Saturday, 22 February 2025

आत्मनिर्भर म्हणजे काय?


ज्यांना सतत परावलंबी जगायला शिकवलेलं असतं, त्यांना स्वावलंबी म्हणजे काय ते समजू शकत नाही. तो त्यांचाही दोष नसतो. मानसिक किंवा बौद्धीक विकास होताना ज्या गोष्टी ज्ञान म्हणून त्यांच्या मेंदूमध्ये ‘डाऊनलोड’ केलेल्या असतात, त्यांना नव्या गोष्टी समजूही शकत नाहीत. किंबहूना दुसर्‍या सॉफ्टवेअरचे आदेश समजणं शक्य नसेल, तर त्याचं आकलन होऊन तसं काम करणंही अशक्य असतं. साहजिकच पत्रालंबीत्व म्हणजेच स्वावलंबन असे मनांत भिनलेलं असेल, तर आत्मनिर्भर म्हणजे काय त्याचं आकलन अशा लोकांना खुळेपणा वाटणं स्वाभाविक आहे.
 हातात वाडगा घेऊन कुठल्याही दारात उभं राहणं हाच त्यांना रोजगार वाटत असतो. एकदा तेच धोरण वा विचारधारा बनली, तर मग तेच तत्वज्ञान होऊन जातं. साहजिकच कुठल्याही समस्या वा उपायांवर वाडगा घेऊन भिक मागणं, हा हक्क मानला जाऊ लागतो. कोरोनानंतर जी परिस्थिती उदभवली, त्यावरचा उपाय म्हणून देशातले वा प्रस्थापिताचे बहुतांश समर्थक प्रत्येक बाबतीत पॅकेजसाठी वाडगा घेऊन रांगेत उभे ठाकले होते, त्यात नवल काहीच नाही. पण त्यांच्या वाडग्यात कोणीतरी काहीतरी टाकायचं, तर ते आणायचं कुठून आणि कसं, याचा पर्याय उपाय त्यांना सांगता येत नाही. त्यामुळंच पंतप्रधानांनी जाहिर केलेले लखो कोटी रुपयांचे पॅकेज रोखीतली रक्कम नसेल, तर त्यांना सगळे पॅकेज देखावा वाटल्यास आश्चर्य मानण्याचे कारण नाही. कारण त्यांनी आजवर हातात वाडगा घेण्यालाच गरीबी दूर करण्याला उपाय मानलेलं आहे. त्यांना कष्टातून संपत्ती निर्माण होते वा त्यातून सबलीकरण होऊ शकतं, हे कसं कळावं? कारण त्यांना अमर्त्य सेन वा रघुराम राजन किंवा अभिजित बनर्जी ठाऊक असतात, वाचलेले असतात. पण समावेशी विकासाचा जाणकार म्हणून ओळखला जाणारा रॉबर्ट चेंबर्स ठाऊकही नसतो वा नसावा. ठाऊक असता, तर त्यांना मोदींनी पॅकेजमधून काय योजलेले आहे, त्याचा अंदाज आला असता.
रॉबर्ट चेंबर्स हा जगातला एक प्रमुख विकास अर्थशास्त्र जाणकार आहे. त्याने गरीब, वंचित आणि दुर्लक्षितांना विकास योजनेत मुख्यस्थानी आणून बसवलं. विकासाचा विचार करताना आणि धोरण आखताना अशा दुर्लक्षित वर्गाला मुख्य केंद्र मानलं नाही तर संतुलित विकास होऊ शकणार नाही, याचं भान असलेला तो अर्थशास्त्रज्ञ होता. म्हणूनच त्यानं गरीबाला भिक घालणं वा उपकार वा दान म्हणून त्याच्या अंगावर काही फेकण्याची कल्पना झुगारली. त्याच गरीब वंचिताला मानवी विकासाच्या मुख्यप्रवाहात सहभागी करून घेण्याची भूमिका हिरीरीने मांडली होती. ती मांडताना विकासाची फळं त्याच गरीबाच्या वाट्याला यावीत, असा विकास करताना त्याला स्वयंभू स्वावलंबी बनवण्याचा विचारही मांडलेला होता. आर्थिक शोषणावर आधारलेल्या अर्थकारणाला बाहेर काढून समावेशक विकास आणि त्यासाठी वंचितालाही त्यातला भागधारक बनवण्याची ही संकल्पना म्हणजेच आत्मनिर्भरता असते. असा सामान्य दुर्लक्षित, कष्टकरी आपल्या श्रमातून नवी संपदा निर्माण करतो आणि आर्थिक व्यवहारातली श्रीमंती एकूण समाजाला संपन्नतेच्या मार्गावर घेऊन जाते. त्याच्या निम्नस्तरीय जीवनातले स्थैर्यच वरच्या वर्गाला श्रीमंतीकडे घेऊन जाणारे यंत्र असतं. त्याची मांडणी चेंबर्सच्या विचारातून पुढं आली आणि त्याचा सगळा भर हा पायाभूत सुविधांच्या उभारणीवर होता. ग्रामीण पायाभूत सुविधा आणि त्यातही प्रत्येक गाव शहरांना जोडणारे सुसज्ज रस्ते हा त्याचाच आग्रह होता. पण इथं अर्थशास्त्री म्हणून मिरवणार्‍या किंवा विश्लेषक म्हणून नाचणार्‍यांनी कधी चेंबर्सच्या गरीबी हटावचा अभ्यास तरी केला होता काय? भारतातल्या गरीबीलाही हटवण्यात त्याच्याच विचारांनी मोठा हातभार लावलेला आहे. पण वाडगा संस्कृतीलाच अर्थकारण समजून बसलेल्यांना चेंबर्स ठाऊकच नव्हता किंवा बोलायचेच नसेल. मग त्याच दिशेनं पुढलं पाऊल टाकणार्‍या मोदींचा आत्मनिर्भर पॅकेज कळण्याची शक्यता किती असेल? तब्बल बारा वर्षापुर्वी या संदर्भात इकॉनॉमिक्स टाईम्सचे संपादक स्वामीनाथन अय्यर यांचा एक खास लेख प्रसिद्ध झाला होता. तेव्हा सत्तेत असलेल्या सोनियाप्रणित युपीए सरकारने सरकारी तिजोरी खुली करून ज्या खिरापत वाटण्याच्या अनेक योजना सुरू केल्या, त्यात अन्न सुरक्षा आणि मनरेगा नावानं लाखो कोटी रुपयांची उधळण सुरू झालेली होती. गरीबी हटवण्याच्या गर्जना चालल्या होत्या. पण त्यातून किती गरीबी दूर होते? तत्पुर्वी वाजपेयी सरकारने ज्या पायाभूत योजनांवर पैसा खर्च करण्याचा सपाटा लावला होता. त्यातून किती गरीबी दूर होऊ शकतात, त्याची तुलनात्मक आकडेवारी अय्यर यांनी त्या लेखात मांडलेली होती. 
स्वातंत्र्योत्तर काळात देशामध्ये अशी गरीबाला मदत देण्यावर अफाट रक्कम खर्च करण्यात आली. पण त्यातून किती गरीब त्या गरीबीच्या रेषेतून वर आले? उलट गरीबीऐवजी पायाभूत सुविधांवर झालेल्या खर्चातून किती गरीब सावरले, त्याची तुलना त्यात आढळते. या संपुर्ण कालावधीमध्ये अशा गरीब कल्याणाच्या योजनेत प्रत्येक दहा लाख रुपये खर्चले, तर त्याचा किती गरीबांना लाभ मिळू शकला आहे? प्रत्येक दहा लाख खर्च रुपये शिक्षणाचे अनुदान म्हणून खर्च केल्यावर १०९ लोक गरीबीतून मुक्त होऊ शकले. तर तितकीच रक्कम जलसंधारणावर खर्च केल्यानं ६७ लोकांना गरीबीतून मुक्ती मिळू शकली. प्रत्येक दहा लाख रुपयांचा खर्च कर्जमाफीत केल्यावर ४२ जण, वीजदरात सवलत दिल्यानं २७ जण आणि खताच्या अनुदानातून फक्त २४ जण गरीबीच्या बाहेर पडू शकले. याच्या उलट परिस्थिती पायाभूत सुविधांनी गरीबांना दिलेल्या लाभाची आहे. प्रत्येक दहा लाख रुपयांचा खर्च रस्ते बांधणीवर झाला, तेव्हा तब्बल ३२५ लोक गरीबीच्या रेषेखालून वर आले. तर संशोधन विकासावर तितकीच रक्कम खर्च झाल्यामुळे ३२३ लोक गरीबीमुक्त व्हायला हातभार लागला. ह्या तुलनेला समजून घेतलं पाहिजे. तर आत्मनिर्भर पॅकेजचे आकलन होऊ शकेल. वर जी उदाहरणं दिलेली आहेत, त्यात दोन प्रकारच्या खर्चाची तुलना आहे. एक खर्च हा थेट सामान्य माणसाला मिळू शकणारा पैसा आहे, किंवा त्याच्या नावावर सरकारी तिजोरीतून काढला जाणारा पैसा आहे. त्याच्या उलट दुसर्‍या गटातला खर्च हा गरीबांच्या नावानं सरकारी तिजोरीतून खर्च झालेला पैसा नाही. ज्याला सरसकट विकासखर्च म्हणता येईल अशा सर्वांगिण विकासाच्या योजनेवर दहा लाख खर्च झाले, तर अधिक लोक गरीबीमुक्त झाले आहेत. त्याच्या उलट जी रक्कम गरीबाच्या नावानं खर्च झालीच नाही, त्यानं अधिक लोक गरीबीतून मुक्त झालेले आहेत. मग दीर्घकाळ गरीबांच्या नावानं चाललेली खिरापत कशासाठी चालली वा उधळली गेली? आजही तशाच पद्धतीनं मोदी सरकारनं गरीबांच्या नावानं तिजोरी खुली करण्याचा आग्रह कशासाठी आहे? राहूल गांधींचे पिताजी राजीव गांधी ४० वर्षापुर्वी म्हणाले होते, शंभर रुपये गरीबांसाठी पाठवले किंवा खर्च केले; तर त्याच्यापर्यंत केवळ १२-१५ रुपये पोहोचतात. त्यातली ८५ टक्के रक्कम मधल्यामध्ये हडपली जाते. आजही तेच चालते. म्हणूनच फक्त खताच्या अनुदानाला लगाम लावण्याची पावलं मोदी सरकारनं उचलली आणि युरीयाची टंचाई संपली. त्याही खर्चातली ६० हजार कोटींची बचत झाली. पायाभूत सुविधांवर किंवा संशोधन विकासावर खर्च केल्यामुळे गरीबी संपते म्हणजे काय? त्यालाच साध्या भाषेत आत्मनिर्भरता म्हणतात. पण वाडगा घेऊन फिरण्यालाच गरीबांचे कल्याण ठरवून बसलेल्यांना आत्मनिर्भर शब्दाचे आकलन म्हणूनच होऊ शकणार नाही. 
कोरोनातून अर्थव्यवस्था बाहेर काढताना मोदी सरकारनं आणलेले पॅकेज, ही नुसती उधळपट्टी वा खिरापत नव्हती विकास, पायाभूत सुविधा यातून गरीबांना सुसह्य जीवनाकडे घेऊन जाण्याची योजना आहेच. पण त्यातून त्यांना रोजगाराची हमी आणि उत्पन्नाची कायम हमी देणारीही आहे. मनानं परावलंबी आणि विचारांसाठीही वाडगा घेऊन पाश्चात्य देशात भिक मागणार्‍यांच्या आवाक्यात येणारी ती गोष्ट नाही
'पार्टी विथ डिफ़रन्स...!' अशी आपली ओळख मागल्या शतकाच्या अखेरीस भाजपने करून दिलेली होती. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीनंतर काँग्रेसचा अस्त होऊ लागल्यावर भाजपने देशातल्या प्रमुख राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने पाऊल टाकताना, अन्य राजकीय पक्ष आणि त्यांच्या शैलीपेक्षा वेगळ्या मार्गाने जाण्याचा पवित्रा घेतला. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, म्हणजेच आपण फारच सभ्य आणि सुसंस्कृत आहोत, असा टेंभा भाजप मिरवत होता. म्हणूनच अन्य पक्षातले गुंड गुन्हेगार वा भ्रष्ट नेत्यांवर आरोप करीत, आपली साधनशुचिता दाखवण्यावर भाजपचा भर असायचा. पण मागल्या लोकसभा मतदानात संसदेतल्या बहुमतापर्यंत मजल मारली आणि भाजपने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असं सिद्ध करण्याची भूमिका घेतली. मात्र त्यांनी आपल्या भीषण असण्याला बिभीषण असं सोज्वळ पौराणिक संबोधन घेतलं. मागल्या दोन वर्षात देशभर सोडाच महाराष्ट्रातही एकामागून एक नमूने शोधून त्यांना भाजपत आणण्याची प्रक्रिया इतकी वेगवान करण्यात आली, की मुळच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाही आपल्या पक्षाची ओळख जाणवेनाशी झाली. आचार, विचार, निष्ठा वा चारित्र्य याच्याशी जणू काडीमोड घेतल्यासारखा पक्षाचा विस्तार करत, कुठलाही कचरा गोळा करण्याचा सपाटा लावला गेला. सत्तेसाठी बहूमत आणि बहूमतासाठी काय पण, कोणी पण; हा एककलमी कार्यक्रम हाती घेतला गेला. त्याविषयी बोलताना विधानसभा प्रचाराच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी बिभीषणाची कहाणी सांगत, आपण रामराज्य आणणार असल्याची ग्वाही दिलेली होती. रामालाही विजय संपादन करण्यासाठी रावणाच्या गोटातला बिभीषण आपल्याकडे घ्यावा लागला होता. हा निकष लावताना भाजपने कुठले कुठले हिरण्यकश्यपू वा दु:शासन पक्षामध्ये भरती करून घेतले, तेही आता मुख्यमंत्र्याला आठवेनासे झाले आहेत. पंढरपूरचे परिचारक त्यापैकीच एक असावेत. कोणी जाणीवपुर्वक देवेंद्र फडणवीस यांना अपेशी ठरवण्याचे डावपेच भाजपमध्ये खेळतो आहे काय? राज्यात भाजपाचा दारूण पराभव व्हावा आणि त्या पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांच्याच माथी फ़ुटावे; अशी कोणाची खेळी चालू आहे काय? नसेल तर आधीपासून ठरलेल्या अशा भव्य सभेसाठी नियोजित प्रसंगी शंभरही माणसे जमली नाहीत, हे वास्तविक चित्र वाटत नाही. परिसरातले उमेदवार आणि त्यांच्यासोबत प्रतिदिन घरोघरी प्रचाराला फिरणारे घोळके एकत्रित केले, तरी हजारपाचशे लोकांची गर्दी त्या ठिकाणी दाखवता आलीच असती. संपुर्ण ओस पडलेले पटांगण आणि रिकाम्या हजारो खुर्च्या, हे दृष्य़ माध्यमातून गाजावे आणि फडणवीस यांचे नाक कापलं जावं, असाच या मागचा ‘नियोजित’ हेतू नसेल, अशी कोणी हमी देऊ शकणार आहे काय? सभा जिथं ठेवतात, तिथं दाटीवाटीने लोकांची गर्दी केलेली दिसावी, असाच एकूण प्रयत्न असतो. त्यासाठी आधीच अंदाज घेऊन मैदान वा जागेचे आकार शोधलेले असतात. चारपाच हजारांची गर्दी जमण्याची अपेक्षा असेल, तर दोनतीन हजार खुर्च्या मांडल्या जातात. परिणामी खुर्च्यांच्या सभोवताली उभ्या लोकांची गर्दी दिसते आणि लोकांनी झुंबड केल्याचा आभासही निर्माण करता येतो. हे भाजपच्या मुरब्बी चाणक्यांना ठाऊकच नाही, असं समजण्याचे कारण नाही. भर दुपारी उन्हातली सभा असेल, तर मुळातच गर्दी कमी होणार, म्हणूनच आकाराने छोटे मैदान घेऊन कमी खुर्च्या मांडूनही सभा साजरी करता आली असती. पण तसं झालेलं नाही वा तसं होऊ दिलेलं नाही. ही बाब मोठी गंभीर आहे. हे चुकलेले नियोजन असण्यापेक्षा पक्के ठरलेले नियोजनही असण्याची शक्यता आहे. सत्तेत आल्यापासून फडणविस यांनी आपल्या अन्य सहकार्‍यांना मागे टाकून, कामाचा झपाटा लावल्याने कोमेजलेल्या पक्षातल्याच असंतुष्टांना आता मुख्यमंत्र्यांना तोंडघशी पाडण्यात रस असल्याचाही हा परिणाम असू शकतो.
हरीश केंची
९४२२३१०६०९

