Saturday, 13 September 2025

भटांनी सार्वजनिक केलेले पेशव्यांचे दैवत

"भारत आणि भारताबाहेरही ज्या गणरायाच्या गजमुख मूर्ती सापडतात आणि त्यांची मोठ्या भक्तिभावानं पूजा केली जाते, त्या गजमुख गणपतीची मूर्ती पहिल्यांदा आढळते ती गुप्तकाळात म्हणजे इ. स. ४५० ते ५०० या काळात. गणेशोत्सवात तसंच दैनंदिन पूजा-पाठात ज्या गणेशाची आपण सर्व मोठ्या भक्तिभावनं पूजा-अर्चा आणि आरती करत असतो, तो गणराज गजानन केवळ दिड हजार वर्षांपेक्षा जुना नाही असं म्हटलं, तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल!" 
---------------------------------------------
वेदपूर्वकाळापासून भारतात तंत्रमार्ग अस्तित्वात होता; पण वैदिकांनी त्याला उशिरा मान्यता दिली. मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासात या मार्गानं मोलाचं योगदान दिलंय; पण त्यातल्या पंच'म'कार साधना विकृतीकडे वळल्यामुळं या मार्गाचा पुढं सुधारकांनी निषेध केला. मंत्रांमध्ये अलौकिक शक्ती असल्याची धारणा तंत्रमार्गानंच दृढ केली, तसंच यंत्रपूजा प्रतिष्ठित केली. तंत्रमार्गातले यंत्र हे योनीच्या आकाराचं असत. स्त्रियांची योनी ही तंत्रांनी आपल्या साधनेचं केंद्र मानलं होतं. त्यामुळं यंत्रांना योनीचा आकार मिळाला. पुढं वैदिकांनीही आपल्या यज्ञकुंडाचा आकार योनीसारखा केला. तंत्रसाधनेत स्त्रियांना महत्त्वाचं स्थान होतं. स्त्रियांना 'वामा' या शब्दानंही संबोधतात; म्हणून तंत्राला 'वामाचार साधना' असंही म्हणतात. तंत्रसाधना करणाऱ्या तांत्रिकाला 'वामाचारी' म्हणून पुढं हिणविलं गेलं. तंत्रसाधनेत मद्य, मांस, मैथुन, मत्स्य आणि मुद्रा या पाच 'म'कारांना महत्त्व होतं. पुढं त्याचा अतिरेक झाल्यावर संतांनी त्याच्या विरोधात आघाडी उभारली. तरीही शेती भरभरून येण्याकरिता तंत्रसाधना कमी-अधिक प्रमाणात सुरूच राहिल्या. त्यांचं स्वरूप कसं होतं, हे डॉ. स. रा. गाडगीळ यांनी सांगितलंय. ते स्त्रियांशी संबंधित का होतं, ते पहा - डॉ. गाडगीळ म्हणतात, 'कृषिविषयक मंत्र तंत्रात्मक विधी स्त्रीकडे येण्याचं कारण म्हणजे, स्त्री आणि भूमी यांमधलं साधर्म्य हे होय. दोन्हीही निर्मितिकेंद्रेच आहेत. स्त्री मानवाला जन्म देते. विश्वाला जन्म देणाऱ्या आदिमातेचीच ही दोन्ही रूपं आहेत. संस्कृतीच्या सर्व थरांवर स्त्री आणि भूमी यांचं साम्य माणसानं कल्पिलेलं आढळतं. भूमीच्या सुफलीकरणासाठी स्त्रीची योजना केली जाते. तिच्या ठिकाणी पृथ्वीप्रमाणेच नवनिर्मितीचे काही विलक्षण यात्वात्मक सामर्थ्य असलं पाहिजे. निसर्गशक्तींना वश करण्यासाठी मानवानं जी कृती केली, त्याला 'यातुविधी' असं म्हणतात. हे सामर्थ्य मंत्रात्मक विधींनी वाढविता येतं. एवढंच नव्हे, तर या सामर्थ्याचा उपयोग करून भूमीची प्रसवक्षमताही वाढविता येते. ज्या स्त्रीला विपुल संतती आहे, तिच्या हस्ते भूमीचा सुफलीकरणविधी करावा, असा संकेत आहे. याउलट, निपुत्रिक स्त्रीच्या हातून बीजारोपण अगर वृक्षारोपण करू नये, अशीही समजूत आहे.

