अशा 'बावनकशी' निश्चयानं भारतातल्या देशी शाळेतल्या पहिल्या विद्यार्थिनी आणि शिक्षिका मुख्याध्यापिका अशी ओळख असणाऱ्या सवित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय राज्य सरकारनं काही वर्षापूर्वी घेतला आणि या निर्णयानुसार, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा नामविस्तार सुरू झालाय. सावित्रीबाई या महात्मा जोतीराव फुले यांच्या पत्नी; तशाच जोतीरावांच्या सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतिकारी कार्यात बरोबरीनं काम करणाऱ्या सहकारी, सावित्रीबाईचा १८४० मध्ये जोतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. साताराच्या नायगावमधून त्या पुण्यात आल्या. त्यावेळी सावित्रीबाईंचं वय नऊ वर्ष आणि जोतिरावांचं वय तेरा वर्ष होतं. जोतिरावांना लहानपणापासून आईचं प्रेम लाभलं नाही. त्यांचा सांभाळ सगुणा आऊ या मावसबहिणीनं केला. ह्या सगुणाऊ पुण्यात एका इंग्रज अधिकाऱ्याकडे त्यांची मुलं सांभाळण्याचं काम करत. त्यामुळं सगुणाऊंना इंग्रजी कळायचं; पण बोलता येत नसे. पण त्यांनी आपल्या ज्ञान माहितीचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. त्यानं जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. दरम्यान, सावित्रीबाईही लग्नापूर्वी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दिलेलं एक इंग्रजी पुस्तक सोबत घेऊन सासरी आल्या होत्या. त्या पुस्तक वाचनानं जोतिरावांना सामाजिक कार्यासाठी नवा मार्ग सापडला. तो होता शिक्षणाचा; आणि ते देव-धर्माच्या नावानं भट-ब्राह्मणशाहीनं बंद केलेले शिक्षणाचे मार्ग सर्वांसाठी खुलं करण्यासाठी तयार झालं. स्वतः शिकून त्यांनी सावित्रीबाईंनाही शिकवलं. या कामात सगुणाऊदेखील होत्या. या दोघींबरोबर फातिमाबिबीनींही रीतसर शिक्षण घेतलं. १ मे १८४७ रोजी सावित्रीबाईनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत शाळा काढून दिली. ही जोतिराव सावित्रीबाईची पहिली शाळा. ह्या शाळेत सगुणाऊ आनंदानं शिकवू लागल्या. परंतु, ही शाळा थोड्याच दिवसांत बंद पडली. पण जोतिराव-सावित्रीबाईंनी आपले प्रयत्न थांबवले नाहीत. त्यांनी सहाच महिन्यांत १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातल्या भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही ब्रिटिश भारतातल्या भारतीय व्यक्तीनं सुरू केलेली पहिलीच मुलींची शाळा. या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम पाहात होत्या. सुरुवातीला ह्या शाळेत सहाच विद्यार्थिनी होत्या; पण वर्षभरात ही संख्या ४६ विद्यार्थिनींपर्यंत पोहोचली. ह्या प्रतिसादामुळं जोतिराव आणि सावित्रीबाईंनी पुण्याच्या इतर भागातही मुलींसाठी तीन शाळा सुरू केल्या. तथापि, जोतिराव सावित्रीबाई यांच्या या शैक्षणिक कार्याला कर्मठ, सनातनी ब्राह्मणांनी देव-धर्माची साक्ष काढत विरोध केला. मागास जातीचे लोक शिक्षण घेऊ लागले...
महिलाही शिकू लागल्या...
त्याने धर्म बुडाला !
आता जग बुडणार! कली आला!
