Saturday, 22 March 2025

मराठ्यांचं खड्ग अन् औरंगजेबाचं थडगं!

"खुलताबाद इथल्या औरंगजेब याच्या कबरीवरून सध्या वाद पेटविला गेलाय. त्यावरून नागपुरात दंगल झालीय. ३१७ वर्षापूर्वी इथंच गाडल्या गेलेल्या औरंगजेबाच्या थडग्याचा विषय समोर आला तो छावा चित्रपटावरून तसा उल्लेख मुख्यमंत्र्यांनीच विधिमंडळात केलाय. औरंजेबाकडे अनेक हिंदू सरदार होते तर मराठ्याच्या सैन्यात अनेक मुस्लिम. त्यावेळी लढाया होत होत्या त्या राज्यासाठी, राज्यविस्तारासाठी. औरंगजेब दिल्लीहून इथं आला  मराठ्यांच्या साम्राज्याला उलथून टाकायला, पण त्याला ते जमलंच नाही. शेवटी तो इथंच गाडला गेला. मराठ्यांचं खड्ग अन् औरंगजेबाचं थडगं! हे मराठी ताकदीचं दर्शन घडवतं. ते उखडून टाकण्यात कसलं आलं शौर्य? भावी पिढीला मराठ्यांचा हा देदीप्यमान इतिहास कळावा म्हणून तरी त्या औरंग्याला इथंच तडफडू द्या! ही कबर हटवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय!"
---------------------------------------------
ज्या मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य उलथून टाकण्यासाठी दिल्लीहून महाराष्ट्रात आलेल्या त्या औरंगजेबाला मराठ्यांनी इथंच गाडलं. पण शत्रूचाही मराठ्यांनी 'मरणांती वैराणी' म्हणत त्याला सन्मान दिला. त्याच्या इच्छेनुसार त्याची कबर इथंच बांधू दिली. मात्र त्याची कबर उखडून टाकली नाही. 'फोडा आणि झोडा' ही नीती वापरत इंग्रजांनी हिंदू मुस्लिम यांना एकमेकांशी लढवलं, त्यासाठी त्यांनी कधी औरंगजेबाची कबर उखडण्याचा हातखंडा वापरण्याचा विचारही कधी मनात आणला नाही. मग आताच भाजप ती उखडून टाकण्याचा विचार का करतेय? इतकी वर्षे सत्तेवर आलेली सर्व सरकारं कबरीची रंगरंगोटी अन् पूजेसाठी निधी देत होती अगदी भाजपचे सत्ताधारी देखील! मग हे आताच का घडतंय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांची जी मूळ विचारधारा आहे ती सांप्रदायिकता आणि राष्ट्रवाद! भाजपचं राजकारण धर्म, जातीयवाद, सांप्रदायिकता यांच्याशिवाय होऊ शकत नाही. त्यांना अशा मुद्द्यांची गरज असते ज्या माध्यमातून हिंदू मुसलमान वाद उभा करता येऊ शकतो. बहुसंख्याकांच्या मनांत अल्पसंख्यांकाबाबत भीती, राग, चीड आणि नफरत निर्माण झाली पाहिजे. आता ३१८ वर्षापूर्वी १७०७ साली मेलेल्या औरंगजेबाची कबर उखडण्याची चर्चा सुरू केलीय. औरंगजेब जेव्हा मेला तेव्हा छत्रपतींच्या वंशजाचं राज्य होतं. त्यानंतर पेशवे आले त्यांनी १७१३ पासून १८५७ च्या क्रांतीपर्यंत बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव यांच्यापासून अखेरचे नानासाहेब पेशवे असे अनेकजण होते. १७१३ पासून १८५७ पर्यंत पेशव्यांना कधी आठवलं नाही की, संभाजीराजांना अनन्वित अत्याचार, हाल हाल करून मारलं, त्या औरंगजेबाची कबर जी इथंच आहे. ती उखडून टाकावी. संभाजीराजांचे पुत्र शाहूंना त्यांच्या बालपणापासून औरंगजेबानं आपल्या ताब्यात ठेवलं होतं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ते मोगलांच्या कैदेतून सुटले त्यानंतर ते औरंगजेबाच्या कबरीजवळ खुलताबादेत पोहोचले. ज्या संभाजीराजांच्या जीवनावर छावा चित्रपट बनलाय ज्यामुळं हा विद्वेष पेटून उठलाय. त्या संभाजीराजांचे शाहू हे पुत्र होते. एवढंच नाही तर औरंगजेबाची मुलगी होती तिची कबर, मजार देखील त्यांनी तिथं बांधली. त्यावेळी ज्या लढाया होत होत्या त्या धर्मासाठी होत नव्हत्या तर त्या राज्यासाठी राजांमध्ये होत होत्या. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात झाली. त्याच महाराष्ट्राच्या भूमीत औरंगजेबाला गाडलंय. डॉ. हेडगेवार, गोळवलकर त्यांच्यानंतरच्या साऱ्या सरसंघचालकांनी कधी असा विचार का केला नाही की, औरंगजेबाची ती कबर नेस्तनाबूत केली जावी. ते सारे जाणत होते की, कुणाची कबर उखडून टाकल्यानं इतिहास पुसून टाकता येत नाही. 
मी इथं स्पष्ट करतो की, औरंगजेब क्रूर होताच, त्यानं अनन्वित अत्याचार केले, हिंदूंची मंदिरं तोडली, जुलम केले, शंभूराजांचे हाल हाल केलं, यांचं समर्थन करताच येणार नाही. कुणी करणारही नाही. हे सारं इतिहासात नमूद आहे. त्यानं बापाला, भावांना मारलं. त्याची कबर उखडून टाकल्यानं हे सत्य कसं पुसून टाकता येईल? औरंगजेबाच्या दरबारात जे प्रमुख सरदार होते त्यात हिंदू राजे, सरदार अधिक होते. औरंगजेबानंतर दोन नंबरवर सवाई मानसिंग होते. मिर्झाराजे जयसिंग, रघुवंश सिंग आदि होते. औरंगजेबाची ती कबर केंद्र शासनाच्या अखत्यारीत, पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. त्यांची निगा, रंगसफेदी सरकारकडून केली जाते. ती केंद्र सरकारची संरक्षित इमारत समजली जाते. औरंगजेबानं आपल्या मृत्युपत्रात लिहिलं होतं की, आपली कबर अत्यंत साधी असावी. लोकांना समजायला नको की, ही आलमगीर औरंगजेबाची ही कबर आहे. त्याचं निधन झालं ते अहमदनगरच्या भिंगार गावात मग त्याचं शव इथं खुलताबादेत आणलं गेलं. तेही अशासाठी की, त्याचे गुरु सूफी संत जैन्यूद्दीन यांच्या कबरी शेजारी आपल्याला दफन केलं जावं अशी त्याची इच्छा त्यानं मृत्युपत्रात नमूद केली होती. त्यानुसार तिथं त्याला दफन केलं गेलं. औरंगजेबाच्या कबरीजवळ जे आता बांधकाम दिसतंय ते केलं हैदराबादच्या निजामानं. त्यानंतर लॉर्ड कर्झन यानं. औरंगजेबाच्या वारसांनी, त्यानंतर सत्तेवर आलेल्या सर्वांनी ती कबर त्याच्या इच्छेनुसार साधारण ठेवली. मग आताच ती कबर उखडून टाकण्याची चर्चा का केली जातेय, त्यालाही राजकीय कारण आहे. राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. बिहार पाठोपाठ, बंगाल पुढच्यावर्षी तामिळनाडू मग उत्तरप्रदेशच्या निवडणुका आहेत. त्याच्यासाठी ही वातावरण निर्मिती आहे. याशिवाय राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार आर्थिक अडचणीत आहे. जी आश्वासनं दिली गेलीत ती पूर्ण होऊ शकत नाहीत. महागाईचा आगडोंब उसळलाय. लोकांनी याबाबत प्रश्न विचारू नयेत, जाब विचारू नये म्हणून औरंगजेबाची कबर छावाच्या निमित्तानं पेटविली गेलीय. 