आपल्या शेतीत भरघोस पीक येण्याकरता, म्हणजेच सुफलीकरणाकरता शेतमालकानं सपत्निक शेतात जाऊन मैथुन करण्याची चाल अनेक देशांमध्ये अजूनही आहे. त्याविषयी डॉ. गाडगीळ म्हणतात, 'नागा लोकांमध्ये सुगीच्या आणि पेरणीच्या दिवसांत मुक्त समागमाची आवश्यकता आहे, असं मानतात. मद्यपान आणि मुक्त-स्वैर-मैथुन यांना या दिवसांत भर येतो. युरोपमध्ये वनस्पतींची चांगली वाढ व्हावी यासाठी पुरुष आणि स्त्री वृक्षदेवतांचे विवाह लावून देतात आणि हे विवाह सफल व्हावेत म्हणून स्त्री-पुरुषांचा विधियुक्त संयोग घडवून आणतात. मध्य अमेरिकेत पेरणीच्या वेळी मैथुनविधी आवश्यक मानला जातो. पिकांच्या समृद्धीसाठी शेतकरी आपल्या स्त्रियांसह रात्री शेतावर जातो आणि धार्मिक श्रद्धेनं मैथुनविधी आचरतो. पेरणी करणाऱ्या तरुण जोडप्यांनी शेतात जमिनीवर पडावं आणि पेरलेल्या बियाणांवरून लोळावं, अशी चाल युक्रेनमध्ये आहे. जर्मनीतही अशी चाल आहे. मूळ मैथुनविधीचे हे अवशेष असावेत. पेरू या देशातले पुढील आचार तर शाक्तांच्या तंत्रोपासनेप्रमाणेच आहे.

ऑस्ट्रेलियातल्या वन्य जमातींची एक समजूत अशी आहे की, पृथ्वी (भूमाता) हे स्त्रीत्व आणि सूर्य हे पुरुषत्व; यांचा संयोग वर्षातून विशिष्ट दिवशी एकदाच घडतो. या संयोगानंतर भूमाता सुफलित होते. याप्रसंगी स्त्री-पुरुषांच्या सामूहिक मैथुनविधीला महत्त्व असतं. वैश्विक कामभावनांशी सहभाव साधण्यासाठी मानवी कामसाधनेची आवश्यकता असते, अशी ही श्रद्धा आहे. सूर्यदेव आणि भूमी यांच्या समागमप्रसंगी या स्त्री-पुरुष तत्त्वांचे मानवी देहधारी प्रतिनिधी म्हणजे स्त्री आणि पुरुष यांनी विधियुक्त समागम करावा, असा हा संकेत आहे. ब्रिटिश उत्तर बोर्निओत हा विधी पंधरा मिनिटे सामूहिकरीत्या चालतो. त्यानंतर पुन्हा सामाजिक-नैतिक बंधनं कडकपणे पाळावी लागतात. म्हणजे, सामूहिक समागम ही जणू सामूहिक प्रार्थनाच! मलायामध्ये भाताच्या हंगामात स्त्रियांची अदलाबदल करून हा विधी साजरा केला जातो.

या सर्व उदाहरणांवरून जमिनीच्या सुफलीकरणाकरता करावयाचे विधी जगभर कमी-अधिक प्रमाणात सारखेच आहेत, हे दिसून येतं. तंत्रसाधना साऱ्या धर्माच्या प्राथमिक अवस्थेत प्रचलित होती, या वास्तवाचाही शोध यातून लागतो. भारतात शिव वा शक्तीला, तसेच गणपतीला मानणाऱ्या अनुयायांनी जी मंदिरं निर्माण केली, त्यांवर जी मैथुनशिल्पे आढळतात, त्यामागं या तंत्रसाधनांची प्रेरणा आहे. पुढं वैष्णव, जैन, बौद्ध इ. संप्रदायांच्या अनुयायांनीही या 'तंत्र' साधनांचा स्वीकार केला. उत्तर पेशवाईत जे 'गणयाग' चालत त्यातला 'घटकंचुकींचा' खेळ या साधनांचा अलीकडचा पुरावा होय. पुण्यात पेशवाईत काहींची घटकंचुकी चालत असे. काही निवडक स्त्री-पुरुष रंगमहालात जमून स्त्रियांच्या चोळ्या एका घटात घालत. ज्या पुरुषाला ज्या स्त्रीची चोळी सापडे तिच्याशी तो सर्वांदेखत कामक्रीडा करत असे. या खेळाला घटकंचुकी म्हणत. ही घटकंचुकी कर्नाटकातही पाचपन्नास वर्षांपूर्वी प्रघातात होती. अशी नोंद इतिहासाचार्य राजवाडे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनीही करुन ठेवलीय. 

या तंत्रसाधना दक्षिणेत अधिक बहरल्या. श्रीशैल हे शाक्त संप्रदायाचे मोठं केंद्र या साधनांसाठी प्रसिद्ध होते. सुफलीकरणासाठी आवश्यक वाटणाऱ्या या तंत्रसाधनांचे रूपांतर पुढे लैंगिक विकृतीत झाले. त्यातील बीभत्सपणा सामाजिक संतुलन घालविण्यास कारणीभूत ठरला. म्हणून त्यांच्या विरोधात महानुभाव आणि वारकरी संप्रदाय जन्माला आले. लीळाचरित्र, नामदेवांचे अभंग, तसंच तुकोबांची गाथा यांतून तंत्रसाधनांचा निषेध स्पष्टपणे उमटलाय. एकनाथांनीही त्यावर ताशेरे ओढलेत. हे सारं मात्र भूमातेच्या आराधनेतून होत होतं, हे आज कुणालाही खरं वाटणार नाही.

गणेश किंवा गणपती या देवतेची वेदांमध्ये माहिती आढळत नाही. परंतु कालांतरानं हे एक आराध्य दैवत बनले. इ.स. ५ व्या शतकाच्या थोडसं आधी गणेशपूजन करण्याची सुरुवात झाली असावी. भाद्रपद चतुर्थी हा गणेशपूजनाचा एक महत्त्वाचा दिवस असल्याबद्दलची माहिती प्राचीन धर्मग्रंथां - मध्ये मिळते. महाराष्ट्रामध्ये पेशव्यांच्या राजवटीपासून गणेश या दैवतास विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले. पेशव्यांच्या काळात गणपतीला एक आराध्य दैवत म्हणून आणि उत्सवाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त का झालं याचं स्पष्टीकरण देता येतं. कारवार, गोवा, कोकण या पश्चिम भारताच्या समुद्रकिनारपट्टीवरील प्रदेशांमध्ये गणपतीला पेशव्यांच्या आधीपासूनच प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. प्राचीन काळातली परशुरामाची कथा या परिसराशी निगडीत आहे. परंपरेनुसार परशुराम हा शिवभक्त होता. गणपतीचा शिवाशी किती जवळचा संबंध आहे हे तर सर्वश्रुत आहे. चित्पावन ब्राह्मणांच्या उत्पत्तीचा परशुरामाशी संबंध जोडला गेलाय. याचा अर्थ असा निघतो की, शिवाच्या उपासनेमधून हळू हळू चित्पावनांनी गणपतीला आराध्य दैवत म्हणून मानण्याचे ठरविलं असावं.

पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट हा श्रीवर्धनचा. चिपळूण हे बंदर १७ व्या शतकामध्ये जंजिरा इथल्या सिद्दिच्या ताब्यात होतं. त्यांच्या वतीनं मीठबंदराचा हवाला १७ व्या शतकाच्या शेवटी बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे होता. याच सुमारास चिपळूणमध्ये ब्रह्मेंद्रस्वामी नावाचे गुरू होते. आपल्या अगाध ज्ञानामुळं आणि पवित्र आचार-विचारांमुळं त्यांना पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रदेशात लौकिक मिळाला होता. बाळाजी विश्वनाथही हळूहळू कालांतरानं ब्रह्मेद्रस्वामींचा भक्त बनला. असंच एकदा बाळाजी त्यांच्या भेटीला आला असताना स्वामींनी त्याला 'श्रीगजानन आणि भार्गव तुला महत्पद देईल' असा आशीर्वाद दिला. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच बदल झाले. संभाजी पुत्र शाहू इ. स. १७०७ मध्ये सातारात आल्यापासून तर थेट इ.स. १७१३ मध्ये पेशवेपद मिळेपर्यंत बाळाजी विश्वनाथची राजकीय प्रतिष्ठा अधिकाधिक वाढत गेली. स्वामींच्या म्हणण्यानुसार हा जणू गजाननाचा बाळाजीला लाभलेला कृपाप्रसादच होता!

अशारितीनं गणेशाला पेशव्यांच्या देव्हाऱ्यात कुलदैवत म्हणून स्थान मिळालं. स्वतः ब्रह्मेन्द्रस्वामींचं मुख्य दैवत गणपती होते. ते गणपतीची उपासना परंपरागत पद्धतीनुसार करत. याशिवाय भाद्रपद महिन्यात ते गणेश चतुर्थीला गणपती उत्सव साजरा करत असत. अशारितीनं किनारपट्टी- जवळच्या प्रदेशात गणपतीचा उत्सव प्रचलित झाला. पेशव्यांच्या काळात सुरू झालेल्या गणपती उत्सवाचं मूळ यामध्ये दिसतं. पुढं इ.स. १७२८ मध्ये ब्रह्मेंद्रस्वामींनी आपलं बस्तान कोकणातून साताऱ्याजवळच्या धावडशी इथं हलवलं. तेव्हापासून साताऱ्यातही गणेशोत्सव सुरू झाला.

पहिल्या बाजीराव पेशव्याच्या वेळेपासून मराठ्यांचा राजकीय विस्तार उत्तरेकडे होऊ लागला. इ.स. १७२७-२८ मध्ये त्यानं माळवा, बुंदेलखंडची मोहीम आखली होती. आता पेशव्यांपुढं जास्त आव्हानं होती. ती पेलताना त्यांना मनोधैर्य मिळविण्यासाठी गणपती या विघ्नहर्त्याची भावनिकदृष्ट्या जास्त गरज होती. यानंतरचा पेशवा नानासाहेब याच्या काळात तर मराठ्यांचा मुघल दरबारच्या राजकारणात प्रवेश झाला. इ. स. १७५२ च्या तहामार्फत पेशव्याला फक्त आग्रा आणि अजमेर इथल्या सुभेदाऱ्याच मिळाल्या नाहीत तर राजनैतिक महत्त्वही मिळालं. ही एवढी मोठी झेप घेताना त्यांना भक्कम भावनिक आधार हवा असणार हे नक्की. आपली विघ्ने गणपती टाळेल असा विश्वास पेशवे घराण्यात आणखी आणखी रुजत गेला असावा. किंबहुना म्हणूनच नानासाहेबानं गणपतीला आणखी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यानंच गणेशोत्सव सुरू केला. शनिवारवाड्यामध्ये नानासाहेबानं गणेश रंगमहाल बांधला. या महालाच्या एका भिंतीत एक मखर तयार करवून त्यानं त्यामध्ये संगमरवरी दगडाची एक भव्य गणेशमूर्ती कायम स्वरूपात प्रतिष्ठापित करवून घेतली होती. शनिवारवाड्याला जी प्रमुख पाच प्रवेशद्वारं होती त्यांपैकी एक प्रवेशद्वार गणेश दरवाजा या नावाचं होतं. नानासाहेबांच्या काळापासून गणेशोत्सव या गणेशमहालातच साजरा होत असे. माधवराव पेशव्यांचीही गणपतीवर असीम श्रद्धा होती. त्यानं नीलमण्यांची गणेशाची मूर्ती मुद्दाम करवून घेतली होती. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने हळूहळू महाराष्ट्रातील अष्टविनायक प्रसिद्धीस येऊ लागले ही गोष्ट नमूद करण्याजोगी आहे. कदाचित ही स्थानिक देवळे छोटी देवळे या स्वरुपात असतीलही, महड, पाली, मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, रांजणगाव, लेण्याद्री आणि ओझर या अष्टविनायकांचे एक मंडलच जणू पुण्याभोवती निर्माण झाले. 

पेशव्यांच्या काळात हा उत्सव दहा दिवस चाले. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत तो साजरा होत असे.  या वेळी गणपतीची एक मूर्ती विकत आणली जाई. ज्या ठिकाणी ही मूर्ती ठेवली जाई तेथे दिवे, आरसे, चित्रकलेचे नमुने इत्यादी लावून आरास केली जाई, कधी कधी काही चोपदारही या दृश्यात रंग भरण्यासाठी उभे राहत. दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात कीर्तन, लळीत, संगीतविषयक कार्यक्रम वगैरे केले जात. या प्रसंगी गोसावी, हरदास, गवई कलावंतिणी इत्यादींना बोलावले जाई. हा उत्सक नेमके कोणते दहा दिवस साजरा होत असे त्याबद्दलची नोंद अशी - श्रीगणपती उत्सव खर्च : भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा उत्साह प्रतिपदेपासून दशमीपर्यंत दहा दिवस झाला त्याची बिदागी देणे गोसावी व गवई व कलावंतिणी वगैरे गुणीजनयांस, बाबत वाटणी, रसानगी यास...' नानासाहेब पेशव्याच्या काळापासून उत्तरोत्तर हा सण आणखी थाटामाटाने साजरा होत गेला. ही बाब उत्सवातील खर्चाच्या नोंदीवरून समजू शकते. नानासाहेब पेशव्याच्या काळात जो गणपती-उत्सव झाला त्यासाठी २६८२ रुपये इतका खर्च झाला. सवाई माधवराव पेशवा असताना इ.स. १७९४- ९५ मध्ये साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवातील कलाकारांना ४३५८ रुपये इतकी बिदागी पेशव्यांकडून मिळाली. या कलाकारांमध्ये १८१ गोसावी हरदास, ३४ गायक आणि ४३ कलावंतिणी यांचा समावेश होता. याखेरीज गुरव पखवाजीही होते. सवाई माधवरावाच्या काळात शनिवारवाड्यामध्ये एक खास गणेश रंगमहाल बांधला होता असेही दिसते. 

