Saturday, 13 September 2025

पुण्याच्या खाद्य संस्कृतीचा दीपस्तंभ..!

'पूना गेस्ट हाऊस' चा वर्धापन दिन. 
पुण्यनगरीचं भूषण आणि पुण्याची शान म्हणून ज्या काही पूर्वापार अन् प्रदीर्घ काळ चालत आलेल्या अनेक गोष्टी पुण्यात आहेत, त्यात वैभवशाली लक्ष्मी रोडवर असलेल्या 'पूना गेस्ट हाऊस'चा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाणं या इतिहासाला कधीच शक्य होऊ शकणार नाही. तो एक मानदंड ठरलाय. 
'पूना गेस्ट हाऊस' हे पुण्यात येणाऱ्या पथिकांच्या मध्यवर्ती निवासाची वर्षानुवर्ष अतिशय चोख आणि दक्ष अशी व्यवस्था निगुतीने पार पाडणारं ठिकाण आहे, पाहुण्या पुणेकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचं असं एक विश्रांतीस्थान, निवासस्थान ठरलेलंय! त्याचवेळी क्षुधाशांतीची घरच्यासारखी सोय पाहणारं एक महत्त्वाचं ठिकाण आहे! आज अनंत चतुर्दशीला प्रतिष्ठित 'पूना गेस्ट हाऊस'  आपल्या वयाची ९० वर्षे पूर्ण करत आहे..!! ती नुसतीच नऊ दशकं पुरी करत नाहीयेत तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, सेवाभावी, नम्र वाटचालीच्या यशाची कमान चढती ठेवत मार्गस्थ होताहेत. 
चित्रपट सृष्टीतले कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांना राहण्यासाठी आणि आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून 'पूना गेस्ट हाऊस'ची स्थापना आद्य मूकपट निर्माते नरहर तथा नानासाहेब सरपोतदार यांनी १९३५ मध्ये केली. त्यांचा आर्यन फिल्म स्टुडिओ हा पेशवे पार्क शेजारच्या जागेत होता. त्याकाळी पुण्यामध्ये प्रभात फिल्म स्टुडिओ, दादासाहेब तोरणे यांचा स्टुडिओ आणि आणखी दोन असे स्टुडिओ होते. इथं चालणाऱ्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी येणारे कलाकार, साहित्यिक, गायक, वादक, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते, लेखक हे सारे नानासाहेबांच्या प्रेमामुळं 'पूना गेस्ट हाऊस' मध्ये राहात असत. त्याकाळी बाजीराव चिवडा, मस्तानी मिसळ असे पेशवाईचा प्रभाव असणारे पदार्थ ते इथं विकत असत. ही त्या काळातली 'पूना गेस्ट हाऊस' ची खासियत होती. 'घरट्यात आपल्या पिल्लांना खाऊ भरवणारी चिमणी...!' हे 'पूना गेस्ट हाऊस' चे बोधचिन्ह साक्षात गदिमा आणि आचार्य अत्रे यांच्या कल्पनेतून साकारलेलं आहे. त्या काळापासून इथं साहित्यिक, कलाकारांचा राबता कायम आहे. इथल्या कांद्याची कुरकुरीत भजी खाल्ल्यानंतर आचार्य अत्रे यांनी 'खेकडा भजी' असा त्यांचा उल्लेख केला होता आणि तेव्हापासून तो शब्द आणि पदार्थही प्रचलित झालाय. बालगंधर्व, लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व या दिग्गजांच्या वास्तव्यासोबतच मैफली या वास्तुत बहरत असत. आजही तो प्रघात किशोर सरपोतदार यांनी सुरू ठेवलाय. शिवाय नुकतंच पुण्यातल्या प्रतिथयश उद्योजकांना इथं दर सोमवारी बोलावून त्यांच्या उद्योगाची वाटचाल नव्या पिढीला देत त्यांच्यात उद्योग व्यवसाय करण्याची प्रेरणा किशोर - अभय हे देत असतात. 
