Sunday, 20 July 2025

महाराष्ट्रधर्म आणि स्वायत्तता....

"मराठ्यांनी सदैव राष्ट्राचाच विचार केला. राष्ट्र मोठं व्हावं म्हणून मराठे धडपडले. अब्दालीची झुंड रोखण्यासाठी पानिपतावर मराठ्यांची एक पिढी मारता मारता मरावे अशी झुंजून मेली. अब्दालीला पुन्हा भारताकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत होणार नाही, असा चोप दिला. मराठे पानिपतावर मोडले, पण हे राष्ट्र, इथला समाज आणि धर्म त्यांनी सावरला. मराठ्यांची समशेर हा भारताचा आधार होता म्हणूनच मराठे ताठ मानेनं शिलंगणाला जात. आज आपण 'महाराष्ट्र धर्म' विसरलोत. आपसातल्या लाथाळ्या अन् कुणाचे तरी अनुयायीत्व मिरवण्यात समाधान वाटू लागलंय. अमराठीचं प्राबल्य वाढलंय. त्यामुळं मराठी माणूस, संस्कृती, अस्मिता, भाषा, महाराष्ट्रधर्म मोडकळीला येण्याची स्थिती निर्माण झालीय. हे थांबवायचं असेल तर महाराष्ट्राला स्वायत्तता हवी.!"
----------------------------------------------
हिंदी भाषेची सक्ती आणि मराठीची अवहेलना या मुद्द्यांवर मराठी मनं पेटून उठलीत. मराठीचा आग्रह धरणारी मंडळी संघटित झालीत. त्यांनी आंदोलनाचा इशारा देताच सरकार नरमलं. हिंदी सक्तीसाठीची दोन्ही जीआर रद्द केली. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या १९ वर्षातलं शत्रुत्व, वैमनस्य, विरोध विसरून एकत्र आले. त्यानं साहजिकच मराठी मनं सुखावली. या दोघांनी एक मोठा विजयी मेळावा घेतला, त्याला मोठा प्रतिसाद लाभला. दरम्यान भाईंदर इथं मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्याला लोकांनी जाब विचारला. त्या विरोधात इथले परप्रांतीय व्यापारी एकत्र झाले. त्यांनी मोर्चा काढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिक एकत्र झाले. त्यांनीही मग मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्याला सरकारनं परवानगी नाकारली. त्या माध्यमातून मुंबई, ठाणे परिसरात मराठी लोक संघटित झाल्याचं दिसलं. राज्यातली मराठी माणसं संघटित होताहेत हे दिसल्यानंतर राज्य शासनानं विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी मनं चुचकारण्यासाठी 'महाराष्ट्रधर्म' या नावानं मराठी भाषा, महाराष्ट्र, संस्कृती, इतिहास सांगणारा एक पॉडकास्ट सुरू केलाय. पण या सरकारी पॉडकास्टनं सत्ताधाऱ्यांना मदत होण्याऐवजी जागृत झालेली मराठी मनं अधिक घट्ट होतील. मराठीचा स्वाभिमान, अस्मिता जागेल, पेटून उठेल! इथं एक जाणवलं की, सत्ताधाऱ्यांना हरेक निवडणुकीत हिंदूधर्माचा जागर, हिंदू मुस्लिम वाद आठवतो तसं मराठी-अमराठी वाद उपस्थित करण्याचा प्रयत्न चालवलाय. हिंदू- मुस्लिम हा धार्मिकवाद निर्माण करून लोकसभा लढवल्या. त्यानंतर विधानसभेत मराठा-ओबीसी हा जातीवाद आणि आता भाषिकवाद उभा केला गेलाय. अमराठी लोकांना गोंजारतानाच महापालिकेसाठी, मराठींसाठी महाराष्ट्र धर्माची आठवण सत्ताधाऱ्यांना आलीय, हेही नसे थोडके...!
महाराष्ट्रधर्म सर्वत्र पसरवण्याचं कंकण मराठ्यांनी बांधलं होतं. महाराष्ट्रधर्म काय आहे? हिंदूधर्मापेक्षा तो वेगळा आहे का? असा प्रश्न केला जाईल.  इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी याचा बराच ऊहापोह केलाय. ते म्हणतात, 'महाराष्ट्रधर्माची व्याख्या हिंदूधर्माहूनही अधिक व्यापक आहे...!' समर्थांनी "महाराष्ट्र धर्म' शब्द वापरला तेव्हा महाराष्ट्रातला हिंदूधर्म आणि भारतातला हिंदूधर्म यात महदंतर होतं..!" असं सांगून राजवाडे म्हणतात, "महाराष्ट्रेतर प्रजा हिंदूधर्म म्हणजे व्रत-उद्यापनं, उपासना-पूजा आदि, यवनांकडून त्रास पोहोचत असतानाही निमूटपणे चालवीत. महाराष्ट्रातली प्रजा मात्र इतकी सोशीक नव्हती. यवनांचा उच्छेद करावयाचा हे त्याकाळी महाराष्ट्रातल्या हिंदूधर्माचं एक कलम होऊन गेलं होतं, पण नुसता यवनांचा उच्छेद करून काम भागण्यासारखं नव्हतं, तर स्वराज्याची स्थापना करणं जरूर होतं. स्वराज्याची स्थापना करणं हेही एक महाराष्ट्रातल्या हिंदूधर्माचं मुख्य कलम होऊन बसलं. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजेत, असं शिवाजी महाराजांच्या लक्षांत आलं. मराठ्यांचं एकीकरण केलं पाहिजे ही एक गोष्ट आणि त्यांचं धुरीधरण म्हणजे पुढारपण स्वीकारलं पाहिजे ही दुसरी गोष्ट...!" त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी केलं आणि अन्य प्रांतातल्या हिंदूधर्मापेक्षा काही आगळं इथं या मराठी मातीत घडतंय, याचा देशवासीयांना प्रत्यय आला. राजवाडे म्हणतात, "महाराष्ट्रेतर प्रांतात हिंदूधर्म हा धर्मस्थापना, गोब्राह्मणप्रतिपाल आणि स्वराज्यस्थापना यांचं एकीकरण धुरीधरण म्हणजे महाराष्ट्रातला हिंदूधर्म होतो अशी त्याकाळी समजूत होती. ह्याच समजुतीला रामदासांनी 'महाराष्ट्रधर्म' अशी संज्ञा दिली. महाराष्ट्रेतर प्रांतातल्या हिंदूधर्माला सहिष्णु हिंदूधर्म आणि महाराष्ट्रातल्या हिंदूधर्माला जयिष्णु हिंदूधर्म म्हटल्यास या दोन्ही धर्मातला भेद स्पष्ट होतील. १६४६ पासून १७७६ पर्यंत ह्या कल्पनेला मराठे साक्षात स्वरूप देत होते आणि बरोबर १५० वर्षे ह्या कल्पनेच्या धोरणानं मराठे चालले होते. महाराष्ट्रधर्माची ही कल्पना मराठ्यांच्या ह्या १५० वर्षांतल्या हालचालींची केवळ प्राणभूत आहे...!"
मग पाठ्यपुस्तकांतून मराठी माणसाचा मोरू प्रवेशला. 'नवरात्र संपले. दसरा उजाडला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, उठ... पालख्या उचलण्याचं, सतरंज्या घालण्याचं, मुजरे करण्याचं काम इमानदारीनं करायला तयार हो...!' महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे ही 'स्वामी'निष्ठा यातूनच निर्माण झाली. हे राष्ट्र मोठं करण्याचं काम करतो म्हणूनच मराठ्यांच्या भूमीला महाराष्ट्र हे नाव आहे, असं छातीठोकपणे सांगणारी आणि विविध क्षेत्रातली कर्तबगार माणसं महाराष्ट्रात झाली. त्या कर्तृत्ववान मराठी पुत्रांमुळंच 'महाराष्ट्र आधार या भारताचा...!' हा विश्वास निर्माण झाला. महाराष्ट्राचं वैभव तळपू लागलं. त्याचा जेव्हा अभाव जाणवला तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय लादला गेला. त्या अन्यायानंच अंगार पेटावा तसा मराठा धगधगून उठला हा इतिहास आपण विसरून गेलोय. 
