Sunday, 20 July 2025

मराठींचं वागणं ! मराठीचं जगणं...!!

"जिथून परप्रांतीयांचा मराठीच्या विरोधात मोर्चा निघाला होता तिथूनच, मीरा भाईंदरमधल्या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा आग्रह धरला. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र हे 'मराठी राज्य' असेल असं म्हटलं होतं, त्याच मराठी राज्याचे मुख्यमंत्री आज मात्र 'हिंदीची सक्ती होणारच...!' अशी वल्गना मराठीचा स्वाभिमान ठेचण्यासाठी करतात. हे कशासाठी? दिल्लीतल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी की, बिहारच्या आणि महाराष्ट्रातल्या होऊ घालेल्या निवडणुकांसाठी इथल्या हिंदी भाषिकांना चुचकारण्यासाठी की, मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी? या साऱ्या पार्श्वभूमीवर मराठी माणसांचं जगणं आणि वागणं महत्वाचं ठरणार आहे. भाषा जगली तरच माणूस सन्मानानं जगू शकेल. सोलापूर हे बहुभाषिक असतानाही सर्व भाषाभगिनी सामाजिक सौहार्दानं इथं नांदतात. याचं अनुकरण व्हायला राज्यभर व्हायला हवंय!"
-------------------------------------
*म* राठी हा कुठेही असो, बाणा मराठी जपे सदा l
पर्वा नसे कुणाचीही, गाणे मराठीचे गाई सदा ll
अशी मराठी माणसाची आणि भाषेची ओळख सांगितली जाते. 'अमृताते पैजा जिंके' अशी मराठीची कौतुक कीर्ती संत ज्ञानेश्वरांनी सांगितलीय. तर, मराठी अमृतापेक्षाही सरस कशी आहे, ते सांगताना कवी सोपानदेव चौधरी म्हणतात-
अमृतास काय उणे? सांगतसे मी कौतिके l
माझी मराठी बोलकी, परी अमृत हे मुके !!
मराठी भाषेची आणि माणसाची ही कीर्ती महती अमृताहून श्रेष्ठ असली, तरी वास्तव मराठी भाषेप्रमाणेच मराठी माणसाच्याही मुळावर उठणारं आहे. याकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसं लक्ष वेधलं होतं. तसं आज राज अन् उद्धव ठाकरे लक्ष वेधताहेत. भाषा ही व्यक्तीचीच नव्हे, तर त्याच्या विचार-संस्कृतीची, प्रांताची, देशाची ओळख सांगत असते. ही ओळख टिकवण्यासाठीच भारतात स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना होऊन नवी राज्यं निर्माण झाली. महाराष्ट्रात मुंबई राखण्यासाठी मराठींना लढावं, मरावं लागलं. शिवसेनाप्रमुखांच्या शब्दात सांगायचं तर, 'मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यापासून मराठी भाषेचा अभिमान अधिकच वाढीस लागला. परंतु, परप्रांतीयांचे लोंढे जसजसे मुंबईवर आदळताहेत, तसतशी अभिमान दाखवणारी माणसंही संख्याबळ कमी झाल्याने विरघळू लागलीत. आता शिल्लक राहिला आहे, तो आरडाओरडा....!' बाळासाहेबांनी नेमक्या शब्दांत मराठी भाषा आणि मराठी माणसाची हालत सांगितली होती. ही पीछेहाट मुंबईपुरतीच मर्यादित नाही. तर ती महाराष्ट्रव्यापी आहे. पुण्यासारख्या पक्क्या मराठमोळ्या शहरातही अमराठींची संख्या तीस टक्क्यांच्या दरम्यान झालीय. ही अमराठींची वाढती टक्केवारी राजकारणातही कुरघोडी करू लागल्यामुळे मराठींमध्ये त्याविरोधी खदखद वाढू लागलीय. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांनी या चिडीला वाट मोकळी करून देताच, त्यांना सर्वच पक्षांतल्या मराठी नेत्यांनी दुजोरा दिला. तो तेव्हा राजकारण टाळण्यासाठी आवश्यकही होता. तथापि, मराठी भाषेविषयी आग्रह धरताना शिवसेनाप्रमुखांनी आपल्या विचारात जो बदल केला होता, तो तेव्हा बऱ्याच जणांच्या लक्षात आलेला नव्हता. मराठी माणूस हे शिवसेनेच्याच निर्मितीचं बीज आहे. मराठी माणसाचा कैवारी हीच शिवसेनेची खरी ओळख होती आणि आहे. ही ओळख हिंदुत्व परिधान करूनही बदलवू शकली नाही. परंतु, मराठी माणूस आणि मराठी भाषा हे विषय शिवसेनेच्या लेखी कायम वेगळेच राहिलेत. आज तीच भूमिका घेऊन राज आणि उद्धव ठाकरे मराठीच्या प्रश्नावर एक होताना दिसताहेत. शासकीय कामात मराठीचा वापर, दुकानांवरच्या पाट्या मराठीत, अथवा मराठी नाटक-चित्रपटांना सहाय्य यापलीकडे शिवसेनेचा मराठी भाषा आग्रह पूर्वी गेलेला नाही. पण आज वातावरण बदललंय हिंदी भाषेची सक्ती करूच असा हट्ट सरकारनं केलाय. शिवसेनेच्या स्थापनेनंतर गेल्या ५७ वर्षांत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापने नंतर गेल्या २० वर्षात मराठी भाषा संवर्धनाचा विषय अनेकदा चर्चेला आला. साहित्यिकांनी आणि भाषा अभ्यासकांनी मराठीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली. शिवसेनेनं, ठाकरेंनी या विषयाकडे लक्ष द्यावं, यासाठी चिमटे काढत का होईना, विनंती केली गेली. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले पत्रकार स्वर्गीय अरुण साधू यांनी तर 'मराठींनी मराठीतच बोलावं, यासाठी शिवसेनाप्रमुखांनी आता फतवा काढावा...!' असा आग्रह धरणारं जाहीर पत्र लिहिलं होतं. या साऱ्याची बोळवण बाळासाहेब ठाकरे यांनी 'मराठी माणूस राहिला, तर मराठी भाषा आणि तुमचं साहित्य, पुस्तकं राहतील. आमच्या दृष्टीने मराठी माणूस महत्त्वाचा आहे...!' अशी बोळवण केली होती. त्याचे परिणाम आता दिसू लागलेत. 
परप्रांतीयांमुळे मराठी टक्का तर घटलाच; पण त्यापेक्षा अधिक टक्का मराठी बोलणाऱ्यांचा घसरलाय. हा मराठींवर झालेला इंग्रजी आणि हिंदी भाषेचा प्रभाव आहे. बाळासाहेबांचा इंग्रजी माध्यमाला विरोध नव्हता तसा तो राज आणि उद्धव यांचाही नाहीये. त्यांची मुलं, नातवंड इंग्रजी माध्यमात शिकतात, पण घरात सर्वांनी मराठीच बोलावं, असा आपला आग्रह असल्याचं ते सांगतात. त्यांचं म्हणणं, 'डॅडी काय नि मम्मी काय, दोघांनाही इंग्रजीच्या गंधाचा टिळा लागलेला नसतो. मग कशासाठी ही डॅडी-मम्मीची मस्ती? मराठीतले आई-बाबा, हे शब्द वाईट आहेत काय? मराठी भाषेचे खरे खुनी मराठी माणसंच आहेत...!' त्यांचा हा संताप मराठी माणूस राहिला तर मराठी भाषा राहील ह्या त्यांच्याच म्हणण्याचं विरुद्ध दुसरं टोक होतं. ते अधिक टोकदार करण्यासाठी त्यांनी मराठींना 'आजपासून शपथ घ्या, यापुढे मी आयुष्यात मराठी भाषेचाच वापर करीन. ज्याला मराठी येत नाही, त्याला अडाणी समजून मग हवं तर हिंदीमध्ये बोलावं. पण आपण मराठी असून