्या मुलाला का पकडलं आहे? असं म्हणताच शिपाई गांगरले, त्यांची पकड सैल होताच खुदिराम तिथून पळून गेला. त्यानंतर डी वेस्टन कोर्टानं सत्येंद्रनाथ यांच्यावर पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवून खटला चालवला मात्र तो आरोप सिद्ध होऊ शकला नाही. कोर्टानं आपला निर्णय अशा विशिष्ट प्रकारे दिला की, १९०६ मध्ये सत्येंद्रनाथ यांना अध्यापकपदावरून निलंबित करण्यात आलं. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी पिस्तुल घेऊन मुजफ्फरपूरला पोहोचले
८ एप्रिल १९०८ रोजी १८ वर्षांचा खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांना डग्ल किंग्जफोर्डची हत्या करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. याआधी किंग्जफोर्ड यांची पार्सल बॉम्ब पाठवून हत्या करण्याचा प्रयत्न क्रांतिकारकांनी केला होता. मात्र ते पार्सल किंग्जफोर्डनी उघडलं नाही, ते दुसऱ्याच कर्मचाऱ्यानं उघडलं आणि तो जखमी झाला.
या दरम्यान क्रांतिकारकांच्या कारवायांना घाबरुन किंग्जफोर्डने आपली बदली बंगालपासून दूर बिहारमधील मुजफ्फरपूरला करुन घेतली. युगांतकारी संघटनेतर्फे खुदिराम बोसला दोन पिस्तुलं आणि प्रफुल्ल चाकीला १ पिस्तुल आणि काडतुसं देण्यात आली आणि मुजफ्फरपूरला पाठवण्यात आलं. हेमंचद कानुनगो यांनी त्यांना काही हातबॉम्बही दिले.
लक्ष्मेंद्र चोपडा लिहितात, "१८ एप्रिल १९०८ रोजी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी आपल्या मोहिमेवर मुजफ्फरपूरला पोहोचले. तिथं दोघेही वीर मोती झील भागात एका धर्मशाळेत उतरले. दोन्ही तरुणांनी किंग्जफोर्डच्या घराचं आणि त्यांच्या दिनचर्येचं बारीक निरीक्षण सुरू केलं. तोपर्यंत पोलिसांच्या गुप्तचर विभागाला या योजनेची थोडीशी माहिती मिळाली होती. त्यांनी किंग्जफोर्ड यांना सांगून त्यांचं संरक्षण वाढवलं होतं. किंग्जफोर्ड प्रत्येक रात्री व्हिक्टोरिया बग्गीतून आपल्या बायकोबरोबर स्टेशन क्लबमध्ये येतात हे खुदिराम आणि प्रफुल्ल यांना लक्षात आलं होतं. क्लबमधून येताना त्यांच्या बग्गीवर बॉम्ब टाकायची योजना त्यांनी आखली. रात्री साडेआठ वाजता फेकला बॉम्ब. त्या काळी मुजफ्फरपूरच्या स्टेशन क्लबात मोठी रेलचेल असे. तिथं रोज संध्याकाळी ब्रिटिश अधिकारी आणि उच्चपदस्थ भारतीय एकत्र येऊन पार्टी करत. तिथं बैठे खेळही खेळले जात. मात्र कलकत्त्याच्या तुलनेत इथली संध्याकाळ लवकर आटपत असे. त्या संध्याकाळी किंग्जफोर्ड एक इंग्रज बॅरिस्टर प्रिंगल कॅनेडी यांची पत्नी आणि मुलीसह ब्रिज खेळत होते. ३० एप्रिल १९०८ चा तो दिवस होता. साडेआठ वाजता खेळ संपल्यावर श्रीमती कॅनेडी आणि ग्रेस कॅनेडी एका बग्गीत बसल्या. ही बग्गी अगदी किंग्जफोर्ड यांच्या बग्गीसारखीच होती. या दुसऱ्या बग्गीत किंग्जफोर्ड दाम्पत्य बसलं. त्या दोघींनीही किंग्जफोर्ड यांच्या घरावरुन जाणाराच रस्ता घेतला होता!"
नरुल होदा आपल्या 'द अलिपूर बॉम्बकेस' पुस्तकात लिहितात, "ती रात्र अंधारी होती. किंग्जफोर्ड यांच्या घराच्या आवाराजवळ पूर्वेकडील दाराजवळ बग्गी आली तेव्हा रस्त्याजवळ लपलेले दोघे त्यादिशेने पळत आले आणि त्यांनी बग्गीवर बॉम्ब टाकले.