भीषण आणि बिभीषण

"मोदींविरोधात उभे ठाकलेले शरद पवार, उद्धव, ममता, अखिलेश, मायावती, लालूप्रसाद, केजरीवाल आणि इतरांचं राजकीय अस्तित्व संकटात आलंय. राहुल अन् काँग्रेस दिशाहीन बनलीय. साम, दाम, दंड, भेद या चाणक्यनीतीने मोदी, शहांनी गतकाळातल्या दिग्गजांचा, वर्तमानातल्या धुरंधरांचा, भविष्यातल्या उत्साही अन् उथळ प्रतिस्पर्धकांचा सफाया चालवलाय, नितीशकुमारांचे आव्हानही संपुष्टात येईल अशी स्थिती आहे. भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' करण्याच्या निर्धारातून 'विपक्षमुक्त भारत' होईल काय याची भीती वाटतेय. असं झालं तर 'लोकशाही'तल्या 'एकाधिकारयुगा'चा आरंभ होईल. संघानं पाहिलेले 'एकचालकानुवर्तीत साम्राज्या'चे स्वप्न साकार होईल! भाजपने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असं सिद्ध करण्याची भूमिका घेतलीय. मात्र आपल्या या भीषण असण्याला त्यांनी बिभीषण असं सोज्वळ पौराणिक संबोधन घेतलंय अन् वाटचाल आरंभलीय!
.....................................................
*दि*ल्लीत भ्रष्टाचार विरोधातल्या चळवळीतून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाचा पराजय झालाय. त्यांची तिथली १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आलीय. गेली १२ वर्षे देशात आपली सत्ता असली तरी राजधानी दिल्लीत आपली सत्ता नाही हे शल्य एक तप सलत होतं. दिल्लीतलं केजरीवाल यांचं सरकार उलथून टाकण्याचे भाजपचे हरेक प्रयत्न अपयशी ठरले होते. ते सलत असलेलं शल्य भाजपने अखेर दूर केलंय. २७ वर्षापूर्वी तिथं भाजपची सत्ता होती. आज त्यानंतर तिथली सत्ता भाजपने पुन्हा मिळवलीय! जगात सर्वाधिक सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षानं आपली ओळख 'पार्टी विथ डिफ़रन्स...!' अशी मागल्या शतकाच्या अखेरीला देशाला करून दिलेली होती. त्याची आज काय स्थिती आहे? हे आपल्याला दिसतंच आहे. इतर पक्षात जसे गणंग आहेत अगदी तसेच किंबहुना त्याहून अधिक गणंग भाजपत दिसून येतात. प्रधानमंत्री नरसिंहराव यांच्या कारकिर्दीनंतर काँग्रेसचा अस्त होऊ लागल्यावर भाजपने देशातला प्रमुख राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने पाऊल टाकताना, अन्य राजकीय पक्ष आणि त्यांच्या शैलीपेक्षा वेगळ्या मार्गाने जाण्याचा पवित्रा घेतला होता. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, म्हणजेच आपण फारच सभ्य आणि सुसंस्कृत आहोत, असा टेंभा भाजप मिरवत होता. म्हणूनच अन्य पक्षातले गुंड गुन्हेगार वा भ्रष्ट नेत्यांवर आरोप करत, आपली साधनशुचिता दाखवण्यावर भाजपचा भर असायचा. पण मागल्या लोकसभा निवडणुकीत संसदेतल्या बहुमतापर्यंत मजल मारली आणि भाजपने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असं सिद्ध करण्याचीच भूमिका घेतली. मात्र त्यांनी आपल्या या 'भीषण असण्याला बिभीषण' असं सोज्वळ पौराणिक संबोधन घेतलं. मागल्या दोन वर्षात देशभर सोडाच महाराष्ट्रातही एकामागून एक नमूने शोधून त्यांना भाजपत आणण्याची प्रक्रिया इतकी वेगवान केली की, निष्ठावान कार्यकर्त्यालाही आपल्या पक्षाची मूळची ओळख जाणवेनाशी झालीय. आचार, विचार, निष्ठा वा चारित्र्य! म्हणजेच भाजपच्या भाषेत चाल, चलन, अन् चरित्र....! याच्याशी जणू काडीमोड घेतल्यासारखा पक्षाचा विस्तार करत, कुठलाही कचरा गोळा करण्याचा सपाटा लावला गेला. सत्तेसाठी बहूमत आणि बहूमतासाठी काय पण, कोणी पण; हा एककलमी कार्यक्रम हाती घेतला गेला. त्याविषयी बोलताना विधानसभा प्रचाराच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी बिभीषणाची कहाणी सांगत, आपण रामराज्य आणणार असल्याची ग्वाही दिलेली. रामालाही विजय संपादन करण्यासाठी रावणाच्या गोटातला बिभीषण आपल्याकडे घ्यावा लागला होता. हा निकष लावताना भाजपने कुठले कुठले हिरण्यकश्यपू वा दु:शासन पक्षामध्ये भरती करून घेतलेत, तेही आता मुख्यमंत्र्याना आठवेनासे झाले आहेत. कारण दोन मंत्र्यांपैकी एकाला न्यायालयाने शिक्षा सुनावलीय तर दुसरा आरोपी म्हणून वावरतोय. हे मित्रपक्षांचे असले तरी पक्षात घेतलेले काही नेते असेच आहेत. मित्रपक्षांचे हे मंत्री जात्यात दळले जाताहेत अन् काही भाजपचे मंत्री सुपात पडून हसत राहिलेत. तेही जात्यात येतील!
*आम्ही 'शठ्यम प्रती शाठ्यम...!'* 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा केली होती. आता आपण केवळ साधनसुचिता धारण करणारे नाही तर 'शठ्यम प्रती शाठ्यम...!' म्हणत आक्रमकपणे चाल करून जाणारे बनलो आहोत, याचा प्रत्यय त्यांनी आजवरच्या निवडणुकांमधून देशाला करून दिलाय. राजकारणात विरोधी पक्षावर कुरघोडी करत एक एक राज्याची सत्ता मिळवणं हा त्यांचा एकमेव हेतू असतो. ते त्यांनी साध्य करून दाखवलंय. पण प्रतिस्पर्धकांची पुरती ओळखच पुसून टाकण्या इतपत आक्रमकता भाजपच्या कार्यकाळात जनतेला दिसून आलीय. साम, दाम, दंड, भेद यासारख्या चाणक्यनीतीतल्या आयुधांचा वापर करण्यात तरबेज असलेल्या शिर्षस्थ भाजप नेतृत्वाने काँग्रेसचं नाही तर, विरोधीपक्षानांही संपविण्याचा प्रयत्न नव्हे सपाटा चालविलाय. लोकसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवलं नसलं तरी सत्ता हाती घेण्याचे राजकीय चातुर्य दाखवत सत्ता हस्तगत केलीय. ५४१ सदस्यांच्या संसदेत २४० जागा भाजपने जिंकल्या अन् मित्रपक्षाच्या मदतीनं बहुमत मिळवलं. सत्ता हस्तगत केलीय. तब्बल तीस वर्षे आघाडी सरकारांनी ग्रासलेल्या संसदेला एकदा पुन्हा आघाडी सरकार येणार असं वाटत असतानाच धूर्तपणे राजकीय खेळी करत भाजपने पुन्हा सत्ता मिळविलीय. आज भाजप अशा स्थितीत जाऊन पोहोचलाय की, निवडणुकीतल्या टीकेला, होणाऱ्या आरोपांना सणसणीत उत्तर देईल. 
*दांभिकपणा पदोपदी जाणवतोय!*
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचा एक करिश्मा होता, जनमानसावर त्यांचा पगडा होता, तरीही त्यांना कधीच ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळविता आलेली नाहीत. फक्त एकदाच इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसनं ५१४ पैकी ४१४ जागा जिंकल्या होत्या, तेव्हा काँग्रेसला ४९.१ टक्के मते होती. आजवरचा तो एक विक्रमच आहे. त्याला आजवर कुणी धक्का लावलेला नाही. भाजपने मात्र 'सत्तेसाठी सारं काही...!' म्हणत; त्याज्य-स्वीकार्य, नैतिक-अनैतिक या साधनसुचिता दर्शविणाऱ्या बाबी दूर सारून नीती-अनितीचे सारे मार्ग अवलंबिलेत. हे सारं पाहता २०२९ च्या निवडणुकीत भाजपने विक्रमी मतं मिळविली तर आश्चर्य वाटायला नको. कारण भाजप सरकारनं कोणताही निर्णय घेतला की, तो जनसामान्यासाठी योग्यच आहे असं समजलं जाऊ लागलंय. आता खोटं देखील खरं वाटायला लागलंय. भाजपचा दांभिकपणा पदोपदी जाणवतोय. महागाई भडकली तरी ती आता राष्ट्रहिताची वाटू लागलीय. सरकारच्या कोणत्याही धोरणाचं, निर्णयाचं कौतुक करताना केवळ मंत्री, नेतेच नव्हे तर कार्यकर्तेही थकत नाहीत. ही राजकीय स्थिती पक्षासाठी उत्साहवर्धक असली तरी लोकशाहीच्या दृष्टीनं हितावह खचितच नाही. 
*जनाधारकी ऐसी की तैसी'!* 
विरोधीपक्षांत असताना भाजप 'सीबीआयचा दुरुपयोग' सत्ताधारी काँग्रेस करतेय...!' अशी कडाडून टीका करत असे. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमेही टीकेची राळ उठवीत. सत्तेचा दुरुपयोग होतोय असा कांगावा केला गेला तर जनतेमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते. इंदिरा गांधींच्या काळात सीबीआयचा दुरुपयोग विरोधकांना तुरुंगात डांबण्यासाठी झाला होता, परंतु त्याचा परिणामाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण आज तशी भीती भाजपला अजिबात वाटतच नाही. कारण विरोधकांवर जनतेचा विश्वासच राहिलेला नाहीये तसाच तो प्रसिद्धी माध्यमांवरही राहिलेला नाही. शिवाय सरकार अशा बाबतीत कशाचीही दखल घ्यायलाही तयार नाही. सगळं राजकारण एका वेगळ्या दिशेनं वाटचाल करतेय. सीबीआय, आयकर, इडी वा इतर कोणत्याही तपास यंत्रणेने निष्ठेनं, प्रामाणिकपणे काम केलं तर, स्वच्छ चारित्र्याचा, प्रामाणिक राजकीय नेता शोधायला त्यांना फार कष्ट घ्यावे लागतील. तपास यंत्रणेचा वापर सत्ताधारी करतात हे आता लपून राहिलेलं नाही. काँग्रेस आघाडीचं सरकार असताना मोदी विरोधात असा वापर झाला होता. आता पलटवार सुरू आहे. तेच हत्यार अधिक धारदारपणे तीव्रपणे परिणामकारकरित्या वापरलं जातंय. पूर्वी या कारवाया निंदनीय ठरत, पण आज त्या अभिनंदनीय ठरताहेत. या साऱ्या प्रकारामुळे राजकारणाचीच नाही तर लोकांच्या बदलत्या मानसिकतेची चिंता वाटतेय. याबाबत विरोधकही तेवढेच जबाबदार आहेत. देशातला प्रत्येक राजकीय नेता हा कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकलेला आहे. लालूप्रसाद यादवांसारखा खुलेआम भ्रष्टाचार करणारा, दोषी ठरलेला नेता, नव्या पिढीच्या मानसिकतेचा विचार न करता अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करणारे अखिलेश यादव, अन् दिशाहीन, प्रभावहीन, अविश्वसनीय ठरलेले राहुल गांधींसारखे राजकीय नेते, कधीकाळी भाजपच्या सोबत असलेले अकाली दल, शिवसेना, बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती, आसाम गण परिषद यासारखे पक्ष आज हवालदिल, गलितगात्र झाले असताना ते भाजप समोर असतील तर निवडणुकीत भाजपला फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. कारण प्रभावी विरोधक समजले जाणारे नेते भाजपच्या वळचणीला आले आहेत. त्यातही विरोधकांनी आपल्या वागण्यानेच भाजपचा मार्ग सोपा केलाय. कधीकाळी मोदींना पर्याय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं त्या नितीशकुमारांना भाजपने बिहारमध्ये आपल्या दावणीला बांधून टाकलंय. त्यांच्या साथीनं तिथली सत्ता हस्तगत केलीय. खरं तर तिथं भाजपचे पक्ष संघटन विस्कळीत झालं होतं, सत्तेशिवाय त्याचं संघटन होणं कठीण आहे याची जाणीव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना झाली, त्या तुलनेत राजदची पक्ष संघटना मजबूत होती. अमित शहांनी मागील दाराने का होईना बिहारची सत्ता पक्षाला मिळवून दिली. 'जनाधारकी ऐसी की तैसी'! शेवटी जो जिता वही सिकंदर...! हे त्यांनी सिद्ध केलंय!
*इंडिया आघाडीत चलबिचल*
बंगालमधली राजकीय स्थिती संवेदनशील बनलीय. ममता बॅनर्जी तिथं एवढया अडकल्यात की, त्यांना कलकत्ता सोडणं शक्य नाही. गुरखालँड आंदोलनाने उग्र रूप धारण केलंय. हे थांबलं तर नारदा, शारदा, रोझवेली, आणि इतर चिटफंडच्या केसेस सुरू होतील, शिवाय मिदनापोर, २४ परगणा इथं जातीय दंगली उसळल्यात. अशा वातावरणात राष्ट्रीय राजकारणात येऊन मोदींना आव्हान देण्याची ताकदच त्यांच्यात उरलेली नाहीये, शिवाय वेळही नाही. कर्नाटकात सत्तेने पुनरागमन करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. कर्नाटकात संख्येने सर्वाधिक आणि राजकारणावर प्रभाव असलेल्या लिंगायत समाजाला आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आलंय. आंध्रप्रदेशात आणि तेलंगणात भाजप कमकुवत आहे, त्यांचं तिथं अस्तित्वच दिसत नाही. पण चंद्राबाबूंच्या तेलुगु देशम आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनाशी भाजपने युती केलीय अन् आंध्रप्रदेशात सत्तेत सहभागी झालीय. तेलंगण राष्ट्र समितीची अवस्था विचित्र बनलीय. ते ना काँग्रेसबरोबर आहेत ना भाजपबरोबर. तामिळनाडूत भाजपने कंबर कसलीय. शशिकला, पनीरसेल्वम, रजनीकांत यासारख्या मोहरांवर त्यांनी गळ टाकला मात्र त्यांना तिथं फारसं यश आलं नाही. आता नव्या नेत्यांची जुळवाजुळव सुरू आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस एवढी निष्प्रभ होईल असं कधी वाटलंच नव्हतं, कारण काँग्रेसची पाळंमुळं खोलवर रुजलेली होती, काही वर्षापूर्वी काँग्रेसकडे देशात एकहाती सत्ता होती, आज मात्र ती गलितगात्र झालीय. लालू, अखिलेश, मायावती, ममता, केजरीवाल, पवार, आणि तत्सम नेत्यांची सद्दी आता संपत आलीय. वाचाळ केजरीवाल यांनी मौन धारण केलंय. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोदींविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीमध्ये चलबिचल सुरू आहे. काँग्रेसचे साथीदार काँग्रेसचेच नेतृत्व नाकारताहेत. आधी नुसत्या कुरबुरी होत्या. दिल्लीच्या निवडणुकांनंतर तर त्या उघडपणे व्यक्त होऊ लागल्यात. २०२९ पर्यंत अशीच स्थिती देशात राहिली तर देश केवळ भाजपच्या इच्छेनुसार 'काँग्रेसमुक्त भारत' नव्हे तर 'विपक्षमुक्त भारत' सुद्धा होऊ शकेल आणि देशात ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळविणारा पक्ष म्हणून भाजप उदयाला आला तर आश्चर्य वाटणार नाही. शेवटी हे यश, ही सफलता भाजपची असेल. यात लोकशाहीने काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार राजकीय निरीक्षकांना, विचारवंतांना करावा लागेल. 
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday, 15 February 2025

काँग्रेसपुढील आव्हान...!

