राष्ट्रपती भवन, हा प्रतिभाताईंचा पत्ता बदलून त्या पुणेकर झाल्या, तरी त्या मूळच्या जळगावच्या. वकील असलेल्या नानासाहेब पाटील यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म जाला. या कुटुंबाचं मूळ घराणं राजस्थानमधल्या सोळंकी आडनावाचं. पुढं यातले काहीजण स्थलांतर करून जळगावजवळच्या नाडगाव इथं स्थायिक झाले. ते इथल्या मराठी संस्कृतीशी एकरूप झाले. त्यांना नाडगावची पाटीलकी मिळाल्यावर ते पाटील या आडनावानं ओळखले जाऊ लागले. प्रतिभा लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीच्या होत्या. कॉलेजमधल्या, सगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये त्यांचा सहभाग असे. त्या 'कॉलेज क्वीन' झाल्या त्या वर्षीच म्हणजे १९६२ मध्ये चाळीसगावला एका मेळाव्यात त्यांनी केलेलं भाषण ऐकून काहीजणांनी नानासाहेब पाटील यांना, प्रतिभा यांना राजकारणात पाठवण्याचा सल्ला दिला. नानासाहेब पाटील यांनी प्रतिभा यांना यशवंतराव चव्हाण यांच्यापुढं उभं केलं. १९६२ मध्ये विधानसभा निवडणुका होत्या. उच्चशिक्षित प्रतिभा यांना काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारीही मिळाली. तेव्हा प्रतिभा यांचं वय फक्त २७ वर्ष होतं. या निवडणुकीत जळगाव मतदारसंघातून प्रतिभा पाटील यांनी विजयी होण्याचा पराक्रम केला. १९६७ मध्ये त्यांना एदलाबाद मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. या निवडणुकीतही त्या विजयी झाल्या. निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांची आरोग्य आणि समाजकल्याण खात्याच्या उपमंत्री म्हणून निवड झाली. तिथून सुरू झालेली प्रतिभा पाटील यांची राजकीय कारकीर्द नंतर सतत बहरतच गेली.
१९७४ मध्ये प्रतिभाताई कॅबिनेट मिनिस्टर बनल्या. १९७८ पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या खात्यांचं कॅबिनेट मिनिस्टरपद भूषवलं. १९७९ मध्ये पुलोद सरकारच्या काळात त्या विधानसभेतल्या विरोधी पक्षनेत्या होत्या. १९८२ ते ८५ च्या काळात त्या पुन्हा कॅबिनेट मंत्री बनल्या. १९८५ मध्ये त्या राज्यसभेच्या सदस्या बनल्या. १९८६ ते १९८८ या काळात त्यांनी राज्यसभेचं उपसभापतीपदही भूषवलं. राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या अमरावती मतदारसंघातून निवडून आल्या. १९९६ नंतर काही वर्षं त्या राजकीय विजनवासात होत्या. २००४ मध्ये त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. त्यानंतर २५ जुलै २००७ रोजी त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या
प्रतिभाताईंचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी लढवलेल्या कुठल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला नाही. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी कायम इंदिरा काँग्रेसच्या निष्ठावंताची भूमिका बजावली. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर देशात झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यावर अनेक मोठे नेते त्यांना सोडून गेले होते. प्रतिभा मात्र इंदिरा गांधी यांच्याशी निष्ठावान राहिल्या. इंदिरा गांधी यांना अटक केल्याचा निषेध केल्याबद्दल त्यांनी दहा दिवस तुरुंगवासही भोगला. गांधी घराण्यावरच्या या निष्ठेमुळेच त्यांना अनेक पदं मिळत गेली. १९८० मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यावर इंदिरा गांधी यांनी प्रतिभा यांना मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरवलंही होतं. परंतु संजय गांधी यांनी आपलं वजन ए.आर. अंतुले यांच्या पारड्यात टाकल्यानं अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. अर्थात, बाईंना राज्यात मंत्रिपद, राज्यसभा सदस्यत्व अशी अनेक पदं त्यानंतर मिळत राहिली. २००७ मध्ये सोनिया गांधी यांनी त्यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी घोषित केलं, तेव्हाही त्यांची गांधीनिष्ठा हेच त्याचं प्रमुख कारण होतं.