बग्गीच्या ठिकऱ्या उडाल्या आणि त्यात बसलेल्या दोन्ही महिलांना गंभीर जखमा झाल्या. बग्गीबरोबर असेला सेवक जखमी होऊन खाली पडला. सर्व जखमींना किंग्जफोर्ड यांच्या घरी नेण्यात आलं. ग्रेस कॅनेडी यांनी एका तासात प्राण सोडले तर श्रीमती कॅनेडी यांचा २ मे रोजी मृत्यू झाला...!" बोस आणि चाकी यांच्यावर ५ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर झालं. या घटनेच्या रेकॉर्डमध्ये नमूद करण्यात आलं, "बॉम्बस्फोट तितका तीव्र नव्हता. मात्र तो अचूक नेम धरुन फेकण्यात आला होता. जर त्यांचा नेम एखादा फुटभर जरी चुकला असता तरी दोनपैकी एका महिलेचा जीव वाचला असता...!"' जेव्हा कलकत्ता पोलिसांनी किंग्जफोर्ड यांच्या संभाव्य हत्येबद्दल सूचना दिली होती तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी दोन पोलीस कर्मचारी तहसिलदार खान आणि फैयाजुद्दिन यांची नेमणूक करण्यात आली होती.
३० एप्रिल रोजी संध्याकाळी या दोघांना स्टेशन क्लब आणि किंग्जफोर्ड यांच्या घराच्यामध्ये गस्त घालण्याचं काम दिलं होतं. साडेआठ वाजता स्फोट झाल्यावर त्यांनी दोन लोकांना पळताना पाहिलं पण अंधारात ते गडप झाले होते. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी तिथून पळाले मात्र घाई-गडबडीत खुदिरामांच्या चपला तिथंच राहिल्या. या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी मुजफ्फरपूरमधून मोकामा अन् बांकीपूरच्या दिशेने या लोकांना पकडण्यासाठी पोलीस पाठवले. तसेच या लोकांची माहिती देणाऱ्यांना ५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं
या घटनेनंतर सर्व मुजफ्फरपूर शहरात सनसनाटीचं वातावरण तयार झालं. खुदिराम आणि चाकी रेल्वे रुळाजवळून धावत समस्तीपूरच्या जवळ वैनी रेल्वे स्थानकात आले. त्यांनी रात्रीच्या काळोखात सुमारे २४ मैलाचं अंतर पायीच पळत कापलं होतं. वैनी स्थानकाबाहेर दोन्ही क्रांतिकारकांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि जगलो-वाचलो तर कलकत्त्यात पुन्हा भेटू असा संकल्प करुन ते वेगवेगळ्या दिशेने निघाले...!" लक्ष्मेंद्र चोपडा लिहितात, “१ मे १९०८ रोजी सकाळी वैनी स्थानकाजवळ खुदिराम पाणी पिऊन विश्रांती घेत होते तेव्हा आजूबाजूचे लोक कालच्या घटनेची चर्चा करत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. त्यात एक जण सांगत होता, तो किंग्जफोर्ड मेला नाही पण बॉम्बमुळे इंग्रज आई-मुलगी मारली गेली. हे ऐकून खुदिरामला धक्का बसला आणि मग किंग्जफोर्ड मारला गेला नाही? असे शब्द त्यांच्या तोंडून अनवधानाने बाहेर पडले. तिथं काही इंग्रज पोलीस आणि हेर फिरत होते. खुदिरामला आलेला थकवा, उत्तेजित होऊन बोलणं, त्यांचं वय, बोलण्यातील बंगाली हेल, त्यांचं अनवाणी असणं य़ामुळे शंका निर्माण झाली आणि त्यांना पकडण्यात आलं. पकडताना त्यांच्या कपड्यातून एक पिस्तुल बाहेर पडलं. त्यांच्या खिशातून ३७ काडतुसं आणि ३० रुपयेही मिळाले...!” खुदिराम याच्या कंबरेला एक कोट बांधलेला होता. नंतर तहसिलदार खानने क्लबबाहेर खुदिराम याला हा कोट घातलेला असताना पाहिल्याचं सांगितलं. बोस यांना अटक झाल्यानंतर जिल्हा मॅजिस्ट्रेट वैनीला पोहोचले. नंतर तहसिलदार आणि फैयाजुद्दिन यांनी खुदिराम बोस याची ओळख पटवून ३० एप्रिल १९०८ साली क्लबसमोर दिसलेल्या दोघांपैकी हा एक असल्याचं सांगितलं. घटनास्थळी सापडलेल्या चपला खुदिराम याला घालून पाहण्यात आलं. ते अगदी बरोबर बसले मग खुदिराम यानं त्या आपल्याच असल्याचं सांगितलं. पोलिसांच्या चौकशीत बोस यांनी आपल्या साथीदाराचं खरं नाव न सांगता दिनेशचंद्र रॉय असं सांगितलं. खुदिराम बोस याला पोलिसांनी कैदी बनवून मुजफ्फरपूर स्थानकात नेलं तेव्हा त्यांना पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली
१ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता सब इन्स्पेक्टर नंदलाल बॅनर्जी यांनी सिंहभूमला जाणारी रेल्वे पकडली. समस्तीपूर स्थानकावर नंदलालने फलाटावर नवे कपडे आणि चपला घातल्याचं पाहिलं. त्यांना या वेशभूषेमुळे शंका आली. हा युवक ज्या डब्ब्यात बसला त्याच डब्यात नंदलाल घुसले. त्यांनी त्या युवकाशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो युवक नाराज होऊन दुसऱ्या डब्यात गेला. मोकामा घाट स्थानकाजवळ असताना नंदलाल पुन्हा तो युवक ज्या डब्यात बसला होता त्या डब्यात गेले.
या काळात आपल्याला आलेली शंका त्यांनी लिहून मुजफ्फरपूर पोलिसांना तारेने कळवली. मोकामा स्थानकात त्या तारेला उत्तरादाखल तार आली होती. आपल्याला पकडलं जाणार हे कळताच त्या युवकानं फलाटावर उडी मारली. नरुल होदा लिहितात, “तो युवक महिलांच्या विश्रांतीकक्षाच्या दिशेने पळाला. तिथं जीआरपीच्या पोलिसानं त्याला पकडायचा प्रयत्न केला. तेव्हा तो युवकानं त्या जवानाच्या दिशेनं गोळीबार केला मात्र नेम लागला नाही. त्या युवकाला घेरल्यानंतर त्यानं स्वतःवर दोन गोळ्या झाडून घेतल्या. एक गोळी गळ्याला आणि दुसरी कॉलर बोनला लागली. तो तिथंच मृत्युमुखी पडला. प्रफुल्ल चाकी यांची ओळख पटवायला तो देह मुजफ्फरपूरला पाठवला गेला. तिथं तहसिलदार खान आणि फैयाजुद्दिन यांनी क्लबजवळ फिरणाऱ्या खुदिरामबरोबर हा माणूसही होता असं सांगितलं. त्यानंतर तो देह खुदिरामला दाखवला. खुदिरामनं तो ओळखला मात्र त्यांचं नाव मात्र दिनेशचंद्र रॉय असं सांगितलं. चाकी यांचं पिस्तुल दाखवल्यावर ते खुदिराम ओळखू शकला नाही. मात्र दिनेश यानं आपल्याजवळ पिस्तुल असल्याचं सांगितलं होतं, असं ते म्हणाले. या घटनेच्या ५ महिन्यांनी ९ नोव्हेंबर १९०८ रोजी प्रफुल्ल चाकी यांना अटक करणाऱ्या नंदलाल बॅनर्जींची श्रीशचंद्र पाल आणि गनेंद्रबाबू गांगुली यांनी कलकत्त्यात गोळी घालून हत्या केली.
खुदीराम यांच्यावर अपर सत्र न्यायाधीश एच. डब्ल्यू कॉर्नडफ यांच्या कोर्टात खटला चालवला गेला. खुदिराम यांना कोर्टात आणताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभं राहून लोक जिंदाबाद, वंदे मातरमच्या घोषणा देत. १३ जून १९०८ रोजी खुदिराम बोस यांना फाशीची शिक्षा झाली.
११ ऑगस्ट १९०८ रोजी सकाळी ६ वाजता भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका इतक्या किशोरावस्थेतील मुलाला फाशी देण्यात आली. त्यावेळेस खुदिराम याच्या हातात गीतेची एक प्रत होती. त्यांचं वय १८ वर्षं, ८ महिने ८ दिवस होतं. तुरुंगाच्या बाहेर त्यांना निरोप द्यायला आलेल्या मोठ्या जमावानं वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी खुदिराम बोस यांच्या हौतात्म्यावर अनेक लेख लिहिले.
मराठामधून त्यांनी १० मे १९०८च्या अंकात हा तीव्र विद्रोहाचा मार्ग आहे, याला इंग्रज सरकार जबाबदार आहे. संपूर्ण देशभरात खुदिराम बोस यांची चित्रं वाटली गेली. लेखक बाळकृष्ण भट्ट यांनी आपल्या एका व्याख्यानात खुदिराम बोस यांना श्रद्धांजली वाहिल्यामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली होती. मुन्शी प्रेमचंद यांनी खुदिराम यांचं एक चित्र आपल्या वाचनाच्या खोलीच्या भिंतीवर लावलं होतं. खुदिराम बोस यांच्या हौतात्म्याचा विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला. त्यांच्या मते, वंदे मातरम आणि आनंदमठाच्या वाचनाची, पाठांतराची आवड निर्माण झाली.
बंगालमधील विणकरांनी एक नव्या प्रकारचं धोतर विणायला सुरुवात केली त्यावर खुदिराम लिहिलेलं असे. पितांबर दास यांनी खुदिराम याच्यावर एक गाणं लिहिलं ते आजही बंगालमध्ये घराघरात गायलं जातं. ऐक बार बिदाए दे माघुरे आशि....(आई एकदा तरी मला सोड, म्हणजे मी फिरुन येऊ शकेन) असं ते गाणं आहे. त्यात पुढे लिहिलंय, दश माश दश दिन पोरे, जन्मो नेबो माशीर घरे मा गो, तॉखोन जोदी ना चीनते पारिश, देखबी गोलाए फांशी ( ए आई, आजपासून ९ महिने ९ दिवसांनी मी मावशीच्या घरी जन्म घेऊन पुन्हा येईन, जर तू मला ओळखू शकली नाहीस तर माझ्या गळ्याला फासाचे वळ पाहून तू ओळखू शकशील).
No comments:
Post a Comment