अशी बोंब त्यांनी ठोकली. जोतिरावांच्या वडिलांना गोविंदरावांना त्यांनी 'तुझ्या मुलानं आणि सुनेनं मागासांना आणि महिलांना शिक्षण देण्याचं काम थांबवलं नाही, तर वाळीत टाकू...!' अशी धमकी दिली. पण जोतिराव आणि सावित्रीबाई आपल्या कार्याबद्दल ठाम राहिल्यानं त्यांना गोविंदरावांचं घर सोडावं लागलं, तरीही सावित्रीबाईंचा छळ संपला नाही. सावित्रीबाई शाळेत शिकण्या-शिकवण्यासाठी जाताना भट-ब्राह्मण आणि भटीपाशात फसलेले लोक सावित्रीबाईंची हेटाळणी करीत. अर्वाच्च बोलत. त्यांच्या अंगावर थुंकत. शेण-गोटे मारत, जोतिराव-सावित्रीबाईना धडा शिकवण्याची भाषा करत. हा सारा मारा सोसत सावित्रीबाई त्यांना शांतपणे ऐकवत, 'माझ्या भावांनो, मी जे काम करते, ते तुमच्याच माय-बहिणींसाठी आहे, ते तुमच्याही भल्यासाठी आहे. त्याची किंमत तुम्हाला आज नाही, पण उद्या कळेल....!' स्त्री शिक्षणाचं कार्य करतात, म्हणून ज्या पुण्यात सावित्रीबाईची अवहेलना झाली; त्याच पुणे विद्यापीठला सावित्रीबाईंचं नाव दिलंय. पण त्यासाठी सावित्रीबाईच्या मृत्यूनंतर १२५ वर्ष जावी लागली. सनातनी नीचपणा संपला नसल्याची ही साक्ष आहे.
बाराखडी जोतिबा-सावित्रीची
जोतिरावांच्या ऐतिहासिक कार्यामुळंच शिक्षण भटीपाशातूनच नाही; तर सोवळ्यातूनही सुटलं आणि सावित्रीबाईंनी प्रचंड छळ सोसूनही आपलं कार्य सुरू ठेवलं, म्हणूनच आज असंख्य तरुणी-महिला मोठ-मोठ्या हुद्यांवर काम करताना दिसतात. कुणी वैज्ञानिक आहेत, पायलट आहेत, लष्करी अधिकारी आहेत, उद्योजिका आहेत. शिक्षिका-प्राध्यापिका तर भरपूर आहेत. देशाचं सर्वोच्च अधिकार स्थान असलेलं राष्ट्रपती पदही महिलेनं प्रतिभा पाटील यांनी भूषवलंय, कल्पना चावलानं तर थेट अंतराळात भरारी मारली होती. भारतीय वंशाच्या सुनीता विलियमनं तर अंतराळात सर्वाधिक काळ राहाण्याचा विक्रम केलाय. या मिळून साऱ्याजणींना सावित्रीबाईंचं कार्य ठाऊक असेलच, ह्याची खात्री देता येत नाही. कारण वर्तमान विपरीत आहे. ते दाखवण्याचा प्रयत्न 'जिंकू या दाहीदिशा.....' या नाटकात केलाय. हे नाटक छत्रपती शिवराय, जिजामाता, महात्मा फुले, सावित्रीबाई, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज आले, तर काय बोलतील, या कल्पनेवर बेतलेलंय. या नाटकातला तरुण सावित्रीबाईंची ओळख होताच, तो वरीलप्रमाणे त्यांच्या कार्याची महती सांगतो, तेव्हा त्या तरुणाला रोखत सावित्रीबाई म्हणतात, 'हो, हो! पण सुनीता विलियम सुखरूप परत यावी, यासाठी शहरातील सुशिक्षित, सुसंस्कृत महिलांनी होम केला होता ना....?'
तरुणः (खाल मानेने) हो हो, बाई!
सावित्रीबाईः (त्रासिकतेने) अरे, देशातील पहिली विद्यार्थिनी आणि शिक्षिका म्हणून तुम्ही माझं नाव घेता बन्याच जणी स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवतात. (अस्वस्थपणे) पण ही सावित्री शिकण्या आणि शिकवण्यासाठी शाळेत कशी जात होती, ठाऊक आहे? ...शाळेत जाताना माझ्या काखोटीला पुस्तकं पाटी, आणि एक लुगडं असायचं. वाटेवरची लोकं कुत्सित नजरेने पाहात. अभद्र बोलत. कुणी माझ्या दिशेने धुंकत. कुणी शेणगोळे, तर कुणी दगड-गोटे मारत. जखमा व्हायच्या. शाळेत गेल्यावर आडोशाला जायचे. अंगावरचं खराब झालेलं लुगडं बदलायचे. सोबत आणलेलं लुगडं नेसून शिकायचे आणि शिकवायचे. अरे, ज्या सावित्रीने शिक्षणासाठी माथ्यावर धोंडे खाल्ले; त्या सावित्रीला, देव देव म्हणत धोंड्यावर डोकं आपटून घेण्यासाठी केलेली तरुणी स्त्रियांची गर्दी पाहून कसा आनंद होईल?
ती अस्वस्थच असणार !
तरुणः पण सुशिक्षित स्त्रियांनी तरी...