"कृतीशिवाय विश्वास ही आत्मवंचना असते! तारतम्य गमावलेल्या काँग्रेसकडून काही अपेक्षा करणंच गैर ठरतं. आज संपूर्ण देशातून काँग्रेसचं जवळजवळ उच्चाटन झालेलंय. दोन चार राज्यं वगळता कुठेही सत्ता नाही. गतवैभवात मश्गूल असल्यामुळं इतर सहकारी पक्षाचं नेतृत्व त्यांना मान्य नाही. दुसरीकडे बिगरभाजप पक्ष काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास करायला तयार नाहीत. बहुतांश राज्यांत भाजपप्रणीत राज्य सरकारं असल्यामुळं तिथली पक्षसंघटना डबघाईला आलेलीय. आहेत त्या नेत्या-कार्यकर्त्यांत सुसंवाद नाही, असा स्थितीत पक्षनेतृत्वानं आत्मचिंतन करण्याची गरज आहे! ही 'ग्रँड ओल्ड पार्टी' दिशाहीन लोकांची टोळी बनतेय. जुना पक्ष हा अधिक 'जुनाट' होऊ लागलाय...!"
----------------------------------------------------
*रा*ज्यातल्या काँग्रेस नेतृत्वात बदल झालाय. फारशा चर्चेत नसलेल्या पण तळागाळातून काम केलेल्या सर्वोदयी कार्यकर्त्याकडे हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवलीय. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानं पक्ष बेडकासारखा फुगला होता. डराव डराव करत स्वबळाचा नारा देत होता. पण विधानसभा निवडणुकीत सारं काही फुस्स झालं. अशा अवमानकारक निकालामुळे नेतृत्व बदल होणं अपरिहार्य होतं. मागे एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेसच्या स्थितीगतीचं अचूक एका वाक्यात विश्लेषण केलं होतं. ‘काँग्रेस पक्षाची अवस्था जमीनदारी नष्ट झालेल्या आणि आपल्या हवेलीची डागडुजी करण्याइतपतही ऐपत नसलेल्या माजी जमीनदारासारखी झालीय....!' पवारांच्या वक्तव्यात टीका कमी अन् वस्तुस्थिती अधिक होती. काँग्रेसची संघटनात्मक वाताहत पाहता पवारच काय, कोणताही काँग्रेसेतर नेताच नव्हे तर, अगदी सामान्य नागरिकदेखील यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया देणार नाही. शरद पवार हे आपलं वक्तव्यं आणि कृती ही अचूक वेळ साधून करतात. त्यासाठी ते प्रसिध्दही आहेत. नुकतंच त्यांनी केलेलं एकनाथ शिंदे यांचं कौतुक हा त्यातलाच प्रकार! त्यापूर्वीही त्यांनी संघाचं कौतुक करतानाच, कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांची खिल्ली उडविली होती. कॉंग्रेसला खालसा संस्थानाचं स्वरुप प्राप्त झाल्याचं पवारांनी म्हटलं होतं. देशाचं काहीही झालं तरी चालेल पण माझं गाव शाबूत राहीलं पाहिजे; हीच पवारांची भूमिका असते. त्यांना जो काटा रुतून बसलाय, तो प्रधानमंत्रीपद हुकल्याचा आहे आणि तो कॉंग्रेसच्या तो सध्याच्या नेतृत्वामुळं घुसला होता. ही खंत ते वेळोवेळी व्यक्त करत असतात. आताही आपलं महत्त्व निदान महाराष्ट्रात तरी जाणवलं पाहिजे. या हेतूनंच त्यांनी शिवसेनेला अन् कॉंग्रेसला चिमटा काढलाय. कॉंग्रेसनं त्यांच्या वक्रोत्वीकडं दुर्लक्ष करणं हा सर्वात श्रेयस्कर मार्ग आहे. मात्र स्वभाव माहीत असूनही शिवसेनेनं थयथयाट केलाय. पवार राष्ट्रीय 'नेतृत्व' बनण्याचा प्रयत्न करत आलेत. त्यांचा बारीकसाही उपद्रव होऊ नये म्हणून मोदींपासून फडणवीसांपर्यंत पवारांना फुगवत असतात. त्यात आता शिंदेंची भर पडलीय. पवारांनी पक्ष कोणत्या मानसिकतेतून जात आहे ते ध्यानात घेता पक्ष बरकतीत येईल याची शक्यता फार कमी आहे. महाराष्ट्रातही ते स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन करु शकत नाहीत. महाराष्ट्रात त्यांचं निश्चित एक स्थान अन् उपद्रव मूल्यही आहे. आज त्यांच्या एवढा अनुभवी राजकारणी राज्यात दुसरा कोणीही नाही. पवारांचा वापर राजकारणात लोणच्यासारखा केला जातो. त्यांच्यामुळं राजकीय खेळींची चव वाढते. पण त्यांना मुख्य आहारात समाविष्ट केलं जात नाही. हे देवेगौडा व्ही.पी.सिंग, मनमोहनसिंग यांच्यावेळी दिसून आलं होतं. एक मतांनी अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं, त्यावेळी पवारांचं उपद्रवी मूल्य जाणवलं होतं पण ते सत्ता मिळवू शकले नाहीत. महाराष्ट्रातूनच वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ, शिवराज चाकूरकर पाटील व इतरांनी पवारांना दिल्लीत वरचढ होऊ दिलं नव्हतं. पवारांची प्रतिमा 'दगाबाज' म्हणून प्रसिध्द करण्यात या मंडळींचा मोठा वाटा होता. पवारांचे अंदाज गेल्या वीस वर्षांत चुकत गेलेत. अर्थात राजकारणात शंभर टक्के अचूक अंदाज कोणाचेच नसतात. त्यांचे सांदीपनी यशवंतराव चव्हाण हे कायम सावध अन् बेरजेचं राजकारण खेळत राहिले. त्यामुळं त्यांना जे काही मिळालं ते कर्तृत्वामुळं मिळालं तर, काही त्यांच्या सावध पवित्र्यामुळं मिळालं. त्यांचं कर्तृत्व मोठं होतं. पण राजकीय डावपेचात गुणवत्ता सांदीकोपऱ्यात बसते. अनेकांचं तसं होतं. मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडं गुणवत्ता आणि चारित्र्य असूनही समाजवाद्यांच्या जुन्या भांडणात देवेगौडा आणि गुजराल बाजी मारुन गेले. पवारांचं तेच झालंय. म्हणून ते अधूनमधून असे चावे घेतात. 
महाराष्ट्रातल्या खेकड्यांच्या वृत्तीनं पवारांचे पाय खेचले होते. हे खरं असलं तरी पवारांनीही काकडे, मोहिते, विखे, थोपटे व इतर घराण्यांना झोपवलं तसं  आता ठाकरे घराणे संपवण्याच्या मागे लागलेत. त्यासाठी त्यांचा कल्याण शिष्य तत्पर आहे. हे विसरुन कसं चालेल? पवारांकडून जनतेच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. पवारांनी पक्षीय न राहता महाराष्ट्रीय होऊन भारतीय क्षितिजावर चमकावं. असो. मागील दोन दशकांपासून भाजपची जी घोडदौड चालू आहे, त्यात काँग्रेसच्या पराभूत मनोवृत्तीच अधिक आहे. तेव्हा केवळ १२५ वर्षांचा वारसा असलेला, ५० वर्षं सत्तेत असलेला राष्ट्रीय पक्ष म्हणून फक्त गतवैभवावर आरूढ होऊन काँग्रेस पक्ष आणि त्याचे नेते वावरत असतील, तर पवारांनी केलेलं ते विधान ही टीका नसून काँग्रेसला हलवून जागं करण्याचा प्रयत्न आहे. आत्मचिंतनाची सवय नसलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाकडून सद्यस्थितीत असं काही घडेल अशी अपेक्षा नाही. २०१४ मध्ये ‘मोदी-लाट’ आली आणि काँग्रेसला प्रचंड अपयश आलं, असा युक्तीवाद करून पक्षसंघटनेच्या नाकर्तेपणावर पांघरून टाकलं जातं. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, ‘मोदी-लाटे’त काँग्रेस पक्ष वाहून गेला हे अर्धसत्य आहे. कारण २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत असूनही संघटनात्मक पातळीवर कधीच सक्रिय आणि प्रबळ नव्हता. केवळ सत्तेचं आवरण म्हणून पक्षाची हाराकिरी झाकून गेली होती, ही वस्तुस्थिती आहे. तत्पूर्वी जरा मागे जाऊन पाहिलं तरी काँग्रेस रसातळाला का गेली, हे लक्षात येतं. १९९१ ते १९९६ ही पाच वर्षं नरसिंहराव प्रधानमंत्री होते. या काळातच काँग्रेसची संघटनात्मक घसरण सुरू झाली. अनेक मंत्र्यांची, नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड झाली. नरसिंहरावांची पक्षसंघटनेवर पकड निर्माण झाली नाही. पद टिकवण्यासाठी त्यांनी पक्षसंघटना पणाला लावली. याच कालखंडात विविध घटकराज्यांत बिगरकाँग्रेसी सरकारं आली. तरुण नेत्या-कार्यकर्त्यांना फारशी संधी न मिळाल्यामुळं काँग्रेस केवळ वृद्धांचा पक्ष झालाय, अशी टीका करत अनेक तरुण कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. सोनिया गांधींचं नेतृत्व आणि राहुल गांधींचं मार्गदर्शन एवढ्यापुरतीच पक्षसंघटनेची कार्यपद्धती सीमित झाली. त्यात आता प्रियंकाची भर पडलीय. सर्वच आघाड्यांवर पक्षीय स्वातंत्र्याचा लोप होत गेला. आघाडीतल्या घटकपक्षांनाही काँग्रेस धडपणे सांभाळू शकली नाही. सर्वच डाव्या पक्षांनी बिगरभाजपवाद हा एकमेव अजेंडा घेऊन निवडणुका लढवल्या. भाजपसारख्या चतुर पक्षाला तुकड्या-तुकड्यानं विरोध सुरू झाला. या सर्व गदारोळात १९९९ साली देशात अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’चे २१ पक्षांचं सरकार अस्तित्वात आलं. अन् काँग्रेसनं घटकराज्यांतला आपला जनाधार गमावला. दुसऱ्या बाजूनं पाच वर्षं सत्तेत राहिलेल्या एनडीएतल्या भाजपनं आपली संघटनात्मक बांधणी सुरू केली. पुढे २००४ ते २००९ या पाच वर्षांत काँग्रेस सत्तेत आली, तरी भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यात काँग्रेसला यश आलं नाही. २०१४ पर्यंत केंद्रात सत्तेत असूनही पक्षबांधणीसाठी प्रयत्न झाले नाहीत. दक्षिणेतली आणि उत्तरेकडची राज्यं हातातून निसटत असतानाही पक्षानं आत्मचिंतन  केलं नाही. १९८४ मध्ये दोन खासदार निवडून आणण्याची क्षमता असलेला भाजप १९९९ मध्ये १७५ वर पोहोचला, तर २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये त्यानं सत्ता प्राप्त केली. हा भाजपच्या लोकप्रियते बरोबरच काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा आणि गलथान कारभाराचा कळस होता, असंच म्हणावं लागेल!
जे लोक केवळ इतिहासात रमतात, ते वर्तमानाशी जुळवून घेत नाहीत, भविष्याचा वेधही घेऊ शकत नाहीत, त्यांची वाताहत ठरलेली. हे काँग्रेसला तंतोतंत लागू पडतं. सोनिया गांधीचं आजारपण, वार्धक्य, राहुल गांधींची एकांगी भूमिकाच काँग्रेसला घरघर लागायला कारणीभूत ठरलीय. २०२४ मध्ये  राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सक्षम पर्याय ठरू शकेल असं वाटत होतं. मात्र संघटनेवर कमांड नसल्यामुळं त्यांना पक्षातली युवकांची फळी सांभाळताच आली नाही. सतत ज्येष्ठांनाच पुढं केल्यामुळं बरीच तरुण मंडळी बाहेर पडली. राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश अशा मोठ्या राज्यांतून पक्षाला सत्ता गमवावी लागली. सत्ता स्थापन करण्यात आली नाही. काही राज्यांत तर ‘मुघलोंने सल्तनत बक्ष दी’ या म्हणीप्रमाणे हाती आलेली सत्तादेखील पक्षाला सांभाळता आली नाही. वस्तुत: प्रगल्भ नेतृत्व, त्याची विचारसरणी, कार्यकर्त्यांचा संच या त्रिसूत्रीवरच पक्षसंघटनेचं यशापयश अवलंबून असतं. इंदिरा गांधींनंतर नेतृत्वाच्या बाबतीत पक्ष काही भरीव योगदान देऊ शकलेला नाही. नेतृत्व दिशाहीन आणि लक्ष्यहीन झाल्यामुळं कार्यकर्ते सैरभर झाले. त्याचा दृश्यपरिणाम असा झाला की, स्थानिक पातळीपासून केंद्रीय पातळीपर्यंत पक्षबांधणी धडपणे झाली नाही. सत्ता गेली की, काँग्रेसची पक्षसंघटना का कोलमडते, याबाबत पक्षानं कधीच चिंतन केलं नाही. आजही अनेक राज्यात प्रादेशिक पक्षांनी भाजपला प्रबळ पर्याय दिलाय. मात्र काँग्रेसला दोन-तीन राज्यं वगळता स्वबळावर सत्ता प्राप्त करता आलेली नाही. यात मोदी आणि भाजपचा वाढता प्रभाव हे कारण असलं तरी काँग्रेसचा नाकर्तेपणा अधिक कारणीभूत ठरलेलाय. एकेकाळी ४०४ लोकसभा सदस्य असलेल्या पक्षाचे आज केवळ ९९ खासदार आहेत. 
जर इतर पक्षाशी युती केली आणि त्या पक्षाला आपल्यापेक्षा जादा मतं मिळाली तर त्यांचा प्रभाव वाढू शकतो. मग आपल्या मतांवर अतिक्रमण कसं करू देऊ, अथवा आमच्या जागा त्यांना कशा देऊ. भावनिकदृष्ट्या हे जरी अगदी वाजवी वाटत असलं तरी, भूतकाळात रमणे आणि भावनिक होणं यानं वर्तमान बदलत नाही. त्यामुळं आपली जहागीर असणाऱ्या राज्यांमध्ये आपले मित्र पक्ष विस्तार करताहेत, अशी धारणा न ठेवता या पक्षांनी तिथं प्रवेश केल्यामुळे आपल्याला पुन्हा बळ मिळालंय याबद्दल काँग्रेने मित्रपक्षाप्रती कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजे. याचा अनुभव काँग्रेसने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात घेतलाय, पश्चिम बंगालमध्येदेखील जरा जुळवून घेतलं असतं तर तिथंही काँग्रेसची कामगिरी चांगली झाली असती. १९८९ पासून काँग्रेसला भेडसावणारी सर्वात प्रमुख समस्या म्हणजे पक्षाचं अस्तित्व टिकवणं महत्वाचं की पुनरुज्जीवन महत्वाचं. आपण जर टिकून राहण्यासाठी एखाद्या पक्षाशी युती केली तर पक्षात नवचैतन्य कसं संचारेल अशी भीती काँग्रेसला कायम वाटत राहते, यावर ठोस निर्णय घेणं आवश्यक आहे. मात्र कोंबडी आधी की अंडे? अशी अनुत्तरित राहणारी ही समस्या मुळीच नाही. पुनरुज्जीवनापेक्षा अस्तित्व टिकवून ठेवण्याला प्राधान्य देणं महत्त्वाचे असतं.
इकडं राज्यातलं नेतृत्व हे आत्मस्तुतीत व्यग्र होतं. त्यांच्यात विश्वास कमी आणि आर्विभाव अधिक होता. मुळात प्रश्न काँग्रेस आपल्या गतवैभवाच्या मानसिकतेतून बाहेर कधी येईल हा आहे! नाना पटोले अखिल भारतीय पातळीवर जाऊन विधानं करत असले तरी महाराष्ट्रात तरी त्यांचा पक्ष स्वबळावर सत्तेत येईल असं वातावरण आहे का? २५ वर्षांपूर्वी २८८ पैकी २०० आमदार असलेली काँग्रेस आज केवळ १६ आमदारांवर आलेला आहे. भाजप सत्तेत आलीय, पण विरोधी पक्ष म्हणून देखील काँग्रेसचं अस्तित्व राहिलेलं नाही. केवळ राजकीय विधानं करून किंवा सत्ताधाऱ्यांवर राग व्यक्त करून पक्षसंघटना प्रबळ होत नसते. पक्षसंघटनेत जोपर्यंत एकजिनसीपणा निर्माण होत नाही, तोपर्यंत बांधणी होत नाही, हे लक्षांत घेतलं पाहिजे. ज्या राष्ट्रीय पक्षाला स्थानिक पातळीवरच्या  निवडणूकीत देखील इतर पक्षांसोबत युती-आघाडी करावी लागते, तो पक्ष आणि त्याचे तथाकथित नेते स्वबळावर लढण्याच्या घोषणा का करतात, हे समजण्याच्या पलीकडचं आहे. शेवटी आणखी एका गोष्टीकडं लक्ष वेधणं गरजेचं आहे. ते म्हणजे सत्तात्यागातून पक्षबांधणीची राजकीय संस्कृती काँग्रेसमध्ये जवळजवळ नष्ट झालीय. प्रत्येक नेत्या-कार्यकर्त्याला पद मिळालं तरच पक्ष आपला वाटतो. महाराष्ट्राच्या राजकारणात ही प्रक्रिया वेगानं सुरू झाली. अनेक नेते काँग्रेसबाहेर पडले. त्यामुळं काँग्रेसची खूप हानी झालेलीय. खरं तर पक्षासाठी एकेक नेता-कार्यकर्ता अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु पक्षांतर्गत स्वातंत्र्य हीच पक्षाची मक्तेदारी झाल्यामुळं काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आलेलीय. घराणेशाही आणि एकाधिकारशाही यांचा अनिष्ट संगम पक्षात झाल्यामुळं ‘होयबा’ संस्कृती निर्माण झाली. याची जाणीव जोपर्यंत पक्षश्रेष्ठींना होणार नाही, तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नाही, असं म्हटलं तर ते काही अनुचित ठरणार नाही. आज हर्षवर्धन सकपाळ यांची नियुक्ती त्यासाठी आव्हानात्मक ठरतेय.
हरीश केंची
९४२२३१०६०९