प्रतिभाताई यांचे पूर्वाश्रमी डॉ. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतीपदाला एक वेगळीच लोकप्रियता प्राप्त करून दिली होती. प्रोटोकॉलचा पडदा बाजूला करून कलाम सामान्य लोकांमध्ये मिसळत. याबाबतीत प्रतिभाताईही त्यांचंच अनुकरण करणाऱ्या होत्या. त्यामुळंच भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळयात्री सुनिता विल्यम्स असोत किंवा नाशिक-जळगाव जिल्ह्यातले शाळकरी मुलं असोत, राष्ट्रपती भवनात त्या आपुलकीनं त्यांची भेट घेतात. प्रतिभाताईंना जुनी हिंदी-मराठी गाणी, नाट्यसंगीत, भावगीतांची आवड आहे. त्यांना चिवडा, चकल्या, बदाम शिरा, चिरोटे हे पदार्थ आवडतात. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आहे. त्या धार्मिक स्वभावाच्या आहेत. संत बहिणाबाईंच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे.
भारताच्या लोकशाही व्यवस्थेत राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपती लष्कराच्या तीनही दलांचे प्रमुख असतात. अशा सर्वोच्च पदाचा मान भारताच्या लोकसंख्येत निम्मा हिस्सा असलेल्या स्त्रियांपैकी एखादीला मिळणं, ही ऐतिहासिक घटना ठरलीय. कारण गेल्या ६० वर्षांत राष्ट्रपतीपदासाठी एकाही स्त्रीची निवड झाली नव्हती. पुरुषांसाठी राखीव अशीच या पदाची ओळख होती. त्यामुळे त्या पदासाठी प्रतिभाताईंची निवड होणार, हे स्पष्ट झाल्यावर राष्ट्रपतीतल्या 'पती' या शब्दावर चर्चा सुरू झाली. परंतु गणपती अथवा सभापतीतील पती हा गणाचा अथवा सभेचा पती म्हणजे नवरा नसतो; तसा राष्ट्रपती हा राष्ट्राचा पती नसतो. ते पदनाम आहे, हे या खुळचटांना कोण सांगणार? पदांप्रमाणे विशेषनामालाही लिंगभेद नसतो. तरीही शब्दांशी खेळणाऱ्या क्षेत्रातही विद्वान-विदुषी, लेखक-लेखिका, संपादक- संपादिका, कवी-कवयित्री, गायक-गायिका, निवेदक-निवेदिका, शिक्षक-शिक्षिका असा लिंगभेदाचं प्रदर्शन घडवणारा अतिशहाणपणा वहिवाट म्हणून राजरोस सुरू आहे. अशा वातावरणात प्रतिभाताईंचं राष्ट्रपतीपण हे खटकणारच. तरीही प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या, ते स्त्री म्हणूनच ! त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडीमागे काँग्रेस आणि इंदिरा गांधी कुटुंबाशी असलेली निष्ठा जशी कामी आली, तशीच भारतीय स्त्रीचं पारंपरिक दर्शन घडवणारी त्यांची प्रतिमाही कामी आलीय. प्रतिभाताई १९६२ पासून राजकारणात आहेत. त्यांच्या अगोदरपासून स्त्रिया राजकारणात आहेत. कार्यकर्त्या आहेत, नेत्या आहेत. अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, प्रेमा पुरव, तारा रेड्डी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणात उमटवला आहे. त्यांच्या तुलनेत तरुण समजल्या जाणाऱ्या पिढीत सूर्यकांता पाटील, निलम गो-हे, विद्या चव्हाण या आहेत. त्या समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणून राजकारण करीत आहेत. पक्षात आणि पक्षाबाहेरील सत्तेच्या विरोधात आवाज उठवण्याची धमक त्यांनी दाखवलीय. त्यांचं हे काम