Saturday, 8 March 2025

हताश शिंदेंची नाराजी

"माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'अवस्था ना घरका ना घाट का' अशी झालीय. त्यांना सहनही होत नाही अन् सांगताही येत नाहीये. फडणवीस यांनी अनपेक्षितपणे २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपद हाती घेतलं त्यानंतर पक्षातले आपले स्पर्धक मुख्यमंत्रिपदाचे दावेदार त्यांनी संपवले. ज्यांची महत्वाकांक्षा वाढतेय असं दिसलं त्यांना गुडघ्यावर रांगायला लावलं. आता पक्षात त्यांना स्पर्धकच उरलेला नाही. अशावेळी मग सत्तासाथीदार मित्रपक्षातल्या स्पर्धकाला ते कसं चुचकारतील? त्यांचीही ते अशीच गत करणार! शिंदे यांनी गॉडफादर अमित शहांकडे फडणवीसांची कागाळी केली तरी फडणवीस बधले नाहीत. 'मी उद्धव ठाकरे नाही...!' असं म्हणतच ते शिंदे, त्यांचे मंत्री अन् त्यांच्या पक्षाची कोंडी करताहेत !"
.....................................................
राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीत कुरघोड्या सुरू आहेत. स्वबळावर सत्ता येण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी झाला नसला तरी केंद्राप्रमाणे घरात येऊन दारात थांबावं लागलंय. पण सत्तासाथीदार पक्षांना महत्व द्यावं अशीही स्थिती राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पक्षातले आपले स्पर्धक संपवलेत. आता मित्रपक्षातून आव्हान दिलं जातंय. अमित शहांचा वरदहस्त असल्यानं पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा एकनाथ शिंदेंची जागी झाली. फडणवीसांनी मग गृहमंत्रीपद पाठोपाठ गडचिरोलीचे पालकमंत्रीपदही शिंदेंना दिलं नाही.  त्यांनी घेतलेले निर्णय रोखले, काहींच्या चौकशा सुरू केल्या. नेमलेले अधिकारी बदलले. एकापाठोपाठ कोंडी करायला फडणवीस यांनी सुरुवात केली. शिंदेंनी मग अमित शहांचं दार ठोठावलं. पण तिथंही त्यांची डाळ शिजली नाही. मागील काही दिवसांपासून सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेत शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची कोंडी करण्याचा धडाकाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलाय. त्याचवेळी शिंदे यांनी 'दाढीला हलक्यात घेऊ नका...!' म्हणत नाव न घेता फडणवीस आणि भाजपला इशारा दिला. पण शिंदे यांना हादरवणारे निर्णय घेण्याचे सत्र सुरूच आहे. 
*कोंडीला बालेकिल्ला ठाण्यातूनच सुरुवात*
भाजपकडून शिंदेंची कोंडी करण्याची सुरूवात ठाण्यातूनच झाली. वनमंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पूर्वीपासूनच विळ्या भोपळ्याचे वैर. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यात नाईकांची सर्वत्र कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं दोघांत विस्तवही जात नाही. आता नाईक यांनी शिंदे यांना बालेकिल्ल्यातच आव्हान दिलंय. पालघरचे पालकमंत्री असतानाही त्यांनी ठाण्यातच जनता दरबार घ्यायला सुरूवात केलीय.आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावरून शिंदे यांना डावलण्यात आलं. शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू तीर्थदर्शन योजना, आनंदाचा शिधा, बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठीची योजना, मागेल त्याला सौरऊर्जा, दहा लाख घरं बांधण्याची योजना याला ब्रेक देण्याचे नियोजन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आखलंय. एसटी महामंडळाचा १ हजार ३१० बस खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे हा करार रद्द करण्यात आला. पाठोपाठ फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना डावलून परिवहन सचिवांची एसटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. आरोग्य खात्यातल्या औषध खरेदीची चौकशी सुरू केली. मुंबई महापालिकेने झोपडपट्टीतली साफसफाई आणि स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीतल्या बनावट रेरा प्रमाणपत्रांच्या घोटाळ्याप्रकरणी आता थेट ईडीने चौकशी सुरू केलीय. शिंदे यांच्या कार्यकाळातल्या जालनातल्या सिडकोचे काम, ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या निविदांची चौकशी केली जातेय. 'लाडकी बहीण' योजनेतून आतापर्यंत पाच लाख महिलांना वगळण्यात आलंय. त्यानंतर आता आणखी काही योजना गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे. वित्तीय तूट वाढल्याने काही घोषणांवरचा खर्च कमी करण्याचे फडणवीस आणि अजित पवार यांचं धोरण आहे. त्यानुसार या योजनांच्या निधीच्या तरतुदीत कपात करण्याचे संकेत वित्त विभागाच्या उच्चपदस्थांनी दिलेत.