आपल्या बहुसंख्यांक समाजाची अशी स्थिती आहे की, एका कल्पनेत विहार करताहेत त्यांना सर्वत्र धोके, भीती दिसतेय. पण हे अगदीच तकलादू आहे. कारण १४० कोटी लोकसंख्येत ११० - ११५ कोटी आपण आहोत तर ते १५- २० कोटी ते आहेत. मग भीती कुणाची अन् कशाची? का घाबरवलं जातेय? ही एक 'सोची समझी राजनीती' आहे. त्यासाठी चित्रपट, पुस्तकं, सीरिअल्स, सोशल मिडिया, व्हॉट्सॲप विद्यापीठ आहेत. या साधनांचा वापर करून बहुसंख्यांक समाजाला घाबरून सोडलंय. अशाच वातावरणात त्यांनी राहावं असे प्रयत्न सुरू असतात. ते जर जागे झाले तर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतील. एकीकडे सत्ताधारी नेते माजी मुख्यमंत्री म्हणतात, 'जर तुम्ही औरंगजेबाची तारीफ केली तर सजा मिळेल!' अशी कोणती तरतूद कायद्यात आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून औरंगजेबाच्या दरबारात नेणाऱ्या मिर्झाराजे जयसिंग यांच्या वारसदाराला दियाकुमारीला राजस्थानची उपमुख्यमंत्री का केलंय? त्याच औरंगजेबाच्या वारसदाराला दोनदा गादीवर बसवण्याचं, पुनर्स्थापना करण्याचं काम ग्वाल्हेरचे राजे महादजी शिंदे यांनी केलं होतं. त्यासाठी महादजी शिंदेंना किताब दिला गेला. पण शिंदे हे पेशव्यांची चाकरी करत होते. म्हणून त्यांनी तो किताब पुण्यात येऊन पेशव्यांकडे सादर केला. त्याच महादजी शिंदेंचं वंशज माधवराव शिंदे, वसुंधरा राजे, यशोधरा राजे, ज्योतिरादित्य शिंदे, दुष्यंतसिंग हे सारे भाजपत आहेत. दियाकुमारीचं, ज्योतिरादित्य शिंदे आणि इतरांचं राजप्रासाद कुणी बहाल केलेलं आहेत. याचं उत्तर कोण देणार? इतिहासाची पानं चाळली तर आणखी काही उदाहरणं सापडतील. हे लोकांना समजू नये यासाठी खबरदारी घेतली जातेय. व्हॉटसअप युनिव्हर्सिटीतून वेगळाच इतिहास पसरवला जातोय. नेहरू मुसलमान होते, गांधीजींनी देशाची फाळणी केली. ह्या साऱ्या बाबी चुकीच्या आहेत. आता ग्रोक नावाचं एआय भूत उभं राहिलंय. अवघ्या तीन दिवसात अशा खोट्या वदंताच्या चिंधड्या उडवल्यात. 