स्त्री-प्रतिमा भेदणारं आहे. स्त्रियांना हिंमत देणारं ठरलंय. याउलट प्रतिभाताईंची प्रतिमा आहे. संघर्ष ही त्यांची ओळख नाही. सोशिकता त्यांनी वैयक्तिक जीवनाप्रमाणे राजकारणातही जपलीय. हुंडा द्यायचा नाही, म्हणून त्यांनी लग्न अडवून धरलं; तथापि, गैर-अनिष्ट रूढी- परंपरांना विरोध करण्यासाठी त्या थेट रस्त्यावर उतरल्या, असं घडलेलं नाही. माणसा-माणसांत भेद जपणाऱ्या-वाढवणाऱ्या देव-धर्म-संस्कृतीचा आदर त्यांनी डोईवरल्या पदराप्रमाणे जपलाय. ही प्रतिमा राजकारणातल्या गोळा-बेरजेसाठी उपयुक्त ठरणारी असल्यामुळेच त्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यात त्यांच्या निष्ठा आणि प्रतिमेप्रमाणे समाजाची मानसिकताही महत्त्वाची ठरली आहे. आज देशात जागतिकीकरणाच्या माध्यमातून आधुनिक विचार-व्यवहाराचे वारे जोरात वाहात असले, तरी त्याचं सार्वत्रिकीकरण होऊ नये, यासाठी खोटारडी पण सनातन व्यवस्था प्रयत्नशील आहे. अशांसाठी स्त्रिया ह्या आजही सॉफ्ट टार्गेट आहेत. यासाठी टीव्ही चॅनल्सवरच्या मालिकांतून आणि देव-धर्म-सत्संगाच्या बाजारातील दलालांकडून उतू जाईस्तोवर भडवेगिरी सुरू आहे. मीडियाने ह्यातही हात धुऊन घेतले आहेत. ह्या साऱ्याचा प्रभाव जनमनावर होणं अटळ आहे. तथापि, काळाला साजेसं जगणं ह्यात माणूसपण आहे. ते जगण्याचा आनंद घेण्यासाठी आणि मिळालेल्या जन्मावर शतदा प्रेम करण्यासाठी आवश्यक आहे. भारतीय स्त्री या आनंदाच्या किती जवळ आहे? ज्या थोड्याफार स्त्रिया या आनंदाचा लाभ घेतात, त्यांची प्रतिमा म्हणजे प्रतिभाताई आहेत का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं अजिबात नाही अशीच आहेत. आजही जीवनाचा आनंद मुक्तपणे घेणाऱ्या स्त्रीकडेच नव्हे, तर पुरुषाकडेही आश्चर्यकारक नजरेने पाहिलं जातं. प्रेमात पडणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना कारपेक्षा मोटारबाईक अधिक आवडते. दोन चाकांवर आपण दोघंच! असा हा मामला असतो. पार्टनरशिपसाठी तो आवश्यक असतो. अन्यथा कॉम्प्रेसरशिवाय एअरकंडिशन, असा प्रकार होतो. पण अशा युगुलांला 'हा कलियुगाचा दाखला आहे' अशा टिपणीने हेटाळलं जातं. त्यासाठी विशेषतः तरुणीला महिलेला अधिक जबाबदार धरलं जातं. खरं तर, वृद्ध रसिकांना मरावंसं वाटणार नाही, असे दिवस आलेत. ई-मेल, ई-शॉपिंग, ई-बुकिंग, ई-बैंकिंगच्या जमान्यात चूल-मूल आणि करियरया तिढ्यात सापडलेली स्वी ई-गृहिणी होऊ पाहातेय. शेतात आणि इतरत्र राबणारी स्त्रीही आपल्या मुलीला आधुनिकतेच्या दिशेने ढकलताना दिसतेय. कशी असेल ही आधुनिक स्त्री? ती मैत्रीवादी, विचारवादी, पुस्तकवादी असेल. स्वतंत्र विचार करणारी असेल. स्वयंपाकात अथवा रीतिरिवाजात अडकणारी नसेल. ती पतीच्या उपस्थितीत अन्य पुरुषाशी बोलताना कचरणार नाही. तसंच कोणताही पुरुष तिच्या मर्जीशिवाय तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करू शकणार नाही. अशी स्त्री कितीजणांना आपल्या घरात कुटुंबात-समाजात हवी आहे? या प्रश्नाच्या उत्तरात नकारात्मक टक्केवारी अधिक आहे. जे