*अमित शहांकडे फडणवीसांची कागाळी* 
गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुण्यात मुक्कामाला होते. तेव्हा एकनाथ शिंदे हे त्यांना भल्या पहाटे चार वाजता भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी शहांना 'आपली आणि आपल्या सहकाऱ्यांची कोंडी केली जातेय...!' अशी तक्रार केली. त्यावर शहांनी 'मी फडणवीस यांच्याशी बोलतो...!' असं म्हणत शिंदेचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिंदे यांनी शहांना 'विधानसभा निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढविली. त्यावेळी मला मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं होतं मग आता काय झालं...?' शहांनी समजावणीच्या सुरात सांगितलं की, 'आपण निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढविली न की, तुमच्या. त्यामुळं भाजपला १३२ जागा मिळाल्यात, आमची एवढी ताकद असताना तुम्हाला आम्ही कसं मुख्यमंत्री करणार? आम्हाला आमचा पक्ष चालवायचाय....! तुमचा पक्ष आम्हीच काढलाय, अजित पवारांचाही पक्ष देखील आम्हीच काढलाय. जर तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवं असल्यास, तुम्ही तुमचा पक्ष आमच्या भाजपत विलीन करा, त्यानंतर मग विचार करू...!' शहांच्या दणक्यानं शिंदेंनी तिथून काढता पाय घेतला. अशा आशयाची बातमी प्रसिद्ध होताच चर्चा सुरू झाली. शहांनी शिंदेंना पक्ष विलीन करण्याची ही ऑफर आहे की धमकी...? शिवसेना फोडून शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह शहांनीच बहाल केलं होतं. त्यांना तशी ऑफर करण्याचा अधिकार आहेच. दिल्लीतलं मोदी सरकारला स्पष्ट बहुमत नाहीये. नितीशकुमार, चंद्राबाबू, शिंदेसेना यांचा पाठिंबा मोदींना आहे. शिंदे आता बाहेर पडू शकत नाहीत. त्यांना मोदींबरोबरच राहावं लागेल. शिंदेचे सात खासदार जर भाजपत विलीन झाले तर त्यांची संख्या २४७ होईल. त्यामुळं फारसा फरक पडणार नाहीये. आता शहांच्या भेटीनंतर फडणवीस - शिंदे संघर्षावर शिंदे कसा आवर घालताहेत हे पाहावं लागेल. केवळ शिंदेंचीच नाही तर त्यांच्या सहकारी मंत्र्यांची, नेत्यांची आणि पक्षाचीही कोंडी होतेय. त्यामुळं त्यांना आता सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही, अशी विचित्र अवस्था झालीय!
*पक्षातले स्पर्धक संपवले मग शिंदे कसे चालतील*
महाराष्ट्रातल्या या राजकीय स्थितीला राष्ट्रीय राजकारणाचे कंगोरेही आहेत. शिंदे यांनी आपल्या ५७ आमदारांसह पाठिंबा काढला तरी फडणवीस सरकारला कोणताही धोका संभवत नाही. शिवाय शिंदेसेनेत ११ आमदार हे भाजपचेच आहेत. अन् जर शिंदेंनी असा काही प्रयत्न चालवला तर त्यांचे सहकारी उदय सामंत हे काही आमदार घेऊन पक्षातून बाहेर पडू शकतात. राष्ट्रीय राजकारणात आणखी एक चर्चा सुरू आहे की, सप्टेंबरमध्ये मोदी  वयाची ७५ वर्षे पूर्ण करतील, तेव्हा त्यांचा वारसदार म्हणून अमित शहा यांच्यासह फडणवीस यांचं नावही घेतलं जातंय. त्यामुळं अमित शहा फडणवीस यांचा पत्ता कापण्याचा प्रयत्नात आहेत. परंतु फडणवीस यांच्यामागे संघाची अन् मोदींचीही ताकद आहे. फडणवीस यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात पक्षातल्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणाऱ्यांना राजकारणातूनच हटविलं होतं. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी मावळत्या आमदारांचा फोटो काढला गेला त्यात शेवटच्या रांगेत असलेले फडणवीस आपल्या पक्षातल्या ज्येष्ठांना डावलून २०१४ मध्ये थेट मुख्यमंत्री बनले. खडसे, तावडे, अशांना बाजूला केलं तर बावनकुळे, शेलार, मुंडे अशांना रांगत यायला भाग पाडलं. आताही त्यांनी मुनगंटीवार सारख्यांना सत्तेपासून दूर ठेवलंय, कुणालाही त्यांनी आजवर वरचढ होऊ दिलेलं नाही. असं असताना एकनाथ शिंदे यांच्यासारख्या सहकारी पक्षातल्या नेत्याला ते वरचढ कसे होऊ देतील, त्यामुळंच त्यांनी त्यांची, त्यांच्या सहकाऱ्यांची अन् पक्षाची उघडपणे कोंडी करायला सुरुवात केलीय. 'आपण एकट्यानं नव्हे तर आम्ही तिघांनी सामुहिकरीत्या हे निर्णय घेतलेत. शिंदेंच्या निर्णयांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही...!' असं फडणवीसांनी म्हटलंय ते शिंदेंना खुश करण्यासाठीच. गोड बोलून काटा काढण्यात ते तसे पटाईत आहेत.
