"भाजपला सत्ता मिळवून देण्यात महत्वाची भूमिका घेतलेल्या जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांना प्रधानमंत्री मोदींनी 'यह पवन नहीं आँधी हैं...!' असं म्हणत कौतुक केलं होतं. त्यानंतर पवन कल्याण आंध्रचे उपमुख्यमंत्री बनले. सत्तेचं राज्यकारण करताना ते भाजपहून अधिक कडवट आणि आग्रही हिंदुत्ववादी बनले. चेहऱ्याच्या शोधात असलेल्या भाजपला पवन कल्याण यांची भूमिका आणि चेहरा भाजपच्या दक्षिणायनासाठी सोपान ठरू शकतो याची जाणीव झालीय. त्यामुळं त्यांना चुचकारणं सुरू झालंय. आगामी काळात त्यांनी भाजप प्रवेश केला तरी आश्चर्य वाटणार नाही. पण येत्या २२ मार्च रोजी होणाऱ्या दक्षिणेतल्या राज्यांच्या बैठकीत केंद्राकडून होणारी हिंदी भाषेची सक्ती अन् लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना यावर चर्चा होणार आहे. त्यात भाजपचा वंडर बॉय पवन कल्याण काय भूमिका घेणार त्यातून भाजपचा मनसुबा काय असेल हे स्पष्ट होईल."
--------------------------------------------------
देशात भारतीय जनता पक्षाचा दिग्विज्य सुरूच आहे. उत्तरेकडे विजय मिळवलाय, पूर्वेकडे बंगाल सोडला तर सगळी राज्य हाती आहेत. पश्चिमेकडील राज्यावर वरचष्मा राहिलेलाय. दक्षिणेकडे काही शिरकाव करता आलेला नाही. त्यासाठी भाजपचा जोरकस प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी त्यांना आता पवन कल्याण सारखा मोहरा हाती लागलाय. देशाच्या सत्ताकारणात भाजपला सत्तेपर्यंत नेऊन देशाचं राजकारण बदलणाऱ्या तेलुगू अभिनेते पवन कल्याण यांचा चेहरा हा भाजपच्या दक्षिणायनातला चेहरा ठरतोय. महाराष्ट्रात संघाचं मुख्यालय ९० वर्षाहून अधिक काळ असलं तरी संघ आणि जनसंघ - भाजप यांना जसा महाराष्ट्रात शिरकाव करता आला नव्हता. तो त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल हिंदुत्वाच्या साथीनं तो करता आला. जणू त्याचीच पुनरावृत्ती आंध्र प्रदेशात पवन कल्याण यांच्या माध्यमातून भाजप साधू पाहतेय. सत्ता हाती घेतल्यानंतर पवन कल्याण यांनी आपल्या भूमिकेला नवा आयाम दिलाय. ते अधिक कडवट, आग्रही हिंदुत्ववादी बनलेत. चंद्राबाबू नायडू यांना भाजपला सोबत घेण्यासाठी भरीला टाकण्यात पवन कल्याण हे कारणीभूत ठरले अन् त्यामुळं चंद्राबाबू यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्याला कुण्याकाळी विरोध केलेल्या मोदी शहांची भेट घ्यावी लागली होती. त्यामुळं सत्तेचं शिखर गाठता आलं, 'किंग मेकर' होता आलं. पण राजकारणाचे अनेक वारे पचवलेल्या चंद्राबाबूंना ही चाहूल लागली असावी म्हणूनच त्यांनी सावध भूमिका घ्यायला सुरुवात केलीय. भाजपला दक्षिणेकडे फारसं यश लाभलं नाही. कर्नाटक राज्यात यश मिळालं होतं पण तिथंही त्यांना सत्ताभ्रष्ट व्हावं लागलंय. तेलंगणा राष्ट्र समितीशी जुळवून घेतानाच त्यांना भाजपला विरोध करावा लागला. भाजपला दक्षिणेकडे चेहरा मिळत नव्हता. त्यांनी अनेकांची चाचपणी केली. एन. टी. रामाराव यांच्या कन्येला प्रदेशाध्यक्ष, केंद्रात मंत्रिपद देऊन पाहिलं पण त्यांना तिथं फारसं यश लाभलं नाही. चेहऱ्याच्या शोधात असतानाच भाजप तेलुगू देशम आणि जनसेना याच्या माध्यमातून पवन कल्याण यांचा चेहरा समोर आला. तो या तीनही पक्षांना यश देऊन गेला. त्यामुळं भाजपने पवन कल्याण यांना विशेष महत्व द्यायला सुरुवात केलीय. एकाबाजूला मुस्लिमांचा अनुनय करत चंद्राबाबू सत्ता सांभाळत असताना हिंदू मतांचा विचार करत भाजपने पवन कल्याण यांच्या माध्यमातून सत्तेचा तोल सांभाळलाय. आपल्याकडं मराठा आणि माळी समाजाचं प्राबल्य आहे अगदी तशाच प्रकारे आंध्र प्रदेशात