Sunday, 20 July 2025

बंधुत्वाची जिथे प्रचिती....!

"राज-उद्धव 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील का?
हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर सरकारनं हा निर्णय रद्द केला. या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा शनिवारी ५ जुलैला झालाय. त्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता पण राज आणि उद्धव ठाकरे यासाठी एकाच मंचावर आले होते. यापूर्वी मोर्चाचा निर्णय झाला तेव्हा संजय राऊत यांनी राज आणि उद्धव यांचा फोटो पोस्ट करत एक फेसबूक पोस्ट केली होती. दरम्यान, राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याबाबत काही वक्तव्य केली होती. त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करून शक्यता आणि परिणाम याबाबतचा आढावा."
--------------------------------------
"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितलं. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही तपासून पाहत आहोत. मी तुम्हाला फक्त संदेश नाही, तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात काहीही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ....." उद्धव ठाकरेंचं हे सूचक वक्तव्य आहे राज ठाकरेंच्या मनसेसोबतच्या युतीबद्दलचं. गेल्या अनेक वर्षांपासून राज आणि उद्धव एकत्र येतील असं बोललं जातं होतं. तशा चर्चाही रंगल्या होत्या. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला. कारण, दुसरं तिसरं कोणी नाही, तर थेट राज आणि उद्धव या दोघांनी तसे संकेत दिले होते.
१९ एप्रिलला राज ठाकरे यांनी सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं. राज म्हणाले, "कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत, महाराष्ट्र फार मोठा आहे. या महाराष्ट्र, मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळं एकत्र येणं- एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. परंतु हा विषय इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा...!" असं राज ठाकरे म्हणाले. या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ उत्तर दिलं होतं. "किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. परंतु, एकीकडे भाजपला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड, विरोध करणं असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत-स्वागत करणार नाही. त्याच्या पंगतीला बसणार नाही हे आधी ठरवा. मी माझ्याकडून भांडणं मिटवून टाकली, पण आधी हे ठरवलं पाहिजे. माझ्यासोबत हिंदुत्वाचं हित होणार की भाजपसोबत हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे. चोरांना गाठीभेटी, कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची, मग टाळी दिल्याची हाळी द्यायची," असं उद्धव म्हणाले होते. याशिवाय पत्रकार परिषदेत "संदेश कशाला आम्ही जी काही द्यायची ती थेट बातमीच देऊ", असं म्हणून पुन्हा एकदा दोघांच्या एकत्र येण्याबद्दल सूचक वक्तव्य केलं. दोघांनाही आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर दोघांनाही एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. या दोघांच्या एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षांतल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. याशिवाय मुंबई महापालिकेत देखील मराठी मतांचं होणारं विभाजन टळू शकतं.
दोघांचं एकत्र येणं दोघांसाठी फायद्याचं ठरेल. मात्र, त्याचे काही तोटे देखील असतील. कारण, काही बाबतीत राज आणि उद्धव दोघांच्या भूमिका परस्परविरोधी आहेत. त्यामुळे एकमेकांकडे गेलेले मतदार दोघं एकत्र आल्यानं, मतं एकमेकांकडे वळतील का? हा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे मधल्या काळात त्यांच्यासोबत काही लोक जोडली गेली आहेत. त्या लोकांना या दोघांचं एकत्र येणं कितपत रुचेल हा देखील प्रश्न आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्याविरोधात जी भूमिका घेतली त्याचा फटका बसू शकतो. काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत नसेल, तर काँग्रेसमुळे जी मतं जोडली गेली ती त्यांच्याकडे परत जाऊ शकतात. राज ठाकरेंसोबत जशी मतं येतील तशी काही मतं जातील सुद्धा. त्यामुळे कशासाठी किती गमवायचं याचा विचार त्यांना करावा लागेल. राज ठाकरेंनी मुस्लिमांविरोधात घेतलेली भूमिका ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसारखी होती, ती फक्त पाकिस्तानातल्या मुस्लिमांना विरोध करणारी होती हे राज ठाकरे मतदारांना पटवून देऊ शकले, विरोध करायचा, तर फक्त भोंग्यांच्या आवाजाला कशाला सगळेच आवाज बंद करा असा नरेटीव्ह राज ठाकरेंनी मांडला, तर या युतीचा नक्कीच मुंबईत फायदा होईल. कारण, मुस्लीम मतदारांना सुद्धा कुठे जायला पर्याय उरणार नाही. आज काँग्रेसची ताकद उरलेली नाही. काँग्रेस फारशी सक्रीय दिसत नाही. दोघंही किंतु-परंतु न ठेवता एकत्र आले तर फायदा होईल. पण, तो निर्णायक असेल का? राज ठाकरे यांच्याविषयी बोलणारे नेते म्हणून अनेकांना आकर्षण वाटतं. पण, नेता म्हणून भरोसा वाटत नाही. तो एकाएकी होऊ शकेल की नाही हे कठीण आहे.दोघांची विश्वासार्हता आणि दोघांचं मतदारांना होणारं अपील हे खूप कमी झालंय. एक अधिक एक दोन अशी बेरीज होईल का? अशी शंका आहे.