'देशद्रोही तितके कुत्ते l मारोनि घालावे परते l
देवदास पावती फत्ते l यदर्थी संशय नाही l' 
ह्या समर्थांच्या विचारांचा प्रत्यय देणारी भाषा बाळासाहेब ऐकवत असत. ह्या भाषेमागं सामर्थ्य उभं होतं ते लक्षावधी तरुणांचं...! पण आज पुन्हा मराठीची अशीच स्थिती निर्माण झालीय. आमच्या सहिष्णुतेचा, सभ्यतेचा, संयमाचा गैरफायदा घेतला जातोय. तो थांबवण्यासाठी जरूर तेवढं आक्रमक वा आक्रस्ताळे होण्याचीच गरज आहे. अंतस्थ यादवीनं विस्कळीत होऊन मराठीतल्या जाती क्षीण अन् सौम्य राहिल्यामुळं बेमुर्वत तुटून पडण्यानं आपलं वर्चस्व राखलं जाईल. परप्रांतीयांची, महाराष्ट्रात राहून मराठी माणसांच्या विरोधात उद्योग करणाऱ्या हरामखोरांची रग मोडायची असेल तर बेमुर्वतपणे तुटून पडण्याचं तंत्र आत्मसात करायला हवं. हे जो करील तोच खरा आणि तोच महाराष्ट्र धर्माला जागेल.
हिंदुत्वाच्या नावानं गल्ला गोळा करण्याचं आणि भोळ्याभाबड्यांना आणखी भोळेभाबडे बनवण्याचं उद्योग मोदी शहा कंपनीनं चालवलेत. प्रत्येक थोर पुरुषाचं नाव वापरून तुंबडी भरण्याचा उद्योग होतोय. डोळस राष्ट्रनिष्ठा, डोळस राष्ट्रहित यांना नकोच आहे. इथल्या मुसलमानांना आपण पाकिस्तानवादी बनवत आहोत का? त्यांच्या मनात आपण निष्कारण भय निर्माण करत आहोत का? पाकिस्तानात इथून गेलेल्या मुसलमानांना आज तिथं काय भोगावं लागतंय हे आपण इथल्या मुसलमानांना समजून देत आहोत का? याचाही विचार करायला हवाय. जे प्रेमानं आपले होणार नसतील त्यांना जरूर तर धाकानं आपलं बनवावं लागेल, पण सरसकट सगळ्यांना आपण राष्ट्रद्रोही म्हणून राष्ट्रद्रोही बनवणं हा आपलाच घात ठरेल. नांग्या वर करून वारंवार दंश करू बघणाऱ्यांच्या नांग्या जादा मचमच न करता मोडायलाच हव्यात, पण या देशासाठी, हिंदूधर्मासाठी कापले जात असतानाही ज्यांनी द्रोहाचा विचारही मनाला स्पर्श दिला नाही, ते पाकिस्तानी बुद्धीनं आज का वागत आहेत याचाही आपण विचार करायला हवाय. हिंदुत्वाच्या चुकीच्या अहंगंडानं तर हे घडलं नाही ना? राष्ट्रहितासाठी याचा वापर करून घेण्याची बुद्धी राष्ट्रनेत्यांना व्हायला हवी. आज देशात अराजक-सदृश परिस्थिती निर्माण होईल अशी भीती आहे. लक्षावधी पाकिस्तानी-बांगलादेशी, रोहिंगे, श्रीलंकेचे रहिवासी भारतात घुसलेत. भारतीय म्हणून राहताहेत, भारतद्रोह्यांना सहाय्य होईल असं वागताहेत. त्यांना हुडकून काढणं पोलिसांना शक्य होत नाही. लष्कराला यात गुंतवणं योग्य नाही. मग तरुणांनी स्वयंसेवक पथकं उभारून झोपडपट्टया, गावोगावे, गल्लीबोळ, रानं, वनं पिंजून काढून घुसखोरांना पकडण्याचं काम पोलिसांच्या सहकार्यानं का करू नये? शस्त्रास्त्रे जमवण्याचा उद्योग केला जातोय, विघातक गोष्टींची भेसळ करून बनावट माल बनवण्याचा प्रकार होतोय या सगळ्यावर नजर ठेवण्याचं कामही या तरुणांच्या मदतीनं होऊ शकेल. पण आज जाती जातीवरून फळ्या पडल्यात. जाती होत्या, त्यातच ही नवी भर. ते काम त्याचं, आम्हाला काय करायचंय! सत्ता आमच्या हातात द्या, मग बघतो! हे सगळेच म्हणतात. सत्ता नाही तरीही हे करून दाखवतो असं म्हणून पुढं यायला काय हरकत आहे? शिवसेनेचं मला कौतुक जरूर आहे, पण मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती तरीही मुंबईची अवस्था काय आहे? महापौर शिवसेनेचा होता, पण मुंबईतला गल्लीबोळ कुणाचा? याचाही विचार व्हायला पाहिजे. समर्थांनी महाराष्ट्र धर्म सांगितला. समाज उद्धरणाचे तीन मार्ग सांगितलेत. नीतिस्थापना, धर्मस्थापना, राज्यस्थापना. शिवसेना एकदम तिसऱ्या क्रमांकावर उतरलीय. दुसऱ्या मार्गासाठी तिनं नको त्यांच्याशी युती केली आणि पहिला मार्ग तर चक्क दुर्लक्षलाच, असं जाणवतेय. निवडणुका लढवायच्या, मग भ्रष्टाचार करावाच लागतो ही झाली सबब. असो. अनेकजण कुठं होते, कुठं पोहोचले याचा हिशोब घेऊनच तो विषय मांडावा लागेल. 
मराठी माणसाच्या भल्यासाठी 'स्वायत्त महाराष्ट्र' हाच एकमेव पर्याय आहे. परप्रांतीय लोंढे रोखण्यासाठी व्हिसा कायदा - 'इनर लाईन परमिट' आणि अधिवास कायद्याची मागणी पुढे येतेय. दक्षिणेतल्या राज्यांनी ती यापूर्वीच केलीय. राज्यातल्या नोकऱ्या, परवाने स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने मिळण्यासाठी मागणी करायला हवी. हे करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करावं लागेल. जुने विचार बाजूला ठेवून, नवीन विचारानं काम करावं लागेल. येणाऱ्या काळात मराठीच्या मुद्द्यांवर संघर्ष अटळ आहे. मराठी माणसांचा महाराष्ट्र राज्यावरचा हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, स्वायत्त महाराष्ट्राची मागणी लावून धरायला लागेल. जर या मागण्यांसाठी आपण संघटित झालो नाही, तर येत्या काही दशकात महाराष्ट्रावरचं आपला हक्क, अधिकार संपुष्टात आलेले असतील. मुंबईसह महाराष्ट्र राज्य व्हावे, यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. याची जाणीव ठेवायला हवीय.
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली असली तरी त्याआधी सध्या जो महाराष्ट्र आपल्याला दिसतो तो कसा होता, कोणती भाषा प्रामुख्याने बोलली जात होती, संस्कृती कशी होती याबद्दलचा इतिहास तसा अनेक ठिकाणी सांगितला, लिहिला गेलाय. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणेपर्यंत महाराष्ट्रानं अनेक स्थित्यंतरं पाहिली. मराठी ही भाषा महाराष्ट्राच्या अर्थातच केंद्रस्थानी होती. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठीचेही वेगवेगळे प्रकार आहेत. त्या सर्व भाषा, त्यामागची संस्कृती यांचा संगम म्हणजे 'महाराष्ट्रधर्म' असं ढोबळमानानं म्हणता येईल. महाराष्ट्रधर्माची व्याख्या करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे म्हणतात, "महाराष्ट्रधर्म या शब्दावर महाराष्ट्रात जितकी चर्चा झाली तितकी आणखी कोणत्याही शब्दावर झालेली नाही. महाराष्ट्रात राजाराम भागवत आणि न्या, रानडे यांनी ही संकल्पना आणली. मग वि.का.राजवाडे यांनी तो शब्द सुधारला. महाराष्ट्राचा राष्ट्रीयधर्म म्हणजे महाराष्ट्रधर्म. महाराष्ट्रातल्या लोकांचा हा धर्म. हा काही नुसता कर्मकांडाचा धर्म नाही. हा शब्द पहिल्यांदा रामदासांनी वापरला असा समज सगळ्यांना होता. महाराष्ट्रात राहणारे ते मराठा, त्यांचा धर्म म्हणजे 'महाराष्ट्रधर्म...!' प्रत्येकाचा काही ना काही धर्म असतो. महाराष्ट्रातल्या लोकांचं राष्ट्रीय कर्तव्य अशा अर्थानं तो शब्द वापरतात. हा शब्द वापरावा लागला, कारण शिवाजी महाराज यांच्यापासून पेशव्यांच्या काळापर्यंत मराठा समाजाच्या ज्या हालचाली झाल्या त्याला कोणतंही सूत्र नव्हतं, असा सिद्धांत ग्रॅहम डफने मांडला होता. भारताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रानं पुढं असलं पाहिजे असाही या शब्दाचा अर्थ होतो.
ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे म्हणतात. "वि. का.राजवाडे यांनी एका प्रस्तावनेत याविषयी विवेचन केलंय. त्यांच्या मते लढाऊ वृत्तीचा हिंदूधर्म म्हणजे महाराष्ट्रधर्म अशी त्यांनी व्याख्या केलीय. मला तसं वाटत नाही. महाराष्ट्रधर्म हा हिंदूधर्म आहे, त्याच्या पलीकडे काहीही नाही. त्याला अनेक पुरावे आहेत, अनेक पत्रं उपलब्ध आहेत. या सगळ्या पत्रातून महाराष्ट्रधर्म हाच हिंदूधर्म आहे असं लक्षात येतं. माधव दातार यांच्या 'महाराष्ट्र : एका संकल्पनेचा मागोवा' या पुस्तकात ते म्हणतात, "सध्याच्या काळात आपण धर्म या अर्थानं हा शब्द वापरतो, पुरातन काळी हा अर्थ त्यातून अभिप्रेत नव्हता. पूर्वी लोक ज्या अर्थानं धर्म हा शब्द वापरायचे आणि आता ज्या अर्थानं तो वापरतात त्यात फरक आहे. राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे महाराष्ट्रधर्म हा शब्द वापरतात तेव्हा त्यांना वेगळा अर्थ अभिप्रेत आहे. एका भागात येणारे, एकत्र येणारे लोक, त्यांची समान उद्दिष्टं या अर्थानं हा शब्द आधीही वापरला गेला होता. राजकारणी लोक त्याचा वापर करतात...!" ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या मते 'मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्रधर्म वाढवावा...' या रामदासांच्या संदेशातून ही व्याख्या अस्तित्वात आलीय. ही व्याख्या अजूनही अबाधित असल्याचं मत ते व्यक्त करतात. त्याचवेळी माधव दातार यांच्यामते ही व्याख्या कालानुरूप बदलत गेली. जेव्हा रामदास त्याविषयी बोलायचे तेव्हा त्यांना या भागात राहणारे हिंदू लोक अभिप्रेत होते. कारण पूर्वी महाराष्ट्र हा शब्द जेव्हा वापरला जायचा तेव्हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हाच भाग होता. आता तो बदलत गेला. त्यात भाषेचा मुद्दाही आला. महाराष्ट्राची जी चळवळ झाली त्यात सगळीकडून मराठी लोक एकत्र यावेत हा एक भाग या व्याख्येत होता. न्या. म.गो. रानडे यांनी या शब्दाची व्याख्या करताना 'शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातला उदय' या अर्थानं त्याचं स्पष्टीकरण दिलंय. त्यांची महाराष्ट्र धर्माची कल्पना अधिक आधुनिक होती. वि.का.राजवाडे, न्या. म.गो.रानडे या प्रत्येकाला या व्याख्येतून वेगवेगळे अर्थ अभिप्रेत होते. एक मात्र खरं की, महाराष्ट्रधर्माची कधी नव्हे इतकी गरज वाटतेय ती मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता, स्वाभिमान टिकविण्यासाठी...!
हरीश केंची,
९४२२३१०६०९








No comments:

Post a Comment

राजसत्तेची कोंडी...!

"देशात 'मतचोरी'च्या आरोपामुळं वातावरण ढवळून निघालंय. अनेक बाबी उघड झाल्यात. हरियाणातला ईव्हीएम घोटाळा सर्वोच्च न्या...