Saturday, 29 March 2025

तुझे मिर्ची लगी तो मै क्या करू?

"महाराष्ट्रातल्या राजकारणावर स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या कुणाल कामरा यांनी जे व्यंगकाव्य केलं त्यानं हलकल्लोळ झालाय. शिवसेनेच्या स्टाईलने जिथं ते व्यंगकाव्य चित्रित झालं तो स्टुडिओ फोडला गेला. गेली काहीवर्षे लोप पावलेला शिवसेनेचा तोडाफोडीचा कार्यक्रम दिसला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला गेलाय असं म्हटलं गेलंय. समाजाची, राजकारण्याची संवेदना या फारच कमकुवत झालीय. व्यंगकाव्य, व्यंगलेखन, व्यंगचित्र सहन करण्याची शक्तीच आकुंचन पावलीय. महाराष्ट्रात लवकरच एक कायदा येऊ घातलाय. हा कायदा झाला तर कोणालाच सत्तेच्या विरोधात बोलता येणार नाही, टीका किंवा विनोद करता येणार नाही, रस्त्यावर उतरता येणार नाही, आंदोलन करता येणार नाही. दुसरी आणीबाणीच असेल ही. तेव्हा या कायद्याला विरोध झालाच पाहिजे!"
--------------------------------------------- 
पंडित जवाहरलाल नेहरू यांची नामवंत व्यंगचित्रकार के. शंकर पिल्लई यांनी जवळपास दीड हजाराहून अधिक व्यंगचित्रे काढलीत आणि ती सर्व त्यांच्या 'शंकर्स विकली' या साप्ताहिकातून प्रसिद्ध केलीत. प्रधानमंत्री पंडित नेहरू हे दृष्टे जागतिक नेते म्हणून के.शंकर पिल्लई यांना नेहरूंबद्दल प्रचंड आदर होता, पण व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी पंडित नेहरूंची, प्रधानमंत्री म्हणून नेहरूंच्या धोरणांची यथेच्छ खिल्ली उडवली होती; पण नेहरूंनीही त्याला हसून दाद दिली. दिल्लीत १९४८ च्या मे महिन्यात 'शंकर्स विकली' च्या प्रथम आवृत्तीच्या प्रकाशनाला शुभेच्छा देताना नेहरू म्हणाले होते, "...a cartoonist is not just a maker of fun but one who sees the inner significance of an event and by few masterstrokes impresses it on others. That is a service to all of us for which we should be grateful. For we apt to grow pompous and self-centered ,and it is good to have the veil of our conceit torn occasionall.!" आणि ते पुढे म्हणाले 'Don't spare me, Shankar!' 
मोठं कार्य करायचं असेल स्वतःबद्दल असणारा फाजील आत्मसन्मानाचा अहंकार असाच फाडावा लागतो, त्यासाठी व्यंगचित्र महत्वाचं असतं, म्हणूनच 'मला सोडू नकोस...!' असा संदेश नेहरूंनी व्यंगचित्रकार शंकर यांना दिला होता. त्यांची व्यंगचित्रे खूप मजेशीर अन् खिल्ली उडवणारी होती. पण नेहरूंनी कधी नाराजी व्यक्त केली नाही. उलट त्यांच्या व्यंगचित्राला नेहरूंनी हसून दाद दिली होती. या संग्रहात ३१ मार्च १९५७ ला नेहरूंना चक्क साडी नेसवून शंकर यांनी मंत्रिपदाचं सफरचंद हातात घेवून उभारल्याचं व्यंगचित्र आहे, १९ मे १९५७ च्या व्यंगचित्रात शंकर यांनी नेहरूंना साडी नेसवून शकुंतलेच्या रुपात जयप्रकाश नारायण यांना प्रेमपत्र लिहितानाचे व्यंगचित्र आहे. साडी नेसलेली स्त्रीवेशातली नेहरूंची अनेक चित्रं रेखाटली आहेत.  एक व्यंगचित्र तर कमालीचं आहेत. लहान मुलांना दुध पाजून झोपवणाऱ्या बाळंतीण बाईच्या वेशातलं नेहरूंचं व्यंगचित्र सुद्धा आहे. १२ जुलै १९५३ चं व्यंगचित्र तर फारच गमतीशीर आहे. संयुक्त राष्ट्र संघाने, युनोने भारताच्या काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत काही मागण्यांना नकार दिला होता, त्या मागण्या मान्य होणार नाहीत अशी चिन्हे दिसत असतानाही नेहरूंचे प्रयत्न सुरू होतं. त्यावर टीका करणारे शंकर यांचं व्यंगचित्र चपखल आहे. युनोचा दरवाजा कुलूप लावून पूर्णतः बंद आहे आणि नेहरू दारात उभं राहून दरवाजा उघडण्याची विनंती करताहेत. महत्वाचं म्हणजे या व्यंगचित्रात नेहरू पूर्ण नग्न अवस्थेत विनवणी करताना दाखवलेत. शंकर यांनी असं नग्न चित्र काढलं असताना सुद्धा नेहरूंनी या सर्व व्यंगचित्रांचा मिश्किलपणे आनंद घेतला. नेहरूंच्या कृतीचं अन् विचारांचं मोठेपण अशातून प्रभावीपणे समोर येतं. आजकाल सत्तेतल्या, विरोधातल्या राजकारण्यांना, त्यांच्या भावनाशील अनुयायांना आणि समाजातल्या सर्वच घटकांना, नेहरूंनी आपल्या राजकीय जीवनात जपलेली ही सोशिकता, सहिष्णुता, सरलता आणि व्यंगातला संदेश जाणून घेण्याची शालीनता मार्गदर्शक ठरेल अशीच आहे. 
जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्यावर अश्लील टिप्पणी केली तरी तुमचं राज्यपालपद जाणार नाही, याची खात्री असल्यानं मराठी माणसाला उद्देशून वाट्टेल ते बोला, तर काही बिघडत नाही तुमचं. सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असाल तर इतिहासकारांना उघड धमकी देऊन शिवाजीची बदनामी करत तुम्ही 'तो मी नव्हेच...!' म्हणत पोबारा करू शकता. तुमचं दक्षिण मुंबईतलं ऑफिस, महागड्या गाड्या वगैरे कशालाही धक्का लागत नाही. 'शिवाजी लाच देत होता...!' वगैरे वाट्टेल ते बोला. असली बिनबुडाची पाॅडकास्ट करणारी आणि त्यात मुलाखती देणारे-घेणारे यांचा धंदा बंद पडत नाही. संसदेला कुणी एक नेता प्रधानमंत्री मोदींना हा शिवाजीचा आधुनिक अवतार आहे, असं उघडपणे म्हणतो. पण हूं की चू होत नाही. तिथं शिवाजी महाराजांचे भक्त, समर्थक जात नाहीत, फोडाफोडी करत नाहीत. त्यांना श्रद्धास्थानाऐवजी आपल्या नेत्याचं महिमामंडन करणं महत्वाचं वाटत असतं. 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा अभ्यास करून राज्यघटना लिहिलीय...!' 'आंबेडकर ब्राह्मण होते...!' असली धादांत खोटी विधानं करणारे मनोहर भिडे आणि राहुल सोलापूरकर बिनधास्त उघड माथ्यानं फिरत असतात, त्यांना कुणीच काही बोल लावत नाही. या राज्यात Father of nation ही पदवी स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेतलेल्या पक्षाच्या नेत्याला उद्देशून उच्चारली जाते, आपण फक्त ऐकतो अन् सोडून देतो. 'नामदेव ढसाळ कोण...?' असा प्रश्न इथं विचारण्यात येतो आणि त्यात कुणाला काही अपमानकारक वाटत नाही, महाराष्ट्राचा अपमान झाला, असं वाटत नाही. तोंडदेखली एक माफी ती देखील जर..तर च्या साथीनं, माझा असा हेतू  नव्हता, वगैरे शाब्दिक कडबोळ्यात केली जाते आणि मग साऱ्या संबंधितांना ’सारं काही ओके’ असतं. पण, टीकामय विनोद मात्र खूपच बोचतो. आमच्या दैवताविषयी तुम्ही विनोद केलाच कसा? टीका कशी केली? तोडफोड, एफआयआर, राज्यात फिरू देणार नाही वगैरे धमक्या. विनोद-काॅमेडी शो ला एवढ्या गांभीर्याने घेणारे तरूण तडफदार नेते राज्याला आज कुठे नेताहेत? इथं एक नोंदवावं वाटतं ते असं की, पार्श्वभागात दम असेल तर राज ठाकरेंकडून माफी मागण्याचा पुरुषार्थ दाखवा. ज्यांनी विधानसभेत तुमच्यासारख्या सर्वच आमदारांना खोक्याभाऊ बसलेले आहेत, असं विधान केलं होतं. तेंव्हा तुमचा सन्मान काय चुलीत गेला होता? तेंव्हाच सिद्ध झालं होतं की, तुम्ही खरंतर बिनकण्याची जमात आहात. राज ठाकरे विरोधात ब्र उच्चारण्याची धमक तुमच्यात नाही. असं तर नाही की खोक्याभाऊ हे गद्दार या बिरुदापेक्षा तुम्हाला अधिक सन्मानजनक वाटतंय. अरे थू: !