घरात आणि समाजात, तेच राजकारणात असणार. यावर चर्चा होऊ नये, स्त्री वर्गात अस्वस्थता पसरू नये, यासाठी प्रतिभाताई पाटलांसारख्या परंपरावाद्यांचं प्रतीक असलेल्या महिलेला मोठेपणा दिला जातो. दुसऱ्या बाजूला शालिनीताई पाटील यांच्यासारख्यांना 'मराठ्यांच्या आरक्षणासाठी' सरकारवर तुटून पडायला पुढे केलं जातं. या दोघींच्या मोठेपणाचं कौतुक करताना 'तुम्ही स्त्रियांसाठी काय केलं? त्यांच्यावरील पारिवारिक-सामाजिक गळचेपीविरोधात कधी आवाज उठवला का?' असे प्रश्न विचारले जात नाहीत. कारण त्यांचा सार्वजनिक वावर महिलांमध्ये अधिक नसतो. राजकारणातल्याच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील पुरुषांना समतेचा आव दाखवण्यासाठी अशा महिला लागतात. अशांच्या फसव्या खेळींना जनता भुलते. प्रतिभाताईच्या राष्ट्रपती होण्याबाबतही असंच झालं आहे. त्यांचं राष्ट्रपतीपद हे सामाजिक बदलाची साक्ष देण्यासाठी नाही की, तसा बदल घडवून आणण्यासाठीही नाही. असेलच तर, 'सबुरी का फल मिठा होता हैl' हा सोशिकतेचा जागर भारतीय महिलांत कायम राहाण्यासाठी तो बनाव आहे. राजकारणात सत्तेची गणितं मांडताना कोणतीही चाल उलटी खेळली जाते. यातूनच हिंदू मत मिळवण्यासाठी टोकाचा मुस्लीमद्वेष केला जातो. जात हे वास्तव आहे. ते भारतातील सर्व धर्मियांत आहे. पण मतांची गोळाबेरीज करण्यासाठी जातवार गणित आखलं जात नाही. त्यासाठी धार्मिक श्रद्धांचा कट्टरतेचा वापर केला जातो. त्यात छुपी गोळाबेरीज जातींची असते. काँग्रेसच्या नरसिंह राव यांचा जातीय कासोटा तथाकथित हिंदुत्ववाद्यापेक्षा घट्ट होता. त्याचा फटका काँग्रेसला बसला. सत्ता गेली. त्याची दुरुस्ती करण्यासाठी काँग्रेसने भाजप परिवाराच्या भटी चलाखीवर प्रहार करायला हवा होता. परंतु काँग्रेसने के. आर. नारायणन् यांच्या दलितपणाचा वापर केला. त्यांना राष्ट्रपती बनवून आपला सेक्युलरपणा जपला. भाजपनेही वाजपेयी सरकारच्या काळात आपला मुस्लीमद्वेष आणि थोतांडाची खुलं दिसू नये, यासाठी वैज्ञानिक डॉ. कलाम यांना 'राष्ट्रपती' केलं, आजच्या मार्केट कल्चरमध्ये स्त्रीचा वावर मोठ्या प्रमाणात दिसतो. पण हा वावर नसून वापर आहे. हा वापर वस्तूसारखा मोठ्या प्रमाणात होतोय. ज्या वस्तू नसतात, त्या गिन्हाईक होतात. ही दोन्ही रूपं भारतीय संस्कृतीशी निगडित आहेत. या संस्कृतीनुसार, स्त्री ही अबला आहे आणि दुर्गाही आहे. पण ते सोयीनुसार ठरतं. या परंपरेनुसारच प्रतिभाताई 'राष्ट्रपती' झाल्या आहेत. अनेकदा वास्तवाची दाहकता इतकी असते की, त्याने माणसाची विचारशक्तीच आंधळी-बहिरी होऊन जाते. रामायण-महाभारत काल्पनिक असलं तरी त्यात शिकण्यासारखं खूप आहे. उत्तर रामचरितमध्ये भवभूतीने वशिष्ठांची पत्नी अरुंधती हिच्या तोंडी शब्द टाकले आहेत. ते सत्याचा अस्सल आग्रह धरणारे आहेत. रामाने सीतेचा त्याग केला, तेव्हा अरुंधती म्हणते, 'मी सीतेशिवाय अयोध्येत पाय ठेवणार नाही.' सीता आणि अरुंधती ही कथेतील पात्रं. पण अरुंधतीला सीतेचं दुःख वेगळं वाटत नाही. धर्माच्या