"कधी कधी वाटतं, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं तोडफोड, मारधाड, खळळ खट्यक स्वरूप बदलून मवाळ केलं नसतं तर पक्षातल्या कोल्ह्या लांडग्यांना तिचे लचके तोडण्याची हिम्मत झाली नसती. प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडची 'अरे ला कारे..!' न करता थेट अंगावर जाण्याची वृत्ती बदलून तिला आर्थिक सक्षमता, स्वयं रोजगार, वैचारिक विकास, पुरोगामी तत्व, संविधानाचं महत्व या अशा विधायक मार्गावर आणलं नसतं तर आज भाजपच्या गुंडांची ही हिम्मत झाली नसती. ज्यांचा पुर्ण मेंदू हायजॅक करण्यात आलेलाय अशा गुंड प्रवृतींचा सामना मग केवळ विचारांनी कसा करता येईल? संविधानातली मूळ तत्वं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांचं रक्षण करण्याऐवजी विरोधी विचार शिल्लकच ठेवायचा नाही हे धोरण देशासाठी अत्यंत घातक ठरणारंय. तेव्हा वेळीच जागं झालं पाहिजे अन् अशा 'आधुनिक शाई'स्ते खानांना आवरायला हवं!.. "
-------------------------------------------
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं शाईहल्ला झाला, अन् राज्यभर खळबळ उडाली. हा हल्ला करणारा दिपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा राज्याचा सचिव असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झालंय. संभाजी ब्रिगेडसह पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते संतप्त झालेत, त्यांनी सरकारलाच धारेवर धरलं. विधिमंडळात तसंच राज्यभर संतप्त पडसाद उमटलेत. या घटनेमुळं संभाजी बिग्रेड पुन्हा चर्चेत आली. परिवर्तनवादी क्रांतीकारी धगधग! संभाजी हे एकेरी उच्चारण नाही तर संभा हे एकेरी नाव आहे संभाजी हे सन्मानार्थी नाव आहे आणि आमची एक संघटना आहे ज्यात अनेक लोकं सामील आहेत…!
त्यामुळे एखाद्या संघटनेच्या नावापुढे छत्रपती लावणं योग्य वाटत नाही असं संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांचं म्हणणं आहे. शिवाय मुंबईतल्या सचिन कांबळे नामक तरुणानं छत्रपती संभाजी ब्रिगेड या नावाची संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी केलीय त्यामुळं कायदेशीर बाबी निर्माण झाल्यात. आम्हाला ते नावं मिळत नाही पण आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत असं सांगण्यात आलंय.…!
मराठा सेवा संघाच्या स्थापनेनंतर १९९१ ला सुरु झाला, मराठा युवक कक्ष. परंतु सामाजिकदृष्ट्या हा कक्ष व्यापक करण्यासाठी १९९५ ला मुंबईत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत या युवक कक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मधुकर कोकाटे आणि इतिहास संशोधक मा.म.देशमुख यांच्या संकल्पनेतून त्याचं नामकरण ‘संभाजी ब्रिगेड’ असं करण्यात आलं. छत्रपती संभाजी राजेंचं नाव संघटनेला दिल्यानं अनेक जाती-धर्माचे युवक या चळवळीकडे ओढले गेले. त्यालाच समांतर मराठा महिला कक्षाचे नामकरण ‘जिजाऊ ब्रिगेड’ असं करण्यात आलं, अन् राज्यभर तरुण आणि महिलांची मोठी फळी चळवळीच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या पाठीशी उभी राहिली. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी या दोन्ही ब्रिगेडच्या माध्यमातून तरुण आणि महिला वक्त्यांची एक पलटणच महाराष्ट्रभर उभी केली. त्या माध्यमातून जयश्रीताई शेळके, श्रीमंत कोकाटे, अनिल पाटील, गणेश हलकरे, शरद पाटील, सुनिल मोरे, बबलू पाटील, मनोज आखरे, गंगाधर बनबरे, अमोल मिटकरी, प्रविण गायकवाड, प्रा.शिवानंद भानुसे यासारखी अनेक वक्त्यांच्या कितीतरी मुलूखमैदानी तोफा महाराष्ट्रभर धडधडायला लागल्या, अन् मनुवाद्यांची धडधड वाढायला लागली. चळवळीमध्ये एक नवचैतन्य सळसळायला लागले.. अनेक नावे सुटली असतील !