*गृहमंत्री अन् गडचिरोलीचे पालकमंत्रिपद नाकारलं*
फडणवीस असा काही खुलासा करत असले तरी त्यांनी ४१ आमदार असलेल्या अजित पवारांना गुडघे टेकायला लावलेत. त्यांना हवं असलेलं खातं दिलं. त्यांच्यावरचे, पत्नीवरचे, सहकाऱ्यांवरचे साऱ्या केसेस काढल्यात. धनंजय मुंडे यांचा राजीनामाही घेतलाय. माणिकराव कोकाटेंना धारेवर धरलंय त्यामुळं अजित पवारांच्या मनांत चुकूनही फडणवीस यांना विरोध करायचं मनांत येणार नाही. शिंदे फडणवीस संघर्षात केवळ राजकीय संघर्ष नाही तर तो आर्थिक देखील दिसतोय. शिंदे २०१४ पासून आजवर गडचिरोलीचे पालकमंत्री होते. ज्याप्रकारे गृहमंत्रीपद शिंदेंना दिलं नाही तसंच ते गडचिरोलीचे पालकमंत्री पद देखील दिलं नाही. ते फडणवीसांनी आता स्वतःकडे ठेवलंय. गडचिरोली खनिज संपत्तीसाठी देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळं साऱ्या उद्योगपतींची नजर तिकडं असते. गृहमंत्रीपद नाकारणं ही पहिली नस दाबली. इथून सुरू झालेला संघर्ष हा शिंदेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे प्रकल्प सुरू केले आणि ज्यात भ्रष्टाचाराचा आरोप झालाय त्या सर्व प्रकल्पांना फडणवीसांनी स्थगिती दिलीय. वैद्यकीय मदत कक्षामधून शिंदेंच्या साकारला दूर केलं तसंच मित्रा या संस्थेच्या अध्यक्षपदी शिंदेंनी नेमलेले अजय आशर यांची उचलबांगडी केलीय. सर्व मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी नेमण्याचे अधिकार स्वतः कडे घेतलेत.
*एकनाथ शिंदेंची महत्वाकांक्षा जागी झालीय* 
सहकाऱ्यांची मोक्षप्राप्ती करण्यात भाजप माहीर आहे. शिंदे हे काही पहिले भाजपचे युतीतले सहकारी नाहीत की, ज्यांचा भाजपने 'यूज अँड थ्रो' केलंय. ओरिसात नवीन पटनाईक यांनी कधीच मोदी अन् भाजपला आव्हान दिलं नाही तरी त्यांची तिथं काय अवस्था केलीय. जगनमोहन, मेहबूबा मुफ्ती, अकाली दलाचे सुखविंदर सिंग बादल, दुष्यंत चौटाला, केसीआर, उद्धव ठाकरे, नितीशकुमार यांचं काय झालं? एकवेळ वापरा आणि फेकून द्या ही नीती अजित पवारांना चांगलं माहितीय त्यामुळं त्यांनी आपलं आवडतं खातं घेतलं अन् शांत बसलेत. शिंदेंना वाटत की, आपण शहांच्या जवळ आहोत. ते आपल्याला मुख्यमंत्री करतील. इथंच शिंदे फसले. भाजपची महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळविण्याची मनिषा पूर्ण झालीय. सहकाऱ्यांना आमच्याबरोबर यायचं असेल तर या, नाहीतर त्यांचा मार्ग त्यांना मोकळा आहे. सोबत राहायचं असेल तर असाच अपमान, अवहेलना सहन करत राहा. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतले उद्धव ठाकरे यांच्यानंतरचे मोठे आणि विश्वासू नेते होते, शिवसेना फोडायची म्हणून त्यांनाच हाती धरलं. त्यानंतरचा सारा इतिहास समोर आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आधी रिफ्युज केलं गेलं. त्यानंतर त्यांना कन्फ्युज केलंय आता त्यांना डिफ्युज करण्यासाठी भाजप सरसावलीय. सहकारी पक्षांसाठी यूज, मिस्युज, कन्फ्युज, रिफ्युज अन् डिफ्युज हे भाजपचे स्टेप्स आहेत. हा अभ्यास शिंदेंनी करायला हवा होता, तो त्यांनी केला नाही. अजित पवारांनी हे सारं ओळखलं. शिंदेंची मात्र महत्वाकांक्षा जागी झाली. फडणवीसांना शिंदेंची नस माहीत होती ती त्यांनी वेळीच दाबली. त्यामुळं शिंदे फडफडायला लागलेत. ते सरकारमधून बाहेर पडले तरी काही फरक पडत नाहीये. आजच्या राजकीय स्थितीत भाजपच्या विरोधात बंड करणं हा एक मूर्खपणा ठरलाय. भाजपचे देशातले सारे मुख्यमंत्री बघा त्यांचे पाय मातीचे आहेत. सारे कधीच मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नव्हते. त्यांची नावं देखील फारशी माहीत नव्हती. फडणवीस देखील २०१४ पूर्वी ते मुख्यमंत्री होतील असं कुणीच म्हणत नव्हतं ही देखील वस्तुस्थिती आहे.
चौकट
शिंदे : बनले, हसले, रुसले अन् फसले...! 
भाजपनं सहकाऱ्यांना मोक्षप्राप्ती घडवण्यासाठी *यूज, मिस्युज, कन्फ्युज, रिफ्युज अन् डिफ्युज* ह्या स्टेप्स ठरवलेल्या आहेत. त्यानुसारच त्यांनी आजवर जनसंघापासून ही नीती अवलंबलीय. पूर्वी हिंदुत्ववादी असलेले पक्ष राम राज्य परिषद, हिंदू महासभा, याशिवाय गोव्यातला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, राष्ट्रीय स्तरावर जनता पक्ष, पंजाबमधला बादल यांचा अकाली दल, ओरिसातला नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दल, आंध्र प्रदेशातला जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस, महाराष्ट्रातल्या  उद्धव ठाकरे यांची शिवसेना, तेलंगणातला के. चंद्रशेखर राव यांची टीआरएस, कर्नाटकातल्या देवेगौडा यांची जेडीयू अशा काही पक्षांना त्यांनी संपवलंय. एकनाथ शिंदेंची शिवसेना फोडण्यासाठी त्यांनी शिंदेंना आधी यूज केलं. नंतर सत्तेवर बसवून त्यांचा मिस्युज केला. स्वबळावर सत्ता येताच शिंदेंना कन्फ्युज करत रिफ्युज केलं गेलंय अन् आता डिफ्युज करायची प्रक्रिया सुरू झालीय. त्यामुळं आधी शिंदेना बनवलं, मग मुख्यमंत्रीपदावर बसवून त्यांना हसवलं, नंतर त्यांची कोंडी करत रुसायला लावलंय तर आता त्यांना  फसवलं जातंय अशी भावना शिंदेंची, त्यांच्या सहकाऱ्यांची अन् कार्यकर्त्यांची झालीय...!
हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday, 1 March 2025

वादाची मर्सिडीज...... !

"राज्यातलं राजकारण नासलंय, सडलंय याची प्रचिती पुन्हा एकदा आलीय. उद्धवसेना गलितगात्र झाली असतानाही त्याच्यावर होणारे हल्ले काही केल्या थांबत नाहीत. उद्धवसेनेवर टीकाटिपण्णी, आरोप, निंदानालस्ती, चारित्र्यहनन हे जितकं कडाडून केलं जाईल तितकं सत्ताधाऱ्यांच्या मनावर आपण आरूढ होऊ. हे दिसून आल्यानं उद्धवसेनेला लक्ष्य केलं जातंय. शिवसेनेनं गावकुसाबाहेरच्यांना पदं, मानसन्मान, आर्थिक सुबत्ता दिली. तेच आता कृतघ्नपणे नेतृत्वाचे वाभाडे काढताहेत. नीलम गोऱ्हेंना चारवेळा आमदार, उपसभापतीपद दिलं, त्यांनीच स्वार्थासाठी 'मर्सिडीज दिल्यावर पद मिळाल्या'चा आरोप केलाय. कृतघ्नपणे आपली संस्कृती, प्रकृती अन् विकृती त्यांनी दाखवून दिलीय! उद्धवजी, अशा आयारामांचा सन्मान करण्याऐवजी आतातरी निष्ठावंतांच्या निष्ठेची कदर करा....!"