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची इतकी ताकद दिसत नाही. त्यामुळे ही युतीची चर्चा चाललीय ती फक्त मुंबई महापालिकेतील आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली आहे, असं बोललं जातंय. कारण, मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मा आहे आणि शिवसेनेनं मुंबईवर इतकी वर्षं सत्ता गाजवली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबई आपल्या हातून निसटू द्यायची नाही यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय. त्याचाच भाग म्हणून या युतीकडे बघितलं जात आहे. मात्र, हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर मुंबईतलं राजकीय समीकरण कसं बदलेल? मराठी आणि मुस्लीम मतं एकत्र कशी ठेवायची यासाठी या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थित अजेंडा जनतेसमोर मांडला, तर ही सगळी मतं मिळून फायदा होईल.
महाराष्ट्राला १८ वर्षांपूर्वी एक दु:स्वप्न पडलं होतं ठाकरे कुटुंबात फुट पडली. ते ही हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या हयातीतच. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत तसंच एकाच जंगलात दोन वाघ राज्य करू शकत नाहीत हे सिद्ध झालं होतं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र असले तरी त्यांच्यात राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. एक जागतिक दर्जाचा छायाचित्रकार राजकारणात रमेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. १९९५ पर्यंत तरी उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय नव्हते. ते आपल्या जाहिरात संस्थेतून प्रचाराची धुरा सांभाळत होते. २००३ साली मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचार यंत्रणेपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खरी सुरूवात झाली. वाढत्या वयामुळं बाळासाहेबांना उत्तराधिकारी कोण असावा? याची चिंता वाटत होती. राज ठाकरे हे तेव्हा शिवसेनेत सक्रिय होते. त्यांची राजकीय कारकिर्द १९९० पासून सुरू झाली. त्याचं वागणं, बोलणं, चालणं, देहबोली, वक्तृत्व आणि भाषाशैली ही अगदी बाळासाहेबांसारखीच होती. शिवाय ते एक उत्कृष्ट राजकीय व्यंगचित्रकारही होते. बाळासाहेबांचं जणू प्रतिरूपच वाटत होते. बाळासाहेब यांच्यानंतर कोण? याची जेव्हा जेव्हा दबक्या आवाजात चर्चा होत असे तेव्हा "राज ठाकरे" हेच सर्वांचे उत्तर असे. त्याचं नेतृत्व भारतीय विद्यार्थी सेनेतून उदयास आलं होतं. तेव्हा ते युवकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. राज ठाकरे हे जहाल भाषाशैली, स्पष्टवक्तेपणा आणि ठाकरी बाण्यामुळे लोकप्रिय होते. लाखांची गर्दी खेचण्याची किमया त्यांच्यात अजूनही आहे. दैनिक सामना १९८९ साली सुरू झाला तेव्हा सामनाच्या जडणघडणीत त्यांचा सहभाग मोठा होता. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सूर्यपुत्र असले तरी तेव्हा त्यांच्यात सूर्याचे तेज नव्हते. ते लाजरे बुजरे आणि मवाळ स्वभावाचे होते. सुरूवातीला तर त्यांच्या वक्तृत्वातही जोम नसे. कालांतरानं त्यांनी वक्तृत्वात बाजी मारली परंतू त्याला ठाकरी भाषेचा बाज नव्हता. त्यामुळं बाळासाहेबांचा खरा वारसदार म्हणून राज ठाकरेंना असलेली पसंती कायम राहीली. शिवसेना भाजपची सत्ता असताना किणी प्रकरणामुळं राज ठाकरे अडचणीत आले. त्यांची प्रतिमा डागाळल्यासारखी झाली.