पेशवाईच्या काळात सण-समारंभांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. समारंभांचा एक अविभाज्य भाग म्हणजे नृत्याचे आयोजन. पेशव्यांचे महत्त्वाचे दैवत म्हणजे गणपती. त्यामुळे गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाई. हा उत्सव दहा दिवस चाले. इ.स. १७९१ मध्ये कॅप्टन मूर या पुणे येथील ब्रिटिश रेसिडेंटने असे नमूद केले आहे की, शनिवारवाड्यातील गणेश रंगमहालात त्याला आमंत्रित केले असता त्याने शंभर नायकिणींचे नृत्य पाहिले. गेल्या दीड हजार वर्षांपूर्वी दैवतरूपात पूजनीय ठरलेल्या गजमुख गणपतीचे माहात्म्य वर्णन करणारी गणेशपुराण व मुद्गलपुराण अशी दोन स्वतंत्र उप-पुराणे महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी रचली आहेत, असे संशोधकांचे मत आहे. या पुराणांमध्ये वर्णिल्यानुसार, विघ्नहरण करणाऱ्या गणपतीची उपासना वाढू लागल्यावर इ. स. पाचवे ते नववे शतक यादरम्यान 'गाणपत्य संप्रदाय' उदयास आला व प्रस्थापित झाला. पुढे तंत्रमार्गी लोकांनीही गणपतीला पूजास्थानी मानले. तंत्र म्हणजे तनाशी, अर्थात शरीराशी आणि शेतीशी संबंधित. तांत्रिक हे वामाचारी होते, असे उल्लेख प्राचीन वाङ्गयात सापडतात. वामा म्हणजे स्त्री. वामाचारी म्हणजे स्त्रीसंबंधाला व विशेषतः स्वैरसंबंधाला प्राधान्य देणारे. तांत्रिक मार्गात मद्यपान, स्वैरमैथुन इत्यादी आचारांना पूजेचे अंग मानले आहे. पेशवाईच्या अखेरीस उच्चपदास पोहोचलेल्या काही ब्राह्मण जहागीरदार व सरदारांमध्ये घटकंचुकीसारखे वाममार्गी 'गणेशतंत्र' चालत असे, हे पेशवाईच्या इतिहासावरून दिसते. पेशव्यांचे दैवत गणपती होते, त्यामुळे पुण्याच्या आसपास असलेल्या गावांमधील गणपती मंदिरांची अष्टविनायकांमध्ये गणना झाली.

आज आपल्या प्राचीन लोकशाही गणराज्यातील गणांचा अधिपती असलेला गणपती गणेश नवनव्या रूपात जागोजागी आढळतो. त्याच्याशी थट्टा केली, तरी तो काही कोपत नाही, अशी सर्वांचीच समजूत असल्यामुळे त्याला कधीकधी गमतीचा विषयही बनविले जाते. अशीच एक गंमत २१ सप्टेंबर १९९५ रोजी देशभर व देशाबाहेरही केली गेली. गणपतीला दूध पाजण्याचा उपक्रम योजनाबद्ध रीतीने पार पाडला गेला. एस.टी.डी., पी.सी.ओ. टेलिफोन केंद्रांचा वापर, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी माध्यमेही या कामी सर्रासपणे वापरली गेली. गेली दीड हजार वर्षे ज्या गणपतीला दुर्वा व मोदकांवर समाधान मानावे लागले, त्या बिचाऱ्याला नव्याने दूध या स्निग्ध पदार्थाची चव जबरदस्तीने दिली गेली. या घटनेचा फायदा तथाकथित तांत्रिक चंद्रास्वामी याने घेऊन या साऱ्या दैवी चमत्कारामागे आपलाच हात असल्याची थाप मस्तपैकी ठोकून दिली. खरे तर हा प्रकार म्हणजे आपल्या फुले-शाहू-आंबेडकर या महापुरूषांनी गेल्या शे पाऊणशे वर्षांत शिक्षणाची गंगा ब्राह्मणेतर बहुजनांच्या दारात नेली होती त्यावर उगवलेला सुड होता. त्या विद्येच्या गंगेत न्हाऊन एकंदरीत बहुजनांच्या मेंदुत काही प्रकाश पडला की नाही याची ती एकप्रकारे चाचपणीच होती. परंतु इतक्या सोयीसुविधा, शैक्षणिक हक्क व मुलभूत अधिकार प्राप्त करुनही बहुजन वर्गाने या चाचपणीत सपशेल नापास होवून आपल्या अक्कलेचे दिवाळे गणपतीला दूध पाजून दाखवून दिले. 

बहुजन समाजातील अज्ञानाचा अंधःकार दुर व्हावा व त्यांनी विज्ञानाची कास धरावी यासाठी राजर्षी शाहू महाराज छ्त्रपतींनी सर्वांसाठी शिक्षण मोफत आणि सक्तिचे करण्याचा आदेश २१ सप्टेंबर १९१७ रोजी काढला होता परंतु मनोहर जोशी हा भटजी मुख्यमंत्री झाल्यानंतर १९९५ साली बरोबर २१ सप्टेंबर या दिवशीच त्या भटजीने माझ्या घरातला गणपती दूध पितो अशी अफवा उडवून दिली. या अफवेमुळे आपण मुर्ख बनवले जातोय याची पर्वा न करता चौकाचौकात मंडप घालून, ध्वनिक्षेपक लावून पुजा, आरत्या करण्याच्या स्पर्धा सुरु झाल्या. या सर्व प्रकारातून असे दिसुन आले की बहुजन वर्ग कितीही उच्चशिक्षित झाला तरी त्याने आपला मेंदू भटपुरोहितांच्या जानव्यात गुंडाळून त्यांच्या चरणांवर अर्पण केला आहे. अशाप्रकारे दिसुन येते की, पाचव्या शतकात उदयाला आलेला हा गणपती प्रथम तंत्रसाधना करणारांकडून, नंतर वैदिकांकडून व त्या पुढच्या काळात पेशव्यांचे आराध्य दैवत बनून प्रसिद्धी पावला. कोकणात व पेशव्यांच्या शनिवारवाड्यात मर्यादित असलेला हा गणपती स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजामुळे दुरावलेल्या हिंदूंना ब्राह्मणी वैदिक धर्माकडे वळवण्यासाठी व हिंदू-मुस्लिम एकी तोडून हिंदूंना मुस्लिमांविरोधात एकवटून, हिंदुंच्या नेतृत्वाच्या नाड्या भटपुरोहितांच्या हातात येण्यासाठी ब्रह्ममान्य टिळकांनी त्याचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून अधिक प्रमाणात सुनियोजितपणे प्रसार करुन अधिक मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचला. वैचारिक व राजकीय प्रचाराचे  सांस्कृतिक साधन म्हणून गणेशोत्सवाचा वापर त्या वेळी झाला. तर असा हा गजमुख गणपती स्वातंत्र्योत्तर काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचे व्यापक रुप घेऊन आता चौकाचौकांत व घराघरात विराजमान झाला आहे... 
(संदर्भ : हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र - पां. वा. काणे, 
एन्सायक्लोपीडिया ऑफ धर्मशास्त्र - एस. एस. डांगे,
गणेश लॉर्ड ऑफ ऑब्स्टॅकल्स, लॉर्ड ऑफ बिगीनींग - पॉल कोर्टराईट, 
पूना इन दि बायगॉन डेज - डी. बी. पारसनीस, 
सिलेक्शन फ्रॉम सातारा राजाज ॲन्ड पेशवा डायरीज - ग. चि. वाड, 
पेशवे दप्तरातून निवडलेले कागद - गो. स. सरदेसाई, 
पेशवेकालीन महाराष्ट्र - वा. कृ. भावे, 
श्री ब्रह्मेन्द्रस्वामी धावडशीकर चरित्र व पत्रव्यवहार - द. बा. पारसनीस, 
पेशव्यांचे विलासी जीवन - डाॅ. वर्षा शिरगांवकर, 
गणपती देवता, दैवतांची सत्यकथा - डॉ. अशोक राणा) 
 

No comments:

Post a Comment

तरुणांचा 'आऊट क्राय' अन् सत्तांतर...!

"शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देणारं 'नेबरहूड फर्स्ट’ धोरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेजारी राष्ट्रात राजकी...