....................................................
*म*हाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची दिल्लीतल्या साहित्य संमेलनातली फटकेबाजी त्यांना राजकीय फायदा करून देणार की, खड्ड्यात घालणार हे येणारा काळच ठरवेल. संमेलनातल्या एका परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर खळबळजनक आरोप केला. त्यामुळं साहित्य संमेलनापेक्षा नीलम गोऱ्हेंच्या आरोपाचीच चर्चा झाली. 'मातोश्रीवर दोन मर्सिडीज दिल्या की पदे मिळतात...!' असा आरोप त्यांनी केला. खरं म्हणजे नीलम गोऱ्हेंना विधान परिषद केवळ शिवसेनेमुळे मिळाली हे वास्तव आहे. तशा त्या कुमार सप्तर्षी, अरुण लिमये यांच्या युवक क्रांती दल म्हणजे युक्रांदच्या कार्यकर्त्या, इथं राजकीय भवितव्य नाही असं दिसल्यानंतर त्या प्रकाश आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षात गेल्या. त्यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षात राजकीय भविष्य नाही, हे लक्षात आल्यानं त्यांनी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. तिथंही त्यांची डाळ शिजली नाही. पुढं शरद पवार यांच्यासोबत त्या काँग्रेसमध्येही गेल्या. पवारांनी त्यांना 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान'वर घेऊन सन्मान केला परंतु तिथंही काही राजकीय पद काही मिळणार नाही हे जाणवल्याने त्यांनी आपला मोर्चा मग उजव्या विचारसरणीच्या शिवसेनेकडे वळवला. त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी दिवंगत पत्रकार हर्षद पाटील अन् आंबेगावमधले शिवसेनेचे उमेदवार अन् दादरचे शाखाप्रमुख स्व. सुदाम मंडलिक यांनी मेहनत घेतली. त्यांच्यामुळेच नीलम गोऱ्हेंचा शिवसेनेत प्रवेश झाला. अन्  त्याचं राजकीय आयुष्य फळफळलं. परंतु शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव सेनेबरोबर राहिलेल्या गोऱ्हेनी एकनाथ शिंदेंवर गद्दार वगैरे म्हणून टीका केली होती. पण उद्धव सेनेची शक्ती क्षीण झालीय, तिथं आता यापुढं आपल्याला फार काही मिळणार नाही आणि भाजपच्या साथीनं शिंदे सेनेची ताकद वाढलीय. तिथं आपल्याला संधी आहे हे पाहून त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय. केवळ सत्तेची पद मिळवित म्हणूनच त्यांनी दलबदल केल्याचे दिसते. उद्या शिंदे सेनेची ताकद कमी झाली तर त्या दुसरीकडेही जातील.
२००० साली शिवसेनेत आलेल्या नीलम गोऱ्हेंना २००२ साली उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतून आमदार केलं. रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या अनेक महिला शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना डावलून उद्धव यांनी नीलम गोऱ्हेंना संधी दिली. गोऱ्हेंनी तोवर शिवसेनेच्या रस्त्यावरच्या कोणत्याच आंदोलनात भाग घेतलेला नव्हता. मग त्याचं शिवसेनेतलं कर्तृत्व काय की ज्यामुळे त्यांना विधान परिषद दिली? त्यानंतर सतत चारवेळा म्हणजे २४ वर्षांसाठी त्यांना विधान परिषदेत संधी दिलीय. पण गोऱ्हेंनी कृतघ्नपणे जे काही म्हटलंय त्यानं उद्धव ठाकरे यांना चांगला धडा मिळालाय. हा नियतीचा सूड आहे. चार पक्ष फिरून आलेल्या नीलम गोऱ्हेंना उद्धव यांनी उपसभापतीपदही दिलं. या पदाला कॅबिनेट दर्जा असल्याने हे पद पुन्हा आपल्याकडेच राहावं म्हणून नीलम गोऱ्हेंनी रंग बदलले. शिवसेनेत फूट पडली तेव्हा लगेचच त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या नाहीत. मात्र महायुतीचं विधान परिषदेतलं संख्याबळ वाढलं आणि महाविकास आघाडीचं कमी झालं हे लक्षांत येताच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला. त्यामुळं त्याचं उपसभापतीपद वाचवलं अन्यथा त्यांना ते पद सोडावं लागलं असतं. त्यानंतर भाजपमधून शिवसेनेत आलेल्या मनीषा कायंदे यांना शिवसेनेत येताच लगेच विधान परिषदेवर पाठवण्यात आलं होतं. त्याही शिंदे सेनेत दाखल झाल्या. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना उद्धव यांनीच उमेदवारी दिलेली होती. 