कापू आणि कम्मा समाजाचं अस्तित्व आहे. त्यांच्या राजकीय शत्रुत्वाबाबत नेहमी बोललं जातं. टीडीपीकडे कम्मांचा पक्ष म्हणून पाहिले जातं आणि गेल्या काही वर्षांत ही छाप अधिकच वाढली. विरोधी पक्ष, वायएसआर यांनी आरोप केलेत की, टीडीपी सरकार कम्मा अधिकाऱ्यांना केवळ पक्षाच्या जवळ असल्यामुळे त्यांना महत्त्वाच्या पदांवर बढती देत होती. अशा परिस्थितीत आरक्षणासाठी संघर्ष करणारे कापू नेते टीडीपीकडे संशयानं पाहू लागलेत. जनसेना पक्षानं निवडणूक लढवण्याची घोषणा करेपर्यंत कापूसाठी वायएसआर काँग्रेस हा पर्याय होता. पण राज्य आणि सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी संख्यात्मकदृष्ट्या मजबूत समुदाय दलित आणि कापू म्हणजे शेतकरी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. आंध्र प्रदेशात दलित लोकसंख्येच्या जवळपास १७ टक्के आणि कापू २० टक्के आहेत. पवन कल्याण हे कापू समाजाचे असल्यानं आणि चंद्राबाबू हे कम्मा आहेत यांच्या युतीमुळे मतांचं सोपान गाठण्यास सहाय्य झालं, त्यामुळं त्यांची सत्ता येऊ शकली.
जनसेनेचे पवन कल्याण पिठापुरममधून ७० मतांनी विजयी झाले अन् त्यांची विधानसभेत प्रवेश करण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली! राजकारणात संयम खूप महत्त्वाचा असतो, आणि हाच संयम त्यांनी आणि त्यांच्या जनसेनेनं आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत दाखवला. पवन कल्याण हे पिठापुरममधून निवडणूक लढवत असल्याची घोषणा होताच जनसेना कार्यकर्त्यांनी त्यांचा विजय निश्चित आहे समजून आनंदोत्सव साजरा केला होता. पवन कल्याण यांना पराभूत करण्याच्या उद्देशानं जगनमोहन रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेसनं कापू समाजातल्या वनगीता यांना उमेदवारी दिली. वायएसआर काँग्रेसला वाटलं की मतांचं विभाजन होऊन पवन यांना सहज पराभूत करता येईल. दुसरीकडं, मुद्रागडा पद्मनाभम् सारख्या लोकांनी पवन कल्याण यांचा पराभव होईल असं सांगितल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष पिठापुरमकडं लागलं होतं. जनसेना पक्षाच्या स्थापनेला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, पवन कल्याण यांनी १४ मार्च २०२२ रोजी गुंटूर जिल्ह्यातल्या इप्पटम गावात झालेल्या बैठकीत 'मी सरकारविरोधी मतांचं विभाजन करणार नाही...!' अशी घोषणा केली होती. या घोषणेमुळे आंध्रप्रदेशच्या राजकारणात बदल झाल्याचं मानलं जातं. तोपर्यंत २०१९ प्रमाणेच २०२४ ची निवडणूक जनसेना एकटीच लढवेल असं वाटत होतं. पण, पवन यांच्या घोषणेनंतर जनसेना आणि तेलगू देसम एकत्र येतील असे आडाखे बांधले जाऊ लागले. पवननं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की, "ते मतदार तुमच्याप्रमाणेच माझ्या सभेत आले आणि त्यांनी माझ्या भाषणात टाळ्या वाजवल्या. मात्र मतदान केलं नाही, मला याचं दुःख नाही, कारण मी तुमच्यासाठी काम करतोय, आणि सतत काम करत राहणार आहे...!" पवन कल्याण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पटवून दिलं की, 'पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीत अपयश आलं, एकाच जागेवर विजय मिळाला. यापुढेही अशीच स्थिती राहिली कार्यकर्त्यांचा, मतदारांचा भ्रमनिरास होईल, मग आपण जोमानं कसं काय लढणार...?' त्यानंतर पवन यांनी भाजप, टीडीपी आणि जनसेना युतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. युती नको, असं म्हणून पक्षात विरोध होता. पण त्यांनी सर्वांना पटवून सांगितल्याचं आणि कार्यकर्त्यांच्या मनातलं मळभ दूर करून युतीचे शिलेदार त्यांनी तयार केलं!
