राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं राबवलेली पूर्णवेळ प्रचारकाची संकल्पना परिवारातली एक महत्त्वाची संघटना अशी ओळख असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुरू झाली ती मदनदास देवींच्या रूपानं...! ते साल होतं १९६९. देवी हे मूळचे सोलापूरजवळच्या करमाळ्याचे. माझे मित्र वसंतभाई देवी यांच्या ते नात्यातले. त्यांच्यामुळेच माझी त्यांच्याशी पहिल्यांदा ओळख झाली होती. नंतर माझा भाचा अभाविपचा पूर्णवेळ कार्यकर्ता. त्याच्यामुळेही ही ओळख वाढत गेली. पुणे विद्यापीठातून आधी वकिली आणि नंतर सनदी लेखापालाची परीक्षा उत्तीर्ण झालेले मदनदास देवी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ‘पूर्णवेळ कार्यकर्ता’ म्हणून काम करू लागले आणि या संघटनेचा देशभर विस्तार झाला. अर्थात यात इतरांचाही वाटा होता, पण देवी या सर्वाचे आदर्श होते. सुमारे वीस वर्षांनंतर देवींनी परिवारापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त केली ती भाऊराव देवरसांजवळ. तेव्हा परिवारातून संघात परत जाण्याची प्रथा पडलेली नव्हती. हेच कारण देऊन गोविंदाचार्याना संघात परत घेतलं नव्हतं. मात्र कायम समन्वयवादी भूमिकेत वावरणाऱ्या देवींना संघात स्थान देण्याचं सूतोवाच भाऊराव आणि बाळासाहेब देवरस या दोघांनी करताच मोठी खळबळ उडाली. विचारप्रवाह एक असला तरी संघात लवचीक आणि ताठर भूमिका घेणारे दोन मतप्रवाह आधीपासून अस्तित्वात आहेत. त्यातल्या ताठरांनी देवींच्या आगमनाला विरोध केला तर लवचिकांनी स्वागताची तयारी दर्शवली. ज्यानं बाहेरचं जग अनुभवलं, त्याला आत घेतलं तर फायदाच होईल असा युक्तिवाद यामागे होता. तत्पूर्वी अभाविपत असतानाच देवींनी संघ परिवारातून सुरू झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. मोरोपंत पिंगळे हे या आंदोलनाचे शिल्पकार तर देवी नियोजनकार अशी ओळख निर्माण झाली ती त्याच काळात. पडद्यामागे राहून सर्वाशी समन्वय ठेवण्याची देवींची ही हातोटी लक्षात घेऊन १९९८ ला नागपुरात झालेल्या संघाच्या चिंतन बैठकीची जबाबदारी त्यांना देण्यात आली. ती त्यांनी आणि शेषाद्रींनी उत्तमरीत्या पार पाडली. यानंतर त्यांच्याकडं भाजप आणि संघात समन्वय राखण्याचं काम देण्यात आलं. २००२ ला सुदर्शन सरसंघचालक झाले तेव्हा देवींना सरकार्यवाह करावं असा रज्जूभैय्या, शेषाद्रींचा आग्रह होता. वाजपेयींनाही हेच हवं होतं. मात्र दत्तोपंत ठेंगडी, मा.गो. वैद्य, अशोक सिंघल आदींच्या विरोधामुळं देवींना सहकार्यवाह पदावर समाधान मानावं लागलं. समन्वयवादी भूमिकेमुळं हे घडलं याची सल देवींना अखेरपर्यंत होती पण संघातली शिस्त पाळत त्यांनी याची जाहीर वाच्यता कधीही आणि कुठेही केली नाही. तेव्हा मदनदास देवींसह ज्यांचं नाव चर्चेत होतं ते मोहन भागवत सरकार्यवाह झाले.
परिवारातली संघटना आणि संघ यांची संघटनात्मक ताकद समान पातळीवर आणायची असेल तर परिवारातून नेतृत्व विकसित झालेल्या व्यक्तींना संघात आणणं गरजेचं आहे असा युक्तिवाद देवी हे संघाच्या अंतर्गत वर्तुळात सतत मांडत राहिले. नंतर बऱ्याच वर्षांनी भागवतांनी दत्तात्रय होसबळे आणि सुनील आंबेकर यांना संघात घेऊन, देवींचं म्हणणं किती योग्य होतं हेच सर्वाना दाखवून दिलं. वाजपेयी प्रधानमंत्री असतानाच्या काळात भाजप आणि संघात अनेकदा खटके उडाले. या वादानं जाहीर स्वरूप घेतलं. वाजपेयींच्या काही निर्णयांमुळं संघात नाराजीची भावना निर्माण झाली. संघातला लवचिकांचा गट हा वाद वाढू नये या मताचा होता तर ताठर गटाला हे मान्य नव्हतं. या अंतर्गत मतविभाजनाचा फटका भाजपला बसू नये म्हणून देवींनी बरेच प्रयत्न केले पण व्हायचं तेच झालं आणि २००४ च्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. हे सारं घडलं ते ‘इगोक्लॅश’मुळं असं नंतर देवींनी खासगीत अनेकांकडं बोलून दाखवलं. संघ आणि परिवारात साधारणपणे एखाद्यानं क्षेत्र त्यागलं की आधी केलेल्या कामाच्या ठिकाणी लुडबुड करायची नसते असा अलिखित नियम आहे. देवींनी तो कटाक्षानं पाळला पण मार्गदर्शन मागणाऱ्या कुणालाही कधी निराश केलं नाही. उच्च शिक्षण घेतल्यावर नोकरी वा व्यवसाय करून भरपूर पैसे कमावण्याची संधी सोडून त्यांनी त्या काळात खडतर म्हणून ओळखलं जाणारं प्रचारकाचं जीवन स्वीकारलं. तेव्हा डाव्या आणि काँग्रेस विचाराच्या विद्यार्थी संघटनांचा देशभर बोलबाला होता. अशा कठीण स्थितीत त्यांनी अभाविपचा विस्तार केला. ही संघटना केवळ अभिजनांसह बहुजन, मागास अशा सर्वाची आहे हा विचार राष्ट्रीय पातळीवर रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. संघ असो वा परिवार, त्याचा विस्तार करायचा असेल तर सर्वसमावेशक धोरणाशिवाय पर्याय नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे असं ते सतत सांगायचे. मोहन भागवतांच्या नेतृत्वात नव्या चमूनं संघाची धुरा हाती घेतल्यावर ते दैनंदिन कामातून थोडसं बाजूला झाले. त्यांचा ८० वा वाढदिवस अभाविप आणि इतर संघटनांनी साजरा केला होता. त्यानंतर गेल्यावर्षी त्याचं निधन झालं. आणि त्यांच्या मृत्यूनं संघ परिवारातल्या एका समन्वयवादी पर्वाचा अस्त झालाय. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन....!
No comments:
Post a Comment