सावरकरांवर अरुण शौरींचे नवे पुस्तक

विनायक दामोदर सावरकरांच्या फ्रान्सच्या मार्सेच्या समुद्रात मारलेल्या उडीचं महाराष्ट्रात आणि देशभरातही कायम अप्रूप राहिलंय. त्याचं वर्णन सावरकर समर्थकांच्या लिखाणात आणि बोलण्यात बऱ्याचदा 'त्रिखंडात गाजलेली उडी' असं होत आलंय. मंगळवारी, ११ फेब्रुवारीला 'आर्टिफिशिअल इंजेलिजन्स समिट' साठी फ्रान्समध्ये पोहोचलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीही मार्सेला उतरल्यावर तिथून लगेच 'एक्स' या माध्यमावर लिहितांना सावरकरांच्या या उडीचा उल्लेख केला. पण आता प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार लेखक अरुण शौरी यांनी या प्रकरणाबद्दल नवे दावे केले आहेत. त्यांच्या मते सावरकरांची समुद्रातल्या उडीची वर्णनं 'अतिरंजित' आहे. शौरींनी केवळ या एकाच घटनेबद्दल काही नवे दावे केलेत असं नाही. सावरकरांशी संबंधित इतर अनेक घटनांबद्दलही त्यांनी लिहिलंय आणि त्याची सध्या बरीच चर्चा होते आहे. पत्रकार आणि अनेक चर्चित पुस्तकांचे लेखक असण्यासोबतच अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रिय मंत्री राहिलेले अरुण शौरी भाजपाचे राज्यसभेतले खासदारही होते.अलिकडेच, म्हणजे गांधी पुण्यतिथीला ३० जानेवारीला अरुण शौरींचं सावरकरांवरचं नवं पुस्तक प्रसिद्ध झालं. इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाचं नाव आहे 'द न्यू आयकन: सावरकर अँड द फॅक्ट्स (The New icon: Savarkar and the facts). या पुस्तकात शौरींनी सावरकरांशी जोडल्या गेलेल्या अनेक घटनांचा, दाव्यांचा, मिथकांचा आणि त्यातून तयार झालेल्या त्यांच्या विविध प्रतिमांचा उहापोह केला आहे. त्यात सावरकरांबद्दल तयार झालेल्या अनेक समजुतींचा आणि एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल विमर्श शौरी करतात. विनायक दामोदर सावरकर हे नाव अनेक विषयांवरुन सतत चर्चेत असतं. सावरकरांच्या हिंदुत्वापासून ते त्यांच्या अंदमानच्या तुरुंगातून सुटकेपर्यंत, महात्मा गांधी हत्या प्रकरणातल्या कथित आरोपांपासून ते त्यांच्या राजकीय विचारांपर्यंत, त्यांच्याभोवतालच्या वादांना विराम नाही. त्यांचे समर्थक आणि टीकाकार, दोघेही त्यात भाग घेत असतात. एका प्रकारे समकालीन मुख्य प्रवाह बनलेल्या हिंदुत्ववादी राजकारणाच्या केंद्रस्थानीही सावरकर आहेत. सध्या त्यात शौरींच्या या नव्या पुस्तकानं एका नव्या चर्चेची भर पडलीय.
फ्रान्सच्या समुद्रातली उडी
सावरकरांच्या या उडीचा संदर्भ ८ जुलै १०१९ रोजी फ्रान्सच्या मार्से या बंदरावर घडलेल्या घटनेचा आहे. डिसेंबर १९०९ मध्ये अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे तत्कालिन ब्रिटिश जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घालून मारले. ज्या पिस्तुलातून या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या ते इंग्लंडमधून भारतात पाठवण्यात आलं होतं आणि या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरुन तेव्हा लंडनमध्ये असलेल्या सावरकरांना पकडण्यात आलं. सावरकरांना अटक करुन भारतात आणलं जात होतं. 'एस एस मोरीआ' हे त्यांना घेऊन येणारं जहाज जेव्हा फ्रान्सच्या मार्से या बंदरात उभं होतं, तेव्हा त्यावरुन सावरकरांनी उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न जरी अयशस्वी ठरला, तरीही त्यांची ही उडी गाजली आणि आजही त्याविषयी चर्चा होत असते. त्याविषयीच अरुण शौरी त्यांच्या या नव्या पुस्तकात लिहितात. शौरी जरी सावरकरांनी उडी मारली आणि सुटण्याचा तो एक धाडसी प्रयत्न होता असं म्हणत असले तरीही, त्याबद्दल सांगण्यात येणारी कहाणी ते अतिशयोक्तीपूर्ण किंवा अतिरंजित मानतात. ते लिहितात, "छोट्याशा खिडकीतून उडी मारणं हा निश्चित धाडसी प्रयत्न होता, पण 'खवळलेल्या समुद्रातून, लाटांशी झुंजत पोहून गेले' हे का म्हणावं?" शौरी लिहितात. त्यांच्या मते तथ्य न माहिती करुन घेता काही कविकल्पना या घटनेला जोडल्या गेल्या. त्यासाठी ते उदाहरण म्हणून ज्यांच्या नेतृत्वात ते भाजपात आणि केंद्रीय मंत्रिमंडळात होते, अटलबिहारी वाजपेयींचं सावरकरांबद्दलच्या प्रसिद्ध भाषणाचं उदाहरण देतात. या उडीच्या प्रकरणासाठी संदर्भ म्हणून शौरी स्वत: सावरकरांनी त्यांच्या लिखाणात केलेले उल्लेख, त्यांचं चित्रगुप्त या नावानं लिहिण्यात आलेले चरित्र ज्याविषयी कायम असा प्रवाद आहे की ते स्वत: सावकरकरांनीच टोपणनावानं लिहिलं आहे, असा उल्लेख शौरी यांनी आणि १९८६ सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत डॉ. रविंद्र वामन रामदास यांनी केला आहे आणि तत्कालिन उपलब्ध असलेले काही दफ्तरी कागदपत्रं वापरली आहेत. सावरकरांच्या समुद्रातल्या उडीबद्दल शौरींचा पहिला आक्षेप आहे की, जेवढा पल्ला त्यांनी पोहून गाठला असं सांगितलं तो तेवढा नव्हता. ते म्हणतात, उपलब्ध कागदपत्रांवरुन असं दिसतं, की सावरकरांना नेणारं जहाज कोळसा भरण्यासाठी मार्से बंदरात थांबलं होतं आणि ज्या धक्क्यापाशी ते थांबलं होतं तिथून किनारा केवळ १० ते १२ फूट होता. "हे अगोदर थोडं जरी तपासलं असतं, तरी समजलं असतं की जहाज समुद्रात लांब थांबलं नव्हतं," शौरी लिहितात.
अरुण शौरी इथं त्यांच्या बाजूचा पुरावा म्हणून सावरकरांच्याच 'माझी जन्मठेप' या तुरुंगकाळातल्या आत्मचरित्रात्मक लिखाणाचा दाखला देतात. अंदमानला नेण्याअगोदर जेव्हा सावरकरांना अलिपूरच्या तुरुंगात नेण्यात आलं, तेव्हाचा प्रसंग जो त्यांनी लिहून ठेवला आहे, तो शौरी उधृत करतात. सावरकर लिहितात, "दुसऱ्या शिपायानं मला विचारलं, किती दिवस आणि रात्री तुम्ही समुद्रात पोहत होतात? सहाजिकच तो मार्सेबद्दल विचारत होता. मी उत्तरलो, "कसले दिवस आणि रात्री? मी केवळ १० मिनीटं पोहलो आणि किनाऱ्याला पोहोचलो." हा 'माझी जन्मठेप' मधला उतारा देऊन शौरी लिहितात, "हे लिहितांना सावरकर स्वत: सत्याच्या अधिक जवळ होते. पण माझ्या मते त्यांना १० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला असावा." शौरी असाही प्रश्न विचारतात, जर सावरकर समुद्रातला मोठा पल्ला पार करुन पोहत आले असतील, तर त्यांच्या पाळतीवर असलेले दोन भारतीय पोलीस किनाऱ्यावर कसे आले? कोणीही म्हणत नाही की तेही पोहून आले. शौरी म्हणतात की, जहाजावर किनाऱ्यावर उतरणारा एक जोडपूल त्यावेळेस सर्वत्र असायचा, त्यावरुनच ते पोलीस आले. शौरी या सगळ्या प्रकरणावर तत्कालिन मुंबई सरकारनं तिथे असलेल्या दोन भारतीय आणि दोन ब्रिटिश अशा एकूण ४ पोलीस शिपायांची चौकशी करुन एक अहवाल केला, तो उपलब्ध आहे. शौरी त्यांच्या पुस्तकात असाही दावा करतात की, या समुद्रातल्या उडी घटनेवर जे जे नंतर अतिशयोक्तीपूर्ण लिहिलं आणि बोललं गेलं, त्या मिथकांची पेरणी चित्रगुप्त लिखित 'द लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर' या पुस्तकातून पहिल्यांदा केली गेली.
"या पुस्तकात एक संपूर्ण प्रकरण 'एस एस मोरिआ' जहाजावरुन पलायनावर लिहिलं आहे आणि एक मिथक तयार होण्याचे सगळे घटक त्यात आहेत," शौरी लिहितात. शौरी यांच्या अगोदरही अनेक लेखकांनी सावरकरांशी संबंधित या घटनांवर, त्यांच्या राजकारणावर आणि त्यांच्या परिणामांवर लिहिलं आहे. वैभव पुरंदरे यांनी इंग्रजीमध्ये 'सावरकर: द ट्रू स्टोरी ऑफ फादर ऑफ हिंदुत्व' हे सावरकरांचं चरित्र लिहिलं आहे. पुरंदरेंच्या मते, सावरकरांच्या या उडीबद्दल अतिशयोक्तीपूर्ण लिहिलं गेलं आहे हे नक्की पण त्याचा दोष सावरकरांना देता येणार नाही. "त्यांनी जी उडी मारली आणि जे घडलं ते तर खरं आहे. पण नंतर त्यात जी अतिशयोक्ती घातली गेली, ते सावरकरांमुळे झालं असं कसं म्हणायचं? किंबहुना स्वत: सावरकरांनी जेव्हा त्याबद्दल काही म्हटलं अथवा लिहिलं आहे, ते एका मर्यादेतच लिहिलं आहे. पुस्तक लिहितांना मला असंही दिसलं की इतर कोणी लोक सावरकरांपाशी येऊन या घटनेविषयी अतिशयोक्तीपूर्ण बोलायचे, तेव्हा सावरकरही त्यांना म्हणायचे की तुम्ही सांगता आहात तेवढं ते नाही. त्यामुळे अतिशयोक्तीसाठी त्यांना जबाबदार धरावं असं मला वाटत नाही," वैभव पुरंदरे म्हणतात. सुभाषचंद्र बोसांना भारतातून पळून जाऊन सैन्य उभं करण्याची 'सूचना' सावरकरांची?
सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकात अरुण शौरींनी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या 'आझाद हिंद सेने'बाबत केलेल्या दाव्यांचाही विषय हाताळला आहे. या दाव्यांची चर्चाही समर्थक विरुद्ध टीकाकार अशी सतत होत आली आहे. पण सुभाषचंद्रांच्या या साहसामागची, परदेशात सैन्य उभारुन ब्रिटिशांशी युद्ध करण्याची रणनीति या सगळ्याशी सावरकरांचा काहीही संबंध नव्हता, अशी मांडणी शौरींनी केली आहे. सावरकरांनी हा दावा १९५२ सालच्या मे महिन्यातल्या त्यांच्या पुण्यातल्या भाषणांमध्ये केला होता. पारतंत्र्यकाळात सशस्त्र क्रांतीसाठी 'अभिनव भारत' ही संघटना सावरकरांनी स्थापन केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर उद्देश सफल झाला असं म्हणून ही संघटना विसर्जित करण्यात आली. संघटनेचा हा सांगता समारंभ पुण्यात झाला. तीन दिवस चाललेल्या या सभारंभात केलेल्या भाषणांमध्ये सावरकरांनी स्वातंत्र्ययुद्धातल्या क्रांतिकार्याचा आढावा घेतला. तो घेत असतांना 'माझ्या सूचनेस स्वीकारुन' भारतातून पळून जर्मनीत जाणऱ्या सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या 'आझाद हिंद सेने' बद्दल विस्तारानं बोलत आपण सुभाषचंद्रांना मुंबईतल्या भेटीत या क्रांतिकार्याची कल्पना कशी दिली आणि त्यानुसार बोसांनी कृती कशी केली, हे सावरकरांनी सांगितल
११ मे १९५२ रोजीच्या त्यांच्या या मालिकेतल्या दुसऱ्या दिवशीच्या भाषणात सावरकर २२ जून १९४० रोजी सुभाषचंद्र बोसांनी मुंबईतल्या 'सावरकर सदन'मध्ये घेतलेल्या त्यांच्या भेटीची हकीकत सांगतात. अरूण शौरी 'सावरकर समग्र' या हिंदी भाषांतरित तिसऱ्या खंडात प्रकाशित करण्यात आलेल्या भाषणांचा संदर्भ त्यांच्या अभ्यासासाठी वापरतात. 'सावरकरस्मारक डॉट कॉम' या वेबसाईटवर हा तीनही भाषणांची मराठी लिखित आवृत्ती उपलब्ध आहे. या भाषणात 'सुभाषचंद्र बोसांची अवचित भेट' या प्रकरणात सावरकरांनी या भेटीचा इतिवृत्तांत सांगितला आणि तो सांगण्या अगोदर सुरुवातीला या भेटीचा वृत्तांत काहींना अगोदर माहित असला तरीही 'त्याचा प्रकट सभेत असा उच्चार मी प्रथमच आणि हेतुपूर्वक करत आहे' असं सावरकर म्हणतात. 'मुस्लीम लिग'च्या महंमद अलि जिना यांची भेट झाल्यावर बोस सावरकरांना भेटायला आले होते. या भेटीचे इतर तपशील सांगितल्यावर सावरकरांनी स्वत: बोसांना केलेल्या सूचनेसंदर्भात सांगितले. सावरकर म्हणाले, "रासबिहारीसारखे अनेक सशस्त्र क्रांतिकारक पुढारी जसे ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन जपान जर्मनी येथे निसटून गेले तसे आपणही तत्काल हुलकांडी देऊन निसटून जावे. तिकडे इटली, जर्मनीच्या हाती पडलेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांचे पुढारीपण उघडपणे स्वीकारावे."
"हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्याची प्रकट घोषणा करावी आणि जपान युद्धात पडताच साधेल त्या मार्गाने बंगालच्या उपसागरातून म्हणा किंवा ब्रम्हदेशातून म्हणा, हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेवर बाहेरून स्वारी करावी. असा काही तरी सशस्त्र नि साहसी पराक्रम केल्यावाचून आपण हिंदुस्थान स्वतंत्र करू शकणार नाही. असा पराक्रम नि साहस करण्यासाठी जी दोन तीन माणसे आज मला समर्थ दिसतात त्यात आपण एक आहात. त्यातही माझा आपणावरच डोळा आहे." सावरकरांच्या या भाषणांतले सुभाषचंद्र बोसांसंदर्भात असलेले उल्लेख घेऊन अरुण शौरी त्यांच्या पुस्तकात 'भारतातून पळून जाणं आणि जर्मनी-जपानची मदत घेऊन बाहेरून ब्रिटिशांविरुद्ध सैन्याचा उठाव करणं' ही सावरकरांनी बोसांना केलेली सूचना वा दिलेली कल्पना होती' या सावरकरांच्या दाव्याला चूक ठरवतात. हा दावा अनैतिहासिक असून त्याला कोणताही पुरावा नाही, असंही शौरी म्हणतात. 'छाननी वा तपासणी केली, तर हे दावे कोसळून पडतात' असंही शौरी म्हणतात. या दाव्यांविरोधात दाखले देतांना शौरींनी खुद्द सुभाषचंद्र बोसांनीच लिहून ठेवलेला वृत्तांत दिला आहे. बोसांनी त्यांच्या 'द इंडियन स्ट्रगल' या पुस्तकात दिलेला सावरकरांच्या भेटीचा उल्लेख पाहिला तर सावरकरांनी सांगितलं त्यापेक्षा वेगळं दिसेल, शौरी लिहितात. बोसांनी युरोपात सुरु झालेल्या दुस-या महायुद्धाचा उपयोग कसा करुन घेता येईल या हेतूनं गांधी, नेहरु, जिना आणि सावरकरांसह अन्य काहींच्या भेटी घेतल्या होत्या. बोसांनी या भेटीबद्दल लिहिलं आहे: 'सावरकरांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं असं दिसतं आणि ते केवळ हिंदूंनी ब्रिटिश सैन्यात प्रवेश करुन सैनिकी प्रशिक्षण कसं घ्यावं, याचा विचार करतात. या भेटींनंतर प्रस्तुत लेखकाला अपरिहार्यपणे या निष्कर्षाशी यावं लागलं की मुस्लिम लिग असो वा हिंदु महासभा, यांच्याकडून काहीही अपेक्षा करता येणार नाहीत.' सावरकरांच्या भेटीबद्दल स्वत: बोसांनी एवढाच उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे असं सांगून शौरी हे नोंदवतात की, सावरकर म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या प्रभावानं बोसांनी पुढची कृती केली, हे शक्य नाही.
शौरी सावरकरांच्या या दाव्याबद्दल या विषयावर संशोधन केलेल्या इतरही काही अभ्यासकांचे निष्कर्ष देतात. लेनर्ड गॉर्डन या इतिहासकाराच्या संशोधनाचा उल्लेख करत शौरी म्हणतात की सावरकरांसह इतर काहींशी या देशातून पळून जाऊन उठाव करण्याची मूळ कल्पना जोडली जाते, पण ती केवळ सुभाषचंद्र बोसांची होती. 'प्रत्यक्ष कृती करण्याअगोदर बोस किमान एक दशक अगोदर इटली, जर्मनी, जपान आणि इतर देशांच्या अधिका-यांशी संपर्कात होते' असं गॉर्डन नमूद करत असल्याचं शौरी लिहितात. शिवाय ही रणनीति सावरकरांची होती हे सांगणारा कोणताही पुरावा आपल्याला मिळाला नसल्याचा आणि ती केवळ सुभाषचंद्र बोसांचीच असल्याचं गॉर्डन यांनी आपल्याला पत्रव्यवहारात सांगितल्याचं, शौरी त्यांच्या पुस्तकात लिहितात. "या मुद्द्यावर मी माझ्या पुस्तकातही विस्तारानं लिहिलं आहे. सुभाषचंद्र बोसांचं पळून जाणं आणि त्यांच्या कारवायांची कल्पना अथवा सूचना आपली होती असं म्हणणं, या सावरकरांच्या दाव्यात तथ्य दिसत नाही. किंबहुना सुभाषबाबूंनी सावरकरांना मुंबईत भेटून गेल्यावर त्यांच्यावर टीकाच केली आहे. परदेशात जाणं, इतर देशांशी हातमिळवणी करणं, 'आझाद हिंद सेना' स्थापन करणं याची कल्पना आणि प्रेरणा केवळ सुभाषबाबूंची स्वत:ची होती. अन्य कोणाचीही नाही," वैभव पुरंदरे 'बीबीसी मराठी'शी बोलतांना आपलं मत मांडतात.
अर्थात, केवळ या दोन घटनांबद्दलच शौरींनी या त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे असं नाही. सावरकरांशी संबंधित अन्य घटनांबद्दल, वादांबद्दल लिहून, काही पुरावे, संदर्भ यांच्या सहाय्यानं या व्यक्तिमत्वाचा शोध घेतला आहे. उदाहरणार्थ, गांधींबद्दलचे त्यांचे विचार, मित्रत्वाचे कथित दावे, हेही शौरी शोधायचा प्रयत्न करतात. अंदमानातल्या, तिथून बाहेर पडतानाचा घटनाक्रमावर, त्याच्या कारणांबद्दल शौरी त्यांच्या पद्धतीनं लिहितात. मुख्य म्हणजे, हिंदुत्वाच्या राजकारणाच्या सध्याच्या काळात सावरकरांच्या हिंदुत्वाचाही ते वेध घेतात. त्यात गायींबद्दलच्या सावरकरांच्या उपयुक्तावादी भूमिकेपासून धर्माबद्दलचे, इतिहासाबद्दलचे त्यांचे विचारही या विश्लेषणाच्या कक्षेत येतात. एवढ्या वर्षांनंतरही असणा-या भारतीय राजकारणावरचा महात्मा गांधींचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या सावरकरांचा उपयोग करुन घेतला जातो आहे का, या प्रश्नाचं उत्तरही शौरी शोधायचा प्रयत्न करतात. "सध्या ज्या दिशेला आपला देश जातो आहे, त्याबद्दल अनेकांप्रमाणेच मलाही चिंता आहे. तसं होतं आहे, याची मुळं कुठे आहेत, हे शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो. हे नेमकं कुठे सुरु झालं? तेव्हा मी रा.स्व.संघ, गोळवळकरांसारखे त्यांचे सरसंघचालक यांचं लिखाण वाचणं सुरु केलं. पण मला सापडलं की आजच्या हिंदुत्वाची मूळ कल्पना ही सावरकरांपासून सुरु झाली आहे," असं अरुण शौरी या पुस्तकाबद्दल 'बीबीसी'शी बोलतांना म्हणाले. "सावरकरांवर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. पण त्यात सावरकरांनी स्वत:बद्दल आणि विविध घटनांबद्दल काय लिहिलं आहे, तेच परत सांगितलं होतं. त्यामुळे मी केवळ त्यांनी जे म्हटलं, जे स्वत: लिहिलं, त्यावरच लक्ष केंद्रित केलं. हे त्यांनी स्वत: जे लिहिलं त्याचं विश्लेषण आहे. त्यामुळे ते नाकारणं अवघड आहे," शौरी म्हणतात. वाद, चर्चा आणि सावरकर हा संबंध नवा नव्हे. त्यामुळे या नव्या पुस्तकातल्या नव्या दाव्यांनी पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. पण नुसतेच वाद न होता त्या मंथनातून कोणतं नवं सत्य समोर येतं, याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.


 

संमेलनाकडून वाचकांची अपेक्षा...!

"दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतेय. कुसुमाग्रजांनी 'मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दारात फाटक्या वस्त्रांनिशी उभी आहे...!' अशी खंत व्यक्त केली होती. त्यात आजही फरक पडलेला नाही. संमेलनातून मराठीचा प्रसार अन् प्रचारासाठी काही केलं जातं का? केवळ उत्सवी, वैभवी संमेलनं झाली म्हणजे ते यशस्वी झालं का? खरंतर अशी संमेलनं ही 'मांडववाल्यां'ची आणि 'खानावळवाल्यां'ची झडताना दिसून येताहेत! या संमेलनातून ज्यांचं कॉपीराईट संपलेलंय अशी चांगली साहित्यमुल्य असलेली पुस्तकं 'पॉकेट बुक'च्या धर्तीवर काढता येणार नाही का? न्यूजप्रिंटचा कागद अन् कव्हरवर जाहिराती घेऊन साप्ताहिकाच्या किंमतीत ही पुस्तकं रेल्वेस्थानक, बसस्थानक, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवायला काय हरकत आहे?"
......................................................
*ज*वळपास दीडशे वर्षापूर्वी म्हणजे ११ मे १८७८ रोजी पुण्यात न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी ग्रंथकारांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून 'ग्रंथकारांचं संमेलन' भरवलं होतं. हेच पहिलं मराठी साहित्य संमेलन! मराठी भाषकांचं राज्य अस्तित्वात आल्यानंतर 'मराठी भाषा सल्लागार समिती' स्थापन करण्यात आली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मराठी ही राजभाषा म्हणून प्रस्थापित झाल्यानंतरही होणारी मराठीची गळचेपी दूर करण्यासाठी कार्यरत करण्यात आली. प्रशासनाला जे करणं शक्य नाही, ते करण्यासाठी त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी मराठी भाषा साहित्य संस्कृती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था-व्यक्तींना एकत्र करून 'मराठी साहित्य संस्कृती महामंडळा'ची स्थापना केली. सारे मिळून मराठीच्या विकासाचा ध्यास घेऊ, आवश्यक ते करू, असा या महामंडळाचा उद्देश होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठी माणसानं घेतलेला हा एक अत्यंत आवश्यक असा निर्णय होता. मराठीच्या समर्थनासाठी, मराठीचं वैभव वाढविण्यासाठी, मराठी माणसाची शक्ती एकवटण्याचा तो एक प्रयत्न होता. महामंडळाच्या माध्यमातून मराठी लोकेच्छांची तीव्रता शासनापर्यंत पोहोचणारी होती. प्रशासनातल्या मराठी विरोधकांना धाक दाखविण्याचं काम महामंडळामार्फत केलं जायला हवं होतं. नाना हुलकावण्या देऊन मराठीला तिच्या न्यायाचं, हक्काचं स्थान मिळू न देण्याऱ्या अधिकाऱ्यांना आणि त्यांचा वापर करणाऱ्या प्रशासनबाह्य मराठी विरोधी शक्तींना मराठी माणसाचा प्रक्षोभ कसा असतो, हे दाखविण्याची जबाबदारीही या महामंडळावर होती. मराठी माणसाच्या स्वाभिमानानं आपलं तेज दाखविण्याचं काम सरळ झटकून सुरू केलं होतं. मुंबईत या तेजाची दाहकताही काही आडमुठ्यांना अनुभवायला लागली होती. महाराष्ट्रात मराठीला मानाचं स्थान असायलाच हवं, ही स्वाभाविकच गोष्ट होती. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या मराठीच्या उपेक्षेचा प्रश्न महामंडळानं सर्व घटक आणि संलग्न संस्थांच्या सामर्थ्यासह लावून धरला असता, तर मराठी साहित्य महामंडळाच्या हातून संयुक्त महाराष्ट्र समितीला जे साधणं शक्य झालं नाही ते साधण्याची शक्यता होती, पण महामंडळ फक्त साहित्य संमेलनापुरतंच उरलं. संमेलनात मिरविण्यानं खुश झालं. साहित्य संमेलन जोवर मराठी साहित्य परिषद भरवत होती, तोवर त्याचा व्याप आणि स्वरूपही परिषदेच्या आटोपशीर आकारासारखंच होतं.
मराठी साहित्य महामंडळ झाल्यापासून या संमेलनांना आजचं भव्य बाजारू, दिखाऊ स्वरूप प्राप्त झालंय, साहित्यबाह्य व्यक्ती आणि शक्तीचा संमेलनावर वरचष्मा झालाय. 'सरबराई'ला महत्त्व आलंय. हे सगळं पेलण्यासाठी आवश्यक असलेला पैसा आणि हुकमी लोकसंग्रह जमवू शकणाऱ्यांना महत्व आलं. विविध मार्गानं यश संपादन केलेल्या आपल्या कर्तृत्वानं आपल्या क्षेत्रात आपलं वैभव आणि वर्चस्व निर्माण केलेल्या, आपल्या या वैभवशाली कर्तृत्वदर्शनानं अधिकाधिक लोकांपर्यंत जाता यावं, अशी इच्छा असलेल्या महत्त्वाकांक्षी व्यक्तींना आपल्या इच्छापूर्तीचा हा सहजसोपा मार्गच गवसला. साऱ्या नामवंत, विद्यावंत, प्रतिष्ठित सज्जनांचा मेळा जमविण्याचा आणि त्याचबरोबर परिसरातला सारा मराठमोठा गोळा करण्याचा हा हुकमी उपक्रम करताना पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी असा त्रिवेणी संगम साधणारा होता. महामंडळाला तर 'देईल खाटल्यावरी' असाच लाभ झाला. साहित्य संमेलनांनी महामंडळाला असं काही व्यापून टाकलं की, मराठीच्या केविलवाण्या अवस्थेकडं बघण्याचं भानच महामंडळातल्या कुणाला राहिलेलं नाही. १८७८ पासून किती साहित्य संमेलनं भरत आहेत, चर्चा होत आहेत. त्यातून निष्पन्न काय होईल आणि आजवर किती झालंय, याचा ऊहापोह आता नको. महाराष्ट्राचं राज्य होईपर्यंत जे काही घडलं, त्याचीही फक्त ऐतिहासिक आठवण ठेवू, पण महाराष्ट्र राज्य झाल्यावर १९६५ मध्ये राज्यभाषा विधेयक मंजूर झाल्यानंतर मराठी साहित्य महामंडळाच्या रूपानं मराठीच्या विकासासाठी लोकेच्छेला बळ लाभावं म्हणून मध्यवर्ती संस्था निर्माण झाल्यानंतर काय घडलं, कसं पडलं याचा तपास करायला काय हरकत आहे? मराठीच्या विकासासाठी महामंडळानं काही करण्याची गरज आहे. नाही तर मराठीची अवस्था 'सेंट झेविअरच्या शवासारखी होईल, मखमली वस्त्राआड मराठीचा नुसता सांगाडाच उरेल.....!'
मुंबईत ७२ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वसंत बापट यांच्या अध्यक्षपदाखाली झालं तेव्हा ते संमेलन 'आविष्कार स्वातंत्र्या'नं गाजलं. बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांबद्धल जे काही म्हटलं, त्यामुळं साहित्यिक आणि साहित्य जगतात खळबळ माजली होती. बाळासाहेबांच्या स्पष्ट, अन् परखड बोलण्याचा वापर करून काहूर उठविलं होतं. बाळासाहेबांचं बोलणं गैर, औचित्यभंग करणार, असभ्य असल्याची खंत वाटणाऱ्यांनी शहाजोग अध्यक्षांचं आणि त्यांच्यासारखा शहाजोगपणा मिरवत अनेक गैरगोष्टी सहजपणे करणाऱ्यांचे व्यवहारही डोळसपणे तपासावेत. आणीबाणीच्या काळात झालेल्या त्या वेळच्या साहित्य संमेलनात दुर्गा भागवतांनी आविष्कार स्वातंत्र्याचा जयघोष करत यशवंतराव चव्हाण आणि इतर राजकारण्यांवर तोफ डागली होती, याची आठवण होणं स्वाभाविक आहे. कारण ही चर्चा अनेक साहित्य संमेलनांतून अजूनही चघळली जाते. त्यानंतर मग बाळासाहेब ठाकरे आणि वसंत बापट यांची जुगलबंदी जुंपली गेली होती. त्याचेही पडसाद त्यानंतरच्या अनेक संमेलनातून उमटलेत. हे सारं पुन्हा सांगण्याचं कारण असं की, साहित्यिकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकारण्यांना व्यासपीठावर बसू दिलं जाणार नाही, असं नेहमी सांगितलं जातं. राजकारण्यांची ॲलर्जी असणाऱ्या या साहित्यिकांचा एकदा पंचनामा व्हायलाच हवाय, साहित्यिक राजकारण करत नाहीत का? खरं तर राजकारण्यापेक्षा अधिक राजकारण हे साहित्यिक करत असतात. अशा प्रकारची शेरेबाजी अनेक साहित्यिकच आपल्या भाषणांतून इतर समारंभात करत असतात.
साहित्य क्षेत्रात जे काही चाललंय, त्यामुळंच मराठी भाषा आणि मराठी समाज यांची प्रगती खुंटलीय. मराठीला रक्तक्षय झालेला नाही, तर मराठीचं रक्त पिणारे रक्तपिपासू डसलेत. या जळवा दूर करायला हव्यात. राजकारण्यांचा द्वेष करणारी ही साहित्यिक मंडळी शासकीय समित्यांवर स्थान मिळावं, साहित्यविषयक कमिट्यांमधून आपली वर्णी लागावी म्हणून इथल्या राजकारण्यांच्या पायाशी कशी लोळण घेतात, त्यासाठी काय काय करतात, याची माहिती लोकांसमोर यायला हवीय. नव्हे, राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी ती लोकांना सांगायला हवीय म्हणजेच राजकारण्यांचा, सत्ताधाऱ्यांचा उपमर्द करणाऱ्या साहित्यिकांचं पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. मराठी साहित्य जगतात चाललेली गटबाजी, काटाकाटी, लाचारी, लाचखोरी आणि अन्य अनेक गैर गोष्टींवर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलीय. ब्राह्मणी तोंडवळ्याविरुद्ध तोंडाळपणा करून काही जण समाधान मानतात. काही ताकद नसलेले राजकारणी साहित्याच्या या व्यासपीठावर राजकारण मांडून आपली हौस भागवून घेतात. साहित्य संमेलन आलं की, असं काही घडवायचं आणि मग जे चालतंय त्यात आपलं साधता येईल का. एवढंच बघायचं, असाही काहींचा उद्योग आहे.
गेल्या दहावर्षांत या मराठी साहित्य संस्कृती मंडळाने काय काय केलं, वेगवेगळ्या मराठी संस्थांमध्ये कोण कोण अन् किती वर्षे खुर्च्या उबवत बसलेत, साहित्य संमेलनात मानधन घेऊन कोण किती वेळा मिरविले आहेत, शासकीय समित्यांवर कोणते साहित्यिक किती वेळा, किती वर्षे आहेत, शासकीय पुरस्काराची खिरापत कशी दिली जाते आणि कुणाला किती वेळा ती दिली गेलीय? देणारे कोण आहेत? कुणाची पुस्तकं सरकारी ग्रंथालयातून जातात? शालेय पाठ्यपुस्तकातून कुणाचं साहित्य घेतलं जातं? या आणि अशाप्रकारच्या अनेक गोष्टींचा पंचनामा अगदी चव्हाट्यावर करण्याची तयारी मराठी माणसानं ठेवायला हवी. मराठी साहित्य क्षेत्रात जे काही घडतंय, त्याची परखड चिकित्सा व्हायलाच हवी, असं लोकांना वाटतं. शासन साहित्य संमेलनासाठी सध्या एक कोटी रुपयांची उधळण करते. त्याच्या जोरावर मानमरातब आणि सरबराई केली जाते अन् वर 'माझी भूक भागविण्यासाठी नव्हे तर तुम्हाला दानाचं पुण्य लाभावं म्हणून जेवतोय...!' अशी मिजास यजमानाला दाखविण्याची हुक्की न आवरणारे या संमेलनाच्या वशिंडावर बसलेले आहेत. पसायदानी ज्ञानोबाबरोबरच 'भले तरी देऊ कासेची लंगोटी...!' अशी उदारता दाखवणारा आणि 'नाठाळाच्या माथी काठी हाणणारा...!' तुकोबाही मराठी माणसानं मनोमनी मानलाय. साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठी साहित्य विश्वातच नव्हे, सर्व मराठी समाजात जे काही घडतंय, त्यानं संमेलन भरवून मिरविण्याची हौस असणाऱ्यांना संमेलनात मिरविण्याचा आमचा हक्कच आहे, अशी मिजासखोरी करणाऱ्या मतलबी मंडळींना आणि आम्ही म्हणजेच मराठी साहित्यिक, असा दर्प बाळगणं, त्यांना खूप काही या पंचनाम्यातून शिकायला मिळेल. तेव्हा पंचनामा चव्हाट्यावर यायलाच हवा!
मराठी भाषा, मराठी साहित्य यासाठी साहित्य महामंडळातून, अशा साहित्य संमेलनातून नेमकं काय साध्य होतं हा एक प्रश्नच आहे. मराठीचा प्रसार आणि प्रचार यासाठी काही केलं जातं का? याचं उत्तर नकारात्मक आहे. उत्सवी, वैभवी संमेलनं झाली म्हणजे ते यशस्वी झालं का? खरंतर अशी संमेलनं ही 'मांडववाल्यां'ची आणि 'खानावळवाल्यां'ची झडताना दिसून येताहेत! या संमेलनातून संमत होणारे ठराव हे अंमलबजावणीसाठी असतात हे महामंडळाच्या ध्यानीच नसतं, असं दिसतं. त्याचा पाठपुरावा होतोच असंही नाही. भव्य, दिव्य, उत्सवी संमेलन करण्याची जणू चढाओढ दिसून येतेय. 'सरस्वतीच्या प्रांगणात लक्ष्मीला नाचवायलाच हवी...!' असं काही नाही. मराठी माणसाला ती अपेक्षाही नाही. तो खुल्या पारावरही संमेलन आयोजित झालं तर तो तिथंही मोठ्यासंख्येनं सहभागी होईल. साहित्यक्षेत्राचा मुख्याधार असलेल्या वाचकांसाठी महामंडळ, संमेलनातून काहीतरी करायला हवंय! पुस्तकांच्या वाढत्या किंमती कशा कमी करता येतील; जेणेकरून त्या सामान्य वाचकाला विकत घेता येईल. आज चढ्या किंमतीतही मराठी वाचक पुस्तकं खरेदी करतोय. पुण्यातल्या पुस्तक मेळ्यात ५० कोटी रुपयांची पुस्तकं विकली गेलीत. मराठी पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावीत यासाठी महामंडळानं प्रयत्न करायला हवा, पण ते करतांना दिसत नाही. जुन्या लेखकांची ज्यांचं कॉपीराईट संपलेलं आहे अशा चांगल्या साहित्यमुल्यांची पुस्तकं 'पॉकेट बुक'च्या धर्तीवर काढता येणार नाही का? न्यूजप्रिंटच्या कागदाच्या, कव्हरच्या तीन पानांवर जाहिराती घेऊन एखाद्या साप्ताहिकाच्या किंमतीत ही पुस्तकं वाचकांपर्यंत रेल्वेस्थानक, बसस्थानक इथं शिवाय वृत्तपत्रविक्रेत्यांच्या माध्यमातून पोचवायला काय हरकत आहे? वाचकाला सहज पुस्तकं उपलब्ध झाली तर वाचकाला कसदार साहित्य वाचायला मिळेल, शिवाय त्याला वाचनाचीही आवड लागेल. पर्यायानं मराठी वाचक वाढेल आणि साहित्यक्षेत्रही बहरेल!
शेकडो वर्षानंतरही ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा वाचल्या जातात. त्यासाठी कुठली संमेलने भरवावी लागली नाहीत. पुल, अत्रे, खांडेकर, सावरकर यांच्या पुस्तकांच्या स्वस्त आवृत्या काढाव्या लागल्या नाहीत. सानेगुरूजी कुठल्या विचारांचे होते, म्हणून त्यांची मराठी वाचली जात नाही. त्यांनी लिहीले ते साहित्य त्या काळातच नव्हे तर पुढल्या अनेक पिढ्यांनाही वाचनीय अन् बोधकारक वाटलं; म्हणून आजही वाचलं जातंय. त्यांनी कार्यशाळा भरवून लेखक तयार केले नाहीत. त्यांचं बोट धरून अनेक पिढ्या साहित्यिक उदयाला आलेत आणि त्यातून मराठीची जोपासना झालेलीय. त्यांना कुठले अविष्कार स्वातंत्र्याचे झेंडे खांद्यावर घेऊन, अजेंडा पुढे करावा लागला नाही. तेच मराठी भाषेचे संवर्धक होतेच. पण मराठीचे असे शिलेदार होते, की त्यांच्यासमोर सत्ताधारी वा राजकारणी अरेरावी करू शकले नव्हते. संमेलनात येणार्‍या राजकारण्यांची त्यांना भिती वाटली नाही. कुणापुढे त्या मराठी सारस्वतांना नतमस्तक होण्याची गरजही वाटलेली नव्हती. कारण त्यांनी भरवलेले साहित्य मेळे वा संमेलनांना भव्यदिव्य करणारी रोषणाई त्यांच्या प्रतिभेत होती. त्यासाठी सेट लावावे लागत नव्हते, की सजावटी कराव्या लागत नव्हत्या. लेखकांना आमंत्रितांना खाऊपिऊ घालणारी संमेलने भरवली जात नव्हती. तर तिथं जमणार्‍या साहित्य रसिकांना पोटभर समाधान मिळणारी पंगत वाढली जात होती. आज जेवणावळी आणि खानावळी झाल्यासारखी संमेलने भरवण्यासाठी यजमान शोधले जात असतील. तर संमेलनात गर्दीसाठी सलमानखान वा अमिताभ बच्चन यांनाही अगत्याने बोलवावं. मग तिकडे गर्दी कशाला झाली नाही, असे शोकमग्न होण्याची नामुष्की येणार नाही. खरेतर यापुढे ‘मराठी साहित्याचा राजा’ असे नाव या सोहळ्याला दिले तरी चालेल. लालबागची थोडी गर्दी तिकडेही सरकू लागेल. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती अशा भव्यदिव्य सोहळ्याची लाचार नाही, इतकं समजलं तरी पुरे आहे.
चौकट.....
*भाबडेपणा सोडून छडा लावायला हवा!*
मराठीच्या साहित्य संस्थांना समाजवादी पक्षासारखी अवकळा आलीय. शिवसेनेपेक्षा अधिक व्यक्तिस्तोम या संस्थांमधून माजलंय. रिपब्लिकन पक्षापेक्षा अधिक विकाऊ साहित्यिक अशा संस्थांतून आहेत. काँग्रेसी भ्रष्टाचारापेक्षा अधिक भ्रष्टाचाराला चटावलेले साहित्यिक अशा संस्थांतून अड्डे करून बसले आहेत. भारतीय जनता पक्षातल्या कर्मठ, उर्मटांपेक्षा अधिक कर्मठ, उर्मट इथं आहेत आणि डाव्यांप्रमाणेच बाह्यनिष्ठेच्या रोगानं पछाडलेलेही आहेत, असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. साहित्य क्षेत्रातल्या या साऱ्या संस्थांच्या कारभाराचा, जबाबदारीचा मराठी रसिकांनी, वाचकांनी, भाबडेपणा सोडून त्यातल्या अनेक गोष्टींचा छडा लावायला हवा!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Monday, 10 February 2025

अमृतकाळातला गणतंत्र दिन...!