छत्रपतींच्या आसपास अनेक राजपूत वा हिंदूधर्मीय राजे होते. त्यांना जे साध्य झालं नाही, ते छत्रपतींनी करून दाखवलं. आलमगीराच्या क्रौर्याचे, त्याच्या बीमोडाचे मोठेपण त्याच्या कबरीच्या ध्वस्ततेची मागणी करणाऱ्यांना माहीत नाही, असं नाही. वास्तविक छत्रपतींनी टोपीकरांना ज्या रीतीनं धुडकावलं तो मुत्सद्देगिरीचा सर्वोत्कृष्ट नमुना ठरावा. पण त्याचा गवगवा तितका केला जाणार नाही. कारण उघड आहे. टोपीकर ख्रिश्चन होते आणि औरंगजेब मुसलमान. त्यामुळं त्याचा संबंध पाकिस्तानशी आणि त्याद्वारे देशातल्या इस्लामधर्मियांशी जोडायची सोय आहे आणि ती ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी गरजेची आहे. गोऱ्या टोपीकरांशी आपला थेट वाद नाही. ते बौद्धिकदृष्ट्या झेपणारेही नाही. त्यापेक्षा सद्य:स्थितीत इस्लामींना चेपणे अधिक सोपं आणि सोयीचं. ‘घर मे घुसके मारेंगे...!’ची शूरभाषा म्हणूनच केली जातेय.  खरंतर आपल्या ‘घरात’ खऱ्या अर्थानं घुसलेलाय तो चीन. पण त्याच्याबाबत मात्र सौहार्दाची, मैत्रीपूर्ण शांततेची भाषा! त्यामागचं कारणही तेच. धर्म आणि सामर्थ्याचा आकार. चीनबाबत अशी भाषा आपल्याला पेलवणारही नाही आणि ते न पेलवणं सर्वांना दिसणं राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही. तेव्हा सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा औरंगजेब बरा. त्याच्या नावे बोटं मोडणं, कबरीवर थुंकण्याची भाषा करणं इत्यादी शौर्यदर्शक कृत्ये सद्य:स्थितीत राजकीयदृष्ट्या सोयीची आहेत. खेरीज हे असले आदिम मुद्दे पटवून देणं सोपं आणि पेटवणं त्याहूनही सोपं. सबब औरंगजेब हा केवळ निमित्तमात्र. धर्मप्रेमींनी चिंता, क्लेश, दारिद्र्य, दु:ख वगैरेंची जागजागी बनलेली थडगीही अशीच उखडून फेकावीत. वाद औरंगजेबाच्या कबरीचा नसता तर अन्य कोणती कबर, मशीद, मजार असं काही ना काही मिळालेच असते. काही निर्मिती करण्यापेक्षा विध्वंस योजनं अधिक सोपं असतं. त्यात मागे जमाव आणि सत्ताधीशही असतील तर हे काम अधिकच सुलभ. पण ‘इश्यू’ जागता ठेवण्यासाठी विध्वंस इतक्यात होणार नाही. एखादा मुद्दा सतत तापत ठेवणं. आपल्या देशात सतत तापता ठेवता येईल असा मुद्दा म्हणजे हिंदू-मुसलमान संघर्ष! असा संघर्ष नसेल तर तो निर्माण करा, निर्माण झालेला असेल तर तो शांत होऊ देऊ नका आणि तो निमालाच तर निखाऱ्यांवरची राख झटकून ही आग पुन्हा कशी भडकेल असे प्रयत्न करा, हिंदू-मुसलमान मुद्दा नसेल तर मराठा-ओबीसी, दलित-दलितेतर, उच्चवर्णीय विरोधात कनिष्ठवर्णीय, ही विरुद्ध ती भाषा असा कोणता ना कोणता मुद्दा शोधा, तापवा आणि तापता राहील याची खबरदारी घ्या असा हा सांगावा. हे असे मुद्दे धुमसते ठेवणं अनेकांच्या सोयीचं असतं. या अनेकांत राजकारणेतरही अनेक येतात. उदाहरणार्थ माध्यमं, सुरक्षा यंत्रणा, बाजारपेठ, सोशलमिडिया इत्यादी. माध्यमांकडे या काळात बहुतांशांचे अधिक लक्ष जातं म्हणून माध्यमं खूश. सुरक्षा यंत्रणांना त्यांचा अंमल चालवता येतो आणि हात ‘साफ करून’ घेता येतात म्हणून ते खूश. बाजारपेठ आनंदी कारण अनेक वस्तूंची मागणी वाढते आणि अधिक काही गंभीर होईल या भीतीने माणसे अनावश्यक चीजवस्तूही खरेदी करून ठेवतात. अखेर लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे भीतीचीसुद्धा एक मोठी बाजारपेठ असते आणि अन्य कोणत्याही बाजारपेठेप्रमाणे ती गजबजती राहील हे पाहणं बाजारपेठ धुरीणांचे कर्तव्य असते. हे सत्य एकदा का लक्षात घेतलं की सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू ठेवण्यात येत असलेल्या वादाचा अर्थ लावता येईल.