नीलम गोऱ्हेंच्या आरोपात तथ्य नाही. परंतु पक्ष चालवण्यासाठी पार्टी फंड लागतोच. नारायण राणे ते एकनाथ शिंदे हे काही स्वकर्तृत्वावर मोठे झालेले नेते नाहीत. नारायण राणे यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष असताना, महसूलमंत्री झाल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यावर सर्वाधिक पक्षनिधी दिला. त्यामुळेच ते सर्वांना डावलून मोठे झाले. १९९० पासून आमदार आणि नेते असलेल्यांना डावलून २००४ साली निवडून आलेले एकनाथ शिंदे केवळ पक्षनिधीच्या जीवावरच मोठे झाले. त्यांची राजकीय क्षमता त्यांच्या वक्तृत्वावरून लक्षात येते. पक्षासाठी आणि संघटनेसाठी राबणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना मातोश्रीबाहेर तिष्ठत ठेवून केवळ पक्षनिधी देणाऱ्या कालच्या नेत्यांना मातोश्रीमध्ये महत्त्व आलं. पण नियतीचा खेळ बघा. सर्वाधिक पक्षनिधी देणारे नेते सर्वांच्या आधी पक्षाबाहेर गेले. हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ६४ व्या वाढदिवसाला ६४ ॲम्बुलन्स देणारे गणेश नाईकसुद्धा पक्षाबाहेर गेले. सर्व निवडणुकांचा सर्वाधिक खर्च सांभाळणारे नारायण राणेसुद्धा पक्षाबाहेर गेले. ठाणे आणि मुंबई महानगर क्षेत्रातून सर्वाधिक पक्षनिधी देणारे एकनाथ शिंदेही पक्षाबाहेर गेले. यापुढं तरी उद्धव ठाकरेंनी अशांना दूर ठेऊन निष्ठेची कदर करायला हवी. 
एक म्हण आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी  दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. पार्टी फंड आणि भेटवस्तू घेणं याला एकही पक्ष अपवाद नाही. नाहीतर 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणणाऱ्या जगातल्या सर्वांत मोठ्या पार्टीचा पक्ष फंड दहा हजार कोटीच्या पुढं गेला नसता. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा, विधानसभा या दोन्हीं निवडणुकीत भाजपला तीन हजार कोटी मिळाले. कोणत्याही पक्षाला पार्टी फंड आणि त्यांच्या नेत्याला भेट वस्तू दिल्याशिवाय पक्ष चालत नाहीत. सत्ता कुणाचीही असो. सर्व उद्योगपती सत्तेला अनुसरून वागतात. त्यांना धंदा करायचा असतो. नारायण राणे पहिल्यांदा बेस्टचे अध्यक्ष झाले. त्यावेळीं त्यांनी मातोश्रीला प्रसाद कसा असतो आणि तो कसा चढवला जातो हे शिकवलं. त्यांना सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री करण्यात आले. ते सहज झाले नाहीत. सुशीलकुमार शिंदे यांना विलासराव देशमुख यांना हटवून मुख्यमंत्री कऱण्यात आले. त्यावेळीं देशात बारा राज्यातल्या निवडणूका होणार होत्या. काँग्रेसने सर्व खर्च शिंदे यांच्याकडून वसूल केला. एकनाथ शिंदे यांनी तर ठाण्यातून पक्षाला सर्व रसद पुरवली. संजय राऊत यांच्या घरी ईडीला जे पैसे सापडले त्यावर एकनाथ शिंदे यांचं नाव होतं आणि ते अयोध्या दौऱ्यासाठी होतं हे दिसून आलंय. देवाला चढवलेला प्रसाद माणूस कधी काढून दाखवतो का? पहिल्यांदा कार्यकर्त्यांसाठी नेता हा देवच असतो. शिवसेनेतून फुटून गेलेल्या सर्व नेत्यांनी राजकीय आरोप प्रत्यारोप केले पण वैयक्तिक देणं घेणं हे कधी जाहीरपणे काढली नाहीत. हे सर्व करताना या नेत्यांनी पक्षाला, नेतृत्वाला जेवढी मदत