"आज भारताचा अमृतकाळातला गणतंत्रदिवस! देशाचा कारभार कसा चालवा यासाठी केलेलं संविधान अन् तो लागू केला तो दिवस हा गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकांनी लोकांसाठी आरंभलेलं लोकराज्य...! लोकशाही, समता, बंधुता, सर्वधर्मसमभाव याची अंमलबजावणी करण्यासाठी तयार केलेला राष्ट्र ग्रंथ! भारतीय प्रजासत्ताक दिवस जो गणतंत्र दिन म्हणूनही ओळखला जातो. हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो!"
..........................................
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'भारताचे संविधान' हे संविधान समितीनं २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारलं आणि २६ जानेवारी १९५० रोजी पासून संविधान अंमलात आलं. पंडित नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदी काठी  अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची अन् स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात राष्ट्रध्वजाचं आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. राष्ट्रगीत म्हटलं जातं आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस देशातला सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झालीय. ब्रिटिशापासून १५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. भारतात आणि जगभरात हाच स्वातंत्र्यदिन सर्वसंमत आहे. पण काही भक्तांनी तो २०१४ ला देश स्वतंत्र झाल्याचं म्हटलं. आता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत राम मंदिर उभारलं गेलं, त्यादिवशी देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला असं नुकतंच म्हटलंय. खरं तर हा स्वातंत्र्यलढ्यात आत्मर्पण करणाऱ्या योद्ध्यांचा अपमान होतोय याची खंत त्यांना वाटत नाही. कारण त्यांच्या विचारांशी जवळीक असलेले या लढ्यात नव्हते. स्वातंत्र्यलढा आणि त्यातही महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचं असं संविधान नव्हतं. मात्र कायदे हे राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर आधारित होते. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचं संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीनं संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेनं सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधीनंतर समितीनं हा मसुदा अंतिम केला. बराचसा विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती हिंदी आणि इंग्रजी २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे संविधान राष्ट्रासाठी लागू झालं. या निमित्तानं प्रजासत्ताक दिन हा साजरा होऊ लागला.
२६ जानेवारी १९५० रोजी डॉ.राजेंद्र प्रसाद प्रथमच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथं त्यांनी पहिल्यांदा लष्करी सलामी घेतली आणि त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. तेव्हापासून या मार्गावर हा संचलन सोहळा सुरू झाला. या दिवशी भारताच्या विविधतेचं आणि संस्कृतीचं आणि लष्करी सामर्थ्यांचं प्रदर्शन केलं जातं. दरवर्षी २६ जानेवारीला नवी दिल्लीत, एक मोठं संचलन आयोजित केलं जातं. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जातं. संचलनापूर्वी अनाम सैनिकांसाठी बनवलं गेलेलं स्मारक, अमर जवान ज्योती याला प्रधानमंत्री पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून वा इतर वाहनावरून या संचलनात सहभागी होतात. नौदल, पायदल, वायुसेना वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ,  पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे, क्षेपणास्त्रे जसे पृथ्वी, अग्नी, रणगाडे समवेत संचलन करतात. राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीनं केली जाते इतकं या संचलनाचं महत्त्व आहे.
संविधानाच्या अंमलबजावणीचं हे अमृतकाळातलं वर्ष आहे. संविधानप्रेमी प्रजासत्ताकदिन साजरा करतीलच पण नाइलाजानं संविधानानुसार कारभार चालविणाऱ्या घटनात्मक दर्जाच्या यंत्रणांना जुलुमाचा रामराम घालावा लागणार आहे. कारण त्यासाठी जे काही कार्यक्रम करावेत तेवढं ते करताना काही दिसत नाही. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'संविधान बदलणार...!' अशी वदंता पसरवून विरोधी पक्षांनी मतदारांची दिशाभूल केली होती. त्यामुळं भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, मात्र त्याचा लाभ विरोधकांना झाल. असाही दावा भाजप नेत्यांनी केला. माजी केंद्रीयमंत्री अनंतकुमार यांनी राज्यघटना बदलाचं सूतोवाच जाहीर सभेतून केलं होतं. अनंतकुमार हेगडे, पाठोपाठ भाजपचेच लल्लूसिंग, अरुण गोविल, पंकजा मुंडे, ज्योती मिर्धा, दिया कुमारी, धर्मपुरी अरविंद अशा काही काही भाजप उमेदवारांनी 'आम्ही भाजप ४०० पार झालो तर आजचं संविधान बदलू ...!' असं प्रचारात सांगतलं होतं. भाजपनं हे नाकारलं खरं, पण भाजपला तसं वाटत नव्हतं तर मग त्या उमेदवारांवर कारवाई का झाली नाही? जणू ती भाजप नेत्यांची मूक संमती होती असंच वाटावं अशी परिस्थिती होती. आता भाजपला ४०० पार खासदार मिळाले नाहीत म्हणून भाजपची भाषा बदललीय का? आज लोकशाही आडून हुकूमशाही, फॅसिझम आपण सारे अनुभवतो आहोत. देशात मूल्याधिष्ठित, संवैधानिक राजकारणाऐवजी व्यक्तिनिष्ठ राजकारणाला प्रारंभ झालाय. ती लोकशाहीकडून एकाधिकारशाहीकडं म्हणजेच हुकूमशाहीवादी सत्ताकारणाला सुरुवात झालीय. चार पाच खासदारांनी संविधान बदलणार अशी वक्तव्य केली. त्याची चित्रफीतही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित केली जात होती. भाजप प्रचार यंत्रणा त्या अफवांना प्रत्युत्तर देत होती. पण ते लटकं अन् दुबळ होतं. कारण विरोधकांनी सादर केलेला सज्जड पुरावा बिनतोड होता.
त्यापूर्वीही विरोधकांच्या आरोपांवर मात करण्याची संधी भाजपच्या कारभाऱ्यांना मिळाली होती. २ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधीचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मदिवस अन् १५ ऑगस्ट २०२२  भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिन! या दोन्ही दिवशी हे दाखवून देऊ शकले असते की, आम्हाला गांधींबद्दल आदर आहे. सत्ताधाऱ्यांच्या पक्षस्थापनेत महात्मा गांधी यांच्या विचारांवर पक्ष वाटचाल करील असं सांगितलं होतं. पण ती संधी त्यांनी टाळली. स्वातंत्र्यदिन हा नागरी स्वातंत्र्याचा पवित्र दिवस देशभरात मानला जातो. परंतु तसं घडू शकलं नाही. कारण नेहरू अन् महात्मा गांधींबद्दलचा कमालीचा द्वेष आणि मनुस्मृतीबद्दलचा भक्तीभाव यांनी दोन्ही समारंभांवर मात केली. गेल्यावर्षी प्रजासत्ताकाचा अमृतमहोत्सव होता. अशावेळी कारभाऱ्यांना हे दाखवून देण्याची नामी संधी होती की, आम्ही भारतीय संविधानचा आदर करतो. संविधानची काटेकोरपणे अंमलबजावणी आमच्याकडून केली जाईल. मिळालेल्या संधीचा सदुपयोग सत्ताधारी करतील ही अपेक्षा होती, पण तसं काही घडलं नाही.
गेल्या वर्षात सिंधुदुर्गला लोकशाही, समतेचं प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्याची लाज न वाटता लपवाछपवी सुरु होती. जिथं नीतिमत्ता भुईसपाट झालीय, तिथं पुतळा धारातीर्थी पडल्याची खंत कशी वाटेल? उलट विषमतेचं प्रतिक असलेल्या शंकराचार्याचा पुतळा ओंकारेश्वर इथं उभारला होता. त्यावर दोन हजार एकशे बेचाळीस कोटी रुपये खर्च केले होते. ज्या शंकराचार्यानं बौध्द मठ उध्वस्त करण्याची प्रेरणा दिली होती, भिख्खूंचं हत्याकांड घडवून आणलं होतं. त्यांचा पुतळा चोपन्न फूट चबुतऱ्यावर उभारलाय. त्याची उंची पंच्याऐंशी फूट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी गंजणारा पत्रा वापरला होता. निवडणूक कॅश करण्यासाठी घाईघाईत पुतळा बनवून, त्याचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं होतं. सत्ताधाऱ्यांना शिवाजी महाराजा़बद्दल किती आस्था, आदर, श्रद्धा आहे, हे पुतळा उभारणीवरुन दिसून आलं होतं. शंकराचार्यांचा पुतळा जरी मतं मिळवून देणारा नसला तरी आमच्या विषमता तत्वांचं ते प्रतिक आहे, ते हजारो वर्षे लोकशाहीला वाकुल्या दाखवत उभं राहिल, अशा बेतानं बनवलं होतं. यावरुन, छत्रपती शिवाजी महाराज आणि शंकराचार्य यामध्ये कोणाबद्दल कुणाला किती आदर आहे, हे समजतं. प्रत्येक कटकारस्थान आणि लाभाच्या गोष्टींसाठी महापुरुषांची ढाल करण्याची लत लागलेले आजचे राजकारणी आदर्शांचा वापर गलिच्छ कामांसाठीही करुन घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जगात आदर आहे. तर शंकराचार्याला मनुस्मृतीचं प्रतिक मानलं जातं. दोघांमध्ये फरक करताना गंजलेल्या बुध्दीच्या राजकारण्यांनी पुतळ्यासाठी गंजलेला पत्रा वापरला यात आश्चर्य करण्यासारखं काहीही नव्हतं. या सर्व पार्श्वभूमीवर आजचा हा प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला जातोय, याकडं देशाचं लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचं शताब्दी वर्ष दसऱ्याला साजरं करताना राष्ट्रीय सण असलेला प्रजासत्ताक दिन फिका पडायला नको. संविधान रक्षकांना  'राज्यघटना कट्टा' निर्माण करण्याची संधी असेल. सध्या टवाळांचे वासूगिरी करण्याचे कट्टे सजवले जात आहेत, हे बातम्यांवरुन समजतं. सुगंधी कट्टेही मोगऱ्यानं दरवळताहेत. आपण रक्षाबंधनाच्या दिवशी जशी हातावर राखी बांधवून घेतो. तशी संविधान रक्षकाचं प्रतिक असलेली राखी तयार करून नागरिकांच्या हातावर बांधून ही प्रथा सुरु करण्यास हरकत नसावी!
हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday, 8 February 2025

आपचा ‘दारू’नं पराभव...!

"देशभरात सर्वत्र सत्ता असली तरी मात्र राजधानीत सत्ता नाही हे शल्य भारतीय जनता पक्षाला आणि संघाला गेली अनेक वर्षे सलत होतं. त्यामुळं त्यांनी रेवड्यांची धुवांधार उधळण केली. समाजाच्या सर्व वर्गाला काहीना काही देण्याचा घोषणा केली. काँग्रेसचीही अवस्था थोडी फार अशीच होती. अण्णा हजारेंच्या मदतीनं भ्रष्टाचाराच्या विरोधात चळवळ उभी करून राजकीय पक्ष निर्माण केलेल्या माजी सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीची सत्ता काबीज केली होती. त्याचं 'कॉमन मॅन' हे रूप लोकांना भावलं होतं. त्यांचा वीज, पाणी मोफत देण्याचा प्रभाव लोकांवर होता. पण त्यांनी स्वीकारलेल्या दारू धोरणानं त्यांचा घात केला. त्यांची तुरुंगवारी झाली आता शीशमहालातून घरवापसी झालीय. त्यांचा हा पराभव दारूनं केलाय! लीकरमुळे त्यांची सत्ता लीक झाली असंच म्हणावं लागेल!"
................................................
*या*वेळी दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनली होती. कारण गेल्या दोन निवडणुकीत आम आदमी पक्षानं भाजप आणि काँग्रेसचा धुव्वा उडवत इथली सत्ता मिळविली होती. मतदारांनीही एकहाती सत्ता सोपविली होती. पण गेल्यावर्षीच या यशाचे शिल्पकार समजले जाणारे अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि आपल्या मंत्रिमंडळातल्या शिक्षणमंत्री आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवावी लागली होती. यावेळी प्रचारादरम्यान भाजप अधिक बोलका होता. त्यांच्या अनेक नेत्यांनी कडाडून हल्ला केला होता. भ्रष्टाचाराविरुद्धच्या चळवळीतून उदयास आलेल्या पक्षावर घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले. आप पक्षानं स्वीकारलेल्या लीकर पॉलिसीमुळे त्यांना हा दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचं दिसून येतेय. त्यांनी दक्षिण भारतात असलेल्या या लीकर पॉलिसी थोडाफार बदल करून दिल्लीत ती राबविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तेलंगणा, आंध्रप्रदेश इथल्या कंत्राटदारांना आणि राजकीय नेत्यांना हाताशी धरलं होतं. ते त्यांच्या अंगाशी आल्याचं दिसून येतंय. याशिवाय व्हीआयपी संस्कृती नाकारण्याचा दांभिकपणा करणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानाचा शीशमहाल असा उल्लेख करत त्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेसनं आरोप केले त्यात ते आपसूक अडकले. त्यामुळं 'आप' विरुद्ध भाजपला जी काही बळकटी मिळाली त्यातलं हे एक कारण आहे. अत्यंत धोरणी अन् सूक्ष्म प्रचाराची मोहीम भाजपनं राबवून दिल्लीत आम आदमी पक्षाला चौथा विजय मिळवण्यापासून रोखलं. भाजप २७ वर्षांनंतर इथं पुन्हा सत्तेत येत आहे. २७ वर्षांपूर्वी भाजपच्या सुषमा स्वराज ५२ दिवस दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर, आतिशी यांनी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्ली निवडणुकीचं चित्र पूर्णत: बदललं. भाजप अधिक आक्रमक बनला. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची अशा जिद्दीनं प्रचार केला. त्यासाठीची सारी आयुधं त्यांनी परजली. त्याचवेळी, काँग्रेसनंही अशा पद्धतीनं उमेदवारी वाटली ज्यामुळे आम आदमी पक्षाला अनेक जागा सहजपणे जिंकता आल्या नाहीत. इथंच भाजपच्या विजयाची आणि आम आदमी पक्षाच्या पराभवाचा पाया रचला गेला.
तुरुंगात जाणारे आम आदमी पक्षाचे सर्वात मोठे नेते अरविंद केजरीवाल यांनी सलग तीन वेळा दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन केलं होतं. त्यांच्या सरकारच्या लोकाभिमानी धोरणांमुळे ते सत्तेत राहिले. संपूर्ण पक्ष केजरीवालांभोवती फिरत होता, परंतु दिल्लीच्या दारू धोरणाशी संबंधित एका प्रकरणात अटक आणि तुरुंगवास झाल्यानंतर, आणि सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सत्येंद्र जैन हे त्याआधीच तुरुंगात गेले होते. त्याचवेळी, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही बराच काळ जामीन मिळू शकला नाही.  आम आदमी पक्षाच्या मोठ्या नेत्यांचं तुरुंगात जाणं आणि न्यायालयीन अटींमुळे बांधील होणं ही दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची एक मोठी कलाटणी होती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्धच्या चळवळीतून उदयास आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप झाले. केजरीवाल नेहमीच व्हीआयपी संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करत आले आहेत, परंतु यावेळी त्यांच्यावरच त्यांच्या निवासस्थानावर शीशमहालबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याचं मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेसनं 'आप'ला जोरदार घेरलं होतं.
मतदारांना मोफत गोष्टी देण्याचा पायंडा केजरीवाल यांनी पाडला. त्याला रेवड्या म्हणत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपनं टीकेचे आसूड ओढले, पण त्याचंच अनुकरण सगळ्याच इतर राजकीय पक्षांनी केलं, अगदी भाजपनंही. आपचं ते धोरण सत्तेसाठीचा काँग्रेसला कर्नाटक, तेलंगणात आणि भाजपलाही इतर राज्यात सोपान ठरलंय. मोफत योजना हा सर्वात मोठा धोका होता आणि आहे असं अर्थतज्ञ सांगतात, परंतु सर्वांनी या रणनीतीचा फायदा घेतला असल्याचं दिसून येतं. दिल्लीत 'आप'च्या लोकप्रियतेचे सर्वात मोठं कारण ह्या मोफत वीज आणि पाणी यासारख्या योजना असल्याचं मानलं गेलं होतं. या निवडणुकीपूर्वी भाजप मोफत वस्तूंविरुद्ध आवाज उठवत होता. केजरीवाल यांनी या वस्तुस्थितीचा फायदा घेतला आणि देशभरात मोफत वीज आणि वैद्यकीय उपचारांसारखे मुद्दे उपस्थित केले, परंतु निवडणुकीत भाजपनंही 'आप' सारखीच चाल खेळली आणि महिला, मुले, तरुण, वृद्ध आणि अगदी ऑटो रिक्षाचालकांसाठी निवडणूक आश्वासनांमध्ये मोठ्या घोषणा केल्या. यासोबतच काँग्रेसनंही अशीच मोठी आश्वासनं दिली, ज्यामुळे 'आप'साठीचं आव्हान वाढलं. भाजपनं शीशमहाल वाद जोरात उपस्थित केला. दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आलिशान पद्धतीनं बांधण्याचा आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा मुद्दा भाजपनं निवडणूक प्रचारात प्रभावीपणे उपस्थित केला. भाजपनं या मुद्द्यावर अनेक पोस्टर्स जारी करून केजरीवाल यांना घेरलं. काँग्रेसनंही हा मुद्दा उपस्थित केला. देशाच्या संसदेतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी या मुद्द्यावरून 'आप'ला घेरलं होतं.
यमुना नदीची स्वच्छता, रस्ते आणि पाणी साचणं यासारख्या मुद्द्यांनीही आप घेरलं होतं. दिल्लीत सत्तेत येण्यापूर्वीच केजरीवाल आणि अनेक आपच्या नेत्यांनी यमुनेच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत सतत सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. तत्कालीन दिल्ली सरकारला फटकारत, सर्व नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर नदी स्वच्छ करण्याचा दावा केला होता. त्यानंतर, दिल्लीच्या जनतेनं 'आप'ला सरकार स्थापन करण्याची संधी दिली. तथापि, १० वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहूनही यमुना नदी स्वच्छ होऊ शकली नाही. हे वास्तव आम आदमी पक्षाला भोगावं लागलंय. दिल्लीत निवडणूक प्रचार सुरू असताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इथं येऊन त्यांनी केजरीवाल यांना आव्हान दिलं. तेव्हा योगी आदित्यनाथ यांनी सवाल केला होता की, 'मी माझ्या मंत्रिमंडळासोबत संगमात स्नान केलंय, पण केजरीवाल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत यमुनेत स्नान करू शकतात का?' यानंतर केजरीवाल यांनी यमुनेच्या विषारी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला.  त्यांनी यासाठी हरियाणा सरकारला जबाबदार धरलं. याला प्रत्युत्तर देत हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी यमुनेचं पाणी एका कपमध्ये प्यायले.  निवडणूक आयोगानंही या मुद्द्यावर केजरीवाल यांना कडक प्रश्न विचारले. याशिवाय, दिल्लीतले जीर्ण रस्ते, त्यावरचे खड्डे, वाहतुकीची कोंडी आणि पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या यामुळेही केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या, लोक नाराज झाले होते. या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस दोघांनीही केजरीवाल आणि आपला प्रचारात लक्ष्य केलं होतं..
'आप'ही इथल्या नागरिकांसाठी मोठी आपत्ती आहे...! हे लोकांवर बिंबविण्यात भाजपला यश आलं. भाजपनं निवडणूक प्रचारात हाच मुद्दा आणि इतर घोषणा देण्यात यश मिळवलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक सभेत 'आप'ला आपत्ती म्हटलं होतं. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह द्विगुणित झाला. या निवडणूक घोषणेसह, भाजपनं प्रत्येक पावलावर केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला लक्ष्य केलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम असो किंवा आयुष्मान योजना असो, केंद्राच्या प्रत्येक योजना ज्या आप सरकारनं दिल्लीत लागू केल्या नाहीत, भाजपनं दिल्लीतल्या लोकांना त्यांच्या योजनांमधून इतर राज्यांना आणि तिथल्या गरिबांना मिळालेल्या फायद्यांबद्दल दिल्लीत ठासून सांगितलं. भाजपनं 'आप'च्या या वृत्तीला आपत्ती म्हटलं. या निवडणूक घोषणेसह भाजपनं 'आप'ला आव्हान दिलं होतं ते अनेक सरकारी योजना ठळकपणे मांडून! 
काँग्रेसनं इंडिया आघाडीत आम आदमी पार्टी असतानाही त्याच्या विरोधात निवडणूक लढवत टीकेची झोड उठवली होती. अनेक काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसनं ही निवडणूक जोरदारपणे लढली. पण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही त्याचं प्रकारे याही निवडणुकीत त्यांना अपयश आलंय.  तथापि, काँग्रेसला २०१५ मध्ये ९.७ टक्के आणि २०२० मध्ये ४.३ टक्के मते मिळाली.  यावेळी या आकड्याला ६.६२ टक्के मते मिळत असल्याचे दिसून येतंय. लोकसभेत विरोधी एकतेचा नारा देऊन भाजपला आव्हान देणारे आप आणि काँग्रेस विधानसभा निवडणुकीत वेगळे झाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं आपली सर्व ताकद पणाला लावली. त्याचा परिणाम निकालांवर दिसून आला.  काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्यामुळे, 'आप'ला तोटा सहन करावा लागल्याचं दिसून आलंय.
तसं पाहिलं तर पाच कारणांमुळे दिल्लीची सत्ता आपच्या हातून गेली, अनेक चुका पडल्या महागात पडल्या. दिल्लीत लीकर घोटाळ्याचे भूत समोर आल्यानंतर आपचा आत्मविश्वास लीक झाला. त्याचा परिणाम दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मधील निकालात झाल्याचे बोललं जातंय. दिल्लीमधल्या दारू घोटाळ्यात आप सरकार बुडालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याभोवती दारू घोटाळ्याचा फास आवळला. त्यात ईडीपासून इतर तपास यंत्रणांची एंट्री झाली. दिल्ली निवडणुकीचा बिगुल वाजताच केजरीवाल आणि सिसोदिया यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली. या सर्व घोटाळ्याचे मुद्दे निवडणुकीत प्रभावीपणे वापरण्यात भाजप यशस्वी ठरली. लिकर घोटाळ्यापासून अनेक घोटाळ्याचा मुद्दा निवडणुकीत हिरारीनं मांडण्यात आला. त्यात केजरीवाल यांच्या मोफत वाटपाच्या सर्व योजना एका झटक्यात मतदारांनी मागे टाकल्या.लिकर घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आतिषी यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लावली. पण आतिषी यांना करिष्मा दाखवता आला नाही. केजरीवाल यांच्या पत्नीचं नाव समोर आलं असतानाही आतिषी यांना आपनं पुढं आणलं. आम्ही घराणेशाही मानत नाही असा संदेश देण्यात आप यशस्वी ठरले. पण आतिषींना लोकप्रिय निर्णय घेता आले नाही. मुख्यमंत्री दुबळा दिसला. मुख्यमंत्री म्हणून आतिषी यांनी छाप पाडलीच नाही. इंडिया आघाडीतील फूट, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांनी आपला पाठिंबा दिला. पण विधानसभा निवडणुकीत आपच्या प्रचाराला यातला कोणताही दिग्गज आला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचंच मतदारांसमोर गेलं. केजरीवाल यांच्या पाठीशी इंडिया आघाडीतले नेते आहेत हे दिसलंच नाही. तर काँग्रेससोबत केजरीवाल यांनी आघाडी न केल्याचा फटका सुद्धा आपला बसल्याचे दिसून आले. भलेही काँग्रेसला निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही. पण काँग्रेसची मतं आपला मिळाली असती, तर चित्र वेगळं दिसलं असतं. अण्णा हजारे यांनी १५-१८ वर्षांपूर्वी दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीत मोठे आंदोलन उभारले होते. त्यातून देशात सत्ता पालट झाली. काँग्रेस सत्तेतून गेली. भाजपने मांड ठोकली. दिल्लीच्या निवडणूक प्रचारात यावेळी अण्णा उतरले. केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावरच त्यांनी बोट ठेवलं. केजरीवाल स्वार्थी, बदमाश आणि संधीसाधू असल्याची प्रतिमा ठसवण्यात अण्णा यशस्वी ठरले. भाजपचं सुक्ष्म नियोजन, केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले. दिल्लीत ज्या भाषिकांची जास्त लोकवस्ती त्या ठिकाणी त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा घेऊन मतदारांना आकर्षित केलं. मुस्लिम बहुल इलाक्यात विश्वास निर्माण करण्यात भाजप यशस्वी, तर आपचं दलित मुस्लिम प्रेम फक्त कागदावरच राहिलं. प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच केलं नाही, यामळे आपला फटका बसला.
हरीश केंची
९४२२३१०६०९

डॉलरच्या दादागिरीचं कारण काय?

"नेहमीच्या राजकीय सामाजिक लेखा ऐवजी आज आर्थिक प्रश्नावर लेख लिहीलाय. डॉलरची किंमत वाढतेय म्हणजेच रुपया घसरतोय. आज तो ८७-८८ पर्यंत येऊन ठेपलाय. दहा बारा वर्षापूर्वी ६२-६३ रुपये डॉलरची किंमत असताना तत्कालीन सरकारवर आजच्या सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती. देशाच्या अस्मितेशी, आत्मसन्मानाशी  सांगड घातली होती. पण जागतिक स्तरावर डॉलरची दादागिरी कशी आहे अन् भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था कशी आहे याचा केलेला धांडोळा!"
....................................
अमेरिकन डॉलरला 'बिग बॉस' म्हटलं जातं. अर्थतज्ज्ञांच्या मते डॉलर का बॉसच राहील. अर्थात, आता डॉलरपुढे आव्हानं उभी राहिली आहेत आणि ती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या गोष्टीला आणखी काही कालावधी लागेल, चीन आणि रशिया हे अमेरिकेविरोधात उभे ठाकलेत. भारताला तसा पवित्रा घ्यायला अजून वेळ लागेल. भारत आपल्या अर्थव्यवस्थेच्या आधारे मजबूत होण्यासाठी सक्षम होतोय. यासाठी त्याला अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागेल. जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास असलेले तज्ज्ञ सांगतात, "अमेरिका अनेक वर्षांपासून डॉलरचा खेळ खेळतेय. या खेळात ती अशाप्रकारे 'करन्सी मॅनेजमेंट' करते की, 'टर्म ऑफ ट्रेंड'मध्ये सर्वाधिक लाभ तिलाच मिळेल. अमेरिका स्वतः ज्या देशांतून मालसामान आयात करते, त्या देशांचं चलन दाबते. आजही 'वर्ल्ड बँक'च्या डेव्हलपमेंट रिपोर्टची वार्षिक यादी पाहिल्यास १०० पैकी ७० देशांचं चलन 'अंडरव्हॅल्यू' दिसेल. अमेरिका जगातल्या सगळ्याच बड्या बँकांवर दडपण आणू शकत असल्यानं सगळ्यांना तिचं म्हणणं ऐकावं लागतं, त्यांना अमेरिकेचा मुकाबला करता येत नाही." खरं तर, अमेरिका एक 'नादार देश' आहे. अमेरिकेच्या उत्पन्नापेक्षा त्या देशाचा खर्च अधिक आहे. वास्तविक, अमेरिकेलाच आपल्या खर्चाचं व्यवस्थापन करता येत नाही. काही वर्षांपूर्वी अशीही परिस्थिती उद्भवली होती की, अमेरिकेकडं आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नव्हते. सध्या अमेरिका स्वतःच आर्थिक संकटात आहे. परंतु आर्थिक परिस्थिती ढासळली असूनही अमेरिका श्रीमंत आणि समृद्ध समजली जातेय. कारण ती इतर सगळ्या देशांना डॉलर्स खर्च करायला लावते. तिचं 'फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट' पॉवरफुल आहे. जगातल्या मोठ्या बँका आणि वित्तसंस्थांवर तिचं प्रभुत्व आहे. तिची तूट गंभीर म्हणता येईल इतकी वाढलीय, तरीही डॉलर्स छापत राहून जगाची दिशाभूल करण्याची चलाखी अमेरिका करते.
२०११ मधल्या गंभीर आर्थिक संकटाच्या वेळी १०० वर्षांत कधीही न घडलेली घटना पाहायला मिळाली होती. 'एस अँड पी' - स्टँडर्ड अँड प्युअर या रेटिंग एजन्सीनं 'अमेरिकन ट्रेझरी बॉण्ड्स'ना 'डाऊनग्रेड' केलं होतं. हा अमेरिकेच्या आर्थिक स्थितीचा सर्वात मोठा निदर्शक होता. त्यावेळी अमेरिकेने 'मनी सप्लाय' वाढवला होता. आता अमेरिकेनं रशिया आणि चीन या दोन बड्या देशांविरोधात आर्थिक युद्ध पुकारलंय, रशियानं युक्रेनविरोधात युद्ध छेडून अमेरिकेलाही आव्हान दिलंय. यात अण्वस्त्रसज्ज युरोपियन देश अमेरिकेच्या बाजूला आहेत. अमेरिकेनं चीनला तैवान विरोधात आघाडी उघडायला लावलीय. अर्थात, चीन आणि रशिया अमेरिकेला ओळखून आहेत. भारताचे अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांशी संबंध आहेत. भारतावर रशिया-युक्रेन युद्धाचा अल्पसा परिणाम झालाय, गॅस पुरवठादार म्हणून रशिया मजबूत आहे. त्यामुळं युरोपियन देशांची बाजू कमकुवत ठरलीय आणि याच कारणामुळे युरोपियन चलन मोठ्या प्रमाणावर कोसळलंय. त्यांच्या तुलनेत, आपला रुपया चांगल्या स्थितीत आहे, असं म्हणावं लागेल. अमेरिका आणि इतर देशांच्या बँकांतल्या 'कार्टेल' डॉलरची बाजू घेत आहेत. त्यामुळं रुपयाची स्थिती किती सुधारेल किंवा कोलमडेल, हे सांगणं अवघड आहे. अमेरिकेत सध्या चलनफुगवट्याचा दर १० टक्के असला तरी डॉलर मजबूत आहे. अमेरिकेचं व्याज दरवाढीचं पाऊल डॉलरला इतर जागतिक बाजारातून परत आणतंय. भारतीय बाजारातूनही मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेतला जातोय. याप्रकारे 'फॉरेन-ग्लोबल इन्व्हेस्टर्स'च्या विक्रीच्या दडपणाखाली भारतीय मार्केट खाली कोसळू शकतं. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत बऱ्या अवस्थेत आहे. बहुतांशी स्वावलंबी आहे. मात्र, 'क्रूड ऑईल'च्या बाबतीत आपण पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहोत. आपल्याला रशियाकडून तुलनेनं स्वस्त ऑईल मिळतं. परंतु, आपली गरज मोठी आहे. आपल्या देशात 'मेक इन इंडिया'च्या बाता जोरजोरात होतात. पण तेवढ्या जोरदारपणे उत्पादन होत नाही. आजही आपल्याला चीनकडून अनेक गोष्टी आयात कराव्या लागतात. या तुलनेत आपली निर्यात कमी आहे. त्यात युरोप कमजोर झाल्यानं त्याचा आपल्या निर्यातीलाही फटका बसलाय. या सगळ्या अडचणी असूनही भारतीय अर्थव्यवस्था इतर अनेक देशांच्या तुलनेत मजबूत आहे. आपण 'जीडीपी'मध्ये किती टक्के वाढ होईल, याचं गणित मांडत असताना इतर अनेक देश मंदीत सापडलेत.
रुपयाची घसरण केवळ नकारात्मक नाही...
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा भाव वर्षभरापूर्वी ७३ रुपयांच्या आसपास होता. गेल्या महिन्यात तो ८०-८२ होता. सध्या तो ८७ वर पोहोचलाय. पुढील काळात रुपयाची स्थिती कशी राहील, हे जागतिक परिस्थिती आणि अमेरिकचं धोरण यावर अवलंबून असेल. सध्या सगळीकडून हेच ऐकायला मिळतंय की, भारतीय रुपयाची घसरण चालू आहे. परंतु पूर्णपणे तसं समजण्याची गरज नाही. हे खरं की, आपली सगळ्यात मोठी आयात क्रूड तेलाची असल्यानं आपल्याला डॉलर महाग पडतो. परंतु आपल्याला आयात कराव्या लागणाऱ्या आणखीही बऱ्याच वस्तू आहेत. या वस्तूंसाठी डॉलर खर्च करण्याऐवजी आपण स्थानिक बाजारपेठेतून त्यांची खरेदी करू शकतो. असं केल्यानं स्थानिक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळेल. डॉलर वधारल्याचा आपल्याला असा फायदा मिळू शकेल. परंतु चलनाची स्थिती अस्थिर म्हणजे व्होलेंटाईल राहिली तर आयात-निर्यातदार संभ्रमात पडतात. चलन स्थिर न राहणं ही अर्थव्यवस्थेसाठी चांगली खूण नसते.
'व्हाईट ओक कॅपिटल मॅनेजमेंट' कंपनीचे सीईओ सांगतात की, "सध्या स्टॉक इन्व्हेस्टर्ससहित सगळे 'यूएस मॉनिटरी पॉलिसी' आणि भयंकर जागतिक परिस्थितीनं चिंतित आहेत. दुसऱ्या बाजूला, रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपमध्ये 'एनर्जी क्रायसिस' निर्माण झालाय. अमेरिका गंभीर चलनफुगवट्याचा सामना करतेय. चीनला संथ विकासदर आणि रिअल इस्टेट 'क्रायसिस' सतावतोय. या परिस्थितीत डॉलरचं वर चढणं आणि अमेरिकेतील संभाव्य मंदी ही भारताची अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ यांच्यासाठी चिंता वाढवणारी बाब आहे." डॉलर्स वर चढण्याची कारणं सांगताना ते सांगतात, "दोन मुख्य कारणं ही आहेत की, चलनफुगवटा नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी 'फेडरल रिझर्व्ह' व्याजदर वाढवत जातेय. दुसरीकडं, जागतिक आर्थिक घडामोडींमुळे सगळ्यांचं लक्ष डॉलरकडं आहे. त्यात गुंतवणूक वाढतेय. कारण डॉलर सगळ्या चलनांच्या तुलनेत मजबूत आहे...!" परंतु लक्षात ठेवा, सध्याचा टप्पा तात्पुरता आहे. अमेरिकेनं आपल्या अर्थव्यवस्थेचं नुकसान टाळण्यासाठी व्याजदर वाढवलेत. चलनफुगवटा कमी करण्यासाठी अशी पावलं उचलावी लागतात. परंतु 'मॉनिटरी पॉलिसी' ही 'सिलिंग फैन'च्या रेग्युलेटरप्रमाणे फिरवता येत नाही. चलनफुगवट्याला आळा घालण्यासाठी केलेल्या व्यापक प्रयत्नांमुळे मंदीची मोठी शक्यता निर्माण होणं स्वाभाविक असते शेवटी डॉलर त्याच्या वास्तव अर्थव्यवस्थेचंच प्रतिबिंब दाखवेल. उदाहरणार्थ, तो अर्थव्यवस्थेची गती मंद करेल किंवा मंदीच्या दिशेनं घेऊन जाईल. त्याचा परिणाम असा होईल की, अमेरिकेला 'ग्रोथ' साठी बाहेर जावं लागेल, तर रुपया आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती दाखवेल. तशीही सध्या 'ग्लोबल ग्रोथ'मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची मजबुती आणि सुधारणा दिसून येत आहेत.
चित्र बदलेल... धीर धरा
या परिस्थितीत युरोप 'ग्लोबल क्रायसिस' ध्यानात ठेवून भारताकडं वळेल. सध्या आपल्याला धीर बाळगायची गरज आहे. पुढील सहा ते नऊ महिन्यांत रुपया वाढू आणि डॉलर घसरू लागेल. २००८-९ च्या जागतिक आर्थिक मंदीचं स्मरण केल्यास त्यावेळी डॉलर रुपया समीकरण कसं होतं, हे लक्षात येईल. अमेरिकेच्या मंदीच्या परिणामावरून हे समजून घ्यायला हवं की, आपला शेअरबाजार हा दीर्घकाळासाठी आपली अर्थव्यवस्था आणि कॉर्पोरेट कामगिरीच्या आधारे चालेल. तर अमेरिकन मार्केट तिथली इकॉनॉमी आणि कॉर्पोरेट कामगिरीवर चालेल. अल्पकाळासाठी काहीतरी मोठी नकारात्मक गोष्ट घडू शकते. तिचा मोठा परिणाम अमेरिकन बाजारावर झाला, तर आपल्या बाजारावरही होऊ शकतो. हे लक्षात घेता भारतीय गुंतवणूकदारांसाठी 'स्टे इन्व्हेस्टेड' राहण्यात शहाणपणा आहे.
रुपयात व्यापार किती शक्य ?
भारताबरोबर चार ते पाच देश रुपयात व्यापार करायला तयार असल्याचं कळतंय. सरकार या देशांशी बातचीत करतंय. रशियानं पूर्वीच होकार दिलाय. या प्रक्रियेशी बँका, रिझर्व्ह बँक आणि विविध सरकारी धोरणं यांचा संबंध असल्यानं याची अंमलबजावणी व्हायला थोडा कालावधी लागेल, असं दिसतंय. रुपयात व्यवहार झाल्यास तेवढे डॉलर्स वाचतील. हा उपाय कितपत प्रभावी ठरेल, हे सांगता येणार नाही. परंतु तो करून पाहायला हरकत नाही. तसाही भारत आता जगातली पाचवी मोठी 'इकॉनॉमी' बनलाय. असे अनेक मैलाचे दगड भारत पार करणार आहे. सध्याच्या विपरीत जागतिक परिस्थितीत भारत सर्वात वेगवान अर्थव्यवस्था आहे, यात शंका नाही. मात्र, याचा फायदा सर्वसामान्य भारतीयांना किती पोहोचलाय किंवा पोहोचेल, हा प्रश्नच आहे.
चौकट
भारतीय अर्थव्यवस्था.....
बँकांना व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून काही रक्कम रिझर्व्ह बँकेकडं जमा होते जी “राखीव निधी“ म्हणून सुरक्षित ठेवली जाते. रिझर्व्ह बँकेकडं असलेली ही गंगाजळी आहे किंवा होती ९ लाख कोटी रुपयांची! म्हणजेच हे सगळे पैसे तुम्ही आम्ही इमानइतबारे केलेल्या व्यवसायातून, बँकिंग मधून भरलेलेत अर्थातच करदात्यांचे पैसे आहेत. राखीव निधी हे नावच हा निधी आपत्कालीन स्थितीत वापरायचा असल्याचं स्पष्ट करतं. यशस्वी नोटाबंदी ,यशस्वी जीएसटी आणि घोडदौड करणारी अर्थव्यवस्था असताना सरकारला हे ९ लाख कोटी नेमकं कशाला हवं होतं? ही गंगाजळी द्यायला नकार दिल्यानं उर्जित पटेल घरी गेले आणि इतिहासाचे पदवीधर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेम्बर २०१८ मध्ये नेमलेल्या समितीनं अंतिम अहवाल दिला. “येत्या पाच वर्षात हे ९ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेनं सरकारला सुपूर्द करावेत...!“ धक्कादायक बाब म्हणजे हा आपत्कालीन राखीव निधी पूर्वी ६.४ टक्के होता तो घटवून ५.५ टक्के करावा अशीही शिफारस समितीनं केलेलीय. आता रिझर्व्ह बँकेकडून सरकारनं घेतलेले पैसे, रिझर्व्ह बँकेनं पैसे दिलेले नाहीत, सरकारनं घेतलेत हे लक्षात ठेवा. 
२०१४-२०१५ – ६५, ८९६ कोटी. २०१५-२०१६ – ६५, ८७६ कोटी. २०१६-२०१७ – ३०, ६५९ कोटी. २०१७-२०१८ – ५०,००० कोटी. २०१८-२०१९ – ९९, १२२ कोटी. २०१९-२०२० – ५७, १२८ कोटी. २०२०-२०२१ – ९९, १२२ कोटी. २०२१-२०२२ – ३०, ३०७ कोटी. २०२२-२०२३ – ८७, १४६ कोटी. २०२३-२०२४ – २,११, ००० कोटी. एकूण रक्कम झाली ७ लाख ९६ हजार २५६ कोटी. मग फक्त एवढेच पैसे रिझर्व्ह बँकेकडून घेतलेत का ? तर त्याच उत्तर 'नाही'. रिझर्व्ह बँक सरकारला नफ्यातून डिव्हिडंड देते. त्या पैशाचा हिशोब वेगळाच. २००६-२०१४ या दहा वर्षाच्या कालावधीत सरकारनं १ लाख ०१ हजार ६७९ कोटी रुपये घेतले. २०१५-२०२४ या दहा वर्षाच्या कालावधीत सरकारनं ७ लाख ९६ हजार २५६ कोटी रुपये म्हणजे आठ पट पैसे जास्त घेतलेत. सरकार इतक्या पैशाचं करतं काय? इंधनाच्या उत्पादन शुल्क करातून मिळालेली रक्कम, मद्यविक्रीमधून मिळालेलं उत्पादन शुल्क, जीएसटीची रक्कम, वेगवेगळ्या कंपन्या विकून मिळालेली रक्कम, विमानतळ-रेल्वे यांच्या खाजगीकरणातून मिळालेली रक्कम. एवढे लाखो कोटी रुपये नेमकं कुठं गेलेत? लसीकरण करायला ३६ हजार कोटी लागणार होते, रस्त्याची कामं सगळीच बीओटी तत्वावर आहेत जिथं आपल्याला टोल भरायचा आहेच. मग नेमकं पैसे कुठं गेलेत? वेगवेगळ्या काळात आलेल्या आर्थिक मंदीतही भारताची अर्थव्यवस्था टिकून राहिली कारण रिझर्व्ह बँकेची त्याकाळात असलेली मजबूत स्थिती आणि २८ टक्के असलेली गंगाजळी. आता जर असा मंदीचा फेरा आला किंवा जगभरात आर्थिक अरिष्ट आलं तर भारताची अवस्था काय होईल?



भारत 'लाभार्थींचा देश बनतोय...!

"यंदाचं बजेट हे शहरी आणि मध्यमवर्गासाठी असावं असंच दिसतंय. त्यांच्यासाठीच्या तरतुदी वाढविल्या आहेत. १२ लाखाचे उत्पन्न असलेल्यांना आयकरात सूट दिल्याचा डांगोरा पिटला जातोय तो एक भुलभुलैय्या वाटावा अशी स्थिती आहे. यामुळं सरकारचं १ लाख कोटींचे उत्पन्न घटलंय असं सांगितलं जातंय. पण प्रत्यक्षात ५ लाख कोटींचे उत्पन्न वाढलेलंय. कृषीसंदर्भात करवाढ करतानाच अनुदान कमी केलंय. आणखी २ लाख कोटींचे कर्ज घेतलं जाणार आहे. लोकांचं उत्पन्न वाढवून त्यांची क्रयशक्ती वाढावी यासाठीचं प्रयत्न करण्याऐवजी देशात लाभार्थी वाढविले जाताहेत. भारताला सशक्त, समर्थ, आर्थिकदृष्ट्या संपन्न देश बनविण्याऐवजी जणू 'लाभार्थींचा देश' बनवला जातोय!"
.....................................................
*सं*सदेत घोषणा झाली अन् लगोलग ढोल वाजवले जाऊ लागले. टाळ्या वाजायला जाऊ लागल्या. १२ लाखाच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही...! सरकारनं सांगितलं की, यामुळं सरकारचं नुकसान झालंय, १ लाख कोटीचं उत्पन्न कमी मिळणार आहेत. सरकार असं म्हणत असलं तरी गेल्यावर्षीच्या उत्पन्नापेक्षा ५ लाख कोटींचा जादा महसूल सरकारला मिळणार आहे. मग तो जीएसटी असो नाहीतर आयकर, कार्पोरेट कर, कस्टम कर, एक्साईज असेल वा त्यावरचा सेस असेल. हा महसूल कुठं बाहेरून येणार नाहीये. जे आता करदाते आहेत त्याचं तेवढ्याच करदात्यांकडूनच कर वसूल होणार आहे. मग ती शेतकऱ्यांची अवजारे असोत, बी बियाणे, खतं वा शेतीसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद असो. जी सरकारच्या मालकीचे उद्योग नेहरुकाळापासून कार्यरत आहेत त्या उद्योगकडूनही वसूली केली जाईल. यंदाचं बजेट हे ५० लाख ६५ हजार ३४५ कोटी रुपयाचे आहे. या बजेटमध्ये जी करवसुली केली जाईल ती ४८ लाख कोटी इतकी आहे. सगळेच आकडे वाढलेत, बजेट वाढलंय तसंच उत्पन्न अन् करवसुली ही वाढलीय. गेल्यावर्षीच्या बजेटमध्ये असलेल्या करवसुलीपेक्षा यंदाची करवसुली ही अधिक प्रमाणात होणार आहे. आयकर गेल्यावर्षीपेक्षा २ लाख ७ हजार ७२ कोटी अधिक गोळा होणार आहे. म्हणजेच गेल्यावर्षी १२ लाख ३१ हजार कोटी आयकराच उत्पन्न होतं ते वाढून आता १४ कोटी ३८ हजार असेल. सरकार संसदेत म्हणतेय की, आम्हाला १ लाख कोटी उत्पन्न कमी मिळणार आहे. पण बजेटमध्ये तर २ लाख कोटीचे आयकराचं उत्पन्न वाढलेलंय. जीएसटीमध्ये गेल्यावर्षी १० लाख ३० हजार कोटीची वसुली होती. ती यंदा वाढून ११ लाख ७८ हजार कोटी होणार आहे. कार्पोरेट कर देखील वाढलेलाय पण या दोन कराच्या तुलनेत तो कमी आहे. 
आयकर भरणाऱ्या देशातल्या एकूण करदात्यांपैकी केवळ २२ लोक जे कार्पोरेटच्या रेंजमध्ये येतात त्यांच्याकडे देशाच्या एकूण संपत्ती पैकी ५० टक्के संपत्ती आहे. यंदा कार्पोरेट कर १० लाख ८३ हजार कोटी अपेक्षित आहे जी गेल्यावर्षी ९ लाख ७० हजार कोटीचे उत्पन्न होतं. म्हणजे १ लाख १२ हजार ५२८ कोटी उत्पन्न वाढतेय. इतर करांच्या वसुलीमध्ये ही रक्कम अल्प आहे. कस्टमकडून ५ हजार कोटीचे अधिक उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्यावर्षी २ लाख ३५ हजार कोटी होतं ते आता वाढून यंदा २ लाख ४० हजार मिळेल. एक्साईज कर २ लाख ५० हजार २५० कोटी अपेक्षित आहे. ३९ हजार १८० कोटी हे न्यूनतम उत्पन्न धरलं जातं. दुसरी एक्साईज ड्युटीचं  उत्पन्न २ लाख ७० हजार ११ कोटीचं आहे. यातही वाढ आहे. जो सेस घेतला जातो ज्यातून रस्ते आणि मूलभूत सुविधा दिल्या जाताहेत. यात टोलची रक्कम धरलेली नाही, ती अलग आहे. सेसमधून ४७ हजार ४२० कोटी इतकी वसुली आहे. याव्यतिरिक्त इतर खात्यातल्या जो सेस आहे तो १९ हजार ३३० कोटी आहे. दोन्ही मिळून ६६ हजार ७५० कोटी. म्हणजे सेसचे उत्पन्न ही वाढतेय. केंद्रशासित प्रदेशातून कर संकलित केला जातो. तो गेल्यावर्षी ८-९ हजार कोटी होता तो वाढून यंदा १० हजार १३३ कोटी होईल. हे सगळं एकत्रित केलं तर आपल्या हाती असेल, ८२ लाख ६५ हजार १३३ कोटी! बजेट कितीचे आहे तर ते ५० लाख ६५ हजार ३४५ कोटी रुपयांचे! यातलं प्रत्यक्ष कर ४२ लाख ६५ हजार कोटींचे आहे. शिल्लक राहिलेत ८ लाख कोटी! याशिवाय सेवासुविधा दिल्या जाणाऱ्या नॉन रिव्ह्यून्यू कर देखील असतो जो सरकार नाही तर ते कंपन्याकडून सरकार अन् आपल्याकडून कंपन्या वसूल करतात. उदा. कम्युनिकेशन सर्व्हिस देणाऱ्या मोबाईल कंपन्याकडून सरकार कर वसूल करते ते ८२ हजार ४४५ कोटी. त्या कंपन्या त्यांचे दर वाढवून ती रक्कम आपल्याकडून वसूल करतात. ट्रान्सपोर्ट क्षेत्राकडून ३७ हजार ६७३ कोटी, एनर्जी सर्व्हिस मधूनही २२ हजार ६५६ कोटी वसुली तर. इतर खात्यातल्या सेवाकरापोटी १६ हजार ५५ वसूल केले जातात. डिव्हीडंड प्रॉफिट ३ लाख २५ हजार कोटी हा डिव्हीडंड रिझर्व्ह बँक, इतर सरकारी बँका, सरकारी उद्योग यांच्याकडून येतो मग यावर सरकारनं लक्ष द्यायला हवंय, पण तसं होत नाही. कारण सरकारला हे साऱ्याच खासगीकरण करायचंय. नॉन टॅक्स रेव्हिण्यू ५ लाख ८३ हजार कोटींचा आहे. गेल्यावर्षी पेक्षा ५८ हजार कोटी अधिक मिळताहेत. जुन्या प्रत्यक्षकराच्या ५ लाख ८३ हजार कोटी मध्ये ८२ लाख ६५ हजार कोटी यात जोडले गेले तर तेवढा कर सरकार करदात्यांकडून गोळा करते. 
अशावेळी तुम्ही म्हणाल की, कर आकारला नाही तर सरकार चालणार कसं? इथं मग दुसरा प्रश्न उभा राहतो करदात्यांच्या पैशाचा विनियोग कसा व्हायला हवाय? सरकार म्हणतं आमच्यावर खर्च झाला पाहिजे तर जनता म्हणते आमच्यावर खर्ची पडले पाहिजेत. सरकारनं निर्णय घेतला की, आधी सरकारवर खर्च झाला पाहिजे. म्हणून मग 'सेंट्रल एक्सपेंडीचर' मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत १ लाख ६५ हजार २४ कोटी रुपये वाढविलेत. गेल्यावर्षी ३७ लाख ५०० कोटी खर्ची पडलेत ते आता ३९ लाख २४ हजार १५४ कोटी खर्ची पडतील. एस्टाब्लिशमेंटवर होणारा खर्च ३ लाख ५१ हजार ९४५ कोटी होणार आहेत ज्यात सर्व सरकारी खाती येतात. इथल्या कर्मचाऱ्यांवर पगार, भत्ते यासाठीचा खर्च गेल्या वर्षी १ लाख ५९ हजार कोटी होता त्यात यंदा वाढ झाली असून ती आता १ लाख ६५ हजार ९१३ कोटी खर्च होणार आहेत. दुसऱ्या प्रकारच्या एस्टाब्लिशमेंटवर १ लाख ८६ हजार ३२ कोटी रुपये खर्च होताहेत. यातही वाढ झालेलीय. म्हणजे जवळपास सेंट्रल एक्सपेंडीचर ३९ लाख कोटी खर्च होताहेत. याशिवाय केंद्राच्या योजनाही असतात. त्यासाठीची तरतूद १६ लाख कोटींच्या आसपास आहे. त्यातही गतवर्षीपेक्षा १ लाख ७६ हजार कोटीची वाढ झालीय. शेतीवर होणाऱ्या खर्चात मात्र ३ लाख ८१८ हजार कोटींची घट करण्यात आलीय. गेल्यावर्षी १ लाख ३१ हजार खर्च झालेत ते आता १ लाख २७ हजार २९० खर्ची पडणार आहेत. खतांवर मिळणारी सबसिडी २२ हजार कोटींनी कमी करण्यात आलीय. गेल्यावर्षी १ लाख ८० हजार कोटी होती त्यात यंदा आणखी घट केली असून यंदा १ लाख ५६ हजार कोटी दिली जाणार आहे. पब्लिक सेक्टर म्हणजे सरकारी उद्योगातून मिळणारा डिव्हीडंड १२ हजार ८४० कोटी कमी मिळणार आहे. खरं तर अशा उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवायला हवी होती. ती वाढवली नाही. पूर्वी साडेपाच लाख गुंतविले जायचे आता ५ लाख ३५ हजार गुंतविले जाताहेत. 
मग खर्च वाढला कुठे तर ते राजकीय लाभासाठी ज्या घोषणा केल्या जातात त्यात वाढ झालीय. सरकारनं शहरी लोकांसाठी घरं देण्याची योजना राबवतेय त्यात ५२ टक्क्यांची म्हणजे ५० हजार ३२३ कोटींची वाढ केलीय. गेल्या वर्षी ४६ लाख कोटी तरतूद होती ती आता ९६ लाख कोटी केली गेलीय. याशिवाय सरकारच्या सहकार्याने चालणाऱ्या ज्या योजना आहेत, जसे की, स्वच्छ भारत अभियान, ग्रामीण आवास योजना, अमृत - अटल या नावाने सुरू असलेल्या योजनावर ५ लाख ४१ हजार ८५० कोटी खर्च करतेय. गेल्यावर्षी ३ सव्वा तीन कोटी खर्च होता त्यात वाढ झालीय. राज्यसरकारांच्या मदतीनं आयुष्यमानसारख्या योजना राबविल्या जाताहेत त्यातही वाढ केलीय. एकूण काय १२ लाख उत्पन्नवर जी सुट देऊन १ लाख कोटींची तूट सरकार सोसतेय असं म्हणणं कसं तद्दन खोटं आहे हे लक्षांत आलं असेलच. नोकऱ्या नसल्यानं लोकांच्या हाती पैसे नाहीत. त्यांचं वार्षिक उत्पन्न लाखावर जातच नाही. बिहारमध्ये तर ते ५५ हजार इतकं आहे. तिथं निवडणुका असल्यानं घोषणांचा पाऊस पाडलाय. सरकारकडे करवसुलीशिवाय उत्पन्न वाढीचा दुसरा कोणताही मार्ग नाहीये का? या योजनांसाठी २ लाख कोटींच्या कर्जाची तरतूद केली गेलीय. त्यामुळं आजवर घेतलेल्या कर्जावर १२ लाख ७६ हजार ३३८ कोटी इतकं व्याज भरावं लागणार असल्याचं बजेटमध्ये दाखवलंय. देशात कुठे ना कुठे निवडणुका होत असतात नुकत्याच दिल्लीत झाल्यात आता बिहारमध्ये मग बंगाल, आसाम इथं होताहेत त्यासाठी राजकीय घोषणा केल्या जाताहेत. कारण रेवड्याच्या माध्यमातून मतांचं ध्रुवीकरण सत्ताधाऱ्यांकडून केलं जातंय. लोकांची क्रयशक्ती वाढविण्याऐवजी त्यांना लाभार्थी बनविण्यातच सरकार धन्यता मानतेय. मग काय भारत लाभार्थींचा देश बनलाय कां? 
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आनंद शितोळे यांनी जे मत मांडलंय ते अत्यंत गंभीर आहे. बँकांना व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून काही रक्कम रिझर्व्ह बँकेकडं जमा होते जी “राखीव निधी“ म्हणून सुरक्षित ठेवली जाते. रिझर्व्ह बँकेकडं असलेली ही गंगाजळी आहे किंवा होती ९ लाख कोटी रुपयांची! म्हणजेच हे सगळे पैसे तुम्ही आम्ही इमानइतबारे केलेल्या व्यवसायातून, बँकिंग मधून भरलेलेत अर्थातच करदात्यांचे पैसे आहेत. राखीव निधी हे नावच हा निधी आपत्कालीन स्थितीत वापरायचा असल्याचं स्पष्ट करतं. यशस्वी नोटाबंदी, यशस्वी जीएसटी आणि घोडदौड करणारी अर्थव्यवस्था असताना सरकारला हे ९ लाख कोटी रुपये नेमकं कशाला हवे होते? ही गंगाजळी द्यायला नकार दिल्यानं उर्जित पटेल घरी गेले आणि इतिहासाचे पदवीधर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेम्बर २०१८ मध्ये नेमलेल्या समितीनं अंतिम अहवाल दिला. “येत्या पाच वर्षात हे ९ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेनं सरकारला सुपूर्द करावेत...!“ धक्कादायक बाब म्हणजे हा आपत्कालीन राखीव निधी पूर्वी ६.४ टक्के होता तो घटवून ५.५ टक्के करावा अशीही शिफारस समितीनं केलेलीय. आता रिझर्व्ह बँकेकडून सरकारनं घेतलेले पैसे, रिझर्व्ह बँकेनं पैसे दिलेले नाहीत, सरकारनं घेतलेत हे लक्षात ठेवा. २०१४-२०१५ – ६५, ८९६ कोटी. २०१५-२०१६ – ६५, ८७६ कोटी. २०१६-२०१७ – ३०, ६५९ कोटी. २०१७-२०१८ – ५०,००० कोटी. २०१८-२०१९ – ९९, १२२ कोटी. २०१९-२०२० – ५७, १२८ कोटी. २०२०-२०२१ – ९९, १२२ कोटी. २०२१-२०२२ – ३०, ३०७ कोटी. २०२२-२०२३ – ८७, १४६ कोटी. २०२३-२०२४ – २,११, ००० कोटी. एकूण रक्कम झाली ७ लाख ९६ हजार २५६ कोटी. मग फक्त एवढेच पैसे रिझर्व्ह बँकेकडून घेतलेत का? तर त्याच उत्तर 'नाही'. रिझर्व्ह बँक सरकारला नफ्यातून डिव्हिडंड देते. त्या पैशाचा हिशोब वेगळाच. २००६-२०१४ या दहा वर्षाच्या कालावधीत सरकारनं १ लाख ०१ हजार ६७९ कोटी रुपये घेतले. २०१५-२०२४ या दहा वर्षाच्या कालावधीत सरकारनं ७ लाख ९६ हजार २५६ कोटी रुपये म्हणजे आठ पट पैसे जास्त घेतलेत. सरकार इतक्या पैशाचं करतं काय? इंधनाच्या उत्पादन शुल्क करातून मिळालेली रक्कम, मद्यविक्रीमधून मिळालेलं उत्पादन शुल्क, जीएसटीची रक्कम, वेगवेगळ्या कंपन्या विकून मिळालेली रक्कम, विमानतळ-रेल्वे यांच्या खाजगीकरणातून मिळालेली रक्कम. एवढे लाखो कोटी रुपये नेमकं कुठं गेलेत? रस्त्याची कामं सगळीच बीओटी तत्वावर आहेत जिथं आपल्याला टोल भरायचा आहेच. मग नेमकं पैसे कुठं गेलेत? वेगवेगळ्या काळात आलेल्या आर्थिक मंदीतही भारताची अर्थव्यवस्था टिकून राहिली कारण रिझर्व्ह बँकेची त्याकाळात असलेली मजबूत स्थिती आणि २८ टक्के असलेली गंगाजळी. आता जर असा मंदीचा फेरा आला किंवा जगभरात आर्थिक अरिष्ट आलं तर भारताची अवस्था काय होईल?
हरीश केंची 
९४२२३१०६०९ 

आत्मनिर्भर म्हणजे काय?

ज्यांना सतत परावलंबी जगायला शिकवलेलं असतं, त्यांना स्वावलंबी म्हणजे काय ते समजू शकत नाही. तो त्यांचाही दोष नसतो. मानसिक किंवा बौ...