सावित्रीबाईः सुशिक्षित? ... कोण सुशिक्षित? सुशिक्षितांना शिक्षणाचा खरा अर्थ कळला असता, तर त्यांनी आयुष्यातील बहुमूल्य वेळ पोथ्यावाचनात आणि देवळापुढच्या रांगांत वाया घालवला नसता.
तरुणः पण शिक्षकांनी तरी...
सावित्रीबाईः (रोखत) ते काय! तुमच्यासारखेच !... मार्कापुरते शिकलेले आणि शिकवणारे!
तरुणः मग, तुमची शिक्षणाची पद्धत कशी होती?
सावित्रीबाईः (हसून) त्याची मजा आहे. जोतिरावांचं गरीब-अस्पृश्यांना शिक्षण देण्याचं काम सुरू झालं होतं. एक दिवस घरासमोरच्या अंगणात आम्ही बोलत बसलो होतो. अचानक जोतिरावांनी डोळे मोठ्ठाले करीत मला सांगितलं, आत जा आणि काठी घेऊन ये. मी घाबरले. काय झालं ते कळेना. भीत भीत काठी घेऊन आले. त्या काठीने त्यांनी मातीच्या जमिनीवर एक आकार काढला. तसाच आकार मलाही काढायला सांगितला. पहिल्याच दमात मला ते जमलं.... जोतिराव खूष झाले. मी त्यांना विचारलं, हा आकार कसला आहे? तर ते म्हणाले, हा आकार नाही. हे अक्षर आहे. ह्याला म्हणतात 'ग'!... पण या 'ग'ची ओळख काय सांगितली, माहीतेय?
तरुणः (उत्साहात) त्यात काय? 'ग' रे गणपतीतला! अशीच सांगितली असणार!
सावित्रीबाईः छ्या! ... त्यांनी सांगितलं 'ग'... रे गवतातला! मातीचं आणि मतीचं नातं जोडणारी 'ग'ची ओळख त्यांनी सांगितली. त्यांचा 'ज्ञ'ही यज्ञातला नव्हता. तर ज्ञानातला होता!
तरुणः म्हणजे, तुमची बाराखडीच वेगळी होती!
सावित्रीबाईः ती तशी होती, म्हणूनच मी तुझ्यासमोर अशी हिंमतीनं खडी आहे! या हिंमतीनेच आम्ही सांगू लागलो-
नसे बुद्धी ज्याला, नसे ज्ञान काही
अशा मानवाला, कधी सुख नाही!
तरुणः बाई, कुणाचं काव्य हे?
सावित्रीबाईः माझं ! मी शिकले, आणि लिहू-बोलूही लागले. माझ्यासारखीच फातिमा बिबीही होती. आमच्या ताराबाई शिंदेंनी तर 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथच लिहिला. या लेखनातून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक चिकित्सा करण्यापर्यंत मजल मारली. शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही झटत होतो. या कार्याआड येणाऱ्यांना ठणकावून सांगत होतो-
अविचार, अज्ञान; मूर्खत्व जेथे !
कसे काय राहील, धर्मत्व तेथे ?
गोपाळकाला फोडण्याचा उद्योग
सावित्रीबाईंचं कार्य केवळ स्त्री शिक्षणापुरतंच मर्यादित नाही. तेव्हाच्या काळी सत्तर वर्षांचा नवरा आणि बारा वर्षांची नवरी असे जरठ-बाला विवाह व्हायचे. परिणामी, अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षीही विधवा व्हायच्या. अशांचे पुनर्विवाह होत. मात्र, ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाहास अजिबात मान्यता नव्हती. अशा विधवा मुलींना पती निधनानंतर सती जावं लागे; अथवा केशवपन करून 'बोडकी' केलं जात असे. ह्या केशवपनाविरोधात गोपाळ गणेश आगरकरांनी चळवळ सुरू केली; तेव्हा जोतिराव फुले यांनी न्हाव्यांचा संप घडवून त्यांना पाठिंबा दिला होता. पण जोतिराव तेवढ्यावरच थांबले नाहीत. 