बाळासाहेबही आपला उत्तराधिकारी नेमण्याच्या मन:स्थितीत होते. उद्धव की राज यातून निवड करणं बाळासाहेबांनाही अवघड होतं.अखेर महाबळेश्वर इथल्या शिबीरात त्यांनी आपला उत्तराधिकारी नेमण्याचा सर्वाधिकार शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला. स्वतः बाळासाहेब त्यावेळी उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत हा निर्णय घ्यायचा होता. पडद्यामागे काय घडलं सांगता येत नाही मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कार्याध्यक्ष म्हणून नेमण्याचा ठराव मंजूर झाला.तो ठराव राज ठाकरे यांनीच मांडला होता. याचं तेव्हा आजही शिवसैनिकांना त्यातलं गुपित कळलेलं नाही. अशाप्रकारे राज ठाकरे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून उदय झाला. पक्षनेतृत्व दोघांमध्ये विभागलं जावं अशी अनेकांची इच्छा होती. बाळासाहेब ही त्यास अनुकूल होते. परंतू 'मुंबई माझ्याकडे हवी..! किमान पुणे आणि नाशिक तरी द्या...!' असा आग्रह राज ठाकरेंनी धरला. त्यामुळं ती संकल्पना साकार होऊ शकली नाही. तेव्हा पासून गृहकलह म्हणा वा भाऊबंदकी सुरू झाली. राज ठाकरेंना डावललं जाऊ लागलं. 'माझ्या पांडूरंगाला बडव्यांनी घेरलंय...!' अशी खंत राज ठाकरे उघडपणे व्यक्त करू लागले. राज ठाकरे हा स्वाभिमानी हट्टी माणूस. रोखठोकपणा हा ठाकरी बाणा अंगात मुरलेला. त्यांची पक्षांतर्गत कोंडी होऊ लागली. अखेर त्याचा स्फोट होऊन राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच २००६ साली बंड करून आपला 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' हा पक्ष निर्माण केला. त्या पाठोपाठ राज ठाकरे यांना मानणारे हजारो शिवसैनिक आणि शेकडो पदाधिकारी राज ठाकरेंसोबत गेले. शिवसेनेनं यापुर्वी अनेक बंडं पचवली होती. अगदी बंडू शिंगरे यांच्यापासून छगन भुजबळ, नारायण राणे ते गणेश नाईकांपर्यंत. परंतू यावेळी अभेद्य मानल्या जाणाऱ्या मातोश्रीच्या बालेकिल्याला सुरूंग लागला होता. मात्र राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारखी गद्दारी केली नाही. पाठीत खंजीरही खुपसला नाही. फोडाफोडीचे राजकारण तर अजिबात केले नाही. बाळासाहेबांना  पुर्वकल्पना देऊन आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच पक्ष सोडला. राज ठाकरे यांचे नेतृत्व मानणारे लोक त्यांच्यासोबत आले त्यांनाच त्यांनी सोबत घेतले. शिंदेसारखी त्यांनी बाळासाहेबांच्या नाव, पक्ष वा चिन्हावर दावा केला नाही. स्वतःच्या बळावर आपला पक्ष निर्माण केला आणि तो टिकवला. यामुळंच राज ठाकरे यांच्या बंडाला कोणी गद्दारी म्हणू शकले नाही. त्यांनी कधीही शिवसेना संपवण्याची भाषा केली नाही. म्हणून आजपर्यंत राज ठाकरे यांना मानणारे लाखो शिवसैनिक आहेत. जे राज ठाकरेंसोबत गेले तेही १९ वर्ष निष्ठेनं राज ठाकरे यांच्यासोबत प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहीले. राज आणि उद्धव यांच्यातल्या मतं विभाजनाचा फायदा भाजपलाच झाला. भाजपनं मनसेचा वापर शिवसेनेची मत विभाजनासाठी केला. त्याचा फटका  दोन्ही सेनांना बसला. भाऊबंदकीमुळं दोघांचं जितकं नुकसान झालं नसेल त्यापेक्षा शतपटीनं महाराष्ट्र आणि मराठी जनतेचे नुकसान झालं. आज उशीरा का होईना या ठाकरे बंधुंना साक्षात्कार झाला आणि ते महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आले. तो महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी सुवर्ण कांचन योग मानावा लागेल. राज आणि उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक ईगो बाजूला ठेऊन एकदिलानं महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. 
हरीश केंची 
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

राजसत्तेची कोंडी...!

"देशात 'मतचोरी'च्या आरोपामुळं वातावरण ढवळून निघालंय. अनेक बाबी उघड झाल्यात. हरियाणातला ईव्हीएम घोटाळा सर्वोच्च न्या...