पवन कल्याण नेहमी सांगतात की, व्यक्तीला माहिती असायला हवं की, नेमकं जायचं कुठं. त्यामुळं त्यांनी आपल्या ताकदीचा अंदाज नेमका आणि बरोबर लावला. भारतीय जनता पक्ष आणि तेलुगु देशम् पक्षामध्ये विळ्या भोपळ्याचे सख्य होते. कुण्या एकेकाळी भाजपसोबत सत्तेत राहिलेल्या चंद्राबाबू यांना नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर जी अपमानास्पद वागणूक दिली होती, त्यानं ते त्रासले होते. पक्षाची दारुण अवस्था करण्यात मोदींनी जगनमोहन यांना साथ दिली होती. याचा राग त्यांना होता. शिवाय ईडीची कारवाई आणि तुरुंगवास त्यांनी अनुभवला होता. त्याचा वचपा काढायचा त्यांचा विचार होता. पण पवन कल्याण यांच्या भेटीनंतर ती काहीसा मंदावला. धोरणी आणि मुत्सद्दी असलेल्या चंद्राबाबू यांनी वर्मी घाव घालायचा असेल तर एक पाऊल मागं घ्यावं लागतं या न्यायानं अपमान गिळला. काही साध्य करण्यासाठी प्रसंगी नमतं घेतलं. पवन कल्याण यांच्या आग्रहास्तव त्यांनी मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली. आंध्रच्या भवितव्यासाठी, आर्थिक गर्तेत सापडलेल्या तेलुगु बांधवांना बाहेर काढण्यासाठी केंद्रातल्या सत्तेची गरज भासणार हे जाणलं आणि युती करण्यासाठी पुढं पाऊल टाकलं. त्यांची ती खेळी किती योग्य ठरली हे काळानं दाखवून दिलं. केंद्रातील भाजपची सत्ता केवळ चंद्राबाबू यांच्यामुळेच अस्तित्वात आली. झालेल्या पराभवाचं उट्ट काढत त्यांनी आंध्रसाठी मंत्रिपदं घेतलीच शिवाय अर्थसंकल्पातला मोठा हिस्सा स्वतःकडे खेचण्यात ते यशस्वी झालेत! हे सारं घडलं ते केवळ आणि केवळ पवन कल्याण यांच्याचमुळे! त्यामुळं पवन कल्याण यांचं महत्त्व केवळ आंध्रमध्येच नाही तर भाजपच्या दक्षिणेकडच्या राज्यात शिरकाव करण्यालाही हातभार लागलाय. कर्नाटकातील सत्ता हातून गेल्यानंतर भाजपच्या दक्षिणायण प्रवासाला खीळ बसला होता. तो पवन कल्याण यांच्या प्रयत्नाने हे साध्य झाल्यानं नरेंद्र मोदी यांनी म्हणूनच 'पवन नहीं आंधी हैं l' असं म्हणत गौरवलं होतं!
भारतीय जनता पक्ष, तेलुगु देशम् आणि जनसेना या तीन पक्षांनी युती करायचीच या उद्देशानं विधानसभेच्या जागा आणि लोकसभेच्या जागा सामंजस्याने वाटून घेतल्या. जनसेनेनं विधानसभेच्या २१ जागा आणि लोकसभेच्या २ जागा जिंकल्यात, तर भाजपनं विधानसभेच्या १० जागा आणि लोकसभेच्या ६ जागा जिंकल्यात. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला विधानसभेच्या १० जागा आणि लोकसभेच्या ६ जागा मिळाल्या होत्या. विशेषतः जनसेनेनं ज्या जागा लढवल्या होत्या त्या सर्वच्यासर्व जागांवर म्हणजेच विधानसभेच्या २१ जागा आणि लोकसभेच्या २ जागा जिंकल्यामुळे जनसेना १००% निकाल मिळवणारा पक्ष बनला. विश्लेषकांचं म्हणणं आहे की, पवन कल्याण यांनी स्वत: बाजूला होऊन युतीचं मूल्य वाढवलं. जनसेना वेबसाईट उघडल्यावर एक प्रश्न समोर येतो, "एक पाऊल टाकून किती लांबचा प्रवास करणार हे महत्त्वाचं नाही. परिवर्तनासाठी मी राजकारणात प्रवेश केला आहे. माझ्याकडे एक मजबूत राजकीय व्यवस्था आहे. तुम्ही माझ्यासोबत प्रवास करायला तयार आहात का...?" वरील प्रश्न पवन कल्याण यांच्या राजकीय प्रवासाचा आरसा, प्रतिबिंब वाटतं. पवन कल्याण यांची बलस्थानं आणि त्यांच्या कमकुवत बाजूंची चांगलीच त्यांना जाणीव आहे. त्यांचा मोठा भाऊ सिनेमेगास्टार चिरंजीवी यांनी स्थापन केलेल्या प्रजा राज्यम पक्षामुळे त्यांना हा अनुभव मिळाल्याचं सांगितलं जातं. राजकारण आणि चित्रपट यातील फरक पवन कल्याण यांना समजणार नाही असं नेहमी म्हटलं जायचं. २०१४ मध्ये पवन कल्याण यांनी आपल्या जनसेना पक्षाची निवडणूक आयोगाकडं नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी विभाजन झालेल्या आंध्रप्रदेशच्या विकासासाठी आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र विकासासाठी तेलुगु देसम आणि भाजपला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत पवन कल्याण यांनी चंद्राबाबू आणि मोदींसोबत प्रचार केला.
२०१४ च्या निवडणुकीपासून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जनसेनेच्या प्रवासात अनेक बदल घडलेत. आंध्रप्रदेशला देण्यात येणारा विशेष दर्जा नाकारून विशेष पॅकेजच्या नावाखाली बनावट पॅकेज दिल्याची टीका पवन कल्याण यांनी केंद्रसरकारवर केली होती. यानंतर त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत डावे पक्ष आणि बसपासोबत युती करून निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी प्रवेश केला. पवन कल्याण यांनी विधानसभेच्या गजुवाका आणि भीमावरम् या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत जनसेनेचा दारुण पराभव झाला. त्यांनी लढवलेल्या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला. जनसेनेला केवळ एक जागा मिळाली. राजोलू मतदारसंघातून जनसेनेचे रापाका वरप्रसाद विजयी झाले. नंतर तेही वायएसआर काँग्रेसमध्ये गेले. त्या निवडणुकीत जनसेनेला ६ टक्के मतं मिळाली होती. पवन कल्याण यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यावेळी आर्थिक मदत देऊ केली आणि यात्रेमुळे त्यांचा राजकीय आलेख वाढल्याचा विश्वास सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला. अशात ९ सप्टेंबर २०२३ रोजी चंद्राबाबूंना पहाटे नंद्याला इथं अटक करण्यात आली आणि त्यांना राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं. यानंतर पवन कल्याण आणि चंद्राबाबू यांची तुरुंगात झालेली भेट ही आंध्रप्रीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. यानंतर पवन कल्याण यांनी २०२४ च्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे जाहीर केलं. शिवाय त्यांच्यासोबत भाजपही येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. पवन कल्याण यांनी निवडणुकीच्या प्रचारात मोलाची भूमिका बजावली. युती झाल्यानंतर पक्षांतर्गत समस्या बाहेर येऊ न देण्याची काळजी पवन कल्याण यांनी घेतली होती.
चौकट
येत्या २२ मार्च रोजी दक्षिणेतल्या प्रादेशिक पक्षांची एक बैठक चेन्नईत स्टॅलिन यांनी आयोजित केलीय. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना केली जातेय. त्या परिसिमनाला विरोध करण्यासाठी हे एकत्रित येत आहे. अटलजी प्रधानमंत्री असताना तसा प्रयत्न झाला होता. तो चंद्राबाबू यांनी हाणून पाडला होता. कारण लोकसंख्या नियंत्रण करण्यात दक्षिणेकडील राज्यांनी आघाडी घेतलेली आहे. याउलट उत्तरेकडील राज्यांमध्ये लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढलीय. यामुळं दक्षिणेकडील खासदारांची संख्या कमी होतेय अन् उत्तरेकडील संख्या वाढतेय. दक्षिणेचा आवाज संसदेत कमी होणार आहे. त्यामुळं दक्षिणेकडील राज्यांवर होऊ घातलेली हिंदीची सक्ती, मतदारसंघाचं परिसीमन अशा मुद्द्यावर ही बैठक आयोजित केली आहे. याबाबत चंद्राबाबू यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यासाठीच त्यांनी स्टॅलिन, रेवंत रेड्डी यांनी अधिक मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलंय. त्यासाठी सरकारकडून बक्षिसी, सवलती जाहीर केल्या आहेत. पण पवन कल्याण यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही १४ मार्च रोजी त्यांच्या जनसेना पक्षाचा वर्धापनदिन आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाचं अधिवेशन बोलावलं आहे. त्यात ते कोणती भूमिका मांडतात हे महत्वाचं आहे. कारण पवन कल्याण यांची जी भूमिका असेल तीच भाजपची असेल. त्यामुळं परिसीमन प्रलंबित राहतेय की, अंमलबजावणी करून भाजप रोष ओढवून घेईल हे स्पष्ट होईल. इथल्या स्थानिक प्रसिद्धीमाध्यातून याबाबत सतत टोकाची भूमिका घेतलेली आहे. काही नेत्यांनी तर भारतातून फुटून दक्षिण भारत हे नवं राष्ट्र असावं अशी भूमिका घेतलीय. हे अधिक भयानक आणि वेदनादायी आहे. त्यावर लवकरच उपाय केंद्राला काढावा लागणार आहे.
हरीश केंची
९४२२३१०६०९
No comments:
Post a Comment