आग विझवून काही निर्मिती करण्यापेक्षा आग लावून विध्वंस योजणे अधिक सोपे असते. त्यात मागे जमाव आणि सत्ताधीशही असतील तर हे काम अधिकच सुलभ. किती ते बाबरी मशीद पाडताना भारतीयांनी अनुभवले. हाताला काम आणि डोक्याला व्यवधान नसणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही. त्यातल्या काही शेदोनशे जणांना एकत्र करायचे, पोलीस बघ्याची भूमिका घेतील याची हमी बाळगत औरंगजेबाच्या कबरीवर चालून जायचं आणि ती उद्ध्वस्त करून टाकायची की झालं. आहे काय नि नाही काय! जगातील सर्वात प्राचीन, सर्वात सहिष्णू इत्यादी असलेल्या हिंदू धर्मीयांच्या वैश्विक संघटनेने लोकशाहीची जननी असलेल्या देशात असे करून दाखवण्याचा इशारा दिलेला आहेच. तो अमलात आणणं फार अवघड नाही. पण तरीही तो तातडीने अमलात आणला जाणार नाही. कारण तसे झाले तर ‘इश्यू’च संपेल ! आणि इश्यू एकदा का संपला की मग पुन्हा एकदा नवीन काही शोधणं आलं, नवीन कबर शोधणं आलं, त्या विरोधात हवा निर्माण करणारा एखादा देमार चित्रपट निर्माण करणं आलं! इतके सगळे उपद्व्याप केल्यानंतर कुठे एखादा मुद्दा कार्यक्रमपत्रिकेवर येतो. तसा आता कुठं औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापवता आलेलाय. त्यामुळं गावागावांत पत्रकार परिषदा घेऊन, भाषणं करून, इशारे देऊन तो अधिकाधिक कसा तापेल आणि तसा तापता राहील याची खबरदारी घ्यायला हवी. त्यानंतर मग ‘थेट प्रक्षेपणात’ कबर उखडण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम हाती घेता येऊ शकेल. इतर ठिकाणच्या अशा कबरींबाबत योग्य तो इशाराही प्रसृत करता येईल आणि पुढचे उखडा-उखडीचे कार्यक्रम हाती घेता येतील. तो हाती घेणाऱ्यांचे सामर्थ्य लक्षात घेता त्यांनी अन्यही काही ‘विधायक’ कार्यक्रम सुरू करावेत. जसे की प्रशासनातला भ्रष्टाचार त्यांनी उखडून टाकावा. अफझलखान, औरंगजेब यांची कबर उखडून टाकणाऱ्यांनी राज्याच्या प्रशासनातली अकार्यक्षमताही अशीच उखडून टाकावी. दफ्तरदिरंगाई, वेळकाढूपणा आदींचाही नाश त्यामुळं होऊन राज्याचे प्रशासन अधिक गतिमान होण्यास मदत होईल. अनेक महाराष्ट्रीय तरुण, तरुणींच्या हातास सध्या काम नाही. या तरुण, तरुणींच्या हाताचा आणि डोक्याचा रिकामटेकडेपणाही कबर उखडून टाकणाऱ्यांनी समूळ नाहीसा करून टाकावा. आपल्या राज्यातली अनेक महानगरे ही उकिरडे बनलेली आहेत आणि खेडी, गावे बकाल. या नवधर्मरक्षकांनी ठिकठिकाणचे उकिरडे, बकालपणादेखील नष्ट करून टाकावा. नुसत्या अचेतन कबरीची काय मातबरी? या धर्मप्रेमींनी चिंता, क्लेश, दारिद्र्य, दु:ख वगैरेंची जागजागी बनलेली थडगीही अशीच उखडून फेकावीत. दुसऱ्या धर्माचा राग केल्याने स्वधर्मावरचं प्रेम सिद्ध होत नाही. तद्वत पराजयींच्या कबरी उखडून टाकण्याने आपला विजय सिद्ध होत नाही. तो आज सिद्ध करावयाचा असेल तर वर उल्लेखलेल्या गोष्टीही उखडून टाकायला हव्यात.
हरीश केंची 
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

संघम् शरणम् गच्छामी...!

"नुकतीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक  मोहन भागवत यांची बहुचर्चित भेट झालीय. प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रचा...