दिली त्यापेक्षा हजारपट संपत्ती त्यांनी जमा केली. हे सर्वज्ञात आहे. नाहीतर रिक्षा चालवणारे शिंदे, इन्कम टॅक्समधले साधे कर्मचारी राणे, पानाची टपरी चालवणारे गुलाबराव पाटील असे अनेक किरकोळ लोक आज अरबो खरबोचे धनी झाले नसते. पक्ष नेतृत्वालाही माहीत असतं की तुम्ही पद मिळाल्यानंतर काय धंदे करता ते. सुषमा अंधारे म्हणतात त्याप्रमाणे आरोप करणाऱ्या नीलम गोऱ्हे देखील याच पठडीतल्या आहेत. पुण्यात पीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या गोऱ्हेबाई आज आलिशान गाड्यामधून फिरताहेत. दोन अडीचशे कोटीच्या मालकीण आहे. ती काय भजन, प्रवचन करुन जमा केलीय का? त्यांचे सर्व उपद्व्याप आता बाहेर येत आहेत. ह्या बाई 'मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली...!'चा आव आणतात. पक्षाने चार वेळा आमदारकी दिल्यानंतर ह्या गोऱ्हेबाई आता तोंड वर करुन नेत्यांवर आरोप करताहेत. ते आरोप पक्षातून बाहेर पडून पक्षफुटीवेळीं का नाही केलं. चार घरं फिरून आलेल्या नीलम गोऱ्हें, संधी मिळाली तर पाचव्या घरात गेल्यावर जुन्या घरातल्या नेत्यावर आरोप करतील. तेव्हा शिंदेसाहेब सांभाळून राहा. जो माणूस तुमच्याकडे दुसऱ्याबद्दल कुचेष्टा करतो तो माणूस तुमची पाठ वळताच तुमच्याबद्दल तिसऱ्याकडे कागाळ्या केल्याशिवाय राहत नाही. उद्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांनी 'महाराष्ट्र लुटला' असं म्हणायला त्या मागं पुढं बघणार नाही.  
इलेक्ट्रोरोल बाँडच्या माध्यमातून पार्टी फंड कसा घेतला जातो हे आपण पाहतो. पार्टी फंड आणि नेत्यांना भेटी देणं हा आता राज शिष्टाचार झालाय. ही झाकली मूठ असते. ती तशीच ठेवणं योग्य आहे. मर्सिडीज मोटार ही काळे धन देऊन विकत घेता येत नाही. त्यासाठी व्हाईट अमाऊंट भरावी लागते. अशी रोख रक्कम भरून कोण मर्सिडीज घेणार आणि कोण पदं विकत घेणार. आरोप करताना तेवढं तरी भान ठेवायला हवं. गावात गणेशोत्सव साजरा करायला पण हल्ली जोरात वर्गणी वसूल केली जाते. इथं तर अख्खा पक्ष चालवायचा असतो. कमवणाऱ्या नेत्यांकडून घेऊन न कमवणाऱ्या नेत्यांना आर्थिक बळ देण्याचं काम पक्षाचे नेते करत असतात. त्यावरच राजकीय पक्ष चालतात. डॉक्टर झालेल्या गोऱ्हेना इतकंही कळू नये हे दुर्दैव आहे. बरं हे कुठं बोलावं, याचंही भान ठेवलं गेलं नाही. देशाच्या राजधानीत जाऊन राज्यातल्या नेत्यांची बदनामी करण्याची गरज काय होती. ह्याला शुद्ध भाषेत कृतघ्नपणा म्हणतात, आपल्या सोलापुरी भाषेत याला हलकटपणा म्हणतात. शिंदे यांना खुश करण्यासाठीं ठाकरे यांना अंगावर घेण्याचं गोऱ्हेंना आज ना उद्या महागात पडणार आहे. उध्दव काही गोष्टी बोलत नाहीत. पण ते जे बोलत नाहीत ती गोष्ट ते नक्की करतात. हा अनुभव आहे. सत्ता आज आहे उद्या नाही. ती एक ना एक दिवस पालटणार आहे. करोनासारख्या काळात उध्दव यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी, अभिनेत्री कंगना राणावत, नारायण राणे यांना सोडलं नाही. त्यांची गचांडी पकडली होती. काय माहीत उद्या राजकारण बदलेल. फडणवीस ठाकरे एकत्र येतील. शिंदे गटाला बाहेर बसावं लागेल. तेव्हा ह्या नीलम गोऱ्हे काय मर्सिडीज घेऊन मातोश्रीवर जाणार आहेत का?
साहित्य संमेलनाची मर्सिडीज नीलम गोऱ्हेंनी वादाच्या वळणावर नेली! संमेलन राजकारण्यांनी हायजॅक केल्याची टीका होती. मात्र हे संमेलन राजकारण्यांनी नव्हे, तर सरहद्द या संस्थेने हायजॅक केल्याचं सुरुवातीपासून ठाम मत होते. आज या मतावर नीलम गोऱ्हेंनी मर्सिडीजचा स्टार्टर मारून शिक्कामोर्तब केलं. संमेलन आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अध्यक्ष निवडीपासून सुरुवात होते मग त्यात राजकारण्यांचा सहभाग, सरकारी निधी, साहित्यिकांचा खर्च, जेवणावळीतले पदार्थ, प्रकाशकांची गैरसोय अशा वादाचे निखारे फुलत राहतात. संमेलनाचे सूप वाजण्याच्या दिवशी  गोऱ्हेंनी थेट वादाची मर्सिडीज चालवून होळी आधीच धुळवड साजरी केली आणि 'साहित्य संमेलन' या शब्दाची सरहद्द ओलांडली! खरं तर अध्यक्ष निवडीपासूनच हे संमेलन वादग्रस्त होतं. अर्थात तो वाद तेव्हा बाहेर आला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना याची सुरुवात झाली. ठाण्यातले एका गोड गोड बोलण्यात 'प्रवीण" असलेल्या कवीला यंदा संमेलनाध्यक्ष व्हायचं होतं. त्यासाठी त्यानं जंग जंग 'ढवळ"ले आणि शिंदे यांच्याकडे फिल्डिंग लावली. हे कळताच महामंडळाचा रातोरात निर्णय झाला आणि शिंदेंचे आदेश यायच्या आधीच संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर यांचं नाव जाहीर झालं. अर्थात भवाळकर यांनाच अध्यक्ष करायचं ठरलं होतं, पण ठाण्यातून बोलावणं आलं तर वाद सुरू होईल म्हणून नाव घोषित करण्याची घाई करण्यात आली. 
यंदाचं संमेलन आयोजन सरहद्द या संस्थेकडे होती. संमेलनात काय असावं याची परवानगी आयोजकाने  महामंडळाकडून घ्यावी असा नियम आहे. मात्र तिथं सरहदने महामंडळाला फाट्यावर मारलं. त्यातूनच निर्माण झाला एकनाथ शिंदे यांच्या पुरस्काराचा वाद! महामंडळाला दिल्लीचं स्वप्न दाखविल्याने त्यांनी मग आपल्या डोळ्यांवर चार कोटींचे कातडं ओढून घेतलं. कडेकोट बंदोबस्तात, बंदिस्त सभागृहात, फक्त निमंत्रितांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झालं, संमेलनाची दोन उद्घाटने होणं असा ऐतिहासिक प्रकार या संमेलनात घडला. एकनाथ शिंदे यांना जेव्हा शरद पवार यांनी पगडी घातली तेव्हाच हे संमेलन राजकारण्यांनी नव्हे, तर सरहदने हायजॅक केल्याची बोंब महामंडळ पदाधिकाऱ्यांनी ठोकली. कसले तरी चिरकुट ठराव करून संमेलनाचे सूप वाजेल. अशा भ्रमात असलेल्यांची धुंदी मात्र नीलम गोऱ्हेंनी उतरवली आणि साहित्य संमेलन चांगलेच वादग्रस्त ठरलं. 'आम्ही असे घडलो...!' ह्या परिसंवादात बोलले कोण तर सुरेश प्रभू, पृथ्वीराज चव्हाण आणि नीलम गोऱ्हे. सारेच राजकारणी. चव्हाण, प्रभू यांचा संवाद संपेपर्यंत संमेलन शांत होतं, पण गोऱ्हेंनी या मंचावरून थेट राजकीय आरोप केल्याने गदारोळ उडाला. गोऱ्हे यांच्या आरोपानंतर जी काही धुळवड सुरू झालीय. सरहद्दचे संजय नहार यांनी हात वर केले आणि म्हणाले, ते मत, तो आरोप गोऱ्हे यांचा वैयक्तिक आहे. आयोजक वा महामंडळाचा याच्याशी संबंध नाही! शिवसेना नेते संजय राऊत यांनी महामंडळ अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी महामंडळाने माफी मागावी अशी मागणी केलीय, 'मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले आहे...!' असं नीलम गोऱ्हेंनी कार्यक्रमानंतर पत्रकारांना सांगितले. हे खरे की खोटे माहित नाही असं पत्रात नमूद करून राऊत यांनी महामंडळ विकले गेलेय अशी चर्चा लोकांमध्ये होणे चिंताजनक असल्याची टिप्पणी केलीय. वादाची मर्सिडीज त्याआधीच मुंबईत पोहचलीय! नीलम गोऱ्हे यांनी माफी मागावी अशी मागणी साहित्य महामंडळ करणार का? की गोऱ्हे यांचा निषेध करणार?
हरीश केंची
९४२२३१०६०९

हताश शिंदेंची नाराजी

"माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'अवस्था ना घरका ना घाट का' अशी झालीय. त्यांना सहनही होत नाही अन् सांगताही येत न...