जुन्या पिढीतले  सूर्यकांत मांडरे, चंद्रकांत मांढरे, वसंत शिंदे, जयश्री गडकर, मास्टर धुमाळ, मास्टर विनायक, मास्टर विठ्ठल, वसंतराव पहिलवान, प्रभाकर पणशीकर, दादा कोंडके, रमेश आणि सीमा देव, भालजी पेंढारकर, ललिता पवार, जयश्री गडकर, काशिनाथ घाणेकर, सुलोचना दीदी, अशोक सराफ, राम कदम अशा मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज नामवंत कलाकार नियमितपणे इथं वास्तव्य करत असत. काळ बदलला तरी काही मराठमोळे कलाकार आवर्जून इथं मुक्कामाला, भोजनाला येतात. ख्यातनाम नाटककार बाळ कोल्हटकर यांनी तर त्यांची सर्व नाटकं 'पूना गेस्ट हाऊस' च्या चार नंबरच्या रूममध्ये बसून लिहिली आहेत असं त्यांनीच नमूद केलंय. शिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतले मोहम्मद रफी, देव आनंद, बिमल रॉय अशी कितीतरी दिग्गज नावं सांगता येतील की, ज्यांचं 'पूना गेस्ट हाऊस' शी खूप जिव्हाळ्याचं नातं ऋणानुबंध होते. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली ती 'पूना गेस्ट हाऊस' मधूनच. टिळकांचे नातू आणि दैनिक केसरीचे संपादक ग. वि. केतकर हे त्यांच्या शेवटच्या काळात इथंच राहायला होते. प्रख्यात विनोदी अभिनेता मधू आपटे यांचं शेवटच्या चार वर्षांचं वास्तव्य इथंच होतं. अभिनेते काशिनाथ घाणेकर यांनीदेखील करिअरच्या सुरुवातीची काही वर्षे आणि आयुष्यातली शेवटची साडेचार वर्षे 'पूना गेस्ट हाऊस' मध्येच आपला मुक्काम केला होता. निराधार, एकाकी, निष्कांचन कलावंतासाठी तर चारूकाका सरपोतदार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असत. जुने संगीत रंगभूमीचे गायक नट श्रीपाद जोशी, मधू आपटे यांनी तर अखेरचा श्वास 'पूना गेस्ट हाऊस' मध्ये घेतलाय, तो चारू काका सरपोतदार यांच्या सहृदयतेमुळंच. 
सरपोतदार कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीनं  'पूना गेस्ट हाऊस'ची ध्वजा दिल्लीत नेऊन रोवली होती. संसदेचं कॅन्टीन देखील त्यांच्याकडं होतं. त्यांच्याकडं असलेला कमालीचा जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि कलावंतांशी असणारे ऋणानुबंध पिढ्यानपिढ्या जपणाऱ्या 'पूना गेस्ट हाऊस' ची किशोर, अभय, साधना, शर्मिला, सनत, शौनक ही सरपोतदार कुटुंबाची पुढची पिढी मोठ्या उत्साहात आपल्या कुटुंबाचा वारसा पुढं नेत आहेत. शिवाय व्यवसायात आधुनिकता आणण्याचाही प्रयत्न करत असतात. १९३५ मध्ये पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर सुरू झालेला 'पूना गेस्ट हाऊस' चा प्रवास सरपोतदारांच्या चौथ्या पिढीनं सेनापती बापट रस्त्यावरच्या पॅव्हिलियन मॉलमध्ये, तसंच विकसित बाणेर मधल्या हाय स्ट्रीटवर यशस्वीपणे नेऊन ठेवलाय. त्याशिवाय खडकवासला कुडजे गावातल्या झपूर्जा संग्रहालय इथंही आपला ठसा उमटवलाय. 
--------------------------------------------------
सरपोतदार कुटुंबातल्या चौथ्या पिढीनं सनत किशोर सरपोतदार आणि त्यांची पत्नी आदितीनं नव्या युगात प्रवेश केलाय. 'पूना गेस्ट हाऊस' मध्ये लोकप्रिय ठरलेली रुचकर आणि स्वादिष्ट "मिसळ, पातळ अळूची भाजी, मटार उसळ आणि मसाले भात...!" याला देशविदेशातून मागणी असल्यानं 'रेडी टू इट' पाकीटं तयार केली आहेत. त्याचा शुभारंभ आज अनंत चतुर्दशी आणि ९० व्या वर्धापन दिनी करण्यात आलाय. त्याचे डिझाईन आणि पॅकेजिंग माझ्या मुलानं मृणाल यानं आमच्या 'फायर फ्लाय क्रिएटिव्ह सोल्युशन' या जाहिरात संस्थेनं तयार केलंय. याचा आम्हाला अभिमान वाटतो. ही संधी सरपोतदार कुटुंबानं आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
---------------------------------------------
सरपोतदार आणि  'पूना गेस्ट हाऊस' ला मनापासून धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा...! 

No comments:

Post a Comment

तरुणांचा 'आऊट क्राय' अन् सत्तांतर...!

"शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देणारं 'नेबरहूड फर्स्ट’ धोरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेजारी राष्ट्रात राजकी...