कुणाल कामराच्या स्टँडअप शो मुळे दुसऱ्याच्या मालकीचा स्टुडिओ तोडणं हे अत्यंत चुकीचं अन् अपरिपक्व असं उत्तर होतं. खरंतर त्यानं कोणाचंही नाव घेतलेलं नव्हतं. अशा नेत्यांच्या सल्लागारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ आणि ते जपण्याचं महत्व उत्तम समजत असावं! ते त्यांनी आपल्या नेत्यांना समजावणं गरजेचं होतं. या देशात टीका करण्याचा, विनोद करण्याचा कोणालाही अधिकार आहे, तसाच अब्रुनुकसानी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही कोणालाहि अधिकार आहे. या घटनेनंतर तशी तक्रारही दाखल झालीय. अभिव्यक्त झालेला आशय स्वातंत्र्य वापरून केलाय, का तो स्वैराचार होता, हे सत्ताधारी राजकारण्यांनी नाही तर घटनेचा अर्थ लावणाऱ्या न्यायालयांनी ठरवायचंय. तशी न्यायालयीन कारवाई करता आलीच असती. पण ती तक्रार फारशी टिकणारी नाही याचा तरी अंदाज यायला हवा होता. मग मोडतोड कशाला आणि का? त्याचंही राजकीय निमित्त करायचंय का? 
राजकीय नेत्यांनी आपल्या भाषणांतून कोणतेही कसलेही जुमले करायचे, कोणावरही कोणत्याही पातळीवर जाऊन अत्यंत गलिच्छ शब्दांत टीका करायची, त्यांच्यावर तुटून पडायचं, बिनधास्तपणे खोटी माहिती सांगून दिशाभूल करायची, ते सारं चालतं का? संबंधितांनं आणि जनतेनं ते सारे निमूट ऐकून घ्यायचं. पण कोणी नाव न घेता व्यंगोक्ती, टीका टिपण्णी केलेली राजकारण्यांनी मात्र सहन करायची नाही. हे कसं चालेल? व्यंगचित्रकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार केला असं म्हणून त्यांच्यावर बंधनं आणणार आहात का? त्यांना तुरुंगात टाकणार का? कोणतंही मीम करायला कायदेशीर बंदी घालणार का? अडचणीत आणणारं छायाचित्र प्रसिद्ध केले म्हणून बदडणार का? आता लोकांना राडेबाजी, मोडतोड आवडत नाही. पूर्वीचे दिवस गेले. एरवी पाच ते सहा लाख व्ह्यू मिळणार्‍या कामराला त्याच व्हिडिओसाठी चाळीस लाख व्ह्यू मिळालेत, हे त्या तोडफोडीमुळेच! कामरा प्रकरणाला हाताळायचं धोरण पुर्णपणे चुकलंय असं वाटतं. असेच गंभीर विधानं काही महिन्यांपूर्वी केलेल्या, आणि आता मांडीला मांडी लावून बसणाऱ्या नेत्यांचं काय केलं गेलं? का तिथं राजकीय सोय आणि स्वार्थ आडवा आलाय का? जनतेच्या व्यक्त होण्यावर अनाठायी स्वैराचाराचे ठपके टाकून केली जाणारी मुस्कटदाबी उपयोगाची नाही. तिचं बुमरॅन्ग होण्याची शक्यताच अधिक असते, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवं! तितकी प्रगल्भता आपल्या राजकारणात असायला हवी. आता यावरसुद्धा, पूर्वी अमूक प्रकरणात का नाही बोलला? वगैरे प्रतिक्रियांना मी उत्तर देणार नाही. कारण कधी आणि कशावर व्यक्त व्हायचे, हे स्वातंत्र्यही मला घटनेने दिलंय....! आचार्य अत्रे, पु. ल.देशपांडे, द. मा. मिरासदार यांच्यापासून ते अगदी अलीकडचे कवी अशोक नायगावकर यांच्यापर्यंतच्या महान व्यक्तिमत्वांनी सुद्धा विनोदी लेखन आणि मिस्कील टीका टिप्पणी केलेलीय. नामदेव ढसाळ यांसारख्या विद्रोही कवींनी तर व्यवस्थेला उखडून टाकणाऱ्या कविता लिहिलेल्यात. विनोदातून विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याला विरोध होता कामा नये. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आज नासवला जातोय!
कुणाल कामराने एका व्हिडिओत थेट नाव घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, निर्मला सीतारामन, अंबानी वगैरे सगळ्यांवर टीका केलीय. पण बिल फाडलं गेलं फक्त एकट्या एकनाथ शिंदे यांच्या नावावर! विशेष म्हणजे त्यांच्या नावाचा त्या व्हिडिओत थेट उल्लेखही नाही. आता बाकी सगळे तात्पुरत्या 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'चा गजर करायला मोकळे! त्यामुळं हे तर गद्दारीवर शिक्कामोर्तबच आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पॉडकास्टमधल्या मुलाखतीत मोदी म्हणाले होते की, 'मी टीका सहन करू शकतो. सरकारवर टीका करणं हा विरोधकांचा अधिकारच आहे...!' आणि कुणाल कामराने टीका काय केली तर मोदींच्याच पक्षातले फडणवीस महाशय म्हणतात, 'अशाप्रकारे माजी मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. कामराने माफी मागितली पाहिजे...!' याचा अर्थ मोदींचं म्हणणं फडणवीसांना मान्य नाही हे स्पष्ट होतं. कामराने गाण्यात माजी मुख्यमंत्र्यांचे नावही घेतलेलं नव्हतं, फक्त 'गद्दार' शब्द वापरला होता, जो आजपर्यंत अनेकदा अनेकांनी वापरला होता. तरीही फडणवीसांना हा माजी मुख्यमंत्र्यांचा अपमान वाटतो. याचा अर्थ फडणवीसांना शिंदे गद्दार आहेत हे माहीत आहे, असाच होतो ना? वर ते शहाजोगपणे म्हणतात, 'संविधानाने अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिलंय म्हणून काय वाट्टेल ते बोलायचं...?' शिवाजी महाराजांचा अपमान वाट्टेल त्या गलिच्छ शब्दांत केला जातो त्याचं काय? म्हणजे नितेश राणे खुलेआम मुस्लीमद्वेष पसरवत फिरतात, त्याला स्वातंत्र्य म्हणायचं आणि कुणाल कामराने विडंबन गीताद्वारे खिल्ली उडवली तर त्याला स्वैराचार म्हणायचं का? नागपुरातल्या दंगलीत सहभागीं झालेल्यांवर त्वरित कारवाई करणारे हे सरकार स्टुडिओची तोडफोड करण्याऱ्यांवर कारवाई करणार काय? नेहरूंच्या काळात शंकर नावाच्या व्यंगचित्रकाराने नेहरूंवर टोकाची टीका करणारे व्यंगचित्र काढलं होतं. तरी नेहरू म्हणाले, 'डोन्ट स्पेअर मी, अशीच उत्तम व्यंगचित्रे काढत जा...!' आज असा दिलदारपणा दिसणे कठीणच ! बाळासाहेब ठाकरेंचे वारस असल्याचा टेंभा मिरवणारे बाळासाहेबांनी विरोधकांवर व्यंगचित्रातून मारलेले फटकारे विसरलेत काय? राज ठाकरेंनी लपूनछपून गुवाहाटीला गेलेल्यांना 'खोक्याभाई' संबोधले तो अपमान वाटला नाही? मोदींपासून भाजपतल्या अनेक नेत्यांनी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींची खिल्ली उडवली तेव्हा ती फडणवीसांना उच्च दर्जाची अभिव्यक्ती वाटली होती काय? 'चोराच्या मनात चांदणे' अशी शिंदे सैनिकांची अवस्था झालीय. राजनिष्ठा दाखवण्यासाठी तोडफोड करून त्यांनी 'गद्दारी' वर शिक्कामोर्तबच केलंय. कुणाल कामराच्या निमित्तानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय, मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नरडीला नख लावणारा कायदा महाराष्ट्रात लवकरच येऊ घातलाय हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. हा कायदा झाला तर कोणालाच सत्तेच्या विरोधात बोलता येणार नाही, टीका किंवा विनोद करता येणार नाही, रस्त्यावर उतरता येणार नाही, आंदोलन करता येणार नाही. दुसरी आणीबाणीच असेल ही. या कायद्याला विरोध झालाच पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि विरोधी पक्षांना एकत्र येऊन कायद्याला विरोध करावा लागेल. असं झालं नाही तर आपल्या सर्वांची बोलती बंद होणार आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९.




No comments:

Post a Comment

संघम् शरणम् गच्छामी...!

"नुकतीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक  मोहन भागवत यांची बहुचर्चित भेट झालीय. प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रचा...