संभाजी ब्रिगेडचा इतिहास पाहिला तर ही संघटना सामाजिक न्याय, बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढा आणि इतिहासकालीन महापुरुषांचा सन्मान राखण्याचं काम करते. प्रखर राष्ट्रवादी संघटना म्हणूनही काम करते. संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत विविध प्रश्नांवर आंदोलने, धरणे आणि अनेक वादग्रस्त कारवाया केल्यात. या संघटनेची सर्वात जास्त गाजलेली कारवाई म्हणजे ५ जानेवारी २००४ रोजी पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर तब्बल ७२ कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला, ज्यात अनेक प्राचीन दस्तऐवज नष्ट झाले होते. या हल्ल्याचं कारण होतं जेम्स लेन लिखीत ‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामीक इंडिया’ या पुस्तकात उल्लेखलेल्या काही इतिहासाचे अभ्यासक आणि भांडारकर संस्थेकडून मिळालेल्या माहितीचा आरोप. हा हल्ला करणार्यांचा जाहीर सत्कार १२ जानेवारी २००४ च्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात करण्यात आला होता. तशी संभाजी ब्रिगेडची ओळख ही आक्रमक आंदोलकांची राहिलीय. २०१० रोजी पुण्यातल्या लाल महालात बाल शिवाजी, जिजाऊ अन् दादोजी कोंडदेव यांच्या महापालिकेनं उभारलेल्या समूहशिल्पातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवणं, २०११ ला किल्ले रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीची तोडफोड, २०१७ ला पुण्याच्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा काढून फेकण्यात आला. २०१८ ला वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबईत हल्ला, २०२१ ला नाशिकमध्ये लेखक गिरीश कुबेर यांच्या पुस्तकातल्या संभाजी महाराजांच्या संदर्भावर असंतोष व्यक्त करत त्यांना केलेली मारहाण, शिक्षण विभागाचे एक वरिष्ठ अधिकार्यांवर संभाजी ब्रिगेडचे तत्कालीन पश्चिम विदर्भ संघटक मनोज वाघ यांनी केलेली शाईफेक, यासह ईव्हीएम विरोधी आंदोलन, शेतकरी अन्नत्याग आंदोलन, त्रासदायक अधिकारी विरोधी आंदोलन, सोलापूर विमान सेवेसाठी आंदोलन, सोलापूर मध्येच गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याला विरोध म्हणून मंगळसुत्राच्या प्रतिकात्मक प्रदर्शनानं निषेध.. अशी विविध आंदोलनं संभाजी ब्रिगेडनं आजवर केलीत यातली अनेक आंदोलनं आणि संभाजी ब्रिगेड ही वादाच्या भोवर्यात सापडलीय. त्यामुळं ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल झालेलेत.
जानेवारी २००४ ला भांडारकर संस्थेवर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याचं आवाहन करत संभाजी ब्रिगेडच्या या कृतीला ‘तालीबानी कृत्य’ असं संबोधलं होतं. भाजपमधले वैचारिक नेतृत्व म्हणून अटलजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत या संघटनेतले अनेक नेते आणि कार्यकर्ते वैचारिक बाजूवर प्रतिगामित्वाच्या विरोधात पुरोगामी विचार मांडत राहिले. पण आज त्याच वैचारिक प्रवृत्तीवर तालीबानी कृत्याप्रमाणे हल्ला होत असेल, तोही ज्या पक्षात वाजपेयींनी विचार पेरला. त्याच पक्षातल्या कार्यकर्त्याकडून तर मग विचारांचा मुकाबला विचारांनी कसा होणार? हा वैचारिक प्रश्न शेवटी पडतोच!
संभाजी ब्रिगेडच्या ७२ जणांना पुढे अटक करण्यात आली. १४ वर्षांनंतर २०१७ साली या खटल्यातील ६८ जणांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता झाली. चार आरोपींचं सुनावणीदरम्यान निधन झालं होतं. अमेरिकन लेखक जेम्स लेन यांनी लिहिलेल्या 'शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया...!' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचा होता. या घटनेनंतर राज्य सरकारने पुढे या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदीही घातली. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ही संघटना मराठा समाजासाठी काम करते. संभाजी ब्रिगेडच्या वेबसाईटवर म्हटलं आहे की, संभाजी ब्रिगेडची ओळख ही प्रामुख्याने आक्रमक आंदोलने करणारी संघटना अशीच राहिलीय. मराठा समाजाची शक्ती, वेळ, पैसा या गोष्टी गेली ३५-४० वर्षे केवळ आरक्षण या विषयाभोवती केंद्रित झाल्यात. मात्र आजही मराठ्यांच्या हातात म्हणावे तसे यश मिळाले नाही. उलट हजारो केसेस, अनेक आंदोलकांचा बळी, राजकारण्यांकडून फसवणूक, सामाजिक सलोख्याचे बिघडलेले वातावरण, इत्यादि नको असणाऱ्या गोष्टी पदरात पडल्या. केवळ आरक्षणाने मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, म्हणून आता उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात उतरायला हवे असे प्रवीण गायकवाड यांचं सांगणे आहे. २०२२ सालापासून "अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूख आपला... !" या नावाचा उपक्रम प्रवीण गायकवाड चालवतात. आपल्या लोकांनीही ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात मुलूखगिरी करावी, तिथं जाऊन नोकरी, उद्योग आणि व्यवसायाच्या संधी हेराव्यात, त्यातून आपले अर्थकारण मजबूत करावं आणि जगभर आपली कम्युनिटी फार्मिंग करावी अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. आज हा विचार पेरला तर निदान भविष्यात तरी आमची लोकं समृद्ध, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील', असं प्रवीण गायकवाड सांगतात. २०१६ साली मराठा सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडनं राजकीय वर्तुळात सक्रीयपणे उतरण्याचा निर्णय घेतला. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी मराठा सेवा संघाची शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं स्वत:ला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं. तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हेच पक्षाचे प्रमुख झाले आणि पुरुषोत्तम खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर हे सरचिटणीस झाले. प्रवीण गायकवाड हे मराठा सेवा संघाच्या अखत्यारित संभाजी ब्रिगेड असताना, तिचे पाच वर्षं अध्यक्षही होते. २०१६ साली संभाजी ब्रिगेडचा पक्ष स्थापन करणारे मनोज आखरे हे त्यावेळी प्रवीण गायकवाड यांचे सहकारी होते, जे पुढे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षही झाले होते.
प्रवीण गायकवाड यांनी याच काळात शेतकरी कामगार पक्षात आणि नंतर काँग्रेसमध्येही प्रवेश केला. मात्र, त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली नाही.
पुण्यातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही. त्यामुळे गायकवाड नाराज असल्याची चर्चाही झाली.
मात्र, प्रवीण गायकवाड यांनी राजकीय प्रवेश किंवा पक्षांतरं सुरू असतानाही, संभाजी ब्रिगेडचं काम सुरू ठेवलं. नाशिकमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती. गिरीश कुबेर लिखित 'रेनेसाँ स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र...!' या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी या १ सप्टेंबर १९९० रोजी या मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती. मूळचे बुलडाणा जिल्ह्यातले असणारे पुरुषोत्तम खेडेकर हे तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते.