सुरुवातीलाच मराठी भाषेचा अभिमान बाजूला ठेवून अडाणीपणा स्वतःकडे घेऊ नये,...!' अशी नम्र प्रार्थना केली होती. यामागील भावना, आग्रह मराठीचा जाज्वल्य अभिमान सांगणारा होता. परंतु, शपथा घालून, अभिमान दाखवून, कुठल्याही भाषेची घसरण थांबत नाही. तशीच भाषा गगनचुंबी केल्याने अथवा तिच्या अट्टाहासी वापराने टिकत नाही. भाषा व्यापक होते, सर्वसमावेशक होते, इतर प्रगतिशील भाषेतल्या विचारांना, शब्दांना स्वतःत सामावून घेते, तेव्हा ती टिकते; अधिक प्रवाही आणि प्रभावी होते. मराठी भाषाही अशीच टिकली, वाढली. मराठी ही ज्ञानभाषा असेलही. पण सध्या जमाना विशेष ज्ञानाचा म्हणजे विज्ञानाचा आहे. ह्या विज्ञानानेच जगाला जवळ आणून त्याचं खेडं केलंय. पूर्वी प्रांतानुसार भाषा बदलायची. आता वस्ती-हौसिंग सोसायटीगणिकच नव्हे, प्रत्येक घरानुसार भाषा आणि राहाणीमान बदलतंय. पण हा स्वतंत्रपणा दाराबाहेर पडल्यावर वितळतो. तो वितळावा लागतो. त्याने भाषिक सरमिसळ होते. ती आज आवश्यक ठरलीय. त्याशिवाय समाज-व्यवहार होणार नाही. सामाजिक व्यवहार हा एखाद्या भाषेच्या अट्टहासाने होत नाही. असा व्यवहार जी भाषा उपयुक्त आहे, त्या भाषेत होत असतो. हा व्यवहार मराठी भाषेत व्हावा, असं वाटत असेल, तर तो मराठी वळवावी तशी वळते असा शाब्दिक खेळ करून होणार नाही. त्यासाठी मराठी भाषा व्यावहारिक आणि इतर भाषांना सामावून घेणारी करावी लागेल. तिला अर्थसत्ता प्राप्त करून द्यावी लागेल. त्यासाठी भाषाशुद्धतेची सोवळी फेकून द्यावी लागतील. विचारांची शुद्धता आणि व्यावहारिक सहजता मराठीत वाढवावी लागेल. हे काम मराठीची बरोबरी अमृताशी करून अथवा डॅडी-मम्मी कल्चरची मापं काढून होणार नाही. त्यासाठी भाषेचं जगणं आणि मरणं कशात आहे, ते समजून घ्यावं लागेल. अमृतापुढचा 'अ' जर भाषेच्या मर्यादेमुळेच गळून पडणार असेल, तर ती उणीव मराठीच्या नावाने गळे काढून भरून निघणार नाही. सध्या जन्मदात्या आई-बापाला वृद्धाश्रमात अथवा मास्टर रूममध्ये अडकवून निकालात काढायचा जमाना आहे. अशा वातावरणात मायमराठीची अवस्था वेगळी कशी असेल?
संयुक्त महाराष्ट्रची चळवळ जोरात होती, तेव्हाचा हा प्रसंग आहे. चळवळ विचाराने चालावी; पटतील असे मुद्दे लोकांपुढे यावेत, यासाठी मराठी आणि गुजराती भाषिक विद्वानांची संयुक्त सभा शिवाजी पार्कवर भरली होती. प्रचंड गर्दीसमोर दोन्ही बाजूंचे विद्वान मुंबई आमच्याच भाषिकांची कशी ते ठासून सांगत होते. मराठी विद्वान मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी, आगरींच्या वास्तव्याचे दाखले देत होते. ऐतिहासिक वास्तूंचे दाखले आणि साहित्यातले संदर्भ सांगत होते. गुजराती विद्वान आपल्या लोकांनी आर्थिक उलाढाल करून मुंबईची कशी भरभराट केली, मोठमोठ्या वास्तूंची कशी उभारणी केली, कारखानदारी वाढवून कष्टकऱ्यांना आधार कसा दिला, त्याची माहिती देत होते. या अटीतटीच्या मुद्यांना त्यांच्या भाषा-भाईकडून दाद मिळत होती. पाच तास उलटले तरी वादाचा निकाल लागत नव्हता. तेवढ्यात एक गावंढळ वेशातला माणूस मंचाजवळ आला. त्याने दोन मिनिटं भाषण करण्याची विनंती संयोजकांना केली. आधी त्याला हुसकावून लावण्यात आलं. पण सभा अध्यक्ष कॉम्रेड डांगे यांनी त्याला पाहाताच भाषणाला परवानगी दिली. खणखणीत आवाजात भाषण सुरू झालं. 'आम्ही म्हणतो, मुंबई आमचीच, मराठींची, महाराष्ट्राचीच आहे. गुजराती विद्वान म्हणतात, मुंबईत आम्ही पैसा टाकला, व्यापार केला, कारखाने उभारले, मुंबई किमती केली, म्हणून मुंबई आमची, गुजरातींची, गुजरातची आहे...! आम्ही ते मान्य कसं करायचं हो...! काय हो, मूल गुटगुटीत व्हावं; त्यानं चांगलं बाळसं धरावं म्हणून त्याला आपण डोंगरे ग्राइप वॉटर पाजतो. मूल मोठं होतं. धट्टकट्ट दिसतं. गावात नाव कमावतं. म्हणून त्याचे आई-बाप हे पोर डोंगरेचं बरं... असं कधी बोलतात का? आणि डोंगरेही आमचं ग्राइप वॉटर पितात, ती सगळी मुलं आमचीच...! असं कधी म्हणतो का...?' या प्रहारासरशी गर्दीतल्या मराठी आणि गुजराती भाषिकांनी संयुक्तपणे टाळ्यांचा गडगडाट केला. बोलणाऱ्याने दोन मिनिटं मागितली होती. पण केवळ एक मिनिटात त्याने 'मुंबई मराठींची, महाराष्ट्राची...' कशी ते पटवून दिलं. सभा संपली. हा साक्षात्कार घडवून आणणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं, सातारा आणि सांगली परिसरात ब्रिटिशांच्या उरावर बसून सहा वर्षं प्रतिसरकार चालवणारे क्रांतिवीर नाना पाटील. महाराष्ट्र मुंबईवरचा हक्क सोडणार नाही, हे दाखवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभरातून एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा मुंबईत आणला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत इतर नेत्यांप्रमाणे नाना पाटील यांचं योगदानही मोठं आहे. मुंबई महाराष्ट्राची झाली. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यासाठी १०५ हुतात्मे झाले. हजारो कायमचे जखमी, जायबंदी झाले. मुंबई महाराष्ट्राची झाली. पण ती मराठींची राहिली आहे का? महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर अवघ्या पाच वर्षांत शाहीर साबळे यांनी ह्याच प्रश्नावर 'आंधळं दळतंय..!' हे नाटक लिहिलं. मुंबईत मराठीची पिछेहाट आणि अवहेलना कशी होते याचं मर्मभेदी चित्रण या नाटकात होतं. या नाटकाचं तेव्हा समीक्षण करताना प्रमोद नवलकर यांनी लिहिलंय. 'शिवसेनेच्या प्रसूती वेदना शाहीर साबळेंच्या आंधळं दळतंय या नाटकात आहेत...!' मराठी, मुंबईकरांची दुर्दशा दाखवताना शाहीर एका गाण्यात म्हणतात,
अरब पाहुणा घरात शिरला, 
उंट त्याने आत दडपला, 
मालक दारी रडे, मराठी पाऊल मागे पडे...! 
हे चित्र बदलण्यासाठी शिवसेना सजली. सत्तेच्या मेण्यात काही काळ बसली तरीही परप्रांतीयांच्या लोढ्यांच्या नावानं मराठीचं भोकाड पसरणं सुरूच आहे. ह्याला कारण सत्तेसाठी राजकीय पक्षांनी केलेल्या कुरघोड्या हे जसं आहे तसंच मराठी माणसाची उदासीनता, बेपर्वाई, बेजबाबदारपणा, आपल्याच माणसाला कमी लेखण्याची वृत्ती ही आहे.
मध्यंतरी मालवणी भाषेत नाटकं सादर करणारे मच्छिंद्र कांबळी यांनी 'भैय्या हात पाय आणि मराठी माणूस भोकाड पसरी...!' हे नाटक रंगमंचावर सादर केलं होतं. हे नाटक अस्वस्थ करणारं होतं. गुरु ठाकूर यांचं मार्मिक लेखन आणि संतोष पवार यांचं वास्तव ठळक करणारं दिग्दर्शन यांनी प्रेक्षक अन् कलाकार यांच्यातला सीमाभेद पुसून टाकला होता. रंगमंचावर जे घडतंय ते प्रत्यक्षात घडतंय, असं वाटत होतं. ह्या कलारंगात मच्छिंद्र कांबळी, संजीवनी जाधव, संतोष मयेकर आणि सहकाऱ्यांनी अभिनयाने कमालीचा जिवंतपणा आणला होता. संतोष मयेकरांचा भैया चीड आणत होता, त्याचवेळी मराठींची नालायकीही उघडी पाडत होता. ती मराठींना सुधारण्यास चालना देणारी होती. हे नाटक परप्रांतीय गुजराती, मारवाडी वा भैया-उत्तर भारतीयांविरोधी नव्हतं. तर ते मराठींच्या उदासीनतेच्या विरोधात होतं. हा अवगुण मुंबईतल्या मराठीपणाला आटवणारा ठरल्याचं दिसून येतंय. मोठ्या घराचं स्वप्न पाहाताना मराठी कुटुंबं आपली राहाती जागा विकून अधिक पैशाचं, जागेचं आमिष दाखवणाऱ्या अमराठी विकासकाच्या जाळ्यात कशी सापडतात; त्यासाठी मराठींचाच माध्यम म्हणून कसा वापर करतात; हे दाखवण्यासाठी रंगमंचाच्या ताकदीचा पूर्ण वापर या नाटकात करण्यात आला होता. त्यामुळं नाटक काळजाला भिडतं जात होतं. अखेरीस तर मच्छिंद्र कांबळी यांचा प्रत्येक शब्द मुंबई मराठींचीच करण्याचा निश्चय निर्माण करतो. जय जय महाराष्ट्र माझा....या गीताने नाटकाचा पडदा पडतो, प्रेक्षक मच्छिंद्र कांबळींच्या लोकजागृतीला उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना देत असत. फार थोड्या कलाकारांना हा मान मिळतो. मराठी लोक त्याबाबतीत चिकित्सक आहेत, ते स्वतःच्या विकासाबरोबर मुंबई-महाराष्ट्रातला मराठीपणा टिकवून ठेवण्यासाठी चिकित्सक राहावेत, हा नाटकाचा हेतू होता. ह्याच हेतूने शाहीर साबळेंनी साठ वर्षांपूर्वी 'आंधळ दळतंय...!' नाटक रंगमंचावर आणलं होतं. त्या नाटकाचा प्रारंभ 'जय जय महाराष्ट्र' ने व्हायचा. त्याच गीताने 'भैया हातपाय पसरी' चा शेवट होत असे. हा महाराष्ट्र गौरव मराठी बाण्याला साजेसं काही निर्माण करणारा हवा होता. तसा तो झाला नाही हे वास्तव आहे. सत्ताधाऱ्यांना मतं देणारी परप्रांतीय मंडळी जवळची वाटायला लागली, त्यासाठी त्यांनी कमकुवत होत चाललेल्या मराठींची अवहेलना चालवलीय. आता तर अगदी पहिलीपासून हिंदी सक्तीची करून त्यांनी आगीत तेल ओतलंय. त्यामुळं राज आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा आवाज काढण्याची संधी मिळालीय. मराठी माणूस एकवटलाय. तो आगामी काळात किती एकसंघ राहतो हे महत्वाचं आहे. अन्यथा ते भैयाच्या, गुजराथ्यांच्या, मारवाड्यांच्या, परप्रांतीयांच्या नावाने मराठींचं भोकाड पसरणं ठरणार ! असं चित्र निर्माण होऊ शकतं. मराठीचा अभिमान मराठी माणसात कसा भिनलाय, त्याचं दर्शन घडवताना कवी ना.गो. नांदापूरकर माझी मराठी या कवितेत लिहितात-
आम्ही मराठी, हिचे पुत्र लोकी 
कधी भ्यावयाचे ना, मुळी ना कुणा ! 
आकंठ प्यालो, हिचे दूध अंगी 
पहा रोमारोमांतुनी, या खुणा!
तोडा वा चिरा, दुग्धधाराच येती 
रक्त न वाहे, शरीरातुनी !
'माझी मराठी, मराठीच मीही' 
असे शब्द येतील, हो त्यातुनी !
पण हा मराठी बाणा व्यवहारात उपयुक्त ठरतो का?
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

राजसत्तेची कोंडी...!

"देशात 'मतचोरी'च्या आरोपामुळं वातावरण ढवळून निघालंय. अनेक बाबी उघड झाल्यात. हरियाणातला ईव्हीएम घोटाळा सर्वोच्च न्या...