काँट्रॅक्टरनी, परंपरेच्या बिल्डरांनी आणि त्यांच्यासाठी दगड-विटांचं मुर्दाड आयुष्य जगणाऱ्या धर्म-परंपरावाद्यांना थोडी जरी माणुसकी असेल, तर स्वतःला विचारायला हवं, 'सीता, दौपद्री आणि सावित्रीचं वैवाहिक जीवन संपूर्णपणे दुःखमुक्त असतं, तर त्यांना सतीचा मान प्राप्त झाला असता का?' नाही! दुःखी होणं ही सती होण्याची अट आहे. आजचं युग हे सतीचं नाही, तर सखीचं आहे. आजची सीता ही प्रीतमची सखी आहे, पाटर्नर आहे, कन्सल्टंट आहे, काऊन्सेलर आहे आणि गर्लफ्रेंडही आहे. ती पतीची आज्ञापालक, सेविका वा दासी नाही. पतीबरोबरची मैत्रीच ही तिच्या प्रामाणिकपणाची साक्ष आहे. तिला कुणी बॉस नाही आणि कुणासाठी अग्निदिव्य करायलाही ती बांधील नाही. अशी सीता आजच्या काळाला वंदनीय आहे. धर्म-संस्कृतीवादी ज्याला कलियुग म्हणतात, ते खरं तर मैत्रीयुग आहे. या युगातच जगाचं विश्वदर्शन झालं. विज्ञानाचा विकास झाला आणि माणसाचं दुःख-वेदना एकेक करीत दूर झालं. या युगाचा आनंद लुटायचा तर सती आऊट आणि सखी इन झाली पाहिजे. हे धर्माचे टिळे लावून, बुरखे घालून अथवा नवरेपणाची आणि पक्ष-नेतृत्व निष्ठेची उजळणी करून होणार नाही. त्यातून फक्त दहशतच निर्माण होते, असा इतिहास आहे. वर्तमानही त्यापेक्षा वेगळा नाही. या दहशतीचा त्रास भारतात दलितांप्रमाणेच स्त्रियांही शतकानुशतकं सोसत आहेत. तो संपवण्याची प्रक्रिया महात्मा फुले आणि लोकहितवादी देशमुख यांच्या प्रयत्नांपासून गेली दीडशे वर्ष महाराष्ट्रात सुरू आहे. त्यासाठी अनेक सुधारकांनी आपलं आयुष्य झिजवलं आहे. तथापि, देश स्वतंत्र होऊन ६० वर्ष उलटली, तरी दलित वस्त्यांवर हल्ले होतात. स्त्रीची नग्न धिंड काढली जाते. आई-बहिणीवरून शिवी देऊन राग व्यक्त केला जातो. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात स्त्रियांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक टाळणारं अंधश्रद्धाविरोधी विधेयक तब्बल वीस वर्षं मंजूर होत नाही. आमदार-खासदाराच्या निवडणुकीत ३३ टक्के आरक्षणाचं वारं शिरू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. जय माता! आदि माता! गोमाता! हिंदमाता! असा घोष जोरात असतानाही शंकराचार्याच्या पदी महिला बसू शकत नाही. कामावरून आलेल्या सुनेला पाण्याचा ग्लास देणारी सासू तुरळक का होईना, आता पाहायला मिळतात. तसे सासरे पाहायचे दिवस अजून कल्पनेतच गटांगळ्या खाताहेत. स्त्रियांनी अनेक अडथळे पार करीत कर्तृत्वाची अनेक शिखरं गाठलीत. त्यापुढे समाजही नतमस्तक झालाय. तरीही स्वियांचे प्रश्न आणि त्यांच्यावर परंपरेने होणारे अन्याय-अत्याचार कायम आहेत. त्याला चाप बसावा, यासाठी केंद्र सरकारने विशेष कायदाही केलाय. मुली नाकारणाऱ्या 'स्त्रीभ्रूणहत्ये' विरोधात मोठ्या प्रयत्नात जनजागृती सुरू आहे. हे सारे प्रयत्न स्त्रीचा माणूस म्हणून स्वीकार करण्यासाठी आहेत. त्याचा एकदा स्वीकार केला की, प्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाचं वेगळंपण उरत नाही आणि सलतही नाही.
No comments:
Post a Comment