'बोडकी' झालेल्या मुलीने लाल रंगाचं लुगडं म्हणजे आलवण नेसलं पाहिजे; देवपूजेतच गुंतवून घेतलं पाहिजे, असा नियम असायचा. पण असा कितीही बंदोबस्त केला, तरी शरीराची स्वतःची म्हणून गरज असतेच! ही गरज ओळखून तिच्या असहाय्यतेचा फायदा उठवला जात असे. त्यात घरातलेच सासरे वा दीरही असायचे. कधी-कधी सत्संगाला आलेल्या बालविधवेचा भक्तिभाव पाहून लंपट पुराणिकबोवाही गोपालकाला उरकायचे. पण मग निसर्ग आपल्या नियमानुसार वागू लागला की, हे संधिसाधू नामानिराळे होत. या प्रकारानंतर पोटात वाढणारा जीव स्वतःसह आईला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करायचा. अशा असहाय्य महिलांसाठी जोतिरावांनी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केलं. या असहाय्य महिलांचं बाळंतपण सावित्रीबाई स्वतः करीत. सगळं ठीकठाक झाल्यावर त्या महिला लेकरांना सावित्रीबाईंकडे सोपवून घरी परतत. अशा बऱ्याच मुलांना सावित्रीबाई आणि जोतिरावांनी वाढवलं. त्यातील ठाणे इथल्या काशीबाईंचा मुलगा यशवंताला त्यांनी दत्तक घेतला. त्याला शिकवलं. डॉक्टर केलं, त्याच्या नावावर दोघांनी सगळा जमीन जुमलाही करून दिला. दोघांच्या कार्याला यशवंतानीही साथ दिली. जोतिराव फुले आणि सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या सत्यशोधक समाजच्या कामात आणि पुनर्विवाहाचा कायदा होण्यासाठीच्या प्रयत्नात सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुलेंच्या निधनानंतर १८९० ला त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाला अग्नी देण्याला दत्तकपुत्र म्हणून यशवंताला विरोध केला. तेव्हा सावित्रीबाई स्वतः अग्नी देण्यासाठी पुढे झाल्या. ह्याच हिंमतीनं त्यांनी महात्मा फुलेंच्या पश्चात 'सत्यशोधक समाज'ची जबाबदारी घेतली. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी लेखन केलं. 'काव्य फुले' आणि 'बावनकशी सुबोध रत्नाकार' हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यात फुला-चंद्रावर कविता नाहीत. त्यात समाजाच्या वेदना-संवेदना सांगणाऱ्या, प्रबोधन करणाऱ्या कविता आहेत. सावित्रीबाईंची 'भाषणंही उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसनं, कर्ज अशा विषयांवर असत. उद्योगाचंही त्यांनी 'विचारी उद्योग व विचार नसलेला उद्योग,' असं वर्गीकरण केलं होतं. 'अभ्यास करणे, हा विचारी उद्योग आहे. या उद्योगात डोळे, कान, बुद्धी या इंद्रियांची जरुरी असते. उलटपक्षी, दे ग माई भाकरी मला... असं ओरडत फिरणे, हाही उद्योगच आहे, पण तो विचार नसलेला उद्योग आहे,' असं सावित्रीबाई म्हणतात. 'उद्योग हा ज्ञानस्वरूप असून, आळस हा दैवाचा मित्र आणि दरिद्रीपणाचं लक्षण आहे,' अशी सुभाषितं त्यांच्या भाषणांत आहेत. 'सदाचरण, हे मनुष्यास अधिक सुख प्राप्त करून घेण्याचं व्रत आहे. या व्रतामुळे सर्व संसार दुःखांचा नाश होतो,' असं त्या 'सदाचरण' ह्या विषयीच्या भाषणात सांगतात. कर्ज काढून व्यर्थ उधळपट्टी करणं, खोट्या श्रीमंतीचा देखावा करणं, हे किती चुकीचं आहे, ते सावित्रीबाईंनी आपल्या कवन-लेखनातून स्पष्ट केलंय. त्या म्हणतात-
शेटजीचे कर्ज घेई, तयाचे सुख दूर जाई।
संकटाने हैराण होई, बेजार होई कर्जदार ।।
कर्जाने लागतसे चिंता, घालवी सारी मालमत्ता ।
संसारात वाढवी गुंता, आली अहंता ऋणकोची ।।
अर्थकारणाचा आणि आपला फारसा संबंध नाही; त्यातलं फारसं कळत नाही, असं बोलणाऱ्या सुशिक्षित, नोकरदार महिलांची संख्या आजही कमी नाही. नवऱ्याचा आर्थिक व्यवहार कळत नाही, असंही त्या म्हणतात. तो समजून घ्यावा यासाठी सावित्रीबाईनी हे १२५ वर्षांपूर्वी 'कर्ज-कवन' लिहिलं. ते सर्वांनीच समजून उमजून घेऊन त्यानुसार वागलं पाहिजे. फरक इतकाच, सावित्रीबाईंच्या काळात लोकांना कर्जात फसवणारे शेटजी-सावकार होते; आता लोन-स्कीमचा फंडा आहे.
विद्यापीठाचे व्हावे विचार-कृतिपीठ
सावित्रीबाईंनी १८९६ मधल्या दुष्काळात लोकांना सहकार्याचा आदर्श घालून दिला. केवळ अन्नासाठी शरीर विक्रयाला तयार झालेल्यांना दुष्टांच्या कब्जातून सोडवून त्यांना सत्यशोधक कुटुंबाच्या घरात आश्रयाला पाठवलं. ह्या कार्यातली सावित्रीबाईंची तळमळ लक्षात घेऊन बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांनी आणि पंडिता रमाबाई यांच्या संस्थेने भरघोस मदत पाठवली. दुष्काळानंतर वर्षभरात पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. ह्या संसर्गजन्य रोगाने अनेकांचे जीव फटाफट जाऊ लागले. त्यामुळे ब्रिटिश सरकारने संभाव्य रोगी हुडकून त्यांचं स्थलांतर करण्याचा खबरदारीचा उपाय अंमलात आणला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळच्या ससाणे येथे मुलगा-डॉ. यशवंतच्या सहकार्याने दवाखाना सुरू केला. तिथे त्या प्लेग रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचं काम करीत होत्या. त्यातच प्लेगबाधा होऊन १० मार्च १८९७ रोजी सावित्रीबाईंचं निधन झालं. काळाने डाव साधला. पण त्यांचं कार्य काळालाही पुरून उरलंय. कारण ते कार्य काळाच्या पुढे होतं. जोतिरावांसारखा महात्मा पती असूनही त्यांच्या सावलीत सावित्रीबाई वावरल्या नाहीत. त्या क्रांतिज्योत बनून आपलं तेज दाखवत राहिल्या. १९९५पासून सावित्रीबाईंचा ३ जानेवारी हा जन्मदिन राज्यात 'बालिका दिन' म्हणून साजरा होतो. त्यांच्या नावाने सरकार आणि अनेक संस्था-संघटना पुरस्कार देतात. त्यांच्या नाव-चित्राचं केंद्र सरकारने टपाल तिकीटही काढलंय. त्यांच्यावरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. सावित्रीबाईंचं कार्य ऐतिहासिक असूनही डोंबिवली येथील नाट्यगृहाला त्यांचं नाव देताना बराच वाद झाला. या नाट्यगृहासाठी डोंबिवलीला राहाणारे पु. भा. भावे आणि शं. ना. नवरे (हयात असताना) यांची नावं नाटककार म्हणून पुढे आली होती. तेव्हा मी मत मांडलं होतं-सावित्रीबाई नाटककार नसल्या तरी त्यांच्यावर शेकडो नाटक चित्रपट, कथा-कविता-कांदबऱ्या होतील, एवढं त्यांचं कार्य थोर आहे. एवढी थोरवी भावे-नवरे यांच्या नावे आहे का? शेवटी सावित्रीबाईंचं नाव डोंबिवलीच्या नाट्यगृहाला देण्यात आलंय. पुणे विद्यापीठालाही सावित्रीबाईंचं नाव सहजासहजी देण्यात आलेलं नाही. गेली १० वर्ष डॉ. बाबा आढाव आणि 'सत्यशोधक विद्यार्थी परिषदे'चे किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी आपल्या सहकारी व पुरोगामी संघटनांसह पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव देण्यासाठी पाठपुरावा करीत होते. ह्या कामात 'समता परिषद'चे कृष्णकान्त कुदळे, हनमंत उपरे, भिंगारे ह्यांचाही पुढाकार होता. सावित्रीबाईंच्या नावाला 'पुणे विद्यापीठ'च्या सिनेटने ऑक्टोबर २०१३मध्ये मान्यता देऊन आवश्यक त्या मंजुरीसाठी राज्य शासनाकडे नामविस्ताराचा ठराव पाठवला होता. त्याला राज्य शासनाने आता मान्यता दिलीय. या नामविस्ताराबरोबर पुणे विद्यापीठाची उरली सुरली सोवळी ओळखही मिटली पाहिजे. 'सावित्रीबाई फुले विचार-कृतिपीठ' अशी त्याची ओळख झाली पाहिजे. सावित्रीबाईनी स्वतंत्र ओळख निर्माण केली, तरी त्या म्हणत होत्या-
माझ्या जीवनात । जोतिबा सानंद
जैसा मकरंद । कळीतला ।।
मानवाचे नाते । ओळखती जे ते
सावित्री वदते । तेच संत ।।
No comments:
Post a Comment