मराठा-कुणबी समाजातल्या सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा प्रमुख उद्देश मराठा सेवा संघाच्या स्थापनेवेळी होता. पुढे मराठा सेवा संघानं ३० हून अधिक विभाग सुरू केले. जेव्हा मराठा सेवा संघाची स्थापना झाली तेव्हा खेडेकर यांच्यासह निर्मलकुमार देशमुख, अमृतराव सावंत यांच्यासारखे एकूण १७ जण प्रमुख कार्यकर्ते होते. मर्यादित उद्देशासह सुरू झालेली संघटनेनं पुढे मोठं रूप घेतलं. मराठा सेवा संघानं स्थापनेच्या काही वर्षांतच ३२ ते ३३ विभाग सुरू केले. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचा दावा करत, दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा, क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा, अशी मागणी मराठा संघटनांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली. यात संभाजी ब्रिगेड अग्रस्थानी होती. या प्रकरणी सरकारने समितीही नेमली. या समितीच्या अहवालाचा आधार घेत क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख काढून टाकण्यात आला. तसंच दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारही रद्द करण्यात आला. त्यानंतर दादोजी कोंडदेव प्रकरणी पुन्हा वाद तापला तो २०१९ साली. त्यानंतर डिसेंबर २०१० मध्ये लाल महलातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्यात आला. त्यानंतर २०१२ साली संभाजी ब्रिगेडनं रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला होता. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता, असं म्हणणं संभाजी ब्रिगेडचं होतं आणि आहे. त्यानंतर चर्चा करण्यासारखं संभाजी ब्रिगेडचं गेल्या काही वर्षातील निदर्शन म्हणजे २०१७ च्या जानेवारी महिन्यात पुण्यातील संभाजी उद्यानातला साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकणं. राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकांमधून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांचा लिहिलेला इतिहास हा संभाजी ब्रिगेडच्या कायमच निशाण्यावर राहिलाय. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासही त्यांनी विरोध केला होता. त्यांच्यावरही शाईफेकीची घटना घडली होती. एकूणच राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह लेखन केल्याच्या आरोपातून आजवर संभाजी ब्रिगेडनं अनेकदा आक्रमक निदर्शनं नोंदवली आहेत.
आ. ह. साळुंखे, मा. म. देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज किंवा नंतरच्या इतिहासाची मांडणी करणाऱ्या पुस्तकांचा प्रसार-प्रचारही संभाजी ब्रिगेडनं केलाय. वैचारिक प्रतिवाद करण्याचं कधीच संभाजी ब्रिगेडनं सोडलं नाही. याआधीही केलंय आणि अजूनही करताहेत.
२०१६ साली मराठा सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडनं राजकीय वर्तुळात सक्रीयपणे उतरण्याचा निर्णय घेतला. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी मराठा सेवा संघाची शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं स्वत:ला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं. तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हेच पक्षाचे प्रमुख झाले आणि पुरुषोत्तम खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर हे सरचिटणीस झाले. मात्र, संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना होती आणि त्याच धर्तीवर तिचा प्रसार झाला होता. त्यामुळे राजकीय पक्षास अनेकांचा विरोध होता, त्यातूनच पक्ष आणि सामाजिक संघटना हे दोन गट निर्माण झाले.
संभाजी ब्रिगेडच्या राजकारणातील प्रवेशास मराठा सेवा संघात आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनीही विरोध दर्शवला आणि त्यांनी 'मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड' नामक सामाजिक संघटना म्हणून वेगळा गट सुरू ठेवला. संभाजी ब्रिगेडच्या अजेंड्याबद्दल तुमचे मतभेद असू शकतील, पण त्यांनी ज्या तरुणांना गोळा केले त्यांचे मनोविश्व समजून घेतले पाहिजे. दोन-पाच एकर शेती असणारा, शिक्षण घेण्याच्या अडथळ्यांनी वैतागलेला, नोकरी-रोजगार नसलेला 'नाही रे' वर्गातला शेतकरी मराठा समाजातल्या तरुणांना ही संघटना आपली वाटते. त्या 'नाही रे' तरुणांना ही संघटना शिवरायांसारखे लढायचं आवाहन करून मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेनं जवळ केलंय. इथं आणखी एक गोष्ट महत्त्वाची ठरते, ती म्हणजे केवळ भावनेच्या आहारी जात प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वातील संभाजी ब्रिगेडनं तरुणांची मोट बांधली नाही, तर गेल्या काही वर्षात या तरुणांना उद्योजकतेविषयक प्रशिक्षणं देण्याची कामंही सुरू केली आहेत. विशेषत: पुण्यात प्रवीण गायकवाड यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या 'बिझनेस कॉन्फरन्स २०२१...'कडे याचं ताजं उदाहरण म्हणून पाहता येईल. संभाजी ब्रिगेडच्या सामान्य कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी संभाजी ब्रिगेडनं हे सुरू केलं. केवळ भावनेच्या आहारी जाऊन नव्हे, तर बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठीही 'अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपुला....!' असं म्हणत प्रवीण गायकवाडांनी उद्योजकतेकडे या कार्यकर्त्यांना वळवलंय
हरीश केंची,
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment