"कुंभमेळ्यातून बाळा नांदगावकर यांनी आणलेलं तीर्थ घेण्यास राज ठाकरे यांनी अगदी नदीत अंग धुणाऱ्यांसारखे काखाबगला घासण्याचा अभिनय करत नाकारलं. त्याची खूप मोठी चर्चा झाली. त्यांनी यानिमित्तानं नदी स्वच्छता अभियानाचे वस्त्रहरण केलं. पण कुंभमेळा, धर्म, परंपरा याबाबत संवेदनशील असलेल्या भाजपनं नाराजी व्यतिरिक्त कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. चरफडण्यावाचून त्यांना काही करता आलं नाही. कारण त्यांना एक सत्तेतल्या साथीदार अन् एक विरोधक अशा दोन्ही शिवसेनेला लोळवत मनसेच्या साथीनं आर्थिक राजधानी जी गेली २५ वर्षे ठाकरेंच्या हाती आहे ती मुंबई हिसकावून घ्यायची आहे. तिथं राज यांची गरज आहे म्हणून भाजपचं नमतं घेणं प्रकर्षानं जाणवतेय! त्यासाठी वाटाघाटी सौदेबाजी केली जातेय...!"
...............................
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजकारणाचे टायमिंग साधणं अगदी व्यवस्थित जमतं. म्हणूनच त्यांनी वर्धापन दिनाचं निमित्त साधत कुंभमेळ्यावर शरसंधान केलं. साहजिकच त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र भाजपला चरफडण्यावाचून काही करता आलेलं नाही. संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे. 'कुंभमेळाबाबत असेच वक्तव्य इतर कुणी केलं असतं तर भाजपची सारी झुंड चवताळून उठली असती!' तेही खरंच आहे म्हणा. पण राज ठाकरे चुकीचं vaa वेगळं काय म्हणाले? ज्याच्या त्याच्या कल्पना असतात. राज हे प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू अन् बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत. प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुख हे हिंदुत्ववादी असतानाही त्यांनी हिंदुधर्मातल्या वाईट चालीरिती, परंपरा यावर प्रहार केले होते. त्यांची ती परंपरा राज यांनी पुढं नेलीय, एवढंच! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अशीच 'हट... नको मला तुमचा प्रसाद....!' होतं. तुळजापूरला शिवसेनेचे अधिवेशन होतं. त्यासाठी बाळासाहेब तुळजापूरला आले होते. हे निमित्त साधून बाळासाहेब तुळजा भवानीच्या दर्शनाला गेले. तिथं देवीला अभिषेक करण्यात आला. पुजाऱ्यानं देवीच्या मूर्तीवर दही लावली, त्यानंतर केळी सोलून कुस्करुन ती मूर्तीवर चोळली. त्याचा प्रसाद देण्याचा प्रयत्न पुजाऱ्यानं केला. तेव्हा बाळासाहेब भडकले. इतकी चांगली दही होती, चांगलं केळ होतं ते कुस्करुन टाकली. त्यात तुमच्या अंगाचा घाम पडतोय अन् तुम्ही ते प्रसाद मला देताय. असं म्हणून त्यांनी तो प्रसाद नाकारला होता. हे सत्यकथन त्यांनी त्यावेळच्या तुळजापूरच्या सभेतही सांगितलं होतं. त्यामुळं राज यांनी विशेष काही म्हटलं असं काही नाही. पण अंधश्रद्धेच्या जंजाळात गुरफटलेल्या भक्तांना हे कसं पटणार? त्यांनी त्यांचं भांडवल करायचं अयशस्वी प्रयत्न केला. पण भाजपला, त्यांच्या नेत्यांना राज यांची गरज असल्यानं ते त्याच्या विरोधात बोलणार तरी काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी एकनाथ शिंदेंच्या रुसण्यानंतर अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन्ही पक्षात युती होणार का? अशी चर्चा रंगली होती. राजकारणात अचानक काहीच घडत नसतं आणि वेळेलाही महत्त्व असतं यामुळे ही भेट पूर्वनियोजित असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या २५ हून अधिक वर्षं शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर आहे. यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुंबईसह राज्यातल्या २९ महापालिका, २६ जिल्हा परिषदा, २५७ नगरपालिका आणि २८९ नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत. यातली मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. विधानसभेच्या निकालानंतर आता आगामी काही महिन्यात या निवडणुका होतील असा अंदाज वर्तवला जात होता. यामुळे राजकीय पक्षाचीही मोर्चेबांधणी सुरू झाल्याचं पहायला मिळालं, पण पुन्हा सारं काही थंडावलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १० फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली. खरं तर काही दिवसांपूर्वीच राज यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल तसंच भाजपवर कडाडून टीका केली होती. यामुळे लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं गेलं, परंतु फडणवीस यांनी स्वतः राज यांची भेट घेतल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली गेली. विशेष म्हणजे आताच्या राजकीय वातावरणात जिथं महायुतीत एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त वारंवार समोर येत असताना आणि दुसरीकडे फडणवीस अन् शिंदे यांच्यात विसंवाद असल्याचंही म्हटलं जात असताना आगामी निवडणुकांसाठी भाजप शिंदे यांच्या शिवसेनेचं महत्त्व कमी करतेय. शिवाय मुंबई महापालिकेवर एकहाती विजय मिळवण्यासाठी मनसेला जवळ करू पाहतेय. यामागे मुंबई महापालिकेची काही मोठी समीकरणं दडली आहेत. याचीही शक्यता नाकारता येत नाही. फडणवीस यांनी राजकीय चर्चा फेटाळत ही भेट राजकीय नसल्याचं म्हटलं होतं. पण एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला त्याच्या घरी जाऊन भेट घेतो तेव्हा इथं काहीतरी शिजतंय अशी शंका येते.
महाराष्ट्रात विधानसभेला क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर भाजपने आपलं लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे केंद्रीत करताना दिसलं. यात भाजपसाठी सर्वांत महत्त्वाची लढाई ठरणार आहे ती मुंबई महापालिकेची जिथं २५ वर्षांपासून शिवसेनेची म्हणजे ठाकरेंची सत्ता आहे. यामुळे मनसे भेटीमागे मुंबई महापालिकेची रणनिती, व्यूहरचना असणार. त्यासाठी विधानपरिषदेची जागा किंवा इतर वाटाघाटी, सौदा हे कारण असणार. मुंबईत तुलनेने शिंदेसेनेचा यांचा प्रभाव फारसा नाही. मुंबई महापालिकेतून उद्धव ठाकरे यांची सत्ता घालवणं हे भाजपचं स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी हरेक प्रयत्न चालवलेत जसं दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना धडा शिकवला तसं मुंबईत उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा असेल तर त्यांच्याकडून मुंबई महापालिका हिसकावून घ्यायची हा त्यांचा हेतू आहे. यासाठी शिंदेसेनेची फारशी मदत त्यांना होणं कठीण वाटतंय. मुंबई महापालकेवर ९ फेब्रुवारी २०२२ पासून प्रशासक आहे. मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळच्या निकालानुसार मुंबई महापालिकेत शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. आता तर शिवसेनेत फूट पडलीय. यामुळे शिवसेनेचे दोन गट पालिका निवडणुकीत आमने-सामने असतील. यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक मतांचंही विभाजन होईल. शिवाय, ही निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अधिक फटका बसू शकतो असाही अंदाज वर्तवला जातोय. भाजपला मुंबई महापालिकेत असा विजय मिळवायचा आहे की कोणत्याही शिवसेनेची गरज त्यांना भासणार नाही. मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असे उभे करायचे की भाजपला त्यांना हवा असलेला आकडा गाठता येईल. उद्धव ठाकरे यांच्या जागा २०-२५ जागांवर शिंदेंचे उमेदवार डॅमेज करू शकतात तर ४०- ४५ जागांवर मनसेचे उमेदवार डॅमेज करू शकतात. मराठी बहुल भागात जिथं उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेचा उपयोग भाजपला होऊ शकतो, यासाठी मनसेची मनधरणी सुरू असते. शिवाय महापौर बसवताना कोणाशीही अटी-शर्थीची गरज भासू नये. उद्धव ठाकरे यांची सत्ता स्वबळावर उलथवली असं कुठेतरी त्यांना सिद्ध करून दाखवायचंय यासाठी भाजपचा हा सारा खटाटोप सुरू आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज यांच्या भेटनंतर सांगितलं होतं, की, 'चर्चा केवळ तुम्ही करता. ही कुठलीही राजकीय भेट नाही. या भेटीचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीसाठी मी गेलो होतो...!' तर मनसेनेही युतीची चर्चा फेटाळून लावली होती. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं होतं, 'राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट ही वैयक्तिक आहे. कोणतीही राजकीय चर्चा यात झालेली नाही. भाजप-मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव अद्याप नाही. विधानपरिषदेसाठीही काही बोलणी नाहीत..!' पण अशी काही व्यूहरचना किंवा सौदेबाजी होत असेल तर ही मंडळी प्रसिद्धी माध्यमांना सांगतील तरी कसे? दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या भेटीवरून मनसेवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "राज यांचा पाॅलिटिकल रिलिव्हन्स संपत चाललेलाय. यामुळे राज यांना कोण भेटतं यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात फार उलथापालथ होईल असं वाटत नाही. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही सवय झालीय की एरव्ही भाजपवर टीका करणारे राज निवडणुका जवळ आल्या की त्यांच्या भूमिका भाजपच्या बाजूने दिसतात. या भेटीगाठी पुन्हा एकदा महापालिका संबंधाने असू शकतात.
हरीश केंची
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment